शहरातली ’समोवार’ जेव्हा बंद होत जातात..

Submitted by शर्मिला फडके on 6 April, 2015 - 00:26

’समोवार’ हे शहरातल्या एका रेस्टॉरन्टचं नाव असतं पण अनेकांकरता ते केवळ खाण्या-पिण्याचं ठिकाण नसतं. त्यांच्याकरता ते वैयक्तिक भावना गुंतलेलं एक ठिकाण असतं ज्यात आनंदाचे, दु:खाचे, जिव्हाळ्याचे, नैराश्याचे, उमेदीचे, यशाचे, अपयशांचेही असंख्य क्षण भरुन असतात. मुंबईसारख्या गजबजाटी, कोलाहल भरुन राहिलेल्या शहरांमधे अशीही काही निवांत बेटं असतात ज्यांचं नाव ’समोवार’ असतं.
--
सकाळचे अकरा वाजले की एक परदेशी तरुण मुलगी आपल्या लहान मुलीला प्रॅममधे घालून रोज त्या रेस्टॉरन्टमधे यायची, पॉट टी मागवायची आणि तिथल्या टेबलावर बसून पुस्तक वाचायची किंवा पत्र लिहायची. लिहिताना काहीवेळा तिच्या डोळ्यातून अश्रू यायचे. चेहराही अनेकदा दमलेला दिसायचा. रेस्टॉरन्टच्या मालकिणीच्या ते लक्षात आलं तेव्हा तिने ऑर्डर दिलेली नसतानाच त्या टेबलावर ऑमलेट आणि ज्यूसही पाठवायला सुरुवात केली. पत्र लिहिणारी सावकाश ते संपवायची. मग बिल देऊन मुलीला घेऊन निघून जायची. जाताना रेस्टॉरन्टच्या मालकिणीचे आभार मानायला विसरायची नाही. मग हळू हळू गप्पा सुरु झाल्या. तेव्हा कळलं की ती तरुण मुलगी आपल्या इंग्लंडमधल्या नातेवाईकांना खूप मिस करतेय. भारतात रहाण्याची, इथल्या आयुष्याशी जुळवून घेण्याची सवय करण्याची धडपड करताना थकून जातेय. आपल्या लहान मुलांचं आवरुन, घरातलं काम करुन, नव-याचं खाणंपिणं करुन तो कामावर गेला की ती इथे येते आणि इथेच फ़क्त तिला निवांत वेळ मिळतो घरच्यांना पत्र लिहून खुशाली कळवण्याचा, तिकडच्या मित्र-मैत्रिणींना इथल्या गमती जमती कळवायला. काही दिवसांनंतर एका संध्याकाळी ती आपल्या नव-यासोबत तिथे आली. तेव्हा रेस्टॉरन्टच्या मालकिणीला कळलं की तरुणी शशी कपूरची बायको, जेनिफ़र केन्डल कपूर आहे. प्रॅममधली ती चिमुरडी होती संजाना कपूर. ते रेस्टॉरन्ट होतं नुकतंच बंद झालेलं सामोवार.

सामोवार बंद होणार हे कळल्यावर संजाना कपूरने ही आठवण सांगीतली. ती जेव्हा सांगते की ती अक्षरश: या जागेत वाढली आहे, लहानपणापासूनचे अनेक आनंदाचे क्षण या जागेत साठून आहेत तेव्हा त्यात अजिबात अतिशयोक्ती वाटत नाही.

एकटा, एकाकी आरा, कॅनव्हासचं ओझं घेऊन हिंडणारा, समोवारमधे बिनदुधाचा चहा पित गप्पा मारणारा. कधी समोवारमधे न खाणारा. त्याला वांग्याचं भरीत खावसं वाटलं तेव्हा त्याने समोवारमधूनच तेरा रुपये घेतले वांगी, टोमॅटो, मिरच्या आणायला आणि मग तिथल्या किचनमधे ते बनवलं.

