पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 11 चावरा - बॅकवॉटर्स

Submitted by आशुचँप on 14 June, 2015 - 17:30

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ७ पय्यानुर

http://www.maayboli.com/node/54041 - दिवस ८ कोईकोडे

http://www.maayboli.com/node/54080 - दिवस ९ गुरुवायुर

http://www.maayboli.com/node/54166 - दिवस 10 कोची

=====================================================================

कालच्या फक्कडच्या विश्रांतीनंतर आज मन आणि शरीर पुन्हा एकदा सज्ज झाले होते अजून एक सेंच्युरी राईड मारायला. आजचा रस्ता पण लई झ्याक होता. चढ-उतार जवळपास नव्हतेच आणि कोची शहर ते चावरा अर्थातच थिरुवनंतपुरमचे उपनगर म्हणता येईल अशा या वाहत्या रस्त्याची कंडीशन पण चांगली असणार होती. त्यातून दक्षिण केरळावर निसर्गसौंद्याची बरसात झाल्यामुळे कोई लोचाच नही था.

त्यामुळे निवांत निघालो, हॉटेलबाहेरच एका टपरीवर कॉफीपान उरकले. कालच्या संपप्रकरणी जादाची घेऊन ठेवलेली क्रीम बिस्कीटे, केक्स यावेळी कामाला आले.

अपेक्षा केली होती त्याप्रमाणे रस्ता झकासच होता आणि सकाळी सकाळी ट्रॅफिक त्यामानाने कमी असल्याने झपाझप किलोमीटर मागे किलोमीटर पार करत चाललो होतो. असाच वेग मिळत राहीला तर दुपारपर्यंतच चावरा गाठू असे मनात विचार येतो ना येतो तोच गचका मिळाला.

फोटो वेदांग

लान्सच्या सायकलीमध्ये काहीतरी बिघाड झाला होता. गियर सॉकेटमध्ये अडकल्यामुळे त्याला दुसऱ्यावरून तिसऱ्या फ्रंट गियरवर जाताच येत नव्हते. सायकलची अडचण म्हणल्यावर आमचे टेक्निकल अॅडवायजर घाटपांडे काका उत्साहाने पुढे सरसावले. सुरुवातीला हे काय फार अडचणीचे असेल असे वाटले नाही पण वाटला होता त्यापेक्षा बराच वेळ लागलायला लागला आणि मग अस्वस्थता वाटू लागली. सकाळचा मस्त वेळ वाया चालला होता. याच वेळात झपाझप अंतर काटून गेलो असतो तर तेवढाच उन्हाचा तडाखा वाचला असता. पण आता निरुपाय होता.

फोटो वेदांग

शेवटी बराच वेळ प्रयत्न करूनपण जमेना तेव्हा पुढे एखादे सायकलचे दुकान बघून त्यात खटपट करायचे ठरले. आता साध्या शब्दात सांगायचे झाले तर वेगात सायकल चालवण्यासाठी तिसरा गियर फार आवश्यक असतो. आता आमच्या सुसाट गँगचा प्रमुख शिलेदार लान्सचाच तिसरा गियर बाद झाल्यामुळे त्याला हँडीकॅप असल्यासारखेच वाटत होते. पण त्या बहाद्दराने हाय के़डन्स ठेवत सेकंड तर सेकंड गियरवर सायकल चालवत आमच्या वेगाने सायकल मारली. पुढे मग अलापुझा ला एका दुकानात आवश्यक ती सामग्री मिळाली आणि सायकल पूर्वपदावर आली.

दरम्यान एके ठिकाणी थांबून मस्त नाष्टा केला. नाष्टा म्हणजे काय माझी ठरलेली अॉर्डर असायची. ईडली वडा मिक्स (जादाची एक-एक) आणि त्यावर कमी गोड, जादा स्ट्रॉंग अशी मस्त वाफाळती कॉफी. अहाहा सकाळचे २० एक किमी सायकल चालवल्यावर पोटात आगडोंब उसळलेला असायचा अशा वेळी तो इडली वडा, तो पण दाक्षिणात्य आणि कडक कॉफी हे जे काही अद्भूत समाधान होते त्याला तोड नव्हती.

