पारंपारीक ईडली आणि चटण्या

Submitted by आरती. on 14 May, 2015 - 03:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

पारंपारीक ईडली
P13-05-15_07.32[2].jpg

ईडली राईस - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून

रवा ईडलीसाठी

ईडली रवा - ४ वाटी
उडीद डाळ - १/२ वाटी
पोहे - १/२ वाटी
मेथी दाणे - १ टी.स्पून

क्रमवार पाककृती: 

सॉफ्ट पांढरी शुभ्र ईडली

१. सकाळी ईडली राईस, मेथी एकत्र भिजत घाला. उडीद डाळ वेगळी भिजत घाला.
२. संध्याकाळी डाळ तांदूळ वाटायच्या १५ मि. आधी पोहे थोड जास्त पाणी घालून भिजत घाला.
३. ईडली राईस, मेथी पोहे अगदी बारीक वाटून घ्या. अजिबात रवाळ नको. उडीद डाळ कमीत कमी पाणी घालून बारीक वाटून घ्या.

४. दोन्ही मिश्रण एकत्र करा. त्यात चवीपुरत मीठ घालून एकाच दिशेने ढवळून घ्या. १ टे. स्पून कच्च तेल घालून आंबवायला ठेवा.

५. सकाळी ईडलीपात्रात पाणी घालून ५ मि. उकळवून घ्या. नंतर ईडली स्टॅन्ड ठेवून १५ मिनिटे वाफवा. पहिल्या घाण्याच्या नंतर ईडली पात्रातील पाणी उकळवायची गरज नाही.

रवा ईडलीसाठी

ईडली रवा, मेथी, उडीद डाळ वेगळ भिजत घाला. उडीद डाळ, मेथी, पोहे घालून बारीक वाटून घ्या. ईडली रवा वाटलेल्या मिश्रणात घालून मीठ घालून ढवळून कच्च तेल घालून पीठ आंबवायला ठेवा.

अजून काही ईडलीचे प्रकार

१. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून भिजवलेल्या चणाडाळीचे ४-५ दाणे घाला. ही ईडलीसुद्धा छान लागतात.

२. ईडलीच पीठ ईडलीपात्रात घातल्यावर त्यात वरून साधी किंवा रंगीत साखर शिंपडा. ही गोड ईडली गोडप्रेमींना खूप आवडते.

३. तट्टे ईडली - ईडलीच पीठ छोट्या डीशमध्ये वाफवा. असच छोट्या वाटी किंवा ग्लासमध्ये वाफवता येते.

४. कांचीपुरम ईडली - ईडलीच पीठ आंबवायला ठेवल की २ टे. स्पून चणाडाळ भिजत घाला. सकाळी काजूचे तुकडे तुपात तळून घ्या. ईडलीच्या पिठात भिजवलेली चणाडाळ, बारीक चिरलेली हि.मि., कढीपता बारीक चिरून, १/२ कप ओल खोबर, १/२ इंच किसलेल आल, काळी मिरी खडबडीत वाटून १ टी.स्पून. हे सर्व मिक्स करा. पिठात काजूचे तुकडे मिक्स करा किंवा वेळ असेल तर ईडलीपात्रातील तेल लावलेल्या प्रत्येक वाटीत काजूचे दोन तीन तुकडे ठेवून् त्यावर पीठ ओता. आणि १५ मिनिट वाफवा.

वरच्या फोटोतील ओल्या खोबर्‍याची चटणी प्रकार १

ओल खोबर, बेडगी मिरची, आल, लसूण. मी लिंबूरस घातला होता, तुम्ही कैरी किंवा चिंच वापरू शकता. चवीपुरत मीठ घालून ग्रांईड करा. वरून कढीपता, हिंग, राई ची फोडणी द्या.

ओल्या खोबर्‍याची चटणी प्रकार २-ओल खोबर, हिरवी मिरची, आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

ओल खोबर चटणी प्रकार ३ - ओल खोबर, चटणीची डाळ / पंढरपूरी डाळ, हि.मि. आल, हवी असेल तर १ किंवा दोन पाकळी लसूण, कैरी किंवा लिंबू रस किंवा चिंच, मीठ चवीपुरत, सर्व वाटून वरून फोडणी.

लाल टॉमेटोची चटणी

तेल किंवा तूपामध्ये कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसूण, आल, बेडगी मिरची परतून घ्यायची. थंड झाल्यावर चवीपुरत मीठ घालून हे मिश्रण वाटायच. वरून हिंग, राई, कढीपत्ताची फोडणी द्यायची. ही चटणी ईडली बरोबर एकदम टेस्टी लागते.

