गाजराची कोशिंबीर

Submitted by साहिल शहा on 29 August, 2015 - 14:44
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

३ मध्यम आकाराचे गाजर,
१/४ कप मुगडाळ
२ हिरव्या मिरच्या
२ चमचे तेल,
धणेजिर्याची पुड,
मोहरी
जिरे
कडिपत्ता

चवीनुसार मिठ , लिंबु, साखर

क्रमवार पाककृती: 

मुगाची डाळ तासभर भिजत ठेवावी.
गाजर खिसुन ताटात घ्यावेत. त्यावर मुगाची डाळ (पाणी ड्रेन करुन), धणेजिर्याची पुड , मिठ , साखर टाकावी. वरुन चवीनुसार लिंबु पिळावा.
कढईत तेल गरम करुन त्यात मोहरी , जिरे, मिरची आणि कडिपत्ताची फोडणी द्यावी. गरम फोडणी वरिल मिश्रणात टाकुन चांगले मिक्स करावे.

IMG_0756.JPG

वाढणी/प्रमाण: 
२-३ जणाकरिता
अधिक टिपा: 

जेवताना तोंडीलावणी म्हणून हि कोशिंबीर छान लागते.
जर मुगडाळ भिजत घालायला वेळ नसेल तर मुगडाळ फोडणीत घातली तरी चालते.

पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आहा मस्त वाटतेय..
नविन काहीतरी.. डाळ घालुन कधी कुठली कोशिंबीर खाल्ली नै..दही घातलेली हरभर्‍याच्या ड्ळीची चटणी सोडता.. गाजराची हिवाळ्यापर्यंत वाट पाहावी लागणार आता..
मला ते केशरी रंगाचे गाजरं नै आवडत अज्जिब्बात..
नोंद करुन ठेवावी लागणार करायच्या यादीत Happy

मी परवा ह्याच रेसिपीने गाजराची भाजी केली होती.
आमची गाजराची कोशिंबीर वेगळी असते म्हणजे डाळ वगैरे घालत नाही. दाण्याचं कूट वगैरे घालतो.

केशरी रंगाचे गाजर मला पण आवडत नाही पण ह्या कोशिंबिरीमध्ये चालते.

ही कर्नाटकातिल पध्धत आहे. काही जण ह्यात ओल्या खोबर्याचा खीस पण टाकतात.

वेगळी पद्धत. करून बघेन. फोटो छान.

सायो यांनी लिहिल्याप्रमाणेच आम्ही करतो ही कोशिंबीर.

सासरी कोकणात घरचे नारळ असल्याने तिथे सगळ्याच कोशिंबिरीत ओले खोबरे टाकतात. इथे आम्ही दाण्याचे कुट टाकतो.

आम्ही अशी पडवळाची करतो. ती पण हिरवी पिवळी छान दिसते आणि छान लागते.

आता गाजराची अशा पद्धति ने करुन बघेन.

आमची पण रेस्पी सायो म्हणते तशी दाकु घालून. ही सौदिंडियन पद्धत आहे ना? भिजवलेली असली तरी मला कच्ची मुगाची डाळ आवडत नाही म्हणून अशा पद्धतीनं केलीच तर फोडणी तडतडली की भिजलेली डाळ त्यात घालते आणि मग ती फोडणी गाजराच्या किसावर ओतते.

१)गाजराच्या किसावर हिंग,मोहरीची फोडणी, साखर्,मीठ ,ओले खोबरे(ऐच्छिक)
२)गा.की.+ लिंबू
३)गा.की.+ आवळा कीस

मी गाजराची भिजवलेली मूगडाळ व वरून फोडणी घातलेली कोशिंबीर बंगळुरात अनेकदा खाल्ली आहे. मस्त लागते. (धणे जिरे पूड वगळून बनवलेली)

यात आवडत असल्यास मोड आलेले हिरवे मूग (कच्चे किंवा वाफवलेले) घालून बघा. छान लागतात. तसेच बारीक चिरलेला टोमॅटो / कोचवलेली काकडी / डाळिंबाचे दाणे / भिजवलेले कच्चे शेंगदाणे/ ओला नारळ वगैरेही सोबत घालतात कधी कधी या कोशिंबिरीत. नेहमीपेक्षा जरा वेगळी चव.
घरी मात्र दा.कू. घालूनच ही कोशिंबीर केली जाते.

आवडती कोशिंबीर आहे. Happy मस्त फोटो.

ह्यात मनुका पण घालतात कुणी कुणी. कोशिंबीरीला सुटलेल्या पाण्यात मस्त फुगतात. वेगळी चव येते.

सगळ्याना धन्यवाद,

अकु,
तुम्ही सांगितलेले प्रकार मी नक्की करुन बघेत.
धण्याजिर्याची पुड , दाण्याचा कुट उत्तर कर्णाटकात जास्त वापरतात. दक्षिणेला त्याचा वापर सहसा होत नाही.

दिनेश,
पडवळ ईकडे मिळत नाही मुळ्याची करुन बघेन.

सि,
ह्या कोशिंबिरिला पाणि नाही सुटत. फोटो कोशिंबिर केल्यावर अर्ध्या तासानी काढला आहे. जर टॉमेटो/ काकडी घातले तर पाणि सुटेल आणि मग त्यात मनुका चांगल्या लागतिल.

खास ह्या कोशिंबीरीसाठी मी इथे फरार पार्क ला लागून एम. टी. आर आहे तिथे जातो. इथे फक्त तिथेच ही कोंशिबीर मिळते. इथे ओल्या नारळाचा किस पण घालतात. हिंगाची चव देखील लागते.

आम्ही पण अशी कोशिंबीर करतो. फक्त त्यात मूग डाळ नसते. ती घालून करून बघेन.

पण ह्यात आम्ही डाळिंबाचे दाणे घालतो. अशी डाळिंबाचे दाणे आणि वरून कोथिंबीर घातलेली कोशिंबीर फार सुन्दर दिसते आणि मध्ये मध्ये डाळिंबाचे दाणे दाताखाली फार छान लागतात.

ह्यात थोडासा टोमॅटो घातला तरी छान लागतो. फक्त तेव्हा ह्यात थोडं लिंबू कमी घालायचं नाहीतर फार आंबट होईल.

आम्ही दा. कू वाले. पण मी या कोशिंबीरीत बरेचदा एखादी काकडी पण किसून ढकलते. फक्त तसं केलं तर अगदी पानावर बसायच्या आधी काकडी मिसळून फोडणी घालते नाहीतर पाणी पाणी होतं Proud