फोटो ओंकार

आत्ताच इथे सांगायला हरकत नाही. मोहीम संपल्यावर बरोबर एका महिन्याने एक अशीच छोटी राईड करायचे ठरले. जायचे कुठे, तर २० किमी चालवून रुपाली किंवा वैशाली आणि तिथे जाऊन खायचे काय तर इडली वडा आणि कडक कॉफी....

(अर्थात रुपालीमधली चव ही अफलातूनच असते आणि सांगायला आनंद किंवा खेद वाटतो की त्या चवीची इडली किंवा विशेषत खोबऱ्याची चटणी आख्खा केरळात पण कुठे मिळाली नाही)

वर लिहील्याप्रमाणे आज एकदम सरळसोट रस्ता होता आणि आता पोट भरल्यामुळे सुसाट सायकली मारायला सुरुवात केली. एरवी २०-२२ च्या स्पी़डऐवजी आता एकदम ३०-३२ चा स्पीड मिळाल्यामुळे धम्माल येत होती. आणि त्यात अजून रंगत आणली एका आईस्क्रीमवाल्याने.

एक पोरगेलासा मुलगा, जुन्या अॅटलस सायकलच्या कॅरीयरवर आईस्क्रीमचा मोठा डब्बा लादून चालला होता. त्याने आम्हाला ओव्हरटेक करून थोडे खिजवल्यासारखे केले. मग काय, सुसाट गँग पेटली. वेदांग, सुहृद, बाबुभाई वगैरे दणादणा पॅडल मारत निघाले आणि थोड्या अंतरावर त्याला मागे टाकले. पण तोही काही कमी नव्हता, थोड्या वेळाने पुन्हा त्याने आम्हाला ओव्हरटेक केला. आता मात्र शर्यत सुरु झाली. आमच्या सायकली जरी आधुनिक असल्या तरी त्या पोराच्या अंगात जोर मात्र चांगलाच होता आणि त्यामुळेच कधी तो पुढे कधी आम्ही असे जवळजवळ २०-२५ किमी अंतर पार केले.

शेवटी मलाच त्याची दया आली. आणि पुढे जाऊन थांबलो आणि त्याला आणि बाकीच्यांनाही थांबवले. २०-२५ किमी शर्यत म्हणजे काय कमी नव्हती, ती पण ओझे घेऊन (हो सगळ्यांच्या सायकलवर ओझी होती ना). इतक्या उन्हात. त्यामुळे सगळेच लालबुंद टमाटोसारखे झाले होते. घामाच्या धारा वाहत होत्याच पण छातीचेपण भाते झाले होते. त्यापोराची अवस्थाही फार काही वेगळी नव्हती.

मग सगळ्यांनी त्याच्याकडचेच आईस्क्रीम विकत घेतले आणि अजून एक घेऊन त्याला पण खायला दिले. आधी नको नको म्हणाला, पण पैसै आम्हीच देतोय म्हणल्यावर मग घेतले. हो ना..नाहीतर त्याला त्याचेच आईस्क्रीम कोण खिलवणार.
खाता खाता मग माहीती काढली. मुळचा बिहारचा आणि कामधंद्यासाठी केरळात आलेला. रोज तो सुमारे ४० किमी सायकल चालवत आईस्क्रीम विकतो. म्हणलं केरळी भाषा येते का तर लाजत लाजत म्हणे थोडा थोडा.

फोटो वेदांग

काय कौतुक आहे ना...च्यायला...घरापासून हजारो किमी अंतरावर येऊन नुसते काम नाही तर धंदा करायचा..तेही स्थानिक भाषा, वातावरण काहीही माहीती नसताना...इथे मराठी माणूस असता तर काय केले असते देव जाणे. कदाचित, रोजच्या इडली डोश्याला कंटाळून केव्हाचाच गड्या आपला गाव बरा करत परत गेला असता...

मी आधी एका भागात लिहील्याप्रमाणे केरळात वरच्या बाजूला मुस्लिम वस्ती जास्त आहे तर खालच्या अंगाला. त्याची प्रचिती जागोजागी दिसणाऱ्या चर्चेसमुळे येतच होती. आणि ही चर्चेसपण इतकी दिमाखदार आणि भव्य बांधली होती की थांबून फोटो काढून पुढे जाणे शक्यच होणार नाही. प्रत्येक चर्चची बांधणी वेगळी आणि प्रत्येकात काहीतरी वैशिष्ट्य.

