इंदूर - भाग ४ - इंदूर ते पुणे (समाप्त)

Submitted by मनोज. on 13 May, 2015 - 05:23

इंदूर - भाग १ - पूर्वतयारी आणि पुणे ते शिर्डी

इंदूर - भाग २ - रावेरखेडी

इंदूर - भाग ३ - सराफा

>>>>>इंदूरला येताना भूषणच्या डोळ्यात धूळसदृश काहीतरी गेले होते. त्यामुळे तो दिवसभर आय इन्फेक्शनने त्रस्त होता. त्यामुळे मी पुण्याला एकटा गाडी चालवत येणार व तो रविवारी सावकाश बसने येणार असेही ठरले.

एक चविष्ट दिवस बघता बघता संपला होता.

आज शक्य झाले तर पुणे गाठायचे असे ठरवले होते. काही प्रॉब्लेम आला तर येताना शिर्डीला मुक्काम केला त्या प्लॅननुसार शिर्डीला थांबून दुसर्‍या दिवशी पुणे गाठायचे असेही ठरवले होते. आजचा पल्ला साधारणपणे ६५० किमीचा होणार होता. आणि भुषणच्या इंदूरच्या घरापासून ते माझ्या पुण्यातल्या घरापर्यंतचे एकूण अंतर किती होणार आहे याचा काहीच अंदाज येत नव्हता. 'जो होगा देखा जाएगा' असे ठरवून बाहेर पडू.. नंतर Plan A, Plan B वगैरे ठरवू असा विचार केला.

सकाळी लवकर उठून आवरले व साडेपाचच्या दरम्यान बाहेर पडलो. सकाळी सकाळी मस्त हवा होती. इंदुरमधून बाहेर कसे पडायचे हा प्रश्न होताच. परंतु त्या भल्या पहाटे माझ्यासोबत चेतनही उठला व आवरून जेथे NH3 सुरू होतो तेथेपर्यंत सोडायला आला.

सकाळी सकाळी गाडी चालवायला (नेहमीप्रमाणे) मजा येत होती. 'मध्य प्रदेश यायायात पुलीस', 'आगे खतर्नाक मोड है' 'आगे ग्राम क्षेत्र है' वगैरे पाट्या मागे पडत होत्या. हिंदीमध्ये यमक जुळवलेल्या एक दोन मजेदार पाट्याही होत्या. परंतु त्यांचा फोटो घेणे शक्य झाले नाही.

"NH3 चा मुख्य त्रास म्हणजे स्पीडब्रेकर्स" हे http://www.team-bhp.com वर अनेक ठिकाणी वाचले होते. मात्र आता त्याचा पुरेपूर अनुभव येत होता. थोडे अंतर गेल्यानंतर कितीही लहान गांव असले तरी सलग १० स्पीडब्रेकर्स एकमेकांना खेटून हजर होत होते. हे स्पीडब्रेकर्सचे कुटूंब गांव सुरू होण्याआधी व गांव संपल्यानंतर असे वसवले होते त्यामुळे गांव आले की वैताग यायचा. नंतर नंतर तर एखादे क्रॉसींग किंवा U टर्न साठी दुभाजकांमध्ये जागा सोडतात तसा प्रकार असला तरी स्पीडब्रेकर्स असायचे. इंदूर सोडल्या सोडल्या ४० / ५० किमीनंतर एक घाट लागला होता. संपूर्ण उतार असलेल्या या घाटामध्ये गांव नसतानाही स्पीडब्रेकर्स होतेच!!!!

या उताराच्या रस्त्यावर पलीकडच्या बाजुला गाड्यांचा वेग अत्यंत कमी होता आणि ट्रॅफीक जाम असावे असाही नजारा दिसत होता. थोड्या वेळाने लक्षात आले की ट्रक "स्टॉल" होण्याच्या भीतीने इतर गाड्या ट्रकपासून लांब अंतर ठेवून तो चढ चढत होत्या आणि ट्रकवाल्यांचा बंधुभाव जागृत झाल्याने संपूर्ण रस्त्यावर दोन ट्रक समांतर पद्धतीने १० च्या स्पीडने रस्ता कापत होते.

