निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...

Submitted by मार्गी on 21 August, 2015 - 22:27

सर्व मान्यवरांना मन:पूर्वक अभिवादन! उत्तराखंडच्या २०१३ च्या महापूरामधील अनुभव शेअर करत आहे. ग्लोबल वॉर्मिंग, क्लाएमेट चेंज, सतत येणारे कोरडे किंवा ओले दुष्काळ, महापूर, भूकंप, वेस्टर्न डिस्टर्बन्स अशा विविध मुद्द्यांना ह्या लेखनातून स्पर्श करत आहे. निसर्गाने मानवाला वेळोवेळी इशारे दिले आहेत व त्यांची तीव्रता वाढत जाते आहे. ह्याचं हे जीवंत अनुभव कथन. धन्यवाद.

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: १- पिथौरागढ़
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: २- गोरीगंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ३- आपत्तीचे आकलन होताना...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ४- काली गंगेच्या काठावरती...
निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ५- तवाघाट जवळील तांडव आणि आरोग्य शिबिर...
वाचनाबद्दल व प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!

निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ६- खेलामार्गे धारचुला...

... १ ऑगस्टच्या रात्री मैत्री आणि अर्पणची टीम खेला आणि गरगुवा गावांमध्ये थांबली आहे. गरगुवामध्ये रात्री झालेल्या मीटिंगमध्ये अनेक मुद्दे समोर आले. गावातलं राजकारण बघायला मिळालं. स्वत: काहीही न करता लोकांना सगळं सामान गावामध्ये हवं आहे. हा मानवी स्वभावच आहे. ह्या गावाचंही असेसमेंट केलं जातं आहे. त्यानंतर इथे काय करायचं हे सर्व मिळून ठरवतील. डॉक्टर उद्याच इथे येतील. त्याशिवाय अन्य मदत ठरवायची‌ आहे. हेलिकॉप्टरचा पर्यायही इतका शक्य दिसत नाही. त्यामध्ये सामानाची वजन मर्यादा कमीच असते. आपत्ती प्रभावित भागांमध्ये काम करणारे हेलिकॉप्टर्स एका वेळी ५ क्विंटल म्हणजे ५०० किलोग्रॅम रेशनच आणू शकतात. गावातल्या प्रत्येक गरजू कुटुंबाला ३० किलोचं पोतं‌ द्यायचं, हा विचार आहे. हेलिकॉप्टरही अपुरं पडेल. कदाचित सर्वांत चांगला पर्याय हाच असेल की, हे सगळं सामान रस्त्याने तवा घाट किंवा जिथपर्यंत रस्ता आहे (तोपर्यंत बनेल)- एलागाडपर्यंत आणायचं‌ व नंतर ग्रामस्थांनी ते स्वत: आणायचं. कारण खालून सामान वर आणायचं असेल तर मजूर लागतील आणि आपत्तीच्या वेळेमध्ये त्यांचे भाव खूप वाढलेले आहेत.

टीमच्या कामाबद्दल सरांनी सांगितलं की, आता लवकरच पुण्याहून ट्रकद्वारे पाठवलेलं सामान रूद्रपूरला पोहचेल. १३ टनपेक्षा अधिक असं‌ ते सर्व प्रकारचं सामान आहे. पुण्यातून येणारा ट्रक सामानाला रूद्रपूरच्या पुढे आणणार नाही. म्हणून आमच्यातल्या दोन जणांना रूद्रपूरला जाऊन नवीन ट्रकमध्ये ते शिफ्ट करावं लागेल किंवा मग दुस-या एखाद्या व्यक्तीला/ ट्रेड एजन्सीला ते काम सांगावं लागेल. सर त्याविषयी सर्व पर्यायांवर विचार करत आहेत. त्यांची इच्छा आहे की, कसंही करून एखाद्या ट्रक एजन्सीने ते तिथून घ्यावं आणि पिथौरागढ़ किंवा अस्कोटपर्यंट आणावं. म्हणजे दोन व्हॉलंटीअर्सचा वेळ दुस-या कामासाठी वापरता येईल. हे अजून ठरायचं आहे.