पुढे अलापुझा अर्थात अलेप्पीला आलो. भारतातले व्हेनिस म्हणून ओळखले जाणारे हे गाव केरळचे खास वैशिष्ट्य असणारे बॅकवॉटर आणि त्यातील हाऊसबोटसाठी प्रसिद्ध आहे. खास हनिमूनर्स गाव.

त्यामुळे मार्केटींग जोरदार होते. दोघे तरुण असे बाईकवरून बाजूबाजूने चालवत चालले होते. मी हसून स्माईल वगैरे दिल्यावर त्यातल्या एकाने सफाईदार इंग्रजीमध्ये कुठुन आले कुठुन चालला अशी चौकशी केली. मी आपली ठराविक छापातली उत्तरे दिली. मग त्यांनी केरळ किती सुंदर आहे, हा भाग किती छान आहे आणि इतकया उन्हात सायकल चालवल्यानंतर विश्रांती घेणे किती आवश्यक आहे हे मनावर ठसवले. मी अजून त्यांच्या पाहुणचाराचेच मनात कौतुक करत होतो. पण नंतर हळून मागे बसलेल्याने त्यांचे कार्ड पुढे सरकावले आणि इथेच या तुम्हाला कन्सेशनमध्ये बोट मिळवून देतो सांगितल्यावर एकदम पत्ते उघड झाले.

मी पण तितक्याच तत्परतेने, आत्ता तर शक्य नाही पण मी कार्ड जपून ठेवतो आणि फॅमिलाला घेऊन आलो की तुमच्याच कडे येईन असे सांगून त्याची बोळवण केली.

पण तो भाग होता मात्र खरंच सुंदर. आणि एक क्षण त्या हाऊसबोटीत जाऊन राहण्याची इच्छा पण प्रबळ झाली. आत्तापर्यंत आम्ही ५० एक किमी आलो होतो आणि अजून जवळपास तेवढेच जायचे होते. त्यामुळे विशबुकमध्ये अजून एका जागेची नोंद करत पुढे सरकलो. असेही गुरुवायुरला हत्तींचा उत्सव बघायला यायचेच आहे, तेव्हाच अलेप्पी पण करता येईल अशी मनाची समजूत घातली.

त्यानंतर चावरा गाठेपर्यंत फार उत्साहवर्धक असे काही घडले नाही. आम्हाला उन्हाची आणि उन्हालाही आमची सवय झाली होती. तीच गोष्ट सीटची. मला तर वाटत होते सातत्याने बसून बसून सायकलची सीट मोल्ड होऊन मला हव्या त्या आकाराची झालीये. वाटेत जागोजागी शहाळी, कलिंगड, मोसंबी, उसाचा रस असे काय काय लागत होते आणि नुसते पाणी ढोसण्यापेक्षा सर्व प्राकृतिक उपाय करत डीहायड्रेशनला आमच्यापासून लांब ठेवत होतो.

फोटो वेदांग

अर्थात एक भारी युक्ती आम्हाला करावी लागली. रस्ता एकदमच सरळसोट असल्याने सुसाटग्रुपने पॅडल अगदीच सैल सोडून दिली होती. सुहृद, बाबुभाई तर चेव आल्यासारखे सुटायचे आणि त्या स्पीडला गाठता गाठता घाटपांडेकाकांची दमछाक व्हायची. त्यामुळे असे ठरले की पुढच्या लोकांनी एकच मर्यादेत वेग पकडायचा. पण सुहद आणि बाबुभाई या दोघांकडेही स्पीडोमीटर नव्हता. माझ्याकडे होता पण मला कधीही हेडविंडसचा सामना करत सगळ्यात पुढे रहायला आवडायचे नाही. मग यावर एक खास इंडियन जुगाड.

बाबुभाई आणि सुहृद सगळ्यात पुढे, त्यांच्या पाठोपाठ मी आणि घाटपांडे काका, त्यापाठोपाठ वेदांग आणि लान्स. वीक मेंबर्स मध्ये घेतल्यामुळे पेलेटॉनचा स्पीड एकसारखा राहणार होता. माझे काम एवढेच की बाबुभाई आणि सुहृदला कंट्रोल करणे. त्यांच्या मागून राहत वेग वाढला की आता ३५ च्या स्पीडनी चाललोय, कमी करा, आता २८ चाच आहे, जरा चला जोरात. असे बसचा कंडक्टर कसा कोकलत राहतो तसे. सायकल चालवत चालवत असे ओरडत राहणे सोप्पे नव्हते, पण एकंदरीत ते प्रकरण जमले. आणि बराच काळ आम्ही सर्व जण एका गतीने जात राहीलो.

