पुस्तक परिचय-पर्वतावरील पुनर्जन्म

Submitted by नरेंद्र गोळे on 2 August, 2015 - 09:21

“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय: पर्वतावरील पुनर्जन्म


“बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित  मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे. त्या पुस्तकाचा हा अल्पपरिचय.

“ पीटीआय, काठमांडु
Published: Wednesday, May 22, 2013
आठ हजार ८४८ मीटर उंचीवर यशस्वी चढाई

काही गुंडांनी चालत्या ट्रेनमधून फेकल्यामुळे एक पाय गमावलेल्या माजी राष्ट्रीय व्हॉलीबॉलपटू अरुणिमा सिन्हा हिने नवीन इतिहास रचला आहे. जगातील सर्वोच्च शिखर असलेले माऊंट एव्हरेस्ट पादाक्रांत करणारी ती पहिली अपंग भारतीय ठरली आहे. टाटा समूहातर्फे आयोजित करण्यात आलेल्या  इको एव्हरेस्ट मोहिमेअंतर्गत अरुणिमा मंगळवारी सकाळी १०.५५ ला ८ हजार ८४८ मीटर उंचीच्या हिमालयाच्या सर्वोच्च टोकावर पोहोचल्याची माहिती नेपाळ पर्यटन मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी दिली. ”

उत्तर प्रदेशची रहिवासी असलेली अरुणिमा १२ एप्रिल २०११ रोजी लखनऊ येथून दिल्लीला जात असताना काही गुंडांनी तिला पद्मावती एक्स्प्रेसमधून बाहेर फेकले होते. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या अरुणिमाच्या डाव्या पायावर शस्त्रक्रिया करून डॉक्टरांनी डावा पाय गुडघ्यापासून काढून टाकला. या मोहिमेवर निघण्याआधी वृत्तवाहिन्यांशी बोलताना अरुणिमा हिने सांगितले की, मी रुग्णालयात असताना प्रत्येकाला माझी काळजी वाटत होती. मात्र माझ्याकडे प्रत्येकाने दयेने बघू नये यासाठी काहीतरी वेगळे करण्याचा विचार माझ्या मनात घर करून होता. त्यामुळे जेव्हा एव्हरेस्ट मोहिमेबद्दल माहिती मिळवली, तेव्हा माझा भाऊ आणि प्रशिक्षकांना सांगितले. त्यांनीही मला प्रोत्साहन दिले.

त्यापूर्वी ती उत्तरकाशी येथील शिबिरात, टाटा स्टील  ऍडव्हेंचर फाऊंडेशनशी जोडली गेली. तिथे, एव्हरेस्टवर चढणारी पहिली भारतीय महिला असलेल्या बचेंद्री पाल यांनी तिला प्रशिक्षण दिले. २०१२ साली ६ हजार ६२२ मीटर उंचीचे लडाखमधील छामसेर कांग्री हे उंच शिखर तिने काबीज केले. त्यामुळे एव्हरेस्ट सर करण्याची तिची इच्छा प्रबळ झाली होती.

जगातील सात प्रमुख खंडांतील सर्वोच्च शिखरांना “सप्त-शिखरे” म्हणून ओळखले जाते. आशिया खंडातील सागरमाथा (माऊंट एव्हरेस्ट), आफ्रिका खंडातील किलिमांजारो, युरोप खंडातील माऊंट एलब्रूस, ऑस्ट्रेलिया खंडातील कोशिस्को, दक्षिण अमेरिकेतील ऍकॉन्कागुआ, उत्तर अमेरिकेतील माऊंट मॅकिन्ली आणि अंटार्टिका खंडातील माऊंट व्हिन्सन ही ती सप्त-शिखरे आहेत. एव्हरेस्ट विजयानंतर अरुणिमाला ह्या सातही शिखरांवर आपली पावले उमटवून, “मूकं करोति वाचालं, पंगुं लंघयते गिरिं” ह्या ईश्वरी सामर्थ्याचा पुनरुच्चार करण्याची आकांक्षा निर्माण झाली. अद्याप एकाही अपंग व्यक्तीस हे साधता आलेले नाही. अरुणिमाने मात्र आपल्या दुर्दम्य आशावादाच्या जोरावर ह्यांपैकी आशिया खंडातील सागरमाथा (माऊंट एव्हरेस्ट), आफ्रिका खंडातील किलिमांजारो, युरोप खंडातील माऊंट एलब्रूस, ऑस्ट्रेलिया खंडातील कोशिस्को ही चार पर्वतशिखरे सर केलेली आहेत. अमेरिका खंडांतील पर्वतशिखरांकरता तिची आता तयारी सुरू आहे. सप्तशिखरांवर पदचिन्हे उमटविण्यासाठी तिला आपल्या सगळ्यांच्या हार्दिक शुभेच्छा!

