पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 1२ थिरुवनंतपुरम - खादाडी

Submitted by आशुचँप on 29 June, 2015 - 17:47

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ७ पय्यानुर

http://www.maayboli.com/node/54041 - दिवस ८ कोईकोडे

http://www.maayboli.com/node/54080 - दिवस ९ गुरुवायुर

http://www.maayboli.com/node/54166 - दिवस 10 कोची

http://www.maayboli.com/node/54276 - दिवस ११ चावरा

=====================================================================

आजचा दिवस हा खऱ्या अर्थाने आनंदी आनंद गडे प्रकारातला होता. याचे कारण म्हणजे आख्ख्या प्रवासातले सर्वात कमी अंतर ८५ किमी आज पार करायचे होते.

इथे प्रश्न पडेल की सुरुवातीला १६५, १४५ असे दमछाक करत चालवून नंतर ८५, ९० अशी विषम विभागणी का केली. तर याची दोन उत्तरे आहेत. एकतर धारवाडपर्यंत बघण्यासारखे काही नाही. नुसता हायवेचा रखरखाट. त्यामुळे तिथे वेळ घालवण्यात अर्थ नव्हता. आणि दुसरे म्हणजे, चावरा ते कन्याकुमारी अंतर १७० किमी. ते एका टप्प्यात करणे शक्य नव्हते. त्यामुळे ब्रेक जर्नी ही अशीना तशी करावीच लागणार होती. मग त्यातल्या त्यात मध्यावर थिरूवनंतपुरम होते. त्यामुळे आज ८५ किमी आणि उद्या ९० अशी विभागणी करून टाकली.

तात्पर्य, आज फक्त ८५ किमी. फुल टु धिंगाणा..पण म्हणून या पहाटे उठणाऱ्यांनी काय जास्त वेळ झोपू दिले असेल तर शपथ. अर्थात त्यांचेही बरोबर होते. वाटेत काय वाट्टेल त्या अडचणी येऊ शकतात हा अनुभव गाठीशी होता त्यामुळे लवकरच निघून लवकरच पोहचे फारच श्रेयस्कर होते. त्यातून करपवून टाकणारे उन्ह पण वाचवता येणार होते.

सगळी आवराआवर करून खाली आलो तेव्हा हॉटेलचा स्टाफ आम्ही सामान कसे बांधतो सायकलवर ते बघायला आला होता. त्या गर्दीत कालची सुंदरी आली आहे का हे हळूचन पाहून घेतले. नव्हती!!! बहुदा ड्युटी अवर्स संपवून घरी गेली असावी.

आज घाई कसलीच नसल्यामुळे अगदी निवांतपणे चाललो होतो. रस्तापण अजूनही चांगलाच होता. फक्त कटकट एकाच गोष्टीची होती. ती म्हणजे फ्लायओव्हर्स. फ्लायओवर्समधुन मजबूत कमाई होत असावी अशी शंका येण्याइतपत फ्लायओव्हर्स लागले. त्यातले काही टाळण्याजोगे होते ते टाळलेच पण रेल्वेरुळांवरून जाणाऱ्या फ्लायओव्हर्स साठी ते करणेच शक्य नव्हते. आणि ते इतके उंच केले होते की खालून बहुदा डबलडेकर ट्रेन जात असाव्यात. या सततच्या चढ उतारांनी तुफान वैताग आणला. त्यातून सतत आवाज करत जाणाऱ्या अँब्युलन्स...त्यांच्या आवाजमुळे वाटत होते बहुदा दर मिनिटाला एक अशा हिशेबाने इथे अपघात होत असावेत. इतक्या सातत्याने अँब्युलन्स मी आजवर कुठल्याही शहरात पाहिल्या नाहीत. बर कुठे काही घडले म्हणावे तर एकाच दिशेने जाता येताना दिसायला पाहिजे होत्या. तसेही नव्हते.

आज आता बाकीचे काहीच बघण्यासाठी नसल्यामुळे वाटेत जिथे दिसेल तिथे खान पान प्रोग्राम सुरु केला. आणि अक्षरश चरत चरत म्हणता येईल असे चाललो होतो. त्यातल्याच काही गंमती जमती....

