मुंबईचे फेरीवाले

Submitted by दिनेश. on 26 March, 2015 - 04:24

इब्लिस यांनी कल्हईवाले आणि लेलेकाकांनी पिंजार्यांबद्दल लिहिल्यापासून हा विषय मनात होता. आज लिहूनच टाकतो.

माझे बालपण मालाड पूर्वेला आणि चेंबूरला गेले. (आम्ही १९७४ साली शिवसृष्टीत आलो त्यावेळी तो
भाग चेंबूरच्या पोस्टल हद्दीत होता नंतर नेहरू नगरला जोडणारा पूल झाला आणि आमचा पिनकोड बदलला. )
त्या काळात हाऊसिंग सोसायट्या नव्यानेच तयार होत होत्या. आजकाल बहुतेक सोसायट्यांच्या गेटवर, " फेरीवाले
व सेल्समन यांना प्रवेश नाही " अश्या पाट्या असतात त्या, त्या काळी नव्हत्या.

एका जागी स्थिर न बसता आपल्याकडील मालाची वा सेवेची घरोघर ( किंवा दारोदार ) जाऊन विक्री करतो, तो
फेरीवाला अशी माझी सोपी व्याख्या. आठवणीतल्या फेरीवाल्यांची हि जंत्री..

मुंबईत १९७२ साली दूरदर्शन सुरु झाले. नंतरही बरीच वर्षे ते सामान्यांच्या आवाक्यातले नव्हते. शिवाय तो बाळगायला लायसन्स आणि अँटेना लागत असे. आकाशवाणी पण २४ तास नसे. संध्याकाळची छोटी वर्तमानपत्रे मोजकीच होती ( संध्याकाळ, श्री वगैरे ) त्यामूळे करमणुकीची साधने अशी नव्हतीच. ती कमी हे फेरीवाले भरून काढत असत.
या फेरीवाल्यांमधे एवढी विविधता होती कि रोज नवी करमणूक आम्हाला मिळत असे. शिवाय आज कोण येणार, याची अजिबातच कल्पना नसल्याने उत्कंठाही असायचीच. यापैकी कुणीही आला कि आम्हा मुलांचे त्याच्याभोवती रिंगण ठरलेले. ती वस्तू घेण्यात, त्याचे पैसे देण्यात वा त्या आधीची घासाघीस करण्यात आमचा काहीच सहभाग नसे. आमची भुमिका केवळ बघ्याची ( व कदाचित नंतर त्यांची नक्कल करण्याची )

१) दूधवाला

जोगेश्वरीच्या पुढे बहुतेक गावात गोठे होते. काही अजूनही आहेत. त्या गोठ्यातून भय्ये दारोदार जाऊन दूधाचा रतीब घालत असत. सरकारी दूध केंद्रे होती पण एकतर ती गाडी अगदी सकाळी येत असे शिवाय त्यासाठी रेशनकार्डासारखे कार्ड काढावे लागे. प्लॅस्टीकच्या पिशव्या नव्हत्या तश्याच आता असतात तश्या डेर्याही नव्हत्या.
काही जिलबी फरसाण विकणारे मोठ्या कढईत आटवलेले दूध विकत असते, पण ते रोजच्या वापरासाठी नसे.
त्यामूळे हा दूधवाला भैया, हाच एकमेव पर्याय होता. तो दूधात पाणी मिसळतो यावर तमाम गृहिणींचा ठाम विश्वास.
आणि त्या दिव्य हिंदीत त्याच्याशी रोजचा वाद ठरलेला ( मापटा बुडव बुडवके देव ) पण हे भय्ये प्रतिवाद करत
नसत. हे दूध मात्र नीरसे म्हणजे न तापवलेले असे.

तसेच दूधाचे पैसे हे महिन्याने द्यायचे असत. रतीब घालून उरले तर ते जास्तीचे दूध विकत असत. ते परत नेऊन त्यांनाही काही फायदा नसे. साठवण्याची व्यवस्था नसे. पनीर खवा करायची सोय नसे. जास्तीचे दूध हवे असेल तर तेही काही दिवस आधी सांगावे लागे. कोजागिरीला, श्रावणी शुक्रवारी असे जास्त दूध लागत असे. आमच्याकडे बरीच वर्षे एकच भैया होता. तो गावी गेला कि त्याची बायको रतीब घालत असे. ( तिला आम्ही भैय्यीण म्हणत असू. )

होळीला ते आवर्जून आम्हाला भांग आणून देत असत. आम्हा लहान मूलांना अर्थात ती जास्त मिळत नसे. आणि मिळाली तर आमचा दंगा वेगळाच. एकदा एका मुलीने भांग प्यायल्यावर जो पिंगा घालायला सुरवात केला, तो आवरायला ३ जणांनी तिला धरून ठेवावे लागले होते.

२) चीक

भैया तूम्हारी भैंस कब बाळंत होनेवाली है, हमको चीक मंगताय.. अशी मागणी भैयाकडे नेहमीच होत असे.
हा चीक मात्र तो निवडक घरातच देत असे. या चीकातही तो पाणी घालतो, असा आईला संशय असे. ( तिच्या माहेरी जो चीक मिळत असे, त्याचा खर्वस एवढा घट्ट होत असे कि तो किसणीवर किसता येत असे. ) तेवढा घट्ट खर्वस मुंबईला कधीच होत नसे.

पुढे कुर्ल्याला आल्यावरही असा चीक आमच्याकडे नेहमी येत असे. इथे आल्यावर आई, शेजारच्या वागळेकाकींकडून खर्वसाची नवीन पाककृती शिकली. त्या खर्वसात खोबरे आणि शहाजिरे वाटून टाकत असत.
पुढे खर्वस बाजारातही मिळू लागला. आता चीकवाले आमच्या भागात तरी येत नाहीत.

३) वसईचे भाजीवाले.

वसईमधे त्याकाळी भाजीचे बरेच मळे होते आता स्टेशनपासुनच वस्ती दिसते. पुर्वी स्टेशन ते गाव यामधे बराच मोकळा भाग होता. तिथून हे भाजीवाले येत असत. त्यांच्याकडे वांगी, मेथी, इतर पालेभाज्या, पापडी, कच्ची केळी अश्या मोजक्याच भाज्या असत. त्या उत्तम प्रतीच्या असल्याने भावही जास्त असे. केळफूल वगैरे त्यांना मुद्दाम आणायला सांगावे लागे. विशेष म्हणजे हे भाजीवाले कावडीतून भाज्या आणत.

आता वसईची शेतजमीनच कमी झाल्याने, हे भाजीवालेही कमी दिसतात.

४) म्हावरेवाली.

पुर्वी कोळणी मासे घेऊन घरोघरी फिरायच्या. कोळी पद्धतीने नेसलेले घट्ट लुगडे. अंगावर भरपूर दागिने. डोक्यावर एक लांबरुंद फळी आणि त्यावर माश्याची टोपली. त्यांची यायची वेळ पण सकाळी १० च्या दरम्यानचीच असे.

