मुंबईचे फेरीवाले

Submitted by दिनेश. on 26 March, 2015 - 04:24

इब्लिस यांनी कल्हईवाले आणि लेलेकाकांनी पिंजार्यांबद्दल लिहिल्यापासून हा विषय मनात होता. आज लिहूनच टाकतो.

माझे बालपण मालाड पूर्वेला आणि चेंबूरला गेले. (आम्ही १९७४ साली शिवसृष्टीत आलो त्यावेळी तो
भाग चेंबूरच्या पोस्टल हद्दीत होता नंतर नेहरू नगरला जोडणारा पूल झाला आणि आमचा पिनकोड बदलला. )
त्या काळात हाऊसिंग सोसायट्या नव्यानेच तयार होत होत्या. आजकाल बहुतेक सोसायट्यांच्या गेटवर, " फेरीवाले
व सेल्समन यांना प्रवेश नाही " अश्या पाट्या असतात त्या, त्या काळी नव्हत्या.

एका जागी स्थिर न बसता आपल्याकडील मालाची वा सेवेची घरोघर ( किंवा दारोदार ) जाऊन विक्री करतो, तो
फेरीवाला अशी माझी सोपी व्याख्या. आठवणीतल्या फेरीवाल्यांची हि जंत्री..

मुंबईत १९७२ साली दूरदर्शन सुरु झाले. नंतरही बरीच वर्षे ते सामान्यांच्या आवाक्यातले नव्हते. शिवाय तो बाळगायला लायसन्स आणि अँटेना लागत असे. आकाशवाणी पण २४ तास नसे. संध्याकाळची छोटी वर्तमानपत्रे मोजकीच होती ( संध्याकाळ, श्री वगैरे ) त्यामूळे करमणुकीची साधने अशी नव्हतीच. ती कमी हे फेरीवाले भरून काढत असत.
या फेरीवाल्यांमधे एवढी विविधता होती कि रोज नवी करमणूक आम्हाला मिळत असे. शिवाय आज कोण येणार, याची अजिबातच कल्पना नसल्याने उत्कंठाही असायचीच. यापैकी कुणीही आला कि आम्हा मुलांचे त्याच्याभोवती रिंगण ठरलेले. ती वस्तू घेण्यात, त्याचे पैसे देण्यात वा त्या आधीची घासाघीस करण्यात आमचा काहीच सहभाग नसे. आमची भुमिका केवळ बघ्याची ( व कदाचित नंतर त्यांची नक्कल करण्याची )

१) दूधवाला

जोगेश्वरीच्या पुढे बहुतेक गावात गोठे होते. काही अजूनही आहेत. त्या गोठ्यातून भय्ये दारोदार जाऊन दूधाचा रतीब घालत असत. सरकारी दूध केंद्रे होती पण एकतर ती गाडी अगदी सकाळी येत असे शिवाय त्यासाठी रेशनकार्डासारखे कार्ड काढावे लागे. प्लॅस्टीकच्या पिशव्या नव्हत्या तश्याच आता असतात तश्या डेर्याही नव्हत्या.
काही जिलबी फरसाण विकणारे मोठ्या कढईत आटवलेले दूध विकत असते, पण ते रोजच्या वापरासाठी नसे.
त्यामूळे हा दूधवाला भैया, हाच एकमेव पर्याय होता. तो दूधात पाणी मिसळतो यावर तमाम गृहिणींचा ठाम विश्वास.
आणि त्या दिव्य हिंदीत त्याच्याशी रोजचा वाद ठरलेला ( मापटा बुडव बुडवके देव ) पण हे भय्ये प्रतिवाद करत
नसत. हे दूध मात्र नीरसे म्हणजे न तापवलेले असे.

तसेच दूधाचे पैसे हे महिन्याने द्यायचे असत. रतीब घालून उरले तर ते जास्तीचे दूध विकत असत. ते परत नेऊन त्यांनाही काही फायदा नसे. साठवण्याची व्यवस्था नसे. पनीर खवा करायची सोय नसे. जास्तीचे दूध हवे असेल तर तेही काही दिवस आधी सांगावे लागे. कोजागिरीला, श्रावणी शुक्रवारी असे जास्त दूध लागत असे. आमच्याकडे बरीच वर्षे एकच भैया होता. तो गावी गेला कि त्याची बायको रतीब घालत असे. ( तिला आम्ही भैय्यीण म्हणत असू. )

होळीला ते आवर्जून आम्हाला भांग आणून देत असत. आम्हा लहान मूलांना अर्थात ती जास्त मिळत नसे. आणि मिळाली तर आमचा दंगा वेगळाच. एकदा एका मुलीने भांग प्यायल्यावर जो पिंगा घालायला सुरवात केला, तो आवरायला ३ जणांनी तिला धरून ठेवावे लागले होते.

२) चीक

भैया तूम्हारी भैंस कब बाळंत होनेवाली है, हमको चीक मंगताय.. अशी मागणी भैयाकडे नेहमीच होत असे.
हा चीक मात्र तो निवडक घरातच देत असे. या चीकातही तो पाणी घालतो, असा आईला संशय असे. ( तिच्या माहेरी जो चीक मिळत असे, त्याचा खर्वस एवढा घट्ट होत असे कि तो किसणीवर किसता येत असे. ) तेवढा घट्ट खर्वस मुंबईला कधीच होत नसे.

पुढे कुर्ल्याला आल्यावरही असा चीक आमच्याकडे नेहमी येत असे. इथे आल्यावर आई, शेजारच्या वागळेकाकींकडून खर्वसाची नवीन पाककृती शिकली. त्या खर्वसात खोबरे आणि शहाजिरे वाटून टाकत असत.
पुढे खर्वस बाजारातही मिळू लागला. आता चीकवाले आमच्या भागात तरी येत नाहीत.

३) वसईचे भाजीवाले.

वसईमधे त्याकाळी भाजीचे बरेच मळे होते आता स्टेशनपासुनच वस्ती दिसते. पुर्वी स्टेशन ते गाव यामधे बराच मोकळा भाग होता. तिथून हे भाजीवाले येत असत. त्यांच्याकडे वांगी, मेथी, इतर पालेभाज्या, पापडी, कच्ची केळी अश्या मोजक्याच भाज्या असत. त्या उत्तम प्रतीच्या असल्याने भावही जास्त असे. केळफूल वगैरे त्यांना मुद्दाम आणायला सांगावे लागे. विशेष म्हणजे हे भाजीवाले कावडीतून भाज्या आणत.

आता वसईची शेतजमीनच कमी झाल्याने, हे भाजीवालेही कमी दिसतात.

४) म्हावरेवाली.