त्यातून मी माझी एक थिअरी पण घाटपांडेकाकांनी समजाऊन सांगत होतो. माझ्या थिअरीनुसार ग्रुपमधून जाताना आजूबाजूच्या लोकांकडून (विशेषत मुलींकडून) अटेन्शन हे दुसऱ्या ते चौथ्या क्रमांकाच्या रायडरला मिळते. याचे कारण म्हणजे पहिले दोन रायडर जाईपर्यंत त्यांना नक्की काय चालले आहे हेच कळत नाही. पण एका पाठोपाठ दोन रायडर गेले आणि अजून मागून येतायत म्हणल्यावर त्यांचा मेंदू अटे़न्टीव होतो आणि मग त्या (आपलं ते लोक्स) दुसऱ्या ते चौथ्या रायडरकडे लक्षपूर्वक पाहतात. त्यानंतर मग सगळेच एकसारखे येतायत म्हणल्यावर त्यांचा इंट्रेस्ट काहीसा कमी होतो आणि शेवटचे रायडरतर बघून न बघीतल्यासारखे करतात. त्यामुळे आपण आत्ता पर्फेक्ट पोझीशनला आहोत असे मी त्यांना पटवून दिले.

अशाच गमती जमतीत कधी १२० किमी पार केले आणि चावरा आले ते कळले देखील नाही. आजचे हॉटेलपण अगदीच रस्त्यालगत होते. इतके रस्त्यालगत की आता सायकली कुठे पार्क कराव्यात हा प्रश्न आम्हाला पडला. पण सुदैवाने त्यांच्याकडे मागच्या बाजूला प्रशस्त जागा होती.

ते हॉटेल होते मस्तच आणि रुममध्ये गेल्या गेल्या आमचा दंगा सुरु झाला. रुम सर्विस आणि एक्स्ट्रा बेड लावण्यासाठी आम्ही बेल वाजवून स्टाफला बोलावले आणि आली ती एक मुलगी (तरूणी) आणि मी आपला तिला सांगतोय की बेड हवाय जादाचा, आणि आत्ता काहीतरी खायला आणि वर कॉफी. आणि ती आपली चूर चूर होऊन खाली बघतीेये, हायला हे काय म्हणणार एवढ्यात माझ्या लक्षात आले की नेहमीच्या सवयीने रुमवर गेल्या गेल्या कपडे काढून उघडाबंब फिरत होतो. अरे देवा. मी एकदम उडी मारून बेडवर गेलो आणि गळ्यापर्यंत चादर ओढून घेतली. आता म्हणजे तीला हसू आवरणे अशक्य झाले होते.

त्यानंतरच्या त्या बेडचाही किस्सा. बेड आला तेव्हा युडी नुकतेच हाशहुश करत येऊन पोहचले होते. फ्रेश होऊन आल्यावर त्यांनी त्या बेडवर बसकण मारली आणि धडामकन तो बेडच मधोमध तुटला.

फोटो ओंकार

आणि बेल वाजवून पुन्हा तीच बाई. दोघांनाही हसू आवरणे आता अगदीच अवघड झाले होते. मी आपला गांभिर्याने सांगतोय आणि ती ऐकतीये. एवढ्यात कुणी हसले असते तर मग मात्र कंट्रोल झाले नसते हसू.

रात्री मग जेवताना पुन्हा एकदा बासनातून माझ्या कवित काढल्या. हो ती एकच वेळ अशी असायची की तेव्हा सगळे एकत्र सापडायचे आणि त्यांचे तोंडे खाण्यात मग्न असायची. त्यामुळे गमगुमान माझ्या कविता ऐकून घ्याव्या लागत.

आजच्या दिवसाचा हिशेब. १२० किमी रेकॉर्ड स्पीडनी गाठले होते. सायकलींगचा वेळ ५ तास २७ मिनिटे पण इतका टाईमपास करत आलो की तब्बल ९ तास लागले एकूण प्रवासाला. पण इट वॉज वर्थ इट. त्यातून काही फास्ट टायमिंगचीही नोंद स्ट्राव्हाने केली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आयला आज एकदम सुस्साट चालवली की सायकल. फळांचे फ़ोटो भारी. तो केरळी बीहारी मुलगा किती लहान, पण खिलाडुवृत्तिने तुमच्याबरोबर आला त्याचेही विशेष कौतुक

वाह.. मजाच आली वाचताना... डोळ्यासमोर साकारली दृष्यं..