वाटेत कॉफी हाऊसला थांबलो आणि भूक पण लागली होती, उन्हातून आल्यामुळे मस्त काहीतरी गार प्यावेसे वाटत होते. मेनूकार्डावर फालुदा वाचले आणि तीच अॉर्डर गेली. बऱ्याच वेळानंतर वेटर महाराजांनी एका मोठ्या ग्लासात तो फालुदा आणून दिला. पहिला घास घेतला आणि तोंड, कान,नाक, डोळे सगळेच बंद झाले. अरारा, त्या फालुद्याच्या नावाखाली लापशीचा लगदा किंवा थोडे सभ्य बोलायचे झाले तर भिंतीवर मारण्यापूर्वी सिंमेंटच्या मिश्रणाचे जे काही असते ते माथी मारण्यात आले होते.

एकदम पुलंची आठवण झाली. (पोस्टातली शाई ही लेह्य, चोष्य किंवा तत्सम प्रकारातली नसुन कुमारी आसवासारखी पातळ असावी ) यांना एक दंडवत आहे. काय वर्णन.

तसेच काहीसे वेटरला सांगण्याचा प्रकार केला. पण ते घशात घातलेले धड गिळवतही नव्हते. कसाबसा तो लगदा गिळला आणि त्याला सांगतले म्हणलं अरे हे काय आहे. तर म्हणे वो वैसाच होता.

हा म्हणजे एक थोर वैतागच होता. अजून एक घास खाण्याची काही हिंमत होईना आणि टाकवेनाही. (हो ना...६० का ६५ रुपयाला होता...च्यायला का फुकट घालवा)...

मग त्या वेटरला पुन्हा बोलावून सांगितले यात घालायला नुसते दुध घेऊन ये. त्याने ज्या चमत्कारीक नजरेने माझ्याकडे पाहिले, त्यामुळे मी जरा वरमलोच. पण वाया घालवायचे नाही हा निर्धार. त्यामुळे पुन्हा त्याला तेच सांगितले. तर म्हणे दुध एकदम गरम आहे. म्हणलं मग गार कर आणि घेऊन ये....

त्यावर त्याचे उत्तर नही वो कॉफी के लिये होता है, हमेशा उबलता रेहता है.....

आता आली का पंचाईत. पण आता एकदा निर्धार म्हणजे निर्धार....इथे सल्लू असता तर म्हणाला असता एकबार मैने कमिटमेंट कर ली तो अपनी बाप की भी नही सुनता (असेच आहे बहुदा...) त्याला ते गरम दुध वाटीतून आणायला सांगतले आणि त्याने जणू सूड उगवायचा म्हणून उकळते दुध आणून दिले.

मग पुढचा अर्धा तास ते दुध फुंकुन फुंकुन गार करणे आणि त्या फालुदाच्या ग्लासात ओतणे हा कार्यक्रम केला. समस्त लोक ते जाता येता हा काय प्रकार चालला आहे ते वळून वळून पाहत होते. माझे बघून मग वेदांग आणि लान्सदादांनीही तोच प्रकार केला पण राष्ट्रहीतासाठी कुणालातरी शहीद व्हावे लागतेच तसे दुध मागवून मीच पुढाकार घेतला.

निधड्या छातीने फालुद्याला हसत हसत सामोरे जाणारे लान्सदादा Happy Happy

आयुष्यात पुन्हा कधीही फालुदा मागवणार नाही अशी भिष्मप्रतिज्ञा करून तिथून बाहेर पडलो. तासाभरात काजूसाठी प्रसिद्ध अशा कोल्लंम ला पोचलो. हे शहर तसे बरेच जुने आणि प्रसिद्ध...

विकीबाबानुसार अत्यंत प्राचिन बंदरापैकी एक. रोमन काळात इथे व्यापार चालत असे. मुख्य व्यापार चीन बरोबर आणि मग तिथून बाकी सगळीकडे. इब्न बतुता या प्रवाशाने देखील भारतात जी पाच बंदरे होती त्यात कोल्लंमचा उल्लेख केलाय.

