मलई कोफ्ता

Submitted by अल्पना on 8 August, 2015 - 13:16
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

कोफ्त्यांसाठी
एक वाटी किसलेलं पनीर, एक मोठा उकडलेला बटाटा, मीठ, जीरेपुड, गरम मसाला, तिखट

ग्रेव्हीसाठी
टॉमॅटो प्युरी १०० ग्रॅम (अर्धे पाकिट), क्रिम १०० ग्रॅम (अर्धे पकिट), मिल्क पावडर ( मी अमुलचं डेअरी व्हाइटनर वापरते), काजुची पुड, फोडणीसाठी थोडं तेल, जीरे, चमचाभर लांब चिरलेलं अद्रक, कसुरी मेथी, गरम मसाला /किचन किंग मसाला , जीरे, हळद, धण्याची पुड, तिखट, मीठ इ.

क्रमवार पाककृती: 

कोफ्त्यांसाठी लिहिलेलं सगळं साहित्य एकत्र मळून घ्यावं. व्यवस्थित मळल्यावर त्याचे आप्प्यांच्या आकाराचे गोळे करावेत. हवं असल्यास त्या गोळ्यांमध्ये काजुचा तुकडा किंवा एखादा किसमीस ठेवता येईल.
आप्पेपात्रात हे गोळे शॅलो फ्राय करून घ्यावेत. यात बाइंडींग साठी मैदा किंवा कॉर्नफ्लोअर न घातल्याने कढईत तळले तर गोळे फुटून सगळाच घोळ होवू शकतो. आप्पेपात्रात मात्र अगदी मस्त होतात. पनीरचं तेल सुटत असल्याने शॅलो फ्राय करताना अगदी थेंब-दोन थेंब तेल वापरलं तरी चालेल. एक बाजू झाल्यावर उलटताना खूप हलक्या हाताने कोफ्ते उलटावे लागतात.

हे कोफ्ते आप्पेपात्रात होत असतानाच एका कढईत थोड्या तेलात जीरे, अद्रक आणि हळद घालून फोडणी करावी. या फोडणीत घरात असल्यास चिमुटभर बिर्याणी मसाला टाकला तर मस्त वास येतो. फोडणीत टॉमॅटो प्युरी घालून थोडी शिजू द्यावी. यात गरम मसाला किंवा किचन किंग मसाला, तिखट, धण्याची पुड आणि कसूरी मेथी घालावी. टॉमॅटो प्युरीला तेल सुटल्यावर त्यात क्रिम घालावे.
ही ग्रेव्ही पातळ वाटल्यास त्यात मिल्क पावडर घालावी. चवीप्रमाणे मीठ घालावे. विकतची टॉमॅटो प्युरी वापरली असेल तर ग्रेव्ही बर्‍यापैकी आंबट वाटते. अश्यावेळी मी तरी काजुच्या पावडरीपेक्षा एमटीआरची केसर-बदाम पावडर घालते. (ही खरं तर दुधात घालण्यासाठी असते आणि त्यामूळे गोड असते) याच्या गोडव्यामूळे टॉमॅटोचा आंबटपणा जाणवत नाही.

ग्रेव्ही व्यवस्थित उकळल्यावर त्यात कोफ्ते घालून एकदा गरम करून घ्यावी. परत उकळल्यावर कोफ्ते फुटतिल का हे मला माहित नाही. उरलेली कोफ्ता करी उद्या सकाळी उकळल्यावरच कळेल ते. Happy

IMG_20150808_213714.jpgIMG_20150808_213734.jpg

वाढणी/प्रमाण: 
२-३ जण
अधिक टिपा: 

मृण्मयीची पालक आणि चीझच्या बॉलची एक रेसेपी(http://www.maayboli.com/node/4515) आहे. मागे पार्टीसाठी करताना चीझ ऐवजी पालक, पनीर आणि बटाटा वापरून आप्पेपात्रात हे बॉल केले होते. त्यावरून कोफ्ते करायला सुचले.
ग्रेव्ही सायोच्या सुप्रसिद्ध पनीर माखनीचे मी करत असलेले व्हर्जन आहे.
रेडीमेड टॉमॅटो प्युरी वापरायची नसेल तर ३-४ मध्यम आकाराच्या टॉमॅटोची कच्चीच फुप्रो मधून्/चॉपर मधून प्युरी करून घ्यावी. ही शिजायला किंचीत जास्त वेळ लागतो. पण ही प्युरी आंबट नसते त्यामूळे नंतर आंबटपणा लपवण्यासाठी अजून थोडं क्रिम घाल, थोडी अजून मिल्क पावडर घाल, थोडी बदाम-केसर पावडर घाल असं करत बसावं लागत नाही. Happy

