पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस 10 कोची - पाहुणचार

Submitted by आशुचँप on 6 June, 2015 - 17:47

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ७ पय्यानुर

http://www.maayboli.com/node/54041 - दिवस ८ कोईकोडे

http://www.maayboli.com/node/54080 - दिवस ९ गुरुवायुर

=======================================================================

पहाटे कधीतरी जाग आली ती लान्सच्या खुडबुड करण्यामुळे. इतक्या पहाटे याचे काय चाललेय म्हणून डोळे उघडून पाहिले तर महाराज आंघोळ वगैरे करून तयार...

"अबे, इतक्या पहाटे निघायचे ठरलेय का आपले...?"

"नाही, आपण नेहमीच्याच वेळी निघतोय, पण आत्ता दर्शनाला गर्दी अजिबात नसेल, त्यामुळे मी आणि बाबुभाई चाललोय. येताय का कुणी...".

मी त्याला पडल्या पडल्याच हात जोडले, म्हणलं माझ्यातर्फे पण एक नमस्कार घाल...आणि झोपू दे मला....फारच उत्साही लोक आहेत रे बाबा...

परत दर्शन घेऊन आले तेव्हाही आम्ही ढाराढूरच होतो. पण मग उठून आवरणे भाग होते. पण घाई कसलीच नव्हती. आजचा दिवस म्हणजे आनंदी आनंद गडे होता. कारण, आज फक्त ८९ किमी अंतर पार करायचे होते.

रोज १००-१२५ कधीकधी १४५ किमी अंतर पार करत असल्यामुळे आजचे ८९ किमी म्हणजे अक्षरश सुखद प्रकार होता. त्यातून मणिकांचन, दुधात साखर आदी अादी वाटले जेव्हा बाहेर आलो. रात्री झकास पाऊस झाला होता आणि सकाळी सकाळी देखील थोडी बुरबुर सुरुच होती त्यामुळे कधी नव्हे ते वातावरणात जरा गारवा (पावसाळ्यात मुंबईमध्ये असतो तितकाच...पुण्याइतका नव्हे) आला होता. आहाहा, कम्माल सुख वाटत होते.

अंतर कमी, वातावरण इतके आल्हाददायक आणि आजच्या रस्त्यावर चढ-उतारही नव्हते फारसे...बास आख्या ट्रीपमध्ये बेस्ट दिवस कुठला असेल तर तो आजच असेही वाटायला लागले. पण आयुष्य आणि मोहीम ही अपेक्षाभंग करण्यात किती पटाईत असते याचा अनुभव अजून यायचा होता.

तत्पूर्वी, मी कालचा राग विसरलो नव्हतो आणि चेकआउट करताना मॅनेजर कडे कंप्लेट बुक मागवली आणि त्यात अगदी पानभरून इथले लोक कसे माजोरी आहेत, व्यवस्था किती खराब आहे, पुन्हा इथे यायची इच्छा नाही असे भरभरून लिहीत गेलो. शेवटी घाटपांडे काकांनी "अरे, कळली त्यांना त्यांची चूक, आता पुन्हा नाही करणार", असे लहान मुलाला समजावतात तसे समजावून बाहेर काढले. Happy

सर्वान्ना भवनने काल निराशा केलीच होती, त्यामुळे नाष्टा आत्ताच न करता पुढे जाऊन करावा असा विचार केला आणि पुढे निघालो. अरे अजून एक सांगायचेच राहीले, आज एक तिढा आमच्यासमोर उभा राहीला होता. आज नेमका गुरुवायुरमध्ये हत्तींचा उत्सव होता. वेगवेगळ्या ठिकाणचे हत्ती आज या ठिकाणी येणार होते, त्यांची मिरवणूक वगैरे निघणार होती. एकंदरीत मोठा प्रकार होता. त्यामुळे गुरुवायुर सोडताना जाम हळहळ वाटली. पण उत्सवासाठी थांबणे शक्यच नव्हते. आमची मोहीम इतकी काटेकोर आखली होती की त्यात मॉ़डीफिकेशनला फारसा वावच नव्हता. त्यामुळे उत्सवाला थांबायचे तर टेंपोत सायकली टाकून रात्री कोची गाठायचे असा एक पर्याय आला, पण तो मनाला पटेना. मध्येच सायकली टेंपोनी टाकून नेल्या असत्या तर मग सायकल मोहीमेला काय अर्थ राहीला असता. हत्तींच्या उत्सवाला पुन्हा कधीतरी येणे शक्य होते, पण पुन्हा याच मार्गावरून सायकल मोहीम नेणे शक्य नव्हते, त्यामुळे उदास मनाने गुरुवायुरला बाय बाय करून पुढे निघालो.

