सब्स्टीट्यूट डोसा

Submitted by दिनेश. on 4 May, 2015 - 07:39
substitute dosa

असा मस्त कुरकुरीत डोसा, आतमधे भरलेली बटाट्याची भाजी, सोबत खोबर्‍याची चटणी आणि वाटीत सांबारही.
एक प्लेट मसाला डोसा मागितला तर असा मस्त सरंजाम समोर येतो..

पण ते भारतात महाराजा. इथे अंगोलात कोण देणार मला आयता डोसा ? आले दिनेशच्या मना... असे म्हणूनही
लगेच डोसा होत नाही. इये अंगोला नामे देशी, भारतीय वस्तू मिळण्याचे एकच दुकान आहे. तिथेही जायला
मला सवड होत नाही. माझी भिस्त असते भारतातून जे सामान आणतो त्यावरच.

पण त्यात तरी काय काय आणणार ?

तर हा डोसा कसा जम(व)ला त्याची सुरस कथा..

१) खुद्द डोसा.

डोसा करण्यासाठी बासमती तांदूळ ( आरतीच्या मते याचे डोसे करू नयेत... पण इथे मिळणारे बाकीचे तांदूळ
.. असो ) १ कप, त्यात १ टेबलस्पून उदीद डाळ ( जपून वापरायची भाऊ, यापेक्षा जास्त घालून चालत नाही ) १ टेबलस्पून साबुदाणा आणि १ टिस्पून मेथी असे भिजत घातले. झोपायच्या आधी आठवणीने ते वाटून ठेवले.

एरवी असे वाटण सकाळी नीट आंबलेले असते. पण त्या दिवशी सूर्य स्विच ऑफ केल्यासारखी थंडी पडली.
तशी इथे आता थंडी पडणारच होती, पण ती हळू हळू पडते. अशी एकदम नाही. बहुतेक इथल्या समुद्रात शीत
प्रवाह आला असावा. तर तात्पर्य असे कि पिठ आले नाही. मग मी त्यात ब्रेड मेकिंग मशीन साठी लागते ती इंस्टंट यीस्ट टाकली. ती मात्र नावाला जागली आणि अर्ध्या तासातच पिठ मस्त फुगून आले. मग डोसे बनवायला काय ?

२) बटाट्याची भाजी

अंगोलाच्या पूर्व भागात बटाटे होतात. ( सफरचंदेही होतात ) पण त्यांच्या सिझन असला कि दुकानात दुसरे बटाटे
नसतात. हे बटाटे नेहमीच चांगले निघतात असे नाही. म्हणून मी पोटॅटो फ्लेक्स नेहमी घरी ठेवतो.
या भाजीसाठी पण तेच वापरले.

तेलाची हिग मोहरीची फोडणी करून त्यात हळद व मिरच्या परतल्या. मग कांदा परतला. त्यात पाणी ओतले आणि त्याला छान उकळी आल्यावर त्यात पोटॅटो फ्लेक्स टाकल्या. फोडणीत उडदाची डाळ टाकायची राहिली होती, म्हणून हाताशी नेहमी असणारे शेंगदाणेच टाकले. झाली भाजी तयार.

३) सांबार

सांबार मसाला मी नेहमी रुचिरातील प्रमाणानुसार घरून करून आणतो. तो संपला होता. इथेही केला असता पण कढीपत्ता मिळत नाही इथे.
मग कूकरमधे त्याचे घटक म्हणजे धणेजिरे पूड, मिरपुड, हिंग, तिखट असे किंचीत भाजून घेतले. तुरीची डाळही
भारतातूनच आणली आहे. ती पण जरा शेकून घेतली. मग त्यात पाणी ओतले व चिंचेचा कोळ, हळद टाकले.
घरात ज्या भाज्या होत्या ( ब्रोकोली, गाजर, मश्रुम ) त्या सांबारात घालण्याजोग्या नव्हत्या. सुट्टी होती म्हणून
घराजवळचे दुकानही उघडले नव्हते. तसेही तिथे टोमॅटॉ शिवाय दुसरी भाजी मिळालीच नसती. मग त्या सांबारात
फक्त कांदा घातला. आणि शिजवून घेतले. वरुन फोडणी दिली.. बर्‍यापैकी चव जमली.

४) चटणी

एवढ्याश्या चटणीसाठी पण उद्योग करावा लागला बरं का ? इथून समुद्रकिनारा जवळ असला तरी नारळाची अजिबात लागाव्ड नाही. बाजारात कधी असले तर ते वट्ट साडेसातशे रुपये किलो दराने लावलेले असतात.
आणि तेही खराब निघायची १०५ टक्के खात्री. नारळाचा किस मात्र मिळतो. तो छान स्वादाचा असतो.
तोच कोमट पाण्यात भिजत घातला. त्यात थोडे टिनमधले कोकोनट क्रीम घातले. तव्यावर परतून चण्याची डाळ व मिरच्या घातल्या. आणि वाटले. चटणी पण जमली.

सबस्टीट्यूट डोसा फ्रॉम दिनेश शेट्टी ऑफ अंगोला Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सब्स्टीट्यूट दोसा आणी इतर पदार्थ.. तोंपासु !!!!!!!!!

अब तारीफ करनेके लिये , आश्चर्य व्यक्त करनेके लिये शब्द संपलेत.. __/\__ Happy

वा खूपच छान
पण आमच्याकडे नॉनस्टिक तवा नसल्यामुळे डोसे नेहमी तव्याला चिकटतात
डोसा तव्याला चिकटू नये म्हणून काय करायच

व्वा! एकदम मस्त!!!

अहो इथे डोस्याचे सर्व साहित्य उपलब्ध असून सुध्दा कित्येकांना एवढा सुंदर डोसा बनवता येणार नाही. तुम्ही तर एकदम कमालच केलीत.

धन्यवाद प्रफुल्ल.. असे सर्व घटक उपलब्ध तसतील तेव्हाच खावासा वाटतो ! मग हे असे आपोआप सूचत जाते.
मनरंग, आरतीचा डोश्याचा बीबी पहा, तिथे चर्चा आहे.

दिनेश,
तुमची चिकाटी आणि कल्पकता अफाट आहे. ईतकया मर्यादित गोष्टीत असा हा साग्र-संगीत मेनू!
सुरेख रेसेपी आणि फोटो पण छान. पोटॅटो फ्लेक्स ची आयडिया मस्तच.

दिनेशदा खरंच तुम्ही ग्रेट आहात .तुम्ही सान्गितलेली इंस्टंट यीस्ट ची टीप सुपर्ब. त्याच्यामुळे खुपच छान ,हलके डोसे झाले . ते पण इथल्या थन्डी मध्ये..:)

कारण प्रयोग करून फसलेले पदार्थ सुधारण्यासाठी आणि ते घरात खपवण्यासाठी जास्त संशोधन आणि श्रम करावे लागतात!

Submitted by चंद्रा on 4 May, 2015 - 10:18>>>
ह ह ह हा हा हा हा

एकट्यासाठी एव्हढा उद्योग ? मी एकटा होतो तेव्हां दही + फरसाण शेव + मिळेल ती भाजी असे उद्योग करायचो. त्याबरोबर ब्रेड. इतका खटाटोप पाहूनच घाम फुटला. कमाल आहे खरंच.

Pages