त्या काहि मोजकेच मासे आणायच्या. पापलेट, कोलंबी, करंदी, मांदेली, ओले बोंबील व ओले बांगडे.. साधारणपणे हेच मासे जास्त खपत. टोपलीवर ती फळी आडवी ठेवून वाटे लावत. त्यांच्याशी बरीच घासाघीस करावी लागे. पण नेहमीच्या गिर्हाईकांना त्या प्राधान्य देत.

त्यांना वेळ असेल आणि मागणी केली तर त्या मासे नीट करूनही देत. खास करुन भरले पापलेट करायला आई त्यांनाच कापून द्यायला सांगत असे. पण त्यांना बहुदा घाई असे. जेवणाची वेळ व्हायच्या आत आणि मासे खराब व्हायच्या आत त्यांना विकायचे अस्त. ( त्यांच्या टोपलीत बर्फ नसे आणि घरोघरी फ्रिजही नसत. )

कुर्ल्याच्या घरी पण नेहमीची कोळीण येत असे. तिचा माझ्या पुतण्यावर विशेष जीव होता. तिचा आवाज ऐकल्यावर तो बाहेर पळत जायचा आणि ती त्याला एखाद दुसरी कोलंबी किंवा बोंबील बक्षीस द्यायची. तो ते मासे तसेच हातात धरून यायचा घरी.

कोळणी स्टेशनवर पण लगबगीने चालत असायच्या. मच्छी का पानी, असे ओरडत राहिल्या कि त्यांना आपोआप गर्दीत वाट मिळायची. पुढे या धंद्यात केरळी लोक शिरले आणि टोपल्यांच्या जागी प्लॅस्टीकचे टब आले.

५) पाट्याला टाकी

त्यावेळी मिक्सर नव्हतेच. घरोघरची वाटणे पाट्यावरच होत. पापडाचे पिठ कुटणे, मेंदी वाटणे, पुरण वाटणे वा इडलीचे वाटण करणे... या सगळ्यासाठी आमच्या घरी पाटाच वापरत. आमच्या घरी जाते पण होते. हे सगळे काही काळाने गुळगुळीत होत. मग त्याला टाके काढावे लागत.

पाट्याला टाकी असे ओरडत बायका आल्या कि त्यांना या वस्तू दिल्या जात. हातोड्यासारखे एक अवजार वापरून अगदी नक्षी काढल्यासारखे टाके काढून देत त्या. आमच्या वाड्यात एकच कारवारी कुटुंब होते आणि त्यांच्याकडे रगडा होता. त्यालाही टाके काढून देत त्या. एकाच्या घरी त्यांना बोलावले म्हणजे वाड्यातल्या सगळ्याच पाट्यांना
टाके काढून घेतले जात.

त्यांना काम करताना बघणे म्हणजे आम्हा मुलांना कोण आनंद. दगडाची कपची डोळ्यात जाईल म्हणून त्या आम्हाला जरा लांब बसायला सांगत. टाके काढताना क्वचित ठिणग्याही उडत, त्याचे तर आम्हाला कोण कौतूक.
त्यांची गुटगुटीत तान्ही बाळे त्या दुपट्यात गुंडाळून तशीच जमिनीवर ठेवत. बाळाला आमच्या घरात ठेव असे आईने सांगितले, तर फरशी बादेल असे म्हणत त्या.

आता पाट्याचा वापर कमी झाल्याने त्या दिसत नाहीत. कधी कधी खास दगड आणून ते मुंबईतच पाटे वरवंटे घडवताना दिसतात. पण आता पाट्याचा आकारही लहान झालाय.

६) बाटलीबाई

नाही बाई बाटली नाही, बाटलीबाई च. असेच ओरडत या बायका येत. त्यावेळी प्लॅस्टीक फारसे वापरात नव्हते.
बरीच औषधे काचेच्या बाटल्यांतून मिळत. व्हीक्स फॉर्म्यूला ४४ तर आम्हा मुलांचे फार आवडते औषध. घरोघरी मुले आवडीने पित ते. शिवाय मर्क्यूरीक्रोम ( लाल औषध ) ग्राईप वॉटर, द्राक्षासव, गौर येऊन गेल्यावर घ्यायचा परिपाठाचा काढा, वैद्य पाटणकर काढा, बेडेकर, कुबल यांची लोणची... अशा अनेक बाटल्या घरात येत. त्या रिकाम्या झाल्या कि या बायकांना दिल्या जात.

बाटली त्यांना दिली कि आधी त्या उघडून झाकण नीट आहे का ते बघत. आत औषध असले तर ओतून टाकत.
मग वास घेऊन बघत. वास न येणारी, धुतलेली बाटली असेल तर १/२ पैसे जास्त मिळत.
यातल्या बर्याच बाटल्या काचेच्या कारखान्यात विकल्या जात ( काच तयार करताना विरजणासारखी काच वापरावी लागते ) पण धड झाकण असलेल्या बाटल्या तेल, औषध आणण्यासाठी, रॉकेलच्या चिमण्या वगैरे करण्यासाठी वापरल्या जात.

बियरच्या बाटल्या फार नसतच. एखादे काका घरी पित असतील तर त्या बाटल्या, काकूंना चोरूनच विकाव्या लागत. दारुची व्हॅट ६९ हि बाटली आम्हा मुलांना ओळखीची ( आकारावरुन ) होती पण ती कचर्यात जरी दिसली तरी आम्ही तिला हातच काय पाय पण लावत नसू.

७) भंगारवाला

डालड्याचा किमान १ तरी डबा दर महिन्याला घरोघर वापरला जात असे. या डब्याला झाकणाखाली पातळ पत्रा असे. डबा रिकामा झाला तरी हा पत्रा काढल्याशिवाय तो डबा झाकणाचा डबा म्हणून वापरता येत नसे आणि हा पत्रा काढणे तसे जिकिरीचे असायचे.

वरचा सगळाच पत्रा कापून हे डबे तुळस लावण्यासाठी ते विहिरीच्या पोहर्यासाठी ( मालाडला वाड्याजवळ विहिर होती ) वापरले जात. पण कालांतराने ते गंजत. बिस्किटांचे मोठे डबे, पापड, करंज्या वगैरे ठेवण्यासाठी वापरत. पण तेही मग गंजत. पत्र्याच्या बादल्या गळू लागत. अश्या सगळ्या निरुपयोगी ठरलेल्या वस्तूंची विल्ल्हेवाट
लावण्यासाठी भंगारवाला कामी येत असे. या व्यवहारात पैसे थोडे मिळत पण घरातली अडगळ कमी होतेय याचे सुख असे. आम्हा मुलांच्या जुन्या तीन्चाकी सायकली भंगारात देतांना मात्र आमचे डोळे भरुन येत. आपण दुसरी घेऊ, हे वचन आईबाबांना पाळणे नेहमीच शक्य होत असे, असे नाही. हा भंगारवाला हातगाडी घेऊन येत असे. पण त्याच्या भरलेल्या हातगाडीकडे बघणेही का कुणास ठाऊक ,त्रासदायक वाटे.

