निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- सहा.

Submitted by किंकर on 12 July, 2015 - 17:00

निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग एक - http://www.maayboli.com/node/54551
निमित्त पालखी सोहळ्याचे .भाग दोन - http://www.maayboli.com/node/54561
निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग तीन- http://www.maayboli.com/node/54583
निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग चार - http://www.maayboli.com/node/54599
निमित्त पालखी सोहळ्याचे- भाग- पाच- http://www.maayboli.com/node/54630
भागवत धर्म जसा जात पात ,उच्च नीच असा भेद भाव करीत नाही, तसा स्त्री पुरुष हा लैगिक दुजाभाव पण करीत नाही . त्यामुळे या दिंडी सोहळ्यात जसा वारकरी विणा , मृदुंग यासह तल्लीन होतो, तशी डोक्यावर तुळशीचे पवित्र वृंदावन घेत स्त्री वारकरी भक्त, तितक्याच सहजतेने रममाण होते .

देवाच्या दरबारी ,अथवा या विश्वाच्या निर्मितीत जीव हि एकच संज्ञा सम पातळीवर आहे . बाकी भेदाभेद हे निसर्ग चक्राचा अविभाज्य घटक आहेत . हे महत्वाचे सूत्र संतांनी पुरेपूर ओळखले होते .

असे असून देखील समाज जेंव्हा जात पात ,उच्च नीच , स्त्री पुरुष असे भेदा भेद करीत होता , काही मुठभर घटक इतरांच्या वर सत्ता गाजवून स्वार्थ साधण्यात गुंतले होते ,तेंव्हा समाज प्रबोधन करण्यासाठी संतांनी लेखणी उचलली आणि भक्ती मार्गाचा आश्रय घेत, या अत्याचारा विरुद्ध आवाज उठवला .

स्त्री पुरुष हे दोघे समान पातळीवर आहेत आणि त्याच्या निर्मितीचीच ती दोन रूपे आहेत हे समाजाला पटवून दिले. पण जेंव्हा रूढी ,परंपरा यांची जोखडे झुगारून देणे हेच एक अवघड काम होते त्या काळात संतांनी ते कार्य लेखणीने केले .

स्त्री पुरुष समान आहेत हे सहज सूत्र समजावून देताना संतांनी , ईश्वरास सम पातळीवर आणले . विठूरायास ' माउली ' स्वरुपात सादर करण्या मागे हेच मुख्य सूत्र होते . त्यामुळे हा भेदा भेद जपण्यात ज्यांचा स्वार्थ दडला होता त्यांना विरोध करणेच अशक्य झाले .

अर्थात हे सम सूत्र आजही पुरेपूर पचनी पडले आहे असे नाही ,तेंव्हा सुद्धा ते लगेच अमलात आले होते असे नाही. पण चुकीच्या परंपरा चुकीच्या आहेत आणि त्या मोडून काढल्याच पाहिजेत हा आवाज त्या काळी ज्यांनी उठवला ते यांच्या कार्याने संत झाले .

या सर्व प्रवासात असलेल्या ' माउली ' चे दर्शन माउली च्या नजरेतून घेण्याचा प्रयत्न आज आपण करणार आहोत . माउली समान संत परंपरेतील नावांची यादी मोठी आहे त्यातील एक संत कान्होपात्रा पांडुरंगास साकडे घालताना, सखा मानून म्हणतात -
अगा वैकुंठीच्या राया ।
अगा विठ्ठल सखया ॥१॥

अगा नारायणा ।
अगा वासुदेवनंदना ॥२॥

अगा पुंडलिक वरदा ।
अगा विष्णू तू गोविंदा ॥३॥

म्हणजे हे विठ्ठला तू अनेक रुपात आहेस ,कृष्णा विष्णू तूच आहेस आणि पुंडलिकास वरदान देणारा तूच आहेस आणि माझा सखा देखील तूच आहेस तेंव्हा रुख्मीणीचा नाथ असलेल्या पांडुरंगा या कान्होपात्रेस तूच राख. असे सांगत या रचनेत शेवटी त्या म्हणतात -

अगा रखुमाईच्या कांता ।
कान्होपात्रा राखी आता ॥४॥

या प्रकारे लिह्णारी कान्होपात्रा भक्ती आणि कारूण्य यांचा संगम असणाऱ्या पुढील रचनेत जी विनवणी करताना दिसते , त्याकडे फक्त भक्ती रचना म्हणून पाहत राहावे का त्या पलीकडे जात, कान्होपात्रेस आणखी काही म्हणावयाचे आहे, असा प्रश्न मला नेहमीच पडतो .

