वैद्यकीय इच्छापत्र

Submitted by प्रकाश घाटपांडे on 29 August, 2015 - 03:56

२२ ऑगस्ट २०१५ रोजी कोथरुड येथे यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात माझ्या सुखांताचा माझा विचार या विषयावर परिसंवाद झाला होता.खाली नमूद केली वैद्यकीय इच्छापत्र हे नमुन्या दाखल आहे. यात प्रत्येक व्यक्ती आपल्या इच्छेनुसार बदल करु शकते. ऎड असीम सरोदे यांनी स्थापन केलेल्या सहयोग ट्रस्ट तर्फे इच्छामरण या विषयावर समाजप्रबोधनात्मक कार्यक्रम घेतले जातात. डॉ शिरीष व डॉ आरती प्रयाग ( वैद्यकीय क्षेत्र) असीम व रमा सरोदे ( कायदा क्षेत्र) मंगला आठलेकर, डॉ रोहिणी पटवर्धन ( वृद्धकल्याणशास्त्र) शुभदा जोशी, विद्या बाळ व रविंद्र गोरे असा एक गट या विषयावर काम करतो आहे. वैद्यकीय इच्छापत्रा आधारे इच्छामरणाला कायदेशीर आधार मिळवण्यासाठी सहयोग ट्रस्ट काम करत आहे. आपण जर हे वैद्यकीय इच्छापत्र संमती व शक्य असल्यास त्यांचे कडे पाठवले तर जनहित याचिकेला जोडता येईल.
सहयोग ट्रस्ट
१, प्रथमेश सहकारी गृहरचना सोसा, प्रभात रोड गल्ली नं ५, पुणे ४११००४
फोन नं- ०२० २५४५९७७७
sahayogtrust.in
वैद्यकीय इच्छापत्र
माझे कुटुंबीय,माझ्या आरोग्याबाबत आस्था बाळगणारी मंडळी आणि माझे डॉक्टर यांच्यासाठी मी हे वैद्यकीय इच्छापत्र लिहून ठेवत आहे.

मी------------------------------------------------------------------------------------------------------------------
जन्मतारीख-.--------------------------------------------------- वय------------------------------------------------
माझा पत्ता-----------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------------------------