८) बोहारणी

आता आता पर्यंत बोहारणींचा आमच्याकडे नियमित राबता होता. आईला भांड्यांची फार हौस. पुढे मी काचेची, नॉन स्टीक वगैरे भांडी जास्त घेऊ लागल्यावर तो सोस कमी झाला.. आमच्याकडे जुने कपडे भरपूर होतात ( कारण सगळ्यांना नवे नवे कपडे घ्यायची हौस आहे आणि जुने व्यवस्थित नीट राखलेले असतात. )
चि. वि. जोश्यांच्या "काटकसरीचे प्रयोग" प्रमाणेच आमच्या घरात संवाद होत असे. पुढे पुढे त्या स्टीलची क्वालिटी अगदीच खराब येऊ लागली. फ्रिजमधे ती भांडी ठेवली कि त्यांना तडे जाऊ लागले आणि मुख्य म्हणजे हे आईला पटले, तेव्हा हा प्रकार बंद झाला.

९) गोधडीवाल्या

जुन्या कपड्यांची गोधडी शिवून देणार्या बायकाही येत. शिवायला दोरा आणि सुई त्याच आणत. आपण फक्त जुने कपडे द्यायचे. सर्व कपड्यांच्या नाड्या, शिवणी काढून त्या एका जुन्या साडीच्या घडीत व्यवस्थित रचत. मग अंतरा अंतरावर टाके घालून ते सगळे कपडे जागच्या जागी बसवत. मग दोन बाजूंनी सुरवात करुन भराभर टाके घालून त्या गोधडी पूर्ण करत.

यातले टाके अगदी सुबक तर असतच पण गोधडी देखील सगळीकडे सारख्याच जाडीची असे. अनेक वर्षे ती वापरली जात असे मुंबईच्या थोटक्या थंडीत ती व्यवस्थि ऊब देत असे.

१०) मनकवडे

मनकवडे दिसायला अगदी साधे असत. धोतर टोपी असाच त्यांचा वेष असे. पण त्यांचे कसब वेगळेच असे.
दोघे व्यवस्थित अंतर राखून उभे रहात. मग एकाच्या कानात आपण आपले नाव सांगितले कि तो खाणाखुणांच्या आधारे किंवा क्वचित काही कवनांच्या आधारे दुसर्याला ते नाव सांगत असे आणि दुसरा ते नाव ओळखून दाखवत असे. या खाणाखुणा आपल्याला अजिबात कळत नसत. पण आम्हाला त्याच्यातपण खुप थ्रील वाटत असे.

दुसरी मजा अशी कि त्याकाळी बायकांची खरी नावे आम्हा मुलांना माहीत नसत ( शेखरच्या आई, शशिच्या आई हीच नावे आम्हाला माहीत असत. ) या मनकवड्यांना मात्र खरी नावे सांगत त्या. हे मनकवडे कधी कधी भविष्य पण सांगत.

११) नंदीबैल.

नंदीबैल म्हणजे सजवलेला लहानखुरा बैल. सोबत बुगु बुगु असे वाजणारे एक वाद्य. परिक्षेत पास होईन का, ताईचे लग्न जमेल का अशा प्रश्नांना तो होकारार्थी ( क्वचितच नकारार्थी ) मान डोलावत असे. ती कशी डोलवायची हे तो नंदीबैलवालाच सांगत असणार यावर आमचा विश्वास होता.

मला आवर्जून सांगावेसे वाटतेय, कि नंदीबैल हेच नाव प्रचलित होते. मीना खडीकर यांच्या चॉकलेटचा बंगला हा गाण्यांच्या संग्रह त्याच दरम्यान आला, त्यानंतर त्याला भोलानाथ असे कुणी कुणी म्हणू लागले.

१२) गौशाला वाले

एक जरा अॅबनॉर्मल वाटेल ( म्हणजे पाठीवर पाचवा पाय वगैरे असलेली ) अशी गाय हे लोक घेऊन येत. त्या गायीत काही दैवी शक्ती आहे, असा त्यांचा दावा. पण ती काही मान वगैरे डोलावत नसे. तिला लोक कुंकु वगैरे लावत.
या गायवाल्यांचा पैसे जमवायचा वेगळाच धंदा असे. ते कुठेतरी उत्तरेत मोठी गौशाला उभारणार असत आणि त्यासाठी त्यांना पैसे हवे असत. त्यासाठी काशीचा पत्ता असणारी रसिट देखील ते देत. ( नवल म्हणजे मालाडमधेच एक गोशाळा होती आणि ते लोक कधीही अशी मदत मागायला येत नसत. )

गायीला चारा, हा प्रकार मात्र खुप नंतर सुरु झाला. या बायका पण सहसा फिरत नाहीत तर एका जागी बसून असतात.

१३) हत्तीवाले

राजेश खन्नाचा , " हाथी मेरे साथी " हा चित्रपट त्या काळात आला होता. तो आम्ही सर्वच मुलांनी बघितला होता आणि तो बघून सर्वच हत्ती आपले मित्र आहेत असा ठाम समज झाला होता.
मालाडला एक हत्तीवाला येत असे. त्याचा हत्ती भला मोठा होता तरी फारच प्रेमळ होता. त्याच्या अंगाला, शेपटीला हात लावला तरी तो शांत असे. काही धाडसी मुले तर त्याच्या पोटाखालून पळ्त जात असत.

या हत्तीची आणखी एक मजा म्हणजे जर त्याला केळं वगैरे दिलं तर तो ते खात असे पण अगदी पाच पैश्याचे नाणे जरी दिले तरी तो सोंडेने व्यवस्थित पकडून वरच्या माहुताकडे देत असे. त्याच्या ताकदिची आम्हाला कल्पना आलीच एकदा. त्याला एकाने असोला नारळ दिला. त्यावर पाय देऊन त्याने तो चपटा केला आणि खाऊनही टाकला.
पण त्यानंतरही त्याची भिती वाटली नाहीच.

१४) दरवेशी

दरवेशी येत ते आम्हाला कुत्र्याच्या भुंकण्यावरून कळत असे. या दरवेश्याकडे एक अस्वल असे. त्याच्या मुसक्या बांधलेल्या असत त्यामुळे ते कुणाला चावू वगैरे शकत नसे. तरीही कुत्रे त्याला टरकून असत.

अधून मधून दोन पायावर उभे राहण्या व्यतीरिक्त ते अस्वल फार काही करतही नसे. पण हे दरवेशी एक वेगळीच वस्तू विकत असत. अस्वलाचा एक केस एका कॅप्सूल मधे घालून त्याचा ताविज बनवत आणि तो ते विकत असत. हा केस ते आपल्यासमोरच काढत असत. असा ताविज गळ्यात घातला तर मुलांना कशाची भिती वाटत नाही, असा समज होता. असे ताविज आम्हा सगळ्यांच्याच गळ्यात असत. आणि ते साध्या दोर्यात बांधलेले असल्याने तुटतही पटकन. त्यामूळे दरवेश्याच्या ताविजाला नेहमीच मागणी असे.