मुंबईतून फ़्रान्सला गेलेले आणि तिथून पुन्हा पुन्हा मुंबईत येत राहिलेले, परत जात राहिलेले रझा जहांगिरमधे झालेल्या त्यांच्या एका चित्रप्रदर्शनानंतर खूप उशिरा, सगळी गर्दी ओसरल्यावर सामोवारमधे चहा प्यायला आले आणि जाताना टेबलावरच्या पेपर नॅपकिनमधे लिहून गेले- “किप मी बॅक, डोन्ट लेट मी लिव्ह, क्लास्प मी टू दिज शोरस- मुझे आप यहां रोक लिजिए-”.

लक्ष्मण श्रेष्ठ नेपाळवरुन जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकायला आले चित्रकलेच्या ओढीने. घरच्यांचा विरोध होता त्यामुळे जवळ पैसे नसायचेच. होस्टेलवर जेमतेम रात्री झोपण्यापुरता आसरा. अशात जे जे मधून पास आऊट होत असतानाच त्यांचं प्रेम जडलं एका सुंदर, श्रीमंत घरातल्या मुलीवर. जहांगिर आर्ट गॅलरीच्या पाय-यांवर ते तिच्याशी खूप वेळ गप्पा मारत बसायचे. सामोवारच्या उषा खन्नांनी बरेच दिवस ते पाहिलं आणि त्याला आत रेस्टॉरन्टमधे येऊन बसत जा असं सुचवलं. तो मुलगा संकोचला. त्याच्याजवळ तिथे रोज चहा प्यायला पैसे नव्हते. पण सामोवारमधे चालत होतं जमेल तेव्हा पैसे दिलेले. तो मुलगा हळू हळू तिथे इतका रमला की एकदा त्याने विचारलं की ’मूली का आचार’ का बनवत नाही तुम्ही इथे? हा खास नेपाळी पदार्थ त्याला त्याच्या मैत्रिणीला खिलवायचा होता. तेव्हा त्याच्याकडूनच रेसिपी घेऊन ते बनवलं गेलं. मग तो पदार्थ मेनू कार्डावर आला. लक्ष्मण श्रेष्ठांचं पुढे त्या मुलीशी म्हणजे सुनिता परळकरांशी लग्न झाल्यावर सामोवारच्या स्टाफ़ने त्यांना पार्टी दिली. लक्ष्मण आणि त्यांची बायको सामोवारमधे नियमित येत राहिले, अगदी परवा सामोवार बंद होईपर्यंत. लक्ष्मण आवर्जून सांगतात की गरज होती तेव्हा पेंटींगची मोठी कामं त्यांना मिळाली हुसेनसारख्या इथेच मिळालेल्या मित्रांनी करुन दिलेल्या इथल्या ओळखींमधून.

लक्ष्मण श्रेष्ठ, आरा, जेनिफ़र कपूरसारखे अनेक जन असतात या अवाढव्य, गजबजलेल्या शहरात पण समोवारसारख्या जागा मात्र अगदीच मोजक्या, शेवटच्या काही उरलेल्या.

मुंबईसारख्या शहरात असं एखादं रेस्टॉरन्ट अशा या अनेकांकरता काय असतं नेमकं?

जे जे स्कूल ऑफ़ आर्टमधे शिकणारे, तिथून डिप्लोमा घेऊन बाहेर पडलेले आर्टिस्ट, थिएटर, सिनेमामधे काही नवं करु पहाणारे, लिहू पहाणारे, कविता करणारे, स्वप्न पहाणारे हजारो तरुण आणि तरुणी.
काय हवं असतं त्यांना शहरात?

