पांढरा ढोकळा.

Submitted by आरती on 17 April, 2015 - 12:35
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
३० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

[माबोवर(जुन्या) पांढर्‍या ढोकळ्याची एकच पा.कृ सापडली. ती बरीच वेगळी आहे म्हणुन ही टाकली.]

तांदुळ - २ वाट्या,
उडदाची डाळ - १/२ ते १ वाटी (आवडी प्रमाणे),
पोहे - १ वाटी (जाड,मध्यम,पातळ कोणतेही)
हरबरा डाळ - ४ चमचे,
मेथी दाणे - १ चमचा,
आल+लसुण+हि.मिरची वाटणं - २ चमचे भरुन,
साखर्+मिठ - चवीप्रमाणे,
ताटलीला लावायला थोडे तेल.

क्रमवार पाककृती: 

तांदुळ, डाळी, पोहे आणि मेथी दाणे सगळे एकत्रच पाण्यात भिजत घालावे. साधारण ८-१० तास भिजवावे. मग गंधगाळ वाटुन घ्यावे. घट्ट झाकुन चांगले फसफसे पर्यंत ठेवावे. जास्तितजास्त बारा तासात फसफसते असा अनुभव आहे.

लसुण-आलं-मिरचीच वाटणं, साखर, मीठ घालुन पिठ चांगले हलवुन घ्यावे. ताटलीला तेल लावुन त्यात पिठ ओतावे. ताटली हलवुनच सारखे करावे आणि वाफवायला ठेवावे (मी ढोकळा स्टँड वापरते). साधारण १५ मिनीटात ढोकळा तयार होतो. कधी लवकरही होतो. वाफेचा रंग आणि वासावरुन अंदाज करता येउ शकतो.

बाहेर काढल्यावर ५ मिनीटांनी सुरीने रेघा पाडुन वरुन मोहरी आणी हिंगाची फोडणी घालावी. हवी असल्यास बारीक चिरुन कोथिंबीर घालावी.

या कृतीने ढोकळा अगदी पांढरा स्वच्छ आणि हलका होतो.

dhokala.jpg

वाढणी/प्रमाण: 
४ माणसांना पोटभर होतो.
अधिक टिपा: 

१.फोडणीत तिळ, जिरे पण चांगले लागतात.
२. पिठात साखर न घालता फोडणीत '२ चमचे साखरेचे' पाणी मिसळुन पण चांगली चव येते. पाण्यामुळे फोडणी ढोकळ्यात नीट शोशलीपण जाते.
३.जिने पा.कृ सांगीतली ती मैत्रिण वाटुन झाल्यावर २ चमचे दही घालुन ठेवते. पण मला ती चव जरा जास्तच आंबट वाटली म्हणुन मी आता घालत नाही.

माहितीचा स्रोत: 
गुजराथी मैत्रिण.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

फक्त तांदुळाचा माबोवरच्याच कृतीने करून पाहिला होता (सुलेखा यांची पाकृ होती बहुतेक). हाही करून पहावासा वाटतोय. मस्त कृती आणि फोटोही.. Happy

ढोकळा केला. चवीला अप्रतिम झाला आहे. ब्राउन बास्मती तांदूळ वापरल्यामुळे पांढराशुभ्र झाला नाही. तसंच पहिल्या घाण्याला बाहेर काढल्यावर लागलीच कापायला घेतल्यामुळे ढोकळ्यांच्या कडा दबल्या. त्यामुळे ढोकळे स्पाँजी दिसत नाहीत. पण झाले आहेत. Happy

थँक्यू आरती!

(ब्राउन राइस खपवायला आणखी एक पदार्थ मिळाला.)

pandhara-dhokala-aratistyle-maayboli.jpg

मृण्मयी, छान दिसतो आहे ढोकळा.
दिसत नाहीत. पण झाले आहेत.>>
फोटो झुम करुन बघितल्यावर दिसते आहे जाळी Happy

अश्विनी, फोटो कुठे आहे ?

धन्यवाद अश्विनी, मृण्मयी.

सिंडरेला,
हो तसाच लागतो. पण अर्चनाच्या आईची पद्धत थोडी वेगळी होती.
डाळ, तांदुळ भिजवुन, मग भाजुन त्याची वेगवेगळी पिठं दळुन आणायची आणि मग रात्रभर ताकात भिजवुन सकाळी चिमुट्भर सोडा, थोडे तेल घालुन ढोकळा करायचा.