१) मी मृत्युशय्येवर असेन, लवकरच मरण्याची शक्यता दिसत असेल, आणि मी बोलण्याच्या परिस्थितीत नसेन अशा अवस्थेत माझ्यावर केल्या जाणार्याच उपचारांसंदर्भात मी हे वैद्यकीय इच्छापत्र करुन माझी इच्छा स्पष्टपणे नोंदवून ठेवत आहे
२) आपल्या राज्यघटनेत नमूद केलेल्या, जगण्याचा अधिकार या संकल्पनेची, तसेच अविष्कार स्वातंत्र्याच्या मूलभूत हक्काची मला पूर्ण माहिती आहे. सन्मानाने जगणे व सन्मानाने मरणे या भूमिकेला माझा पूर्ण पाठिंबा आहे.
३) माझ्या आजारपणात मला जगवण्यासाठी जे उपचार केले जातील त्यासंबंधी स्पष्ट सूचना मी माझ्या संबंधीतांसाठी पुढीलप्रमाणे लिहून ठेवत आहे.
अ) मी मरणाच्या दारात असेन ,किंवा गाढ बेशुद्धीत असेन, तर माझा मृत्यू लांबवण्याकरिता काहीही उपचार करु नयेत, शरीराला सुया टोचून औषधोपचार करण्याचा किंवा कृत्रिम साधनांच्या मदतीने मला जगवण्याचा प्रयत्न कृपया करु नये.कारण अशा अवस्थेत आपल्या परावलंबनाचे ओझे इतरांवर टाकणे आणि जगत राहणे हे मला कीव करण्यासारखे आणि म्हणुनच घृणास्पद वाटते.
ब) अशा प्रकारे केवळ जगवण्यासाठी जर उपचार सुरु झाले असतील आणि तेही मला सन्मानाचे जिणे जगण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार नसतील तर मला असे निरर्थक जीवन जगण्याची अजिबात इच्छा नाही. म्हणुन हे उपचार ताबडतोब थांबवावे अशी माझी आग्रहाची विनंती आहे.
क) मी असाध्य रोगाने आजारी आहे, एकूणच जगण्याच्या शक्यता मंदावल्या आहेत, किंवा बेशुद्धीतून मी बाहेर येण्याची ही आशा नाही, अशा अवस्थेत मला कृत्रिमरित्या अन्नपाणी देउन जगवण्याचा खटाटोप करु नये. मला आग्रहपूर्वक सांगायचे आहे की,मला अशा परिस्थितीत कृत्रिम रित्या जिवंत ठेवण्याचे सारे उपचार मी नाकारु इच्छितो/ इच्छिते.
ड) मला माहित आहे की,मी काहीही इच्छा नोंदवून ठेवली असली तरी वैद्यकीय तज्ञांशी सल्लामसलत, विचारविनिमय केला जाईल; पण मला ठामपणे म्हणायचे आहे की, याबाबत कायदा असे स्पष्टपणे सांगतो की, अशा परिस्थितीत माणुस स्वत: बोलू शकत नसेल तर त्याच्या इच्छापत्राचे ऐकावे.म्हणुनच माझ्या बाबतीत या संदर्भातील निर्णयाची जबाबदारी घेणार्या सर्वांना माझी पुन:पुन्हा विनंती आहे की, माझ्या वैद्यकीय इच्छापत्राचा मान राखला जावा.
४) माझ्यावर प्रेम करणार्यान, माझ्याविषयी आस्था बाळगणार्‍या सार्‍यांसाठी या इच्छापत्रातून सांगू पहात आहे की, ज्यावेळी कृत्रिम जीवनाधारांच्या मदतीनंतरही मी पुन्हा पहिल्यासारखा स्वावलंबी सहज जीवन जगू शकणार नाही, त्यावेळी तशा अवस्थेत जिवंत राहण्याची माझी इच्छा नाही. त्यावेळी मी सुदृढ मनाने निर्णय घेण्याच्या अवस्थेत मी नसेन, म्हणुनच इथे विचारात घेतलेल्या शक्यतांच्या पलिकडे तुम्हाला काही विचार करुन निर्णय घेण्याची वेळ आलीच तर सन्मानाने जगणे आणि तसेच सन्मानाने मरणे या माझ्या ध्यासाची तुम्ही आठवण ठेवा. हे वैद्यकीय इच्छापत्र मी कुणाच्या दबावाखाली नव्हे तर स्वत:च राजीखुषीने करत आहे.
मी-------------------------------------------------------------------------------------------
खाली साक्षीदारांसमक्ष दि. ------------------------------रोजी वैद्यकीय इच्छापत्रावर माझी सही करत आहे.
----------------
सही
साक्षीदार १)---------------------------------------------------------- सही----------------------------------
साक्षीदार २)---------------------------------------------------------- सही----------------------------------
साक्षीदार ३)---------------------------------------------------------- सही----------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

राज, तुमच्या पोस्ट्शी सहमत.

जर दुसरा कोणी मरणासन्न यातना भोगत असेल आणि त्या माणसला शुध्ध नसेल किंवा वेजिटेटिव स्टेटमध्ये असेल तर आपण त्या जागी असेल तर लोकानी काय केले पाहिजे ह्यावर विचार करुन निर्णय घेतला पाहिजे.

"माणूस" जगवण्याचा शक्य तितका प्रयत्न केलाच गेला पाहिजे ह्या गोष्टीशी तर सहमत आहेच पण माणुस तरुण असतो, उपचार करुन तो हिंडु-फिरु शकतो त्यावेळी.
वयस्कर माणुस मरणासन्न यातना भोगत असेल अश्यावेळी रुग्णालयात ठेऊन अंगाला सुया टोचुन, घशात मशिन घालुन त्या माणसाला त्रास देण्यात काय अर्थ आहे. जाईनी देइल्याप्रमाणे डॉक्टरनी admit करून घेण्यास नकार दिला ते माझ्या मते चांगले केले. जर admit केले असते तर औषधानी आजुन काही दिवस जगल्या असत्या पण त्याचा त्याना किती त्रास झाला असता.

मागच्याच आठवड्यात एका आजींना भेटायला गेलो होतो. वर्षभर त्या अंथरुणाला खिळलेल्या होत्या. त्यामुळे जखमा देखील झाल्या होत्या.
त्यांना काहीच शुद्ध नव्हती. आपल्याच ग्लानीत होत्या. भेटायला येणारे जाणारे त्यांना जबरदस्तीने हलवून "मी आलोय, मला ओळखलं का?" असे विचारत होते. त्या बिचार्‍या डोळे किलकिले करुन बघत नि परत डोळे मिटत.

