इंदूर - भाग २ - रावेरखेडी

Submitted by मनोज. on 13 April, 2015 - 13:54

भाग १ - एक हॉटेल शोधले, चेक इन केले आणि फ्रेश होवून जेवणासाठी बाहेर पडलो. २०० किमी अंतरावर पहिला दिवस संपला होता..

दुसर्‍या दिवशी सकाळी उजाडण्यापूर्वीच दोघेही उठलो, आवरले. रूममध्ये चहा घेतला व बाहेर पडलो. आजच्या दिवसाचा एकंदर प्रवास, जीपीएस सेट करणे, आज लागणारे नकाशे हाताशी येतील असे ठेवणे आणि गाडीला फळी / उशी बांधणे वगैरे तयारीमध्ये थोडा वेळ गेला. आज नकाशे आणि जीपीएस अत्यंत महत्वाचे ठरणार होते कारण आजच्या दिवसात इंदूरला जाताना आम्ही वाट वाकडी करून रावेरखेडी ला जाणार होतो.

"रावेरखेडी" "पेशवा सरकार"

'पेशवा सरकार' हा लेख वाचून कधीकाळी इकडेही भेट द्यायचा निश्चय केला होता. बाजीराव पेशव्यांचे स्मारक असलेले रावेरखेडी गांव मात्र गुगल मॅप्स वर बरेच दिवस सापडले नाही. नंतर अचानक विकीमॅपीयावर टॅग केलेले रावेरखेडी सापडले. त्यानंतर विकीमॅपीया ते गुगल मॅप्स असे रेफरन्ससेस जोडून गुगलवरती "रावेर" लोकेट केले व नंतर गुगल मॅप्स ते हिअर मॅप्स असेही एक 'ट्रांझीशन' केले. हा सगळा खटाटोप करताना स्मारकाच्या बरोब्बर मागे नर्मदा नदीच्या पात्रात एक मोठे बेट आहे त्याचा खूप उपयोग झाला.

एकंदर आराखड्यावरून असे दिसत होते की, रावेरखेडीसाठी आम्हाला फक्त ७० / ७५ किमीचा जास्तीचा रस्ता पार करावा लागणार होता. त्यामुळे इंदूर भेटी आधीच रावेरखेडी ला भेट द्यायचे ठरवले व सकाळी बाहेर पडलो.

सकाळच्या उन्हातला रस्ता..

.

सकाळची वेळ असल्याने फारसे ट्रॅफीक गर्दी वगैरे नव्हती व दुपार होण्याआधी व ऊन वाढण्याआधी शक्य तितके अंतर लवकर कापावे म्हणून आम्ही सुसाट निघालो मात्र खराब रस्त्याने आम्हाला ४० किमीच्या वरती जावू दिले नाही. शिर्डी कोपरगांव (१५ किमी) अंतर लगेच पार पडले. आता मालेगांव व धुळे चे वेध लागले होते. मालेगांवपासून मुंबई आग्रा नॅशनल हायवे ३ पकडायचा होता.

वाटेत अंकाईचा किल्ला, लेणी आणि त्याच्या समोरच एक "थम्स-अप" केल्यासारखा एक कडा दिसत होता.

.

येथे थांबून थोडा क्लिकक्लिकाट केला. घरातून आणलेला डबा फस्त केला व पुन्हा गाडीवर स्वार होवून मालेगांव, धुळेची वाट पाहू लागलो.

.

रस्त्यांची माहिती वाचताना महाराष्ट्रातील NH 3 आणि मध्य प्रदेशातील NH 3 यांमध्येही कमालीचा फरक असल्याचे अनेकजणांनी लिहिले होते. ते खरे नसावे असे मनापासून वाटत होते आणि उन्हाचा वाढता जोर बघता लवकरात लवकर या खराब रस्त्यांमधून बाहेर पडावे असेही वाटत होते.

