पुणे ते कन्याकुमारी सायकल प्रवास - दिवस ९ गुरुवायुर - हत्तींच्या देशा

Submitted by आशुचँप on 29 May, 2015 - 18:28

http://www.maayboli.com/node/53152 - पूर्वार्ध

http://www.maayboli.com/node/53206 - दिवस १ कराड

http://www.maayboli.com/node/53235 - दिवस २ निप्पाणी

http://www.maayboli.com/node/53300 - दिवस ३ धारवाड

http://www.maayboli.com/node/53330 - दिवस ४ अंकोला

http://www.maayboli.com/node/53394 - दिवस ५ मारवंथे

http://www.maayboli.com/node/53751 - दिवस ६ मंगळुरु

http://www.maayboli.com/node/53944 - दिवस ७ पय्यानुर

http://www.maayboli.com/node/54041 - दिवस ८ कोईकोडे

=======================================================================

आजच्या दिवशीही एक सेंच्युरी राईड नशिबात होतीच. पण रोज मरे त्याला कोण रडे याप्रमाणे आता १०० किमी म्हणजे काही वाटेनासे झाले होते. उलट आज फक्त १०० च किमी जायचे आहेत अशी भावना सकाळी निघालो तेव्हा मनात होती.

कोईकोडेतून बाहेर पडून हायवेला लागेपर्यंतच रस्ता इतका झकास गुळगुळीत आणि सरळ होता की सुसाट स्पीडने तो १३ किमी चा पॅच संपवून हायवेला कधी लागलो ते कळलेच नाही. आणि हायवेला गेल्या गेल्या पुन्हा एकदा चढउतारांचे सत्र सुरु झाले. आणि २० एक किमी नंतर तर जो काही तुफान चढ सुरु झाला तो संपायचे नावच घेईना. पुन्हा एकदा घाटवाटांचा फील. बर चढ म्हणजे साधेसुधे नाहीत. डायरेक्ट आभाळातच जायचे आणि तो उतरतोय तोच पुढे वळून त्याच डोंगरावर गेल्यासारखे.

मागचा चढ बघा म्हणजे कळेल मी एवढा बारीक कसा झालो ते.... Happy
फोटो @ वेदांग

त्यामुळे सकाळचे चांगले अॅव्हरेज पडलेले अगदीच ढप्प झाले आणि जेमतेम १५-१६ च्या स्पीडने पुढे जात राहीलो. पण आज असेही वाटेत बघण्यासारखे काही नव्हते आणि अंतरही जेमेतम १०० होते त्यामुळे निवांत झाडाच्या सावलीत थांबत, टाईमपास करत जात होतो. फोटो काढायलाही मुबलक अवसर होता आणि तसे निसर्गसौंदर्यही.

फोटो @ वेदांग

गॉड्स ओन कंट्रीमध्ये आल्याची पुरेपूर साक्ष पटावी असे रस्ते होते. एकदम मस्त गुळगुळीत, बाजूला सुरेख झाडी. त्यामुळे त्रास असा काही होत नव्हता. पांथिरनकावू (Pantheerankavu), रामानट्टूकरा (Ramanattukara), चित्रमंगलम अश्या लंब्याचौड्या नावाची गावे पार करत करत मजेत चाललो होतो. तिरूरच्या पुढे भरतपुझा नदीच्या मुखापाशी एक लांबच्या लांब ब्रिज लागला. चमावतारम अय्यपा देवळाच्या बाजून जाणारा म्हणून ब्रिजचे नावपण चमवातरम ब्रिज.

फोटो @ वेदांग

एकदमच सिनीक लोकेशन. दोन्ही बाजूला विस्तिर्ण पात्र, त्यात हिरव्या पाचूसारखी दिसणारी बेटे, त्यावर स्वच्छंद विहार करणारे बगळे, स्टॉर्क आणि वाराही झकास. झाडीचा हिरवागर्द रंग, पाण्याचा निळसर, आकाशाचा फिकट निळा, त्यावर पांढऱ्या ढगांची स्केचेस, अधुनमधुन वीज लखलखावी तसा पक्ष्यांचा थवा उडत जात होता.