जवळ पैसे नसतात तेव्हा त्यांना उधारीवर खाण्याची मुभा, काम मिळवायला फोन करायला लागतो म्हणून कॅश काउन्टरजवळच पब्लिक बूथची सोय, चित्रकारांना त्यांची चित्र विकत घेऊ शकतील अशांशी ओळखी, लेखकांना लिहायला एक निवांत टेबल, कार्टुनिस्टकरता समोर अनेक इंतरेस्तींग चेहरे, एकंदरीत अनेकांना दिवससभर हवी तितकी, हवा तितका वेळ बसता येईल अशी जागा, ज्यांच्याकडे परमनन्ट अड्रेस नाही अशांना पत्रव्यवहार करण्याकरता एक पत्ता. कवी, पत्रकार, उभरते लेखक, जाहिरात व्यावसायिक, सिनेमा नाटकांमधे काम करणारे सगळेच एका ठिकाणी जमा होणार, मग त्यातून अनेक पुढील काळात दंतकथांचं स्थान मिळालेल्या गोष्टी घडणार. पत्रकारांना शहरातल्या सांस्कृतिक घडामोडी टिपायला वाव.. ताज्या बातम्या कळण्याचं, बातम्या घडण्याचं एक ठिकाण.

दमून भागून समोवारमधे येऊन टेकणं हे घरात येऊन टेकण्यासारखंच. रेस्टॉरन्ट अनेकांच्या लग्नाला साक्षीदार राहिलं, त्यांच्या डिव्होर्सलाही ते साक्षी होतंच. जतीन दासांनी आपलं लग्न सामोवारमधेच पंडिताला बोलावून इथल्या स्टाफ़च्या साक्षीने लावलं आणि मग त्याची आठवण म्हणून रेस्टॉरन्टच्या छतावर न्यूड काढलं. लग्न टिकलं नाही पण त्याने काढलेलं छतावरचं पेंटींग टिकलं अनेक वर्षं. मग एका पावसाळ्यात गळणा-या छतावरचं न्यूडही पुसलं गेलं. जतीन दासांनी नवं लग्न केलं. ते आणि त्यांची नवी बायको येत राहिले. नाती जमली, तुटली, पुन्हा जुळली इथे.

गीव्ह पटेल, अकबर पदमसी, जहांगिर सबावाला, अर्पना कौर, अंजोली इला मेनन, जोगेन चौधरी, अल्ताफ़, प्रोतिमा बेदी, रत्ना पाठक, नासिरुद्दीन शहा, शाम बेनेगल, अमोल पालेकर.. न्यू वेव्ह सिनेमाच्या जन्माला, बहराला, आधुनिक, समकालिन कला मुंबईत रुजत जाताना समोवार साक्षी होतं.
ज्ञानेश्वर नाडकर्णी, बेहराम कॉन्ट्रॅक्टर, रणजित होस्कोटे, निस्सिम इझिकेल, अनिल धारकर, डॉम मोरेस, फ़्रॅन्क सिमोससारखे अनेक जण मुंबईच्या बदलांच्या, घडामोडींच्या नोंदी वृत्तपत्र, कविता, लेखांमधून वेध घेणारे इथे रमले, प्रसिद्ध झाले, अस्ताला गेले.
फ़ॅशन्स बदलल्या, बेल बॉटम आला, नाहिसा झाला, पुन्हा आला. बलराज सहानी पासुन आय एस जोहर पर्यंत, शोभा राजाध्यक्ष पासुन डॉली ठाकोर, पर्ल पदमसी, कबीर बेदी, शाम बेनेगल, लक्ष्मण श्रेष्ठ, परिक्षित सहानी, आरा, सत्यदेव दुबे अशांना यशाच्या उंबरठ्या अलिकडे झगडताना आणि मग तो ओलांडून जाताना पाहिलं.

जेव्हा खिसे रिकामे असलेले भणंग सृजनाच्या उर्मी मनात घेऊन शहरातल्या रस्त्यांवर, गल्ल्यांमधून भटकत असतात तेव्हा त्यांना अशा जागांची गरज असते. शहरातली कला-साहित्याची संस्कृती मग इथेच रुजते, फ़ोफ़ावत रहाते.
समोवारसारख्या जागा गजबजलेल्या शहरातले सांस्कृतिक ओऎसिस असतात. अशा जागा फ़क्त भेटण्याच्या, खाण्यापिण्याच्या जागा नसतात. इथले खाद्यपदार्थ उकृष्ट असतीलच असं नाही पण ते त्यांच्या चवीला, खिशाला परवडणारे, रुचणारे बनत गेलेले असतात.
इथे येणारी माणसं घडतात, मोठी होतात आणि मग जागाही मोठी होते, प्रसिद्ध होते. ग्लॅमरसही होते. पण ती उर्मट होत नाही, स्नॉबिशही नाही. ती येणा-याला जिव्हाळा देत रहाते.