ते डोळे किलकिले करतना त्यांना होणार्‍या यातना जाणवत होत्या. पण त्या विजीटर्सची काय अपेक्षा होती काय ठाऊक.

एक बाई तर जबरदस्तीने ज्युस पाजत होत्या. आजींना गिळवत देखील नव्हते, पण या काकु बळजबरीने कोंबत होत्या.

आधीच आजारपण, त्यात चाललेले उपचार, वर हे सो कॉल्ड हितचिंतक येऊन देत असलेला त्रास बघवत नव्हते.
शेवटी त्या आजी गेल्या परवाच.

ऐकल्यावर वाटले की सुटल्या एकदाच्या.

हे वाक्य थोडं सेल्फिश आणि पोलिटिकली करेक्ट नाहि वाटत? दुसरा मरणासन्न यातना भोगत असताना किंवा वेजिटेटिव स्टेटमध्ये असताना केवळ त्याची लिविंग विल नाहि म्हणुन, त्याची पुढे जगण्याची शक्यता नसतानाहि जिवंत ठेवायचं, तो बिचारा माझी यातुन सुटका करा असं सांगु शकत नाहि म्हणुन?
<<

दोन्ही बोल्ड भाग परस्पर विरोधी नाहीत का?

त्याच्या मनात काय आहे, हे आपण कसे अन का ठरवायचे? ("पुढे जगण्याची शक्यता" बद्दल सातींनी लिहिलंय वरती)

खिशातले पैसे, किंवा इन्शुरन्सची लिमिट संपली म्हणून? त्याच्यावरची तुमची माया आटली म्हणून? त्याला बोलता येत नाही, म्हणून संथारा देऊन, तू आम्हाला नको आहेस हे १०००० % त्याला पटवून देत त्याचं अन्न पाणी बंद करुन??

http://www.maayboli.com/node/12105
कृपया हा धागा वाचावा . सुखांत हा एक अतिशय सुंदर मराठी चित्रपट आहे.जमल्यास सर्वांनी एकदातरी पहावा . अतिशय सुंदर अभिनय केलाय सगळ्यांनी . परावलंबी आयुष्य कोणाच्याही वाट्याला न येवो .
माणूस व्यवस्थित जगात असताना कोणी त्याची दाखल घेत नाही मात्र मरणासन्न अवस्थेत त्याच्या विषयी विनाकारण दयाभाव , प्रेम जागृत होतात . जोपर्यंत चांगल आयुष्य आहे तो पर्यंत मस्त जगाव आणि जगू द्याव . तुम्ही त्यांच्या यातना पाहू शकता पण सुटका नाही हे जर विचित्र आहे अस मला वाटते . निर्णय कठीण आसतो अशा परिस्थितीत हे मान्यच आहे .
मी स्वतः माझ्या बाबतीत इतक परावलंबी आयुष्याची कल्पना सुद्धा करू शकत नाही . म्हणूनच मी याबाबतीत सगळ्या कायदेशीर प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार आहे.

"माणूस" जगवण्याचा शक्य तितका प्रयत्न केलाच गेला पाहिजे >>> बरोबर. पण मग त्याला बरे होऊन माणसासारखे जगता पण आले पाहिजे. तसे होणार नसेल तर त्या प्रयत्नांना काय अर्थ?

कुणास ठाउक त्या कोमॅटोज बंद डोळ्यांआड अजून थोडे दिवस जगण्याची इच्छा शिल्लक असेलही? >>> असेलही. पण 'आता आपल्याला आपणहून बंद दारामागे प्रातर्विधीकरता जाणे शक्य होणार नाही' ही जाणीव जेव्हा त्या उघडलेल्या डोळ्यांमागच्या मेंदूला होईल तेंव्हा पण ती इच्छा शिल्लक राहिल का?

जे रुग्ण बरे होऊन माफक प्रमाणात का होईना स्वावलंबी होऊ शकतात त्यांच्या बाबतीत हा धागा नाहीये (प्रकाश, बरोबर आहे ना?). जे रुग्ण औषधोपचारांनी जिवंत राहू शकतील पण अंथरुणाला खिळूनच राहणार आहेत त्यांच्या बाबतीत काय करावे?

