'महिला दिन' मोझाम्बिकचा: भाग १

Submitted by आतिवास on 11 April, 2015 - 07:04

दर दोन-चार दिवसांनी कोणतातरी आंतरराष्ट्रीय दिन असतो असं मला हल्ली वाटायला लागलं आहे. मागच्या आठवड्यात कधीतरी सेलिया मला म्हणाली, “आम्ही सगळ्या एकसारखा कापुलाना शिवणार आहोत. तू पण घेशील का?” ‘कापुलाना’ हे इथल्या स्त्रियांचं पारंपरिक वस्त्र. मुळात ते काहीसं आपल्याकडच्या लुंगीसारखं असतं. पण आता बदलत्या काळानुसार विविध प्रकारचे कापुलाना आले.

हा एक प्रकार (निळा ड्रेस)
Local audience 31 October 2014.JPG

हा दुसरा प्रकार. टी शर्ट आणि स्कर्ट/पॅन्ट वर गुंडाळायचा.

Frelimo campaign Sept 14.JPG
मी कापुलाना कितपत वापरेन याबाबत मला शंका होती, पण त्यानिमित्ताने स्थानिक चालीरीती माहिती होतात म्हणून मी लगेच ‘हो’ म्हटलं. खरेदीसाठी १२० मेटिकाईश (म्हणजे २४० रूपये) देताना मी विचारलं, “कधी घालणार आहोत हा कापुलाना आपण?” त्यावर जिझेला म्हणाली, “महिला दिनाला.”

“८ मार्च तर झाला की नुकताच, पुढच्या ८ मार्चला मी इथं नसेन,” मी गोंधळले होते. त्यावर किटेरिया म्हणाली, “तो महिला दिन वेगळा. मोझाम्बिकन महिला दिन ७ एप्रिलला असतो.” माझं थोडं चुकलंच म्हणा – ८ मार्च अजून लांब आहे बराच. मोझाम्बिकन फार दूरचा विचार करत नाहीत हे एव्हाना मला माहिती झालं होतं! मग दुस-या दिवशी जेवणासाठी म्हणून (आणखी) दोनशे मेटिकाईशची वर्गणी दिली आणि ‘मोझाम्बिक महिला दिना’साठी मी सज्ज झाले.

पोर्तुगाल आक्रमणाविरुद्ध झालेल्या (दीर्घकालीन) लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या जोसिना माशेल (Josina Machel) यांचा ७ एप्रिल १९७१ या दिवशी मृत्यू झाला. त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस आहे. मी हे नाव आज पहिल्यांदा ऐकत होते. भारतात असताना मोझाम्बिकबद्दल मला काहीच माहिती नव्हती हे खरं. पण इथं येऊन मला आठ महिने झाले, पण हे नाव कधी कानावर पडलं नव्हतं. “कोण होत्या या बाई?” या माझ्या प्रश्नावर “समोरा माशेल (Samora Machel) या (स्वतंत्र) मोझाम्बिक राष्ट्राध्यक्षांच्या त्या पत्नी होत्या”, इतकी मोघम माहिती मिळाली. स्वतंत्र देशात जन्मलेल्या आणि वाढलेल्या पिढीचे ‘आयडॉल’ वेगळे असतात हे भारत आणि मोझाम्बिकमध्ये असलेलं साम्य तत्काळ लक्षात आलं. मी निमूटपणे माहिती शोधायला लागले. इतिहासातल्या स्त्रियांबद्दल माहिती मिळवणं सोपं नसतं हा अनुभव पुन्हा एकदा आला.

५ बहिणी आणि ३ भाऊ असलेल्या एका मध्यमवर्गीय मोझाम्बिकन कुटुंबात १० ऑगस्ट १९४५ या दिवशी जोसिनाचा जन्म झाला. राष्ट्रवादाचं बाळकडू तिला घरात आजोबांकडून मिळालं. तिचे वडील सरकारी ‘नर्स’ होते; पण त्यामुळे ‘वसाहतवादी पोर्तुगालविरोधी लढ्यातला’ जोसिनाच्या कुटुंबाचा सहभाग काही कमी झाला नाही. मुलींनी शिकणं फारसं प्रचलित नसण्याच्या कालखंडात तिला शिकायला मिळालं. त्याचं एक कारण म्हणजे तिच्या कुटुंबाला पोर्तुगीज सत्तेने दिलेला ‘Assimilados’ हा दर्जा. यान्वये काही ठराविक मोझाम्बिकन कुटुंबांना ‘गोरा’ दर्जा म्हणजे गो-या लोकांना मिळणारे अधिकार दिले जात.

