वर्‍हाडी ठेचा

Submitted by टीना on 28 July, 2015 - 08:20
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

* ओल्या लाल मिरच्या - अर्धा पाव ( म्या लाल झालेल्या मिरच्या घेतल्या.. हिरव्या असताना आणलेल्या मिरच्या समद्या वापरण्यात न आल्यानं लाल व्हाले लागल्या व्हत्या म्हणुन त्याच रपातपा केल्या..म्हणजे कामी आणल्या)
* लसणाच्या पाकळ्या - १० १२ ( १५ बी चालतीन.. तिखट किती झेलु शकता त्यावर हाय. )
* अद्रक - चित्रात दिसन तेवढा घ्या..
* जिरं - अर्धा चमचा
* मिठ - चवीनुसार घेता येत नसन त काही अर्थ नै तुमच्या सयपाकाले ..
* १ अख्ख्या लिंबाचा रस
* मिक्सर आणि मिक्सरच लहानवाल भांड.. ( कोणचाई यक प्रकार असुन जमत नै )
* मिरच्या जराश्या भाजासाठी तवा नै त कढई अन चालु जीवंत असणारी गॅस शेगडी..( सिलेंडर मदि गॅस भरुन असावा हे वेगळ सांगणार नाय.. इतकुशी गोष्ट बी सांगाची वेळ पडत असन त उद्या तुमी घास तोंडात कसा टाकाचा, कसा चावाचा कसा गिटकाचा ते बी पुसान..कोन सांगितल )

क्रमवार पाककृती: 

तर...

१. पहिले मिरचिच्या ठुश्या काढुन तिल जराशी मदुन मोडून तापलेल्या तव्यावर ( इथ वरच ) किंवा कढईत ( इथ कढईतच .. खाली वर कुठच नै ) भाजुन घ्या.

२. थंड झाल्यावर त्या मिरच्या + लसुण + अद्रकाचा तुकडा + लिंबाचा रस + मिठ + जिरं मिक्सरच्या छोट्या भांड्यात फिरवुन घ्या.

ज्याले जस वाटनं तस खा.. पोईसंग, भाकरीसंग मस्त लागते.. वरुन कच्च तेल घ्याच घ्या.. पोटाले जपुन बर..
एकापाठोपाठ दार वाजवाव लागले तर आपल्यावर नाव नाई..

हे कच्च सामान :
DSC06192-001.JPG

हे पिकल वाल Biggrin .. फाईनल रिजल्ट
DSC06201.JPG

ह्यापेक्षा डाऊन रंग आला त करताना नक्की मिरच्याच टाकल्या का नै ते बघुन घ्या..

वाढणी/प्रमाण: 
आता म्या पामरानं थे कसं सांगाव..पाहा कस जमते थे..
अधिक टिपा: 

सर्वात महत्वाचं म्हणजे..
१. भाजताना मिरच्या तोडून घ्या..अपनेआप फुटून बी ( मिरचिची ) डोयात गेली त कानाले खडा.. आपल्यावरवर नाव नाई..

२. मिरच्या धु का ? कोरड्या करु का ? लिंबाच्या बिया काढू का ? तेलात हिंग, गोडलिंबाचा पत्ता अन कहर म्हणजे साखर किंवा गुळ टाकु का अस विचारल त शप्पथ Angry

३. किती दिवस टिकन म्हंता ? आता का सांगु राजेहो..खाण्यावर हाय समद.. चार लोकाच्या घरात यवढा ठेचा दोन टायमाले खातो म्हणल त चार दिस टिकाले पाहिजेन.. कच्चा लसुण अद्रक हाय म्हणल्यावर फ्रिजमंदी ठेवसान.. आणान आफत नाई त..

४. फोटूत वरचा सांबार निर्रा दाखवालेच ठेवला बर..टाकान नाई त..
आन पहिल्या फोटूतली वाटी, लसणाचे फोतर हाय त्यात..ते पण होती तिथ म्हणुन फोटूत आली..थे कचरा टा़कू नका रे बा..

माहितीचा स्रोत: 
काइ आठवत नाई बा..
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छेछे, योकु, तीव्र असहमती!
लिंबाशिवाय मजा नाही याला.

येकदा खाल्लेला नं, पोटात धुमशान ... जिभेला धुमशान करून राहिलं.
कच्चा लसून न आलं लय बेक्कार...

पण खरच कच्चा लसून तो हि ताजा ताजा वाटून खाल्ला तेव्हा खूप पोटाला त्रास झालेला आठवतोय.
आपण नखभर ठेचा भरपूर भातात कालवून खावू.

दीड मायबोलीकर, फ्रिजात पिकवलेल्या..नै ओ फ्लॅट मंदी फ्रिज असण्याइतपत सुदैवी नै मी..भाजीच्या टोपलीतच पिकल्या त्या Lol ..

योकु, खरच लिंबाशिवाय मज्जा नाय..