संलेखना/संथारा बद्दल एक ताजा निर्णय.

सेशन कोर्टाकडून राजस्थान हायकोर्टाच्या ही प्रथा बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती मिळाली आहे.

जाई.... बोलुया आपण...
प्रकाशजी.. सुंदर माहिती. धन्यवाद.
असीम माझा कॉलेजमित्र. त्याच्याशी लवकरच संवाद साधेन.

जेव्हा एखादी व्यक्ती अश्या अवस्थेत असते कि जिला श्वासासाठी, अन्नासाठी अनेक नळ्या जोडलेल्या असतात. ड्रिप साठी सुई टोचलेली असते.. त्या सर्वाच्या त्या व्यक्तीला वेदना होत असतील का ? कधी कधी तर ती व्यक्ती कण्हूही शकत नाही, एवढी क्षीण असते.

शारीरीक पातळीवर जे असेल ते असेल पण जाणीवेच्या पातळीवर ( ती शिल्लक असेल तर ) मला हि अवस्था खुपच त्रासदायक होईल.

आणि प्रत्यक्ष मरणाचा क्षण नॉर्मली खराच वेदनादायक असतो का ? अपघाती मृत्यू सोडा, पण एरवी अनेक वेळा तो तसा नसावा असे वाटते. एखाद्या क्षणी मला जीवनापेक्षा मरणाचीच ओढ लागेल असे वाटतेय... त्यावेळी मला हवे तेच घडावे.

साती.. मी वाट बघतोय बरं का !
माझ्या वडीलांचा मृत्यू अगदी शांतपणे झाला.. पण भावाचा मात्र तसा नव्हता. त्याला आणि आम्हा सर्वांनाच तो वेदनादायक ठरला.

>>प्रत्यक्ष मरणाचा क्षण नॉर्मली खराच वेदनादायक असतो का ? <<
मला वाटत कि प्रत्येक केस नुसार ते वेगळे असावे. पण समजा प्रत्यक्ष मरण्याचा क्षण वेदना दायी नसला तरी मृत्युशय्येवर तो पर्यंत जगण्याचे क्षण अनेकदा वेदना दायी असतात.

काल याच विषयावर पुण्याई सभागृहात परिसंवादाचा कार्यक्रम झाला. रोहीणी पटवर्धन. विद्या बाळ, डॉ संदीप तामणे. अ‍ॅड रमा सरोदे या परिसंवादात सहभागी होते. शुभदा जोशी यांनी परिसंवादाचे सूत्रसंचालन केले. याविषयावर छोटी फिल्म ही दाखवली.
अद्याप म्हणाव तशी जागृती या विषयावर अजून झाली नाही हे रोहिणी पटवर्धन यांनी सांगितले.

छान चर्चा झाली की या विषयावर. स्वतःसाठी सगळेच इच्छामरणाची इच्छा करताहेत, पण आपल्या जिवलगांसाठी निर्णय घेण्याची वेळ येते, तेव्हा खरी अवघड परिस्थिती असते.

मला तर या विषयावर मतच नाही, कारण मन सतत तळ्यात मळ्यात होतं. कधी for तर कधी against.
घरच्या 4 पैकी 2 वृद्धांचे अतिशय त्रासात मृत्यू झाले, (म्हणजे सगळे आजार, सतत हॉस्पिटल्स, सतत झोपून जखमा, अंथरुणात विधी, स्मृतीभ्रंश इ) तेव्हा तिसर्याच्या, जी व्यक्ती 80+ असून फिट आणि हसती खेळती होती, मृत्यूने ती व्यक्ती अति नशीबवान असं वाटलं, म्हणजे दुःख झालं पण त्याला किंचित समाधानाची किनार होती. हे वाचून टीका होईल, दुष्ट वाटेल, पण जेव्हा जवळच्या दोन माणसांचे अतीव हाल वेदना पहिल्या तेव्हा सुखासुखी जाणं किती बरं ते पटलं.

प्रकाश, जर पुन्हा असं चर्चासत्र किंवा परिसंवाद असेल तर मायबोलीवर कळवा ना, प्लिज.