त्या छोटुल्या बिहारी पोराचा चेहरा किती गोड आहे आणी सुंदर हास्य.. कौतुक वाटलं फार त्याच्या धडपडीचं..

परफेक्ट पोझिशन, हॉटेलातल्या गमती Rofl Biggrin

भारीय Happy

चावरा वाचुन वाटलं की बॅकवॉटर्सच्या पाण्यामुळे तिकडे डास खुप आहेत आणि ते चावले म्हणुन चावरा. Proud

हाटिलतल्या गमतीजमती. Lol

त्या पोराच कौतुक आहे..

मस्तच सफर !

पण स्पीडमध्ये जाण्यासाठी पुढचा तिसरा हवाच असे नसते. ती मुलींची थेअरी बरोबर आहे. एकदमच अनुमोदन.

फोटोनी जितके प्रसन्न केले तितकेच प्रसन्नतेने लिहिलेल्या मजकुरानेसुद्धा....रस्त्याचे गुणगान सायकलस्वारांनी करणे हे किती सुखदायक ठरते त्याचा प्रत्यक्ष अनुभव मीही घेतला आहे....अशा काळात जेव्हा आशुचँप "...झपाझप किलोमीटर मागे किलोमीटर पार करत चाललो होतो..." असे लिहितात त्यावेळी निश्चित्तच जाणवते की त्याचे प्रमुख कारण म्हणजे रस्त्याचा दर्जाच होय.

बिहारी मुलाच्या चेहर्‍यावरील निरागस म्हणावे असे हास्य सारे काही सांगून जाते....रोज चाळीस किलोमीटर सायकल दामटत...."आईस्क्रिम" ची आरोळी सोबतीला घेऊन...उन्हातान्हातून....अगदी तुमच्याबरोबरीने वेगाने सायकल नेत, तो मुलगा चार पैसे जेव्हा कमावितो (त्यातील दोन बिहारमधील गावीही पाठवत असेल तो), त्यावेळी तुम्ही त्याला आईस्क्रिम देऊन एक प्रकारे त्याच्या कष्टाची योग्य अशी पावती केली असे म्हणेन.

बेडचा किस्साही धमालच !!

मस्तच..
त्यावेळी तुम्ही त्याला आईस्क्रिम देऊन एक प्रकारे त्याच्या कष्टाची योग्य अशी पावती केली असे म्हणेन.>> +१०००

धन्यवाद सर्वांना....

टण्या - पहिल्या प्रतिसादाची प्रथा अजूनही कायम ठेवली आहे तुम्ही....

त्या छोटुल्या बिहारी पोराचा चेहरा किती गोड आहे आणी सुंदर हास्य.. कौतुक वाटलं फार त्याच्या धडपडीचं.. >>>>

हो कौतुक करण्यासारखाच होता तो

चर्च चे फोटो एकदम छान!>>>>>

धन्यवाद सुरेख....या आख्ख्या धाग्यात माझे असे हे दोन तीनच फोटो आहेत. या दिवशी सायकल मारण्यात इतका मग्न होतो की फारसे फोटोच काढले नाहीत.

चावरा वाचुन वाटलं की बॅकवॉटर्सच्या पाण्यामुळे तिकडे डास खुप आहेत आणि ते चावले म्हणुन चावरा.>>>>

हाहाहा...भारीये

पण स्पीडमध्ये जाण्यासाठी पुढचा तिसरा हवाच असे नसते. >>>>

ते आहेच. पण सातत्याने हाय केडन्सवर चालवली तर जास्त दमायला होते ना.

ती मुलींची थेअरी बरोबर आहे. एकदमच अनुमोदन.>>>>>>

हाहाहा थँक्यु थँक्यु

अशोकदा - नेहमीप्रमाणेच अतिशय सुरेख प्रतिसाद...मी वाटच पाहत असतो तुमच्या प्रतिसादाची...इतके हुरुप वाढवणारे तुमचे शब्द आहेत...खूप छान वाटते.