सरांनी हेही सांगितलं की, ते टीमची आवश्यकता आणि प्रत्येक सदस्याची क्षमता बघून प्रत्येक सदस्याला/ गटाला काम देण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि आत्तापर्यंत नक्कीच त्यांना प्रत्येकाची क्षमता आणि कोण कुठे फिट बसेल, हे समजलं आहे. म्हणून त्यांनी मला त्यांच्यासोबत परत जायला सांगितलं आहे. इतर सदस्य पुढच्या गावांमध्ये शिबिर आणि अन्य मदतीसाठी जातील. मी, सर आणि अर्पणच्या दिदी‌ गरगुवावरून परत अस्कोट- हेल्पिया बेस कँपला जाऊ आणि लवकरच येत असलेल्या सामानासाठी स्टोअरची व्यवस्था करू. आणि ह्या प्रकारचे दुसरीही तांत्रिक कामं आहेत. मनात प्रतिक्रिया आली की, एका अर्थाने हे पहाडामधून परत जाणं आहे. हो, आहे तर खरं. पण काय करणार. शरीराची तयारी व फिटनेस इतका चांगला नाही... पुढे डॉक्टर जिथे जातील तिथेही तीव्र चढाचा रस्ता आहे. मोठं अंतर चढत जायचं आहे. मला जाता येईल, पण त्याला वेळ लागेल व अडचण येईल. त्याऐवजी‌ सर सांगतात ते काम मला जास्त चांगलं जमेल. स्टोअरची तयारीसुद्धा करायची आहे. काही सामान विकत घ्यायचं आहे. त्या प्रकारची बरीच कामं आहेत. आणि सरांसोबत एकाने असायला पाहिजे ना. अशा प्रकारे कामाचं वाटप झालं.

... जशी रात्र संपली व पूर्व दिशा उजळली, पाऊस आपोआप थांबला. पावसाचं वेळेचं पालन अचूक आहे. सरांनी म्हंटलंसुद्धा की, आपल्या कामामध्ये पाऊसही मदत करतोय. आता इथून आधी खेलाला जायचं‌ आहे. तिथून खाली उतरून धारचूलाला जायचं आहे. दोन जण धारचुलावरून परत येतील, कारण डॉक्टरांकडे औषधं‌ कमी उरली आहेत. त्यामुळे धारचुलामध्ये औषधं‌ विकत घेऊन ते परत इथे येतील. डॉक्टर आणि त्यांच्यासोबत दोन साथीदार आज शिबिर घेतील व जमेल त्याप्रमाणे पुढच्या गावांमध्ये जातील.

गरगुवावरून खेलाची वाट आता अगदी‌ सोपी वाटते आहे. दोन दिवस आधीपर्यंत 'भितीदायक' वाटणारं दृश्य आता सामान्य वाटत आहे. डोळे व मनाला सवय झाली आहे. आत्तापर्यंत कुठेच थंडी वाजली नव्हती. पण इथे गरगुवा- खेलाजवळ चांगली थंडी आहे. उंचीही २००० मीटर्सहून अधिक आहे. वाटेमध्ये खेलाहून निघालेले साथीदार मिळाले. बोलणं झालं. त्यांना गरगुवाची वाट समजावून सांगितली. डोंगरातून अनेक पायवाटा जातात. त्यामुळे योग्य वाट घेणं महत्त्वाचं. अशा वाटांवर फार कोणी जाताना- येताना दिसत नाही. खरोखर ही जागा बाह्य आणि ओळखीच्या जगाहून खूप वेगळी आहे.


गरगुवावरून खेलाकडे जाणारी वाट

खेलामध्ये थोडा वेळ थांबलो. हे गाव छोटं असलं‌ तरी एका अर्थाने मोठंच आहे. गावातल्या एका पोस्टरवरून तसं जाणावलं. गावामध्ये एका स्पर्धेचं आयोजन होतं व त्याचं हे पोस्टर होतं. त्यामध्ये सहभाग शुल्क तर आहेच, पण बक्षीस रक्कम हजारांमध्ये आहे. शिवाय ह्या गावात इंटर कॉलेजही आहे. खेलामध्ये अपेक्षेपेक्षा जास्त कुटुंबं होती; म्हणून इथे औषधं जास्त संपली. इथून पुढच्या खेतसारख्या गावांमध्येही घरांचं नुकसान झालं आहे. खेलामध्ये सरांनी सॅटेलाईट (नेपाली सिम के) फोनवर पुण्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. पण संपर्क झाला नाही.