डोसासाठी शेंगदाणा चटणी एकदम बेस्ट.

शेंगदाणे भाजून, साल काढून, लसूण, आल, बेडगी मिरची, चिंच हे मिक्सरला वाटून घ्या. वरून फोडणी.

आल्याची चटणी
ही सुद्धा ईडलीबरोबर झणझणीत टेस्टी लागते. आल छोटे तुकडे करून पाव वाटी, बेडगी मिरची, चणाडाळ आणि उडीद डाळ १ टे.स्पून, लसूण १-२ पाकळ्या नसल्यातरी चालतात, हे तेलात भाजून चिंच, गूळ मीठ घालून मिक्सरवर बारीक पेस्ट करा. वरून फोडणी द्या.

डोसे प्रकार इथे बघा. http://www.maayboli.com/node/53541

वाढणी/प्रमाण: 
खाल तसे, माझ्यासारखे ईडलीप्रेमी दिवसभर चरत असतात. :)
अधिक टिपा: 

प्लीज ईडलीच्या पीठात भात घालू नका. आंबण्याच्या प्रक्रियेत भात नासतो आणि अशी ईडली खाल्ली की पोट बिघडत. अशा ईडल्यांची चव आणि रंगसुद्धा वेगळाच असतो.

पोहे नसतील तर कुरमुरे घाला.

पीठात तेल घातल्यावर ढवळायच नाही.
जी काही पिठाची कंन्सिस्टंसी करायची असेल ती पीठ आंबवायला ठेवण्या अगोदर करावी.
एकदा पीठ आंबल्यावर त्यात अजिबात पाणी घालायच नाही.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शूम्पी, तू इडली झाल्या झाल्या सुरी फिरवतेस का? अर्धा-एक मिनिट निवु दिल्या तर नीट सुटून येतात.

वेका, सेम हियर Happy

सिंडी +१

गॅस बंद केल्यावर लगेच इडली स्टॅंड बाहेर काढून वाफ जायला ठेवायचा.वाफ जावून जरा इडली सुकल्यासारखी वाटली की सुरीने किंवा इडल्या काढण्यासाठी छोटा पसरट चमचा मिळतो त्याने इडल्या सोडवायच्या.

माझी आई पुर्वी सुती पातळश्या साडीचे छोटे छोटे तुकडे इडली स्टॅंडच्या खळग्यात ठेवून वर इडलीचं पीठ घालायची. चटकन इडल्या निघायच्या. नंतर ते तुकडे धुवून पुढच्या वेळेसाठी ठेवून द्यायचे.

किचन पेपरने इडली स्टँडला बॅटर टाकण्यापूर्वी तेल लावून घेतल्यास अजिबात चिकटत नाहीत. तसंच कुकरमधून बाहेर काढून दोनेक मिनिटं गार करून मग काढणं हेही आहेच.

इडली पात्रात पीठ घालायच्या आधी एकदा आडवं नळाखाली धरुन सर्व लेयर विसळून घ्यायचे. पाणी झटकायचं पण पुसायचं नाही. लगेच पीठ घालायचं. गॅस बंद केल्यावर एक मिनिट झाकून अन मग १-२ मिनिटे बाहेर काढून अख्खा स्टँडच आडवा ठेवायचा. वाफ निघून जाते म्हणे. मग सुरीने किंवा मिनिएचर भात वाढणीने अगदी अलगद सुटून येतात इडल्या, शिवाय पात्र घासायला त्रास होत नाही.

का नांची पारंपारिक पद्धत आहे

आरती, वर लिहिली आहेस तशी शेंगदाणा चटणी आज केली आहे. पुदीनाही घातला आहे आणि चिंचेऐवजी कैरी घातली आहे... ओल्या खोबर्‍याच्या चटणीसारखी खडबडीत न ठेवता मिक्सर फिरवून फिरवून छान गुळगुळीत केली आहे Wink मस्त लागते आहे.

मी माझ्याकडे जो तेलाचा स्प्रे आहे तो वापरते (त्यात नॉर्मल ऑलिव ऑइल घालून). इडली पात्राला तळाशी तेल लाव्लं तर इडलीला खालून पिवळसर रंग येतो आणि तरिही चकटते.