मालेगांवला एका ठिकाणी उजवे वळण घेवून आम्ही NH3 पकडला. अर्थातच हा रस्ता शिर्डी-कोपरगांव-मालेगांव या सिंगल रस्त्यापेक्षा खूप चांगला होता. रस्ता आणि एकंदर वातावरणात लगेचच फरक पडला होता. शिर्डीच्या आसपास रस्त्याच्या आजुबाजूला डेरेदार झाडे होती, तुरळक हिरवे शेत दिसत होते. फार काही नसले तरी निदान सावलीत थांबावे अशी जागा होती. येथे मात्र अगदी उलटे चित्र दिसत होते. ऊन आणि रखरखाट.. झाडांचे प्रमाण जाणवण्याइतके कमी.

.

मालेगांव जवळ एक ठीकठाक हॉटेल बघून पोहे, इडली वगैरे मागवले. हे एकंदर बाहेरून चांगले दिसणारे एक टुकार हॉटेल होते, चवही खास नव्हती आणि कै च्या कै रेट्स. पण हे सगळे साक्षात्कार पदार्थ मागवल्यानंतर झाल्याने मुकाट समोर आहे ते पोटात ढकलण्याशिवाय पर्याय नव्हता.

नाष्टा आवरला. Sad

आता जेवणाची वेळ होईपर्यंत मुकाट गाडी चालवणे इतकेच काम होते. धुळ्याजवळ एका ठिकाणी पेट्रोल भरून घेतले आता इंदूरला पोहोचेपर्यंत आणि परतीच्या थोड्या अंतराचीही काळजी मिटली होती.

NH 3 हा ही रस्ता चांगला आहे. ६० / ७० चा वेग सलग ठेवता येत होता. बुलेटला त्यापेक्षा जास्त वेगाने जाताही येत नाही. एकतर माझी गाडी नवीन आहे म्हणून मी गाडीला फारसा त्रास देत नव्हतो आणि दुसरे महत्वाचे कारण म्हणजे व्हायब्रेशन. ८० नंतर गाडी कंप पावण्यास सुरूवात करते. मला तेही करावयाचे नसल्याने अगदी आरामात ६० / ७० ने प्रवास सुरू होता. सोन्याबापु म्हणतात त्याप्रमाणे बुलेटची खरी मजा क्रुझींग मध्ये असल्याने एका लयीत डगडगडग आवाज ऐकत आम्ही चाललो होतो.

..

येथे एका ठिकाणी भारी मजा झाली. आत्ता मजा म्हणतोय पण त्या क्षणी बेक्कार हालत झाली होती.
चारचाकी वाहनांची वाहतूक करणारे अजस्त्र कंटेनर्स शक्यतो कळपाने प्रवास करतात. एका ठिकाणी मी अशा एका कंटेनरला मागे टाकण्यासाठी उजव्या लेनमध्ये गाडी घेतली तर त्याच्या समोर त्याचे आणखी तीन भाऊ आरामात चालले होते. एकामागोमाग एक अशी कंटेनरची लांब रेल्वे तयार झाली होती. दोन लेन असल्याने काहीच प्रश्न नव्हता. मी एकाला मागे टाकले, आणखी तीन राहिले होते आणि अचानक सटासट शिंका येवू लागल्या. एक, दोन, तीन अशा सलग शिंका आल्याने वेग कमी झाला होता पण माझा काऊंट सुरूच होता. गाडी डावीकडे घेण्याला जागा नव्हती, त्या लेनमध्ये थांबणे अशक्य होते आणि यादरम्यान मी त्या कंटेनरच्या फ्लीटला बरोब्बर निम्मे गाठले होते. शेवटी ६ / ७ शिंका देवून व कशीबशी गाडी कंट्रोल करून उरलेल्या रेल्वेला पार केले. Happy

दुपारी १ च्या दरम्यान उन्हाचा तडाखा बसत असल्याने जेवणासाठी ढाबे बघायला सुरूवात केली. या रस्त्यावर एकंदरच हॉटेल व ढाबे कमी प्रमाणात आहेत. आम्ही थोडेफार ढाबे पाहिले पण ते ट्रक ड्रायव्हर स्पेशल कळकट्ट ढाबे होते. शेवटी अशाच एका ढाब्यापाशी थांबलो. हरियाणवी धाबा होता. शेवभाजी, दालफ्राय आणि रोटी मागवली.