खेलावरून परतताना एक दुसरी वाट घेतली. येताना तवा घाटवरून सरळ दोन- अडीच तास चढून वर आलो होतो. आता तिरपी जाणारी वाट आहे. म्हणायला तिरपी वाट. मध्ये मध्ये चढ आणि उतार आहेच. खेलाचे एक ग्रामस्थ युवक- वीरेंद्रजी सोबत आहेत. त्यांच्याशी मैत्री केली. वाटेमध्ये जेव्हा अडचण आली; घसरायला झालं; तेव्हा त्यांची मदत घेतली. त्यांनी सांगितलं की, ह्या परिसरामध्ये छिपला केदार यात्रा होते. तेव्हा खूप यात्रेकरू येतात. त्यांनी इथली पंचायत संरचना समजावून दिली. इथे पंचायत राजमध्ये थोडा फरक आहे. ग्राम पंचायतसोबत न्याय पंचायत स्तरसुद्धा असतो. त्यांनी सांगितलं की, धारचुलामध्ये ५६ ग्रामसभा आहेत. त्यांनी डोंगरामध्ये नारायण आश्रमाकडे जाणारा रस्ताही दाखवला. डॉक्टर आणि त्यांच्यासोबतचे दोघे जण नारायण आश्रमाकडे जातील. एकदा थोडं वाईट वाटलं. पणा जे आहे, ते आहे! एक गोष्ट स्पष्ट आहे. जर अशा पहाडी वाटांवर हसत हसत चालायचं असेल, तर त्यासाठी कठोर मेहनत हवी. फिटनेस चांगला नव्हे अत्यंत चांगला हवा. अशा 'भितीदायक' (सापेक्ष अर्थाने) वाटांशीही खूप चांगली मैत्री हवी; परिचय हवा. परतताना मनात हे विचार आहेत.

खेलावरून खाली उतरणारी ही वाट वळणं- वळणं घेऊन उतरते. आता बहुतेक ती तवा घाटला जाणार नाही. आता ती एलागाड़ला (झिरो पॉइंट) जाईल. ह्याचा एक अर्थ असा की, वाट जास्त लांब आहे. दूसरा अर्थ हा की, तवा घाट पोहचण्याच्या अगदी आधी जिथे रस्ता तुटल्यानंतर पायी पायी आलो होतो; तो भागही ही वाट बायपास करेल. म्हणजेच आता फक्त दोन वेळेस पायी पायी चालावं लागेल. आणि मनात आशा आहे की, कदाचित बी.आर.ओ. वाल्यांनी एलागाड पर्यंतसुद्धा रस्ता बनवला असू शकेल. खाली पोहचल्यावर कळेल. वाट जशी जशी पुढे गेली, तसा उतार वाढला आणि मध्ये मध्ये वाट अरुंद खडकांवरून जाते आहे. वरून पहाडी धबधबे कोसळत आहेत. वाटसुद्धा अशी आहे की, १०० किलोमीटर गतीने ड्रायव्हिंग करताना रस्त्यावर जितकं लक्ष द्यावं लागतं, अगदी तितकंच लक्ष प्रत्येक पावलाकडे द्यावं लागत आहे. वाट सतत वळत आहे. अगदी लक्ष देऊन जावं लागत आहे. दरीचं एक्स्पोजर अगदी बाजूला आहे. पण वाट चालत राहिली. खाली पक्का रस्ताही दिसू लागला आणि उत्साह वाढला. उतरताना मात्र एकच विचार मनात होता- जे दोन जण औषधं घेऊन परत वर येतील, त्यांची काय अवस्था होईल...

किंचित अडचणी आल्या पण खाली उतरलो आणि रस्त्यावर जीप मिळाली. ह्यावेळी भाव वाढला आहे. पण इतकं तर होणारच. तुकड्या तुकड्यांमध्ये ते इथे जीप चालवत आहेत, हीच गोष्ट मोठी आहे. थोड्याच वेळाने जीप थांबली. इथे परा मैत्री- गिरीप्रेमीने बांधलेली पुलिया. त्यावर जवळच्या प्रपातातून थंड पाण्याचे थेंब आणि तीव्र वारं आहे. पुलिया सहज पार झाली; पण पुढे एका जागी खडकांचा पॅच आहे. काल येताना हा उतरायचा होता; त्यामुळे आरामात उतरलो. पण आता हा चढायचा आहे. अवघड गेलं, पण वीरेंद्रजींनी मदतीचा हात दिला आणि कसंतरी चढून गेलो. किंचित खरचटलं. शरीर आणि मनाला अशा वाटांची सवय करायला हवी... जीपनंतर परत थोडं पायी पायी‌ चाललो. इथे बी. आर. ओ. ने ब्रिज बांधला आहे. थोडा वेळ थांबावं लागलं. मन पुन: स्वत:ला दोष देत आहे.