गिरी, चनस, डीडी आणि मित - खूप खूप धन्यवाद....दर वेळी न चुकता तुम्ही जी शाब्दिक शाबासकी देता त्याने अजून लिहावेसे वाटते

जबरदस्त वर्णन केलं आहे. त्या आईस्क्रिम वाल्या पोराचं खरच कौतुक आहे. एवढी दणकट सायकल दामटायची म्हणजे गम्मत नाही. तुम्ही त्याच्याकडुन आईस्क्रिम विकत घेतले आणि वर त्यालाही खाऊ घातले हे उत्तम. त्यानेही कदाचित असा अनुभव अगोदर कधी घेतला नसेल.

फोटोज पण मस्त! *thumbsup*

आशु, तू टण्याला तुम्ही म्हणतो आहेस... टण्या तिकडे गडाबडा लोळत असेल..

रच्याकने.. हा भाग पण नेहमी प्रमाणे मस्तच...

आइस्क्रीमवाला मुलगा एकदम जबरी..

ते आहेच. पण सातत्याने हाय केडन्सवर चालवली तर जास्त दमायला होते ना. >>

हे उत्तर म्हणजे अवांतर ठरू शकेल ह्याची कल्पना आहे पण तू वर जे म्हणतोस तसाच बहुतेक सायकल चालवणार्‍यांनाचा तो समज असतो. म्हणून वेळ घेतोच. Happy

हाय केडन्सचा आणि दमण्याचा संबंध नसतो तर कुठल्या गिअर रेशोमुळे पायावर किती ताण येतो त्यामुळे दमतो.

उदाहरणासाठी आपण ते गिअर रेशो द्वारे समजावून घेऊ.

समजा तुझ्या सायकलच्या समोरच्या दोन रिंग ५० आणि ३४ च्या आहेत. आणि तुझ्या मागच्या रिंग ११ ते ३२ अश्या आहे. ( ३४ हा सुपर लो असतो.) आणि ३० किमीच्या स्पिडनी जायचे आहे. आणि त्या पाय फिरण्याला आपण केडन्स म्हणतो

तर हे अचिव्ह करण्यासाठी लोकं लगेच सर्वात मोठ्या रिंग वर (म्हणजे हायब्रिडचा समोरचा ३) टाकतील आणि पाठीमागेही अगदी ६ पर्यंत नेऊन जोरात चालवतील. . ह्यातून जी एनर्जी निर्माण होते ती तुला खरे तर ३० पेक्षा जास्त स्पीडने नेऊ शकते. पण आपल्याला त्याची सवय नसते आणि कसे जायचे हे माहितीही नसते. आणि ती सर्व एनर्जी वाया जाते.

आता हेच सर्व ( म्हणजे ३० ची स्पीड) अचिव्ह करण्यासाठी तू इनफॅक्ट दोन कॉम्बो वापरू शकतोस. आणि मी हे उदाहरण पटवून देण्यासाठी आपण केडन्स हा फिक्स ठेवू. म्हणजे समजा तू ८० च्या केडन्सनीच चालवतोयस.

तर

केडन्स ८० - नो चेंज

पुढची रिंग ५० (म्हणजे गिअर ३) आणि मागची रिंग १६ (म्हणजे बहुदा ४/५) ह्यानेही ३० किमीची स्पिड साधता येईल.
आणि पुढची रिंग ३४ ( म्हणजे गिअर २ ) आणि मागची रिंग १२ (म्हणजे ७ ) ह्यानेही ३० किमीची स्पिड साधता येईल.

थोडक्यात काय केडन्स मुळे नाहीतर गिअर रेशोमुळे आपण हे साध्य करू शकतो. हा चार्ट बघ.

Gear_selection.JPG

थोडक्यात तू २ - ६/७ ने जर चालविली तर कदाचित कमी दमशील आणि ३-५ ने चालविलीतर जास्त दमशील.

प्लिज डोन्ट माईंड माय पोस्ट -
३ ने चालविली म्हणजेच फास्ट हे कॉम्बो खूप लोकांच्या डोक्यात असते, पण खरे तसे नसते. म्हणून ही पोस्ट. ही स्वतःची हुशारी दाखविण्यासाठी नाही तर नॉलेज शेअर करण्यासाठी आहे.