IMG_20150330_170446458_HDR_0.jpg

हळू हळू शहर बदलत गेलं. बॉम्बेचं मुंबई झालं. रस्ते बदलले, नकाशे बदलायला लागले. इराणी कॅफ़े एकामागोमाग एक नाहिसे होत गेले, कॉफ़ी हाऊसेस बंद पडत गेली. स्ट्रॅन्ड सारखी घरगुती जिव्हाळ्यातून चालवलेली पुस्तकांची दुकाने बंद पडली. मिनर्व्हा, मेट्रो, रॉक्सी बंद पडलं, नाट्यगृह बंद पडली. एकेका फ़्लायओव्हरखाली अशी अनेक ठिकाणं जमिनदोस्त होत गेली. शहराच्या नकाशावरची निवांत बेटं होती जी हळू हळू खचत गेली, शहरातल्या वाढत्या चकचकाटात, झगमगाटात बुडून गेली.
तरी सामोवार होतं. ते होतं तोवर या बदलांची झळ लागली नाही. पण आता तेही नाही आणि मग तेव्हा प्रश्न पडतो की आता यानंतर काय? अजून एखादी अशी जागा आहे का शहरात याचा विफ़ल शोध घ्यायचा की तशी निर्माण होईल अशी आशा करत रहायचं की आता काळ इतका बदललाच आहे तर अशा जागांची गरजही नसणार आपल्याला आणि कुणालाच असं समजत रहायचं?

शहरातली समोवार जेव्हा बंद पडतात शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो. आणि मग अनेकांच्या नॉस्टेल्जियाचं एक गाठोडं बांधलं जात आणि ते शहराच्या इतिहासात फ़ेकलं जातं. अनेक जण हळहळतात. त्यात सामान्य असतात, नोकरी असलेले असतात, नसलेले असतात. शिकणारे असतात, स्ट्रगलर्स असतात. सेलेब्रिटी असतात. स्थिरावलेले, नाव कमावलेले, स्थलांतरीत, पर्यटक, अगदी हायकोर्टातले वकिल, दलाल स्ट्रीटवरचे बनिये असे अनेक जण त्या हळहळणा-यांमधे असतात. त्या जागेत त्यांच्या भावना गुंतलेल्या असतात. आठवणी अडकलेल्या असतात तिथल्या टेबलखुर्च्यांमधे. ते जेव्हा कोणीच नव्हते तेव्हा त्यांना एक कप चहावर तासनतास बसून रहायला, सिगरेटच्या धुरात विचारांची वर्तुळं काढायला, चर्चा करायला, योजना आखायला, त्या कागदावर मांडायला, इतरांची मतं आजमावून बघायला, आपल्यासारख्या इतर काहींचं नेमकं काय चाललय काय चाललेलं नाही ते चाचपडायला इथे जागा मिळालेली असते. खिशात पन्नास रुपये असणा-याला आणि पाच हजार असणा-यालाही सामावून घेण्याची क्षमता अजून कुठे असणार?
इंच इंच जागेचा हिशेब लावणा-या महागड्या शहरात अशा बेहिशेबी जागांचं मोल करता येत नाही.