पुर्वी कोळणी मासे घेऊन घरोघरी फिरायच्या. कोळी पद्धतीने नेसलेले घट्ट लुगडे. अंगावर भरपूर दागिने. डोक्यावर एक लांबरुंद फळी आणि त्यावर माश्याची टोपली. त्यांची यायची वेळ पण सकाळी १० च्या दरम्यानचीच असे.

त्या काहि मोजकेच मासे आणायच्या. पापलेट, कोलंबी, करंदी, मांदेली, ओले बोंबील व ओले बांगडे.. साधारणपणे हेच मासे जास्त खपत. टोपलीवर ती फळी आडवी ठेवून वाटे लावत. त्यांच्याशी बरीच घासाघीस करावी लागे. पण नेहमीच्या गिर्हाईकांना त्या प्राधान्य देत.

त्यांना वेळ असेल आणि मागणी केली तर त्या मासे नीट करूनही देत. खास करुन भरले पापलेट करायला आई त्यांनाच कापून द्यायला सांगत असे. पण त्यांना बहुदा घाई असे. जेवणाची वेळ व्हायच्या आत आणि मासे खराब व्हायच्या आत त्यांना विकायचे अस्त. ( त्यांच्या टोपलीत बर्फ नसे आणि घरोघरी फ्रिजही नसत. )

कुर्ल्याच्या घरी पण नेहमीची कोळीण येत असे. तिचा माझ्या पुतण्यावर विशेष जीव होता. तिचा आवाज ऐकल्यावर तो बाहेर पळत जायचा आणि ती त्याला एखाद दुसरी कोलंबी किंवा बोंबील बक्षीस द्यायची. तो ते मासे तसेच हातात धरून यायचा घरी.

कोळणी स्टेशनवर पण लगबगीने चालत असायच्या. मच्छी का पानी, असे ओरडत राहिल्या कि त्यांना आपोआप गर्दीत वाट मिळायची. पुढे या धंद्यात केरळी लोक शिरले आणि टोपल्यांच्या जागी प्लॅस्टीकचे टब आले.

५) पाट्याला टाकी

त्यावेळी मिक्सर नव्हतेच. घरोघरची वाटणे पाट्यावरच होत. पापडाचे पिठ कुटणे, मेंदी वाटणे, पुरण वाटणे वा इडलीचे वाटण करणे... या सगळ्यासाठी आमच्या घरी पाटाच वापरत. आमच्या घरी जाते पण होते. हे सगळे काही काळाने गुळगुळीत होत. मग त्याला टाके काढावे लागत.

पाट्याला टाकी असे ओरडत बायका आल्या कि त्यांना या वस्तू दिल्या जात. हातोड्यासारखे एक अवजार वापरून अगदी नक्षी काढल्यासारखे टाके काढून देत त्या. आमच्या वाड्यात एकच कारवारी कुटुंब होते आणि त्यांच्याकडे रगडा होता. त्यालाही टाके काढून देत त्या. एकाच्या घरी त्यांना बोलावले म्हणजे वाड्यातल्या सगळ्याच पाट्यांना
टाके काढून घेतले जात.

त्यांना काम करताना बघणे म्हणजे आम्हा मुलांना कोण आनंद. दगडाची कपची डोळ्यात जाईल म्हणून त्या आम्हाला जरा लांब बसायला सांगत. टाके काढताना क्वचित ठिणग्याही उडत, त्याचे तर आम्हाला कोण कौतूक.
त्यांची गुटगुटीत तान्ही बाळे त्या दुपट्यात गुंडाळून तशीच जमिनीवर ठेवत. बाळाला आमच्या घरात ठेव असे आईने सांगितले, तर फरशी बादेल असे म्हणत त्या.

आता पाट्याचा वापर कमी झाल्याने त्या दिसत नाहीत. कधी कधी खास दगड आणून ते मुंबईतच पाटे वरवंटे घडवताना दिसतात. पण आता पाट्याचा आकारही लहान झालाय.

६) बाटलीबाई

नाही बाई बाटली नाही, बाटलीबाई च. असेच ओरडत या बायका येत. त्यावेळी प्लॅस्टीक फारसे वापरात नव्हते.
बरीच औषधे काचेच्या बाटल्यांतून मिळत. व्हीक्स फॉर्म्यूला ४४ तर आम्हा मुलांचे फार आवडते औषध. घरोघरी मुले आवडीने पित ते. शिवाय मर्क्यूरीक्रोम ( लाल औषध ) ग्राईप वॉटर, द्राक्षासव, गौर येऊन गेल्यावर घ्यायचा परिपाठाचा काढा, वैद्य पाटणकर काढा, बेडेकर, कुबल यांची लोणची... अशा अनेक बाटल्या घरात येत. त्या रिकाम्या झाल्या कि या बायकांना दिल्या जात.

बाटली त्यांना दिली कि आधी त्या उघडून झाकण नीट आहे का ते बघत. आत औषध असले तर ओतून टाकत.
मग वास घेऊन बघत. वास न येणारी, धुतलेली बाटली असेल तर १/२ पैसे जास्त मिळत.
यातल्या बर्याच बाटल्या काचेच्या कारखान्यात विकल्या जात ( काच तयार करताना विरजणासारखी काच वापरावी लागते ) पण धड झाकण असलेल्या बाटल्या तेल, औषध आणण्यासाठी, रॉकेलच्या चिमण्या वगैरे करण्यासाठी वापरल्या जात.

बियरच्या बाटल्या फार नसतच. एखादे काका घरी पित असतील तर त्या बाटल्या, काकूंना चोरूनच विकाव्या लागत. दारुची व्हॅट ६९ हि बाटली आम्हा मुलांना ओळखीची ( आकारावरुन ) होती पण ती कचर्यात जरी दिसली तरी आम्ही तिला हातच काय पाय पण लावत नसू.

७) भंगारवाला

डालड्याचा किमान १ तरी डबा दर महिन्याला घरोघर वापरला जात असे. या डब्याला झाकणाखाली पातळ पत्रा असे. डबा रिकामा झाला तरी हा पत्रा काढल्याशिवाय तो डबा झाकणाचा डबा म्हणून वापरता येत नसे आणि हा पत्रा काढणे तसे जिकिरीचे असायचे.

