पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 1३ कन्याकुमारी - स्वप्नपूर्ती

Submitted by आशुचँप on 13 July, 2015 - 16:52

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ७ पय्यानुर

http://www.maayboli.com/node/54041 - दिवस ८ कोईकोडे

http://www.maayboli.com/node/54080 - दिवस ९ गुरुवायुर

http://www.maayboli.com/node/54166 - दिवस 10 कोची

http://www.maayboli.com/node/54276 - दिवस ११ चावरा

http://www.maayboli.com/node/54475 - दिवस १२ थिरुवनंतपुरम

=====================================================================

सकाळी उठून आवरतोय तोच घाटपांडे काका सांगत आले, अरे ते सायकलींग क्लबवाले लोक आलेत चला लवकर. नाहीतर आजचा दिवस इथेच अडकून पडावे लागेल. माझे सगळे आवरून झाले पण काही केल्या माझी बिंदु बाटली सापडेना. कुठे गायब झाली तेच कळेना. आणि इतक्या दिवसाची सवय झालेली आणि एक अंधश्रद्धा बसली होती की जेव्हापासून ती मिळाली तेव्हापासून माझा स्पीड वाढलाय. आता ती नसल्याने मला एकदम अस्वस्थता वाटायला लागली. असे वाटायला लागले की आज काहीतरी त्रास होणार. त्यात आज शेवटच्या दिवशी केशरी रंगाची जर्सी सगळ्यांनी घालायचे फर्मान सुटले. त्यामुळे तर अजूनच. कारण योगायोग म्हणा किंवा काहीही की बिंदु बाटली आणि हिरवी जर्सी एकाच दिवशी माझ्या आयुष्यात आले, आणि तेव्हापासूनचा प्रवास दृष्ट लागावा असा झाला होता. दोन्हीपासून ताटातूट नेमकी शेवटच्या दिवशीच यावी हा मागे काही संकेत असावा असे काहीसे विचित्र विचार मनात डोकावून गेले. पण पर्याय काहीच नव्हता.
म्हणलं, गड्या लेका तु जिद्दीच्या बळावर येऊन ठेपलायस, आता नाही तिथे कसल्या नाही त्या गोष्टी मनात आणतोयस. गपगुमान चल, झालाच त्रास तर बघुन घेऊ.

आवरून खाली आलो तर ८-१० सायकलस्वार जमा झाले होते. प्रकाश आणि मूर्ती यांच्याप्रमाणेच त्यांनाही आमच्याकडच्या गॅजेटसचे अपार कुतुहल होते. शेवटी सगळ्यांचे शंकासमाधान करून पुढे निघालो.

पूजा सुरु व्हायला अजून अवकाश होता तरीही धोका नको म्हणून त्यांनी एक गल्लीबोळातला रस्ता शोधला आणि निघालो. माझ्या पुढेच एक पैलवान सायकल चालवत होता. त्याची सायकल त्याच्या प्रकृतीला साजेशीच अशी दणक़ट एमटीबी होती. आणि पैलवान म्हणजे शरीरसौष्ठव स्पर्धेत उतरावा असला. सायकल चालवताना त्याचे पायाचे मसल्स विशेषता पोटऱ्यांचे इतके लयबद्धपणे हलत होते ते पाहून माझ्या बारकु़ड्या पायांची माझी मलाच लाज वाटली. इतक्या हजार किमी नंतरही माझे पाय सुकड्या पैलवानासारखे दिसत होते.
मी त्यावेळी कुणाला तरी म्हणालो पण बहुदा...बिपाशा बासुकडे पाहून सोनम कपूरला कसे वाटत असेल याची कल्पना आली....:) Happy

असो, तर बऱ्याच गल्लीबोळांतून वाट काढत शेवटी आम्ही हायवेला येऊन ठेपलो. एक एकत्रित फोटोसेशन झाले आणि त्यांना बाय करून पुढे निघालो.

