मैसूर रसम

Submitted by अमेय२८०८०७ on 12 August, 2015 - 12:45

आज आलेल्या पेपर रसमच्या कृतीवरुन लिहिण्याची प्रेरणा मिळाली.

माहिती स्रोत : वाह शेफ

हाही रसमचाच एक प्रकार पण मैसूरकडचा. कृती आणि बरेच घटक तामिळ रसमशी मिळते असले तरी ओल्या खोबर्‍याच्या वापराने किंचित वेगळा स्वाद येतो.

घटक :

रसम पावडरसाठी
सुक्या मिरच्या तीन चार (तिखट जास्त असतील तर दोन पुरेत), धणे (दीड टे स्पून), जिरे (दीड टे स्पून), कच्ची तूरडाळ (दीड टे स्पून), कच्ची उडीद डाळ (एक टे स्पून), मिरीदाणे (एक ते दीड स्पून तिखट आवडते त्यानुसार), कढीलिंब (दहा पाने), खोवलेले ओले खोबरे (दोन टे स्पून), लसूण (सहा सात पाकळ्या) ऑप्शनल.
(या प्रमाणाने दोनदा रसम करता येईल इतका म्हणजे सधारण सहा चमचे मसाला होईल)

दोन वाट्या पाणी, तीन वाट्या तूरडाळ शिजवलेले पाणी, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, दोन वाट्या ताजी टोमॅटो प्युरे, चिमूटभर हिंग व हळद, दोन हिरव्या मिरच्या तुकडे करून, कोथींबीर, गुळाचा छोटा खडा

फोडणी
मोहरी, जिरे, हिंग (अर्धा टीस्पून), कढीलिंब पाच सहा पाने

सजावट : कोथींबीर, ओले खोबरे (ऑप्शनल)

rasam1.JPG

कृती:

सुक्या मिरच्या, धणे, जिरे, कच्ची तूरडाळ, कच्ची उडीद डाळ, मिरीदाणे मंद आचेवर भा़जून घ्या.
दोन तीन मिनिटांनंतर कढीलिंब आणि खोबरे घाला. खोबरे हलके तांबूस होईपर्यंत भाजा.
मिश्रण गार करून,लसणासोबत (वापरायचा असेल तर) कोरडेच मिक्सरमधून काढा. अगदी बारीक करायची गरज नाही.

rasam2.jpg

पातेल्यात दोन वाट्या पाणी, तीन वाट्या तूरडाळ शिजवलेले पाणी, लिंबाएवढ्या चिंचेचा कोळ, दोन वाट्या ताजी टोमॅटो प्युरे, चिमूटभर हिंग व हळद आणि दोन हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालून एक उकळी काढा, कोथींबीर आणि छोटा गुळाचा खडा टाकून आच मंद करा व आणखी पाच मिनिटे झाकण लावून शिजवा. अगदीच दाट वाटले तर अजून एखाद दुसरी वाटी पाणी वाढवता येईल.

केलेल्या मसाल्यातील तीन चमचे रसम मसाला घाला आणि पुन्हा झाकण लावून तीन चार मिनिटे ठेवा. चवीनुसार मीठ घाला.

फोडणीचे साहित्य वापरून खमंग फोडणी करा (शक्यतो तुपाची) आणि रसममध्ये घाला. मिसळून गॅस बंद करा.
कोथींबीर आणि हवे असल्यास थोडे ओले खोबरे घालून सजवा आणि खायला घ्या.

rasam3.jpgrasam4.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही दिसतंय.
सोना मसुरी तांदळाचा भात, रस्सम, बटाटा / लाल भोपळा / झुकीनी / वांगं इत्यादींची सांबार मसाला (सासूबाई सुक्या मिरच्या, धने, जीरे, मिरी, उडद डाळ, ह. डाळ किंची भाजून, ताजा मसाला करून घालतात) घालून केलेली भाजी, अगदी ताजं दही घालून केलेलं काकडी-टोमॅटो-कांदा रायतं आणि ताजं लोणचं. वरून फोडणी दिलेला दहीभात. एकदम मस्त बेत होतो.

टिना, चिंचेचा कोळ घालायचा आहे की...

