'हायवे'च्या निमित्ताने श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 24 August, 2015 - 23:42

’वळू’, ’विहीर’, देऊळ’ या राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारप्राप्त चित्रपटांचं दिग्दर्शन करणार्‍या श्री. उमेश विनायक कुलकर्णी यांचा ’हायवे - एक सेल्फी आरपार’ हा नवा चित्रपट २८ ऑगस्ट, २०१५ रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे.

त्या निमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद -

umesh-renuka.jpg

’हायवे’च्या प्रवासाबद्दल सांगशील का?

’हायवे’ची गोष्ट गेले ५ -६ वर्षं मनामध्ये होती. ’वळू’ हा चित्रपट आम्ही जेव्हा तयार करत होतो, तेव्हा पटकथा लिहून झाल्यानंतर निर्माता मिळवण्यासाठी सतत मुंबईला जावं लागायचं. त्यावेळी एक-दीड वर्षं मी अनेकदा शेअर्ड टॅक्सीमधून प्रवास करायचो. या प्रत्येक वेळेला शेअर्ड टॅक्सीत वेगवेगळी मंडळी असायची. प्रवास सुरू व्हायचा तेव्हा आपल्याबरोबर गाडीत कोण आहे, हे माहीत नसायचं. प्रवास सुरू झाल्यानंतर प्रत्येकजण फोनवर बोलायला लागायचा आणि प्रवास संपता संपता प्रत्येकाची आयुष्यं कशी असतील, याचा एक निश्चित अंदाज यायचा. ही जी गंमत होती प्रत्येक प्रवासाची, ती कुठेतरी मनात कायम राहिली. त्यातूनच ’हायवे’ या चित्रपटाच्या कल्पनेचा जन्म झाला.

दुसरी गोष्ट म्हणजे, प्रत्येक वेळेला एखादा नवीन मार्ग आपण आपल्यासाठी शोधायला पाहिजे, असं मी मानतो. एखादी गोष्ट सतत करून करून आपला एक कंफर्ट झोन तयार होतो. आपण जे करतोय, ते हळूहळू आता जमल्यासारखं वाटतंय, असं वाटायला लागतं. तेव्हा ती पद्धत पूर्णपणे बदलून काही नवीन शोधता येतंय का, असं वाटत राहतं. मग ते नवीन काहीतरी शोधण्यासाठी सगळ्याच गोष्टी बदलून पाहायला लागतात. आपल्याला जिथे काय आहे हे माहीत नाही, अशा नवीन 'स्पेसेस' आपण शोधल्या पाहिजेत, असं वाटत राहतं.

आधीपेक्षा काहीतरी वेगळं आम्हांला नेहमीच करायचं असतं. जेव्हा आम्ही ’वळू’ केला, त्यानंतर त्याच्याचसारखा दुसरा चित्रपट न करता आम्ही 'विहीर' हा चित्रपट तयार केला. त्या नंतर पूर्णपणे वेगळा असा ’देऊळ’ केला. प्रत्येक वेळेस नवीन काहीतरी करायचं, असं आम्ही ठरवलं होतं. ’हायवे’ ही गोष्ट तशा नवीन, वेगळ्या पद्धतीनं सादर करायचा प्रयत्न केला आहे. असं नवीन काहीतरी शोधायचा प्रयत्न सतत सुरू असल्यामुळे प्रत्येक चित्रपट हा एक अगदी नवा शोध असतो.

highway-j1.jpg

highway-j2.jpg

दिग्दर्शक म्हणून ’हायवे’च्या वैशिष्ट्यांबद्दल काय सांगशील?