खरेतर आता चांगलीच भूक लागली होती पण त्यांनी बजावले होते की कुठेही टाईमपास न करता शक्य तितक्या लवकर बाहेर पडा त्यामुळे तसेच पॅडल मारत निघालो. वाटेत काकांनी केळी घेऊन प्रत्येकाला दिलेली त्यामुळे तसा पोटाला आधार होता पण रोजच्या इडली वडा आणि कॉफीची सवय झालेली त्यामुळे काहीच उत्साहवर्धक वाटत नव्हते.

आणि त्यातून आज आमचा हनुमान होता सहृुद. त्याला काल सगळा रस्ता समजाऊन सांगितलेला आणि त्याप्रमाणे त्याने थोड्या अंतरानंतर हायवे सोडून सायकल आत वळवली. हा भाग म्हणजे अगदी गावठाण म्हणता येईल असाच होता. एकही बरे हॉटेल दिसत नव्हते खायला. आणि भरीस भर म्हणजे आज उन्हाचा कडाका नेहमीपेक्षा जास्तच लवकरच जाणवायला लागला होता.

शेव़टी अगदी एक अगदीच सुमार दर्जाचे हॉटेल दिसले. दुसरा पर्यायच नसल्यामुळे तिथेच आत घुसलो. एकंदरीत अवतार बराच कळकट होता, पण मला एकच गोष्ट आव़़डली ती म्हणजे केळीच्या पानावर खायला देत होते. ज्यासाठी मी केरळात आल्यापासून वाट पाहत होतो ती आज मला मिळाली. त्यामुळे मी प्रसन्न झालो आणि चवीकडे आणि एकंदरीत आजूबाजूच्या अस्वच्छतेकडे पाहून नाक न मुरडता हात मारला.

उदरभरण व्यवस्थित झाल्यामुळ मी पुन्हा माणसात आलो आणि वात्रटपणा करायला सुरुवात केला. आम्ही अजून यौवनात असल्यामुळे सनस्क्रीम लावायला अजिबात कसूर करत नसू पण घाटपांडे काका काय असले सोपस्कार करत नसत. त्यामुळे आज बाटली संपली तरी चालेल पण काकांना क्रीम लावायचा चंग बांधला आणि पकडून त्यांना क्रिम लावले.

मग काय नुसत्या रंगपंचमीला उत आला. त्यावर साजेसे म्हणून रंग बरसे भिगे असे गाणे साभिनय म्हणून वगैरे दाखवले. आजूबाजूला ही गर्दी आमचा दंगा बघत उभी होती. त्यांच्याकडून अजून फर्मायशी आल्या तर पंचायत होईल म्हणून आमचा कलाविष्कार आटोपता घेतला आणि पुढे सटकलो.

आजच्या प्रवासातही काही सुंदर सुंदर चर्चेस दिसली आणि थांबून फोटोसेशनही.

त्यादरम्यान बाकीचे पुढे सटकले आणि मी आणि बाबुभाई मागे राहीलो. मी तर सारखाच थांबून फोटो काढत असल्याने तोपण थोड्या वेळाने पुढे गेला. दरम्यान, एक हिरा साध्या सायकलवरून मुद्दाम कट मारून ओव्हरटेक करून गेला. मी असाही वात्रटपणाच्या मूड मध्ये होतो त्यामुळे त्याच्या पाठोपाठ सायकल घातली पण त्याला ओव्हरटेक केला नाही. उलट ड्राफ्टींग करताना आम्ही कसे पाठोपाठ अगदी टायर टू टायर सायकल चालवतो तशी चालवायला सुरुवात केली. बराच वेळ त्याला काही समजलेच नाही. मग त्याचा स्पीड हळू झाला तसा मी पण केला. तो वरचेवर मागे वळून पहायला लागला पण मी आपण त्या गावचेच नाही असे दाखवत त्याला चिकटून मागे मागे जात राहीलो.

भाई एकदम हैराण झाले ना. त्याला वाटले होते मी पुढे गेलो की परत त्याला ओव्हरटेक करता येईल पण मी काही केल्या पुढे जातच नव्हतो. शेवटी कहर म्हणजे तो थांबला तर मी पण ब्रेक दाबून थांबलो आणि शीळ मारत इकडे तिकडे बघत राहीलो. परत त्याने सायकल चालवायला सुरुवात केली की मी परत त्याच्या मागे. मग त्याने माझा पिच्छा सोडवायचा म्हणून जोरात सायकल हाणली. पण मी त्याला काय ऐकतोय मी त्याचे टायर काय शेवटपर्यंत सोडले नाही. आणि मला त्याच्या अवस्वथतेमुळे इतके हसायला येत होते.