वाटेत हे असे हत्ती गुरुवायुरच्या दिशेनी जाताना दिसत होते त्यामुळे अधिकच वाईट वाटत होते.

एका बागेत हे शिल्प दिसले...काय होते नक्की कळले नाही पण भारी होते.

वाटेत आम्हाला एकाने अडवून प्रश्न विचारायला सुरुवात केली. कोण, कुठले, कुठे चालला. नंतर कळले तो एक मुंबईचा ब्लॉगर होता. मुळचा तिथलाच पण कामानिमित्त मुंबई. त्याने मग आमचे फोटो वगैरे काढले आणि बरेच तपशील विचारले.

गावाच्या बाहेर पडलो आणि इतके झ्याक वातावरण होते की बास. मी जाम म्हणजे जामच प्रेमात पडलो केरळच्या. इतके सगळीकडे फिरलो पण केरळातल्या निसर्गसौंर्दयाला तोड नाही. मस्त रस्ते, गच्च झाडींचे आच्छादन, त्यातून वाहणारे संथ बॅकवॉटर, कमानदार पूल. मी त्याच वेळी ठरवून टाकले. पुढच्या वेळी सायकल घेऊन फक्त केरळ फिरायचे. बाकी काही नाही. गॉड्स ओन कंट्रीनेे अक्षरश वेड लावले. आणि व्यंकटेश माडगूळकर म्हणतात तसे, की एखाद्या उत्तम नाटकाला जाऊन फक्त पाच दहा मिनिटेच बघायला मिळाल्यानंतर जी हळहळ वाटते, तसे काहीसे वाटत होते.

आणि आज पहिल्यांदा मामांची सूचना अव्हेरून हेडफोन्स कानात अडकवले. आणि पहिलेच गाणे लागले ते जादू है नशा है...
एम.एम. क्रीमचे नशिले संगित आणि त्यावर श्रेया घोषालचा तितकाच काळजात रुतणारा आवाज...काय अप्रतिम कॉम्बो. आणि त्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर तो अधिकच खुलुन येत होता.

अशाच जादुभरी वातावरणात पॅडल मारत राहीलो आणि त्यामुळे आजूबाजूला फारसे लक्ष नव्हतेच. पण १५-२० किमी नंतर लक्षात यायला लागले की काहीतरी गडबड आहे बॉस. अजूनही एकही दुकान उघडले नव्हते, रस्त्यावर माणसेही फारशी दिसत नव्हती. किती हे लोक निवांत आहेत असा मनात विचार येत होताच पण सगळीच्या सगळी दुकाने कशी काय बंद असा कीडा डोक्यात येतच होता.

साधारणपणे २० एक किमी झाले की नाष्टा करायचा प्रघात पडला होता, त्या सवयीनुसार पोटाने भूक लागल्याची घंटा वाजवायला सुरुवात केली. पण एकही दुकान मिळेना. बर पाणी पण आम्ही दुकानात भरून घेत असल्यामुळे जवळ घोटभरच पाणी होते.

जसेजसे पुढे जाऊ लागलो तसे रस्त्यात माणसांचे घोळके दिसले पण दुकाने कडेकोट बंद मग लक्षात आले नक्कीच काहीतरी लफडा आहे. एका ठिकाणी थांबून विचारले, आणि कळले की रात्री कुठल्यातरी स्थानिक कम्युनिस्ट नेत्याची हत्या झाली होती आणि त्याच्या निषेधार्थ सगळी दुकाने बंद आहेत.

अरे देवा, आता हा बंद कुठपर्यंत असेल असे विचारले तेव्हा कळले की पुढच्या जिल्हयापर्यत तरी नक्कीच. म्हणजे कीती किमी तर किमान ५०-६०.

शप्पथ, आता म्हणजे वाट लागली. एकतर आदले दिवशीचे जेवण लवकर झालेले, सकाळची २० किमी ची राईड आण पोटात कडकडून आग पेटलेली आणि आता अजून ६० किमी काहीही खायला मिळणार नव्हते. भुकेचे तरी कसेबसे निभावले असते पण इतका कडक बंद म्हणजे पाणीही नाही. आणि आता सकाळची आल्हाददायक हवा जाऊन उन्हे वाढायला सुरुवात झाली होती. त्यामुळे पाण्याविना अजून ६० किमी जाणे म्हणजे डीहायड्रेशन होणार हे नक्कीच.