आज मी मेधाची पद्धत वापरून पहिला घाणा लावला आहे. बघू काय होतं ते.

इडलीपात्र बाहेर काढल्यावर जरा निवु दिले तर इडल्या चिकटत नाहीत. निवण्याइतका वेळ नसेल तर मी इडलीपात्र सरळ उलटे नळाखाली अर्धा मिनिट धरते आणि मग सपाट चमचा अलगद बाजुने फिरवुन इडल्या काढते. चिकटत नाहीत. आणि पहिला घाणा झाल्यावर त्याच भांड्यात दुसरा घालायचा असल्यास, जर आधीच्या इडलीचे काही कण इकडे तिकडे चिकटलेले असतील तर ते भांडे धुवुन घेते.

गरम गरम इडल्या खोलगट चमच्याने काढल्या गेल्या तर हमखास चिकटतात असा अनुभव आहे.

आणि सांगायचे राहिलेच, वरच्या रेस्पिने इडल्या केल्या. अगदी पांढ-याशुभ्र, नरम, मऊ मुलायम अशा झाल्या. मी साधा तांदुळ वापरौन नेहमी करायची, तेव्हा उरलेल्या इडल्या संध्याकाळपर्यंत जरा कडक, दडदडीत अशा व्हायच्या. पण ह्या संध्याकाळीही खुप नरम लागत होत्या. अजुन वेगवेगळ्या चटण्या करुन पाहिल्या नाहीत. त्याही करेन लवकरच. धन्यवाद आरती.

मनीशा, फोटो नेक्स्ट टाईम नक्की द्या. Happy

मंजुडी, साधना धन्यवाद. साधना मी दुसर्‍या दिवशीही ह्याच ईडल्या डीप फ्राय करून खाते. एकदम यम्मी लागतात.
सुमेधाव्ही, हो ईडली राईसमूळे पांढर्‍या शुभ्र, नरम, स्पाँजी ईडल्या होतात.
अनघा, खालच्या धाग्यावर ईडली राईसचा फोटो दिला आहे. तिथे खूप चर्चा झाली आहे ईडली राईसवर. Happy
http://www.maayboli.com/node/53541

-

सुमेधाव्ही <<<< आधी नव्हता म्हणजे कधी??? आमच्या लहानपणापासून आम्ही अशीच ईडली खात आलो आहोत ह्याच तांदूळाची म्हणून मी वर लिहिल आहे बाहेरची ईडली मला आवडत नाही. ईडली राईस हा उकडा तांदूळाचा प्रकार आहे. डोश्याच्या धाग्यावर मी अजून दोन प्रकारचे उकडे तांदूळ दिले आहेत.

सुमेधा, मी इडली राईस आणलाय्. दक्षिणेत खल्ला जाणारा उकडा तांदुळ एवढेच त्याच्यात नाविन्य आहे. दक्षिणेतले लोक असा भात त्यांच्या जन्मापासुन खात असणार, आपल्याला आता कळला. माझ्याकडे गावी मिळणारा लाल रंगाचा उकडा तांदुळ असतो. आई त्याच्या इडल्या करायची आणि त्याही मऊ व्हायच्या, फक्त तांदळाच्या रंगामुळे त्या लालसर दिसायच्या.

इडलीसाठी साधा तांदुळ नकोय तर उकडा तांदुळ हवा हे ज्ञान मला यातुन मिळाले. उकडा असल्यामुळॅ कदाचित आंबवण्याचा आणि वाफवण्याचा वेगळा परिणाम साधला जात असेल जो साध्या तांदळात साधला जात नसणार.

प्रत्येक जातीच्या तांदळाचाही एक गुणधर्म असतो ना. काही तांदळाचा भात सडसडीत मोकळा होतो तर काहीचा चिकट होतो. इडलीराईसचा मुळ तांदुळ हा बहुतेक चिकट भात होणा-या कॅटेगरीतला असावा. इथल्या बाजारात सुरती कोलमचाही उकडा तांदुळ मिळतो. तोही वापरौन बघेन एकदा. त्याच्याही इडल्या कदाचित चांगल्या होतील.

-

पण हा इडली राईस हा प्रकार विषेश वेगळा खास सॉफ्ट इडल्यांसाठी बरीच आर एन डी करून बाजारात आलाय असे समजले. <<<<< कुठुन समजले??? माझ्या आजीलासुद्दा वरच्या लिंकवरचे सप्लाय करत होते का?