शेवटी त्याने काय झाले अशी खूण केली त्याला प्रत्युत्तर म्हणून मी कुठे काय, तु चालवत रहा अशी खूण केली. शेवटी त्याचे पेशन्स संपले आणि तो सायकल कडेल लावून चक्क खालीच बसला. मी पण तसेच करायच्या विचारात होतो पण पुढेच आमची गँग दिसली आणि काका माझ्याचकडे बघत होते. म्हणलं ओरडा खायच्या आधी गपगुमान जावे हे उत्तम. आणि त्या बादशहाला बाय करून पुढे गेलो.

इतका वेळ आम्ही गावठाणातून सायकल चालवत होतोच पण आता आमच्या हनुमंताने तो रस्ता बरा म्हणावा अशा गल्लीबोळातून न्यायला सुरुवात केली. भरीस भर म्हणजे प्रचंड डोंगराएवढे चढ उतार. एक चढ तर आठवतोय की अक्षरश छाती फुटायची वेळ आली होती तरी संपेना. मग आमचे एकमत झाले की सुहृदची आख्ख्या ट्रीपभर चेष्टा केली त्याचा तो वचपा काढतोय. कारण तो क्लाईंबिग एक्पर्ट आणि त्याला चढ उतार जाम आवडायचे. त्यामुळे त्याने मुद्दाम हा रस्ता शोधलाय आणि आम्हाला छळतोय.

मग आमच्या कॉमेंटस सुरु झाल्या पण तरी भाई ऐकेना. त्याने अजून गल्लीबोळातून न्यायला सुरुवात केली. इथेही उत्सवी वातावरण होते कारण माळा वगैरे लागल्या होत्या आणि लाऊडस्पीकरही. त्यावर एक आज्जीबाई अत्यंत भक्तीभावाने कसलेसे भजन म्हणत होत्या. (पुन्हा एकदा पुल..आज्जींना एकादशीच्या दिवशी पहाटे नदीवर आंघोळ करून झाल्यावर उंच आवाजात व्यंकटेशस्त्रोस्त्र म्हणा म्हणल्यावर कसा आवाज लागेल तसा)...देवा रे कानावर तो अत्याचार सहन होईना पण जिथे बघावे तिथे लाऊडस्पीकर आणि एकच बाई त्यावर रेकत होती.

त्यातून सुटका करून घेत पुढे आलो तर अजून चिंचोळ्या गल्ल्या, इतक्या की पुण्यातल्या पेठा त्यापुढे राजरस्ते वाटावेत. म्हणलं याच गतीने आपण बहुदा कुणाच्यातरी घरात शिरून मागच्या दाराने बाहेर पडू बहुदा.

अजून शैशवात मी....इती घाटपांडे काका Happy

एक चढ चढल्यावर तर इतका वैताग आला की काहीतरी खावे म्हणून एक टपरी दिसली त्यात पान-तंबाखू सोडून काहीही नव्हते. अगदीच काहीतरी घ्यावे म्हणून चक्क लॉलीपॉप घेतले. सगळेजण मग पुन्हा शैशवाचा आनंद घेत लॉलीपॉप चघळत सायकल चालवू लागलो.

या प्रवासाने आमचे पूर्ण खेकटेच काढले. वाटले होते शेवटच्या दिवशी मस्त मजेत जाऊ पण आख्ख्या प्रवासाने जेवढी दमणूक केली नसेल तितकी या आडरस्त्याने केली. नंतर हळूहळू त्यालाही सरावलो आणि काही सायकलीची पोट्रेट काढली.