असे काही होईल याचा अंदाजच नसल्यामुळे काय करावे तेच सुचेना. तसेच मग पुढे जात राहीलो. पुढे अनेक हॉटेल दिसत राहीली पण सगळी बंद. मनाचे कसे असते बघा, मिळणार नाही म्हणल्यावर जास्त त्याची गरज वाटू लागते. एकादशीला जशी जास्त भूक लागल्यासारखी वाटते तसेच.

पण दैव आमच्यावर मेहरेबान होते बहुदा. कारण थोडे पुढे गेलो तेव्हा वेदांग आणि लान्स एका हॉटेलसमोर थांबलेले दिसले.

"चला, पटकन इथे आपल्याला मिळेल खायला..."

"कसे काय,"

तर त्या हॉटेल मालकाने आम्हाला पाहिले आणि बहुदा त्याच्या लक्षात आले असावे की आम्हाला काहीच मिळाले नसणार खायला म्हणून. त्याने शटर अर्धवट उघडले आणि सायकली बाजूला लाऊन पटापटा आत जाऊन बसलो. त्याने शटर पुन्हा ओढून घेतले.

"ओन्ली डोसा मिलेगा..".

म्हणलं, बाबा रे डोसा तर डोसा आणि पटापटा. मग प्रत्येकी दोन दोन असे डोसे हाणले वर कॉफी. दरम्यान, घाटपांडे काकांनी पुढची सोय म्हणून केक, क्रिमची बिस्किटे असा कोरडा शिधा घेऊन ठेवला आणि पाण्याच्या बाटल्या भरून शिवाय जास्तीच्या एक एक अश्या सामानात भरल्या. त्या हॉटेल मालकाना मनापासून धन्यवाद देत भरल्या पोटाने आम्ही मार्गक्रमण सुरु केले.

कोडूनगुल्लर (kodungallur) नंतर पेरीयार नदी पार करून पलिकडे गेलो आणि संपाचा प्रभाव संपला. इथे सगळी दुकाने व्यवस्थित सुरु होती. पण मध्ये नाष्टा आणि पाणी मिळाला नसता तर अन्वनित हाल झाले असते. पण सुदैवाने तसे काही झाले नाही..

खाणे पिणे मिळाल्यामुळे आम्ही मग पुन्हा एकदा माणसात आलो आणि मी, बाबुभाई वात्रट माणसांत Happy

दरम्यान, काही स्थानिकांशी संवाद साधला आणि त्यांना मोहीमेची माहीती दिली. या भागात लोकांना जाम कुतुहल असल्याचे जाणवत होते त्यामुळे आम्हीही कसर सोडली नाही आणि इत्यंभूत वर्णन केले. (थोडे इंग्लिश आणि हिंदी..चक्क काही जण हिंदीमध्ये बोलत होते...हा एक सुखद धक्काच होता).

सर्व फोटो @ वेदांग

पण हॉटेलचा एक निराळाच वैताग होता. ते एक लिहायचे राहून गेलेच होते. केरळ लागल्यापासून कुठल्याही हॉटेलमध्ये गेले की प्यायला गरमागरम उकळते पाणी. आधी मला वाटले की ते फिंगर बाऊल साठी आहे का काय. म्हणले खायच्या आधीच कसे काय. आणि त्यातून पाण्याचा रंग जांभळसर. म्हणलं हा काय प्रकार आहे भेंडी.

नंतर नंतर जवळपास प्रत्येक हॉटेलमध्ये हेच. दुपारचे कडकडीत तापून हॉटेलात जायचो आणि स्वागताला हे पाणी. शेवटी शंकानिरसन करून घेतले तेव्हा कळले की इथे खराब पाण्यामुळे वा समुद्राच्या जड पाण्यामुळे लोकांची पोटे बिघडतात त्यामुळे शासनाने सर्व हॉटेलला हे सक्तीचे केले आहे.

असेही कितीही थंड पाणी प्यालो तर तहान भागायचीच नाही म्हणून एकदा प्रयोग करायला म्हणून ते गरमागरम पाणी चहा पितात तसे फुंकुन फुंकुन प्यालो. बरे वाटले. घामाच्या धारा वाहतच होत्या त्यात अजून दोन चार ची भर पडली पण घशाला खरेच बरे वाटले आणि नतर नंतर मग तेच गरम पाणी प्यायला लागलो.