आम्ही डिजिटल कॅमेर्‍यावर चित्रीत केलेला हा पहिलाच चित्रपट आहे. या आधीचे सगळे चित्रपट आम्ही ३५ एमएमवर चित्रीत केले होते. मात्र हल्ली डिजिटल तंत्रज्ञानाचा सर्वत्र प्रयोग केला जातो. आज हे तंत्रज्ञान इतकं प्रगत झालं आहे की, ते वापरण्याशिवाय पर्यायच उरला नाहीये. या डिजिटल कॅमेर्‍याबरोबर कसं नातं तयार करता येईल, याचा या चित्रपटाच्या निमित्तानं शोध घ्यायचं आम्ही ठरवलं. डिजिटल कॅमेर्‍याचे काही फायदे आहेत. आपण कुठेही कॅमेरा घेऊन बसू शकतो, ३५ एमएमला फोकस करताना येणारी बंधनं यावर येत नाहीत. तुम्ही अगदी बंदिस्त जागांमध्ये चित्रीकरण करू शकता. व्यक्तिरेखांच्या हालचाली खूप वेगळ्या पद्धतीनं डायनॅमिक करू शकता. डिजिटल तंत्रज्ञानाचे हे गुण जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीनं कसे एक्सप्लोअर करता येतील, याचा आम्ही विचार केला. आम्ही ज्या पद्धतीला सरावलो होतो, त्यापेक्षा फार वेगळी अशी चित्रीकरणाची ही पद्धत होती.

चित्रपटामध्ये कशा पद्धतीनं कथा, गोष्ट मांडता येते याचासुद्धा एक ठरावीक ग्राफ तयार होतो, कथा मांडण्याची एक पद्धत तयार होते. तिच्यातही काही प्रयोग करून पाहता येतील का, काही नवीन शक्यता तपासून बघता येतील का, असाही विचार या चित्रपटाच्या निमित्तानं आम्ही केला. आमच्या इतर चित्रपटांप्रमाणेच याही चित्रपटात जवळजवळ ३५ ते ४० व्यक्तिरेखा आहेत. आणि त्या प्रत्येक व्यक्तिरेखेचं गिरीशनं अगदी बारीकसारीक कंगोर्‍यांसकट आलेखन केलं आहे. या सिनेमाला कोणी एक हीरो किंवा हिरोईन नाहीये. प्रत्येक व्यक्तिरेखा कितीही कमी अथवा जास्त वेळासाठी असली, तरीही ती पूर्णपणे सुस्पष्ट अशी आहे. खूप कमी वेळात या सगळ्या व्यक्तिरेखा खूप चांगल्या पद्धतीनं मांडल्या आहेत. शेवटाला पोहोचणार्‍या काही कलाकृती असतात, जिथे पहिल्यांदाच ठरवलं जातं की, याचा शेवट असा होणार आहे. त्या पद्धतीची बांधणी टाळून वेगळ्या प्रकारचा आकृतिबंध या पटकथेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला आहे.

आत्तापर्यंतच्या आमच्या चित्रपटांवर ते ग्रामीण पार्श्वभूमीवर आधारलेले चित्रपट आहेत, असा एक शिक्का काहींनी मारला होता. अर्थात आम्ही हे कधी त्या अर्थानं मान्य केलं नाही, कारण एखादी फिल्म ही ग्रामीण अथवा शहरी नसते, तर त्यामागचा विचार जास्त महत्त्वाचा असतो. पार्श्वभूमी कुठलीही असली तरी तुम्ही तितकाच आधुनिक चित्रपट तयार करू शकता, असं माझं मत आहे. पण तरीसुद्धा असा एक सूर होता की, तुम्ही शहरी फिल्म कधी करणार, शहरी व्यक्तिरेखांशी कधी संवाद साधणार, त्यांचं म्हणणं कधी मांडणार? तर या चित्रपटात आम्ही ते केलं आहे. एका मोठ्या शहरातून दुसर्‍या मोठ्या शहराकडचा हा प्रवास आहे.

highway-j3.jpg

हा प्रवास अगदी सोपा नक्की नसेल...

नाही, हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. जवळजवळ एक-सव्वा वर्ष गिरीश या कल्पनेशी खेळत होता. त्यानंतर मग पटकथेवर काम करू शकलो आम्ही. बांधीव पटकथेपर्यंत पोहोचायला बर्‍यापैकी काळ लागला. गिरीशच्या आत्तापर्यंतच्या पटकथांपैकी ही सर्वोत्तम पटकथा आहे, असं मला वाटतं.

ही पटकथा पडद्यावर आणण्यात अनेक अडचणी आल्या असतील..