जीवनाचा प्रवाह अनिवार्य प्रकारे दुस-या किना-याकडे म्हणजे मृत्युकडे नेतो

इथे कळालं की, तवा घाटच्या संगमावर जो मोठा पूल होता, तो नदीने इथे आणून आपटला आहे! एका जागी त्या पुलाचे काही‌ अवशेषसुद्धा दिसले. इथून धारचुलापर्यंत- किंबहुना जौलजिबीपर्यंत रस्ता खूप जोखमीचा झाला आहे. कारण अनेक जागी रस्त्यावरचा पहाड तुटलेला आहे. रस्ता बनवताना डोंगर तोडूनच बनवावा लागतो. त्यामुळे लँड स्लाईडची सतत भिती आहे आणि काही ठिकाणी तर रस्त्याच्या खालचा बेसही तुटला आहे. म्हणजेच कुठे कुठे रस्ता अगदी पोकळ आहे. ट्रकवाले आणि इतर ड्रायव्हर्स ते बघून न बघितल्यासारखं करतात. त्यामुळेच कदाचित दिल्ली- धारचुला बस अजूनही धारचुलाच्या ऐवजी बलुआकोटवरूनच परत जाते आहे. असो.

काही वेळाने दुसरी जीप घेतली आणि धारचुलाला पोहचलो. औषधांचं‌ सॉर्टिंग करून घेतलं. डॉक्टरांनी यादी दिली आहे. त्यानुसार आता सरकारी हॉस्पिटलमधून औषधं घ्यायची आहेत. काही जण आपत्तीग्रस्तांच्या शिबिरात जाऊन कपडे वाटून आले. तिथे आठवड्यातून एक दिवस मुलांसाठी दुध, हिरव्या भाज्या, सोयाबीन इत्यादी द्यायचं आहे. बाजारात जे उपलब्ध असेल त्यातून द्यावं लागेल. आणि जे उपलब्ध नाही, ते दूर खरेदी करून आणावं लागेल. आता अस्कोटमध्ये गेल्यावर हे काम बघायचं आहे. धारचुलाला पोहचल्यानंतर बीएसएनएल फोन सुरू झाले. सगळ्यांच्या घरी बोलणं झालं. एकाच्या घरी संपर्क न झाल्यामुळे घरचे काळजीत होते. तिथेही बोलणं‌झालं. धारचुलामध्ये औषधांबरोबरच मित्रांसाठी काही कपडे आणि आवश्यक सामानही विकत घेतलं. किती दिवस थांबावं लागेल, हे निघताना त्यांना माहिती नव्हतं. औषधं‌ घेता घेता संध्याकाळ झाली. त्यामुळे ते दोघं जण आज धारचुलामध्येच राहतील. आता उशीरा परत जाऊन पूर्ण चढ पार करणं आज शक्य नाही. ते आज आराम करून सकाळी लवकर निघतील. त्यांची खूप काळजी‌ वाटते आहे. इतक्या तीव्र चढावर ते सामान घेऊन कसे चढणार?? आणि त्यंचा पुढचा रस्ता- खेलावरून पांगला, नारायण आश्रम आणि पांगू संपूर्ण चढाचाच आहे...


धारचुलामध्ये तिबेट दूर नसल्याची खूण बघायला मिळाली. एक तिबेटी हॉटेलही दिसलं.

... संध्याकाळ होता होता आम्ही धारचुलातून निघालो. आता फक्त हेल्पियाला जायचं आहे. रस्त्यातून सर अनेक फोन करत आहेत. ट्रकला पुढे आणण्याचा प्रयत्न करत आहेत. रेशन, धान्य व अन्य सामान स्वस्तात कुठे मिळेल, ह्याचा शोध सुरू आहे. सामानाच्या स्टोअरचीही बोलणी सुरू आहेत. आणि हे सगळं काम पुढे नेण्यासाठी पैशांची आवश्यकता आहेच. म्हणून बँकेत खातं उघडलं आहे. पण अद्याप चेक बूक मिळालेलं नाही. ते म्हणतात की, सर्व्हर डाऊन आहे. अशा गोष्टी सुरू आहेत. प्रत्येक जण आपल्या पद्धतीने ह्या गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करतो आहे. विशेष गोष्ट अशी आहे की, प्रत्येक जण ह्या कामामध्ये वेगवेगळ्या प्रकारे सहभागी आहे. जीपचे चालक- नारायण जी अर्पण संस्थेचे कार्यकर्ते नाहीत. पण तेसुद्धा सर्व कामांमध्ये सहभाग घेत आहेत. ते 'बाहेरचे' आहेत, असं वाटतंच नाही. आता तर सर्व मिळून एकच टीम आहे. कोणीच वेगळं नाही आणि प्रत्येक जण आपापल्या लेव्हलवर कार्यरत आहे.