सुख वाटायला, दु:ख शेअर करायला, निराशा गिळून टाकायला अशा जागांची गरज असते. शहराच्या कॉस्मोपोलिटन संस्कृतीमधे संवाद निर्माण व्हायला, एकजिनसीपणा वाढवायलाही या जागा गरजेच्या असतात.
समोवार बंद पडतात तेव्हा भेटण्याच्या जागा हरवतात. गप्पांची ठिकाणं हरवतात. पिढ्यानपिढ्या कुटुंबांनी, मित्रमैत्रिणींनी एकत्रित घालवलेले अनेक क्षण ज्या जागांमधे भरलेले असतात त्या जागा शहरातल्या रस्त्यांवरुन अचानक नाहिशा होतात.
शहरातली लोकं मग आठवणी काढत रहातात. कधी वे साईड इनच्या, कधी भुलाभाई मेमोरियल सेंटरच्या, आर्टिस्ट सेंटरच्या, कोप-यावरच्या इराण्याच्या.
अशा जागेला त्याचं असं खास व्यक्तिमत्व असतं, जे इथे येणा-यांच्या व्यक्तिमत्वातून उत्क्रांत होत जातं, घडत जातं. तेही मग हरवतं.
आणि मग शहर एकसुरी बनत जातं. जास्त यांत्रिक. मल्टीनॅशनल बॅन्क्स, ब्रॅन्डेड शॉप्स, चेन रेस्टॉरन्ट्सच्या साचेबद्ध सजावटीखाली शहर आपला चेहरा हरवत जातं. गुळगुळीत होत जातं शहराचं व्यक्तिमत्व. इतर चार आंतरराष्ट्रीय शहरांसारखंच ते एक.
शहराचं सांस्कृतिक अस्तर थोडं थोडं विरत जातं. शहर थोडं थोडं झिजत जातं. थोडं थोडं पोकळ होत जातं.
शहरातला उबदारपणा, लोभसपणा थोडा थोडा हरवत जातो.
--
शहराला हवी असते एक जागा, जिथे गप्पा होतील निवांत, प्रेमात पडलेल्यांना नुसतंच बसता येईल एकमेकांच्या सहवासात संध्याकाळच्या सावल्या लांबेपर्यंत. स्ट्रगलर्सना आपली उमेद टिकवायला, निराशा लपवायला जागा मिळेल, भविष्याची स्वप्न रंगवायला, रंगवलेली कागदावर उतरवायला. कलाकारांना, लेखक-कवींना निवांतपणा मिळेल. एखाद्या वयस्कर, स्पर्धेत मागे पडलेल्या कलाकाराला आसपासच्या ताज्या, उमेदीच्या तरुण कलाकारांच्या सहवासात नवी उर्जा मिळेल. जागा नुसती निवांत असून चालत नाही. तशी तर अनेक एकट रहाणा-यांच्या फ़्लॅटमधेही ती असतेच. पण गरज असते वातावरणातून उर्जा मिळण्याची, इन्स्पायर होण्याची. सातत्याने येणा-या सर्जनशील व्यक्तींमुळे निर्माण झालेल्या सिनर्जीची. बिझिबीने आपले कॉलम मागून कॉलम समोवारच्या टेबलांवर बसून लिहिले ते अशा वातावरणामुळेच. नाहीतर निवांतपणाची त्याला काय कमी असणार?

मॉलच्या पाय-यांवर, फ़ूडकोर्टात, स्टारबक्स, सीसीडीमधे, टी लाउन्जेसमधे हे सगळं कसं शोधायचं? नवी पिढी खरंच तिथे काही कमावणार असतात की जे जवळ जे आहे, जे मिळू शकलं असतं तेही गमावतात? सोशल मिडियामधे, तिथल्या ग्रूप्समधे चर्चा होतंही असतील कदाचित पण वैयक्तिक सहवासांमधून जे मिळतं त्याला पर्याय नाहीच.
इतक्या जलद आणि मोठ्या प्रमाणावर नकाशे बदलत जात आहेत की लोकं विसरुनच जातील शहरात अशी बेटंही होती जिथे साधेपणा, आपलेपणा, उबदारपणासोबत सांस्कृतिक जिव्हाळा फ़ुकट मिळत होता.
--

