'हायवे'च्या निमित्ताने श्री. गिरीश कुलकर्णी यांच्याशी संवाद

Submitted by माध्यम_प्रायोजक on 19 August, 2015 - 23:43

एक उत्तम लेखक व तितकाच दर्जेदार अभिनेता म्हणून गिरीश पांडुरंग कुलकर्णी हे नाव सुपरिचित आहे. भूमिकेत जीव ओतून काम करणारा एक प्रगल्भ अभिनेता, अशी त्यांची ओळख आहे. 'गिरणी', ’विलय’ हे लघुपट, तसंच ’वळू’, ’देऊळ’, ’विहीर’, ’मसाला’ या चित्रपटांचे पटकथा व संवाद गिरीश कुलकर्णी यांनी लिहिले आहेत. ’गिरणी’, ’गारुड’ अशा अनेक लघुपटांतून, व 'वळू', 'गाभ्रीचा पाऊस', 'विहीर', ’गंध', ’बाधा’, ’रेस्टॉरंट’, ’मसाला’, 'पुणे ५२', 'अग्ली' या चित्रपटांतून त्यांनी साकारलेल्या भूमिका प्रेक्षकांच्या कायम स्मरणात आहेत. 'गिरणी' या त्यांनी लिहिलेल्या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपटाचा राष्टीय पुरस्कार मिळाला होता. ’देऊळ’ या चित्रपटातील कामगिरीसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा व सर्वोत्कृष्ट पटकथा-संवादलेखनाचा असे दोन राष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला गेला. ’अरभाट चित्र’ ही त्यांची निर्मितीसंस्था असून ’वळू’, ’मसाला’, ’पुणे - ५२’ या चित्रपटांची निर्मिती त्यांनी केली आहे.

'हायवे - एक सेल्फी आरपार' हा त्यांनी लिहिलेला व निर्मिलेला चित्रपट येत्या २८ ऑगस्ट रोजी सर्वत्र प्रदर्शित होतो आहे. या चित्रपटात एक महत्त्वाची भूमिकाही त्यांनी साकारली आहे.

या निमित्तानं त्यांच्याशी साधलेला संवाद -

banner_hoarding_02_16x9_ft_theme_03.jpg

’हायवे’चं मूळ कशात आहे?

अनुभवात आहे आयुष्याच्या. सगळ्याच गोष्टी ज्या मी लिहीत आलो आहे, त्या कुठेतरी माझ्या जगण्याशी संबंधित, आणि त्यातून उद्भवलेल्या, उगम पावलेल्या अशाच आहेत. ’हायवे’वरनं आपण सगळेच जाणंयेणं करत असतो. त्यातही मुंबई-पुणे हायवे हा विशेष रहदारीचा. या रस्त्याला एक सांस्कृतिक संदर्भ होता. खंडाळ्याचा घाट, वाटेत मिळणारा वडा, दोन शहरांना जोडणारा हा रस्ता अनेक गाण्यांमध्ये आला वगैरे वगैरे. सांगायचं असं की, अचानक हा रस्ता ’एक्स्प्रेस-वे’ झाला आणि त्यानंतर मग असे हायवे सगळीकडेच आले. आपल्या आयुष्याचा भाग झाले. इथे सिग्नल नाहीये, थांबा नाही. विना-थांबा एक सलग प्रवास असा सुरू झाला. त्यामुळे प्रवासाला वेग आला. त्या वेगाबरोबर असुरक्षितता आली, थरार आला. जगण्याला हे सगळे आयाम मिळाले गेल्या काही वर्षांमध्ये. असे जे काही बदल घडत होते, ते तू, मी, आपण सगळेच पाहत होतो. त्या सगळ्याबद्दलचे प्रश्नही आपल्याला पडत होते. हा प्रवास नेमका कुठे चालला आहे, कुठल्या दिशेनं, यामध्ये माणसाचं नेमकं काय होतंय, वगैरे अनेक प्रश्न होते. त्यामुळे याबद्दल काहीतरी लिहावं असं वाटतंच होतं. त्यात उमेशला हायवेवरच्या प्रवासात काही अनुभव आले. त्याच्या एका मित्रानं काही अनुभव सांगितले. तो बहुधा या चित्रपटामागचा ट्रिगर होता. उमेश म्हणाला, आपण हायवेवरच्या या अनुभवांबद्दल काहीतरी करूया. पण त्यावेळी या विषयाबद्दल बाकी काहीच कल्पना, गोष्ट असं काही नव्हतं. काही चित्रचौकटी अशा अशा असाव्यात, एवढंच त्याला फक्त वाटत होतं. अशी अवस्था नेहमीच येते, त्यात काही वेगळं नाही. मीही ’हायवे’ या विषयावर चिंतन करायला लागलो. वर्ष - दीड वर्षाचा काळ यामध्ये गेला. या कल्पनेबद्दल काय करता येईल, काय सांगता येईल, याचा रुपकात्मक वापर करता येईल का, आयुष्यात ’हायवे’ हे खरंच एक रुपक बनून गेलंय का, असा सर्वप्रकारे विचार करायला लागल्यावर मग एक एक करत गोष्टी आकाराला यायला लागल्या. या ’हायवे’वरनं आपल्या आपल्या वाहनानं जाताना एक एकटेपण आहे, आणि माणसानं स्वतःशी संवाद करावा, अशी एक परिस्थिती तिथे तयार होते, हा विचार त्याच्या मुळाशी आहे, असं मला वाटतं.