झंपी, म्हणुन म्हणतेय ना जपुन जरा.. पण कच्च्या लसणाने पोट कधी दुखल्याचा, झोंबण्याचा अनुभव नै.. आम्ही बरेच्दा जेवणात एक ते दोन पाकळी कच्चा लसुण खातो.. रक्तदाबासाठी चांगल असत Happy

बाकी सर्वांचे धन्यवाद Happy

ओय होय टीनाबाय, लय भारी लिवलं तू. लई खुश आपण.

अहाहा काय ठेचा, तो पण लय भारी, तिखट खायला फार आवडतं.

टीना तुला विनोदी कथा छान लिहिता येतील.

टिने, वर्‍हाडी मानसांमधली हिरवीण कि क्क्वाय तू?? भारीच्च आवडली तुझी ठेचदार ईस्टाईल..

रेस्पी वाचताना हसून हसून डोळ्यात पाणी आलं, ठेचा खाऊन पण येणार बघ डोळ्याला पाणी... पण ते नसेल येणार

तर करायचा कशाला आनी खायचा का ठेचा...

आवडत्या दहात टाकली बघ ...

टीना , पाककृती माझा एरिया नाही.. पण असलं दणक्यात लिहीलंय ना तू.. की आख्खं वाचुन काढलं!
(असंच एकदा हैदराबादी बिर्याणी हैदराबादी टोन मधे ऐकली होती)

वा वा पाकृ आनि लिहिन्याची ष्टाईल दोनी बी खमंग!! वाईच फोडनी द्याची की वरुन हिंगाची!! बाकी झक्कास!!

लै ब्येस. आमी फकस्त केळकरान्चा वर्‍हाडी ठेचा खाल्लेला हाय. लय आवडतो. वरुन कच्च तेल घालुन्शान चाखत माखत खातो. पण कृती, लिखाणाची स्टाईल बोले तो एकदम झक्कास! ( हे झक्कास्स अनिल कपूर स्टाईलने वाचावे)

मिठ - चवीनुसार घेता येत नसन त काही अर्थ नै तुमच्या सयपाकाले ..>>

मिरच्या धु का ? कोरड्या करु का ? लिंबाच्या बिया काढू का ? तेलात हिंग, गोडलिंबाचा पत्ता अन कहर म्हणजे साखर किंवा गुळ टाकु का अस विचारल त शप्पथ >>> Lol

ठसक्यात लिहिलीये पाककृती... आमच्या मार्केटात मिळतात ओल्या लाल मिरच्या. जाड्या असतात त्यामुळे कमी तिखट असतात. आम्ही त्या मिरच्यांची ओलं खोबरं, कैरी, आणि भरपूर लसूण घालून चटणी करतो. भाकरीबरोबर लई झ्याक लागते. आता हा ठेचा करणार.

स्टाईल भारी.

आपण असल्या रेसिपींच्या वाट्याला पण जात नाही. शंभर ग्राम तिखट महिनादीड महिना पुरतं आमच्या घरात.

अरे हे वाचायच राहुनच गेलं..
वर्‍हाडी ठेचा आणि तो पण वर्‍हाडी पद्धतीने लिहिलास... लै भारी..
सगळ्यांचे प्रतिसाद वाचताना खुप मज्जा आली..

लगी दिवस झालेत, ठेचा करुन,.. आज करिनच म्हणते..

मस्त.
पण बाजारात लाल मिरच्या दिसल्या नाहीत हल्ली. त्यामूळे मला फ्रिजातल्या मिरच्या लाल व्हायची वाट बघावी लागणार.
लाल मिर॑च्यांचा ठेचा मी फक्त लसणीच्या पातीचा केलाय. एरवी मी एक दिवसा आड हिरव्या मिरच्यांचा ठेचा करते. ७-८ हिरव्या मिरच्या पोळ्या झाल्या की त्यात तव्यावर थोडं तेल घालून परतायच्या. मिरच्या परतल्या गेल्या की गॅस बंद करून तव्यावर मीठ आणि ५-६ लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि छोट्या बत्त्याने तव्यावरच रगडायचं. ठेचा /खरडा तयार. Happy

अल्पना,
तुला बाजारात दिसल्या नै..मी तर बघायचे पण कष्ट घेतले नै Lol
खर्डा मी सुद्धा करते...तसही तळलेल्या मिरचिशिवाय जेवण जात नै घरी कधीच.. मी घाई घाई मधे तर कधी मिरची डायरेक्ट शेगडीवर भाजते.. दोन मिरच्या ठुश्यांना धरुन भाजायच्या..दोन लसुन पाकळ्या घ्यायच्या आणि मग त्या मिरच्यांचे छोटे तुकडे करुन त्यात त्यापेक्षा बारिक लसणाचे तुकडे टाकायचे..मिठ आणि तेल टाकल की हादडायचं Wink

पाकृ ची दखल घेतल्याबद्दल सर्व प्रतिसादकर्त्यांचे आभार..

Pages