जी व्यक्ती 80+ असून फिट आणि हसती खेळती होती, मृत्यूने ती व्यक्ती अति नशीबवान असं वाटलं, म्हणजे दुःख झालं पण त्याला किंचित समाधानाची किनार होती. हे वाचून टीका होईल, दुष्ट वाटेल>> हा मुद्दा काल विद्या बाळ यांनी मांडला होता. एका मैत्रिणीच्या किस्सा त्यांनी सांगितला. तिच्या वडिलांचा मृत्यू झाला तेव्हा मैत्रिणीने सर्वांना वडिलांचा सुखद मृत्यू झाला असे कळविले होते.

मीरा, माझ्या सासूबाई (वय ८२) आठ वर्ष अंथरूणाला खिळून होत्या. विस्मरण, विधींवरचा ताबा जाणे, बेड सोअर्स असे भोग भोगावे लागले. सासरे (वय ९२) मात्र अक्षरश: चार दिवसांच्या आजारपणामुळे गेले.
त्यामुळे दोन्ही प्रकारचे म्रृत्यु बघितले.

माझ्या एका परिचीत व्यक्तीचे वडील असे आजारी पडून आणि आई अचानक गेली. तेव्हा, म्हणजे साधारण वीसेक वर्षांपूर्वी मी ' अण्णांसारखं मरण यावं. काकूसारखं अचानक नको. ते फार धक्कादायक असतं' असं म्हणाले होते. ते मत किती चुकीचं होतं, ते स्वानुभवातून कळलं.

एखादी व्यक्ती डोळ्यासमोर कणाकणाने झिजताना बघणे फार वेदनादायक आहे. आपण मनातल्या मनात त्या व्यक्तीच्या मरण्याची वाट बघत आहोत, ही भावना भयानक होती.

पण इच्छामरणाचा कायदा असला, तरी तेवढा प्रॅक्टिकल विचार करता येईल का? ह्याबद्दल मला शंका आहे.

एखादी व्यक्ती डोळ्यासमोर कणाकणाने झिजताना बघणे फार वेदनादायक आहे. आपण मनातल्या मनात त्या व्यक्तीच्या मरण्याची वाट बघत आहोत, ही भावना भयानक होती.>>>> हा अनुभव मी मागच्या वर्षी आईच्या आजारपणात घेतला. हा काळ खूप मोठा नव्हता खरंतर (हे आता म्हणतेय) पण ते चार दिवस कठीण गेले काढणे....तरीबरं घरीच होती. तिनेही सांगून ठेवले होते व्हेंटिलेटरवर जगवू नका

चांगला धागा आणि चांगली चर्चा.

मीरा, आजकाल कोणी चांगली तब्येत असलेला परिचित अचानक गेल्याची बातमी कानावर पडते, तेव्हा माझ्या मनात तुमच्यासारखीच प्रतिक्रिया उमटते.
अर्थात हे आपल्या हातात नसतं. अगदी व्हेंटिलेटर लावण्याची अवस्था नाही आली तरी बिछान्यात पडून किंवा बहुतांश परावलंबी, मरणाची वाट पाहत जगणं नशिबी येऊ नये. आता कायदा आलाय पण तोही फक्त लाइफ सेव्हिंग एक्विपमेंट लागणार्‍र्‍या रुग्णापुरताच.

ऑस्ट्रेलियतल्या एका व्यक्तीने युरोपात जाऊन आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीने संपवलं. मुंबईतलं एक वृद्ढ दांपत्यही हातीपायी धड आहोत, तोवर हसतखेळत जगता यावं म्हणून स्वेच्छामरणाची परवानगी मागते आहे.