अर्थात ते बाटलीमध्ये भरणे शक्यच नव्हते. कारण फ्रिजमधले पाणी भरले तरी ते अर्ध्या तासात उकळण्याच्या तापमानाला यायचे. त्यावर अनेक प्रयोग करून झाले. कपड्यांच्या घड्यांमध्ये बाटली ठेवायची की ती फार गरम व्हायची नाही. किंवा त्याला वरून ओले फडके गुंडाळायचे. पण त्यापेक्षा सोप्पा उपाय म्हणजे सगळ्यात मिळून दोन चार बाटल्या घ्याययच्या. त्या अर्ध्या अर्ध्या भरल्या की पुढे निघायचे. संपल्या की थांबून पुन्हा भरून घ्यायच्या. अन्यथा प्लॅस्टिक बाटल्यात उकळून निघालेले पाणी पिणे सर्वथा अशक्य व्हायचे.

पुढे कक्कनाडपाशी अजून एक व्यक्ती भेटली. राजकारणात असणार हे निश्चित..एकदंर थाट तसाच होता. त्याने थांबवून आम्हाला कलिंगड ज्यूस पाजला आणि सगळी माहीती घेतली. तहान तर लागलेलीच होती त्यामुळे हावरटासारखे ते सरबत डबल डबल प्यालो आणि पैसे द्यायला गेलो तर देऊच दिले नाहीत. तुम्ही आमचे पाहुणे आहात, तुम्ही द्यायचे नाहीत म्हणत.

फोटो @ वेदांग

अरे वा, केरळी पाहुणाचाराचा अनुभव पहिल्यांदाच येत होता. बर फक्त आम्हालाच नव्हे तर आम्ही पुढे निघून गेल्यावर नंतर बऱ्याच मागाहून आलेल्या घाटपांडे काका आणि युडींनाही थांबवून आग्रहाने सरबत पाजले.

दरम्यान, घाटपांडे काकांना एक अजून एक भारी गंमत बघायला मिळाली. ही एक अजीबोगरीब सायकल...म्हणलं तर लहान मुलांची. पण एक बाप्याच चालवत होता. आणि मागे एवढे जाड आणि पुढे इतके पातळ टायर लावून कसे काय गणित जमत होते ते कळले नाही. प्रत्यक्ष भेटला असता तर चालवून पाहीली असती निश्चित

आज तसे बाकीचे काहीच घडले नाही आणि सरळ रस्ता असल्यामुळे मस्त वेग पकडत एर्नाकुलम गाठले. पण इथून जे काही तुफान ट्रॅफिक लागला रे बाबा. एकतर कडक उन्हाची वेळ आणि त्यातून पुण्यात पेठेतून चालल्यासारखे ट्रॅफिक. जीव अगदी नको नकोसा झाला. रस्ते छान ऐसपैस होते पण भरमसाठ गाड्यांमुळे काहीही उपयोग नव्हता आणि सकाळपासून छानपैकी आलेलो आम्ही मुंगीच्या गतीने पुढे सरकत राहीलो. ते एक पाच दहा किमी आत्तापर्यंत दृष्ट लागाव्या अशा प्रवासाला चांगलीच नजर लावणारे होते. शेवटी कसेबसे दुपारी दोनच्या सुमारास कोची गाठले.

कोचीची ओळख असलेले चायनिज फिशनेट्स. अर्थात हे सूर्यास्ताला जास्त मनोहारी वाटतात. पण तेवढा वेळ आमच्याकडे नव्हता

सुदैवाने यावेळी आमचे हॉटेल शहरात नसून अगदी हायवेनजिकच होते. पण तेही सापडताना थोडी चुकामुक झालीच पण पहिल्यांदाच इतक्या लवकर पोहचल्यामुळे खूपच बरे वाटत होते. त्यामुळे सुहृदची भुणभुण सुरु झाली होती की आलोच आहोत तर कोचीचे क्रिकेट स्टेडीयम पाहुया. मी क्रीडापत्रकार असल्यामुळे मी नक्कीच त्याला साथ देईन असे वाटले होते पण मला अजिबात इच्छा नव्हती. पुढेमागे एखादी मॅच बघायला गेलोच असतो, त्यामुळे आत्ता रिक्कामे स्टेडीयम..ते देखील मॅच चालू नसेल तर आत सोडतील यावर माझा विश्वास नव्हता त्यामुळे मी त्याचा हिरेमोड केला आणि खोलीत गेलो, छानपैकी एसी लावला आणि जे काही पडी टाकली ती संध्याकाळपर्यंत.

गेले कितीतरी दिवस दिवस सायकल चालवल्यामुळे आजचा दिवस खास विश्रांतीचा होता आणि त्याचा पूरेपूर फायदा उठवला. संध्याकाळी जाग आली ती भुकेनी गुरगुरल्यामुळे. हायवे नजिकचे हॉटेल असले तरी व्यवस्था अगदीच सुमार होती. म्हणजे खोल्या चांगल्या होत्या पण किचन डिपार्टमेंट अगदीच सुने सुने.