तसेच सायकल हाणत पुढे निघालो. इथिकरा नदी पार केल्यानंतर एक जोरदार चढ लागला. घाट असावा इतपत. आणि मग चढाई संपून पार अगदी २० एक किमी नंतर नाविकुलमपाशी पुन्हा उतरायला सुरुवात केली. पण रस्त्यात तसे बरेच चढ उतार होते. त्यामुळे दमछाक व्हायला सुरुवात झाली आणि एक पॅचला तर मी इतका थकलो की पुढे जायची ताकद उरली नाही. असे का व्हावे कळेना. कारण आता इतके दिवस सायकल चालवून स्टॅमिना चांगला वाढला होता.

सुदैवाने घाटपांडे काका माझ्या पाठोपाठच होते. मी सायकल थांबवून पार जमिनीवरच लोळण घेतल्याचे बघून ते एकदम हैराण झाले. मग त्यांनी अनुमान केले की बहुदा ग्लुकोज लेव्हल कमी झाली असावी. मग त्यांनी त्यांच्याकडचा एनर्जी बार दिला, दोन विस्कीटे खाल्ली. तेवढ्यानेही खूपच हुशारी आली. भरपूर पाणी प्यालो. आणि मग पुन्हा एकदा ताज्या दमाने वाटचाल सुरु केली.

फोटो - घाटपांडे काका

पण त्या प्रसंगानी मी एक वेळ हबकलोच होतो. मी समजत होतो की सगळा थकवा मी पार मागे अंकोलामध्ये सोडून आलोय. कारण तेव्हापासून जे मी सुसाट ग्रुपमधे हळुच शिरकाव करून घेतला होता तो ते आत्तापर्यंत. असे मध्येच काही होणे तेही शेवटच्या टप्प्यात परवडण्यासारखे नव्हते. त्यामुळे मी मनाला आणि शरीराला चांगलचा दम भरला. म्हणलं, बेट्या आता निगेटीव्ह विचार केलास तर याद राख आणि कुठे काही दुखते खुपते म्हणले तर बघ. नो लाड. एकदा कन्याकुमारी गाठले की मग पुढचा एक महिना विश्रांतीच विश्रांती.

मग भराभर सायकल चालवत बाकीच्यांना गाठले. आणि शरीराने ऐकले बरं का..पुढे अजिबात त्रास दिला नाही.

दरम्यान खाद्यभ्रमंती सुरुच होती. शहाळे, खोबरे, फळे असे तर सुरुच होते पण जाता जाता कुडुम मोरू असा बोर्ड दिसला. खरेतर नुकतेच खाल्ले होते पण काहीतरी नविन आणि स्थानिक (हे महत्वाचे) दिसल्यामुळे थांबलोच. आणि सगळ्यांना एक एक द्या अशी फर्माईश केली.

हाय रे दैवा, ते कुडुम मोरु म्हणजे चक्क ताक होते. आणि नुसते नाही. एका मडक्यात त्या बाबाने ताक घातले आणि त्यावर एक मोठा चमचा घालून लालभडक लोणचे घातले, वर बचकभर मीठ (मनात म्हणले इथे आपला हेम असता तर उलट्या पावली सायकल चालवत पुण्याला गेला असता हे पिण्यापेक्षा) आणि ते सगळे ढवळून प्यायला दिले.

अगदीच दिव्य प्रकार होता तो. पण केळ्याची भजी, फालुदा असे खास पदार्थ खाल्ल्यामुळे काहीही पचवू शकतो हा दांडगा आत्मविश्वास होता. त्याप्रमाणे एक एक मडके संपवून दुसऱ्याची अॉर्डर गेली. अर्थात यावेळी नुसत्या ताकाची. त्याला म्हणले ते लोणचे आता जेवणात वापर. अर्थातच त्याला ते कळले नाही. पण मला आपले समाधान.