१५) गाढविणीचे दूध..

आता कुणाला सांगून खरे वाटणार नाही, पण चक्क गाढविणीचे दूध मालाडला विकायला येत असे. तो माणूस चक्क गाढविण घेऊनच फिरायचा, आणि ज्याला हवे त्याला ते दूध काढून द्यायचा.

ते औषधी म्हणून घेत असत, पण नेमके कश्यावरचे औषध ते मात्र मला कधीच कळले नाही. बाबांना विचारले तर म्हणत. ज्यांना अक्कल नाही त्यांना देतात. तूला हवे का ?.. मी कशाला हो म्हणेन मग ?

१६) कुल्फीवाला

आता छोट्या छोट्या मडक्यात मिळते त्याला मटका कुल्फी असा शब्द वापरतात. पण पुर्वी मटका कुल्फीला वेगळा अर्थ होता. एका मोठ्या माठात बर्फ आणि मिठाचे मिश्रण करून त्यात कुल्फीचे साचे ठेवलेले असत. हे साचे चिलिमीच्या आकाराचे असत आणि त्याचे झाकण काळ्या रबर बॅंडने बांधलेले असे. कुल्फी देतांना दोन तळव्यात हा साचा फिरवून ती मोकळी केली जात असे आणि सागाच्या पानावर दिली जात असे. आटीव दूधापासून केलेल्या या कुल्फीला मस्त चव असे.

१७) बुढ्ढी के बाल

बुढ्ढी के बाल म्हणजे आताचे कँडी फ्लॉस. हे विकणारे दोन प्रकारे हे विकत. एक जण त्याचे मुठीएवढे गोळे काचेच्या बॉक्स मधे घेऊन येत असे तर दुसरा ते चक्क आपल्यासमोर करून देत असे. अल्यूमिनियमचे मोठे भांडे आणि त्याला मधे फिरणारे चक्र असे. त्याखाली एक स्टोव्ह असे. त्या चक्रात तो चमचाभर साखर आणि चिमूटभर रंग टाकत असे, आणि मग त्या चक्रातून साखरेचे धागे बाहेर फेकले जात. त्याचा भला मोठा गोळा करून तो विकत असे. निव्वळ गोड लागणारा तो गोळा, त्या काळात तरी अप्रुपाचा होता.

१८) बर्फाचे गोळे

उलट्या बसवलेल्या लाकडाच्या रंध्यावर बर्फाची लादी घासून त्याचा चुरा. मग तो हाताने दाबून त्यात खुपसलेली एक काडी. तयवर लालभडक आणि पिवळेधम्मक सरबत खास नॉझल बसवलेल्या बाटलीतून. मग बर्फ न चावता केवळ ते सरबत प्यायचे. थोड्याच वेळात तो गोळा पांढरा होणार. मग त्यावर आणखीन सर्बत हक्काने मागून घ्यायचे.
मग कूणाचा तरी गोळा भस्सकन फुटून खाली पडणार. त्याला दुसरा गोळा मिळणार खरा पण त्याखाली धरायला त्याच्या आईने घरातून एक बशी आणून दिलेली असणार.... शाळेला सुट्टी पडली कि आमच्या वाड्यातले हे
हमखास दिसणारे दृष्य. शाळा चालू असताना मात्र आम्हाला ( म्हणजे शेंबड्यांना ) हे गोळे खायची परवानगी अजिबात मिळत नसे.

१९) बर्फवाला

पुर्वी घरोघर फ्रीज नसायचे. बर्फाची लादी बैलगाडीतून विकायला येत असे. ही लादी लाकडाच्या भुश्यात ठेवलेली असे.
आपण मागितल्यावर टोच्यासारख्या हत्याराने त्यावर एक रेघ आखून त्या लादीचा तुकडा दिला जात असे.

घरात पन्हे किंवा पॉट आईस्क्रीम करायचा बेत ठरला कि असला बर्फ आम्ही आणत असू. तो पण आयत्यावेळी नाही मिळायचा. त्याला एक दिवस आधी सांगावे लागत असे.

उसाचे रसवाले हे त्याचे नेहमीचे गिर्हाईक, त्यामुळे त्यांना आधी देऊन, उरला तरच आम्हाला मिळत असे.

२०) चिंगमवाला

च्यूईंगगम हे चिकलेट्स या नावाने बाजारात यायच्या आधी हा विक्रेता येत असे. खांद्यावर एक मोठा खांब आणि त्यावर चिंगमचा घट्ट गोळा. मुख्य रंग पांढरा पण त्यावर हिरवा आणि लाल रंगाचे दोन गोळेही असत. हे सगळे प्लॅस्टीकच्या कागदाने झाकलेले असे. हा माणूस त्या गोळ्यातून फुले, प्राणी असे वेगवेगळे आकार करून देत असे.
मला हा प्रकार कधीच आवडला नाही. शाळेतील मुले तो खाऊन तोंडातून धागे काढत आणि तो इथे तिथे चिकटवून ठेवत म्हणून आमच्या शाळेनेही त्यावर बंदी घातली होती. ( सिंगापूरच्या बंदीच्याही आधी बरं )

२१) गॅसचे फुगेवाला

एक भले मोठे गॅसचे सिलिंडर आणि आकाशात झेपावणारे फुगे घेऊन हा फुगेवाला फिरत असे. त्याचे सफरचंद किंवा माकड असेही प्रकार असत. हे प्रकार तो हातानेच करत असे.

अगदी लहान असताना या फुग्याबरोबर आपणही उडून जाऊ असे मला वाटे, म्हणून मी घाबरत असे. एका काकानेच ती भिती घालवली. दुसरे काही घेण्यात हात गुंतल्याने हा फुगा हातातून सुटणे, हे कायम व्हायचे. मग वर वर जाणार्या त्या फुग्याकडे बघत बसणे, हेच काय ते उरायचे. चुकून घरी आलाच तर रात्री तो सोडल्यावर छताला चिकटून बसत असे.

आता यात चंदेरी वगैरे प्रकारही आलेत तसे हार्ट्शेपही.

२२) कडक लक्ष्मी

उघडे शरीर, लांब केसाचा बांधलेला बुचडा, कपाळावर मळवट, कमरेला अनेक तुकडे गुंडाळलेला असा हा कडकलक्ष्मीचा अवतार येत असे. सोबत त्याची बायको ढोल वाजवत फिरत असे. तिच्या डोक्यावर एक चौकोनी देव्हारा असे.
तो नाद वाजू लागला कि तो आपल्याकडच्या आसूडाचे फटके स्वतःला मारून घेत असे. त्यात मार किती आणि आवाज किती, हे मला न सुटलेले कोडे. काही जण आणखी काही प्रकार करत. एका पाटीवर देव ठेवून गरागरा फिरणे किंवा दंडात दाभण टोचणे. या माणसांची भितीच वाटत असे मुलांना.

