त्रिनिदादच्या कूकूचे पुढे काय झाले ? ( coo coo from Trinidad )

Submitted by दिनेश. on 11 May, 2015 - 05:52

भारताच्या अगदी पुर्वेकडील राज्यांबद्दल मला माहीत नाही, पण बाकीच्या बहुतेक राज्यात भेंडी आवडीने खाल्ली जाते.

भेंडीची भाजी करणे हे थोडेसे कौशल्याचे काम आहे. जरा दुर्लक्ष झाले, चुकून झाकण ठेवले, पाण्याचा हात लागला कि भेंडीला तारा सुटायला लागतात. ती भाजी कितीही परतली तरी मनासारखी होत नाही. अर्थात याला उपायही सोपाच आहे. कुठलाही आंबट पदार्थ वापरला ( चिंच, कोकम, दही, टोमॅटो, ताक, लिंबू वगैरे ) तर तारा सुटत नाहीत. भर तेलात भेंड्या तळून घेतल्या तरी तारा सुटत नाहीत. न कापता मीठाच्या पाण्यात उकडल्या तरी तारा सुटत नाहीत.
हा प्रकार आपण सहसा करत नाही, पण रुचिरातल्या साबूत भेंडी या पंजाबी पाककृतीमधे तसे सुचवलेय. अशा नुसत्या उकडलेल्या भेंड्या, इथे अंगोलात लोकप्रिय आहेत. हॉटेलमधल्या बफे मधे त्या असतातच.

त्यामूळे आपल्याकडे भेंडीची भाजी करताना तिला तारा सुटणार नाहीत अशीच करतात. पण तारा सुटणे हा भेंडीचा गुणधर्म आहे. त्या गुणाचा वापर करून केलेले केवळ दोन पदार्थ मला आठवताहेत.

पहिला म्हणजे कोहाळ्याचे सांडगे. हा प्रकार कोल्हापूर भागात केला जातो. यात कोहाळ्याचे, गवारीचे, भोपळ्याचे तूकडे एकत्र कुटतात. त्यात भेंडीचेही तूकडे कुटतात. भेंडीच्या चिकटपणामूळे या मिश्रणाचे लाडू वळता येतात. तसे वळून ते ऊन्हात वाळवतात आणि मग जेवणावर तळून वाढतात. ( तळल्यावर ते सुटेच होतात. )

दुसरा पदार्थ म्हणजे भेंडेकंद.. हो गुलकंदासारखा भेंडेकंद. हा प्रकार मी कधी केला वा खाल्ला नाही, पण लक्ष्मीबाई धुरंधरांच्या, गृहीणीमित्र पुस्तकात वाचला होता. यात भेंड्याच्या चकत्या करून त्यात साखर घालून ऊन्हात आटवतात ( छुंदा किंवा गुलकंदाप्रमाणेच ) या प्रकारात आधी भांडे चिकाने भरून जाते मग तो चीक आटत जातो.
हा कंद औषधी आहे, असे लेखिकेने लिहिले आहे.

भेंडीची भाजी पश्चिम आफ्रिकेतही लोकप्रिय आहे. इथे तिला ओक्रा किंवा गंबो ( हा अंगोलन शब्द आहे ) म्हणतात.
भारताप्रमाणे किंवा दक्षिण आशियाई देशांतल्याप्रमाणे इथे भाज्या परतून केल्या जात नाहीत. पाण्यात घालून ऊकळणे ( सूप ) , थेट निखार्‍यावर भाजणे किंवा ऊकड काढणे याच पद्धतीने सर्व पदार्थ करतात. मसाले व तेल यांचा मर्यादीत वापर होतो.

नायजेरियन ओक्रा रुपाने वेगळ्या असतात. त्याला ९ धारा असतात. रुंदीला साधारण १ इंच आणि लांबीला ३ इंच
असतात. अंगोलातल्या भेंड्या रुंदीला साधारण १ सेमी आणि लांबीला १०/१२ सेमी असतात. पण त्यांना अजिबात धारा नसतात. दोन्ही प्रकारच्या भेंडी चवीला आपल्या भेंडीसारख्याच लागतात.