विद्या बाळ गेल्यानंतर त्यांच्या आदरांजली सभेत उल्लेख केलेले त्यांचे शेवटचे रेकॉर्डिंग. मार्च 2020 च्या मिळून सार्‍याजणी मधे आले आहे. स्वेच्छामरण या विषयी त्यांच्या आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात त्यांची मते काय होती हे जाणुन घेण्याची उत्सुकता होती.
-------------------------------------------------------------------------
अखेरच आवाहन...
मी विद्या बाळ, १०१, नचिकेत सोसायटी, प्रभात रोड, पुणे - ४, वय ८३ पूर्ण. आज मनाच्या एका अत्यंत गंभीर अशा; पण निर्णायक अवस्थेत बोलते आहे. हा विचार मी आजवर शेकडो लोकांशी बोललीये, पण कुणाला तो इतका गंभीर वाटला, कुणाला नाही, मीही कदाचित थोडी द्विधा मनस्थितीत असेन. पण आज मी अतिशय निर्णायक मनस्थितीत बोलतीये. माझे दात काढल्यामुळे थोडी अस्पष्टता येतीये ती समजून घ्या.
मला असं म्हणायचंय की, मला केव्हापासूनच वाटतंय की माझ्या आयुष्याला आता अर्थ राहिलेला नाही. सगळे माझे प्रियजन सांगताहेत मला की, तुला खूप करण्यासारखं आहे, खूप आयुष्य पुढे आहे, पण मला स्वतःला प्रामाणिकपणे असं वाटतं की, त्याला अर्थ नाहीये, या पुढे बरं होणं, काम करणं, पहिल्या उमेदीनी बरं होऊन काही करणं ही माझी इच्छाही नाहीये आणि मला करायचंही नाहीये. जोशी हॉस्पिटलमध्ये मी ई.ओ.एल. फॉर्म भरलाय - ‘एण्ड
ऑफ लाईफ' म्हणून. काही त्याला अर्थ नाहीये. कारण जोपर्यंत मी प्रत्यक्षात मरण्याच्या स्थितीत येत नाही. तोपर्यंत त्याचा काही उपयोग नाहीये हे माझ्या प्रत्यक्ष अनुभवातून लक्षात आलंय. तेव्हा हा जो विचार करून, विशेषतः आज विचार करून, मी असं ठरवते आहे की, मला यातून सुटकेचा मार्ग हवा आहे. तो लीगल नाही, हे मला २००% माहितीये; पण तरी तो मला हवा आहे.
मला यावर एक मार्ग सुचतो तो असा : तो ४-८ दिवसात होणारा नाही, त्यामुळे सगळ्यांना सांगण्यास, जाहीर करण्यात आता अर्थ नाही, पण मी बोलतीये. माझ्या असं लक्षात आलं की, याच्यात माणसाच्या जवळ, सज्जन माणसाजवळ, जे नाही (त्याची गरज आहे). पण मला आज एक नवा विचार सुचलाय तो असा की, जी माणसं खरोखरच सुपारी देऊन काम करतात, त्या माणसांच्याकडे कदाचित म्हणजे उदाहरणार्थ क्रूर असे किंवा उद्देश नसलेले (लोक), सर्पमित्र (ज्यांच्याविषयी मला आदर आहे) किंवा त्या प्रकारचे लोक शोधणं आणि त्यांच्या मदतीनी यावर काहीतरी उपाय काढणं शक्य आहे. त्याला वेळ लागेल, पण ते कदाचित शक्य आहे. त्याला काही काळ लागेल तो घ्यावा. आणि माझी इच्छा आहे की त्यांनी तो (मार्ग) पूर्ण करावा ज्यामुळे तशी कुणावरच आरोपाची वेळ येणार नाही. कसं, काय, याचे डिटेल्स सिरिअसली ठरवावे लागतील.
आज मी मनाच्या अत्यंत निर्णायक, भावनाविवश नसलेल्या अवस्थेत बोलतीये. इथे आज या बैठकीला सविता ही माझी सध्याची सेवक, विनीता माझी मुलगी, उर्मिला माझी सून, डॉ. मंगला नाही माया (हजर आहेत). इथे हॉस्पिटलमध्ये मी आत्ता ॲडमिट आहे, तिच्याशीही (मायाशीही) मी बोलले आहे. या सगळ्यांनी कृपया याचा नीट नीट नीट विचार करावा आणि जे जे लोक मृत्युशय्येवर आहेत, किंवा लवाटे यांच्यासारखे प्रामाणिकपणे अशाच अवस्थेत मृत्यूची वाट पाहताहेत त्यांना मार्ग मोकळा करून द्यावा. कृपया तुम्ही सगळ्यांनी इथे विचार करावा. आत्ता ही गोष्ट मोठ्यांनी बोलण्याची नाहीये; पण काही महिन्यात, वर्षात, याचा विचार करावा. आत्ता ते शक्य नाही मला माहितीये. मी तोवर थांबायला तयार आहे; पण कधीच न निघणाऱ्या मार्गापेक्षा हा मार्ग खूप चांगला आहे, अनेकांसाठी चांगला आहे, तुम्ही सर्वांनी यावर विचार करावा. हे सगळे विचार ऐकून घेतलेत आणि त्यातनं सगळे जण शांत, शहाण्यासारखा विचार करतील अशी मला आशा आहे.
माझ्यावर लोकांनी इतकं अपार प्रेम केलंय की, मी असा निर्णय घेणं हे एका परीने खूप क्रूर आणि कृतघ्नतेचं लक्षण आहे. मला असं वाटतं की, अनेक लोकांच्या पुढील हितासाठी हा खूपच आणि विशेषतः माझ्यासाठी उपयुक्त (मार्ग) आहे. कृपया विचार करावा. माझ्या निर्णयाचं काही भलं करावं आणि व्यापक जनतेच्यासाठी काहीतरी करावं.
विद्या बाळ २९ जानेवारी २०२०
संध्या. ७.३०