’हायवे’ची गोष्ट अनेक गाड्यांमध्ये घडते. पुण्याला जायला निघालेल्या नऊ वेगवेगळ्या गाड्या आणि त्या प्रत्येक गाडीमध्ये काय काय घडतं, असं या चित्रपटाची वरकरणी बांधणी आहे. चालत्या गाडीमध्ये ज्यांनी एखाद्या शॉर्टफिल्मचं किंवा कुठल्याही प्रकारचं शूटिंग केलं असेल, त्यांनाच कळेल की असं चित्रीकरण ही किती गमतीदार गोष्ट आहे. आमचा चित्रपट जवळजवळ पूर्णपणे हायवेवरच्या प्रवासाबद्दलचा आहे. त्यामुळे पटकथेचं चित्रीकरण करणं अतिशय आव्हानात्मक होतं. अनेकदा दृश्य चित्रीत करताना गाडीत मी किंवा छायालेखक नसायचो. कलाकारच कॅमेरा सुरू करायचे आणि आपापलं दृश्य चित्रीत करून परत यायचे. अजून एक गोष्ट म्हणजे यात कुठलंही मुद्दाम तयार केलेलं नेपथ्य वापरलेलं नाही. चित्रपटातली सगळी स्थळं ही बाहेरची आहेत.

highway-j5.jpg

शीर्षकाच्या टॅगलाईनमध्ये 'सेल्फी' असा शब्द आहे. तुझ्या इतर चित्रपटांमध्येही स्वत:कडे बघत 'स्व'त्वाचा शोध घेणं, ही संकल्पना होती.

'शहरी लँडस्केप'मध्ये स्वतः जगत असताना, आपलं जगणं हे कुठल्या वेगवेगळ्या, व्यामिश्र गोष्टींनी घडलेलं आहे, हे पाहण्याचा हा एक प्रयत्न आहे. आजकाल ’सेल्फी काढणं’ ही एक नवीन गोष्ट सुरू झालेली आहे. आपले पंतप्रधानसुद्धा सेल्फी काढतात. तर त्या सेल्फीमध्ये खरंच आपण स्वतः येतो का? आपण ज्या चेहर्‍याचा फोटो काढतो तो नक्की कोणाचा असतो? तो आपलाच चेहरा असतो की एक मुखवटा असतो? आपल्याला आपलं खरं आत्ताचं असणं जर जाणून घ्यायचं असेल, तर ती सेल्फी मग आरपार कशी काढता येईल, जी फक्त वरवरची राहणार नाही अशी? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न ’हायवे’ हा चित्रपट करतो, म्हणून ’एक सेल्फी आरपार’ अशी टॅगलाईन तयार केलेली आहे.

तुमच्या सर्व चित्रपटांमध्ये विनोदाचा खूप परिणामकारक वापर तुम्ही केला आहे. ’हायवे’तला विनोद कशाप्रकारचा आहे?

गिरीशच्या प्रत्येकच लिखाणामध्ये ह्यूमर, विनोद हा अविभाज्य भाग राहत आलेला आहे. आपण स्वतःकडे खूप गांभीर्यानं पाहू शकतो, पण ते हसतखेळत, स्वतःचीच खोडी काढत करता येतं. ’वळू’, ’देऊळ’मध्ये तसं होतं. ते गिरीशच्या लिखाणाचं बलस्थान आहे, असं मला वाटतं. विनोदाच्या आधारानं आपण अधिक गंभीर गोष्टींकडे प्रगल्भपणे बघू शकतो. हा चित्रपट खर्‍याखुर्‍या माणसांची गोष्ट सांगतो. आपल्या समाजात, आपल्या प्रत्येकात विरोधाभास हा इतक्या जास्त प्रमाणात असतो, की त्यातून, किंवा वेगळ्याच प्रकारची माणसं भेटल्यावर जो एक विसंवाद तयार होतो त्यातून, एक गंमत तयार होते. ती खेळकरपणे टिपण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. अर्थात केवळ ते त्याचं साध्य नाहीये. ते एक साधन आहे.

highway-j4.jpg

या चित्रपटाची पात्रयोजना खूप रोचक आहे. शकुंतलाबाई नगरकर, नागराज मंजुळे, हुमा कुरेशी, टिस्का चोप्रा हे कलाकार ’हायवे’मध्ये एकत्र आले आहेत.