१५ वर्षांची जोसिना विद्यार्थी संघटनेत सक्रीय सहभागी झाली; ही संघटना सांस्कृतिक आणि राजकीय जागृतीचे काम करत असे. त्या काळात टांझानिया देशातून फ्रेलिमो (Front for the Liberation of Mozambique) स्वातंत्र्यासाठी लढत होती. त्यात सामील होण्यासाठी देश सोडून जाण्याच्या प्रयत्नात जोसिनाला पाच महिन्यांचा तुरुंगवास झाला; तेव्हा ती फक्त १८ वर्षांची होती.

चार महिन्यांनी जोसिनाचा देशाबाहेर जाण्याचा दुसरा प्रयत्न यशस्वी झाला. मात्र टांझानियाला जाण्याऐवजी ती सहका-यांसोबत स्वाझीलॅन्डला पोचली. पोर्तुगीज पोलीस तपास करत तिथवर पोचतील अशी बातमी मिळताच तिच्या गटाने जोहान्सबर्गकडे (दक्षिण आफ्रिका) प्रयाण केलं. हा प्रवास चालत, बसने, ट्रकने – जे मिळेल त्याने केला. पुढे ते बोत्स्वानात (Botswana) गेले आणि तिथून त्यांना परत स्वाझीलॅन्डला पाठवलं गेलं. इथं आफ्रिकेतल्या हितचिंतकांच्या मदतीने युनायटेड नेशन्सच्या मदतीने अखेर जोसिना तिच्या १७ सहका-यांसोबत इच्छित स्थळी पोचली. स्वातंत्र्यलढ्यात लोकांचं आयुष्य कसं असतं याची त्यावरून पुन्हा एकदा कल्पना येते.

वयाच्या विसाव्या वर्षी जोसिना टांझानियातल्या ‘मोझाम्बिक इन्स्टिट्यूट’ची साहाय्यक संचालक (असिस्टंट डायरेक्टर) म्हणून कामाला लागली. स्वित्झर्लंडमध्ये उच्च शिक्षणाची संधी नाकारून तिने फ्रेलिमोच्या ‘महिला विभागा’ची जबाबदारी घेतली. स्वांतत्र्यलढ्यात सहभागी होण्याची संधी स्त्रियांना मिळावी म्हणून त्यांना राजकीय आणि सैनिकी प्रशिक्षण देण्याची फ्रेलिमोची योजना होती. तीन महिन्यांच्या प्रशिक्षणाच्या २५ स्त्रियांच्या पहिल्या तुकडीत जोसिना सामील झाली. (याच काळात तिची आणि समोराची भेट झाली.) स्त्री सैनिकांची तुकडी प्रत्यक्ष युद्धक्षेत्रात काम करत असे. पुढे आरोग्य, शिक्षण, मुलांचे संगोपन अशा समाजसेवी क्षेत्रांतही फ्रेलिमो महिला विभागाने काम उभे केले, ज्याची मूळ कल्पना जोसिनाची होती.

फ्रेलिमोत स्त्रियांचा सहभाग सर्व पातळ्यांवर वाढावा यासाठी जोसिना सदैव प्रयत्नशील राहिली. मोझाम्बिकन परंपरा ‘पुरुषसत्ताक’ आहे असं आजही जाणवतं. काही वेळा परकीय शत्रुंशी लढणं तुलनेनं सोपं असतं. पण आपल्याच लोकांना स्त्रियांना समतेची वागणूक देण्यासाठी प्रेरित करणं अवघड असतं. अवघ्या २५ वर्षांच्या आयुष्यात जोसिनाने या दोन्ही पातळ्यांवर काम केलं हे मला विशेष महत्त्वाचं वाटतं.

फ्रेलिमोच्या ‘आंतरराष्ट्रीय संबंध खात्याच्या महिला विभागाची’ प्रमुख म्हणून नियुक्ती झाल्यावर तिने अनेक आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर स्त्रियांच्या समस्या, त्यांचे हक्क आणि त्यांचा सहभाग असे अनेक विचार मांडले. तिने काही लिखाण केलं आहे की नाही मला कल्पना नाही. एक तर ती अल्पायुषी होती; आणि जाणत्या वयातला तिचा बहुतेक काळ धकाधकीचा होता. पण तिचे विचार अधिक समजून घ्यायला हवेत असं मला वाटतंय आता.

१९६९ मध्ये जोसिना आणि समोरा यांचा विवाह झाला; त्यांना एक मुलगा झाला. १९७० मध्ये जोसिना आजारी पडली. उपचार चालू असतानाही तिचं काम चालू होतं. पण अखेर ७ एप्रिल १९७१ रोजी ती टांझानियात मरण पावली. १९७२ मध्ये फ्रेलिमोने ७ एप्रिल हा ‘मोझाम्बिक महिला दिन’ म्हणून जाहीर केला तेव्हा मोझाम्बिकमध्ये पोर्तुगालचीच सत्ता होती. स्वातंत्र्य मिळायला अजून तीन-सव्वातीन वर्ष बाकी होती.