गेल्या गेल्या माशांचा हा तक्ता दिसला आणि लान्स, वेदांगनी नाक मुरडले. ते म्हणजे कट्टर शाकाहारी लोक्स.

मग मोडक्या तोडक्या हिंदीत संवाद साधल्यावर खायला आत्ता फक्त केळा भजी मिळतील असे कळले. म्हणलं ते तर द्या पुढचे पुढे बघु. आणि तब्बल अर्धा तास वाट पाहिल्यावर समोर जो काही प्रकार आला तो फारच भयानक होता. तळून म्हणजे अक्षरश तेलात बुडवून आणलेली ती भजी होती. त्यावरचे तेल पाहून त्यात अजून एक डझन भजी तळली जातील असे वाटून गेले. मग बाजूला पडलेले वर्तमानपत्र घेऊन त्यावरचे तेल निपटून कसेतरी खाणेबल गेले. पहिला घास घेतला आणि पश्चाताप झाला. मिरची आणि मूग भजी खाणाऱ्या माणसाला हे असले गोडसर भजे खाणे म्हणजे श्रीखंडावर फोडणी टाकल्यासारखे वाटत होते. पण भूक तर प्रचंड लागली होती त्यामुळे फार चोचले न करता कसे बसे ते प्रकरण संपवले. पण रात्रीच्या जेवणाला बाहेर काहीतरी सोय बघावी लागणार हे निश्चित झाले.

संध्याकाळी मग पुन्हा एकदा धोबीघाट काढला आणि यच्चयावत कपडे धुवून वाळत घातले. रात्री मग हॉटेल शोध मोहीमेवर निघालो. हायवेवर चांगली हॉटेल मिळणेच अवघड होते त्यातून मिश्राहारी हॉटेल चालण्यासारखे नव्हते. आता केरळात शुद्ध शाकाहारी हॉटेल मिळणे हा एक अवघडच प्रकार होता. पण विचारपुसीनंतर कळले एक दीड किमी अंतरावर एक शाकाहारी हॉटेल आहे. इतक्या लांब चालत जायचा कंटाळा आला होता पण काहींना सुदैवाने शेअर रिक्षा मिळाली आणि मी, घाटपांडे काका आदी चालतच निघालो. एक लांबलचक ब्रिज पार करून चालत चालत हॉटेलपाशी पोचलो आणि आल्याचे सार्थक झाले. उत्तम जेवण मिळाले वर स्वीट डीशपण. येतानाही मग पाय मोकळे करायला चालतच निघालो.

सातत्याने पॅडलींग करत असल्यामुळे चालायला त्रास होईल असे वाटत होते पण झाले उलटेच. वेगळे मसल्स काम करायला लागल्यामुळे पाय खरेच कंफर्ट लेवलला आले. ब्रिजच्या बाजूला कसला तरी उत्सव सुरु होता आणि त्याची आतिषबाजी चालू होती म्हणून उत्सुकतेनी बघायला थांबलो तर इतका पुळचट प्रकार होता. आणि ते बघायला ही गर्दी. पार गाड्या वगैरे थांबवून लोक डोळे भरून ते बघत होते. एकंदरीत इथल्या लोकांच्या मनोरंजनाच्या कल्पनेबद्दल सांशकता आली.

असो, पुन्हा येऊन गपगार झोपलो. आता मोहीम अखेरच्या टप्प्यात आली होती म्हणायला हरकत नव्हती. उद्या चावरा, परवा थिरूवनंतपुरम आणि तिसऱ्या दिवशी आम्ही कन्याकुमारी गाठणार होतो.

दरम्यान, सॅडल सोअरला आम्ही सरावलो असलो तरी एक नविनच प्रकार सुरु झाला होता. सातत्याने हँडल धरून धरून हाताला बधीरपणा येऊ लागला होता आणि तो टिकून राहत होता. माझ्या उजव्या हाताच्या करंगळीला जास्त त्रास होता कारण ती इतकी बधीर व्हायची की नंतर कितीतरी वेळ हाताची हालचाल करणे अवघड व्हायचे. सगळ्यांचा त्यांच्या त्याच्या ग्रीप धरण्याच्या पद्धतीप्रमाणे कमी जास्त प्रमाणात हाच त्रास होत होता. पण इतकाही मोठा नसल्यामुळे त्याबाबत फार विचार करण्याची गरज नव्हती.

कसले भारी वाटतेय असा सरळसोट ग्राफ बघून...फुल्ल टू वसूल Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वाह व्वाह.. मस्त.. आम्हाला पण हायसे वाटले तुम्हाला जास्त त्रास पडला नाही म्ह्णून.....
नेहमीप्रमाणेच मस्त वर्णन.

