खास डोसा व इडली च्या चटणी प्रकार.

Submitted by देवीका on 13 May, 2015 - 23:51
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

डोस्याचा प्रकार हा आरतीचा बीबी बघितला. तिथे चटणी चे प्रकार असायलाच हवे म्हणून हा बीबी.
इथे फक्त डोस्याची /इडलीची चटणी लिहा.

सुरुवात मी करते,

मी फक्त मी माझ्या पद्धतीने केलेल्या, चाखलेल्या लिहित आहे, आता प्रत्येक घराची एक पद्धत असे असु शकते, त्यामुळे तुम्ही लिहा तुमची घरची पद्धत. Happy

१)लाल चटणी
१ टोमॅटो, भिजत घातलेल्या लाल तिखट मिरच्या, एक वाटी खोवलेले खोबरे,मीठ चवीप्रमाणे
तडका सामान: खोबरेल तेल, हिंग,उडीद डाळ, कडीपत्ता

२)कडीपत्ता चटणी
२ वाट्या धूवून निवडून सुकवलेला कडीपत्ता, ३ मोठे चमचा सुकी चणाडाळ,१ चमचा जुना तांदूळ, १ चमचा तूरडाळ, २ चमचा उडीद डाळ, ४-५ तिखट लाल मिरच्या, हिंग, १ लहान चमचा काळंमिरी, १ लहान चमचा धणे, पाव चमचा जीरं, १ लहान चमचा राईची डाळ, सुके खोबरे २ चमचे,मीठ चवीप्रमाणे
तडका नाही लागत इथे.

३)लाल चटणी (टमाटर -कांदा घालून)
२ टोमॅटो, आवडत असतील तितक्या लाल तिखट भिजत घातलेल्या मिरच्या, एक वाटी खोवलेले खोबरे, तीन चमचे भिजलेली हरभरा डाळ, पाव वाटी चिरलेला कांदा, १ लहान चमचा धणे,नखाएवढी भिजलेली चिंचेचा कोळ,
तडका सामान: खोबरेल तेल, हिंग,उडीद डाळ, कडीपत्ता

४) शेंगदाणे घालून चटणी
१ वाटी शेंगदाणा भिजत घालून, मूठभर ओले खोबरे, २ चमचे डाळ्या(पंढरपुरी डाळ), कडीपत्ता आवडेल तितकाच, लाल मिरच्या ४-५,चवीला मीठ
तडका सामानः १ चमचा उडीद डाळ, फोडणीला खोबरेल तेल, हिंग, राई, कडीपत्ता

५)उडीद डाळ भिजत घालून
पाव वाटी उडीद डाळ भिजलेली, ३ चमचा खोबलेले खोबरे, ४-५ हिरव्या तिखट मिरच्या, खिसलेलं आलं,कडीपत्ता लागेल तसा, नखाएवढा चिंचेचा कोळ, मीठ चवीला.
तडका सामान: देसी घी लागेल तसे, हिंग, लाल मिरच्या (तिखट नसलेल्या) फक्त शोभेला फोडणीला.

६) कांदा, खोबरे चटणी
१ वाटी बारीक चिरलेला कांदा(सांबारच कांदे घ्या), ४-५ हिरव्या मिरच्या, मूठभर खोवलेले खोबरे, आलं, १ चमचा डाळ्या
तडका सामानः खोबरेल तेल, हिंग्,कडीपत्ता

७) हॉटेलची चवीची इडली डोसा चटणी
२ वाटी खोवलेलं खोबरे, एकच सांबार कांदा, ३ चमचे डाळ्या, ४ हिरव्या मिरच्या, नखाएवढं आलं किसून, नखाएवढी चिंचेचा कोळ, ३-४ पानं कडीपत्ता, आवडीप्रमाणे साखर,चवीला मीठ.
तडका सामानःखोबरेल तेल, हिंग, राई,उडीद डाळ,कडीपत्ता, लाल मिरच्या(तिखट नसलेल्या ,फक्त शोभेला)

८) कोथींबीर, खोबरे मराठी चटणी- आमच्या घरी ह्याला मराठी चटणी म्हणतो कारण आई जेव्हा बुचकाभर कोथींबीर टाकते आणि चटणी फोडणीत शिजवते. नुसती फोडणी वरून घालून नाही करत तेव्हा.
साधारण दक्षिणेतील लोकं खूपच कमी वेळा शिजवलेली चटणी करतात इडली-डोस्याला. आणि कोथींबीर सुद्धा कमीच घालतात चटणी मध्ये असे माझे मत आहे. Happy
तर सामान :
२ वाटी खोवलेले खोबरे, ४-५ हिरव्या मिरच्या, बुचकाभर कोथींबीर,पेरभर खिसलेलं आलं, चवीला मीठ
तडका सामानः कुठलेही तेल, हिंग, कडीपत्ता, राई,लाल मिरच्या.