जसं चित्रपटात वेगवेगळ्या प्रकारच्या, वेगवेगळ्या शैक्षणिक- सांस्कृतिक पार्श्वभूमीच्या व्यक्ती एकत्र येतात, त्याचप्रमाणे पात्रयोजनेतही अनेक वेगवेगळी मंडळी एकत्र आली आहेत. महानगरांची, तिथल्या जीवनशैलीची ही फिल्म आहे. तीत फक्त मराठी माणसं नसणार. खूप वेगवेगळ्या पद्धतीची, वेगवेगळ्या संस्कृतीची माणसं असणार. त्यामुळे नेहमीच्या रूढ आकृतिबंधापलीकडे जाणारी काही माणसं असावीत, जी त्यांच्याबरोबर त्यांचं वेगळं 'असणं' आणि त्यांची पार्श्वभूमीही घेऊन येतील, अशी या चित्रपटाची गरज होती. टिस्का चोप्रा किंवा हुमा कुरेशी या त्यासाठी या चित्रपटात आहेत. त्या केवळ बॉलीवूडच्या मोठ्या कलाकार आहेत म्हणून या चित्रपटात नाहीत. त्या उत्तम अभिनेत्री आहेत, म्हणून त्या या चित्रपटात आहेत. केवळ व्यावसायिक सिनेमे करण्यापेक्षा जिथे जिथे त्यांना काही म्हणणं मांडता येईल, अशा चित्रपटांकडे त्यांचा कल असतो. त्यामुळे त्यांना घ्यायचं असं माझं ठरलं होतं आणि सुदैवानं त्यांना पटकथा आवडली, त्यांनी काम करायला होकार दिला. खूप साधेपणानं, बॉलीवूडच्या कसल्याही भपक्याशिवाय सगळ्या टीमबरोबर अगदी समरस होऊन त्यांनी काम केलं.

ज्यांचं काम खूप वाखाणलं गेलं आहे, असे काही माहितीचे कलाकार या चित्रपटात आहेत. तसंच आजवर कधीच सिनेमात काम न केलेलेही कलाकार या चित्रपटात आहेत. शकुंतला नगरकर या माझ्या खूप आवडत्या कलाकार आहेत. त्यांनी कधीच चित्रपटामध्ये काम केलेलं नाहीये. त्यांची अदाकारी मी पाहिलेली आहे. त्यांच्याबरोबर काम करावं, असं मला कायम वाटतंच होतं. आणि सुदैवानं या चित्रपटामुळे मला तशी संधी मिळाली. त्यांची चित्रपटातली जी भूमिका आहे, तिला त्यांच्या अनुभवाचा खूप फायदा झालेला आहे.

highway-j7.jpg

आजची शहरी जीवनशैली गोंगाटानं व्यापली आहे. ’हायवे’तली पात्रं बहुतांशी अशा वातावरणातून येतात. या वातावरणात अमित त्रिवेदींचं संगीत किंवा मंगेश धाकडे यांचं पार्श्वसंगीत कुठे बसतं?

या चित्रपटाच्या संगीताच्या निमित्तानं आजचा 'अर्बन साउंड' कुठला आहे, याचा शोध आम्ही घेत होतो. आपलं आजचं संगीत नक्की कसं आहे? आज भारतीय पारंपरिक / क्लासिकल वाद्यं आहेत, त्यातून आपलं आत्ताचं असणं व्यक्त करता येईल, असं मला वाटत नाही. आणि पाश्चिमात्त्य वाद्यांमध्ये, जरी तुम्हांला ती आवडत असली, तरी तुम्हांला 'तुम्ही' सापडत नाही. मग आजचं संगीत नेमकं कुठलं? आम्ही जशी आमची तयार होत असलेली पठडी मोडून काही वेगळं करण्याचा प्रयत्न करतो, तशीच संधी आपल्याबरोबर वाटचाल करणार्‍या सगळ्याच मंडळींना दिली पाहिजे, असं आम्हांला वाटत होतं. त्यामुळे मंगेश ज्या पद्धतीनं काम करतो, त्यापेक्षा वेगळं असं त्याचं काम या सिनेमात आपल्याला दिसेल, असं मला वाटतं. पार्श्वसंगीतातही काही नवे, चांगले प्रयोग करण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. अमित त्रिवेदी हा आजचा आघाडीचा संगीत दिग्दर्शक आहे. चित्रपटाच्या संकल्पनेला तोलून धरणारं संगीत तो कायमच निर्माण करतो. त्याचं संगीत कधीच चित्रपटाच्या आत्म्यापासून विलग करता येत नाही. आजच्या शहरी संगीताचा, शहरी गोंगाटाचा, शहरी जीवनशैलीचा विचार करून अमितनं या चित्रपटासाठी संगीत रचलं आहे. चित्रपटाची परिणामकारकता संगीतामुळे, पार्श्वसंगीतामुळे नक्की वाढली आहे.