मस्तच ! मजा आली ! मी मागच्या महिन्यात केरळ वारी करुन आलो, पण ट्रेनने ! अलेप्पी मुन्नार, गुरुवायुर्,आदी

अप्रतिम लेखमालिका. तुमच्या सर्व टीम चं कौतुक करावं तितकं कमी आहे.
लिहिण्याची शैली तुमची फार छान आहे. सहज गप्पा केल्यासारखे लिहीत आहात....सुरेख....

व्वा... त्या मुलाचे कौतुक वाटते, तो दिसतोयही छान स्मार्ट. नशिब काढेल.
मज्जा केलीत या टप्प्यात.. !

केदार, तुझी पोस्ट वाचली. समजुन घेतो आहे.
तूझे विश्लेषण तार्किक दृष्ट्या समजते/पटते आहे.
पण मी सध्या पुढील तिन गिअरचे व्हिल काढुन तिथे सिन्गल ५२ चे व्हिल बसवलय.
वीस वर्षांपूर्वीची आधीची बरीच वर्षे विदाऊट गिअरवरच चढ उतार चालविल्याने केडन्स हा विषयच कधी डोक्यात शिरला नाही. सगळा ताकदीचाच मामला होता तेव्हा. सातारा एस्टीस्टॅन्ड ते बोगदा दरम्यानचे सर्व चढ मी २४" सायकलवरुन सीटवरुन नळीवर न येताही पण मग हॅन्डल बार खेचत खेचत सहज चढवायचो. त्यामुळे एकच झाले की दन्डाच्या गोट्या जबरदस्त तयार झाल्या. अगदी जिम मधे जाउन व्यायाम केल्यासारख्या.

या सवईमुळे व दम्याच्या त्रासामुळे आत्ताही, कोणत्याही गिअर कॉम्बिनेशनमधे पेडलिन्गचा वेग वाढवला (हाय केडन्स??) तर मला तत्काळ दमायला होते, म्हणुन मग पुढे मोठे मागे छोट्यात छोटे असे कॉम्बिनेशन आवडते. अर्थात पुढे मोठे व मागे जितके छोटे व्हिल निवडु तेव्हा ताकद जास्त लागते हे मान्य. शिवाय पूर्वीचे सर्व सायकलिन्ग हे जास्त वेगापेक्षाही (किंवा अगदी किमान वेगाची मर्यादा वगैरे पाळत करण्या ऐवजी) जास्तीत जास्त अंतर भरपूर वजन घेऊन पार करणे इतक्याच उद्देशाने झाले होते, सबब वेग वाढविण्याची टेक्निक्स तेव्हा विचारातच घेतली नव्हती व बिनागिअरच्या त्या सायकलला ते शक्यही नव्हते, पण तेव्हाही माहित होतेच की मागिल फ्रीव्हील लहान असेल तर वेग जास्त मिळेल. (अर्थात त्याकाळी पुढे जास्त दात्यांचे व मागिल कमी दात्यांचे व्हिल मिळवणेही कर्मकठीण होते, सबब तो प्रयोग तेव्हा केला गेलाच नाही)

तसेच मागे तूच सांगितल्याप्रमाणे, पुढे मोठे व मागेही थोडे मोठेच व्हिल घेऊन सपाट/थोड्या चढाच्या रस्त्यावर प्रयोग करुन बघितल्यावर ३० चा स्पीड आरामात मिळतो असे लक्षात आले, फक्त स्टॅमिना वाढवायला हवाय कारण मी फार लौकर दमतो.

सपाट रस्त्यावर मागिल बाजुचे मोठे व्हिल व चढावर छोटे असे कॉम्बिनेशन सध्या ठेवतो आहे. बघु. हळू हळू वेगवेगळ्या रस्त्यांवरील सरावाने गिअर वापरण्याचा नेमका अंदाज येईल. अजुन कात्रज/सिंहगडा सारखे चढ राहुदेच, देहू-कात्रज बायपासवरील चढही आजमावले नाहीयेत. (वेळच झाला नाहीये, अन वेळ झाला तर तब्येतीचा नेहेमीचा लोचा आहेच, असो.)
तुझे विश्लेषण उपयोगी पडेल.

हाही भाग मस्त. बिहारी कुठेही धंदा करून सर्वाइव होऊ शकतात.
आपल्या कविता अश्या वेळी ऐकवायच्या की कुणी नक्कीच पळून तरी जाऊ शकत नाहीत. छान आय्ड्या! Light 1

मस्त भाग ! फळ भारी दिसताहेत एकदम.