वरचा सगळाच पत्रा कापून हे डबे तुळस लावण्यासाठी ते विहिरीच्या पोहर्यासाठी ( मालाडला वाड्याजवळ विहिर होती ) वापरले जात. पण कालांतराने ते गंजत. बिस्किटांचे मोठे डबे, पापड, करंज्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत. पण तेही मग गंजत. पत्र्याच्या बादल्या गळू लागत. अश्या सगळ्या निरुपयोगी ठरलेल्या वस्तूंची विल्ल्हेवाट
लावण्यासाठी भंगारवाला कामी येत असे. या व्यवहारात पैसे थोडे मिळत पण घरातली अडगळ कमी होतेय याचे सुख असे. आम्हा मुलांच्या जुन्या तीन्चाकी सायकली भंगारात देतांना मात्र आमचे डोळे भरुन येत. आपण दुसरी घेऊ, हे वचन आईबाबांना पाळणे नेहमीच शक्य होत असे, असे नाही. हा भंगारवाला हातगाडी घेऊन येत असे. पण त्याच्या भरलेल्या हातगाडीकडे बघणेही का कुणास ठाऊक ,त्रासदायक वाटे.

८) बोहारणी

आता आता पर्यंत बोहारणींचा आमच्याकडे नियमित राबता होता. आईला भांड्यांची फार हौस. पुढे मी काचेची, नॉन स्टीक वगैरे भांडी जास्त घेऊ लागल्यावर तो सोस कमी झाला.. आमच्याकडे जुने कपडे भरपूर होतात ( कारण सगळ्यांना नवे नवे कपडे घ्यायची हौस आहे आणि जुने व्यवस्थित नीट राखलेले असतात. )
चि. वि. जोश्यांच्या "काटकसरीचे प्रयोग" प्रमाणेच आमच्या घरात संवाद होत असे. पुढे पुढे त्या स्टीलची क्वालिटी अगदीच खराब येऊ लागली. फ्रिजमधे ती भांडी ठेवली कि त्यांना तडे जाऊ लागले आणि मुख्य म्हणजे हे आईला पटले, तेव्हा हा प्रकार बंद झाला.

९) गोधडीवाल्या

जुन्या कपड्यांची गोधडी शिवून देणार्या बायकाही येत. शिवायला दोरा आणि सुई त्याच आणत. आपण फक्त जुने कपडे द्यायचे. सर्व कपड्यांच्या नाड्या, शिवणी काढून त्या एका जुन्या साडीच्या घडीत व्यवस्थित रचत. मग अंतरा अंतरावर टाके घालून ते सगळे कपडे जागच्या जागी बसवत. मग दोन बाजूंनी सुरवात करुन भराभर टाके घालून त्या गोधडी पूर्ण करत.

यातले टाके अगदी सुबक तर असतच पण गोधडी देखील सगळीकडे सारख्याच जाडीची असे. अनेक वर्षे ती वापरली जात असे मुंबईच्या थोटक्या थंडीत ती व्यवस्थि ऊब देत असे.

१०) मनकवडे

मनकवडे दिसायला अगदी साधे असत. धोतर टोपी असाच त्यांचा वेष असे. पण त्यांचे कसब वेगळेच असे.
दोघे व्यवस्थित अंतर राखून उभे रहात. मग एकाच्या कानात आपण आपले नाव सांगितले कि तो खाणाखुणांच्या आधारे किंवा क्वचित काही कवनांच्या आधारे दुसर्याला ते नाव सांगत असे आणि दुसरा ते नाव ओळखून दाखवत असे. या खाणाखुणा आपल्याला अजिबात कळत नसत. पण आम्हाला त्याच्यातपण खुप थ्रील वाटत असे.

दुसरी मजा अशी कि त्याकाळी बायकांची खरी नावे आम्हा मुलांना माहीत नसत ( शेखरच्या आई, शशिच्या आई हीच नावे आम्हाला माहीत असत. ) या मनकवड्यांना मात्र खरी नावे सांगत त्या. हे मनकवडे कधी कधी भविष्य पण सांगत.

११) नंदीबैल.

नंदीबैल म्हणजे सजवलेला लहानखुरा बैल. सोबत बुगु बुगु असे वाजणारे एक वाद्य. परिक्षेत पास होईन का, ताईचे लग्न जमेल का अशा प्रश्नांना तो होकारार्थी ( क्वचितच नकारार्थी ) मान डोलावत असे. ती कशी डोलवायची हे तो नंदीबैलवालाच सांगत असणार यावर आमचा विश्वास होता.

मला आवर्जून सांगावेसे वाटतेय, कि नंदीबैल हेच नाव प्रचलित होते. मीना खडीकर यांच्या चॉकलेटचा बंगला हा गाण्यांच्या संग्रह त्याच दरम्यान आला, त्यानंतर त्याला भोलानाथ असे कुणी कुणी म्हणू लागले.

१२) गौशाला वाले

एक जरा अॅबनॉर्मल वाटेल ( म्हणजे पाठीवर पाचवा पाय वगैरे असलेली ) अशी गाय हे लोक घेऊन येत. त्या गायीत काही दैवी शक्ती आहे, असा त्यांचा दावा. पण ती काही मान वगैरे डोलावत नसे. तिला लोक कुंकु वगैरे लावत.
या गायवाल्यांचा पैसे जमवायचा वेगळाच धंदा असे. ते कुठेतरी उत्तरेत मोठी गौशाला उभारणार असत आणि त्यासाठी त्यांना पैसे हवे असत. त्यासाठी काशीचा पत्ता असणारी रसिट देखील ते देत. ( नवल म्हणजे मालाडमधेच एक गोशाळा होती आणि ते लोक कधीही अशी मदत मागायला येत नसत. )

गायीला चारा, हा प्रकार मात्र खुप नंतर सुरु झाला. या बायका पण सहसा फिरत नाहीत तर एका जागी बसून असतात.

१३) हत्तीवाले

राजेश खन्नाचा , " हाथी मेरे साथी " हा चित्रपट त्या काळात आला होता. तो आम्ही सर्वच मुलांनी बघितला होता आणि तो बघून सर्वच हत्ती आपले मित्र आहेत असा ठाम समज झाला होता.
मालाडला एक हत्तीवाला येत असे. त्याचा हत्ती भला मोठा होता तरी फारच प्रेमळ होता. त्याच्या अंगाला, शेपटीला हात लावला तरी तो शांत असे. काही धाडसी मुले तर त्याच्या पोटाखालून पळ्त जात असत.

या हत्तीची आणखी एक मजा म्हणजे जर त्याला केळं वगैरे दिलं तर तो ते खात असे पण अगदी पाच पैश्याचे नाणे जरी दिले तरी तो सोंडेने व्यवस्थित पकडून वरच्या माहुताकडे देत असे. त्याच्या ताकदिची आम्हाला कल्पना आलीच एकदा. त्याला एकाने असोला नारळ दिला. त्यावर पाय देऊन त्याने तो चपटा केला आणि खाऊनही टाकला.
पण त्यानंतरही त्याची भिती वाटली नाहीच.