दही चटणी:
सामानः खोबरे, हिरवी मिरची, कडीपत्ता,आलं,सांबार मसाला, दही लागेल तसे
तडका नाही.

कैरीची चटणी
पेरभर आलं, हिरव्या मिरच्या आवडतील तितक्या, १ मध्यम कैरी कीसून, २ चमचे खोवलेलं खोबरं, ३-४ काजू, चिमटीभर गूळ.
तडका सामानः
खोबरेल तेल, हिंग, राई,३-४ लाल मिरच्या कडीपत्त, भिजवलेली चणाडाळ्च फक्त(उडीद डाळ नाही)
अतिशय मस्त लागते हि चटणी.

क्रमवार पाककृती: 

आता पद्धत,

१) लाल चटणी:
१ चमचा तेलात टोमॅटो ,खोबरे आणि लाल मिरच्या परतून घ्यायचे. मीठ टाकावे मग टोमॅटो लवकर गळतो. बारीक वाटून वाटीत काढून घेवून मग कडकडीत फोडणी वरील दिलेल्या सामानाची करून खोबरेल तेलाचा चटणीला वरून तडका द्यावा.

२) कडीपत्ता चटणी:
कडीपत्ता धूवून वाळवून घ्यावा. सर्व डाळी खरपूस भाजून घ्याव्या. मग उरलेले सामान(खोबरे वगैरे) सुद्धा वेगळे भाजावे. एकत्रित करून बारीक वाटावे. हवाबंद डब्यात ठेवावे.

वाढणी/प्रमाण: 
आवडेल तशी
अधिक टिपा: 

मौसमाप्रमाणे मी चटणी बनवते, तसेच वेळ व किती काळ ठेवावी लागेल त्याप्रमाणे आमच्याकडे चटणी प्रकार असतो.
प्रवासाला कुठे जातोय त्याप्रमाणे सुद्धा अम्मा चटणी बनवते.
त्यातले जिन्नस असतील तशी तडका असतो.

माहितीचा स्रोत: 
आई(अम्मा)
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

देविका, कृतीची वाट बघतेय. मराठी चटणी फोडणीत शिजवणे म्हणजे काय त्याची उत्सुकता आहे.

आता सध्या कैरीच्या दिवसात आमच्याकडे एकच चटणी केली जाते. ओलं खोबरं, कैरीचा किस, लाल सुक्या मिरच्या भिजवून, लसणीच्या पाकळ्या आणि चवीला मीठ साखर हे सगळं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. एरवीच्या हिरव्या चटणीपेक्षा लसूण जरा जास्त घ्यायची.

मस्त धागा. सगळ्या करून बघणार.
डोश्यांबरोबर माहित नाही पण आंबोळ्यांबरोबर माझी टो चटणी उत्तम लागते. (सॉरी फॉर रिक्षा)

मंजू, आजच कैर्‍या आणते आणि उद्या बाईला करायला लावते ही चटणी. मी करायची तर यावर्षीचा कैरी सीझन जाणार.

देवकी, मस्त धागा. इथे ईडली डोसाच्या चटण्यांचे छान संकलन होईल.

लाल टॉमेटोची चटणी

तेल किंवा तूपामध्ये कांद्याच्या फोडी, टोमॅटोच्या फोडी, लसूण, आल, बेडगी मिरची परतून घ्यायची. थंड झाल्यावर चवीपुरत मीठ घालून हे मिश्रण वाटायच. वरून हिंग, राई, कढीपत्ताची फोडणी द्यायची. ही चटणी ईडली बरोबर एकदम टेस्टी लागते.

डोसासाठी शेंगदाणा चटणी एकदम बेस्ट.

शेंगदाणे भाजून, साल काढून, लसूण, आल, बेडगी मिरची, चिंच हे मिक्सरला वाटून घ्या. वरून फोडणी.

आल्याची चटणी
ही सुद्धा ईडलीबरोबर झणझणीत टेस्टी लागते. आल छोटे तुकडे करून पाव वाटी, बेडगी मिरची, चणाडाळ आणि उडीद डाळ १ टे.स्पून, लसूण १-२ पाकळ्या नसल्यातरी चालतात, हे तेलात भाजून चिंच, गूळ मीठ घालून मिक्सरवर बारीक पेस्ट करा. वरून फोडणी द्या.

दिनेशदांची रताळ्याची चटणी पण मस्त जाते डोश्यांसोबत

पालकाची पण चटणी करता येते.
कोथिंबीरी ऐवजी पलक घालाय्चा की झालं
पौष्टीक पण आणि चवीला सेम लागते

देविका,
कृती व घटक पदार्थ एकत्र टाकाल का? वर जिन्नस अन मग खाली पाकृ शोधत फिरा, असे नसले तर बरे होईल.