वाह, मस्त हा भाग पण.
ती वरची जाड चाकाची सायकल आहे ना तसल्या चाकाच्या सायकली मी इथे पण बघितल्या आहेत. उदा: http://surlybikes.com/bikes/moonlander हे बघ.

बाकी केरळचे अनुभव भारीत मिळत आहेत तुम्हाला.

आशुचँप,

हापण भाग मस्त झालाय. देवभूमीबद्दल ऐकून होतो. खरंच एव्हढी वेड लावण्याजोगी आहे हे एका किल्लाप्रेमीच्या तोंडून ऐकल्यावर आता खात्री पटली आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

धन्यवाद सर्वांना...

आम्हाला पण हायसे वाटले तुम्हाला जास्त त्रास पडला नाही म्ह्णून.....
>>> Happy Happy

टण्या - कैच्याकै सायकली आहेत...पण दोन्ही चाकांना एकाच जाडीचे टायर्स आहेत. या बाबानी मागे इतके जाड आणि पुढे इतके बारीक काय म्हणून बसवले असेल याचे राहून राहून आश्चर्य वाटते. विचित्र वाटत असणार जाम.

खरंच एव्हढी वेड लावण्याजोगी आहे हे एका किल्लाप्रेमीच्या तोंडून ऐकल्यावर आता खात्री पटली आहे >>>

तरी आम्हाला एक टक्काच जेमतेम बघायला मिळाली. बघुया योग आला तर खरेच एखादेवेळी फक्त केरळ सायकल भ्रमंती करायला मिळेल. त्यावेळी मग खराखुरा स्वर्गानुभव घेता येईल...

आणि केरळ म्हणजे देवभूमी नव्हे.
देवभूमी म्हणजे हिमाचल प्रदेश...याचे मराठीत पण गॉड्स ओन कंट्री..म्हणजे देवांचे स्वतचे राष्ट्र असे काहीसे म्हणता येईल Happy

एर्नाकुलमला दुरांतोने जाताना गाडीभर "बळंबोळी" अशी अगम्य हाळी देत फेरीवाले फिरत होते. औत्सुक्य होते पण ट्रेनमध्ये फेरीवाल्याकडे खाणे टाळले आणि नंतर रस्त्याने फिरताना एका हॉटेलमध्ये नाश्त्याला मागवली. ओह गॉड! अगदीच भ्रमनिरास झालेला!! Happy

सायकल सफर अगदी मस्त चाललीय!!

>>>> मिरची आणि मूग भजी खाणाऱ्या माणसाला हे असले गोडसर भजे खाणे म्हणजे श्रीखंडावर फोडणी टाकल्यासारखे वाटत होते <<<<< Lol

कसले भारी वर्णन केले आहेस. सलग वाचून काढले.
त्या एका हॉटेलात खायला डोसे, प्यायला पाणी मिळाले ते नशीब. नैतर फार हाल झाले असते. सगळ्यात शेवटी रस्त्या कडेचे घर/झोपडी शोधावी लागली असती. ती सापडली तरी भाषेची अडचणच.

धन्यवाद सर्वांना....

बळंबोळी - नाव तरी भारी वाटतेय...होते काय नक्की ते...हेच केळ्याची भजी का...

धन्यवाद दिनेशदा, सुरेख, मीत आणि इंद्रा

सगळ्यात शेवटी रस्त्या कडेचे घर/झोपडी शोधावी लागली असती. ती सापडली तरी भाषेची अडचणच.

हो असेच काहीसे करावे लागणार असे वाटत होते. भाषेचे काय आता जीव व्याकुळल्यावर हावभावांनीच काम भागवून नेले असते... प्रसंग बाका होता, निभावून गेलो खरे.

बाबारे, मी बेंगलोरला दोन दिवसांकरता जाणार आहे तर कन्नड भाषाविषयक तिन अ‍ॅप घेतली आहेत. हल्ली अडचण पडू नये.
तुझ्या बाबांना वाचायला देतोस ना हे? काय प्रतिक्रिया त्यांची?
त्यांना म्हणांव, की त्यांच्या वेळच्या प्रवासाच्या ज्या काही आठवणि असतील, कशाही क्रमाने, पण लिहून काढा, अन इथे द्या. त्यांच्यावेळची परिस्थिती किति प्रतिकूल होती तेही समजेल. शिवाय तेव्हाही असे उपक्रम करणारे होते हे माहित होईल. त्यांना लिहाच असे सांग.