अजून एक म्हणजे, उडदाच्या डाळीचे छोटे वडे करून तेही अशा रस्समबरोबर मस्त लागतात.

सॉलिड मस्त आहे. दिसतंय पण किती सुंदर.

असंच उचलून पिता आले असतं तर, हम्म्म्म.

(पूर्वी पाकृबरोबर एक ओघवती स्टोरी असायची अमेय, ती मिसिंग आज).

इन रस्समोंने तो मेरी रातोकी निंद हराम करदी..
मग काय टोमॅटो होते त्याच बिना चिंचेच टोमॅटो रस्सम बनवल..
मस्त वाटताय आता..तृप्तीची (म्हणजे तृप्ततेची..उगाच एखादा माबो आयडी सरसावून यायचा Wink ) ढेकर वगैरे की काय ती पन देउन झाली माझी..

ना ना ना बच्चो..कौतुक वगैरे नको..
रेस्पी गुगलुन मग तयार केलेली हाय..
डाळ नव्हती, गोडलिंबाचा पत्ता नोता अन भरीस भर सांभार पन नोता..
तरी बी काय बनली.. काय बनली.. आहाहा.. गप पिली दोगिंनी..

डिस्क्लेमर :
इथ बरीच नावं आलि आहेत ती सर्व विशेषण आहेत नाम नै .. आणि ती त्याच अर्थाने घेण्यात यावी..
धाग्याला दुसर वळण लावण्याचा अज्याबात हेतु नै आहे पण टोमॅटो रस्सम वाला धागा न दिसल्यामुळे फटू इथं टाकण्यात आला आहे, करिता अमेय यांना वाईट वाटू नये म्हणुन सेम टू सेम प्रतिसाद नंदिनी च्या धाग्यावर पोस्टण्यात आला हाय रे बा.. मांगुन कोनी बोलु नए..

मस्त रेसिपी आणि फोटो.
टीना, >>.तृप्तीची (म्हणजे तृप्ततेची..उगाच एखादा माबो आयडी सरसावून यायचा डोळा मारा ) ढेकर वगैरे की काय ती पन देउन झाली माझी..>> आहे ना तृप्ती आयडी माबोवर. आणि ती म्हणेलही 'माझा ढेकर मलाच देऊ देत, तू का देतेस म्हणून'. Wink

वाह, मस्त रेसिपी आणी कातिल फोटो, अमेय, खूप दिवसांनी आलास रेसिपी घेऊन..

वडा रस्सम ..फेव..

गूळ न घालता करीन(च), ए एस ए पी Happy

आहा!! फोटोसकट पाकृ... जबरदस्त!!
शनिवारी घडवतेच रस्सम! वरणाचं पाणी म्हणजे एक डाव घट्ट वरणात सहा-सात डाव पाणी मिसळलं तर चालेल ना? Wink

आहाहा.. कसला जानलेवा फोटो आणि सोबत हे "सोना मसुरी तांदळाचा भात, रस्सम, बटाटा / लाल भोपळा / झुकीनी / वांगं इत्यादींची सांबार मसाला (सासूबाई सुक्या मिरच्या, धने, जीरे, मिरी, उडद डाळ, ह. डाळ किंची भाजून, ताजा मसाला करून घालतात) घालून केलेली भाजी, अगदी ताजं दही घालून केलेलं काकडी-टोमॅटो-कांदा रायतं आणि ताजं लोणचं. वरून फोडणी दिलेला दहीभात.""

असले काही वाचले की पोटात कसले खवळायला लागते.

टीनाबै, तु खुपच भारीय. बघितले की लगेच करतेस. जरा डोक्यावरुन हात फिरव माझ्याही म्हणजे मलाही करायची बुद्धी होईल लगेच. Happy

सहा वाट्या कुठे वत्सला?
डाळ शिजवलेले तीनच वाट्या पाणी पुरे
(चार पाच टे स्पून डाळ तीन चार वाट्या पाणी घालून शिजवायचे आणि फक्त वरचे पाणी घ्यायचे)

मंजूडी तुम्ही म्हणता तसेही चालेल फक्त रसम थोडे पातळच चांगले लागते त्यामुळे घोटलेले वरण घातल्यावर दाट होऊ शकते.

Pages