लेख लोकमतच्या 'मंथन' पुरवणीमधून पुनर्मुद्रित.
संदर्भांकरता आभार- 'समोवार'- पुस्तकः लेखिका उषा खन्ना.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हळव्या आठवणींना जागे करणारा आणि हळवे करून सोडणारा उत्कृष्ट लेख. निव्वळ नॉस्टाल्जिया नव्हेच. त्याहीपलीकडचे खूप काही तरी.
सुरुवातीच्या दिवसांत खैबर, समोवारचे दडपण यायचे. खैबरचे त्याची सजावट आणि किंमतींमुळे तर सामोवरचे तेथे येणार्‍या माणसांमुळे. पण हळूहळू समोवरने आपलेसे केले. जहांगिरमधले प्रदर्शन बघून झाले की समोवर ठरलेलेच. फार काही खायचे नसे पण नुकत्याच बघितलेल्या प्रदर्शनावर ताज्या ताज्या गप्पा व्हायलाच हव्या असत. एक समोश्यावर पोट भरत नसे पण पोटभर गप्पा मात्र होत. कधीकधी आमच्या टेबलावर एखादा मार्मिक शेरा झाला की आजूबाजूची टेबलेही कान टवकारत (हे अर्थात वायसे वर्सा..) तेव्हा कॉलर थोडी ताठ होई. पावसातले समोवर अधिकच आपलेसे वाटे. दोन वर्षांपूर्वी शेवटचे जाणे झाले ते प्रफुल्ला डहाणूकर यांच्या प्रदर्शनाच्या वेळी. तशा अधूनमधून कित्येक वर्षे समोवर बंद होण्याच्या बातम्या येतच होत्या, पण ते खरोखरच बंद होईल असे मात्र वाटले नव्हते.
au revoir.. good-bye till we meet again समोवर !

सुंदर लेख!

मॉलच्या पाय-यांवर, फ़ूडकोर्टात, स्टारबक्स, सीसीडीमधे, टी लाउन्जेसमधे हे सगळं कसं शोधायचं? नवी पिढी खरंच तिथे काही कमावणार असतात की जे जवळ जे आहे, जे मिळू शकलं असतं तेही गमावतात? >> मी इथे एक वेगळेच स्थित्यांतरण पाहतो आहे. तरूणाईला आता मॉलच्या राज्यातून सुटका हवी आहे. शहराच्या मध्यवस्तीत नवनवीन छोटी छोटी दुकाने, रेस्तरों आणि कॉफी शॉप्स उघडत आहेत आणि तिथे तरूणाई एकत्र येऊन चर्चा करताना दिसते. काही ठीकाणी तर तुमचा फोन, लॅपटॉप दूर ठेवा आणि गप्पा मारत कॉफी प्या असेही सुरू आहे. आपल्या विकास आराखडा बनवणार्‍यांनी आपले जुने आणि हे नविन वास्तव नजरेआड न करता नीट नियोजन करावे नाही तर आपणही मॉलचे मोठे पांढरे हत्ती बनवू आणि एका काळानंतर भकास इमारतींकडे पाहून हळहळू.

सुंदर लिहिलस शर्मिला ! मी कधी गेलो नाही इथे किंवा ऐकलेलंही नव्हतं. एकदम बंद पडायच्या बातम्या आल्यावरच समजलं. अश्या जागांशी खूपच जास्त आठवणी जोडलेल्या असतात!

खूप दिवसांनी लिहिलस... (बहूतेक लिट फेस्ट नंतर आत्ताच.. की मधलं काही वाचायचं राहिलं माझं ? )

खुप सुंदर लिहीले आहेस. अगदी सुरुवातीपासुन उत्कंठा वाढ्वणारे लिखाण! तुझ्यामुळे आज या समोवारची माहिती मिळाली. आपण काहीतरी मिस केले याची जाणीवही.

झक्कास लेख....

खूप वेळा गेले आहे तिकडे... जायची कारणे दोन. एकतर बर्‍याच वेळा वेळ काढायचा असायचा, किंवा जे.जे. मधे शिकणार्‍या माझ्या मावशीला भेटायचे असायचे. लांब असले तरी हा स्पॉट तिला फार आवडायचा. शेजारी मॅक्स म्युल्लर मधुन जर्मन शिकत होते तेंव्हा बर्‍याच वेळा गेले. तिकडचं ऑमलेट व चहा प्यायला.... काँटिनेंटल पदार्थ पण बिचकत खायला सुरुवात केली... क्लब सँडविच, रशियन सॅलेड सँडविच...... मस्त...