२३) डोंबारी

डोंबारी पण नियमित पणे येत असे. थोडी मोकळी जागा सापडली कि चार खांबावर एक आदवी दोरी बांधून त्यांचा खेळ सुरु होत असे. त्या दोरीवरून लिलया जाणारी एक बाई हा महत्वाचा आयटम. गोलांटी उड्या मारणे. एका मोठ्या रिंगमधून पार होणे. एका लांब बांबूला लहान मूल बांधून ती तोलणे, दोन पाटांच्या मधे बाटली ठेवून त्यावर तोल संभाळणे असे अनेक प्रकार ते करत.

त्या काळात अनेक मराठी हिंदी चित्रपटातही डोंबार्याचे खेळ असत ( आठवतात ते असे. केला इशारा जाता जाता ( लिला गांधी आणि उषा चव्हाण ) पडछाया ( लिला गांधी ) बात एक रात कि ( वहिदा रेहमान ) )

२४) गारुडी

नाग, मुंगुस घेऊन येणारे हे गारुडी घरोघर फिरत. नागपंचमीला तर हमखास येत. त्याला दूध लाह्या हे प्रकरण तर आमच्याही घरी होत असे. या सापांचे बहुतेक दात वगैरे काढलेले असत. बिचारे असहाय्यपणे फणा काढून डोलत असत. अर्थात त्यावेळी फारशी जनजागृतीही नव्हती ( आता आहे ?? )

२५) कुडमुडे

कुडमुडे हा शब्दही आता ऐकायला येत नाही. हे खरे तर भटजी असत. त्या त्या दिवशीचे पंचांग, संकष्टी असेल तर चंद्र दर्शनाची वेळ, ग्रहणाची वेळ वगैरे सांगत फिरत असत. त्या अनुशंगाने मिळणारी कामेही करत. कालनिर्णय सारखी कॅलेंडर्स येण्यापुर्वीची ही गोष्ट. नंतर मालाडमधे तरी त्यांचे दिसणे कमी झाले.

२६) जूँ मारनेकी दवा

एक आयताकृती मेणकापडावर एक गोरीगोमटी बाई रंगवलेली. केसात जास्वंदीच्या फुलाएवढी ऊ चितारलेली, त्याच बोर्डाखाली खाली पाठ वर पाय करून राहिलेले उंदीर, पाल, झुरळ वगैरे .. आणि या बोर्डला खाली एक चाक आणि मागे काठी लावून हा विक्रेता फिरत असे. अगदी छोट्या बाटलीत, एक हिरव्या रंगाचे तेल किंवा औषध तो विकत असे. केसात उवा हि त्या काळातली कॉमन बाब होती, आणि मुलींना अधून मधून हे औषध वापरावेच लागत असे.

यातले जूँ हे अक्षर नेमके कसे उच्चारायचे, हे मला लहानपणी कळत नसे. असे विक्रेते अजूनही फिरताना दिसतात.

२७) पनवेल वाले.

ठाणे क्रिक ब्रिज १९७४ साली सुरु झाला ( आणि १९८६ साली धोकादायक ठरला ) त्यापुर्वी पुणेच काय पनवेललाही जायला कळवा पुलावरून जावे लागत असे. आणि अर्थातच त्याला वेळ लागत असे. पण तो पुल सुरु झाल्यावर सिडकोच्या बसेसही सुरु झाल्या. आणि पनवेलच्या शेतातली ताजी भाजी घेऊन माणसे मुंबईत येऊ लागली.

पावट्याच्या शेंगा, घेवड्याच्या शेंगा, वांगी, टोमॅटो, वगैरे ताजी चवदार भाजी ते लोक आनत. ( सध्या दादरला गोल देवळाजवळ ते बसतात. ) कधी कधी बैलगाडीतून कलिंगडे, तांदूळही आणतात.

( तांदळाहून आठवले. माझ्या लहानपणी मुंबईत रेशनिंग होते. तांदूळ मिळायचा तो रेशनवरच. आमच्या घरी तो कुणीच खात नसे. मुंबईला खुल्या बाजारात तांदूळ मिळतही नसे. मुंबई हद्दीच्या बाहेर जाऊन तो आणावा लागे. मालाडला असताना वसईला आणि कुर्ल्याला आल्यावर ट्रॉम्बेला जाऊन आणावा लागत असे. तोही सीटखाली लपवून. काही लमाणी बायका मात्र उघडपणे असा तांदूळ, खास करुन सुरती कोलम आणत असत. )

सांडगी मिरच्या करण्यासाठी खास पेणच्या मिरच्या, अलिबागचे वालही हे लोक आणत असत.

२८) खडे मीठवाले.

दळलेले मीठ ( टेबल सॉल्ट ) बाजारात फार नंतर आले. पुर्वी आम्ही खडे मीठच वापरत असू. मिरा रोडला मिठागरे होती. तिथून हे मीठ येत असे. हातगाडीवर मिठाची गोण घेऊन हे लोक येत. दिवाळीच्या पाडव्याला साठवणीचे मीठ घ्यायची पद्धत अनेक घरात होती. त्या दिवशी अगदी पहाटे पहाटे हे लोक येत असत.

२९) पाव बिस्किट वाले.

मॉडर्न आणि ब्रिटानिया हे पावाचे ब्रांड लोकप्रिय होते तरीही मुंबईत खास बेकरीतले पाव विकणारे लोकही येत.
गोल चपटा कडक पाव हि त्यांच्याकडची खासियत. स्लाईस ब्रेड पण ते विकत पण त्याच्या स्लाईसेस आपल्यासमोर करून देत.

त्यांचेच भाईबंद म्हणजे बिस्किटवाले. पत्र्याच्या भल्या मोठ्या पेटीत, खारी, क्रीमरोल्स, नान कटाई वगैरे
घेऊन ते येत असत. त्यांच्या बिस्किटात बीफ फॅट असते असा समज आमच्या घरात होता, त्यामूळे आम्ही कधी ते घेत नसू. गावाहून कुणी आले तर आजोबा नानकटाई, बिस्किटे वगैरे स्वत: करुन पाठवत असत. अजूनही ते सगळे सुरु आहे.

३०) ब्लाऊज पीस वाले.

आता जशी मॅचिंग सेंटर्स दिसतात तशी पुर्वी नव्हती. मूळात साडीवर मॅचिंग ब्लाऊजच घातला पाहिजे असा आग्रहही नव्हता. (ती फ्याशन गणली जात होती ) तरी ब्लाऊजपिसेसचा संग्रह मात्र घरोघरी असायचाच. घरी सवाष्ण बाई आली तर तिला ओटी भरल्याशिवाय पाठवत नसत , आणि त्यासाठी दोनचार पिसेस घरात ठेवावेच लागत.

मालाडला एक कापडवाले कडू नावाचे गृहस्थ होते. निव्वळ याच उद्योगावर त्यांचे चाललेले होते. सोमवार बाजारापासून ते मालाड पुर्वेला चालत येत ( हे अंतर किती आहे ते मालाडवासी लोकांना नक्कीच माहीत असेल. )

टू बाय टू, टेरीकॉट वगैरे नावे त्याच काळात मला माहीत होती.