साडेसहाच्या दरम्यान एक पेट्रोल पंप दिसला. इंदूरला जाताना धुळ्यामध्ये पेट्रोल भरले होते त्यावर गाडीची खादाडी झाली नव्हती. धुळे-कसरावद-रावेरखेडी-इंदूर असा प्रवास आणि इंदूर शहरात इकडेतिकडे भटकून परतीचा ७०/८० किमी प्रवासही झाला होता.

या पेट्रोल पंपावर एक अजब गोष्ट दिसली.

."दो पहिया वाहनोंको पेट्रोल लेने हेतु हेल्मेट अनिवार्य, अन्यथा पेट्रोल नही दिया जायेगा"

अधिक माहिती विचारली असता त्या जिल्ह्याच्या कलेक्टर / 'मैजीस्ट्रेट साब' ने तशी आज्ञा दिली आहे असे कळाले. त्या 'मैजीस्ट्रेट साब' चे खरंच कौतुक वाटले.

पुन्हा एकला चलो रे प्रवास सुरू केला.

धामणोद पार केल्यानंतर नर्मदामैय्यांची चाहुल लागली. उत्तरायण ट्रीपमध्ये केवळ नर्मदा नदीवरचा पुल लहान असल्याने थांबता आले नव्हते. येथे त्याहून वाईट परिस्थिती होती. दोन - तीन लेनचा रस्ता सरळ सरळ एका लेनमध्ये सावरून बसला होता. आजुबाजुला आणखी दोन पुल होते.

मात्र या रस्त्यावर फारशी वाहतुक नसल्याने थांबलो..

नर्मदा नदीवरचा सिंगल लेन पुल

.

पावसाळ्यात ठरावीक पातळीनंतर पाणी वाढले की हे खडक दिसत आहेत तो भाग भारताच्या नकाशाचा आकार घेतात.

.

दुसर्‍या बाजुला रेल्वेचा पुल.

.

"The BULL"

.

इतके सगळ्यांचे फोटो झाले म्हणून माझा एक "शेल्फी" Wink

.

यथावकाश सकाळपासून १५० किमी पार करून जुलवानीया येथे पहिला खाण्याचा ब्रेक घेतला.

टेस्ट ऑफ इंडीया नामक एकदम स्वच्छ आणि हवेशीर हॉटेलपाशी थांबलो. येथील मालक एकदम देशभक्त होता.

...

असे सगळे फोटो दर्शनी भागात लावले होते. शिवरायांचाही एक फोटो होता परंतु फोटोपाठीमागची काच आणि सकाळच्या उन्हाचा कोन चुकवून फोटो घेता आला नाही.

हे ठिकाण विशेष लक्षात राहण्याचे आणखी एक कारण म्हणजे कमी दर आणि चविष्ट पदार्थ.

येथे गाडी थांबवून सॅक सावरत उतरणे, स्टँडला गाडीलावणे वगैरे प्रकार सुरू असतानाच शेजारच्या स्विफ्टमधला एक जण जवळ आला व नंबरप्लेट पाहून त्याने "कहाँ जा रहे हो??" असे विचारले.
मी : "पुणे"
तो : "तो फिर आपला गँग कहाँ हैं??"
मी : "अकेला हूं!"
तो : "ओके ओके... आरामसे जाईये.. बेस्ट ऑफ लक"

ही गाडी नंतर बराचवेळ माझ्या पुढे मागे होती. टोलनाक्यावरच्या गर्दीत मी त्यांना मागे टाकून पुढे जात होतो. थोड्यावेळात ते मला मागे टाकत होते.. नंतर पुन्हा स्पीडब्रेकर आणि पुढचा टोल नाका यांच्या मदतीने मी त्यांना मागे टाकत होतो. प्रत्येकवेळी तो हितचिंतक हात दाखवून / थम्सअप करून जात होता.