मागच्या वर्षी मुलीला कौतुकाने घेवुन गेले तेंव्हाच एकंदर सर्व्हीस, क्रोकरी, खुर्च्या पाहून मुलीने नाक मुरडले होते... पदार्थांची काँटिटी पण कमी झाली होती..... तरीही आवडून घ्यायचा प्रयत्न केला... मनात पाल तेंव्हाच चुकचुकली.

कारणे काहीही असोत.... एक परंपरा लयाला चालली आहे....

अजून एक.... मागे असेही ऐकले होते की जहांगीर ची सर्व्हीस टॅक्स ची केस खुप दिवस चालली होती. पण शेवटी ते लोक हरले. कदाचित त्याचाही परिणाम असेल. त्यांचा सर्व्हीस टॅक्स माफी साठी प्रयत्न चालला होता. पण तो दावा फोल ठरला. कारण जर जहांगीर ला पैसे भरायला लागले तर नॅचरली त्यांचे भाडेकरु म्हणुन ह्यांचे रेंट वाढणारच.....

हे रेंट वाढवायला तयार होते पण मग त्यांना काढणं मुश्कील झालं असतं म्हणून रेंटही वाढवू दिले नाही ट्रस्टने असंही ऐकलंय.

समोवर... सारख्याच माझ्या मनात घर करून असलेल्या काही जागा.. छबिलदास, वांद्र्याचे नॅशनल थिएटर, राणीच्या बागेतले ओपन थिएटर, हाजी अली चे सर्कल, दादरचे खोदादाद सर्कल ( तसे आहे ते अजून )..!!

अतिशय सुंदर लेख. कॉलेजच्या वेळेस मैत्रीणीला बी सी एलला पुस्तकं परत द्यायची असली की गेलोच आहोत टाउनसाईडला तर म्हणून सामोवारला जायचो. नंतर साउथ मुंबईत काम केलं तेव्हाही चकाट्या पिटायला हे ठिकाण होतं. नेमकं मागच्या काही भेटीत जाणं झालं नाही आणि आता पुन्हा जाता येणार नाही याची खंत कायम राहिल.

या लेखाच्या निमित्ताने आपलं शहर अशा प्रकारे बदलताना काही प्रमुख वास्तू जतन केल्या जाऊ शकतात का? हा विचार मनात आला. मागे अमेरिकेत एका डाउनटाऊनमधल्या इमारतीत ऑफिस होतं ती इमारत शंभर का दीडशे वर्षांची झाली तर तिला हेरिटेज दर्जा दिल्याचं न्युजलेटर वाचलं होतं. त्यानंतर कितीतरी वर्षांनी पुन्हा तिथे गेले तर ती इमारत तशीच होती फक्त दुसर्^या कंपनीने विकत घेतल्यामुळे वरचा लोगो फक्त बदलला होता. आपल्याकडे अशी काही सोय असायला हवी.

कसं लिहिलं आहेस... हा कॅफे बघितला नाही, गेले नाही तरी... अशी एक जागा हरवली ह्याचं दु:ख वाटावं इतकं छान.
<जागा नुसती निवांत असून चालत नाही. तशी तर अनेक एकट रहाणा-यांच्या फ़्लॅटमधेही ती असतेच. पण गरज असते वातावरणातून उर्जा मिळण्याची, इन्स्पायर होण्याची. सातत्याने येणा-या सर्जनशील व्यक्तींमुळे निर्माण झालेल्या सिनर्जीची>>
तुला हजार गावं इनाम आहेत ह्या साठी.

समोवारबद्दल कधी ऐकले पाहिले नव्हते.. लेखाचे शीर्षकही सोमवार, सरोवर, मानसरोवर वगैरे वगैरे वाचले गेले.. Wink
पण लेख सुरेख उतरलाय, आवडला Happy

अतिशय सुंदर लेख शर्मिला.
अस्वस्थ वाटत होतेच बातम्या वाचून.