हे नाही पटलं फक्त :

इथे मराठी माणूस असता तर काय केले असते देव जाणे. कदाचित, रोजच्या इडली डोश्याला कंटाळून केव्हाचाच गड्या आपला गाव बरा करत परत गेला असता... >>>>> अगदी सगळेच जणं सायकलवरून आइस्क्रीम विकण्यासारखं काम करत नसतील. पण इडली डोश्याला किंवा स्थानिक गोष्टींना न कंटाळता देशात, परदेशात कितीतरी मराठी मंडळी आहेत की कामानिमित्ताने गेलेली. परदेशाचं उदाहरण घ्यायचं तर अनेक मराठी मंडळी अत्यंत प्रतिकुल परिस्थितही अनेक वर्षांपासून रहात आहेत. त्यामुळे हे जनरलायझेशन उगीच वाटलं!

केदार तुझी पोस्ट पटली. दुसऱ्या गियरवर अर्थातच तेवढा स्पीड घेता येतो, पण २-६ पेक्षा पुढे जायचे झाले तर मग २-७ किंवा २-८ पेक्षा ३-५ कधीही चांगला कारण मग चेन क्रॉस होऊन त्यावर जास्त ताण येत नाही असे मी वाचलेले. आणि अगदी फ्लॅट रोडवर ३-५ हे मस्त कॉम्बो आहे. २-६ किंवा २-७ वर लईच गरागरा पॅडल मारावा लागतं.

सातारा एस्टीस्टॅन्ड ते बोगदा दरम्यानचे सर्व चढ मी २४" सायकलवरुन सीटवरुन नळीवर न येताही पण मग हॅन्डल बार खेचत खेचत सहज चढवायचो. त्यामुळे एकच झाले की दन्डाच्या गोट्या जबरदस्त तयार झाल्या. अगदी जिम मधे जाउन व्यायाम केल्यासारख्या. >>>>

लिंबुदा तुम्हाला साक्षात दंडवत....तुम्ही आद्य गुरु आहात सायकलिंगमधले.

पण मी सध्या पुढील तिन गिअरचे व्हिल काढुन तिथे सिन्गल ५२ चे व्हिल बसवलय.
>>>

तुमची सायकल एकदा बघायचीच आहे मला...फार वर्णन ऐकले आहे. एकदा दर्शन पण घडू द्याच.

पराग - चच्चच, तुम्ही चुकीच्या अर्थाने घेताय. मला फक्त एवढेच म्हणायचे होते, कुठल्याही राज्यात जाऊन पडेल ते काम-धंदा करायला मराठी माणूस फार तयार नसतो. जॉबसाठी दुसरीकडे जाऊन स्थायिक होणे वेगळे आणि कशाची शाश्वती नसताना हा असा धंदा करणे वेगळे. किती मराठी मुले बाहेरच्या राज्यात जाऊन लॉँड्री, किराणा किंवा असा रस्त्यावर माल विकण्याचा धंदा करतील अशा संदर्भात म्हणले आहे.

आणि परदेशात किती मराठी लोक आहेत याची साक्ष मायबोलीच देते आहे की.

मुलींच्या थिअरीला अनुमोदन.. ही थिअरी सुसाट गँगला सांगितली असतीस तरी त्यांची मागे रहाण्यासाठी धडपड सुरु झाली असती!
अशोककाका, केदार, लिंबुदा यांच्याही पोस्ट्स +१११

ही थिअरी सुसाट गँगला सांगितली असतीस तरी त्यांची मागे रहाण्यासाठी धडपड सुरु झाली असती! >>>

आणि मी राहु दिले असते होय... Happy

खुपच छान झाला आहे हा भाग Happy कष्टाच्या मोहीमेवर असताना असे विरंगुळ्याचे दिवस खुप ऊर्जा देत असतील.
त्या बिहारी मुलाचं खुपच कौतुक वाटतंय. पोरगेल्या वयात घरापासून इतक्या लांब परमुलुखात जाऊन इतकी मेहनत _/\_ किती हसरा आहे तो Happy

किती सुंदर चालू आहे तुझी मालिका.. लेखन आणि फोटोज दोन्हीपण भारी असतं तुझं Happy

Pages