जिरवणी

Submitted by रश्मी. on 8 April, 2015 - 01:40
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

आमसुले, चवीनुसार साखर, मीठ, कोथिम्बीर

क्रमवार पाककृती: 

कृती: काहीजण याला सार म्हणून पण ओळखत असतील. कारण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी.
तर ८ ते १० आमसुले आधी एका पातेल्यात पाणी घालुन दाटसर उकळुन घ्यावीत. गार करायला ठेवावीत. नन्तर दुसर्‍या भान्डयात ती कुस्करुन गाळुन हवे तितके थन्ड पाणी घालुन त्यात चवीनुसार साखर, मीठ घालुन चान्गले ढवळुन घ्यावे. आवडत असल्यास याच गाळलेल्या पाण्यात कोथिम्बीर बारीक चिरुन घालावी. जेवण झाल्यावर किन्वा जेवणाच्या मध्ये प्यायले तरी चालेल, नव्हे पळेल. हे तुम्ही दिवसभरातुन कधीही पिऊ शकता, अगदी रात्रीही आमच्या जेवणात असतेच. उन्हाळ्याचे दोन्ही महिने हे रोज असतेच.

यामुळे आम्लपित्त, उन्हाळ्याने येणारा थकवा हे दोन्ही कमी होते. काहीजण यात जीरे वा जीरेपुड पण घालतात.

वाढणी/प्रमाण: 
८ ते १० आमसुले ४ जणान्च्या जिरवणी साठी पुरतात.
अधिक टिपा: 

आम्ही याला फोडणी देत नाही, आपल्याला आवडल्यास द्यावी. आमसुले चान्गली रसदार घ्यावीत. चिपाडात विशेष रस नसतो.

माहितीचा स्रोत: 
सासुबाई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मला ही कृती हवी होती. धन्यवाद. आज आणते ताजी आमसुले. धन्यवाद.

लसूण घातले तर बरे लागेल का?

हो अमा, काही जण लसुण ठेचुन घालतात, पण लसुण सोल कढीतच बरा लागतो, यात नाही. तुम्ही घालुन बघा, नाही आवडला तर पुढच्या वेळी घालु नका.

जिरवणी दुपारी बनवुन फ्रिझमध्ये ठेवली तरी चालते.

आरती, अमा धन्यवाद.:स्मित:

मी उन्हाळ्याच्या सुट्टीत दुपारी आई झोपली की बनवून मी आणि भाऊ पीत असू. गॅसपाशी जायला बंदी असल्याने नुसतीच पाण्यात भिजत घालून करे. नो कोथिंबीर कारण विळी काढून चिरुन घेताना आवाज होईल. "भोलानाथ दुपारी आई झोपेल काय? आमसुलं हळूच घेताना आवाज होईल काय?" हा प्रॉब्लेम असे Wink

मस्तं.
डबाभर आमसूले आहेत.
सोलकढी करायला ओला नारळ नाही म्हणून पडून आहेत.
या उन्हाळ्यार सार्थकी लावता येतील.

काही जण लसुण ठेचुन घालतात, पण लसुण सोल कढीतच बरा लागतो, यात नाही.>> अगदी अगदी! यात जीरेपावडर टाकून / साजूक तुपावर हिंग/जिरं/मिहरीची फोडणी देऊन छान लागतं पण मला बिना फोडणीचे जीरेपावडर घातलेले सार जास्त आवडते. उन्हाळ्यात रात्रीच्या जेवणाला भात, बोटभर तूप आणि हे सार अगदी हलका आणि मस्त आहार आहे! पित्ताचा त्रास असलेल्यांना नक्की फरक पडेल.

नुसते आमसूल पाणी (आमसुले पाण्यात भिजवून ते पाणी) प्यायलाही मजा येते. उन्हाळ्यात दुपारी प्यायला मस्त पेय. मीठ (साधे) घालण्याऐवजी काळे मीठ, शेंदेलोण, पादेलोण घालून आणखी रूचकर व पाचक पेय तयार होते. जिरे भाजून भरडून घालायचे किंवा भाजक्या जिऱ्याची पूड.
मी शाळा कॉलेजात असताना खोटी सोलकढी तयार करायचे, त्यात आमसुले, ताक, मीठ, किंचित साखर व कोथिंबीर असायची. क्वचित कधी जिरेपूड किंवा जिऱ्याची फोडणी. दिसायला सोलकढीसारखी असली तरी चव वेगळी व मस्त लागायची म्हणून मग ती 'खोटी सोलकढी'. लसूण आवडीवर अवलंबून.

मस्तच. भारतातून आणलेले कोकम सरबत संपले की मी आमसुलं पाण्यात भिजवून त्याचं सरबत करते. आता हा प्रकार करून बघेन.