दोन वेळेस विस्थापित झालेल्या नया बस्तीमधील एक घर. मागेच नदी

वाटेत नया बस्तीमध्ये अर्पणच्या दिदींनी काही साड्या महिलांना दिल्या. त्यांची सगळ्या ठिकाणी व्यक्तिगत ओळख आहे. पुढच्या कामाबद्दल सर अनेक गोष्टी समजावून सांगत आहेत- कपडे वाटणं, आरोग्य शिबिर घेणं, मदत करणं हे तर अगदी वरवरचं काम आहे. खरं महत्त्वाचं काम तर त्याहून वेगळं आहे. त्यांनी सांगितलं की, आता नद्या आपला मार्ग बदलत आहेत. सरळ रेषेत वाहण्याचा प्रयत्न करत आहेत. पर्वतांमध्ये प्रचंड हानी व -हास झाल्यामुळे मोठं क्षेत्र असुरक्षित झालं आहे. त्याचं जिओलॉजिकल सर्वेक्षण व्हायला हवं. त्यानुसार कुठे वस्ती असावी आणि कुठे नसावी, ह्याचा ले- आउट असावा. त्यासाठी सरकारला सांगायचं‌ आहे. आता हळु हळु मदत कार्याचे पुढचे टप्पेही सुरू होतील.

ही चर्चा चालू असतानाच अनौपचारिक वातावरणात हास्य- विनोदही सुरू आहेत. सरांचा अनुभव आणि श्रेष्ठता मोठी असूनही ते मित्र असल्यासारखे सगळ्यांसोबत हास्य- विनोद करतात. वयाचं ओझं अजिबात नाही. कामासोबत थट्टा- मस्करीही‌ सुरू आहे. अशा वेळी कितीही मोठा प्रवास असला तरी तो छोटाच वाटतो.

जौलजिबीच्या पुढे एका वळणावर काही वाहनं उभी आहेत. उतरून बघितलं तर दिसलं की, एक ट्रक खड्ड्यात पडला आहे. साध्याच वळणावर दोन जण प्राणाला मुकले. कदाचित त्याआधी ते आपली सजगता दारूला देऊन बसले असतील. प्रवास पुढे सुरू राहिला. हेल्पियाला पोहचेपर्यंत रात्र झाली. तिथे पोहचल्यावर अर्पणचे अन्य साथीदारांनी हसून स्वागत केलं. आता उद्यापासून ह्या कामाच्या वेगळ्या बाजू पुढे येतील.

 मैत्री संस्था नेपाळच्या भूकंपानंतर तिथे अजूनही कार्यरत आहे. त्याशिवाय संस्था मेळघाटात व विविध विषयांवर मोठं काम करते. संस्थेबद्दल अधिक माहिती व संपर्कासाठी- www.maitripune.net maitri1997@gmail.com.

पुढील भाग: निसर्गाने दिलेला धोक्याचा इशारा: ७- स्टोअरची तयारी

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा भागही माहितीपूर्ण - नवनवीन गोष्टी समजत आहेत ....

ही चर्चा चालू असतानाच अनौपचारिक वातावरणात हास्य- विनोदही सुरू आहेत. सरांचा अनुभव आणि श्रेष्ठता मोठी असूनही ते मित्र असल्यासारखे सगळ्यांसोबत हास्य- विनोद करतात. वयाचं ओझं अजिबात नाही. >>>> श्री. शिरीश जोशी कधीही कोणाला टेन्शन येऊ देत नाहीत .... Happy (या वयातही त्यांचा फिटनेस जबरदस्त दिस्तोय..)

कालच सगळे भाग वाचुन काढले..
आत्ता प्रतिसाद देतेय..
सर्व वर्णन वाचुन कौतुक वाटत लोकांच कि ते त्यातही तगुन आहेत..
माणुस उगा स्वतःच्या गमजा मारतो पण निसर्गाने मनात आणल तर एका फटक्यात होत्याच नव्हत करायला कै वेळ लागत नाही त्याला..मस्त माहितीची मालिका ..

एकाच फोटोत निसर्गाने मुक्त हस्ते केलेल्या सौंदर्याची उधळण आणी त्याचबरोबर निसर्गाच्या रौद्र स्वरूपाने केलेले भयंकर तांडव दिसत आहे..

सामान्य मनुष्याच्या आकलनाबाहेरचे हे जग दाखवण्याबद्दल्,मार्गी यांचे विशेष आभार!!!