शैलजा, कसा झाला कळव Happy

काल हौसेने ढोकळ्याची तयारी केली तर नवरोबा म्हणाले मला दोसा खायचा आहे, मग आहे त्याच पिठाचे दोसे घातले इतके सुंदर झाले की साहेबांनी रात्री मित्रांना बोलावले दोसे खायला.
ढोकळ्याचा मुहुर्त लागलाच नै Sad
या पिठाचे दोसे अप्रतिम होतात अगदि लोणी स्पाँज दोश्यासारखे लुसलुशीत. Happy

येयऽऽऽऽऽ मस्त झाला खाटा ढोकळा!
मी पीठात मीठ साखरेशिवाय काहीही घातलं नव्हतं, तरीही इडलीसारखी चव अजिबात लागली नाही. छान खाटा ढोकळ्यासारखीच चव लागली.

हा मसाला ढोकळा वाफवायच्या आधीचा फोटो:

khatta dhokala.jpg

हा साधा ढोकळा फोडणी घालायच्या आधीचा फोटो:

khatta dhokala1.jpg

मंजू, तुझे ढोकळा पात्र छान दिसतय नेहमीपेक्षा वेगळं. जरा डिटेल्स दे ना प्लीज.

ढोकळा पण मस्त जाळीदार हलका दिसतोय. Happy

शुभांगी, अगं तो इडली/ ढोकळा/ मोदक स्टीमर आहे, हा असा.

त्याबरोबर दोन इडलीचे स्टँड, एक ढोकळ्यासाठी थाळीटाईप डिश आणि एक मोदक/ अळूवडीचे उंडे इत्यादीसाठी जाळीची डिश मिळाली आहे. गरजेप्रमाणे हवी ती डिश आत ठेवता येते. त्या डिशला ठेवण्याउचलण्यासाठी कड्या आहेत.
जाळीदार डिश छोटी आहे, मोदकांना पुरत नाही. ७-८ इडल्या करायच्या असतील तरच मी इडलीच्या डिश वापरते, जास्त प्रमाणात करायच्या असतील तर माझा इडली स्टँड १६चा आहे तोच उपयोगाला येतो.

हो मला कड्या बघुनच छान वाटला तो. बघते आता. माझ्याकडचा चार थाळ्यांचा आहे स्टँड पण त्यात पाणी शिरत बर्‍याचदा.

पिवळ्या, म्हणजे नेहेमीच्या ढोकळ्यात डाळीचं पीठही असतं, इन फॅक्ट ते जास्त असतं आणि तांदळाची पिठी कमी अस्ते. म्हणून तो 'पिवळा' दिसतो, नॅचरली.

हा पूर्ण तांदळाचा आहे. म्हणून 'पांढरा' आहे. त्याला हळद घालून पिवळा का केला? Happy

अगं मुलीला पिवळा आवडतो म्हणून, नवरा म्हणाला घाल हळद ;).

पांढरा केला ना त्यात मीठ कमी झालं, पिवळ्यात बरोबर झालं त्यामुळे पिवळा पटकनं संपला Wink

अरे वा, बर्‍याच जणींनी केलेला दिसतोय Happy

सोनाली, मंजूडी, निल्सन
मस्त आले आहेत फोटो, ढोकळा छान दिसतो आहे.

मंजूडी,
चला शेवटी मला 'खाटा' ढोकळ्याच प्रमाणपत्र मिळाल Happy

पिवळ्या, म्हणजे नेहेमीच्या ढोकळ्यात डाळीचं पीठही असतं, >>
पूनम, प्रजक्ता
डाळ-तांदळाचा ढोकळा असेल तर उडदाच्या डाळीच्या समप्रमाणात हरबर्‍याची डाळ घ्यायची म्हणजे पिवळट रंगाचा ढोकळा होतो. आणि त्यात हळाद-हिंग असतो त्यामुळे तो छान पिवळा होतो. इन्स्टंट मधे मात्र डाळीच पिठच.

सगळ्या नविन प्रतिसादांना धन्यवाद.

Pages