अंड्याचा उपमा - मिडनाईट स्नॅक्स - पुरुषांसाठी

Submitted by ऋन्मेऽऽष on 5 September, 2015 - 16:59

म्हणजे बघा हं, विकांत सुरू झाला आहे. दुसर्‍या दिवशी दुपारपर्यंत झोपण्याव्यतिरीक्त काही स्पेशल प्लान नाही. म्हणून आजची रात्र जागवून स्वत:शीच मैफल जमवायची आहे. पण रात्री दिड-दोन वाजता अचानक पोटातले कुत्रे भुंकू लागले आहेत. पोटाला आधार देण्यासाठी काहीतरी हलकाफुलका स्नॅक्स विचार करत आहात. पण ते करून देणारी आई झोपली आहे. किंवा जागी असली तरी अश्या रात्री अपरात्री तिने काही करून देण्याऐवजी तिच्याकडून ‘झोप मुकाट’ असाच सल्ला मिळण्याची शक्यता जास्त आहे.

जर तुम्ही विवाहीत पुरुष असाल तर कदाचित तुमची स्थिती आणखी बिकट असेल. तुम्ही आपल्या बायकोला काही बनवायला सांगताच, ‘आज तूच बनव ना रे, माझ्यासाठी सुद्धा’ अशी मागणी होण्याची शक्यता आहे. इथे ‘मांझी - द माऊंटन मॅन’ चित्रपटासारखाच एक डायलॉग आठवतो. "बीवी के भरोसे मत बैठो. का पता, वो खुदही तुम्हारे भरोसे बैठी हो.."

तर थोडक्यात तुम्हालाच तुमच्या भूकेची सोय करायची आहे.

आता एक मॅगी काय ती तुम्हाला जमत होती पण त्यावरही सरकारने बॅन आणला आहे. राहता राहिली कॉफी. पण ती काही पोट भरायला काफी होत नाही.
त्यामुळे तुम्ही अश्या एखाद्या पदार्थाच्या शोधात आहात जो तुम्हाला सहज जमून जाईल. कमी वेळात होईल. एखादे साहित्य कमी जास्त असल्यास चालून जाईल. आणि तुमच्या पोटाला झोप येईपर्यंत आधार मिळेल..
तर हो. तुम्ही योग्य धाग्यावर आला आहात.

टूनाईट स्पेशल - अंड्याचा उपमा - माझा एक अत्यंत आवडता पदार्थ
(काल रात्री पैल्यांदाच केला, आणि प्रचंड आवडला)

मुख्य साहित्य - शिळे ब्रेड स्लाईस. किमान १२ तास शिळे. मी वापरलेले ३६ तास शिळे आणि फ्रिजमधील थंड गार होते.
फोडणीचे साहित्य - तेल-तूप, जिरा-हळद, मीठ-तिखट, लसूण-टमाटर, मोहरी-कडीपत्ता आणि परवडल्यास कांदा आपापल्या ऐपतीनुसार.
ईतर घटक - शेव-कोथिंबीर, लिंबू-मिरची
अंडे शीर्षकात आहेच.

कृती - जशी कुठल्याही भाजीला वा कांदेपोह्याला फोडणी देतात तशी देऊन घ्यायची. आणि योग्य वेळ बघून त्यात ब्रेड स्लाईसचे छोटे छोटे तुकडे करून सोडायचे. चमच्याने छानपैकी ढवळून घ्यायचे.

बस्स एवढेच.
इथवर कृती आली आणि भूक अनावर झाली, तर त्या पदार्थाला ‘ब्रेड उपमा’ हे नाव देत खाऊ शकता.
पण अंड्याचा उपमा साठी आपल्या अंगातील जनावर थोडे आणखी रोखून धरणे गरजेचे आहे.

आता,
एखाद्या कढईमध्ये तेल तापवून घ्या आणि त्यात मस्तपैकी फेटलेले अंडे सोडा.
अंड्यांचे प्रमाण दोन ते तीन ब्रेड स्लाईसमागे एक अंडे असे राहील.
गॅस बारीकच ठेवा आणि अंडे अर्धकच्चे स्थितीत येताच त्यात वर तयार केलेला ब्रेड उपमा मिसळून घ्या.
अंडे पुर्ण फ्राय व्हायच्या आधी ते ब्रेडच्या सर्वांगाला लागेल याची काळजी घेत पटापट हात चालवत मिक्स करून घ्या.

अंडे वा ब्रेड, दोहोंपैकी काहीही करपायच्या आधी त्याला एका प्लेटमध्ये काढून घ्या. वर लिंबू पिळत शेव-कोथिंबीरची गार्निशिंग करा. सोबत मिरची चावायला घ्या.

तयार पदार्थ असा दिसतो. मी वर उल्लेखलेले अतिरीक्त संस्कार केलेले नाहीयेत.

andya upma 1.jpg

मात्र अधूनमधून टॉमेटो सॉसचे एखादे बोट चाटणे या पदार्थाची लज्जत वाढवून जाते.

andya upma 2.jpg

फोटो रात्रीचे असल्याने थोडे पेंगुळलेले आलेयत. त्यामुळे अगदीच तोपासु दिसत नसले तरी विश्वास ठेवा, खाताना पाणी सुटतेच.