रस्त्याच्या आजूबाजूला प्रदेश होता मात्र रमणीय पण त्या दमलेल्या अवस्थेत तो एन्जॉय पण करवेना. शेवटी कधीतरी ६५-७० किमी झाल्यानंतर आम्ही हायवे गाठला. आहाहा काय आनंदाचा क्षण होता तो की किमान ५ किमी चढ उतार न करता सायकल चालवता येत होती. हायवेला वळल्या वळल्या एक झकासपैकी हॉटेल दिसले. बरेच प्रसिद्ध असावे कारण बाहेर चारचाकी गाड्यांची बरीच गर्दी होती. त्यातच दाटीवाटी करून आमच्या सायकली बसवल्या आणि आत गेलो.

आतला मेनू बघूनच मी जाहीर केले, कुणाला काय घ्यायचे ते घ्या मी थाळी घेणार, कारण ती पण केळीच्या पानावर देत होते. मग अतिशय चविष्ट असा भात आणि त्याबरोबर तोंडीलावणे, तेलाचे बोट लावलेला पापड असा तुडुंब आहार घेऊन मस्तपैकी सुस्तावलो. त्यावर पान वगैरे मिळाले असते तर राहु दे कन्याकुमारी म्हणत मी तिथेच झाडाची सावली पाहून लवंडलो असतो. पण ती इच्छा अपुरीच राहीली.

इथूनच पुढचा प्रवास मग एकदम धमाल झाला. एरवी युडी काका आमच्या खूप मागे रहायचे. दमले की थांबायचे आणि पुन्हा दमसास घेऊन पुढे कूच करायचे. निवांत रमत गमत येत असल्यामुळे सगळा प्रवास आमच्यापेक्षा त्यांनीच जास्त एन्जॉय केला असावा. पण आज आम्ही ठरवले होते की कन्याकुमारीला एकत्रच पोचायचे त्यामुळे त्यांच्याच स्पीडने जायचे ठरवले.

पण त्यानी ते वैतागलेच थोडे कारण दम खायला ते थांबलो की आम्ही भुणभुण लावायचो की काका चला आता थोडेच राहीले, पुढे जाऊन थांबू. काय त्रास देतायत कार्टी म्हणत ते बिच्चारे पुन्हा सायकल मारायला लागायचे. एकंदरीत आमच्या बरोबर ओढत नेऊन आम्ही बऱ्यापैकी त्यांचे हाल केले.

वाटेत आम्ही केरळमधून तमिळनाडूमध्ये प्रवेश करणार होतो त्याचा मला फोटो घ्यायचा होता. पण सुहृदने गल्लीबोळातून घुमवल्यामुळे नक्की कुठे आम्ही बॉर्डर क्रॉस केली ते कळलेच नाही. त्यामुळेही सुहृदला अजून शिव्या खाव्या लागल्या. (बिच्चारा अजूनही खातोच आहे). मग शेवटी नागरकोईल आले तेव्हा खऱ्या अर्थाने तमिळनाडू राज्यात आल्याची जाणिव झाली. निसर्गसौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या या शहरात देवळांची रेलचेल आहे. पण ज्यावरून नाव पडले ते नागराजाचे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. पण आता कन्याकुमारीची ओढ लागल्यामुळे ते स्कीप करून पुढे जात राहीलो.

शेवटच्या २० एक किमी मध्ये नुसते फोटोसेशन आणि दंगा केला.

कॉट इन दी अॅक्ट Happy

कोट्टरमपासूनचे शेवटचे पाचएक किमी तर रस्ता म्हणजे स्वर्गसुख होते. दोन्ही बाजूला प्रेक्षणिय डोंगर, आणि हिरव्या पाचूसारखी नटलेली भूमी आणि त्यातून सरळसोट दांडासारखा जाणारा रस्ता.

एरवी या रस्त्यावरून सुसाट ग्रुप बाणासारखा सुटला असता पण आज आम्ही युडीकाकांच्या स्पीडने निवांत रमत गमत जात राहीलो.

आणि आता येतय येतय म्हणेतोवर कन्याकुमारीची कमान आलीच की.

काय जबरदस्त फिलींग आले त्यावेळी. इतक्या दिवसांचा प्रवास, कष्ट, उन्ह, घाम, दमणूक सगळे सोसून जिद्दीच्या जोरावर इथवर आलो होतो. आणि त्याचे खऱ्या अर्थाने त्याचे चीज झाले ते कन्याकुमारी आश्रमात गेल्यावर. तिथे आमच्या स्वागताला अख्खी स्वागतसमिती हजर होती.