माहितीचा स्रोत: 
मॄण्मयी आणि सायोच्या दोन रेसेप्यांना एकत्र करणे
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच गं अल्पना..
मी पण करत असते अधे मधे..पण तळूनच घेते ते ही न फोडता Proud
फोटो मिळालाच चुकुन एखादा तर झब्बु देईन तुला..चान्सेस कमीच आहे म्हणा..
त्यात तु इतके छान फोटो दिलेले आहेस कि झब्बु म्हणता पन नै येणार माझ्या फोटोंना..

पनीर जास्त असेल किंवा बटाट्याइतकंच असेल आणि मैदा/ कॉर्नफोअर नसेल तर विरघळतात तेलात.
मी पहिल्यांदा मॄण्मयीच्या रेसेपीनी ते चीझबॉल्स केले त्यावेळी कमी तेलात करायचे म्हणून आप्पेपात्रात केले होते. नंतर एकदा भावाच्या घरी एका पार्टीसाठी मोठ्या प्रमाणात करायला घेतले. त्याच्या घरी आप्पेपात्र नव्हतं म्हणून तळायला घेतले आणि ते विरघळायला लागले. मग आईच्या सल्ल्याने तेलाशिवाय फ्रायपॅनमध्ये शॅलोफ्राय केले.

त्यानंतर मात्र कधीच कढईत तळायची हिम्मत केली नाही.

कोथिंबीर आणि उभी चिरलेली मिरची. गोडसर चव असल्याने सोबत हिरवी मिरची नसेल तर जेवण घशाखाली जात नाही. Proud

झकास आणि सोपी रेसिपी. गोडसर असल्याने माझ्यासाठी परफेक्ट आहे. मी एकदाच मलई कोफ्ते केले होते कुठेतरी रेसिपी वाचून. त्यात चमचा चमचा चारोळी आणि अजून बरच काय काय घालायचं होतं वाटून. तुझ्या रेसिपीत इतके अती लाड नाहियेत हे पाहून नक्कीच करेन. धन्यवाद.

आश्विनी यातला गोडपणा काजु + सुक्या खोबर्‍याच्या पाणि टा़कुन केलेल्या पेस्ट ने व्यवस्थित येतो.. मी ११वीत असताना शिकली होती परफेक्ट हाटेलवाली डिश..सुपर्ब चव येते त्यान Happy

कसले मस्त दिसताय्त कोफ्ते! जरा कौशल्याचंच काम असणार पण न फुटता ते बनवणे ! लग्गेच करून बघायचा मोह होतो अहे !!

आवडला मलई कोफ्ता. फोटो पण मस्त आलाय. अप्पेपात्राची आयडीया झकास. कारण पनीर तळताना फुटुन तेलाचे चटके बसायचे अनूभव घेतलेत.

फोटो छान. मी मागे वरचंच साहित्य घेऊन तळून केले होते. फुटले/विरघळले होते की नाही लक्षात नाही आता. आप्पेपात्राची आयड्या चांगली आहे.

अल्पना,
तुझ्या पाकृ माझ्या आवडत्या आहेत. एकतर उगाच हजारो प्रकारचे नवीन साहित्य विकत घ्यावे लागत नाही. शिवाय करायला सोप्या आणि गॅरंटीड चव.
करुन पाहते नक्की. मग नैवेद्य दाखवायला येईन.

मस्त आहे रेसिपी. अल्पना खरच तुझ्या रेसिपीज सोप्या असतात करायला. आणि थोड इकडे तिकडे झाल तरी चवीला मस्त होतात Happy

अनघा, आप्पेपात्र नसेल तर त्या सारणाच्या टिक्क्या बनवून तव्यावर शॅलो फ्राय करता येतील. पण मग ते गोल-गरगरीत कोफ्ते म्हणून राहाणार नाहीत Wink

Pages