दोन दिशेला तोंड करून काय बघत होतो देव जाणे

फोटो @ ओंकार

कितीतरी वेळ आम्ही भान विसरून ते दृश्य बघत बसलो होतो. इतके दिवस ओझे बाळगून एसएलआर आणल्याचे आज खरे सार्थक होत होते. पण कितीही प्रयत्न केला तरी समोरची रंगसंगती म्हणावी तशी कॅमेरात कैद करताच येईना. त्यामुळे नाद सोडून दिला आणि डोळ्यांनीच ते सौदर्य पीत राहीलो ते भुकेनी गुरगुर करून जाणीव करून देई पर्यंत. आणि ब्रिज संपताच एक हॉटेल असल्याचे दिसले. एरवी आम्ही दुपारी हेवी जेवण करायचो नाही, सुस्ती येईल या भीतीने. पण आज अर्धेअधिक अंतर संपले होते आणि उरलेले अंतर सरळ रस्ता असल्याचे नकाशात दिसत होते. त्यामुळे मी अक्षरश सगळ्यांना भंडावून सोडत त्या हॉटेलमध्ये जायला भाग पाडले.

तिथे सायकली पार्क करत असताना धमाल आली. एक पोरगेलासा असा एक जण आला आणि काहीतरी अगम्य भाषेत बोलायला लागला. बर काही चौकशी करतोय म्हणावे तर स्वर म्हातारी उडता नयेची तिजला असा. त्याला कन्नडा इल्ले, मल्यालम इल्ला असे सांगून झाले, हातवारे करून सांगितले की बाबारे काही कळून नाही राहीले. तरी बाब्या काही थांबायला तयारच नाही. मग माझ्यातला वात्रट पोरगा जागा झाला. आणि त्याच्या मल्यालमला मी मराठीत उत्तरे द्यायला सुरुवात केली.

त्यामुळे पुढचे संभाषण हे असे झाले....

"ഐ ഹാവ് സൊ മണി പ്രോബ്ലെംസ്"

"होय रे पोरा, कळतय मला तुझं दुख, तुझे डोळेच सांगतायत बघ,"

നോ വാട്ട്‌ ടോ ദോ, ഐ ഡോണ്‍'ടി ഉണ്ടെര്സ്ടന്ദ്‌

"काय करणार आता, हे आयुष्यच असे आहे बघ. आपल्या हातात काही नाही.
(वरती हात करून) हे सगळे त्याच्या हातात"

"കാൻ യു ഹെല്പ് മി ഔട്ട്‌"

"केली असती रे तुला मदत, पण आता काय आम्ही आलो पुण्यावरून आणि जायचे कन्याकुमारीला. काय काय म्हणून ओझे वहायचे माणसाने.."

(आम्ही दोघे इतक्या गंभीरपणे बोलत असल्याचे पाहून आजूबाजूची एक दोन लोकंपण थांबून उत्सुकतेने ऐकायला लागली. त्यांना काय अर्थबोध झाला असेल तो अय्यपाच जाणे) Proud Proud

"ഐ അം ഇന് ഫിനഞ്ചിഅൽ റ്റ്രൗബ്ലെ"

"भूक तर मलापण लागलीये रे. काही पैसे वगैरे असतील तर बघ ना भाऊ". (डोळ्यात अगदी केविलवाणे भाव आणून, पोटावर हात मारून, पैशाची खूण केली)

एवढे झाल्यावर मग त्याला कळले की मीच त्याच्याकडे पैसे मागतोय आणि मग एकदमच पसार झाला.

कहर म्हणजे सुहृदला पण हे प्रकरण झेपले नाही. त्याने मला अगदी गंभीरपणे विचारले, काय म्हणत होता रे तो....आता बोला. Proud Proud

असो, भूक तर कडकडून लागलीच होती आणि बसायची व्यवस्था एकदम नामी होती.