१४) दरवेशी

दरवेशी येत ते आम्हाला कुत्र्याच्या भुंकण्यावरून कळत असे. या दरवेश्याकडे एक अस्वल असे. त्याच्या मुसक्या बांधलेल्या असत त्यामुळे ते कुणाला चावू वगैरे शकत नसे. तरीही कुत्रे त्याला टरकून असत.

अधून मधून दोन पायावर उभे राहण्या व्यतीरिक्त ते अस्वल फार काही करतही नसे. पण हे दरवेशी एक वेगळीच वस्तू विकत असत. अस्वलाचा एक केस एका कॅप्सूल मधे घालून त्याचा ताविज बनवत आणि तो ते विकत असत. हा केस ते आपल्यासमोरच काढत असत. असा ताविज गळ्यात घातला तर मुलांना कशाची भिती वाटत नाही, असा समज होता. असे ताविज आम्हा सगळ्यांच्याच गळ्यात असत. आणि ते साध्या दोर्यात बांधलेले असल्याने तुटतही पटकन. त्यामूळे दरवेश्याच्या ताविजाला नेहमीच मागणी असे.

१५) गाढविणीचे दूध..

आता कुणाला सांगून खरे वाटणार नाही, पण चक्क गाढविणीचे दूध मालाडला विकायला येत असे. तो माणूस चक्क गाढविण घेऊनच फिरायचा, आणि ज्याला हवे त्याला ते दूध काढून द्यायचा.

ते औषधी म्हणून घेत असत, पण नेमके कश्यावरचे औषध ते मात्र मला कधीच कळले नाही. बाबांना विचारले तर म्हणत. ज्यांना अक्कल नाही त्यांना देतात. तूला हवे का ?.. मी कशाला हो म्हणेन मग ?

१६) कुल्फीवाला

आता छोट्या छोट्या मडक्यात मिळते त्याला मटका कुल्फी असा शब्द वापरतात. पण पुर्वी मटका कुल्फीला वेगळा अर्थ होता. एका मोठ्या माठात बर्फ आणि मिठाचे मिश्रण करून त्यात कुल्फीचे साचे ठेवलेले असत. हे साचे चिलिमीच्या आकाराचे असत आणि त्याचे झाकण काळ्या रबर बॅंडने बांधलेले असे. कुल्फी देतांना दोन तळव्यात हा साचा फिरवून ती मोकळी केली जात असे आणि सागाच्या पानावर दिली जात असे. आटीव दूधापासून केलेल्या या कुल्फीला मस्त चव असे.

१७) बुढ्ढी के बाल

बुढ्ढी के बाल म्हणजे आताचे कँडी फ्लॉस. हे विकणारे दोन प्रकारे हे विकत. एक जण त्याचे मुठीएवढे गोळे काचेच्या बॉक्स मधे घेऊन येत असे तर दुसरा ते चक्क आपल्यासमोर करून देत असे. अल्यूमिनियमचे मोठे भांडे आणि त्याला मधे फिरणारे चक्र असे. त्याखाली एक स्टोव्ह असे. त्या चक्रात तो चमचाभर साखर आणि चिमूटभर रंग टाकत असे, आणि मग त्या चक्रातून साखरेचे धागे बाहेर फेकले जात. त्याचा भला मोठा गोळा करून तो विकत असे. निव्वळ गोड लागणारा तो गोळा, त्या काळात तरी अप्रुपाचा होता.

१८) बर्फाचे गोळे

उलट्या बसवलेल्या लाकडाच्या रंध्यावर बर्फाची लादी घासून त्याचा चुरा. मग तो हाताने दाबून त्यात खुपसलेली एक काडी. तयवर लालभडक आणि पिवळेधम्मक सरबत खास नॉझल बसवलेल्या बाटलीतून. मग बर्फ न चावता केवळ ते सरबत प्यायचे. थोड्याच वेळात तो गोळा पांढरा होणार. मग त्यावर आणखीन सर्बत हक्काने मागून घ्यायचे.
मग कूणाचा तरी गोळा भस्सकन फुटून खाली पडणार. त्याला दुसरा गोळा मिळणार खरा पण त्याखाली धरायला त्याच्या आईने घरातून एक बशी आणून दिलेली असणार.... शाळेला सुट्टी पडली कि आमच्या वाड्यातले हे
हमखास दिसणारे दृष्य. शाळा चालू असताना मात्र आम्हाला ( म्हणजे शेंबड्यांना ) हे गोळे खायची परवानगी अजिबात मिळत नसे.

१९) बर्फवाला

पुर्वी घरोघर फ्रीज नसायचे. बर्फाची लादी बैलगाडीतून विकायला येत असे. ही लादी लाकडाच्या भुश्यात ठेवलेली असे.
आपण मागितल्यावर टोच्यासारख्या हत्याराने त्यावर एक रेघ आखून त्या लादीचा तुकडा दिला जात असे.

घरात पन्हे किंवा पॉट आईस्क्रीम करायचा बेत ठरला कि असला बर्फ आम्ही आणत असू. तो पण आयत्यावेळी नाही मिळायचा. त्याला एक दिवस आधी सांगावे लागत असे.

उसाचे रसवाले हे त्याचे नेहमीचे गिर्हाईक, त्यामुळे त्यांना आधी देऊन, उरला तरच आम्हाला मिळत असे.

२०) चिंगमवाला

च्यूईंगगम हे चिकलेट्स या नावाने बाजारात यायच्या आधी हा विक्रेता येत असे. खांद्यावर एक मोठा खांब आणि त्यावर चिंगमचा घट्ट गोळा. मुख्य रंग पांढरा पण त्यावर हिरवा आणि लाल रंगाचे दोन गोळेही असत. हे सगळे प्लॅस्टीकच्या कागदाने झाकलेले असे. हा माणूस त्या गोळ्यातून फुले, प्राणी असे वेगवेगळे आकार करून देत असे.
मला हा प्रकार कधीच आवडला नाही. शाळेतील मुले तो खाऊन तोंडातून धागे काढत आणि तो इथे तिथे चिकटवून ठेवत म्हणून आमच्या शाळेनेही त्यावर बंदी घातली होती. ( सिंगापूरच्या बंदीच्याही आधी बरं )

२१) गॅसचे फुगेवाला

एक भले मोठे गॅसचे सिलिंडर आणि आकाशात झेपावणारे फुगे घेऊन हा फुगेवाला फिरत असे. त्याचे सफरचंद किंवा माकड असेही प्रकार असत. हे प्रकार तो हातानेच करत असे.