मस्तच लिहीले आहेस शर्मिला. मीही कधी पाहिलं नाहीये हे ठिकाण पण वाचताना सारखं समोर वैशाली, लकी, वाडेश्वरसारखी ठिकाणं दिसत होती त्यामुळे परफेक्ट रिलेट करता आलं.
प्रत्येकाच्या अघोषित हक्काच्या जागा. भावनिक सी सॉ.

शर्मिला, खुप सुंदर लिहीलं आहे. Happy

मी ठाण्यात असुनही माझं कधीच तिथे जाणं झालं नाही. मुळात बरोबर जायला कोणी नाही / त्याबाजुला जाणेच होत नाही अशा अनेक कारणांमुळे ते राहुन गेले.

आज लोकसत्तामधे बातमी आहे की मुंबई विकास आराखडा बहुधा स्थगित होणार आहे आणि आत्ताच्या आराखड्यातुन तब्बल एक हजार हेरिट्ज वास्तु गायब आहेत.

अश्विनी के, << नवी पिढी ह्या नव्या स्पॉट्सनाही कमावेल. काळ बदलतो तशी ठिकाणं बदलतात फक्त. माणसाच्या भावना तितक्याश्या नाही बदलणार.>> ++

अतिशय सुंदर लेख
एकदा दोनदाच गेलो आहे, तेव्हा जरा ओव्हररेटेड वाटले होते
पण इतका सुंदर इतिहास / संदर्भ त्या ठिकाणाला असतील असे माहीत नव्हते.
अनेकानेक धन्यवाद शर्मिला

अवांतर - असे सुंदर लेख लोकमत मधे येत असतील तर लोकमत चालू करावा की काय

एकदा प्रतिसाद लिहिला आहे, पण राहवलं नाही म्हणून हा दुसरा..
'एक एक समोवार जेव्हा बंद होत जातात' हे शीर्षकही मस्त. ' एक एक दिवा जेव्हा विझत जातो' अशी समांतर कल्पना मनात आली आणि अपरिहार्यपणे 'ये चिराग बुझ रहे हैं, मेरे साथ जलते जलते ' आठवलंच.
आणि poet Donne ची ती सुप्रसिद्ध कविता...
"No man is an island, entire in itself,
every man is a piece of continent, a part of the main,...
Any man's death diminishes me,
because I am involved in mankind,
And therefore never send to know
for whom the bell tolls,
It tolls for thee....
सलाम!

छान लिहीलं आहेस शर्मिला.

हे आणि अशीच काही ठिकाणं पाहण्याचा, अनुभवायचा योग आला नाही, आणि आता तर ती नामशेषच झाली. याची हळहळ मात्र उरी दाटून राहते.

हीरा मस्त! लेख लिहिताना काहिशी अशीच भावना होती मनात.

धन्यवाद सगळ्यांनाच ज्यांना लेख आवडला आणि त्या निमित्ताने समोवार आठवलं.

'समोवार' असतातच प्रत्येकाच्या शहरात कुठल्या ना कुठल्या तरी रस्त्यावर.

शहरातली समोवार जेव्हा बंद पडतात शहरातल्या संस्कृतीचा एक प्रवाह बंद होतो. आणि मग अनेकांच्या नॉस्टेल्जियाचं एक गाठोडं बांधलं जात आणि ते शहराच्या इतिहासात फ़ेकलं जातं. >>>> हा पॅराग्राफ आवडला आणि पटला. लेखाचा 'की पॉइंट' म्हणता येइल असा.

'समोवार' असतातच प्रत्येकाच्या शहरात कुठल्या ना कुठल्या तरी रस्त्यावर. >>> हे पण पटलं.

लेखातला शेवटचा पॅरा वाचताना मात्र दाताखाली खडा आल्यासारखं होउन मजाच गेल्यासारखं वाटलं. त्यासंदर्भातली केश्वीची पोस्ट आवडली.

Pages