त्यामुळे आख्ख्या प्रवासात पहिल्यांदाच आम्ही दुपारी भरपेट थाळी हाणली. वर आईसक्रीम खायची हुक्की आली. त्या मालकाला मोडके तोडके हिंदी येत होते त्यामुळे आईस्क्रीम कुठले आहे विचारल्यावर म्हणे हा सबकुछ मिलेगा.

मग आम्ही काय, एक मँगो, एक बटरस्कॉच असे सांगायला सुरुवात केली. सगळे ऐकून घेतले आणि सगळ्यांना एकच हे असे आईस्क्रीम आणून दिले.

फोटो @ वेदांग

मग आम्हाला कळले की सबकुछ मिलेगा म्हणजे सब को कुछ तो मिलेगा असावे. Proud Proud

भरल्या पोटानी पुढचा प्रवास सुरु केला आणि सुदैवाने पुढचा रस्ता बऱ्यापैकी सरळ होता. त्यामुळे सकाळचा वेग पुन्हा एकदा पकडता आला. त्याआधी चर्मावट्म जंक्शनपाशी एक तिढा उभा राहीला. तिथून गुरुवायूला जायला दोन रस्ते होते. एक मरनचेरी (maranchery) वरून आतून जाणारा आणि दुसरा पोन्नानी समुद्रकिनाऱ्यावरून जाणारा. चौकशी केली असता अातून जाणारा रस्ता कमी अंतराचा असला तरी बऱ्याच गावातून जातो आणि वेडावाकडा असल्याचे कळले त्यामुळे दुसऱ्या पर्यायाची निवड केली. आणि तो निर्णय चांगलाच ठरला. कारण किनाऱ्याच्या बाजूने चालवताना येणाऱ्या झुळकांमुळे सायकलींग थोडे सुखद झाले. आणि हायवे असल्यामुळे रस्त्याची कंडीशनही उत्तम होती.

नंतर मग पुढे वळून पुन्हा गुरुवायुरसाठी आत वळावे लागल्यानंतर जागोजागी रस्ते विचारत जाणे भाग पडले. आमचे हॉटेल प्रसिद्ध गुरुवायुर देवस्थानच्या अगदी बाजूला असे निवडले होते त्यामुळे गावात जाऊन ते शोधणे ही एक मोठी टास्क होती. पण अगदी त्या परिसरात जाऊनही ते सापडेना त्यामुळे वैताग येऊ लागला. त्यातून एलीट गुरुवायुर हॉटेलचा उच्चार न चुकता येलाईटा असा होत असल्याने आपण नक्की काय शोधतोय हेच कळेना.

एका दुकानात विचारले तेव्हा माझ्याबरोबर वेदांग होता. बाकीचे वेगवेगळ्या गल्यांमधून फिरत शोधत होते. त्यामाणसाने येस येस, गो स्ट्रेट आणि सुबुरु दुबुरु लेफ्ट असे सांगितले.
म्हणलं कम अगेन...
पुन्हा त्याच सुरात...गो स्ट्रेटा अँड सुबुरु दुबुरु लेफ्ट...

म्हणलं आधी स्ट्रेट तर जाऊ मग असेल कदाचित डावीकडे. आणि प्रत्यक्षात पुढे गेल्यानंतर ते सापडले ते उजवीकडे.

मग माझ्या लक्षात आले की सुबुरु दुबुरु लेफ्ट म्हणजे डावीकडे जाउ नका .... Proud Proud

हॉटेलचे नाव अगदी एलीट वगैरे असले तरी प्रत्यक्षात ते अगदीच सुमार दर्जाचे निघाले. रिसेप्शन तर इतके ऐटदार होते त्यामुळे खोल्यापण तशाच असतील असे वाटले होते. पण बहुदा सगळे पैसे रिसेप्शनच्याच सजावटीत संपल्यामुळे असेल कदाचित उरल्यासुरल्या रकमेतून कशातरी खोल्या बांधल्या होत्या. मारवंथेनंतर पुन्हा एकदा एक भीषण अनुभवाला तोंड द्यावे लागणार असे वाटायला लागले.