घाटपांडे काकांचे बडील, पत्नी रेल्वेने पोचून आमच्या स्वागताला हजर होते. त्याचबरोबर आश्रमाचे प्रमुख, बाकीचे अधिकारी, आश्रम बघायला आलेले पर्यटक असा बराच मोठा ग्रुप. त्यांनी टाळ्यांच्या गजरात आमचे स्वागत केले त्यावेळी अक्षरश डोळ्यात पाणी तराळले. बरं, स्वागत पण नुसतेच नाही तर अगदी हारवगैरे घालून. प्रत्येकाला एकएक भेटवस्तू देखील. बापरे इतक्या कौतुकाने थोडे संकोचल्यासारखेच झाले.

आम्ही कुठल्याही विक्रमासाठी किंवा काही करून दाखवण्यासाठी ही मोहीम केली नव्हती. बस इच्छा झाली करायची आणि समविचारी भेटले म्हणून केली, पण त्याचे इतरांना इतके अप्रुप असल्याचे बघून थोडे नवलही वाटले. आणि त्या आश्रमाचा धीरगंभीरपणाचा प्रभाव इतका पडला की मी आधी ठरवल्याप्रमाणे खूप दंगा, सायकल डोक्यावर घेऊन सेलीब्रेट करणे वगैरे काहीच केले नाही. अतिशय शांतपणे पण भारावलेल्या अवस्थेत सर्व सदस्यांनी एकमेकांची गळाभेट घेऊन शुभेच्छा दिल्या. एकमेकांची साथ नसती तर ही मोहीम यशस्वी झालीच नसती. प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान दिलेले होते, आपल्या स्वभावाला मुरड घालून कुठेही कटकट करणे, भांडण करणे तर सोडाच उलट जितके होईल तितके अॅडजस्टच केले होते. आणि हा खऱ्या अर्थाने आमचा सांघिक विजय होता.

द एन्टरटेनर...बाबुभाई

शाही थाट - युडीकाका

घाटाचा राजा - वात उर्फ सुहृुद

सायकल परफेक्शनिस्ट - लान्सदादा

अस्मादिक....फोटोवर बायकोची पहिली प्रतिक्रीया - अजून बारीक होऊ नकोस आता....:)

मग तोपर्यंत घरी फोन करण्याचा सपाटा लागला. तिकडे म्हणजे विजयोत्सव असल्यासारखे वातावरण होते. माझे नातेवाईक घरी जमून माझ्या फोनची वाटच पाहत होते. प्रत्येकाशी दोन दोन शब्द बोलून बोलूनच दमलो. आई-बाबांशी बोलताना मात्र मला थोडे गहीवरल्यासारखे झाले. डोळ्यात अश्रू येणार नाहीत याची आटोकाट काळजी घेत मी आता मस्त आहे, काही त्रास झाला नाही एवढेच बोलून फोन ठेवला.

एकदाची स्वप्नपूर्ती झाली होती. बाबांकडून लहानपणापासून त्यांच्या कन्याकुमारी मोहीमेबद्दल ऐकले होते आणि तेव्हापासून वाटत होते की आपणही एकदा करूयाच. आणि आज इतक्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले होते. मनात भावना उचंबळून येत होत्या आणि सगळ्यांपासून लांब जाऊन एकटाच बसलो. डोळ्यातून दोन थेंब ओघळू दिले.

तो आवेग ओसरल्यावर मग पुन्हा एकदा माणसात आलो. आणि आज दिवसभरात सुहृदने जे १७६० चढ चढायला लावले त्याबद्दल रात्री बदला घ्यायचा ठरला. पण बेटा नशिबवान. लाडके आजोबा स्वागताला आल्यामुळे त्याने त्याची व्यवस्था त्यांच्याच खोलीत करून घेतली, त्यामुळे वाचला.