हरियाणवी धाब्यावर येण्याचा माझा पहिला प्रसंग होता. ज्याप्रकारे मेन्यू दिला गेला त्यामुळे मी व भुषण दोघेही हैराण झालो. एका मोठ्या प्लेटमध्ये शेवभाजी, दुसर्‍या प्लेटमध्ये दालफ्राय. हे दोन्ही प्र चं ड प्रमाणात दिले होते. किमान चौघांचे जेवण आमच्या समोर आले. त्यात आम्ही दही मागवल्यावर त्या हॉटेलच्या पोर्‍यानेही "इतना खतम होगा आपसे??" असा प्रश्न टाकून आमची विकेट घेतली होती. Wink

"रोटी हातात घेवून एकाच भाजीच्या प्लेटमधून खा" असा एकंदर सेटअप.

.

ट्रकसोबत विश्रांती...

.

अप्रतीम चव होती. फारसे तिखट नसलेले पण सढळ हाताने मसाले वापरलेले जेवण!! दही खूप आंबट होते, जिभेची व्यवस्थीत विचारपूस करत होते. पण तेही आवडले.

एकंदर त्या ढाब्याचे आणि जेवणाचे वर्णन करावयाचे तर 'उग्र', 'राकट' असली "राऊडी" विशेषणे शोधावी लागतील. थोडा वेळ विश्रांती घेवून आम्ही पुन्हा सेंधव्याकडे कूच केले.

आम्हाला सेंधव्यानंतर ठिकरी गाठायचे होते व ठिकरीच्या थोडे पुढे कसरावद फाटयावरून कसरावदकडे (उजवीकडे) वळण घ्यायचे होते.

ते वळण सापडले आणि त्या फाट्यापासून कसरावद, डोगावण, बडी, कटोरा अशी छोटी छोटी गांवे मागे पडू लागली. अरूंद आणि आणि ठीक ठाक अवस्थेतल्या रस्त्यांवरून हळूहळू पुढे जावू लागलो.
गावांची एकंदर धाटणी पश्चिम महाराष्ट्रातील एखाद्या खेड्यासारखीच होती. फक्त गावातून बाहेर पडल्यानंतर झाडे आणि शेतीचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होते.

.

वाटेत एका गावात थांबल्यानंतर पहिला प्रश्न आला "कै जारियो?" नेमाडी / मालवी भाषेची पुरेपूर झलक मिळाली. त्यांना "पेशवा सरकार की समाधी" कडे जाण्याचा मार्ग विचारला. नेमाडी भाषेत सगळ्या प्रश्नांना उत्तरे मिळाली. सहमती दर्शवताना हो म्हणण्याऐवजी "हौ / हाऊ" असा प्रकार पहिल्यांदा ऐकला.
पुढे एका ठिकाणी "नर्मदाजी के तट पर है" अशीही माहिती मिळाली. या आधी नर्मदामैया असे ऐकले/वाचले होते. नर्मदा"जी" हे पहिल्यांदाच ऐकले.

पुढे त्या रस्त्यावर रावेर फाटा लागला. (NH3-कसरावद फाटा ते रावेरफाटा अंतर - ५० किमी)
तेथे रस्त्यावरच ही पाटी आहे. ही पाटी चुकणे शक्य नाही अशी मोठ्या आकाराची आहे..

.

एकदम चकाचक पाटी बघून फोटो काढताना पुढे रस्ता ठीकठाक असेल असे वाटले होते..
ही तर फक्त सुरूवात होती.

.

आपण जसजसे आत जावू तशी रस्त्याची अवस्था आणखी खराब होत गेली.

.

वाटेत एक नदी पार करावी लागली. खुर्किया नदी.

.

तेथे रावेर आणि खेडी नावाची दोन वेगवेगळी गांवे आहेत.. किंवा रावेरखेडी नावाचे एकच गांव आहे याची माहिती कोठेही मिळाली नाही आणि तिनही प्रकारच्या पाट्या सगळीकडे पाहिल्या..

समाधीजवळ जाणारा रस्ता अगदीच वाईट अवस्थेतला आहे. चारचाकी जाईल की नाही इतपत शंका यावी इतका खराब रस्ता आहे. Sad

यथावकाश चौकशी करत करत समाधीपाशी पोहोचलो.

.