आजच्या प्रवासाची स्ट्रॅटेजी ठरवताना...
१) सकाळी लवकर बाहेर पडणे..
२) दुपारी उन्हाच्या आत शक्य होईल तितके वेगाने जाणे
३) दुपारी १२ वाजल्या नंतर आरामात जेवण, ब्रेक्स आणि गाडी चालवलीच तर सावकाश जाणे
४) दुपारी ३ / ४ नंतर पुन्हा वेग वाढवणे
....असा प्लॅन ठरवला होता. त्यानुसार प्रवास सुरू होता.

NH3 चा रस्ताही चांगला होता. विनाकारण वळणेवळणे नसलेला दोन लेनचा प्रशस्त रोड.. व्यवस्थीत आखलेले पट्टे, भर उन्हातही टिकून असलेली दुभाजकावरची हिरवळ.. फक्त एक गोष्ट नव्हती म्हणजे रस्त्याकडेला सावलीत थांबावीत अशी झाडे नव्हती.

.

प्रत्येक तासानंतर ब्रेक घेत होतो.. उन्हाचा तडाखा वाढू लागला होता. "रखरखाट" या शब्दाचा पुरेपूर अनुभव घेत प्रवास सुरू होता.

बराच वेळ उन्हात गाडी चालवल्यानंतर शेवटी एकदाचे "धुळे" आले. लांब अंतरावरून एक झाड दिसले. नंतर कधी झाड दिसेल की नाही अशा विचाराने तेथे लगेचच गाडी थांबवून गाडीला विश्रांती दिली.

.

अरे हो.. इतके सगळे करून फक्त सकाळचे १०:३० वाजले होते. त्यामुळे आता दिवसभरात ४०० किमी अंतर सहज कापता येणार होते. आजच पुण्याला पोहोचू शकतो असेही लक्षात आले. मग उगीचच इकडे तिकडे करत आणखी थोडा वेळ घालवला व क्लिकक्लिकाट केला.

..

पुन्हा गाडीवर बसलो आणि प्रवास सुरू केला..

एका लयीत डगडगडगडगडगडग असे ऐकत जाणे ही "अनुभवायची" गोष्ट आहे. गाडी घेतल्याचा आणि या प्रवासाचा पुरेपूर आनंद मिळत होता.

यथवकाश मालेगांव पार पडले व मी शिर्डीच्या दिशेने वळालो.

महाराष्ट्रातले रस्ते इतके भिकार का असतात हा प्रश्न पुन्हा पडलाच! NH3 मध्य प्रदेशात जितका चांगला होता तितका महाराष्ट्रात नक्कीच चांगला नव्हता. बम्पी रोड्स, रस्त्यावर लहान मोठे खड्डे असे सगळे चित्र दिसत होते.

.

धुळे-मालेगांव-मनमाड पट्ट्यामध्ये एक वेगळाच प्रॉब्लेम होता. कमी झाडे, एकंदरच धुळीचे साम्राज्य आणि गरम हवा यांच्यामुळे वारा सुटला तरी तो सोबत धुळीचे लोट वाहत नेत होता आणि अनेकदा रस्त्याच्या डावीकडून उजवीकडे असे वार्‍याचे लोट वाहताना धुळीचे सपकारे बसत होते. अत्यंत त्रासदायक होते सगळे. हेल्मेट, बलक्लावा, गॉगल आणि हेल्मेटची काच या सगळ्यातूनही चेहर्‍यावर मातीचा थर बसला आहे अशी जाणीव होत होती.

रस्त्याच्या आजुबाजूला नजर जाईल तेथे धुळीचा एक पट्टा जमिनीपासून २०/३० फुटांवरचा संपूर्ण भाग व्यापून राहिला होता.

..

या अशा वातावरणात ढाब्यावर जेवणे अमान्य करून मी गाडी चालवत राहिलो. दुपारी १ वाजता थांबणार असे ठरवले होते परंतु मनासारखा ढाबा मिळाला नाही म्हणून गाडी चालवतच होतो.. शेवटी अडीच तीन च्या दरम्यान शिर्डीच्या अलिकडे येवला गांव लागले व एका AC हॉटेलचा बोर्ड दिसला. चुपचाप गाडी बाजुला घेतली.