सुहृदचे हेल्मेट सारखे तिरके व्हायचे म्हणून त्याला देवानंद पण नाव ठेवले होते, शेवटी त्याच्या बाबांनीच ते सरळ करायचा प्रयत्न केला. पण नाहीच... Happy Happy

पुढे मग असेच कलिंगडाच्या फोडी वगैरे खात पुढे चाललो होतो तर एक कार बाजूला थांबलेली दिसली आणि एक माणूस हात दाखवून थांबायचा इशारा करत होता. आयला हे काय आता.. म्हणून थांबलो तर तो धावत पुढे आला आणि सगळ्यांशी शेकहँड केले.

मी नारायण मूर्ती...थिरुवनंतपुरमला आमची इंडियन सायकल एम्बेसी म्हणून एक संस्था आहे. तुम्ही आज आमच्या इथे पोचाल तर आम्ही संध्याकाळी तुम्हाला भेटायला येऊ शकतो काय....

हायला हे एक नविनच होते. आधी तर वाटले सत्कार वगैरे करतायत का काय...पण म्हणले येतायत तर येऊ द्या...आपल्याला परत कुठे बोलावत नाहीयेत ना...मग आम्ही कुठे उतरणार त्या हॉटेलचा पत्ता आणि किती वाजता पोहचणार याची माहीती देऊन निरोप घेतला.

यांचीच एक मज्जा पुढे युडींनी आम्हाला नंतर सांगितली. ते एकटेच मागून येत होते तेव्हा मूर्तींनी त्यांना पाहिले आणि थांबा म्हणून खूण केली. पण युडींना वाटले की ते नुसतेच हाय करून हात दाखवतायत. यांनी पण त्यांना हाय आणि बाय केले आणि न थांबता तसेच पुढे गेले. बिच्चारे मूर्ती परत गाडीत बसून युडींना ओव्हरटेक केला आणि थांबा थांब असे सांगून थोपवले. मग युडींकडून माहीती मिळाली की सगळा ग्रुप पुढे गेलाय मग ते फास्ट गाडी मारत आम्हाला भेटायला आले होते.

वाटेत ही अशी एक मूर्ती दिसली म्हणून थांबलो तर

हे पण एक दिसले. मग सायकल बाजूलाच लावली आणि फोटो काढायला घेतले.

कसला जिवंतपणा आहे या शिल्पावर...थक्क झालो मी हे पाहून. आणि रस्त्यावर असाच टाकून दिल्यासारखा ठेवलेला.

शिल्पकार भेटावा अशी इच्छा होती पण दार बराच वेळ वाजवून पण कुणीच बाहेर आले नाही त्यामुळे निराशेने पुढचा मार्ग धरला....

थिरुवनंतरपुरमच्या जस्ट आधी एका ठिकाणी भरपेट खाऊन घेतले आणि आता काय जाऊन आरामच करायचा आहे या विचारानी निघालो. रस्ता एकदम झकास होता आणि त्यामुळे दणादणा सुटलोच. वाटेत ओंकार आणि लान्स थाबले होते पण ते काय गाठतील आपल्याला असे म्हणत पुढे निघालो. बराच पुढे आलो आणि तिथे एक चौक लागला. आता इथे नक्की कुठे जायचे म्हणून बाकीच्यांची वाट पाहत थांबलो तर बराच वेळ कुणीच येईना. गेले कुठे सगळे म्हणून फोन लावला तर ते आधीच एअरपोर्टच्या रस्त्याला लागले होते. (हो आमचे हॉटेल अगदी एअरपोर्टला लागून होते. म्हणजे खोलीतून येणारे जाणारे लोक दिसावे इतके समोर). मग मी पण पत्ता विचारत निघालो. त्यात गोंधळ असा की इंटरनॅशनल का डॉमेस्टीक हे विचारले नाहीच. त्यामुळे आधी इंटरनॅशनलला गेलो मग तिथे काहीच नाही समजल्यावर पुन्हा ३-४ किमी मागे आलो. तरी काही केल्या सापडेना. शेवटी पुन्हा फोना फोनी. बर हॉटेलचे नाव बेड अँड ब्रेकफास्ट असले दिव्य. जे कुणालाच फारसे माहीती नव्हते. शेवटी ओकारने गुगल मॅपवरून ड्रायव्हींग इंस्ट्रक्शन पाठवली. ते सुरु केले आणि कानात हेडफोन कोंबून ती सांगेल तो रस्ता घ्यायला सुरुवात केली. त्यातही लोचा असा की ती गाडीचा वेग गृहीत धरून सांगत होती. सायकल त्यांच्या हिशेबातच नव्हती. त्यामुळे तिने डावीकडे वळायला सांगितले की आधीच वळायचे का कधी हेच कळत नव्हते.