माझा आणखी अंत पाहू नकोस , हरिणीच्या पिल्लास शिकाऱ्याने पकडले असाता जी तडफड हरिणीची होते तशी माझी अवस्था झाली आहे . हे त्यांचे सांगणे म्हणजे या माउलीस लागलेली त्या माउली ची ओढ आहेच ,पण त्यातून त्यांनी होणारी सामाजिक फरपट , दुजाभाव यांनी होणारी घालमेल याचे चित्र उभा केले आहे असेच वाटते . आणि या अस्वस्थते तून शब्द येतात -

नको देवराया अंत आता पाहू
प्राण हा सर्वथा जाऊ पाहे

हरिणीचे पाडस व्याघ्रे धरीयेले
मजलागी जाहले तैसे देवा

इतके म्हणून झाल्यावर कान्होपात्रा म्हणते हि होणारी फरपट थांबवण्यासाठी माते तूच धाव घे ,तुझ्या ओढीने मी इतकी उदास झाले आहे कि मला फक्त जवळ घेवून पण भागणार नाही तर तू मला हृदयांत घे , म्हणजेच या विकल परिस्थितीत असे संरक्षण दे कि ,त्यानंतर मला कोणीच त्रास देणार नाही . आणि हि करुणा भाकताना ती म्हणते -

तुजविण ठावं न दिसे त्रिभुवनी
धावे हो जननी विठाबाई

मोकलूनी आस जाहले उदास
घेई कान्होपात्रेस हृदयांत

आणखी एक संत जनाबाई यांची विठ्ठल भक्ती अशी आहे कि त्यांना पूजा विधी ,शास्त्र यात गुंतून न राहता केली जाणाऱ्या भक्तीची रूपे , त्यांच्या विविध रचनात ठायी ठायी दिसतात, कधी घरातील कामे कताना मी नाम जपेन असे म्हणत, त्या म्हणतात -

दळिता कांडिता । तुज गाईन अनंता ॥१॥

तर कधी स्वतः चे रोजचे आवरताना ,वेणी, फणी पांडुरंगाच्या मदतीने करताना, त्यांच्या ओठी शब्द येतात -
जनी उकलिते वेणी ।
तुळशीचे बनी ॥१॥

हाती घेऊनिया लोणी ।
डोई चोळी चक्रपाणि ॥२॥

माझे जनीला नाही कोणी ।
म्हणुनी देव घाली पाणी ॥३॥

जनी सांगे सर्व लोका ।
न्हाऊ घाली माझा पिता ॥४॥

दळण कांडण यात होणारी मदत, रोजचे पाणी वाहून सडा सारवणे यातली मदत ,हि माउलीच करते, अशी त्यांची ठाम समजूत होती . त्यामुळे त्यांनी पांडुरंगास आई मानून विनवणी केली आहे . मी तुझे गुणगान करताना अशी रंगून जाते कि असे वाटते कि , पंढरीच्या सर्व पसाऱ्या सह तूच माझ्या कडे यावेस . म्हणून त्या म्हणतात -

येग येग विठाबाई, माझे पंढरीचे आई ॥१॥

भीमा आणि चंद्रभागा, तुझे चरणीच्या गंगा ॥२॥

इतुक्यासहित त्वां बा यावें, माझे रंगणी नाचावें ॥३॥

माझा रंग तुझे गुणीं, म्हणे नामयाची जनी ॥४॥

असे माउली रूप विठूरायास दिल्यानंतर सर्व सामान्य भक्तांच्या साठी, त्या पांडुरंगास विनवणी करतांत , हे देवा एक जिवलग म्हणून मागणे आहे कि ,साधू संत यांचे महत्व , कृष्णाची बासरीतील अलौकिकत्व , आपण केलेली पुंडलिकाच्या वरदानाची कारण मीमांसा ,हे कसे झाले सर्व उलगडून सांगाच ,पण या सर्वां बरोबर त्या 'कळलाव्या' नारदाची गरज का भासली ? हे पण सांगाच .
थोडक्यात काय तर जनाबाई यांच्या संसारातच विठू माउली असल्याने त्या पांडुरंगास हक्काने म्हणतात -

जनी म्हणे पांडुरंगा । माझ्या जीवींच्या जिवलगा ।
विनविते सांगा । महिमा साधुसंतांचा ॥१॥

कैसी वसविली पंढरी । काय महिमा भीमातीरीं ।
पुंडलिकाच्या द्वारीं । कां उभा राहिलासी ॥२॥