साधना, ईडली राईस हा लाल उकड्या तांदूळापासूनच बनवतात अस वाटत. गावी गेली की ह्याची प्रोसेस विचारून सांगते.

सुमेधाव्ही, एकेकडे तुम्ही म्हणता ईडली राईस हा उकडा तांदूळ नाही ही पण मजेशीर गोष्ट आहे. ईडली राईसच्या आर अ‍ॅन्ड डी साठि दुसरा धागा काढा प्लिज. Happy

-

उकडा तांदूळ व इडली राईस वेगवेगळे आहेत. <<<<< सुमेधाव्ही, हे वरती तुमचच वाक्य आहे. प्लीज चुकीची माहिती देवू नका.

साधना, ईडली राईस हा लाल उकड्या तांदूळापासूनच बनवतात अस वाटत. गावी गेली की ह्याची प्रोसेस विचारून सांगते

ओके. नक्की विचार. लाल तांदळापासुन नसावा. पांढ-या तांदळापासुन असावा असा माझा अंदाज.

माझ्या गावी उ.ता. असा बनतो - घराबाहेर चुल मांडुन त्याच्यावर तिन चार फुट उंचीचे एक मोठे घंघाळ ठेवतात. त्यात पाणी उकळत ठेवतात. उकळत्या पाण्यात पोतेभर अख्खे भात (म्हणजे वरच्या तुसासकट असलेला तांदुळ, शिजलेला भात नाही) घालतात. साधारण किती वेळ ठेवायचे याचा अंदाज बायांना असतो. तेवढा वेळ ठेवुन मग ते उकडलेले भात रोवळीत काढतात, पाणी पुर्ण निथळले की उन्हात कडकडीत वाळवतात. नंतर त्याच्यावरचे तुस काढुन टाकतात. की झाला उकडा तांदुळ तयार. घंघाळाच्या आत जे भात घालतात त्याचा तांदुळ लाल असतो त्यामुळे उकडा तांदुळही लालच असतो. (घंघाळात ओतण्याआधी भात रात्रभर पाण्यात भिजत घालतात असे आई म्हणाली. मी थेट वरचीच प्रोसेस पाहिलीय, त्यामुळे नक्की माहित नाही. भिजवत असावेत बहुतेक)

आरती, मला जे म्हणायचंय ते नीट मांडले नाहीये असे दिस्ते. त्याने गोंधळ होतय. म्हणून मी आधीचे प्रतिसाद संपादीत करतीये. तुमच्या ह्या धाग्यात खूप चांगली माहीती आहे त्यामुळे उगीच विषयांतर नको.

ईडली राईसचे फोटो बघून arborio rice (हा तांदूळ रिसोटोसाठी वापरतात) घेतला. वाटायला सोपा वाटला. ईडलया मऊ आणि spongy झाल्या. Arborio rice मध्ये starch content जास्त असतो.
धन्यवाद आरती.

आरती, आज ह्या प्रमाणाने इडल्या केल्या. मेथीदाणे नाही घातले, पण मस्त झाल्यात...लुसलुशीत Happy

मी थेट वरचीच प्रोसेस पाहिलीय <<<< साधना खूप छान माहिती दिली आहे. भात शेती खरच खूप कष्टाच काम आहे.
पांढ-या तांदळापासुन असावा असा माझा अंदाज. <<<< तुमचा अंदाज बरोबर आहे.
सुरभी, हर्षा धन्यवाद.

आरती, खूपच चांगल्या झाल्या होत्या इडल्या. पांढर्‍याशुभ्र आणि लुसलुशीत..ह्या इडल्या बनवल्यापासून आमच्याकडे MTR च्या मिक्सेसचा पत्ता कट झाला आहे.. Happy

या पद्धतीनं (ईडली राईस, ऊडीद डाळ, पोहे, मेथ्या) मागच्या आठवड्यात इडली केली होती. अतिशय सुरेख चव आली होती. माझ्या मिक्सरनं ऐनवेळेस दगा दिल्यानं अगदी बारीक वाटता आलं नाही पण तरीही टेक्शर मस्त आलं होतं. उरलेल्या पिठात कांदा, कोथींबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून आप्पे केले होते तेही मस्त झाले होते. पाककृतीबद्दल धन्यवाद!

ह्या रेसिपी नुसार दोन तीन वेळा रवा इडली केल्या. खुप छान झाल्या होत्या..मी नेहमी डाळ आणि तांदळाच्या करायचे. धन्यवाद रेसिपी साठी.

Pages