३१) फिरती लायब्ररी

त्या काळात जास्त मासिके नव्हती तरी किर्लोस्कर, स्त्री, मेनका, जत्रा, मनोहर अशी मासिके लोकप्रिय होती. पण ती विकत घेऊन वाचायची पद्धत नव्हती ( किंवा ती परवडत नसत ) म्हणून फिरती लायब्ररी असे. हा माणूस एका पेटीत ही मासिके घेऊन घरोघरी जात असे. दिवाळी अंकासाठी जास्त वर्गणी असे. अगदी नाममात्र किमतीत अनेक मासिके वाचता येत.

आमच्या घरी आजही अशी व्यवस्था आहे.

३२) सुगंधी उटणे

दिवाळीच्या आधी अनेक घरी उटणे केले जात असे. मग काही गरजू शाळकरी मूले ते घरोघर जाऊन विकत असत.
उटण्याचे ब्रांड फारसे नव्हते ( बेडेकरांचे होते ) त्यामूळे या उटणे वाल्यांची घरोघर वाट बघितली जात असे.

कधी कधी हि मुले आमच्या शाळेतलीच असत. त्यावेळी आई त्यांना आवर्जून खाऊ देत असे. पुढे पुढे कालनिर्णय, दिवाळी कंदील, रांगोळ्यांचे छाप, ठिपक्यांचे कागद वगैरेही हि मुले आणू लागली. या सर्व वस्तू बहुदा त्यांनीच केलेल्या असत.

३३) बहुरुपी

हा एक सोंग काढणारा माणूस असे. कधी शंकर तर कधी राम असे रुप घेऊन तो येत असे. हे रुप मात्र हुबेहुब काढलेले असे. अंगाला फासलेल्या रंगापासून ते कपड्यापर्यंत सर्व हुबेहूब. हा काही गाणी वगैरे म्हणत नसे केवळ ते रुप घेऊन फिरत असे. कधी कधी हा थोडे उग्र रुप घेत असे. म्हणजे छतीत घुसलेला बाण वगैरे असे.

३४) बाइस्कोप

एका स्टँडवर एक चौकोनी डब्बा, त्याला समोर ३ ते ४ गोलाकार छिद्रे, या डब्यावरती एक नाचरी बाहुली किंवा माकड असे या बाइस्कोप चे रुप. या छिद्रांना डोळे लावून आत बघायचे ( एकावेळी ३ ते ४ ) आतमधे चित्रे असत आणि हा फेरीवाला ती हाताने वरखाली करत असे. सोबत एखादे गाणे.
आता हसू येईल पण आम्ही ती चित्रे बघण्यात रंगून जात असू. मला वाटतं मुमताजचे एक गाणेही आहे यावर.
( देखो देखो देखो, बाइस्कोप देखो.. दिल्लीका कुतुबमिनार देखो.. )

आणि हो त्या शिवाय पेपर टाकणारे.... ते तर आजही आहेत. उलट आज त्यांच्या व्यवसाय जास्त जोरात चाललाय.

याशिवाय म्यूनिसिपालिटीचे लोक जे डास मारण्यासाठी धूर सोडायला येत, किंवा कुत्रे पकडायला गाडी घेऊन येत. देवीची लस देणारे... आमच्यासाठी सगळी धमाल असायची.

मुद्दाम नोंदवावेसे वाटतेय कि यापैकी कुणीही भिकारी नव्हते. आपली कला म्हणा किंवा हुनर म्हणा वापरूनच ते पैसे मागत असत.
तर, सहज आठवले म्हणून अशी जंत्री केली.. इथे बसून सगळे मिस करतोय एवढे नक्की.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाशिक कुरमुरे: ही बाई जेंव्हा जेंव्हा येते तेंव्हा तेंव्हा आमच्या घराबाहेर जरा टेकते आणि प्यायला पाणी मागते. <<<अशी एक बाई आमच्याकडे हि येत असे, मला माझ्या एका फ्रेंड ने सांगितले होते कि तिचा मुलगा घरातून पळून मुंबईला आला म्हणून त्याला शोधण्यासाठी ती मुंबईला आली आणि कुरमुरे विकू लागली वैगरे खरे खोटे देव जाणे.

आमच्याकडे एक गोडबोले कोकम वाले येत. एक सायकल आणि त्यावर मोठ मोठाल्या पिशव्या अडकवलेल्या असत त्यात त्यांचा कोकम, लोणचे, मालवणी मसाले, आणि पापड कुरड्या वैगरे असत. त्यांचे नाव गोडबोले न्हवते पण ते कोकमा सारखी आंबट वस्तू गोड बोलून विकत म्हणून आम्हीच ते त्यांना ठेवले होते. ते कोकणातील होते आणि मालवणी भाषेत बोलत.

मस्त आठवणी.
यात सुईदोरे -बिब्बे वाली राहिली. तिच्या काचेच्या चपट्या पेटीत विविध वस्तुंचा खजीनाच असे. सुया,,दोरे,बिब्बे,सागरगोटे ,काळे मणी,डिस्को मणी,गुंजा ,गुलाबाच्या बिया...मज्जा Happy

मस्त आठवणी.
यात सुईदोरे -बिब्बे वाली राहिली. तिच्या काचेच्या चपट्या पेटीत विविध वस्तुंचा खजीनाच असे. सुया,,दोरे,बिब्बे,सागरगोटे ,काळे मणी,डिस्को मणी,गुंजा ,गुलाबाच्या बिया...मज्जा Happy

अपर्णा, अशी एखादी कहाणी या प्रत्येकाचीच असेल. त्यांच्या चटपटीत बोलण्यामागे काय दु:ख दडले असेल, कधी कळतच नाही.

मानुषी, अगदी मुंबईतही पुर्वी ड्रेनेज नव्हते. असे खास सफाई कामगार येत असत. आता शरम वाटते पण त्यांना आमच्या वाड्यात कूरपणे वागवले जात असे.

जयु... आंधळा मारतो डोळा मधे एक गाणे आहे, बिब्ब घ्या बिब्ब, शिक्ककाई.. या बिब्ब्याबद्दल माझ्या मनात अढी होती. (कदाचित लहानपणी अंगावर उठलाही असेल.) आई पण कधी तो घरी येऊ देत नसे.

मस्त आठवणी.
यात सुईदोरे -बिब्बे वाली राहिली. तिच्या काचेच्या चपट्या पेटीत विविध वस्तुंचा खजीनाच असे. सुया,,दोरे,बिब्बे,सागरगोटे ,काळे मणी,डिस्को मणी,गुंजा ,गुलाबाच्या बिया...मज्जा <<<<< या अजूनही अस्तित्वात आहेत बर का ..... बोरीवली वेस्ट स्टेशनला शनिवारी दुपारच्या वेळेला असतात ह्या बस स्टोप जवळ.
लेखात लिहिलेल्या व्यक्तिरेखा अजूनही अस्तित्वात आहेत पण त्या कालानुरूप बदललेल्या स्वरुपात.

