सुरमईचं कालवण

Submitted by मृण्मयी on 22 May, 2015 - 13:41
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

- सुरमईचे अर्ध्या इंच जाडीचे तुकडे
- कोथिंबीर-लसूण-हिरवी मिर्ची वाटण (आलं नको.)
- चिंचेचा घट्टं कोळ
- मीठ
- हळद
- तिखट
- नारळाचं दूध
- तेल

क्रमवार पाककृती: 

- माश्याच्या तुकड्यांना वाटण, मीठ, तिखट, हळद आणि चिंच लावून फ्रिजमध्ये कमितकमी ३-४ तास मुरायला ठेवावं.
- पसरट भांड्यात तेल कडकडीत गरम करून माश्याचे तुकडे घालून ३० सेकंद ठेवावे.
- उलटे करून दुसर्‍या बाजूने ३० सेकंद ठेवावे.
- अगदी मंद आचेवर सगळं मुरवण खरपूस होईपर्यंत हलक्या हातांनी परतावं. या दरम्यान मासे ठक्कं कोरडे होऊन चिवट व्हायला नकोत.
- नारळाचं दूध घालून उकळी आणावी.
-कालवण तयार आहे.

fishcurry-2-maayboli.jpg

वाढणी/प्रमाण: 
माश्याचे तुकडे आणि बाकी घटकांवर अवलंबून.
अधिक टिपा: 

- पुन्हा एकदा, आलं घालण्याचा मोह टाळावा.
- उकळी आल्यावर चव घेऊन मीठ लागलं तर घालावं.
- आरती. ह्यांनी दिलेल्या कृतीनुसार केलेला स्पंज दोसा ह्या कालवणाबरोबर अप्रतिम लागतो. (http://www.maayboli.com/node/5354)

sponge-dosa-curry-maayboli.jpg

माहितीचा स्रोत: 
बहीण- मोनाडार्लिंग, आणखी कोण? :)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा! रेसिपी अगदी तत्परतेने मिळाली :फिदी:, धन्यवाद. रेसिपी सोपी वाटतेय आणि झटपट होईल. फोटो जबरी आले आहेत :).

पराग, आलं अत्यंत आवडतं आहे. पण बहीण माश्याच्या कुठल्याही पदार्थाला आलं घालत नाही. कारण विचारेन. तिची माश्याची कालवणं, तळलेल्या तुकड्या, बरटी इ. आलं घालून केलेल्या ह्याच पदार्थांपेक्षा अनेक पटींनी जास्त चवदार असतात. त्यामुळे तिच्या पाककृती मी कुठेही स्वतःच्या अकलेच्या अ‍ॅडिशन्स न घालता करते. Happy

पराग, आलं अत्यंत आवडतं आहे. पण बहीण माश्याच्या कुठल्याही पदार्थाला आलं घालत नाही. कारण विचारेन. >>> नक्की. कारण आम्ही हल्ली पोहे, उपम्यात पण आलं घालायला लागलोय. त्यामुळे इतकं 'नकोच' सांगितलं बघून का? असा प्रश्न पडला. Happy

सोपी दिसतेय कृती, पण मासे मला फक्त फ्राय केलेले आवडतात. अन ही रेसिपी इतर कशाला (बटाटे, चिकन इ. ला) चांगली लागेल असे वाटत नाही Happy मोनाडार्लिंग च्या रेसिपी भारी असतात एकूण. बरटं पण करायला कॉम्प्लिकेटेड नसल्याने माझी आवडती रेसिपी आहे आता!

हे सही दिसतय.. सोप्पं पण.
आमच्यात (मालवणी), माशाचं कालवण म्हणजे ओलं खोबरं, थोडा उभा चिरलेला कांदा, मिरी, धणे असंच.. मग अजून लाड करायचे तर त्यात तिरफळं घालायची... विशेष्तः बांगडा-बिंगडा असा पैलवानी वासाचा मासा असेल तर नक्की.

हे नक्की करून बघेन.

आवडत्या खाद्यपदार्थाबद्दल,
"पैलवानी वासाचा मासा"
असे वाचुन मला नक्की काय वाटायला हवे, हे नक्की ठरत नाही आहे.

आमच्यात (मालवणी), माशाचं कालवण म्हणजे ओलं खोबरं, थोडा उभा चिरलेला कांदा, मिरी, धणे असंच.. मग अजून लाड करायचे तर त्यात तिरफळं घालायची... >>>>>> हो.माझ्याकडेही असंच आमटीचे वाटण असतं. बांगडा,रावस असल्या माशांच्या तयार केलेल्या आमटीवर कच्च्या खोबरेल तेलाची धार .
आता हे करून पहायला हवे. अख्या नारळाचे दूध घालायचे का?

<<<< आमच्यात (मालवणी), माशाचं कालवण म्हणजे ओलं खोबरं, थोडा उभा चिरलेला कांदा, मिरी, धणे असंच.. मग अजून लाड करायचे तर त्यात तिरफळं
घालायची...>>>> अगदी अगदी
आमच्याकडेही असेच

नारळाच वाटण करायची आयडिया मस्त आहे. मृण्मयी फोटो तोपासू

आमच्या वाट्याला समुद्री जलचर कवा येतीन का माहिती ..
ही नाव फक्त कोकणी मित्र्मैत्रीणी आणि माबोवरच वाचायला मिळतात ..
आमच्या कड फक्त गोड्या पाण्यातले मासे अन झिंगे ..
चांगलय .. चुकुन एखादी सुरमई गळाला लागली तर करुन पाहिन .. तिखट जास्त टाकून Wink

प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद!

>>कांदा नाही???? मग थीकनेस नारळ दुधाने येतो का पुरेसा? आणि अजुन धणा पावडर, मसाला काहिच नाही?

ओरिजिनल पाककृतीत ह्यातलं काहीही नाही. कोथिंबीर- लसूण- हिरवी मिरची ह्यांचं वाटण, चिंचकोळ एवढा ऐवज घट्टपणाला पुरतो. नारळाचं दूध फार पातळ नसावं. बाकी इतर मसाले का नकोत ह्याबद्दल माहिती नाही.

काल ह्या पद्धतीने पापलेटचे कालवण केले !! अत्यंत भारी चव आली होती.
नारळाच्या दुधाचा किंचीत गोडसर फ्लेवर आणि लसूण, मिरचीचा ठसका हे कॉम्बो भारी लाहलं. शिवाय नारळाचं दुध दाट होतं. त्यामुळे ग्रेव्हीला छान स्निग्ध पोत आला होता.
फक्त रंग हिरवट आला, फोटोत दिसतो आहे तसा नाही.
धन्यवाद रेसिपीकरता. Happy

त्यामुळे ग्रेव्हीला छान स्निग्ध पोत आला होता.
>>>>
अरारा. अस्सल मासेखाऊ इतकी सोज्वळ शब्दरचना पाहून जीव देईल!

Pages