दरम्यान, बाकी पर्यटकही जमा झालेच होते. त्यात बरेचसे मराठी होते. त्यांचे शंकानिरसन केले. काही अतिउत्साही सायकलला हात लावून पाहत होते त्यामुळे मग तातडीने त्या सुरक्षीत जागी ठेऊन दिल्या. हो आता सायकली आता चालवायच्या नसल्या म्हणून काय झाले, त्या आता इतक्या जिवाभावाच्या झाल्या होत्या की त्याला ओरखडा आलेलाही खपला नसता. खरेच, त्यांचे कौतुक करावे तितके थोडेच. पूर्ण प्रवासभर एक दोन पंक्चर आणि घाटपांडे काकांचा टायरची अडचण सोडली तर अक्षरश निर्विघ्न असा प्रवास घ़डला त्यांच्याच जीवावर. राक्षसी चढउतार, खराब रस्ते, खड्डे, तुफान तापलेले कॉँक्रीट आणि धूळमाखल्या वाटा अशा सगळ्यातून आम्ही सुखरुपपणे पार आलो होतो आणि त्याबद्दल सायकलला शाबासकी द्यावी तेवढी थोडीच.

माझी स्कॉट एक्स ७०.....आय लव्ह यू....

आजचा हिशेब...

पुन्हा एकदा शंभरी आणि चढ उतारांची....

या प्रवासात सगळ्यांची साथ तर होतीच आणि मायबोलीकरांचे विशेषत मल्लीचे विशेष आभार. तो नियमीतपणे फोन करून अपडेट घेत होता आणि माबोवर टाकत होता. त्याच्या प्रयत्नामुळे सगळ्यांना तपशील कळत होतेच आणि सगळ्यांच्या आभाळाएवढ्या शुभेच्छा पाठीशी होत्या. त्याबद्दल पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ज्जे बात!!
मानाचा मुजरा.

मला सगळ्यात जास्त काय आवडले तर तू आणि सहकार्‍यांनी ही मोहीम खूप मजेने अनुभवली. अशाच उत्तरोत्तर मोहिमा घडोत व माझ्यासारख्या आर्मचेअर प्रवाश्याला वाचायला मिळोत.

उन्हाने पार रापले आहात सगळे. युडी काका तर भाजलेच गेलेत पार.

काय लोकं आहात तुम्ही!!! ग्रेट!
आम्हीच कन्याकुमारी प्रवास करून आल्यासारखं सगळ ओळखीचं ओळखीचं वाटतंय. खूप सही लिहिलंयस.

मनाने कन्याकुमारी ला पोचलो राजे तुमच्यासोबत!! फ़क्त नशीबवान लोकांस कन्याकुमारी दर्शन होते, ते पाय आहे आपल्या ३००० किमी उभ्या आडव्या आई चे! तुम्ही इतके कष्ट केलेत तुम्हाला ती पावले खुणावत होती म्हणुनच! मजा आली! कन्याकुमारी ला असतो तर स्वतः बसवुन पोटर्यांची मालिश केली असती तुमच्या! त्रिवार मुजरा

सायकला सौख्यभरे

बापु

नादखुळा!! लै भारी!! अभिनंदन!!
पोचल्यावरचे क्षण वाचतानाच कसलं भारी वाटतयं.. Happy

व्वा.... सगळी सफर तुमच्या बरोबरच करतोय असे भासत होते वाचताना.
फोटो अप्रतिम.
हा एक परिच्छेद वाचुन डोळ्यात पाणी आले.
>>> एकदाची स्वप्नपूर्ती झाली होती. बाबांकडून लहानपणापासून त्यांच्या कन्याकुमारी मोहीमेबद्दल ऐकले होते आणि तेव्हापासून वाटत होते की आपणही एकदा करूयाच. आणि आज इतक्या वर्षांचे स्वप्न पूर्ण झाले होते. मनात भावना उचंबळून येत होत्या आणि सगळ्यांपासून लांब जाऊन एकटाच बसलो. डोळ्यातून दोन थेंब ओघळू दिले. <<<

पुस्तक बनविलेस तर दोनचार प्रती माझ्याकरता राखीव.