खूप वर्षांपूर्वी एका गृहस्थांनी असेच आवाहन केले होते किर्लोस्कर की मनोहर मध्ये लेख छापून आला होता.त्यामध्ये त्यांनी म्हटले होते की मी 80 वर्षे जगलो.आता बास झाले. किती आयुष्य आहे माहित नाही,म्हणून त्यांना मिळणारी पेन्शन त्यांनी नाकारली.ज्या कोणाला माझे म्हणणे पटत असेल त्यांनी मला सपोर्ट करावा.माहीत नाही पण त्यांनी विष घेऊन जीवन संपविले.

देवकी, ते गोपाळराव मंडलिक.1978 मधे किर्लोस्कर मधे यावर लेख लिहिला होता. व त्यानी स्वेच्छामरण प्रत्यक्षात अमलात आणले. ( संदर्भ- जगायचीही सक्ती आहे... मंगला आठलेकर)

विद्या बाळ ह्यांचा लेख प्रसिद्धी सोस वाटतो

ज्याला मरायचेच आहे , तो प्रायोपवेशन करून , संथारा घेऊन मरेल

ज्याला खरोखरच मरायचे आहे तो गळफास , विष घेऊनही मरेल

पण ह्यांच्या अपेक्षा भलत्याच आहेत , घरात मरण यावे , लगेच मरण यावे , गादी वर झोपून मरण यावे , कुणीतरी साप आणावा , कुणीतरी इंजेक्शन द्यावे , त्याचे बिल कोण भरणार , की तेही सरकारनेच भरायचे ? रेशन कार्डावर दोरी उपलब्ध करून द्या , डेथ सर्टिफिकेट अगदी सहजतेने पोराला मिळावे , त्यावर कारण काय लिहायचे ? आजकाल ईसीजी फ्लॅट लाईन चा कागद जपून ठेवूनच डॉकटर डेथ डिक्लेर करतात , नुसते पल्स बीपी डोळ्यात बेटरी पाडा वगैरेही करतातच , पण हॉस्पिटलात ईसीजी काढणे करतातच , हिला घरी मरायचे , मग हिचा ईसीजी कोण काढणार ?

आवा चालली पंढरपूरला , वेशिपासून आली घरा
तसे आहे हे
मरायचे तर नाही , उगाच सरकार , साप, हे आणि ते

BLACKCAT +१
(विद्या बाळ यांच्याविषयी पूर्ण आदर बाळगूनच)

विचारांचा प्रसार म्हणजे प्रसिद्धीचा सोस? सन्मानाने मरण्याचा हक्कासाठी चळवळ आहे. ज्याला मरायचेच आहे , तो प्रायोपवेशन करून , संथारा घेऊन मरेल ज्याला खरोखरच मरायचे आहे तो गळफास , विष घेऊनही मरेल हे आक्षेपाचे नेहमीचे मुद्दे आहेत. आत्महत्या व इच्छामरण यात मूल्यात्मक फरक आहे.
जीके तथा कृष्णमार्जार आपण त्यांचे इच्छामरणावरील कार्य जाणुन घेउन लिहित आहात असे गृहीत धरतो. मतभिन्नता असणे स्वाभाविक आहे पण ती प्रत्येक वेळी उपहास व तुच्छता या प्रकारेच व्यक्त करावी असे नाही ना! मृत्युशय्येवर असतानाची विचार स्पंदने ही प्रसिद्धीच्या सोसासाठी असतील असे आपल्याला खरोखर वाटते का?

Pages