आज मोझाम्बिकमध्ये स्त्रियांची स्थिती कशी आहे? एका वाक्यात सांगायचं तर ‘फारशी चांगली नाही!’

जगातल्या सर्व गरीब कुटुंबाचं चित्र जवळपास सारखंच असतं – भाषा, धर्म, हवामान, राजकीय स्थिती काही असो. मोझाम्बिक हा देश ‘गरीब’ वर्गात आहे. इथं मला अनेकदा भारतातली खेडी आठवतात. स्त्रिया कमी शिकतात; घरकाम ही त्यांचीच जबाबदारी वगैरे अनेक गोष्टी इथंही दिसतात. इकडे मुलीच्या वडिलांना मुलाकडून पैसे मिळतात; त्यामुळे पैशाच्या लोभाने मुलींना फार लवकर लग्नात अडकवलं जातं. कौटुंबिक अत्याचार आणि आरोग्य असे अनेक प्रश्न त्यातून उद्भवतात. अर्थार्जनाची आधुनिक कौशल्य कमी असल्याने बरेचदा स्त्रिया ‘स्वस्तातल्या कामगार’ असतात.

संसदेत आणि विधानसभांमध्ये स्त्रियांची संख्या चांगली आहे (सुमारे ४०%), पण त्या कितपत सक्रीय आहेत ते माहिती नाही. बँका, सरकारी कार्यालयं अशा ठिकाणी स्त्रिया दिसतात आणि सहजतेने वावरतात. चारचाकी चालवणा-या खूप स्त्रिया दिसतात – पण हे फक्त शहरांत.

वाचून, ऐकून, पाहून स्त्रियांच्या स्थितीबाबत माझं जे मत तयार होतंय, ते तपासून घ्यायची एक उत्तम संधी अशा दृष्टिकोनातून मग मी ७ एप्रिलची वाट पाहायला लागले.

भाग २

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह किती छान.. अगदीच कल्पना नसलेल्या देशा बद्दल काही वाचायला मिळतंय.. अजून लिहा..

आपण ज्या ज्या देशांमधून राहात असतो त्या त्या देशांचे नॅशनल ड्रेस परिधान केले कि लोकल्स शी पटकनी मैत्री
जुळून जाते.. त्यांच्याशी जवळीक साधण्याकरता ही पहिली पायरीच !!!

आणी हो.. शिवलेल्या कापुलिना चा फोटो पाहायला आवडेल Happy

I am in Angola, which was also a Portuguese colony. I can relate to this. Stitching dress from same material, gives them feeling of strength in unity. What I have observed is that, it is always elderly ladies, who from such groups. Young girls or ladies are rarely seen in such groups. What's your observation ?

मस्त लेख! जोसिना माशेल माहितच नव्हत्या. अश्या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची ओळख करुन दिल्याबद्दल धन्यवाद.

दिनेश,
माझा अनुभव असा की, प्रौढ स्त्रिया (पुरूष) जे परंपरा म्हणून करतात, ते नवी पिढी फॅशन म्हणून करते.
शिवाय कापुलानाच्या वापरात बरीच लवचिकता आहे.
हं! असं कदाचित म्हणता येईल की मिश्रवंशीय स्त्रिया (उच्चवर्गीय) स्थानिक परंपरेत तितका रस घेत नाहीत - पण मर्यादित अनुभवाच्या आधारे मी काही ठोस विधान करू नये हे आहेच!

जो देश जगाच्या नकाशावर कुठे येतो हे देखील माहीत नव्हते त्याबद्दल जाणून घेणेही ईंटरेस्टींग!
आवडला लेख, पुढील भागाच्या प्रतिक्षेत.

आभार अतिवास,

अश्या प्रकारचा पेहराव मी अनेक आफ्रिकन देशात ( केनया, नायजेरिया, अंगोला ) बघितलाय, आणि खास करुन एखादा ग्रुप, एखाद्या छोट्या गावातून शहरात जात असेल, तर असा सारखा पेहराव करतात.
माझ्या ऑफिसमधे जास्त करुन तरुण मुली आहेत ( असत ) , पण अशा सामाजिक कार्यांत ना त्यांचा सहभाग असतो, ना त्यांना विशेष माहिती वा रस असतो. अर्थात माझेही निरिक्षण एका मर्यादीत गटापुरतेच मर्यादीत आहे.

आतिवास तुमची विपू बंद आहे म्हणून इथेच विचारते... भीतीच्या भिंती ही मालिका इथेही लिहाल का?
फारच आवडली मला. (तसे तुमचे सर्वच लेखन आवडते. ) Happy

Nidhi,
धन्यवाद.
'भीतीच्या भिंती' लेखमाला सध्या 'मिसळपाव'वर लिहितेय खरी - पण अनियमित.