अगदी लहान असताना या फुग्याबरोबर आपणही उडून जाऊ असे मला वाटे, म्हणून मी घाबरत असे. एका काकानेच ती भिती घालवली. दुसरे काही घेण्यात हात गुंतल्याने हा फुगा हातातून सुटणे, हे कायम व्हायचे. मग वर वर जाणार्या त्या फुग्याकडे बघत बसणे, हेच काय ते उरायचे. चुकून घरी आलाच तर रात्री तो सोडल्यावर छताला चिकटून बसत असे.

आता यात चंदेरी वगैरे प्रकारही आलेत तसे हार्ट्शेपही.

२२) कडक लक्ष्मी

उघडे शरीर, लांब केसाचा बांधलेला बुचडा, कपाळावर मळवट, कमरेला अनेक तुकडे गुंडाळलेला असा हा कडकलक्ष्मीचा अवतार येत असे. सोबत त्याची बायको ढोल वाजवत फिरत असे. तिच्या डोक्यावर एक चौकोनी देव्हारा असे.
तो नाद वाजू लागला कि तो आपल्याकडच्या आसूडाचे फटके स्वतःला मारून घेत असे. त्यात मार किती आणि आवाज किती, हे मला न सुटलेले कोडे. काही जण आणखी काही प्रकार करत. एका पाटीवर देव ठेवून गरागरा फिरणे किंवा दंडात दाभण टोचणे. या माणसांची भितीच वाटत असे मुलांना.

२३) डोंबारी

डोंबारी पण नियमित पणे येत असे. थोडी मोकळी जागा सापडली कि चार खांबावर एक आदवी दोरी बांधून त्यांचा खेळ सुरु होत असे. त्या दोरीवरून लिलया जाणारी एक बाई हा महत्वाचा आयटम. गोलांटी उड्या मारणे. एका मोठ्या रिंगमधून पार होणे. एका लांब बांबूला लहान मूल बांधून ती तोलणे, दोन पाटांच्या मधे बाटली ठेवून त्यावर तोल संभाळणे असे अनेक प्रकार ते करत.

त्या काळात अनेक मराठी हिंदी चित्रपटातही डोंबार्याचे खेळ असत ( आठवतात ते असे. केला इशारा जाता जाता ( लिला गांधी आणि उषा चव्हाण ) पडछाया ( लिला गांधी ) बात एक रात कि ( वहिदा रेहमान ) )

२४) गारुडी

नाग, मुंगुस घेऊन येणारे हे गारुडी घरोघर फिरत. नागपंचमीला तर हमखास येत. त्याला दूध लाह्या हे प्रकरण तर आमच्याही घरी होत असे. या सापांचे बहुतेक दात वगैरे काढलेले असत. बिचारे असहाय्यपणे फणा काढून डोलत असत. अर्थात त्यावेळी फारशी जनजागृतीही नव्हती ( आता आहे ?? )

२५) कुडमुडे

कुडमुडे हा शब्दही आता ऐकायला येत नाही. हे खरे तर भटजी असत. त्या त्या दिवशीचे पंचांग, संकष्टी असेल तर चंद्र दर्शनाची वेळ, ग्रहणाची वेळ वगैरे सांगत फिरत असत. त्या अनुशंगाने मिळणारी कामेही करत. कालनिर्णय सारखी कॅलेंडर्स येण्यापुर्वीची ही गोष्ट. नंतर मालाडमधे तरी त्यांचे दिसणे कमी झाले.

२६) जूँ मारनेकी दवा

एक आयताकृती मेणकापडावर एक गोरीगोमटी बाई रंगवलेली. केसात जास्वंदीच्या फुलाएवढी ऊ चितारलेली, त्याच बोर्डाखाली खाली पाठ वर पाय करून राहिलेले उंदीर, पाल, झुरळ वगैरे .. आणि या बोर्डला खाली एक चाक आणि मागे काठी लावून हा विक्रेता फिरत असे. अगदी छोट्या बाटलीत, एक हिरव्या रंगाचे तेल किंवा औषध तो विकत असे. केसात उवा हि त्या काळातली कॉमन बाब होती, आणि मुलींना अधून मधून हे औषध वापरावेच लागत असे.

यातले जूँ हे अक्षर नेमके कसे उच्चारायचे, हे मला लहानपणी कळत नसे. असे विक्रेते अजूनही फिरताना दिसतात.

२७) पनवेल वाले.

ठाणे क्रिक ब्रिज १९७४ साली सुरु झाला ( आणि १९८६ साली धोकादायक ठरला ) त्यापुर्वी पुणेच काय पनवेललाही जायला कळवा पुलावरून जावे लागत असे. आणि अर्थातच त्याला वेळ लागत असे. पण तो पुल सुरु झाल्यावर सिडकोच्या बसेसही सुरु झाल्या. आणि पनवेलच्या शेतातली ताजी भाजी घेऊन माणसे मुंबईत येऊ लागली.

पावट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वांगी, टोमॅटो, वगैरे ताजी चवदार भाजी ते लोक आनत. ( सध्या दादरला गोल देवळाजवळ ते बसतात. ) कधी कधी बैलगाडीतून कलिंगडे, तांदूळही आणतात.

( तांदळाहून आठवले. माझ्या लहानपणी मुंबईत रेशनिंग होते. तांदूळ मिळायचा तो रेशनवरच. आमच्या घरी तो कुणीच खात नसे. मुंबईला खुल्या बाजारात तांदूळ मिळतही नसे. मुंबई हद्दीच्या बाहेर जाऊन तो आणावा लागे. मालाडला असताना वसईला आणि कुर्ल्याला आल्यावर ट्रॉम्बेला जाऊन आणावा लागत असे. तोही सीटखाली लपवून. काही लमाणी बायका मात्र उघडपणे असा तांदूळ, खास करुन सुरती कोलम आणत असत. )

सांडगी मिरच्या करण्यासाठी खास पेणच्या मिरच्या, अलिबागचे वालही हे लोक आणत असत.

२८) खडे मीठवाले.

दळलेले मीठ ( टेबल सॉल्ट ) बाजारात फार नंतर आले. पुर्वी आम्ही खडे मीठच वापरत असू. मिरा रोडला मिठागरे होती. तिथून हे मीठ येत असे. हातगाडीवर मिठाची गोण घेऊन हे लोक येत. दिवाळीच्या पाडव्याला साठवणीचे मीठ घ्यायची पद्धत अनेक घरात होती. त्या दिवशी अगदी पहाटे पहाटे हे लोक येत असत.

२९) पाव बिस्किट वाले.