एका जेमतेम १० बाय १२ च्या खोलीत एक डबलबेड आणि बाथरूमच्या समोर ट्रेनचा बर्थ असतो त्या आकाराची एक कॉट. दुर्दैवाने नेमकी तीच माझ्या वाट्याला आली. बाथरुमचा दरवाजा त्या कॉटला इतका खेटून होता की जाताना येताना माझ्या अंगावरूनच पलिकडे जावे लागत होते. त्यात हाईट म्हणजे एक डायनिंग टेबल आणि त्यावर एक खोक्यात ठेवलेला टीव्हीपण होता.

म्हणलं मरूं दे एक रात्रच काढायची आहे, काढू कशीतरी आणि पटापटा आंघोळी उरकून गुरुवायुर देवळाकडे निघालो. सुदैवाने ते अगदी चालत जाण्याच्या अंतरावर होते. पण जाण्यापूर्वी लुंगी खरेदी आवश्यक होती. देवळात लुंगीशिवाय प्रवेश नव्हता. एरवी मी तीव्र नापसंती दर्शवली असती पण लुंगी खरेदी करण्याच मोह झालाच. खरेदी झाल्यानंतर भर रस्त्यात कपडे बदल करण्यापेक्षा दुकानातच करण्याचे ठरले आणि मग प्रत्येकाने आपापले डोके चालवून लुंगी नेसण्याचा प्रयत्न केला.

स्कर्ट, मिनिस्कर्ट, पैलवानी धोतर अशी नानाविधे रुपे ते लुंगीने घेतल्यानंतर मात्र दुकानदाराला राहवेना आणि शेवटी त्यानेच आम्हाला लुंग्या नेसवून दिल्या. (त्याला तोपर्यंत पैसेच दिले नव्हते, त्यामुळेही असेल कदाचित :P) आणि एकदम थाटातच देवळाकडे निघालो.

फोटो @ ओंकार

देश तैसा वेश म्हणतात ते अगदी खरेय. त्या लुंगीत इतके मोकळे ढाकळे वाटत होते की का म्हणून इथले लोक ने नेसत असतील त्याची प्रचिती आली. पुढचा सायकल प्रवासही लुंगी नेसून करावा का काय असाही एक विचार मनात आला.

देवळात गेलो आणि एका अतिप्रचंड रांगेने स्वागत केले. अर्धा किमी पसरलेली रांग पाहूनच पोटात गोळा आला आणि मी काही इतका वेळ उभा राहून दर्शन घेणार नाही असे जाहीर केले. पाठोपाठ बाबुभाई आणि वेदांगनेही माघार घेतली. मग बाकीचेही गळाले. मग आम्ही उगाचच इकडे तिकडे भटकत राहीलो. देवस्थानाच्या हत्तीचे फोटो काढले. हा हत्ती सुपरस्टारपेक्षा कमी नव्हता. नंतर आम्हाला आख्ख्या केरळभर याचे फोटो आणि पोस्टर दिसत राहीले.

वाईट म्हणजे आमच्या वाटेतच हे होते पण आम्हाला पत्ताच नव्हता आणि आता गुरुवायुरला आल्यावर पुन्हा तिकडे जाणे अशक्य होते. फार हळहळ झाली. मस्त हत्ती बघायला मिळाले असते.

वेदांगला म्हणले बाबारे इकडे तिकडे फिरू नकोस, लोकांमधून तुला ओळखून काढणे शक्य व्हायचे नाही Happy

तिथेच एका सांस्कृतिक कार्यक्रमाची तयारी चालली होती.

तिथल्याच एक उपहारगृहात गेलो आणि काहीतरी केरळीयन पदार्थ मागवायचे ठरले. पण वेटर जमातीची काय दुष्मनी होती ते कळेना. काहीही सांगितले तरी फक्त डोसाच आहे असे उत्तर यायचे. आजूबाजूला लोक काय काय चेपत होती आणि आम्हाला फक्त डोसाय. शेवटी मी त्याला बोलावून बाजूच्या टेबलवरचा पदार्थ द्या असे सांगितले तरी बधेनात. ओन्ली डोसायचा घोष कायचम ठेवला. म्हणलं, बहुदा बाहेरच्या लोकांना अलाऊड नसेल.