कसाबसा लांबलचक फेरा मारून जेव्हा पोचलो तेव्हा फक्त युडी सोडले तर बाकी सगळे लवंडले होते. अर्थाच मीच रस्ता चुकलो असे नाही. सगळेजण वेगवेगळ्या दिशांना भरक़टले होते आणि मन मानेल तशी सायकल आणली होती. सुहृद तर रेल्वे ट्रॅकवरून सायकल उचलून घेऊन आला होता. आणि मला तर असले काही नाहीच उलट समुद्रकिनारा लागला होता.

असो सगळे पोचले होते हे महत्वाचे. मग मस्त झोप वगैरे काढली. संध्याकाळी मूर्तींचा फोन आलाच. आणि पाठोपाठ येऊन पोचले देखील. त्यांच्या बरोबर प्रकाश गोपीनाथ म्हणून एक गृहस्थ होते. हे पण जबरद्स्त सायकलपटू होते. वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी डबल सायकल बनवून अनेक अंध लोकांना सायकलची सैर घडवली होती. या व्यतिरिक्त पण ते बरेच उपक्रम करतात याची साद्यंत माहीती दिली. मग आम्ही पण आमच्या मोहीमेची आणि गॅजेटसची माहीती दिली. आमच्या हँडलबार बॅग आणि पॅनिअर बद्दल त्यांना फारच कुतुहल होते आणि त्या खास बनवुन घेतल्यात असे सांगितल्यावर तर फारच.

प्रकाश आणि मूर्थी

अशाच गप्पा रंगत गेल्या. आता आलेच आहेत तर कॉफी विचारली आणि मग बाहेर टपरीवर जाऊन कॉफीपान केले.

दरम्यान, एक महत्वाची माहीती कळली की उद्या शहरात एक मोठा उत्सव आहे. या उत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे हा फक्त स्त्रीयांसाठी आहे. शहरातल्या तमाम स्त्रीया या दिवशी घराबाहेर पडतात, उघड्यावरच स्वयंपाक करतात, जेवतात, देवाची गाणी गातात. आणि या अवधीत एकाही पुरुषाला शहरात प्रवेश तर सोडाच घराबाहेर देखील पडता येत नाही. संध्याकाळी सगळे घरी गेल्यावर मग व्यवहार पूर्ववत होतात.

आयला, हे काहीतरी भयंकरच होते. हे म्हणजे विसर्जनाच्या आदले दिवशी लक्ष्मी रोडवर कुणी येऊन राहीले तर कसे होईल तो प्रकार झाला. पूर्णपणे नाकाबंदी...

मग त्यांनीच उपाय सांगितला की जितक्या शक्य होईल तितक्या पहाटे बाहेर पडा. उत्सव सुरु होण्यापूर्वी. आणि आम्ही तुम्हाला रस्ता दाखवायला येतो. सगळे गर्दीचे रस्ते टाळून तुम्हाला शहराबाहेर लावून देतो.

सुहृदला रस्ता समजाऊन देणारे प्रकाश. याचे दुष्परीणाम आम्हाला दुसरे दिवशी भोगावे लागले.... Happy Happy

खरेच, त्यांचे आभार मानावेत तितके थोडेच होते. पण इतक्याने भागले नाही म्हणून त्यांनी रात्रीच्या जेवणाचे विचारले. आम्ही बघु जवळपास असे सांगितले पण त्या भागात जवळपास असा काही नव्हतेच. एक होते ते दुरुस्तीसाठी बंद होते. आता आली का पंचाईत. मग त्यांच्याच गाडीत बसून मी, बाबुभाई गावात गेलो. पार अगदी १४-१५ किमी अंतरावर. त्यातल्या त्यात सोयीची म्हणून व्हेज बिर्याणी घेतली. ती खायला एका दुकानातून प्लॅस्टिक चमचे अशी सगळी खरेदी करून परत आलो.