तू जेव्हा चित्रपट लिहित असतोस, तेव्हा तुझ्यातला अभिनेताही तुला मदत करत असतो का?

हो, नेहमीच. मला त्याचा खूप उपयोग होतो. लिहिताना मी स्वतः सगळे प्रसंग अभिनीत करतो. सगळ्या व्यक्तिरेखा, सगळी पात्रं सजीव करण्याच्या दृष्टीनं माझं अभिनेता असणं उपयोगी पडतं. त्यांच्या लकबी, त्यांची भाषा, त्यांचे उच्चार, या सगळ्यांतच त्याचा खूप फायदा होतो. माझ्या सगळ्या चित्रपटांमध्ये माझीच मुख्य भूमिका असते असं नव्हे. बहुतांश वेळा अनेक मुख्य भूमिका असतात आणि त्यांतली एक भूमिका मी करतो. एकाच माणसामधून ही सगळी माणसं तुम्हांला बाहेर काढायची असतात, हे लेखक म्हणून फार अवघड आहे. त्या सगळ्यांची सुखदु:खं, रागलोभ, त्यांची पार्श्वभूमी, भूतकाळ समजून त्या त्या माणसाचं व्यक्तिचित्रण करायचं असतं. तर हे तसं त्रासदायक आहे. शिवाय सगळ्याच चित्रपटांमध्ये खूप व्यक्तिरेखा असल्यामुळे प्रत्येक व्यक्तिरेखा पूर्णतः वेगळी असावी, याचं भान ठेवावं लागतं. तर असं ते गणित आहे आणि या सगळ्यांत स्वतः अभिनेता असण्याचा खूपच फायदा होतो.

तू चित्रपट लिहितोस तेव्हा इतर व्यक्तिरेखांसाठीचे कलाकारही तुझ्या डोळ्यासमोर असतात का?

मला बहुतांश वेळा चित्रपट लिहितानाच माणसं दिसतात आणि चित्रपटात मला शक्यतो तीच हवी असतात. त्याचा फायदाही होतो.

तू लिहितोस आणि उमेश दिग्दर्शन करतो. ती प्रक्रिया कशी असते?

लिखाण करतानाच एकूण चित्रपटाविषयी बराच सुस्पष्ट असा ऊहापोह झालेला असतो. आम्ही दोघांनी मिळूनच सुरुवातीला चित्रपटाचं स्वरूप, त्याचा पोत असं सगळं ठरवलेलं असतं. शिवाय आम्ही अगोदर तालमी करतो. त्यामुळे अनेक गोष्टी प्रत्यक्ष चित्रीकरणाच्या आधी पक्क्या झालेल्या असतात. चित्रीकरणाच्या वेळी चाचपडावं लागत नाही. तांत्रिक बाबींचं दिग्दर्शन पूर्णपणे उमेश करतो.

शहरांतला गोंगाट हल्ली खूप वाढलाय. तो प्रत्येकच शहरात असतो. एका शहरातून दुसर्‍या शहरात जाताना हा गोंगाट आपली सोबत करतो. शहरी वातावरणाचे, गोंगाटाचे तुझे अनुभव या चित्रपटात दिसले आहेत का?