highway-j6.jpg

एक दिग्दर्शक म्हणून ’हायवे’च्या निर्मितीची प्रक्रिया किती सोपी किंवा अवघड होती? आधीच्या कामापेक्षा वेगळं असं काही करताना तुझ्या आधीच्या कामातली काही सौंदर्यस्थळं या चित्रपटातही तू वापरली आहेस का? उदाहरणार्थ, तुझ्या आधीच्या तिन्ही चित्रपटांमध्ये काही सुरेख लॅंडस्केप्स्‌ होती.

कुठलीही प्रक्रिया ही सोपी किंवा अवघड असण्यापेक्षा, नेहमीचं आपल्याला जे आवडतं, त्याऐवजी दुसरं काही आपल्याला आवडू शकतं का, आणि त्या दुसर्‍या गोष्टींमधून आपल्याला काही सौंदर्यस्थळं निर्माण करता येऊ शकतात का, हे पाहणं महत्त्वाचं असतं. पहिली फिल्म करताना असा ठरावीक आकृतिबंध बनलेला नसतो. पण नंतर एक आकृतिबंध मोडून दुसरी गोष्ट करणं, हे नेहमीच अवघड असतं. पण तसा धोका घ्यावाच लागतो आणि आम्ही तो घेतला आहे. पण असा धोका घेण्यातही एक गंमत असते कारण तुम्ही सतत काहीतरी शिकत असता, नव्याचा शोध घेत असता. उदाहरणार्थ, लँडस्केप्स्‌ऐवजी ’अर्बन-स्केप्स्‌’ असणं, शहरी क्लॉस्ट्रोफोबिया, शहरातला गोंधळ आणि गोंगाट पडद्यावर दाखवणं हे आव्हानात्मक आहे. माणसांचे चेहरेसुद्धा लँडस्केप्स्‌ असू शकतात. चित्रपटात हे शोधता येईल का, हाही एक प्रयत्न आहे.

highway-j8.jpg

टंकलेखन साहाय्य - आर्फी

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान झाला आहे हा ही संवाद. मला गिरीश कुलकर्णींच्या लेखनावरचा भाग जास्त आवडला. यांच्या सगळ्या सिनेमांत खट्याळ विनोद बेमालूमपणे वावरत असतो आणि तोच मला या टीमचा यूएसपी वाटतो. सिनेमा तो देखेंगेच.

सुरेख. विशेषतः चित्रपटासंदर्भात पुढचे काही बोलण्याअगोदर श्री.उमेश कुलकर्णी यानी "डिजिटल कॅमेरा तंत्रज्ञाना"च्या महतीचे वर्णन अगदी अचूक (आणि तितकेच आवश्यकही) केले आहे ते फार आवडले. चित्रपट तयार करणे म्हणजे केवळ कथाकल्पनेचा विस्तार नसून त्याच्यासोबतीनेच तंत्रज्ञानाचेही महत्त्व विशद करणे हे दिग्दर्शकासाठी गरजेचे असते....कॅमेरा (च) या चित्रपटाच्या कथानकातील एक "प्रमुख कलाकार" आहे हे 'हायवे' चा ट्रेलर पाहाताना प्रकर्षाने जाणवले होते. प्रेक्षकाला प्रश्न पडला पाहिजे की हायवेच्या टीम सदस्यांनी कशा रितीने धावत्या कार्समधील हे शूटिंग घेतले असेल ?

उमेश कुलकर्णीनी मुलाखतीच्या सुरुवातीलाच त्याचे उत्तर दिले आहे, तो भाग खूप आवडला.

छान झालाय संवाद! बरंच मोठं आव्हान पेललेलं दिसतंय. चित्रपटातून ते कसं व्यक्त होतंय ते बघायला नक्कीच आवडेल.