मॉडर्न आणि ब्रिटानिया हे पावाचे ब्रांड लोकप्रिय होते तरीही मुंबईत खास बेकरीतले पाव विकणारे लोकही येत.
गोल चपटा कडक पाव हि त्यांच्याकडची खासियत. स्लाईस ब्रेड पण ते विकत पण त्याच्या स्लाईसेस आपल्यासमोर करून देत.

त्यांचेच भाईबंद म्हणजे बिस्किटवाले. पत्र्याच्या भल्या मोठ्या पेटीत, खारी, क्रीमरोल्स, नान कटाई वगैरे
घेऊन ते येत असत. त्यांच्या बिस्किटात बीफ फॅट असते असा समज आमच्या घरात होता, त्यामूळे आम्ही कधी ते घेत नसू. गावाहून कुणी आले तर आजोबा नानकटाई, बिस्किटे वगैरे स्वत: करुन पाठवत असत. अजूनही ते सगळे सुरु आहे.

३०) ब्लाऊज पीस वाले.

आता जशी मॅचिंग सेंटर्स दिसतात तशी पुर्वी नव्हती. मूळात साडीवर मॅचिंग ब्लाऊजच घातला पाहिजे असा आग्रहही नव्हता. (ती फ्याशन गणली जात होती ) तरी ब्लाऊजपिसेसचा संग्रह मात्र घरोघरी असायचाच. घरी सवाष्ण बाई आली तर तिला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत , आणि त्यासाठी दोनचार पिसेस घरात ठेवावेच लागत.

मालाडला एक कापडवाले कडू नावाचे गृहस्थ होते. निव्वळ याच उद्योगावर त्यांचे चाललेले होते. सोमवार बाजारापासून ते मालाड पुर्वेला चालत येत ( हे अंतर किती आहे ते मालाडवासी लोकांना नक्कीच माहीत असेल. )

टू बाय टू, टेरीकॉट वगैरे नावे त्याच काळात मला माहीत होती.

३१) फिरती लायब्ररी

त्या काळात जास्त मासिके नव्हती तरी किर्लोस्कर, स्त्री, मेनका, जत्रा, मनोहर अशी मासिके लोकप्रिय होती. पण ती विकत घेऊन वाचायची पद्धत नव्हती ( किंवा ती परवडत नसत ) म्हणून फिरती लायब्ररी असे. हा माणूस एका पेटीत ही मासिके घेऊन घरोघरी जात असे. दिवाळी अंकासाठी जास्त वर्गणी असे. अगदी नाममात्र किमतीत अनेक मासिके वाचता येत.

आमच्या घरी आजही अशी व्यवस्था आहे.

३२) सुगंधी उटणे

दिवाळीच्या आधी अनेक घरी उटणे केले जात असे. मग काही गरजू शाळकरी मूले ते घरोघर जाऊन विकत असत.
उटण्याचे ब्रांड फारसे नव्हते ( बेडेकरांचे होते ) त्यामूळे या उटणे वाल्यांची घरोघर वाट बघितली जात असे.

कधी कधी हि मुले आमच्या शाळेतलीच असत. त्यावेळी आई त्यांना आवर्जून खाऊ देत असे. पुढे पुढे कालनिर्णय, दिवाळी कंदील, रांगोळ्यांचे छाप, ठिपक्यांचे कागद वगैरेही हि मुले आणू लागली. या सर्व वस्तू बहुदा त्यांनीच केलेल्या असत.

३३) बहुरुपी

हा एक सोंग काढणारा माणूस असे. कधी शंकर तर कधी राम असे रुप घेऊन तो येत असे. हे रुप मात्र हुबेहुब काढलेले असे. अंगाला फासलेल्या रंगापासून ते कपड्यापर्यंत सर्व हुबेहूब. हा काही गाणी वगैरे म्हणत नसे केवळ ते रुप घेऊन फिरत असे. कधी कधी हा थोडे उग्र रुप घेत असे. म्हणजे छतीत घुसलेला बाण वगैरे असे.

३४) बाइस्कोप

एका स्टँडवर एक चौकोनी डब्बा, त्याला समोर ३ ते ४ गोलाकार छिद्रे, या डब्यावरती एक नाचरी बाहुली किंवा माकड असे या बाइस्कोप चे रुप. या छिद्रांना डोळे लावून आत बघायचे ( एकावेळी ३ ते ४ ) आतमधे चित्रे असत आणि हा फेरीवाला ती हाताने वरखाली करत असे. सोबत एखादे गाणे.
आता हसू येईल पण आम्ही ती चित्रे बघण्यात रंगून जात असू. मला वाटतं मुमताजचे एक गाणेही आहे यावर.
( देखो देखो देखो, बाइस्कोप देखो.. दिल्लीका कुतुबमिनार देखो.. )

आणि हो त्या शिवाय पेपर टाकणारे.... ते तर आजही आहेत. उलट आज त्यांच्या व्यवसाय जास्त जोरात चाललाय.

याशिवाय म्यूनिसिपालिटीचे लोक जे डास मारण्यासाठी धूर सोडायला येत, किंवा कुत्रे पकडायला गाडी घेऊन येत. देवीची लस देणारे... आमच्यासाठी सगळी धमाल असायची.

मुद्दाम नोंदवावेसे वाटतेय कि यापैकी कुणीही भिकारी नव्हते. आपली कला म्हणा किंवा हुनर म्हणा वापरूनच ते पैसे मागत असत.
तर, सहज आठवले म्हणून अशी जंत्री केली.. इथे बसून सगळे मिस करतोय एवढे नक्की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त लिहिलंय. Happy
मनकवडे आणि गाढविणीचं दूध विकणारे हे सोडून बाकी सगळे लहानपणी पाहिलेले आहेत. आशूनं लिहिलेल्या तांदूळबदली बायका मात्र नाही पाहिलेल्या.

खुप खुप मजा आली वाचताना .... दिनेशदा... Happy

लहानपण आठवल...

प्रतिसादात कोणी लिहल आहे का माहित नाही... पण बांगडीवाले , फणी कंगवा काजळ लहान मुलांच्या हातातल्या बांगड्या घेऊन येणार्‍या बायका.. बघितल्यात.

लोकहो,

मुंबई एव्हढी समुद्राकाठी असूनही आत्तापर्यंत शहाळेवाल्यांचा केवळ त्रोटक उल्लेख आलाय. दोन प्रकारे शहाळी दारावर येत. चारचाकी ढकलगाडीवर वा डोईवर टोपली घेऊन.

तसेच उसाचा ताजा रस काढून देणारा फिरता चरक घेऊनही काही कुटुंबे दारावर यायची. हा चरक कोलूप्रमाणे फिरवावा लागे. ठाण्याला आमच्या घरी येणाऱ्या एकाने बीएससी केलं होतं, पण नोकरी नसल्याने पिढीजात धंदा स्वीकारला होता.