आम्ही त्यांचे आभार मानत होतो तर तेच ओशाळपणे म्हणत होते की आम्ही तुम्हाला घरीच बोलावले असते पण आम्ही शहराच्या पार दुसऱ्या टोकाला राहतो आणि जाऊन यायला तुम्हालाच खूप उशीर होईल.

मग रात्री काय झकास मैैफिल जमली. सगळे हिशेब वगैरे तपासले आणि एसी रुममध्ये झकास लोळलो.

अर्थात एक हुरहुरही होती. उद्या आता आपला प्रवास संपणार. सगळी धमाल, मज्जा संपणार. घरी जायची ओढ होतीच पण हे सगळे संपणार याचे वाईटही वाटत होते.
पण उद्या आमची सगळ्यांची स्वप्ने पूुर्ण होणार होती. आणि माझे तर लहानपणापासूनचे. त्या अस्वस्थेत झोपही नीट येत नव्हती. रात्री उशीरा कधीतरी डोळा लागला.

ओन्ली ९० किमी टू गो

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कसले भारी वर्णन लिहिले आहेस रे, अगदी डोळ्यापुढे प्रसंग उभा रहातोय, जोडीला फोटो आहेतच.
चुकुनमाकुन त्याच रस्त्याने कधी जायची वेळ आली, तर तु केलेले सगळे वर्णन आठवेल, नव्हे नव्हे, ते वाचूनच तिकडे जाईन.
>>>> त्या गर्दीत कालची सुंदरी आली आहे का हे हळूचन पाहून घेतले. नव्हती!!! <<<<
मी आधीचा एपिसोड(लेख) चुकवला आहे का?
तुझ्या एका फोटोत नीकॅप नीट गुढग्यावर आहे, अन जिथे ढेपाळलास तिथल्या फोटोत पार घोट्यावर उतरलीये. तशी नीकॅप / पोटरीला गुंडाळायला पट्टी घ्यावी अशा विचारात आहे.
मला सांग, त्याचा नेमका फायदा तुला काय जाणवला?

लेखमालेच्या आजच्या भागात खाद्यदेवतेच्या आराधनेसोबतीने त्यामुळे तुम्हा सर्वांवर फालुदा प्रकरणामुळे ओढवलेल्या (वा नको असलेल्या) आपत्तीची कहाणी फारच वाचनीय वाटली. सायकलिंग सारखी सतत घामटा काढणारी साथ सोबतीला असताना प्रसंगी एक ग्लास चहा तरतरी देतो पण ज्यावेळी काही तरी चांगलेही क्षमतावृद्धीसाठी घ्यावे म्हटले तर अशी फालुदाभेट गळी पडते की पुन्हा ते नावही कधी टंकायला मिळू नये अशीच तुम्ही सर्वांनी एकमुखी प्रार्थना केली असणार.

ग्लुकोज लेव्हल कमतरतेमुळे तुमच्या स्टॅमिनावर झालेला परिणाम त्या फोटोवरून पाहिल्यावर माझ्या पोटात विलक्षण कालवाकालव झाली....(असा दम गेल्याचे आणि एका वडाखाली सायकल टाकून स्वतःला सताड पसरून दिल्याचा एक प्रसंग माझ्याही वाट्याला आला होता, त्याची तीव्रतेने आठवण झाली. एका सायकलपटूने तेवढ्यात चपळाई करून शेजारच्या वस्तीतून चांगले गाडगाभर घट्ट दही आणले होते....किंबहुना त्यामुळेच पुन्हा तरतरी आली होती...). तुमच्या सहाध्यायांनी लागलीच त्यावर उपाययोजना केल्यामुळे तुम्ही पुन्हा पुढील मजल मारायला तयार झाला ही आनंदाचीच बाब. प्रवासात अशा घटना अपरिहार्यपणे घडत असतात...आणि त्यांचा उल्लेख लेखात केला ही बाब चांगलीच.