सकाळपासूनचे एकूण रिडींग ४०० किमी झाले होते. हॉटेलच्या पार्किंगमध्ये गाडी लावली, हात व तोंड धुतले. शेवभाजी, रोटी आणि ताक अशी ऑर्डर देवून आरामात जेवण आवरले. आणखी थोडावेळ तेथेच बसून वेळ घालवला व पुन्हा शिर्डीकडे कूच केले.

शिर्डी अर्ध्या तासातच मागे पडले. महाराष्ट्रात "आपल्या" भागात आल्यावर वातावरणाचा व एकंदर हिरवळीचा फरक पडत होता. उन्हाचाही तडाखा कमी झाला होता.

.

धुळे-मालेगांव-मनमाड या रस्त्यावरून प्रवास केल्याने शिर्डी-नगर रस्ता एकदम सुसह्य वाटू लागला.

.

अहमदनगर जवळ...

.

पुन्हा त्या खराब रस्त्यावरून प्रवास करावयाचा होता..

..

आता याआधी पार केलेला नगर पुणे रस्ता पार करावयाचा होता व संध्याकाळचे ५ वाजले होते.

वाटेत एक दोन ठिकाणी किरकोळ ट्रॅफीक जाम वगळता शिरूर - वाघोली वगैरे ठिकाणे आरामात पार पडली.

संध्याकाळचे पुण्यातील नगर रस्ता, जंगली महाराज रस्ता, सिंहगड रस्ता या सर्व ठिकाणच्या गर्दीमध्ये सामील होवून ७:३० च्या दरम्यान घरी पोहोचलो.

एक मस्त प्रवास सुरक्षीतरीत्या संपला होता.

एका दिवसात ६८० किमी रनींग झाले.
गाडीने एकूण ४५ च्या दरम्यान माईलेज दिले.
इंदूरी नमकीन्स आणि सराफा बरेच दिवस लक्षात राहिल!!!!!!

(समाप्त)

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त झाला प्रवास. भरुच स्टेशनजवळही नर्मदेवरचा असाच विशाल पूल लागतो ना ! लक्षात आहे माझ्या.

मस्त

एका दिवसात ६८० किमी रनींग झाले.>>> बाबौ!!!!!!!!!!!!!!!!!!!!

३०० च्या वर कपॅसिटी नाही माझी तरी.
तु तर एकट्यानेच गाडी चालवलीस पुर्ण.
लेखमाला भारीच होती. Happy

एका दिवसात ६८० किमी रनींग झाले. > तुमचा स्टॅमिना खरच चांगला आहे. मी पण पुणे ते जळगाव ४२० किमी ६ तासात गेलो होतो. पण शेवटचे ६०-७० किमी जरा जडच गेले.

धन्यवाद मंडळी.

>>>>>मी पण पुणे ते जळगाव ४२० किमी ६ तासात गेलो होतो

प्रफ - कोणत्या गाडीने आणि कोणत्या महिन्यात..?

<<इंदूर सोडल्या सोडल्या ४० / ५० किमीनंतर एक घाट लागला होता. संपूर्ण उतार असलेल्या या घाटामध्ये गांव नसतानाही स्पीडब्रेकर्स होतेच!!!! >>

त्या घाटात उतार प्रचंड आहे आणि अशा ठिकाणी बरेच वाहनचालक वाहन न्यूट्रलमध्ये टाकून इंजिन बंद करून (बहुदा इंधन वाचविण्याकरिता) वाहन असेच उतारावर सोडतात. ज्यामुळे वाहन नियंत्रणाबाहेर जाऊन मोठे अपघात होतात. विशेषतः कंटेनर्सकडून इतर वाहने चिरडली जातात. पुण्यातही महामार्ग क्रमांक चारच्या बाह्यवळण भागात असे प्रकार सर्रास घडतात. याकरिता गतिरोधक अतिशय गरजेचे आहेत.