आंधळा मारतो डोळा मधे एक गाणे आहे, बिब्ब घ्या बिब्ब, शिक्ककाई.. <<< झब्बू ...हो हो हे गाणे पाहिले आहे आणि मीही याचा उल्लेख करणार होते. Happy

या बिब्ब्याबद्दल माझ्या मनात अढी होती. (कदाचित लहानपणी अंगावर उठलाही असेल.) आई पण कधी तो घरी येऊ देत नसे. <<< दिनेश, याउलट हा बिब्बा औषधी म्हणून आमच्या घरी त्याचा साठा असतो!

अपर्णा, बोरीवलीत अजूनही रानभाज्या वगैरे मिळतात. छान वाटतं.

गजानन, बिब्बाच, मी वयाने खुप मोठा झाल्यावर बघितला. रुचिरामधे तर तो मुखवासाच्या सुपारीत घालयला सुचवले आहे. ते वाचल्यावरच तो खातात हे कळले !

मध्यंतरी एका म्हातार्‍या हत्तीची त्याच्या फेरीवाल्याकडून सुटका करण्यात आली. वडापाव वगैरे अनहेल्धी खाउन त्याचे वजन जास्त वाढले होते. व वयही झाले होते वजना मुळे आजार झाले होते. व विश्रांती नाहीच. लक्ष्मी मला वाट्ते तिचे नाव. एनजीओंनी पुढाकार घेउन तिला सोडवले. ह्या व अजून एका हत्तीची सोडवणूक करून त्यांची अ‍ॅनिमल रिझर्व मध्ये रवानगी केली जाते. अस्वल वगैरे दिसल्यास लगेच प्राणिप्रेमी एनजीओला कळवा. आता हे बेकायदेशीर आहे.

बाकी लेख मस्तच. मी पुण्यात हे सर्व पाहिले आहेत लहान पणी. ती पानावरची कुल्फी खाणे आम्हाला अलाउड नव्हते. बुढ्ढी के बाल वाला येत असे.

याउलट हा बिब्बा औषधी म्हणून आमच्या घरी त्याचा साठा असतो!<<<<< हो माझ्या मावशीने मला दिले होते. अजूनही आहेत माझ्याकडे. एक औषधी उपयोग म्हणजे तळपायाला काटा वैगरे रुतल्यावर त्याठिकाणी गरम करून बिब्याचे चटके दिले जात.

चनाजोरगरम विक्रेते, कोणतीही वस्तू २ रूपये / पाच रूपयांना विकणारे फेरीवाले (पेनं, नाडीचे बंडल वगैरे), द्राक्षे किंवा आंब्याच्या कारंड्या विकणारे, झाडू - खराटा - केरसुणी बांधून देणाऱ्या बायका, पाणीपुरीचे सामान डोक्यावरच्या पाटीत घालून व हातात स्टँड अडकवून फिरणारे फेरीवाले, भेळेच्या गाड्या - त्यांना लावलेली घंटा व तिचा आवाज करत हे फेरीवाले जेव्हा ऐन परीक्षेच्या मौसमात रस्त्यावरून फिरत तेव्हा तोंडाला सुटलेले पाणी व खाता येणार नाही म्हणून कळवळलेला जीव... केळीवाले... पेरू - सीताफळे - डाळिंबे सायकलला पाट्या लावून विकणारे विक्रेते, कणीसवाले....

हा बिब्बा औषधी म्हणून आमच्या घरी त्याचा साठा असतो! >>>अगदी बरोबर. आमच्याही. पण हा उततो म्हणून जपून वापरायला लागतो हेही माहिती असायचं.
मला वाटतं हळद तिखट टिकवण्यासाठी डब्यात बिब्बे घालायची आई. अंधूक आठवतंय.
नगरला इथे बर्‍याच वर्षांपूर्वी एक बाई मोडाची मटकी विकायला यायची.
ती ओरडायची त्यातलं फक्त " ची भे" इतकंच ललकारीस्वरूपात ऐकू यायचं. ती म्हणायची "मठाची भेळ".
मला माहिती नव्हतं पण इकडे मटकीला मठाची भेळ म्हणतात.

अपर्णा, बोरीवलीत अजूनही रानभाज्या वगैरे मिळतात. छान वाटतं.<<<<

हो सर, अजूनही बोरिवलीत गावरान मेनू मिळतो बर का. आता काजूची फका मिळायला लागलीत. शिवाय करवंदे, कच्च्या कैर्या, आणि ती ओव्लीच्या फुलांचे गजरे, काय आठवू नि काय नको असे झाले आहे

बिब्ब्याच्या फुल्या गरम दुधात पाडून आजी कशावरतरी उपाय म्हणून प्यायला द्यायची एवढं आठवतंय. बिब्बा तिच्या संग्रही कायम असायचाच. तिचे मेव्हणे वैद्य मालशे यांनी बनवलेले 'भल्लातकल्प' बरेच प्रसिध्द होते बाबांच्या बालपणी. बाबा लहान असताना भल्लातकल्पचे डबेच्या डबे रिचवल्याचे सांगतात.

गोव्याची एक पद्धत आठवली. तिथे फारसा आरडा ओरडा नसतो. मासे हवे असतील तर गेटला एक प्लॅस्टीकची पिशवी लावून ठेवतात. मासेवाल्याला तो इशारा बरोबर कळतो.

गोव्याची एक पद्धत आठवली. तिथे फारसा आरडा ओरडा नसतो. मासे हवे असतील तर गेटला एक प्लॅस्टीकची पिशवी लावून ठेवतात. मासेवाल्याला तो इशारा बरोबर कळतो.<<<हे नवीनच, पण मग पैसे किंवा नो बार्गेनिंग.

बिब्ब्याच्या बिया गोडांब्या. त्या काजूगरासारख्याच लागतात ( असे ऐकले आहे )
गोव्यातलाच फदेरा फदेरा असे ओरडत येणारा पाववाला. सकाळच्या नाश्त्याला अळसाण्याची उसळ आणि हा पाव.

मासे निवडूनच घ्यायचे. गोव्यातले लोक माश्याचे खरे दर्दी आणि पारखीही. गोव्यातले लोक बर्फातला मासा कधी घेत नाहीत.

पूर्ण लेख भूतकाळात वाचून मजा वाटली. आमच्याकडे आजही यापैकी बहुतेक लोकं अजूनही येतात.