"...लालभडक लोणचे घातले, वर बचकभर मीठ..." ~ हे मजेशीर तसेच विचित्रच म्हणावे असे दृश्य नजरेसमोर आले आणि पु.ल.देशपांडे यांचा एक लेख आठवला. तिथे ते लिहितात, "मटण शिजत असताना मी उत्सुकतेने पाहात होतो पण अचानकच त्या बाईने त्यात बचाकभर पिठ्ठीसाखर टाकल्याचे पाहून माझे पोटच ढवळून आले...". मटणात पिठ्ठीसाखर...गंमतच !

बाकी...शिल्पकला भाग खूप आवडला.....करामतच आहे कलाकाराची.

आशुचँप, तु मस्तंच लिहितोस मित्रा! आता शेवटचा भाग उरलाय आणि मग ही मालिका संपणार म्हणून हुरहुर वाटते आहे. Sad

आशुचँप,

भारी भाग झाला हापण. आता शेवटचा टप्पा. पुभाप्र!

रच्याकने : ते शिल्प रमण महर्षींचं आहे. असं माझं मन मला सांगतंय. म्हणून गुग्गुळाचार्यांना विचारलं. तर हो म्हणतात.

आ.न.,
-गा.पै.

मस्त.. ताकात लोणचे प्रकार जरा इंटरेस्टींग वाटतोय. कसले लोणचे होते ? साधारणपणे केरळमधला पारंपरीक पदार्थ असेल तर तो हेल्दी असणार !

पण आशू.. फालुदा चमच्याने खाल्लात का ?

धन्यवाद सर्वांना

मस्त लिहितो तू चँप. जणू मी तिथे तुझ्याबरोबर आहे असेच वाटते.
>>.>.

धन्स रे...

तुझ्या एका फोटोत नीकॅप नीट गुढग्यावर आहे, अन जिथे ढेपाळलास तिथल्या फोटोत पार घोट्यावर उतरलीये. तशी नीकॅप / पोटरीला गुंडाळायला पट्टी घ्यावी अशा विचारात आहे.
मला सांग, त्याचा नेमका फायदा तुला काय जाणवला?
>>>>>

घोट्यावर उतरली नव्हती ती मुद्दामच सैल करून खाली सरकावली होती थांबलो होतो म्हणून. नीकॅप एका तासापेक्षा जास्त वेळ आवळून ठेवायची नसते. त्यामुळे सतत घालत नव्हतोच पण खेरीज जिथे ताण येत नव्हता तिथेही काढून ठेवायचो.

हो फायदा तर खूप झाला. विशेषत चढ चढताना गुढग्यावर जो ताण येत होता तो नी कॅपमुळे फारच सुसह्य झाला.

मी आधीचा एपिसोड(लेख) चुकवला आहे का?
>>>>
नाही नाही...आधीच्याच भागात तिचा उल्लेख आहे.

असा दम गेल्याचे आणि एका वडाखाली सायकल टाकून स्वतःला सताड पसरून दिल्याचा एक प्रसंग माझ्याही वाट्याला आला होता, त्याची तीव्रतेने आठवण झाली. >>>>

अगदी अगदी मी देखील त्यातूनच गेलो...

आता शेवटचा भाग उरलाय आणि मग ही मालिका संपणार म्हणून हुरहुर वाटते आहे.
>>>

हो मलाही तेच फिलींग आहे. आता लिहायचे तरी काय असा प्रश्न पडला आहे. लिखाणासाठी म्हणून एक ट्रीप करायला पाहिजे असे वाटू लागले आहे.

धन्यवाद गामा - तुमची माहीती मिळवण्याची क्षमता अफाट आहे. नुसत्या फोटोवरून शोध घेणे मला नसते जमले. खूपच मस्त.

कसले लोणचे होते ? साधारणपणे केरळमधला पारंपरीक पदार्थ असेल तर तो हेल्दी असणार !
>>>>>
कसले लोणचे होते याचा पत्ता लागला नाही. विक्रेत्याला विचारूनही काही उपयोग नव्हता कारण खाणाखुणांनीच सगळा व्यवहार चाललेला.