आ.न.,
-गा.पै.

बोस बाबू यायचे आमच्या कडे, मग सर्व बच्चे कंपनी गच्चीत गोळा करून सर्वांचा सामूहिक केश कर्तनाचा कार्यक्रम चाले. Happy

तुम्ही तर बालपणाची सुंदर आठवण जागी केलीत!

आजीकडे गिरगावात आम्ही मुलं सुट्टीत जमलो की कुल्फी खायचा कार्यक्रम असायचा. रात्री येणार्‍या कुल्फीवाल्याची आतुरतेने वाट बघायचो. अगदी गॅलरीत उभं राहून तो दिसतोय का ते बघायचो. तोही निराश करायचा नाही. 'कुल्फीए!' अशी आरोळी ऐकली की लगेच गॅलरीत धाव घेऊन त्याला वर बोलवायचो. मलई आणि पिस्ता हे दोनच फ्लेवर. छोटी कुल्फी आणि मोठी कुल्फी असे दोन साईझ. तो लाल रंगाच्या माठात कुल्फीचे साचे घेऊन यायचा. काही भावंडांना काठीला लावलेली कुल्फी आवडायची. मला मात्र तो कुल्फीचे तुकडे करुन पानांत घालून दयायचा तसं खायला आवडायचं. घरातल्या तिन्ही पिढया कुल्फी खायला एकत्र यायच्या. घरचे जनरली दोन कुल्फी खायची परवानगी दयायचे- एक पिस्ता, एक मलई. आजी स्वतः मात्र क्वचितच कुल्फी खायची. आम्हाला खाताना बघूनच ती समाधानी असायची. कुल्फीवालाही ओळखीचा झाला होता..मराठीच होता. एकदम १५-२० कुल्फी खपत असल्याने तोही खुश असायचा. त्याला पाणी दया आणून असं आजी सांगायची. पाण्याबरोबर एखादा पेढा किंवा बर्फी असायची...नुसतं पाणी दयायची पध्दत नव्हती. त्यानंतर आजवर इतक्या ठिकाणची इतक्या फ्लेवर्सची कुल्फी खाल्ली आहे. पण त्या मलई आणि पिस्ता कुल्फीची चव नाही...ती चव बेस्ट होती Happy

छान लिहिलाय लेख.
बोरिवलीला अजुनही १ मुसलमान साई बाबान्चा वेश करुन येतो आनी घरात धुर सोदून पैसे घेतो. माझ्या आईची ताकिद होती कि पैसे उम्बर्याच्या बाहेर जाउनच द्यायचे.

काय अफलातून नॉस्टॅल्जिया दिलात तुम्ही !

गाढविणीच्या दुधाच्या बाबतीत तुमच्या वडिलांचे उत्तर ग्रेट आहे.

सीएन्डब्ल्यु यांचा प्रतिसाद वाचून आठवलं............
सांगलीला पेरिना नावाचं आईसफ्रोट.....(:खोखो: ...हो तेव्हा आईसफ्रोटच म्हणायचो आम्ही....)ची गाडी यायची. फक्त उन्हाळ्यातच.
आणि ते विकायला येणारा माणूस " निर्वाश्याचा" होता. तो म्हणायचा " ए राम्या बाब्या आया". तो असं का म्हणायचा माहिती नाही. पण अस्संच म्हणायचा तो. ही आरोळी ऐकू आली की तोंडाला पाणी सुटायचं.
यातही आरींज(ऑरेन्ज), म्यान्गो असे काय काय फ्लेवर्स असायचे.
हो ...आणि निर्वाश्याचा म्हणजे निर्वासिताचा, म्हणजेच सिंधी.
यात कुणालाही कमी लेखण्याचा उद्देश नसायचा. तेव्हा समस्त सिंधी समाजाचा उल्लेख निर्वाशीत असाच होत असे.

गामा, खोटं वाटेल पण मुंबईत अगदी चौपाटीवरही शहाळ्यांचा धंदा केरळी लोकांनी आणि तोही खुप नंतर सुरु केला.

मानुषी, त्या निर्वासित लोकांची अगदी करुण आठवण आहे माझी. कोल्हापूरला एका हॉस्पिटल मधे मावशी ऑपरेशन थिएटरच्या दारातून एका सिंधी बाईचे सिझेरियन बघत होती. मी विचारले, मावशी भिती नाही का वाटली, तर ती म्हणाली, निर्वासित ते, त्यांचे बघायला काही वाटत नाही.

त्या कुल्फीची मात्र चवच आगळी होती. क्वांटीटी अगदी कमी असायची तरीही....

डुप्लिकेट चाव्या करून देणारे... त्यांच्याकडे एका मोठ्या रिंगला बऱ्याच किल्ल्या अडकवलेल्या असायच्या. जाम झालेली कुलूपे, हरवलेल्या किल्ल्या वगैरेंसाठी या लोकांना डिमाड असायची. पण त्यांच्याकडून शक्यतो काम करून घ्यायचे नाही असा घरचा संकेत होता. का, तर त्यांना तुम्ही कोठे राहाता हे कळल्यावर कुलूप लीलया उघडून चोरीचा धोका वगैरे.

त्यांचा धोका असतोच अकु.... मस्कतमधे भरपूर कागदपत्रे दाखवल्याशिवाय दुकानातही डुप्लिकेट चावी बनवून देत नसत.

दिनेश दा,

खुप मस्त लेख, आम्ही मुंबई ९३ साली सोडली, अगदी तेव्हा पर्यंत नाही पण तरि ही ह्या तील बरेचसे फेरीवाले मी स्वतः ही मझ्या लहानपणी पाहिले आहेत्...अगदी आम्ही विले-पार्ले पुर्व सारख्या comparitively modern भागात रहात होतो तरिही....स्पेशली ते लाल फडके गुंडाळलेल्या माठा सारख्या पॉट मधुन कुल्फी विकायला यायचे ते...आम्ही मुंबई ९३ साली सोडली, तेव्हा मी बराच लहान होतो, अगदी ७ वीत्...पण नंतर रहायला गेलो ते नागपुरात्...आणि वर उल्लेख केलेले बहुतांश फेरीवाले जसे बहुरुपी, कुड्मुडे, दुधवाले इ. पहावयास मिळाले ते थेट अगदी २००१ पर्यंत. नागपुरात कडक उन्हाळा असल्याने ह्या फेरीवाल्यांबरोबर च एक ताक विकणारी पण लोकं असतात्...माझ्या एका मावस्-आजी ने अश्या एका ताक विकणार्या फेरीवाल्याला तीच्या उच्च हिंदी मधे विचारले होते...."ताक में अल्ला डाला के नै ?" (ताकाला आलं लावलय का?)
तुम्ही खरेच बालपणी च्या सुंदर आठवणी जाग्या केल्यात Happy

तर, सहज आठवले म्हणून अशी जंत्री केली.. >>>>>>>>>>>>>> सहज आठवले म्हणत बहुतेक सगळ्याच फेरिवाल्यांबद्दल लिहिलय! अप्रतिम, तुमची लेखनशैली छानच आहे.