आमच्याकडे रतीबाचा दूधवाला आणि गजरेवाली आहे.
रोजच्यारोज येणारेच म्हणजे गजराफुलंवाली, वेगवेगळ्या भाजीवाल्या/भाजीवाले, फळवाले, दहीताक वाली, मच्छीवाली, पापडआप्पलमवाली, रांगोळीवाला (कोलमवाला,) आलाब्लीचफिनाईलवाला, खारीबिस्कीटवाला. चिंचवाला. पेपरभंगारवाला,

अधूनमधून येणारे लोक म्हणजे डासांसाठी धूर मारणारे, पोपटाकडून भविष्य सांगणारे, नंदीबैल, कडकलक्ष्मी, डोक्यावर देवीचा कलश घेऊन येतात त्या बायका, चाकूसुरीवाले, गादी पिंजारणारे, चप्पल छत्री दुरूस्त करणारा, लहान मुलांची खेळणी विकणारा, कुल्फीवाला (हा रात्री येतो Happy ) केळीची पानं विकणारी बाई (ही सणासुदीला हमखस येते तिच्याकडे झावळ्यांचं एक फिरकीसारखं बनवलेलं एक प्रकरण असतं इकडे सणाला ते दाराला तोरणासारखं लावतात) फुगेवाला, ताडीचा गूळ विकणारी बाई, खडेमीठवाला.

(अजून आठवले की लिहीन)

माझ्या डोक्यात जाणारा सर्वात वैतागवाणा प्रकार म्हणजे गाडीवर साईबाबा चा फॉटो लावून भसाड्या भजनांची गानी लाऊडस्पीकरवर लावून येणारे ते भिकारी. त्यांना मी अजिबात पैसे देत नाही. इतर काही फेरीवाले मात्र चांगले ओळखीचे झालेत तोडक्यामोडक्या भाषेत आमचा काहीनाकाही संवाद साधतच राहतो.

मासे निवडूनच घ्यायचे. गोव्यातले लोक माश्याचे खरे दर्दी आणि पारखीही. गोव्यातले लोक बर्फातला मासा कधी घेत नाहीत.<<< +१०० स ह म त माझी मैत्रीण आहे सारंग, नावाप्रमाणेच मासेप्रेमी.

नंदिनी.. हे कोलम म्हणजे तांदळाचेच पिठ असते ना ? ओले विकत घेतात ते ?

मागे विहिरीत पडलेल्या वस्तू काढून देणार्‍याबद्दल पण लिहिले होते ना ?

मी घेते ते कोलम म्हणजे रांगोळीसारखेच असते, पण रांगोळीइतके चरचरीत नसते. रंगीत रांगोळी मात्र नेहमीसारखीच असते.

हा कोलमवाला पहाटे पाचवाजता येतो. त्यानंतर भाजीवाल्या वगैरे यायला सुरूवात होते. दूधवाला सकाळी आणि रात्री. आमचं रतीबाचं दूध संध्याकाळी देतो पण पहाटे अजून काही घरी रतीब घालतो.

वाह दिनेश, खूपच जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...

आमच्याही लहानपणी या लिस्टमधले बरेच यायचे.. त्यापैकी एक चूरणवाला असायचा.. कसली कसली आंबट, गोड, चटपटी चूर्ण विकायचा.. तो आला कि त्याच्या गाडी भोवती मुलांची गर्दी जमायची .. वर्तमान पत्राच्या इतकुश्या कागदात चूर्णाची पुडिया बांधताना भसकन आगपेटी च्या काडीने आग लावायचा आणी चूर्णात घुसवायचा.. ते पाहताना आम्ही विस्मयचकित होत असू..भारीच आदर वाटायचा त्या चूरण वाल्याचा..

कधीच कळळं नाही आगीचा आणी चूर्णाचा संबंध, पण त्या अ‍ॅक्शन मुळे आपण काहीतरी इस्पेशल खातोय असा आभास व्हायचा.. अगदी तस्सच वाटतं आताही .. Flambé खाताना Lol

दिनेशदा,
'बिब्ब्याच्या बिया गोडांब्या. त्या काजूगरासारख्याच लागतात ( असे ऐकले आहे )
बिब्याच्या बियांच्या आतिल गर म्हणजे गोडांब्या या दिसायला चपट्या बदाम्/अक्रोड या सारख्या दिसतात्,चव साधारण पणे अक्रोडाच्या जवळ्पास असते.

नॉस्टॅल्जिक!!

यात 'बांगडीवाला' राहिला कां??

वसईच्या भाजीवाल्यांचा टिपिकल पोशाख असे. धोतर, जाकीट आणि काळी टोपी. फार नंतर त्यांच्या हातावर क्रॉस पाहून उमगलं की हे ख्रिश्चन आहेत.

आमच्याकडे येणार्‍या बिस्कीटवाल्याकडून खारी नेहमी घेतली जायची. नानकटाई कधितरीच. पुढे दंगलीत त्याला मार पडला आणि मग तो मुंबई सोडुन गेला.

जुना केळिवाला वय झाल्याने गावी गेला पण त्याचा मुलगा आता येतो.

'केस कापणारा' आला की आमच्या चाळीतील सर्व पुरुष त्याच्यासमोर मान तुकवुन बसत. Wink

त्याशिवाय लाकडी स्टुल विकणारे, चटाई विकणारे, सुपं-रोवळ्या-फुलझाडु (कुंचा) विकणार्‍या बायका, तवे विकणारे, धारवाला......

चटाई विकणारे, सुपं-रोवळ्या-फुलझाडु (कुंचा) विकणार्‍या बायका, तवे विकणारे, धारवाला......<<< हां!! चटईवाला आमच्याकडे अधेमधेय येतो.
तो पायीपायीपायी असं ओरडत सायकलवरून यायचा म्हणून मला फार हसू येतं. पायी म्हणजे चटई. सुपं रोवळ्या विकणार्‍या येतात तश्या माडावरचे नारळ उतरवून साफ केले की झावळ्या घेऊन जाऊन झाडू बनवून देणार्‍या बायका येतात. माड साफ करणारा महिन्यादोन महिन्यांतून एकदा चक्कर टाकतो. आला की माड बघून नारळ कधी उतरवायचे ते ठरवतो. त्यानं नारळ उतरवले की लगेच या बायकांना तो निरोप देतो त्या दुपारून येतात आणि मागचं अंगण साफ करून झावळ्या घेऊन जातात. दोन तीन दिवसांनी एक दोन झाडू आणून देतात, बाकीचे इतरांना विकतात.

अजून एक जण अल्युमिनियमची भांडी विकणारा येतो, मी ती भांडी वापरत नाही, पण त्याच्याकडची भांडी बघायला मस्त वाटतात.

लेख मस्तच. तुम्ही पेप्रा मध्ये पण लिहीत जा कि, लोकसत्तेत / सामना / मटा इत्यादि इत्यादि. तुमचे अनुभव आणि भटकंती अफाट आहे.

तो एक फेरीवाला येत होता, डमरु च्या आकाराची लाकडी स्टँड असायची त्याच्याकडे आणि त्या स्टॅंड वर टिव्ही सदृश असे एक खोका ठेवायचा, त्या खोक्याला चार मॉनिटर्स असायचे. त्याला १० पैशे दिले तर एका मॉनिटर मध्ये डोकं खुपसायचे, त्यात तो ५-१० मिनीटाचे सिनेमा सदृश काही तरी दाखवायचा, आता आठवत नाही.

Pages