कहर म्हणजे रात्रीचे जेवण सर्वान्ना भवन इथे करायचे ठरले. मला असेही केव्हाचे एकदम पारंपारिक केरळी जेवण घ्यायचेच होते. अगदी केळीच्या पानावर वगैरे. पण प्रत्यक्षात जेव्हा केरळी थाळीची अॉर्डर दिली तेवा वेटरसाहेबांनी नो केरळ थाली, यु वॉँट गोबी मंचुरीयन असे विचारले तेव्हा आडवाच झालो.

ओह, आम्ही विसरलोच आम्ही केरळात आहोत. पुढच्या वेळी आम्ही पंजाबात जाऊ तेव्हा रस्सम -भात अॉर्डर करू, असे अगदी मानभावी पण त्याला सांगितले. त्यावर अगदी तेलकट चेहरा करत आमच्याकडे दुर्लक्ष करत साहेब निघून गेले. जेवण होते चांगले पण केरळात जाऊन गोबी मंचुरीयन काय खायचे. शेवटी राहवेना म्हणून गल्ल्यावरच्या माणसाला तक्रार केली. त्यानेही नुसते दात दाखवले आणि खांदे उडवले. Angry

माझा फ्युज उडायला आलाच होता आणि तो उडालाच. खोलीत गेलो तेव्हा डासांची फौज होती. एकतर भयानक उकडत होते आणि मी अक्षरश शॉर्टस आणि वर उघडाच असा त्या हॉटेलात फिरत होतो. पण तसेच झोपणे अशक्य होते. डासांनी फोडून काढले असते. शेवटी बेल वाजवून माणसाला बोलावले. तो त्रासदायक चेहरा करत आल्यावर मी त्याला सौम्य भाषेत अडचण समजाऊन दिली आणि एक अंगावर ओढायला चादर मागितली. त्याने तत्परतेने कोपऱ्यात रचलेला ढीग दाखवला. तो पाहून मी थक्क झालो. त्या चक्क रजया होत्या, अगदी सिमला कुलु मनालीलाच फक्त वापरता येतील अशा. जिथे बारा महिने उकाडा असतो अशा ठिकाणी त्या कुणी अंगावर घेत असतील अशी कल्पनाही मला करवेना.

मी पुन्हा त्याला समजावले की बाबा रे मला पातळ बेडशीट हवीये. पण पुन्हा त्याने तोच ढीग दाखवला तेव्हा मग मला कंट्रोल करणे अवघड झाले आणि एकदम वरची पट्टी लावली.

देवस्थानच होते म्हणून शिव्या वगैरे दिल्या नाहीत पण त्याला जे काही खडसावला. म्हणलं, इथे घामाच्या धारा वाहतायत, मी उघडाबंब तुझ्यासमोर उभा आहे. आणि तु मला रजई घ्यायला सांगतोय. काही लाजलज्जा असेल तर मला आत्ताच्या आत्ता चादर आणून दे. माझ्या आरड्याओरड्यामुळे बाजूच्या खोलीतलेही बाहेर येऊन डोकावायला लागले. पण त्या माणसावर त्याचा काडीमात्रही फरक पडला नाही. बाकीच्या लोकांनाही हेच दिले आहे हेच सांगत राहीला.

मला आता आवरले नाही तर मारामारी होईल या भीतीने आमचे बाकी लोक मधे पडले आणि शेवटी त्याने एक चादर अगदी ठेवणीतला शालू आणून द्यावा त्या आविर्भाावात आणून दिली. म्हणलं एक नाही, आम्ही सात जण आहोत, प्रत्येकाला एक एक अशा सात चादरी हव्यात म्हणल्यावर तो जो काही पसार झाला तो परत उगवलाच नाही.