अरे वा, केरळी पाहुणाचाराचा अनुभव पहिल्यांदाच येत होता. बर फक्त आम्हालाच नव्हे तर आम्ही पुढे निघून गेल्यावर नंतर बऱ्याच मागाहून आलेल्या घाटपांडे काका आणि युडींनाही थांबवून आग्रहाने सरबत पाजले. >>> अरे वा असे अनुभव आले की किती छान वाटत तेही तिकडचा बंद अनुभवल्या नंतर, नक्कीच त्या माणसालाही तुमच कौतुक वाट्ल असेल. Happy
बाकी लेख प्रचि मस्तच .

फोटो कम्म्माल सुंदर आहेत...

वर्णन अगदी डोळ्यासमोर उभं राहतंय...
पहिल्या दिवसापासून तुझ्याबरोबर आहोत आणि आता तीन दिवसांनी मीही कन्याकुमारीला पोचणार इतकं सुरेख लिहितो आहेस...

बळंबोळी - नाव तरी भारी वाटतेय...होते काय नक्की ते...हेच केळ्याची भजी का...>>>>
हो हो तीच ती केल्याची भजी! बळंबोळी काय विचारल्यावर ड्रायवरने केल्याची भजी सांगितली म्हणून वाटले व्वा! छान असेल! पण उफ्फ!

नाही वडीलांना अजून दिलेले नाही वाचायला. विचार आहे, की सगळी सिरीज झाली की एक प्रायोगिक तत्वावर मित्रमंडळी आणि घरच्यांसाठी काही प्रिंट काढून पुस्तकस्वरूपात प्रकाशित करावे.

बघुया कसे जमतेय ते.

त्यांच्या आठवणी मलाच लिहून काढाव्या लागतील. ते सांगा म्हणले की नाही सांगणार, विषय निघाला की एखादी आठवण सांगतात. पण कल्पना चांगली आहे.

नक्कीच त्या माणसालाही तुमच कौतुक वाट्ल असेल. >>>>

हो पुण्यापासून सायकली चालवत आल्याचे त्या माणसाला अपार कौतुक वाटत होते. आम्हाला वेळ असता तर घरीच घेऊन जायचा बेत होता. भारी होता तो.

पहिल्या दिवसापासून तुझ्याबरोबर आहोत आणि आता तीन दिवसांनी मीही कन्याकुमारीला पोचणार इतकं सुरेख लिहितो आहेस... >>>>>

धन्स रे... Happy

फारच सुंदर लेखमाला. सगळे भाग आवडले. इतके सुंदर अनुभव कथन केल्याबद्दल धन्यवाद. लेख वाचून मी स्वतः सायकलिंग करायला सुरुवात केलीये. कन्याकुमारी नाही पण नक्कीच निदान रत्नागिरी पर्यंत तरी नक्कीच जाईन.
Happy

अरे वाह, ये हुई ना बात....

फारच मस्त वाटले हा प्रतिसाद वाचून....

तुमच्या सायकलप्रवासाला मनापासून शुभेच्छा

प्रान्जल, झकास.... ऑल दी बेस्ट....
मी पण इथले सायकलिंगवरील लेख वाचूनच परत इमानेइतबारे सायकलिंगला सुरुवात केलीये.

>>>> नाही वडीलांना अजून दिलेले नाही वाचायला. विचार आहे, की सगळी सिरीज झाली की एक प्रायोगिक तत्वावर मित्रमंडळी आणि घरच्यांसाठी काही प्रिंट काढून पुस्तकस्वरूपात प्रकाशित करावे. <<<<
प्रायोगिक तत्वावर कशासाठी? प्रायोगिक तत्व इथे मायबोलीवर वापरुन झालेच की!
मला वाटते की तू गंभिरपणे मनावर घेऊन ह्या प्रवासवर्णनाचे फोटोसहितचे पुस्तक बनवावेसच. अन त्यातच सुरवातील पंचवीस/तीस वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या प्रवासाची पूर्वपिठिका मांडून मग अधेमधेही त्या त्या ठिकाणांपासचे त्यांचे अनुभव देत देत मजकुर भर देत लिहावा. याकरता तुला काही मदत लागली तर सांग.