पण इथे खास करून नायजेरियात भेंडीच्या तारेचे वावडे नाही. उलट तारा आलेल्या त्यांना आवडतात. अशा तार येणार्‍या सुपमधे कसावाच्या पिठाचे ( गारी ) गोळे बुडवून खातात. भेंडी च्या सूपमधे तिथे सुके मासे, भोपळ्याच्या बिया वगैरे घालतात. क्वचित मक्याचे दाणे, टोमॅटोही घालतात.

मका, भेंडी टोमॅटो वापरून परतून केलेली भाजी छान लागते. मी ती बर्‍याच वेळा करतो.

मका मूळचा आफ्रिकेतला नाही. तो इथे दक्षिण अमेरिकेतून आला. पण लगेच लोकप्रियही झाला.

एवढे नमन झाल्यावर आता आपण कूकू म्हणजे काय ते पाहू..

कूकू हा त्रिनिदाद आणि टोबॅगो देशातला लोकप्रिय पदार्थ आहे. त्याचे मूळ आफ्रिकेतच आहे ( कारण तिथले लोकही मुळ आफ्रिकनच आहेत ) पण त्यांनी त्याचे स्वरुप पार बदलले आहे. आफ्रिकन आहारात नसलेला पण तिथे पिकणारा नारळ त्यांनी वापरलाय. नारळाचे दूध व पिवळ्या मक्याचे पिठ ते कूकू ( coo coo ) साठी वापरतात.

नारळाच्या दूधात भेंडीचे तूकडे घालून शिजवतात. मग त्यात मीठ, तिखट मिरच्या ( क्वचित कांदा, लसूणही )
घालतात आणि मग त्यात पिवळ्या मक्याचे पिठ घालून शिजवतात. ही उकड मग तेल लावलेल्या बोलमधे घालून त्याची मूद पाडतात. भेंडीच्या चिकटपणामूळे हे पिठ एकसंध राहते. ही मूद मग फिशकरी सोबत खातात.

हा पदार्थ मूळ स्वरुपात, निदान मला तरी आवडला नसता. मूळ घटक तेच ठेवून मी त्याचे स्वरुपच बदलून टाकले.

यासाठी मी कांदा व भेंडी दोन्ही उभ्या कापून घेतल्या. जिरे व जास्त मिरचीची फोडणी करून त्यावर कांदा व भेंड्या परतल्या. त्यात मीठ व नारळाचे दूध घातले. मग त्यात पिवळ्या मक्याचे पिठ ( हे रंगानेच पिवळे असते )
घातले. त्या पिठाचा शिजून गोळा झाल्यावर तो मळून घेतला आणि त्याचे थालिपीठ केले.

कूकूचे हे रुप मला तरी आवडले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान दिसतोय हा पदार्थ.

पण इथे खास करून नायजेरियात भेंडीच्या तारेचे वावडे नाही. उलट तारा आलेल्या त्यांना आवडतात. अशा तार येणार्‍या सुपमधे कसावाच्या पिठाचे ( गारी ) गोळे बुडवून खातात. >>> मी ते कासवाच्या पिठाचे असं वाचलं आणि दचकले.

ते त्रिनिदाद हवं ना?

ही कुकु खुप छान दिसतेय. पण पिठ मळताना भेंड्या अशा मस्त लांबत राहणार नाही ना?? Happy थोडाश्यातरी वाकड्यातिकड्या होतील.

आपल्या नेहमीच्या पिठात करुन पाहते. घरी भेंडी खाल्ली जात नाही. निदान अशी खाल्ली जाईल.

कुठल्याही भाजीतले (पिठातले, मसाल्यातले, इ.तले) गुणधर्म माहित करुन घेऊन मग त्याचा स्वयंपाकात सुयोग्य वापर करणार्‍या तुमच्यासारख्या अति दुर्मिळ बल्लवाचार्यांना मज पामराचे दंडवत .....

देवा...मी पण "कासवाच्या पिठाचे" असेच वाचले !!! Rofl
अश्विनी, रिया च्या प्रतिक्रिया वाचताना जाम ह्सायला येत होते...... Proud

'कूकूचे हे रुप' पण आता करुन बघायला ह्वे...मस्तच दिसतेय....