पण आशू.. फालुदा चमच्याने खाल्लात का ? >>>>

अॅक्च्युअली थोडी चुकीची दुरुस्ती करायची आहे. तो फालुदा नव्हता. तो शारजा शेक नावाचा एक प्रकार होता. आत्ता धागा वाचल्यावर वेदांगने नाव आठवून सांगितले. माझ्या डोक्यातूनच गेला होता.

नंतर अर्धा वाटी दुध ओतल्यावर तो पिणेबल झाला होता मग गपागपा गिळून टाकला. पण होता मात्र पोटभरीचा. नंतर बराच वेळ काही खावेसे वाटले नाही.

भन्नाट लिहिलंय. फोटो पण मस्त. पुढच्या भागात ही सफर संपणार त्यामुळे हुरहुर वाटतीये.
फक्त कल्पनाच करु शकतो की कन्याकुमारी जवळ यायला लागल्यावर काय वाटलं असेल तुम्हा लोकांना याची !

आशुचँप,

>> तुमची माहीती मिळवण्याची क्षमता अफाट आहे. नुसत्या फोटोवरून शोध घेणे मला नसते जमले.

माझं काही नाही हो! मी फक्त सर्च मारलाय. तोही महर्षींच्या नावाने.

शिल्पात जिवंतपणा चैतन्यामुळे आलाय. आम्हाला बसल्या जागी रमण महर्षींचं दर्शन करवून दिल्याबद्दल धन्यवाद! Happy

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद सर्वांना....

फक्त कल्पनाच करु शकतो की कन्याकुमारी जवळ यायला लागल्यावर काय वाटलं असेल तुम्हा लोकांना याची !
>>>

खरेच त्यावेळी काय वाटत होते हे आत्ताही सांगता येणार नाही. असे मिक्सड फिलींग होते.

माझं काही नाही हो! मी फक्त सर्च मारलाय. तोही महर्षींच्या नावाने.
>>>>

ते महर्षी आहेत इतकेही मला माहीती नव्हते..मी आपला अडाणी कुणाचातरी असेल पुतळा म्हणून तितकेही कष्ट घेतले नाहीत.

धन्यवाद निलूदा, व्हीटी२२०, अमितव आणि मित Happy

वाटेत ही अशी एक मूर्ती दिसली म्हणून थांबलो तर

=============================================================
.
.
.

ही 'नारायण गुरु' ची मूर्ती................ साऊथ कडिल समाजसुधारक

आशीष जी , तुमच्या सीरीज चे करावे तितके कौतुक कमी आहे अन त्याच्या तिप्पट तुमच्या ह्या एडवेंचर चे!! माँ कसम मजा आ गया! हे मूर्ति प्रकरण जास्त जिव्हाळा टाइप वाटले! अजब रसायन आहे देवा हा खंडप्राय देश!! मागे आम्हाला भेटायला काही अमेरिकन मंडळी आली होती आमच्या यूनिट ला तिकडे माझे २ कांस्टेबल तमिळ होते त्यांचे इंग्लिश ज़रा बरे म्हणुन त्यांना एंटरटेन करायला माझ्या सोबत दिले होते त्यांच्यापैकी एकाला पाहुण्याने विचारले "तू कुठला?" तर बोलला तो अमुक तमिलनाडु राज्य वगैरे तर मला म्हणाला तुम्हाला एकमेकांची नेटिव भाषा येते का? म्हणले नाही बा नहीं येत तर डोळे मोठे करत म्हणाला "with २२०० different languages how do u ppl stay put together under one flag buddy?"
म्हणले गड्या ते तुला समजता तू भारतीय झाला नसता काय!!! म्हणले we celebrate our diversity my friend! But at core we have accepted that we are Indians first!!. तूफ़ान मजा आली आजचा भाग वाचुन

"with २२०० different languages how do u ppl stay put together under one flag buddy?"
म्हणले गड्या ते तुला समजता तू भारतीय झाला नसता काय!!!
>>>>

कडक.....जबरदस्त उत्तर...मानलंच तुम्हाला.....