आशीष जी , अतिशय उत्तम वर्णन! निव्वळ अप्रतिम डिटेल्स!! फोटो म्हणजे iceing ऑन द केक , केरळ अन आंध्र+तेलंगाणा मधे हिंदी बोलतात लोक तिकडे अतिरेकी भाषिक नसतो तो त्रास तमिलनाडु अन कर्नाटकात जास्त होतो मुळात केरळी बरेच बाहेर राहतात गल्फ मधे वगैरे त्यामुळे त्यांना हिंदी ला त्रास नसतो कमीतकमी मोठ्या टूरिस्ट डेस्टिनशन्स ला तरी नाहीच

मला वाटते की तू गंभिरपणे मनावर घेऊन ह्या प्रवासवर्णनाचे फोटोसहितचे पुस्तक बनवावेसच. अन त्यातच सुरवातील पंचवीस/तीस वर्षांपूर्वीच्या वडिलांच्या प्रवासाची पूर्वपिठिका मांडून मग अधेमधेही त्या त्या ठिकाणांपासचे त्यांचे अनुभव देत देत मजकुर भर देत लिहावा. याकरता तुला काही मदत लागली तर सांग. >>>>

विचार करतो यावर....काय झालेय की बाकीचे इतके महान लोक्स सायकलींग करत असताना आपणच आपले किती कौतुक करून घ्यायचे ही भावना मनात येते. इथे माबोवर अनुभव शेअर करणे वेगळे आणि पुस्तक छापायचे वेगळे....

आशीष जी , अतिशय उत्तम वर्णन! निव्वळ अप्रतिम डिटेल्स!! फोटो म्हणजे iceing ऑन द केक , केरळ अन आंध्र+तेलंगाणा मधे हिंदी बोलतात लोक तिकडे अतिरेकी भाषिक नसतो तो त्रास तमिलनाडु अन कर्नाटकात जास्त होतो मुळात केरळी बरेच बाहेर राहतात गल्फ मधे वगैरे त्यामुळे त्यांना हिंदी ला त्रास नसतो कमीतकमी मोठ्या टूरिस्ट डेस्टिनशन्स ला तरी नाहीच >>>>

कृपया मला जी वगैरे नका लाऊ...फार अवघडल्यासारखे वाटते.

बाकी तुमचे अगदी बरोबर आहे. तामिळनाडू पेक्षा केरळात हट्टी लोक कमी आहेत.

>>>> .काय झालेय की बाकीचे इतके महान लोक्स सायकलींग करत असताना आपणच आपले किती कौतुक करून घ्यायचे ही भावना मनात येते. <<<<
ही भावना मनात आणण्याचे कारण नाही. बाकीचे महान लोक्स आपआपल्या जागी सायकलिन्ग करत रहातील, पण ते लेखन करतीलच असे नाही.
सायकलिन्ग करुन शिवाय त्या अनुभवांचे लेखन करणे इतरांकरता महत्त्वाचे, त्यात स्वतःचे कौतुक करणे वगैरे टीका कोणी नतद्रष्टाने केली तर सरळ दुर्लक्ष करावे.
दुसरे असे की कन्याकुमारि नै तर मग काय उत्तर/दक्षिण धृवावर सायकलने जाऊन आल्यावर लिहावे असा नियम आहे का?
लिहायचे नाहीच असे ठरले असते तर अन म्हणून गोपाळ गोडसे नावाचा भटजी १८५७ च्या सुमारास जे पायी पायी फिरला, त्याचे वर्णन त्याने लिहुन ठेवले नसते, तर त्यावेळची परिस्थिती मराठी भाषेत सांगणारा दुसरा कोणता दस्त अस्तित्वात आहे? नशिब गोपाळ गोडसेना स्वतःचे कौतुक वगैरे भावना शिवल्या नाहीत.
तुम्ही काही एक जगावेगळे केले आहे, अनुभवले आहे, ते इतरांबरोबर माहिती स्वरुपात जरुर शेअर करा - वाटा, पुस्तक लिहा, लेक्चर्स द्या, स्लाईड शो करा.... का नये करू?
मी तुझ्या जागी असा प्रवास करुन आलेलो असतो तर कर्तव्य भावनेने ते नक्की केले असते.
नैतर काय whatsapp/facebook सारखे मिडीया फक्त बाष्कळ/पाचकळ/पानचट विनोद वाचण्याकरता तेव्हडेच वापरायचे का?
पुस्तके काय फक्त कोणत्यातरी शाळा/कॉलेजातून "लेखक" अशी पदवीप्राप्त लोकान्नीच लिहावीत असे आहे काय?
दरवेळेस जुगवुनच लिहावे काय? स्वानुभव लिहिले तर ते स्वतःचे कौतुकच, असे कशावरून? असो.
तू लिही, आहे ते लेख परत भर घालुन लिहून काढ. तसे केलेस तर फोटोसहितचे तुझे पुस्तक (उद्धव) ठाकरेंच्या गडकोटावरील फोटोंच्या पुस्तका इतकेच संग्रही होईल हे निश्चित.

Pages