फॅन फुल स्पीडवर ठेऊन झोपण्याचा कसाबसा प्रयत्न केला पण माझ्या बरोबर राहत असलेल्या लान्स आणि वेदांग ला पुढे बराच वेळ माझी धुसफुस ऐकत रहावी लागली. हा सगळा देवस्थानचा माजोरीपणा आहे. हेच पर्यटन स्थळ असते तर मुकाट सगळे ऐकले असते कारण त्यांचा धंदा त्यावर आहे. इथे त्यांना माहीती आहे, गोणपाट जरी दिले अंथरायला तरी लोकं येणार कारण त्यांना देवदर्शन घ्यायचे. मूर्ख लोकांच्या भावनेचा गैरफायदा घ्यायला चटावलेत. यांचे देवस्थानचे उत्पन्नच बंद केले की ताळ्यावर येतील. इ. इ. Angry

असो, आजच्या दिवसाचा हिशेब फार काही नाही. १०० किमी केले हीच जमेची बाब. आता किमी चे काऊंटडाऊन सुरु झाले होते. पण मोहीम संपायला अजून बराच अवकाश होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त भाग, अनुभव वाचायला रादर असे लहान लहान डिटेलअनुभव वाचायला मस्त वाटतं.
सुबुरु दुबुरु लेफ्ट म्हणजे डावीकडे जाउ नका >> त्यांना समजलं तुम्ही पुणेकर आहात, म्हणून काय करा सोडून काय केलं की चुकाल ते सांगत सुटले. Proud

धन्यवाद मनरंग, प्रसाद आणि यो...

रेणू - लुंगीचा उपयोग नंतर झालाच पण. तिथल्या सगळ्यात देवळात लुंगी नेसून जावे लागते त्यामुळे इथे नाही तर नाही पुढे तरी झालाच...

पाया कुणाच्या पडायला हवे होते...समजले नाही...

त्यांना समजलं तुम्ही पुणेकर आहात, म्हणून काय करा सोडून काय केलं की चुकाल ते सांगत सुटले
>>>>
झाले का च्यायला...मारा आता पुणेकरांनाच.... Wink

आशुचँप,
मजा आली हा भाग वाचून Happy तुमच्या विनोदबुद्धीला मनापासून दाद! फोटोसुद्धा छान.
>> दोन दिशेला तोंड करून काय बघत होतो देव जाणे>> वाला तर फार आवडला. एखाद्या सचित्र विनोदी रहस्यकथेत चालून जाईल!

तुमच्या विनोदबुद्धीला मनापासून दाद! फोटोसुद्धा छान.
>> दोन दिशेला तोंड करून काय बघत होतो देव जाणे>> वाला तर फार आवडला. एखाद्या सचित्र विनोदी रहस्यकथेत चालून जाईल!
>>>

धन्यवाद Happy

ती जी लुंगी आहे तिला स्थानिक भाषेत (मल्यालाम) "मुंड" असे म्हणतात बहुतेक.

बाकी अत्युत्कृष्ट मालिका! प्रचंड चित्रदर्शी अन मस्त! साइकिल वर डबलसीट बसल्यागत वाटते आहे!! पुढील भाग लवकर येऊ द्या

बाकी अत्युत्कृष्ट मालिका! प्रचंड चित्रदर्शी अन मस्त! साइकिल वर डबलसीट बसल्यागत वाटते आहे!! पुढील भाग लवकर येऊ द्या >>>>

तुमच्या अकादमीच्या तुलनेत काहीच नाही हो....तुमच्या लिखाणाचा जबरदस्त फॅन आहे. त्यामुळे फार भारी वाटतेय हे वाचून...

खूप खूप धन्यवाद

अहो समक्ष अनुभवलेले लिहिले की असेच होते आशीष सर ! Every experience is a priceless lesson in itself मी तर स्पष्ट सांगतो ते ट्रेनिंग वगैरे ठीक आहे पण हे १५०० किमी पायडल मारायचे हनुमान साहस वाचुन गलपाटलो मीच सपशेल! और लिखो!! खुब लिखो!! _/\_

Pages