दुसरे असे की, तुम्ही धुळ्याहून पुण्यास येताना अहमदनगर मार्गे येण्याऐवजी धुळे - मालेगाव - मनमाड - कोपरगाव - संगमनेर - पुणे या मार्गे प्रवास केला असता तर ५० किमीची बचत झाली असती किंवा धुळे - मालेगाव - चांदवड - लासलगाव - पोहेगाव - संगमनेर - पुणे या मार्गे प्रवास केला असता तर ३५ किमीची बचत झाली असती. याउलट जर धुळे - चाळीसगांव - कन्नड - औरंगाबाद - अहमदनगर - पुणे या मार्गे प्रवास केला असता तर अजुन २० किमी वाढले असते परंतु एक अतिशय अवघड घाट पार केल्याचे समाधान लाभले असते. तसेच जर धुळे - चाळीसगांव - गवताड - औरंगाबाद - अहमदनगर - पुणे या मार्गे प्रवास केला असता तर अजुन ३५ किमी वाढले असते परंतु एक अतिशय अवघड घाट + जंगल सफारी पार केल्याचे समाधान लाभले असते.

शिर्डीत ठायी ठायी महामार्ग ओलांडणार्‍या भाविकांच्या गर्दीला पार करणे म्हणजे निव्वळ वैताग आहे. तसेच अहमदनगर शहराबाहेरुन जाणारा पुणे-मनमाड बाह्यवळण मार्ग हा देखील वाहन व चालकाची कसोटी पाहणारा आहे. मी ऑगस्ट २०१२ ते जून २०१४ दरम्यान धुळे येथे तात्पुरते वास्तव्य करीत होतो. त्या दरम्यान अनेकदा धुळे - निगडी प्रवास केला आहे. वेगवेगळे मार्ग वापरून पाहिले परंतु एकही मार्ग संपूर्ण समाधानकारक नाही या निष्कर्षावर आलो. तसेच या दरम्यान एकदा जानेवारी २०१४ मध्ये धुळे ते दिल्ली व दिल्ली ते धुळे असा प्रवास देखील केला आहे.

आम्ही पण हल्लीच म्हणजे १ मे ते ३ मे ठाणे ते भोपाळ आणि परत असा प्रवास चार चाकीमधून केला. १ तारखेला सकाळी सात वाजता निघून संध्याकाळी ५ वाजता इंदूरला पोचलो. त्या दिवशी इंदूरमधे मुक्काम. दुसर्या दिवशी इंदूर ते भोपाळ साडेतीन तासात. त्या दिवशी भोपाळ्मधे मुक्काम. मुलाचा पेपर ४ ते ७ असा होता. त्यामुळे मुक्काम. ३ तारखेला आमच्या हॉटेलवरून सकाळी सव्वा सहाला निघून मुलाच्या हॉस्टेलवर पावणे सातला पोचलो. तो तयारच होता. त्यामुळे १० मिनिटात निघालो. रात्री ८ वाजता ठाण्यात दाखल. ड्रायव्हिंग पूर्णपणे नवर्याने केले कारण मला येतच नाही. येताना दिवसभरात ७९० कि मी प्रवास झाला. आम्ही पण जुलवानियाच्या हॉटेल्मधे जेवायला थांबलो होतो. भोपाळ - इंदूर रस्त्यावर डोडी येथे मध्य प्रदेश पर्यट्नचे हायवे ट्रीट म्हणून हॉटेल आहे. उत्तम सोय आहे खाण्यापिण्याची. मध्य प्रदेशातील रस्तेही आपल्यापेक्षा खूप चांगले आहेत. टोल दोन्ही वेळ्चा मिळून १७९०. त्यातला मध्य प्रदेश ७२२ आणि महाराष्ट्र १०६८. पण महाराष्ट्रात टोल का देतोय असा प्रश्न पडावा अशी रस्त्यांची स्थिती. पूर्ण प्रवास १५८० कि मी. खूप दिवसांपासून ठरवलेला प्रवास करून झाला. आता गाडीचा पुढचा प्रवास कुठला ठरतोय पाहुया.