कैसा आला हा गोविंद । कैसा झाला वेणुनाद ।
येउनी नारद कां राहिला ॥३॥

कृपा करा नारायणा । सांगा अंतरींच्या खुणा ।
येऊं दे करुणा । दासी जनी विनवितसे ॥४॥

या संत परंपरेतील मीराबाई ,मुक्ताई ,सोयराबाई अशी इतरही महत्व पूर्ण नावे आहेत . पण आधुनिक संत कवी पी. सावळाराम यांच्या विठ्ठल भक्तीच्या रचना देखील सुरेख आहेत. पण त्यापैकी संतांच्या नजरेतून केलेल्या या रचना म्हणजे जणू त्या त्या संतांनी अपूर्ण सोडलेली रचना पूर्ण करण्याची विनंती, त्यांना त्या त्या संतानी केली आणि त्यानंतर या रचना झाल्या असेच वाटत राहते .

संत जनाबाई यांचे मनोगत सांगणारी हि रचना -

विठु माझा लेकुरवाळा
संगे गोपाळांचा मेळा

निवृत्ती हा खांद्यावरी
सोपानाचा हात धरी
पुढे चाले ज्ञानेश्वर
मागे मुक्ताबाई सुंदर

गोराकुंभार मांडीवरी
चोखा जीवा बरोबरी
बंका कडेवरी
नामा करांगुली धरी

जनी म्हणे गोपाळा
करी भक्तांचा सोहळा

जशी वरील रचना जणू काही जनाबाई यांचेच मनोगत वाटते ,त्याप्रमाणे स्वतः रुखमाई आपल्या मनातील क्लेश पांडुरंगा पाशी व्यक्त करीत आहेत, असे चित्र त्यांनी या गीतात उभे केले आहे . पंढरपुरात मंदिर प्रवेश जेंव्हा मर्यादित होता तेंव्हा तेथील बडवे यांनी अक्षरशः मनमानी कारभार चालवला होता . पैसा आणि सत्ता यांच्या शिवाय दर्शन दुरापास्त झाले होते . हा भक्तीचा बाजार बघून, आलेली उद्विग्नता मांडताना,हे सर्व म्हणजे मानव जातीला कलंक आहे असे वाटते ,हे त्यांचे विचार त्यांनी रुखमाईच्या मुखी घातले आहेत. पण ते काव्य आणि त्याचा मतितार्थ इतका गहन आहे कि ते मनोगत रुखमाईचेच आहे असे वाटते -
पंढरीनाथा झडकरी आता, पंढरी सोडून चला
विनविते रखुमाई विठ्ठला

ज्ञानदेवे रचिला पाया, कळस झळके वरि तुकयाचा
याच मंदिरी आलो आपण प्रपंच करण्या भक्तजनांचा
भक्त थोर ते गेले निघुनी, गेला महिमा तव नामाचा
विक्रय चाले देवपणाचा, रहायचे मग इथे कशाला

धरणे धरुनी भेटीसाठी, पायरीला हरिजन मेळा
भाविक भोंदु पूजक म्हणती, केवळ आमुचा देव उरला
कलंक अपुल्या महानतेला, बघवेना हो रखुमाईला
यायचे तर लवकर बोला, ना तर द्या हो निरोप मजला

पी . सावळाराम यांच्या प्रमाणे या संत परंपरेतील रचना, तितक्याच ताकदीने पुढे नेणारे कवी म्हणजे जगदीश खेबुडकर . त्यांच्या विठ्ठल भक्तीच्या रचनांमधील -एकतारिसंगे एकरूप झालो,टाळ बोले चिपळीला नाच माझ्यासंग,या सर्वश्रुत असल्या तरी आजच्या 'माउली ' दर्शनाची सांगता करताना आपण त्यांच्या या सुरेल रचनेचा आस्वाद घेवू यात -
विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

लेकरांची सेवा केलीस तू आई
कसं पांग फेडू, कसं होऊ उतराई
तुझ्या उपकारा जगी तोड नाही
ओवाळीन जीव माझा सावळे विठाई
विठ्ठला मायबापा
जन्मभरी पूजा तुझ्या पाऊलांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

भाग पाच दोनदा अपलोड झाला होता म्हणून त्यातील एक संपादित करून त्या ठिकाणी भाग सहा लिहला आहे .

वा, रविन्द्रजी - अजून एक अप्रतिम लेख वाचायला मिळाला ....

श्रीहरि विठ्ठल जय हरि विठ्ठल ||