फोटोमध्ये दिसतेय तेवढेच मी बनवले आणि तेवढेच खाल्ले असे नसून, फोटोत फाफटपसारा दिसू नये म्हणून ताटाला आटोपशीर ठेवलेय.
उलट मी तर म्हणेन भुकेपेक्षा चार घास जास्तच बनवा, कारण एकदा या पदार्थाची चव लागली की ते खाल्ले जातातच.

अधिकच्या टिपा -
-------------------------
एवढी वर कृती लिहिली, फोटो टाकले, तरी अधिकच्या टिपा हव्यातच का..
बरं घ्या,

हा मध्यरात्री खायचा पदार्थ असल्याने खालील तीन गोष्टी खाण्याआधी, खाताना, खाऊन झाल्यावर कायम लक्षात ठेवा.

१. खाण्याआधी कॅलेंडर चेक करायला विसरू नका. कदाचित बारानंतर तुमची संकष्टी सुरू झाली असेल.
२. खाताना तोंडाचा आवाज करू नका. कदाचित तुमचे शेजारी गाढ झोपेत असू शकतात.
३. खाऊन झाल्यावर भांडी तशीच किचन सिंकमध्ये पडून राहीली तरी हरकत नाही, पण दातांना स्वच्छ ब्रश करा आणि खळखळून चुळा मारा. नाहीतर सकाळी दाताला पावाची बुरशी पकडली असेल.

धो. सू. - शाकाहारी लोकांनी अंड्याला पर्याय काय विचारताच त्या पाककृतीचा स्वतंत्र धागा काढण्यात येईल. Happy

माहितीचा स्त्रोत - गर्लफ्रेंड
तिचाच,
ऋन्मेऽऽष

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारी लिहीलीय.
मी पण कांदा घालून छान लागेल लिहिणार होते, पण रेसिपी पुरुषांनी स्वतः बनवून स्वतः खायची असल्याने विचार सोडून दिला.
Happy

मामी, यस्स्स!! पावभाजी चा मसाला घालून केलेली अंडा भुर्जी मस्त लागते..

छानै रेसिपी.. पण मध्यरात्री इतकी काटाकूटी, परतापरती, वॉव, उत्साही आहेस!!!

रेसिपी पुरुषांसाठी असे शीर्षकात ठसठशीत लिहूनही सारे प्रतिसाद महिलांचेच.
बहुधा पुरुषांमध्ये काय शिजतेय हे बघायची उत्सुकता Happy

पण मध्यरात्री इतकी काटाकूटी, परतापरती, वॉव, उत्साही आहेस!!!
>>>>
अहो वर्षू नील ताई, मां इतनी भी बुरी नही होती. आपण थोडा पुढाकार घेतला तर ती एखादा कांदा चटकन विळीवर कापून आणि कढई चमचे पटकन धुवून देतेच Happy
बाकी हे मध्यरात्रीच लॅपटॉपला तासाभराचा ब्रेक देत करण्यात गंमत आहे.

पावभाजी मसाल्याचा सल्ला नोट करण्यात आला आहे.

ओ ऋन्मेष, या रेस्पीत जर आई ने मदत केलीये तुला तर तिला पण क्रेडिट दे की म!!! Happy

ते टायटल वाचून पुरुषांनी एकट्यांनी, स्वतः साठी करावी ही डिश, असा मेसेज जातोय ना.. Happy Happy

मस्तं आयडिया आहे. "अल्टरनेटिव्ह टू अंडा भुर्जी ..." बरोबर. सहमत. अंडाभूर्जी आणि टोस्ट पण.

छान.... पाककृती आवडली....

ब्रेडला पर्याय म्हणुन मी भात वापरतो... कृती सारखीच आहे. मग त्या प्रकाराला भुर्जी - राईस म्हणायचे. चक्क लन्च साठी... Happy

ओ वर्षू नील ताई दिलं की प्रतिसादात क्रेडीट .. आईला अश्या छोट्यामोठ्या गोष्टींचे क्रेडीत देत बसलो तर सारी पाने तीच भरभरून उरेल Happy

उदय,
@ भुर्जी राईस - आईच्या फोडणीच्या भातात अंड्याची प्लेन ओलसर भुर्जी बनवून मिक्स करतो मी .. सोबत लोणचे घेतो आणि पापड भाजतो

. आईला अश्या छोट्यामोठ्या गोष्टींचे क्रेडीत देत बसलो तर सारी पाने तीच भरभरून उरेल ->>>

हे भारी आहे!
जियो!

साती Happy

अंड खात नाही. पण ह्यात कांदा, मटार, अजून काही भाज्या आवडत असल्यास (फ्लॉवर, कोबी) आणि मध्यरात्री उपलब्ध असल्यास चांगलं लागेल बहुतेक. अंड्याबरोबर कशा लागतील माहिती नाही.

कारण ब्रेड अशा विविध भाज्या घालून करते मी. पावभाजी मसाला पण घालते कधी, कधी. चाट मसालापण घालते.

लिहीलेलं भारी आहे, आवडलं.

Pages