खासच
आशु मस्त लिहले आहे

प्रत्तेक घटना छान लिहुन काढली आहेस आगदी तिथे असावे असे सतत जाणावत होते

हॅट्स ऑफ टू यू ऑल!
आवर्जून वाट पहायचो ती मालिका आता संपल्याबद्दल वाईट वाटून घेऊ की एवढा मोठा पल्ला पार पाडल्याबद्दल कौतुक करु अशी अवस्था झाली आहे Happy
पुढच्या उपक्रमाकरता अनेक शुभेच्छा (माझं काय जातंय एसीत बसून तुम्हाला भटका म्हणायला Wink )

आशुचॅम्प....

~ काही लिखाण वाचून झाल्यावर प्रतिसाद देताना मन आनंदाने भरून येते....तर असेही काही लिहून होते कुणाकडून तरी जे मनात घर करून राहते आणि समजत नाही की या लेखकाला पोच देण्यासाठी शब्दांचा फुलोरा कसा सजवायचा ? तुमचा हा लेख वाचल्यानंतर माझ्या मनी नेमकी हीच भावना उमटली....वाटू लागले किती आनंद दिला आहे या मित्रांच्या गटाने आम्हा सर्वांना या लेखमालिकेद्वारे ! इतके सुंदर लिखाण, मनी वसणारे, शिवाय त्याच्या जोडीला मन प्रसन्न करून टाकणारी ती अगणित चित्रे....एकाही चित्रात कुणाच्याही चेहर्‍यावर ना दमल्याची भावना, ना होत असलेल्या त्रासाची जाणीव (....आणि शारीरिक त्रास होणे हे तर गृहितच धरलेले असते), भूक लागली तरी खायाला प्रसंगी नाही मिळाले तरी त्यासाठी अडून न बसता नव्या उत्साहाने पॅडल मारणे, सायकलींची तब्येत बिघडली तरीही आपुलकीने तिला गोंजारत, चुचकारत, तेलपाणी करून परत सक्षम करण्यामागील तुमची तयारी आणि प्रयत्न....हे सारे केवळ "सहल वर्णन" गटातील नव्हे तर एकूणच पुणे ते कन्याकुमारी प्रवास अत्यंत रेखीवपणे आणि आपुलकीने कसा पार पडला याचे तितक्याच सक्षमतेने केलेले वर्णन होय.

"...डोळ्यातून दोन थेंब ओघळू दिले...." ~ बस्स, सहलीची सांगता याच वाक्याने होणे मला अभिप्रेत होते. वाचकांचीही हीच प्रतिक्रिया झाली असेल याची मला खात्री आहे.

सहलीतील सर्व सदस्यांना नमस्कार !!

आशुचँप….

मस्त लिहिला आहेस. तुझा अभिमान वाटतोय.

तुला आणि तुझ्या टीमसाठी ______^ _______ आणि मनपुर्वक अभिनंदन.

@ बिपाशा बासुकडे पाहून सोनम कपूरला कसे वाटत असेल याची कल्पना आली....:हहगलो: Proud Proud Proud

लै भारी !

इनफॅक्ट असे प्रवास पूर्ण केल्यावरही ते पूर्ण झाले असे वाटतच नाही. असे वाटते की अजूनही उद्या उठून जायचेच. मन आणि शरीराला इतकी सवय झालेली असते की बास. मग नंतर १ दोन दिवस अगदी नैराष्य येते की का हा प्रवास संपला.

हॅट्स ऑफ टू यु गाईज. सलग इतके दिवस रोज १०० किमी चालवणे (आणि ते पण अनेक काका लोक सोबत होते त्यांनी ) म्हणजे जोक नाही. यु गाईज डीड इट !!!

पुढच्या अश्याच एखाद्या मोठ्या प्रवासाला शुभेच्छा ! मे बी ह्या वेळी पुणे ते काश्मिर !

सही रे सही!
मस्तच लिहिलंयस.
एकदम इन्स्पायरिंग.
वी आर प्राऊड ऑफ यू.

सुंदर लिहीले आहे. हा प्रवास आम्ही तुम्हासोबत पुर्ण केल्याची मजा आली (अर्थात तुमच्याएवढे काहीच कष्ट न घेता :)). तुम्हा सर्वांचे मन:पुर्वक अभिनंदन !!

