'अशी ही अदलाबदली' - पाककृती क्र.१ : गाजर आणि चणा डाळ वडी

Submitted by संयोजक on 11 September, 2015 - 02:58

गोव्यामध्ये टोस नावाचा एक गोड पदार्थ करतात. चण्याची डाळ, नारळ आणि साखर असतात त्यात. याच पदार्थात गाजर मिसळून केलेला एक प्रकार.

तर यासाठी लागणारे घटक -

१) ३ कप गाजराचा कीस
२) १ कप चणाडाळ
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून
४) २ टेबलस्पून तूप
५) पाऊण कप साखर (चवीप्रमाणे कमी-जास्त)
६) वासासाठी वेलची / जायफळ / केशर

कृती -

१) प्रेशर कूकरमध्ये थोडे तूप तापवून त्यात गाजराचा कीस परतून घ्या. प्रेशर न लावता २ मिनिटे ठेवा आणि मग शक्य तितका कोरडा करून घ्या.

Gajare.JPGShijavalele Gajar.JPG

२) कीस बाहेर काढून त्याच कूकरमध्ये आणखी थोडे तूप घालून चणाडाळ मंद आचेवर परता. कूकर तापलेलाच
असल्याने डाळ लवकर भाजली जाते. अगदी खमंग भाजायची नाही. सोनेरी झाली की बास.

chaNyachee DaaL.JPG

३) मग त्यात दीड ते दोन कप पाणी टाकून झाकण लावा. प्रेशर येऊ द्या. ते आल्यानंतर ५ ते ८ मिनिटे शिजवा.

४) कूकर थंड करून झाकण काढा. (जास्तच पाणी राहिले असेल तर ओतून घ्या, थोडे पाणी राहू द्या) डाळ डावेने ठेचून घ्या. अगदी बारीक करायची नाही. त्यात साखर मिसळा व परत मंद आचेवर ठेवा. सतत हलवत राहा.

५) एक कढ आला की त्यात त्यात खोबरे टाका व मिश्रण नीट मिसळून घ्या.

६) मग त्यात गाजराचा कीस टाका व ढवळत राहा. पाच दहा मिनिटांत मिश्रणाचा गोळा जमू लागेल. तसा जमला की आच बंद करा.

Shijalele mishraN.JPG

७) त्यात वेलची / जायफळ / केशर मिसळा.

८) तूप लावलेल्या ताटात मिश्रण ओता व सपाट करून घ्या, थर साधारण १ सेमी जाडीचा असू द्या.

या वड्या मऊसर आणि बेताच्या गोड होतील. एक-दोन दिवस टिकतील. जास्त टिकवायच्या असतील तर साखर जास्त घालावी लागेल व मिश्रण घट्ट होईपर्यंत आटवावे लागेल. या वड्या नारळाच्या दुधासोबत छान लागतात. नुसत्याही छान लागतात.

vaDee close up.JPGपाककृती मधील बदलण्याचे घटक -

१) गाजर
२) चणाडाळ

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हो झंपी, कुणी सिमला मिर्ची आणि किन्वा पण वापरू शकेल. पदार्थ जमला पाहिजे ( त्याचा पुरावा म्हणून फोटो हवा ) आणि खाण्याजोगा असावा ( त्याचा पुरावा नको ) Happy

आंब्याच्या वड्या-
एक वाटी लाल भोपळ्याचा कीस
एक वाटी ओले खोबरे
एक वाटी साखर

तिन्ही कढइत परतून आटत आले की दोन चमचे तुप सोडून थोडे परता.अर्धे लिंबू पिळून पाटावर तुपाचा हात लावून पसरा आणि वड्या पाडा.
करून फोटो टाका झटपट.

मस्तच!! कल्पना आवडली. मजेदार आहे. वडी उचलून खाऊन टाकावी असं वाटतं इतका मस्त फोटो.

पण हे स्पर्धा- प्रश्न म्हणजे द्राविडी प्राणायाम आहे. "अर्धा कप ओले खोबरे, २ टेबलस्पून तूप, पाऊण कप साखर, वेलची ह्यात दोन प्रमुख घटक पदार्थ घालून पाककृती लिहा" असा सरळ पाच मार्काचा प्रश्न द्यायच्या ऐवजी पार १६ मार्काचा निबंध झाला Wink Happy

संयोजकांच्या विपुत एक भारी प्रश्न सापडला.

>>कोणीतरी "मी गाजराच्या ऐवजी चणाडाळ वापरली आणि चणा डाळी ऐवजी गाजर" असे म्हणून तीच पाककृती देता येईल Wink <<

**एस आर डी, चणाडाळ राहिली ना, त्या ऐवजी पण काहीतरी वापरावे लागेल ***
एवढेच ना ?
मुगडाळ हलवा मिसळा.वेलची पुड, केशर तिखट पदार्थ सोडून कुठेही बसते.
( नाहीतरी कूटप्रश्नाची दिलेली पाकृती म्हणजे गाजर हलवा अधिक श्रावणातले पुरण हे कोणीही ओळखेल ).

एस आर डी, वड्याच करा असे बंधन नाही. त्यामुळे कुणी अ‍ॅव्हकाडो सारणात घालून त्याचे उकडीचे मोदक केले तरी नियमात बसेल.

३) मग त्यात दीड ते दोन कप पाणी टाकून झाकण लावा. प्रेशर येऊ द्या. ते आल्यानंतर ५ ते ८ मिनिटे शिजवा.>>

एवढ्यावरनंच दिनेशदांची ओळखू येत्येय.
शिट्ट्या काढल्या नाहीएत दोन तीन बाकीच्यांसारख्या.
Wink

एवढ्यावरनंच दिनेशदांची ओळखू येत्येय.
शिट्ट्या काढल्या नाहीएत दोन तीन बाकीच्यांसारख्या.
डोळा मारा>>> +१ Lol

संयोजक, तुम्ही नियमात हे नाहि लिहिलेत ह्यावेळी,
रेसीपी मायबोलीवर लिहिलेली, वाचलेली, दुसर्‍या साईटवरून उचललेली नसावी. Proud

मूळ पाककृतीतील घटक :
३) अर्धा कप ओले खोबरे, बारीक वाटून

संयोजकांनी दोनदा दिलेले स्पष्टीकरण :" तसेच बदलून घालायचा पदार्थ कच्चा, चिरून, सोलून, वाळवून, कशाही प्रकारे शिजवून, भाजून, उकडून, गार करून कसाही घालू शकता"

ओले खोबरे न वाटता घेतलेले चालवाल ना?

Pages