मुख्य प्रवेशद्वाराला भरभक्कम कुलूप होते. त्याची किल्ली शोधण्यात थोडा वेळ गेला. गाडीच्या आवाजाने आजुबाजूचे लोक बाहेर डोकावून बघत होतेच. भुषणने त्यातल्या एकांकडे चौकशी सुरू केली. कुलुपाची किल्ली "नारू" नामक चौकीदाराकडे असते असे सांगू लागले - अगदी चार पाच वर्षांची चिल्ली पिल्ली आम्हाला "नारू के पास चाबी है!" असे सांगत होती.
शेवटी एकदाचा भुषणला त्या नारूचे घर सापडले. ते साहेब बाहेर गेले असल्याने दुसरेच कोणीतरी किल्ली घेवून पळत पळत आले व आम्हाला कुलूप उघडून दिले.

.

प्रवेशद्वारापासून आत गेल्यानंतर मध्ये मोकळी जागा व चारही बाजुला बैठे बांधकाम आहे.

.

मोकळ्या भागात एका बाजूला बाजीराव पेशव्यांच्या अस्थी असलेली छत्री आहे.

...

एक जीर्णावस्थेतील बोर्ड एका भिंतीला टेकून ठेवला आहे. (हा बोर्ड पूर्वी एखाद्या लोखंडी आधारावर असावा.)

.

सुबक कोनाडे आणि रेखीव कमानी..

...

एका चिंचोळ्या जिन्यावरून वर जाता येते. येथून नर्मदा नदीचे विशाल पात्र दिसते.

.

प्रवेशद्वाराबाहेरच विलक्षण बोलक्या डोळ्यांच्या मारूतीचे एक मंदिर आहे. (हे मंदिर पेशवेकालीन असावे असा कुठेतरी उल्लेख वाचला आहे.)

.

भक्कम परंतु कोरीव बांधकामातील ही समाधी अत्यंत वाईट अवस्थेत आहे. आत गेल्यानंतर एका बाजूला सिमेंटची वापरलेली पोती आणि लोखंडी ग्रील / गेट पडले होते.

.

गिलावा उडालेल्या कमानी आणि अनेक अनाम प्रेमवीरांनी आपआपली नावे अजरामर करून ठेवण्याचा प्रयत्न केला होता.

.

आजुबाजूला जनावरे चरत होती.

.

समाधी पाहून बाहेर पडलो व इंदूरकडे कूच केले. इंदूर फक्त १०५ किमी दूर होते परंतु रस्ता कसा असेल याची खात्री नव्हती. पुन्हा खराब रस्ता पार करून सनावदला पोहोचलो. तेथे एक छोटासा ब्रेक घेवून लगेचच इंदूरकडे कूच केले. संध्याकाळ उलटून गेल्याने अंधारात प्रवास करणे क्रमप्राप्त होते.

बडवाह येथे पुन्हा "नर्मदाजी के दर्शन" करून सिंमरोल मार्गे सिंगल रोडने हळूहळू प्रवास सुरू झाला. सिंमरोल जवळचा एक घाट पार करताना अचानक समोरून येणारी वाहने रस्त्याच्या डावीकडून येणार व आपण उजवीकडून घाट चढत रहायचे अशी विचित्र पद्धत होती. का ते कळाले नाही. येथे अशा कसरती करून घाट चढू लागलो.

पौर्णिमेच्या आधीचा दिवस असल्याने भरपूर चंद्रप्रकाश होता. अशा दुधाळ वातावरणात आणि किर्रर्र रात्रीमध्ये आम्ही वेगाने रस्ता कापत होतो.

यथावकाश इंदूरमध्ये प्रवेश केला. भुषणच्या घरी पोहोचलो. आज ५०० किमीपेक्षाही जास्त प्रवास झाला होता..

"भिया फ्रेश हो जाओ, अभी सराफा निकलना है!" भुषणचा भाऊ चेतन टिपीकल इंदोरी भाषेत वदला....

(क्रमशः)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मनमाडचा तो थम्स अप डोंगर रेल्वेतून जाताना पण दिसतो.
बाजीराव पेशव्यांची समाधी फारश्या स्वच्छ स्थितीत नसून देखील सुरेख/रेखीव बांधकाम व्यवस्थित नजरेस येत आहे. एका वेगळ्याच जागेची सफर करवलीत.

