मैसूर रसम

Submitted by अमेय२८०८०७ on 12 August, 2015 - 12:45

आज आलेल्या पेपर रसमच्या कृतीवरुन लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

माहिती स्रोत : वाह शेफ

हाही रसमचाच एक प्रकार पण मैसूरकडचा. कृती आणि बरेच घटक तामिळ रसमशी मिळते असले तरी ओल्या खोबर्‍याच्या वापराने किंचित वेगळा स्वाद येतो.

घटक :

रसम पावडरसाठी
सुक्या मिरच्या तीन चार (तिखट जास्त असतील तर दोन पुरेत), धणे (दीड टे स्पून), जिरे (दीड टे स्पून), कच्ची तूरडाळ (दीड टे स्पून), कच्ची उडीद डाळ (एक टे स्पून), मिरीदाणे (एक ते दीड स्पून तिखट आवडते त्यानुसार), कढीलिंब (दहा पाने), खोवलेले ओले खोबरे (दोन टे स्पून), लसूण (सहा सात पाकळ्या) ऑप्शनल.
(या प्रमाणाने दोनदा रसम करता येईल इतका म्हणजे सधारण सहा चमचे मसाला होईल)

दोन वाट्या पाणी, तीन वाट्या तूरडाळ शिजवलेले पाणी, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, दोन वाट्या ताजी टोमॅटो प्युरे, चिमूटभर हिंग व हळद, दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून, कोथींबीर, गुळाचा छोटा खडा

फोडणी
मोहरी, जिरे, हिंग (अर्धा टीस्पून), कढीलिंब पाच सहा पाने

सजावट : कोथींबीर, ओले खोबरे (ऑप्शनल)

rasam1.JPG

कृती:

सुक्या मिरच्या, धणे, जिरे, कच्ची तूरडाळ, कच्ची उडीद डाळ, मिरीदाणे मंद आचेवर भा़जून घ्या.
दोन तीन मिनिटांनंतर कढीलिंब आणि खोबरे घाला. खोबरे हलके तांबूस होईपर्यंत भाजा.
मिश्रण गार करून,लसणासोबत (वापरायचा असेल तर) कोरडेच मिक्सरमधून काढा. अगदी बारीक करायची गरज नाही.

rasam2.jpg

पातेल्यात दोन वाट्या पाणी, तीन वाट्या तूरडाळ शिजवलेले पाणी, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, दोन वाट्या ताजी टोमॅटो प्युरे, चिमूटभर हिंग व हळद आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून एक उकळी काढा, कोथींबीर आणि छोटा गुळाचा खडा टाकून आच मंद करा व आणखी पाच मिनिटे झाकण लावून शिजवा. अगदीच दाट वाटले तर अजून एखाद दुसरी वाटी पाणी वाढवता येईल.

केलेल्या मसाल्यातील तीन चमचे रसम मसाला घाला आणि पुन्हा झाकण लावून तीन चार मिनिटे ठेवा. चवीनुसार मीठ घाला.

फोडणीचे साहित्य वापरून खमंग फोडणी करा (शक्यतो तुपाची) आणि रसममध्ये घाला. मिसळून गॅस बंद करा.
कोथींबीर आणि हवे असल्यास थोडे ओले खोबरे घालून सजवा आणि खायला घ्या.

rasam3.jpgrasam4.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आजच हे रस्सम केले होते. मस्त झाले. ताजा रस्सम मसाला आता हाताशी आहे त्यामुळे पुन्हा पुन्हा बनवता येईल.
रेसिपी साठी धन्यवाद अमेय.

Pages