चणे-चुरमुरे विकणारा, लोखंडी तवे कढया विकणारा, ग्रहण सुटल्यावर दान मागणारे असे काही माझ्या बालपणीच्या आठवणीत देखिल आहेत.

सासरी आले तेव्हा एक आंधळी बाई दर अमावस्येला "अमावस वाढ.. माय अमावस वाढ.." असे ओरडत यायची. तेव्हा ईतर दिवशी ती कुठेही दिसायची नाही. माझा मुलगा महीन्या - दोन महीन्याचा असताना ती आली होती. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून म्हणाली, "अमावस वाढ.. माय अमावस वाढ.. तुझा मुलगा वकिल होईल". मला गंमतच वाटली होती. पण आज वीस वर्षानंतर मुलाचा मुद्दा पटवून देण्याचा स्टॅमिना पाहीला तर वाटते हा खरेच वकील होऊ शकेल. तिचाच आशिर्वाद.

सुंदर लेख. आता सोसायट्यांमधून फेरीवाल्यांना आत येण्याची मनाई असते. त्यामुळे बरेचसे ओळखीचे आवाज कमी झालेत. एका वसईवाल्याचा 'भज्जीsssय्' (भाजी), नंतर एका रद्दीवाल्याचा 'अद्दीsssय्' (रद्दी), केळेवाल्याचा 'एल्लाsss लोप्' (केला लो), आंबेवाल्याचा 'पोssssस' ( हापूस) असे अनेक. कापूस पिंजून गाद्या करून देणार्‍यांचा 'ट्वाँय ट्वाँय' असा धनुकलीचा आवाज आता लुप्तच झालाय कारण आता कापूस यंत्रावर पिंजला जातो. एक अगदी जराजर्जर मराठी गृहस्थ माघ-फाल्गुनात निर्णयसागर पंचांग विकीत. (ही अर्थात फार जुनी म्हणजे कालनिर्णयपूर्वीची आठवण.) त्यांच्या हातातल्या काठीला घुंगूर बसवलेले असत. ती काठी ते मुद्दामहून आपटून 'खुळ्ळुक खुळ्ळुक' असा आवाज काढीत. त्यामुळे ते आल्याचे कळे. गोसावी, भिक्षेकरी खूप येत. एक रामदासीसुद्धा येत. त्यांची खणखणीत आवाजातली 'जय जय रघुवीर समर्थ' ही हाळी ऐकताच आम्ही लगबगीने त्यांना शिधा देत असू. 'अल्लख निरंजन' गोसाव्यांना पसाभर तांदूळ किंवा भात देण्याची पद्धत होती. पण नंतर इतके तांदूळ परवडेनात तेव्हा आम्हां अगदी लहान मुलांच्या हातून आजी भिक्षा द्यायला लावायची. आमच्या चिमुकल्या हातांच्या पशात अगदी थोडे तांदूळ मावायचे. मुंबईत सुटे भात मिळायचे बंद झाल्यावर तांदूळ निवडताना मिळालेले भातगोटे बायका जपून ठेवायच्या आणि ते मूठमूठभर भिक्षा म्हणून द्यायच्या. पण शेवटी भात सडण्याच्या गिरण्या मुंबईतून हद्दपार झाल्या आणि भिक्षेकरी ही भिक्षा स्वीकारीनासे झाले. मग एक पैसा, दोन पैसे असे करत शेवटी भिक्षेकरीच बंद झाले. आता भीक मागणे हा संघटित आणि गुन्हेगारीचा धंदा बनला आहे.

हीरा.. या आरोळ्या अश्या असत कि काहीतरी विकायला आलेय हे समजावे पण काय ते बघण्यासाठी बाहेर जावे लागावे.. अश्या.

पुर्वी रात्री नेपाळी गुरखे पण गस्त घालायचे. होशिय्यार असे ओरडत, काठी आपटत ते जायचे. त्यांचा आधार वाटायचा खुप. महिन्यातून एकदाच पैसे मागायला यायचे ते.

गुरखा आमच्याकडे अजूनही येतो.
महिन्याला १० रुपये मागतो. मी २० देतो.
पण सुमारे हजार पंधराशे घरांत तो मागतो, हेही ध्यानी घेतले पाहिजे.

जबरदस्त संकलन .. क्लासिकच!

@भैया तूम्हारी भैंस कब बाळंत होनेवाली है, >>> Lol

आघाडा..दूर्वा....फुल..य्य!
आमच्या इथे श्रावण ते गणपति या सिझन मधे सकाळी ६ ते ९ या वेळेत या बायका यायच्या. जोरात हाळी ऐकू यायची 'आघाडा..दूर्वा....फुल..य्य! आंम्ही बघायला वाड्याच्या ग्यालरीत यायचो. मग खाली बायका जमायच्या आणि ही विक्रेती पत्री आणि फुलं विकत द्यायची. मग वाड्यातल्या बायकाही, "ही फुलं दोन टाका की अजुन...' आघाडा आहे की चवळई? कळतही नैय्ये' असं काहिबाही बोलत. ती बाईपण , 'मग वास घेऊन बगा की!' असं पान-तोडायची. Wink

वासुदेवपण असाच "पाची वदनीव...मुख वदनीव..." असं काहितरी गाणं म्हणत यायचा. आंम्ही ५/५ पैश्याची चिल्लर घेऊन उभे रहायचो. एक गाणं संपलं. की ५ पैसे द्यायचे.. की लगेच दुसरं... बहुत धमाल.

दुपारी बर्फाची अंडी आणि हातभर लांब पेपसीकोले विकणारा यायचा. त्याला पैसे कींवा ट्यूब बल्ब च्या टोकाचं अल्युम्यॅनिअम दिलं की तो पेप्सी किंवा ती अ‍ॅल्युमॅनिअमच्या साच्यातली बर्फाची रंगीत अंडी काटकीत खुपसून द्यायचा..
च्यायला.., लै लै भारी ते दिस! गेले आता. Sad

छान लिहीलय...
यातले काही फेरीवाले मीपण पाहीलेत लहानपणा पासून, ते गधी का दुधवाले अजुनही येतात .

Pages