१२ डिसेंबर २०१४ रोजी पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदींच्या ह्यांच्या हस्ते “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न झाले होते. तर, ३० मार्च २०१५ रोजी भारताचे राष्ट्रपती श्री प्रणव मुखर्जी ह्यांचे हस्ते अरुणिमाने “पद्मश्री” किताबाचा स्वीकार केला. उत्तरप्रदेशातील उन्नाव येथे “चंद्रशेखर आझाद क्रीडा संकूल” उभे करण्याची तिची योजना आहे. त्याच्या उभारणीचे काम “अरुणिमा फाऊंडेशन”च्या विद्यमाने सुरूही झालेले आहे. अरुणिमाच्या देदिप्यमान कर्तबाची अत्यंत प्रेरणादायी कहाणी ह्या पुस्तकाद्वारे सर्व मराठी वाचकांसाठी खुली झालेली आहे. राष्ट्रीय व्हॉलिबॉलपटू अरुणिमा सिन्हाला, १२ एप्रिल २०११ रोजी रेल्वे अपघातात पाय गमवावा लागल्यानंतर, लोक तिला  “बेचारी” म्हणू लागलेले सहनच होईना. त्या दुर्घटेनेपासून उण्यापुर्‍या दोन वर्षांच्या कालावधीत, २१ मे २०१३ रोजी सकाळी १०५५ वाजता, तिने एव्हरेस्ट शिखर सर करून होतकरू तरुणांकरता देदिप्यमान आदर्श प्रस्थापित केला. तेव्हा ती म्हणाली होती, “जिस दिन मै राह ढूँढते युवाओं के जिगर में अच्छे काम के प्रति आग जला सकूँ, तब सही मायने में मेरा अगला एव्हरेस्ट समिट होगा!”

“ढूँढे राह, जला सकूँ उन युवाओं के खयालात में ।
अच्छे काम कि आग”, ये ’अरुणिमा’, सोचे खयालात में ॥
“वो होगा सहि मायने समिट मेरा” था कहा बात में ।
ले स्फूर्ती, मन हिंदवी, उड चले, हो सूर्य वो विश्व में ॥   - नरेंद्र गोळे २०१४०११७

रोज खिन्न करणार्‍या वृत्तांनी भरलेल्या वृत्तपत्रांत हे अत्यंत उत्साहजनक वृत्त दिसून आले की, अरुणिमा सिन्हाने सागरमाथा शिखरास गवसणी घातली. लहान-सहान अपयशांनी, अपघातांनी, निराशाजनक वृत्तांनी हताश होणार्‍यांना उमेदीचे नवे आकाश दाखवणार्‍या अरुणिमास, मानाचा मुजरा! आज तिची सर्व कहाणी ह्या पुस्तकाद्वारे उपलब्ध झालेली आहे. ती होतकरू तरुणांनी वाचावी आणि तिच्या दैदिप्यमान यशाने प्रेरित होऊन लाखो निराश मनांना उज्ज्वल भविष्याचे वेध लागावेत हीच प्रार्थना!!

संदर्भः

१.      “बॉर्न अगेन ऑन द माऊंटन” ह्या मनीषचंद्र पांडे लिखित आणि पेंग्विन बुक्सतर्फे प्रकाशित मूळ इंग्रजी पुस्तकाचा प्रभाकर करंदीकर ह्यांनी केलेला मराठी अनुवाद “फिरुनी नवी जन्मले मी”, नुकताच प्रफुल्लता प्रकाशन ह्यांनी प्रकाशित केलेला आहे. किंमत रु.१७०/-.

२. मूकं करोति वाचालं http://nvgole.blogspot.in/2013/05/blog-post.html#links

Group content visibility: 
Public - accessible to all site users

रमा, शशांक आणि बेकार तरूण; आपण सगळ्यांनी आवर्जून अभिप्राय नोंदवलात त्याखातर मनःपूर्वक धन्यवाद!

रच्याकने हे अनुवादक म्हणजे आपले मा बो कर बापू करंदीकरच का ??
>>
होय. तेच ते. श्री करंदीकर एक माजी आय ए एस अधिकारी आहेत . याओपुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंर्त्री देवेंद्र फडणवीस यांनी दोनेक महिन्यापूर्वी मुम्बईत केले आहे. ( मी त्या कार्यक्रमात होतो म्हणून मला माहीत)