>>डोळ्यातून दोन थेंब ओघळू दिले >> मला खात्री आहे पलीकडे फोनवर तुझ्या वडीलांचीही हीच अवस्ठा झाली असेल!

पुढल्या वर्षी याच वेळी अशाच अजून एका जबरदस्त ride चं वर्णन अपेक्षित आहे. तूच जाहीर कर ;).

संपूर्ण लेखमाला वाचली. तुमचे लिखाण सहज सुंदर असेच आहे.
अश्या या सफरी पूर्ण करण्यासाठी आपल्याकडे शारीरिक कणखरता तर हवीच.... पण त्याहून जास्त ती मानसिक सक्षमतेवर जास्त निर्भय करते. तुम्ही सर्वांनी ज्या जिद्दीने हि सफर पूर्ण केली त्याबद्दल तुमचे कौतुक करावे तेव्हडे थोडे आहे. तुमचे सर्वांचे हार्दिक अभिनंदन.....!

दमदार सायकलिंग आणि सुंदर लिखाणा साठी... हॅट्स ऑफ!!!

आमच्या लडाख वारीत हायईस्ट मोटरेबल रोड वर म्हणजेच 'खार्दुंगला'वर सायकलने चढणारे परदेशी वीर पाहून जेव्हढ कौतुक वाटले होते... त्या पेक्षा भारी वाटतेय आपल्याच एका मित्राने अशी दैदिप्यमान कामगीरी पार पाडल्या बद्दल... ग्रेट!!!

हॅट्स ऑफ टु यु आशु. Happy

सुरवातीच्या २-३ दिवसात तुला "हे आपल्याला खरेच जमेल का?" असा जो अविश्वास जाणवला होता त्याला स्वतःलाच सडेतोड दिलेले उत्तर आहे.
पुन्हा एकदा अभिनंदन.

मस्तच जमलाय लेख... पुन्हा पुन्हा अभिनंदन..
लेख वाचून झाल्यावर अडगळीत पडलेल्या सायकलची आठवण आली.. पावसाळा संपला की पुन्हा रपेट सुरु करावी म्हणतोय... Happy

मला जो जीता वो ही सिकंदर मधला आमिर खानचा सीन आठवला. मोठा भाऊ अपघातामुळे सायकलिंग स्पर्धेत भाग घेऊ शकत नाही. जिंकण्याची कोणतीच शाश्वती नसताना निदान वडिलांना काही प्रमाणात दिलासा मिळेल या अपेक्षेने आमिर खान स्पर्धेत भाग घेतो.

वडिलांनी त्यावेळेच्या मर्यादित साधनांनी पूर्ण केलेल्या सफरीचे तुझ्या सफरीशी कोणतीच तुलना होऊ शकत नाही. पण खरोखरीच तुझ्या वडिलांना सुद्धा आज 'भरून पावलो' चा feel आला असॆल, हे नक्की! शाब्बास!

जबरदस्त ईच्छाशक्ती आणि प्रामाणिक प्रयत्न __/\__
तुझे अभिनंदन करायला शब्द तोकडे पडतील, आम्हाला तुझा अभिमान आहे.
ही सफर पुस्तक रुपात वाचायला नक्की आवडेल. Happy

आशुचँप, सर्व लेख वाचले. आवडले. अगदी तुझ्याबरोबरच सगळा प्रवास झाला. यशस्वी मोहिमेबद्दल अभिनंदन आणि लेखमालेबद्दल धन्यवाद.

ग्रेट! हॅट्स ऑफ आशिष !!
तुम्हा सगळ्यांचं खुप खुप अभिनंदन. सगळ्यांच्या चिकाटीला आणि कष्टांना सलाम Happy
पुण्यात प्रत्यक्ष भेटल्यावर बाबांची प्रतिक्रिया काय होती?

खुप गुंतवून ठेवणारा प्रवास आणि लेख मालिका झाली. तुझ्या आणि टीमच्या पुढच्या सगळ्या मोहिमांना शुभेच्छा..

Pages