मनोज खूप सुंदर लिहिले आहे आणि फोटो पण छान आहेत. मी विदर्भ एक्स्प्रेसनी अकोला मुंबई असा प्रवास करायचो तेंंव्हा हा थम्प्स नेहमी दिसायचा. आता मुंबई नागपुर फ्लाईट असते तेंव्हा तो प्रवास होत नाही.

ईंदुरला द्रोणात कढी आणि भात मिळतो नर्मदेपाशी. तू खाल्ला की नाही? मला जायचे आहे ईन्दुरला आणि तिथे आर्मीचे एक ठिकाण आहे. काय बरे नाव? महुवा की काहीतसे असे नाव आहे. ते बघायचे आहे. हो तेच आहे नावः http://en.wikipedia.org/wiki/Mhow

पेशवा सरकारची लिंक छान आहे.. छान आहे तो लेख. धन्यवाद.

श्रीमंत पेशवे सरकारांच्या समाधीचे दर्शन घडवल्याबद्दल मनापासून धन्यवाद ....

या अद्वितीय सेनापतीसाठी मनात एक आदरभाव कायमच भरुन आहे ....

प्रवासवर्णन मस्तच आहे ...

छान वर्णन.. ५०० किमि सलग प्रवास म्हणजे खूपच... माझी क्षमता फक्त जास्तीतजास्त २५० ते ३०० ची आहे. त्यात देखिल सीट चांगले नसेल तर आडसंडीत/ मांड्याचे आतिल बाजुस मरणाचे दुखायला लागते.
बरेच फोटो दिसत नाहीयेत. पण नंतर बघतो.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

मस्त सुरु आहे. Happy
कमानीचा फोटो अफलातुन आलाय.

समाधिची अवस्था पाहुन वाइट वाटले.
महाराष्ट्र सरकार त्याची डागडुजी करुन देउ शकेल की.

प्रतिसादांबद्दल धन्यवाद !!

>>>>महाराष्ट्र सरकार त्याची डागडुजी करुन देउ शकेल की.

झकासराव.. याची डागडुजी करणे फारसे खर्चिक काम नाहीये. खरे काम असणार आहे रावेरखेडी कडे जाणारे रस्ते नीट करणे.

रावेरखेडीला भेट द्यायला अजुन जमलेलं नाहीय.
या अद्वितीय सेनानीच्या समाधीस्थळाचं दर्शन घडवल्याबद्दल धन्यवाद.

मनोज,
कालपर्यंत तुम्ही दिलेल्या लिंकवरील पेशवा सरकार हा लेख वाचनात येत होता. पण आज त्या लिंकवर गेल्यावर वेगळेच पेज ओपन होते आहे. असे का? त्या ब्लॉगची लिंक परत येता येईल का?

हा भाग अपेक्षेप्रमाणेच सुंदर उतरलाय.
दुर्लक्षित असली तरी अजून बर्‍या अवस्थेत आहे समाधी.. प्रत्यक्ष बघणे कधी जमलेही नसते मला, पण फोटो बघून खुप छान वाटले. प्र्त्यक्ष इंदूरच्या आजूबाजूचे रस्ते खुप छान आहेत. दोन्ही बाजूला हिरवीगार शेते दिसतात. मी २ वर्षापूर्वीच गेलो होतो.

>>>> प्र्त्यक्ष इंदूरच्या आजूबाजूचे रस्ते खुप छान आहेत

हो. फक्त स्पीडब्रेकरने वैताग आणला. प्रत्येक गावाच्या आधी आणि नंतर मोजून १० स्पीडब्रेकर चा एक सेट असा प्रकार होता.

परत येताना तर एका घाटातही उतरताना स्पीडब्रेकर होते.

कदाचित सुरक्षीततेच्या दृष्टीने बरोबर असेल.. पण वैताग आला हे ही खरे.

>>>पुढच्या भागात सराफा बाजार दिसणार तर !!!

येस्स Happy

मस्तच वर्णन आणि फोटो ...
श्रीमंत बाजीरावांच्या समाधीचे दर्शन घडवल्याबद्दल आभार .__/\__