गोंगाटाचं वाढणं ही एक सामाजिक प्रक्रिया आहे, पण चित्रपटाचा मूळ विषय हा नाहीये. जगण्याची पद्धतच एका संक्रमणामधून जात आहे. त्यामुळे वेगवेगळे सांस्कृतिक प्रभाव आपल्यावर पडत आहेत आणि त्या सगळ्या संघर्षातून गोंगाट उरतोय. सर्वदूर त्याचा प्रभाव आहे. त्यामुळे त्याचं शहरी, पुणेरी, मुंबईचं असं वर्गीकरण करता येत नाही. ज्या सांस्कृतिक बदलातून आपण जात आहोत, त्याचं पर्यवसान एका राजकीय सत्तांतरामध्येही झालेलं दिसून येतं. हा असा काळ आपण जगत आहोत आणि यातून आपल्या गाठीशी जे काही अनुभव जमतात, ते काही थेट वापरता येत नाहीत. पण त्यातून जे काही आकलन होतं, आपल्याला जे प्रश्न पडतात, त्याचा मात्र उपयोग होतो. तशा अर्थानं, सगळंच लिखाण जगण्यातूनच उद्भवतं.

हल्ली माझा एक सलग विचार होऊ शकत नाही, कारण भाषिक संक्रमण सुरू आहे. माझ्या विचारांच्या भाषा अन्य-अन्य झालेल्या आहेत. त्यामुळे सलग एका भाषेत एक वाक्य मला सुचत नाही. अभिव्यक्तीचे जसे हे तुकडे तुकडे झाले आहेत, तसंच माणसाचं जगणंही झालेलं आहे. त्यामुळे या चित्रपटाला एकच बांधेसूद कथानक असू नये, असं मला वाटलं. म्हणून जरा वेगळा विचार करून या चित्रपटाची पटकथा लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. यात अनेक कथानकं आहेत, एकच सलग असं नाही, पण सगळ्यांत एक सूत्र आहे. ती सगळी कथानकं पूर्ण झालीच पाहिजेत, असंही काही बंधन ठेवलेलं नाही. अनेक अपूर्ण अशाही गोष्टी आहेत.

’सेल्फी आरपार’ या शीर्षकाचं महत्त्व काय?

आपण बोललो तसं सांस्कृतिक संक्रमण होत असताना माणसं भौतिकाच्या मागे खूप वेगात लागलेली दिसतात. त्यातून ती आत्मकेंद्री होतानाही दिसतात. आपण स्वतःच्या प्रेमात आहोत, त्यापोटी सेल्फी काढली जाते. एक द्विमितीय चित्र आपल्या हाताशी येतं. त्यात खरा ठाव लागतोच असं नाही. खरं खोलात जाण्यासाठी, अशी आरपार सेल्फी मला काढायला लागेल जिथे माझं माझ्याशी नेमकं बोलणं होऊ शकेल. हा चित्रपट तशा अर्थानं काय करेल? तर कुठल्याही व्यक्तिरेखेची एक गोष्ट सांगून तुम्हांला सरसकटीकरण करायला लावणार नाही. तुम्ही त्या व्यक्तीबरोबर जणू सहप्रवासी आहात, असा अनुभव देत तो तुम्हांला पुढे घेऊन जाईल. तुम्ही शांतपणे, तिर्‍हाईत म्हणून जात असताना, इतरांच्या गोष्टी ऐकत असताना तुमचाच तुमच्याशी संवाद होईल आणि त्या प्रवासात एका परीनं सामील होऊन तुम्हीही एक अनुभव घ्याल, अशी त्या गोष्टीची आणि त्याच्या परिणामाची बांधणी केली आहे.

या चित्रपटातल्या तुझ्या भूमिकेबद्दल सांगशील का?

मी एका परदेशस्थ भारतीयाची भूमिका केली आहे, जो नुकताच भारतात परत आला आहे. तो मुंबईहून पुण्याला चालला आहे. आपण सगळेच स्वतःचं 'बॅगेज' घेऊन प्रवास करत असतो. आजकाल त्या अर्थी हे 'बॅगेज' खूप वाढलंय. त्याचाही सांकेतिक अर्थानं वापर करण्याचा प्रयत्न केला आहे. तर हासुद्धा आपलं बॅगेज घेऊन निघालाय. एका परीनं ते ओझं गळून पडणं, त्याचा निचरा होणं, आणि हलकं होऊन त्याचं स्वतःच्या समीप येणं असा तो प्रवास आहे.

***

मायबोली.कॉम या चित्रपटाचे माध्यम प्रायोजक आहेत.

***
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users