गुरुजिंचे भावं विश्व! भाग-७

Submitted by अत्रुप्त आत्मा on 22 March, 2015 - 09:31

मागिल भागः-http://www.maayboli.com/node/47385#comment-3486157 ...पुढे चालू
खिचडी प्रेमाचा उपास आंम्ही
या कवितेतून सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला....!
=============================
उपासाच्या या सर्व पदार्थांना गुरुजि(लोकां) नी पहिले ३ ते ५ वर्ष कोऑपरेशन दिलं,की एक दिवस त्यांना स्वतःच्या पोटावर ऑपरेशन करवून घ्यावं लागतं. याच कारणास्तव आमच्या या गुरुजिंना एका नाडी वैद्याला गाठावे लागले. वैद्यराजांनी नाडी तपासली व एखादा ज्योतिषी भविष्य सांगतो,तशी त्यांनी बोलायला सुरवात केली.

वैद्यराजः- कायम अस्वस्थता वाटते..वेळेवर भूक लागत नाही.. निरुत्साह पाचवीला पुजलेला..लहानपणी पाचवी-पूजन नीट केलं होतं कि नाही? ते वडिलांना विचारा! सख्खी आणी आख्खी भावंडं दोन.. एक अ‍ॅसिडिटी,दुसरं बद्धकोष्ठता!..

गुर्जी:-वैद्यराज..कित्ती खरं खरं बोलता हो तुंम्ही? तुमच्या आणि माझ्या,दोघांच्याही मनातलं अगदी सगळं सगळं सांगितलत!

वैद्यराजः-अता पथ्थ्य ऐका.. दही,ताक वर्ज्य..सर्व अंबट पदार्थ वर्ज्य..तिखट वर्ज्य..तेलकट वर्ज्य..रात्री भात वर्ज्य..मसालेदार पूर्ण वर्ज्य... वर्ज्यही वर्ज्य!!!

(वैद्यराजांना मध्येच तोडत) गुर्जी:- वैद्यराज..काय खाऊ नये,यापेक्षा काय खावं.. हे सांगितलत,तर फार बरं होइल.
................................
थोडक्यात काय? तर ऐन तारुण्यात ते गुरुजी अनेक गोष्टी खायला मुकले. कारण उपासाच्या पदार्थांची जी कथा,तीच रोजच्या समोर येणार्‍या श्रीखंड,पुरणपोळी,जिल्बी इत्यादी सर्व पदार्थांची! सत्यनारायण व सत्यविनायक यांच्या कथेत फारसा फरक नसतो. पात्र वेगळी असली,तरी कथा त्याच..त्या साच्याची! तसलाच प्रकार.
इति श्री विविध अध्यायात्मकं..काव्यात्मकं..नाट्यात्मकं.. पोट-नारायण कथां संपूर्णम्। तत्सत् पोटा..र्पणमस्तु॥ (५चा डॉलर खिशात ठेऊ नका! Wink )

असो... अता सूचना आणी त्या अनुषंगानी आलेलं रामायण संपलं.त्यामुळे मुळ मुद्दा..यादी! तिच्याकडे आपण वळू या.. आणी मगच मलाही तुम्ही म्हणा..."अता या....!"

मी सर्वप्रथम लिखित यादिचा नाद सोडून सध्याच्या कॉम्प्युटर जमान्याच्या विधिलिखिताकडे याद्या टाइपण्यास का वळलो ते सांगतो. (इतक पूर्व रामायण ऐकलत,तर हे ही थोडं उत्तर रामायण ऐकाच अता! Biggrin )

होतं काय की आपण आपल्या कथित सू वाच्य नसलं तरी बर्‍यापैकी वाचता येणार्‍या अक्षरात याद्या लिहिल्या आणी त्याचे सतराशेसाठ झेरॉक्सं मारून ठेवले,तरी वाचणारा माणूस काय नजरेचा येइल हे सांगणं, नशिब म्हणजे काय? या प्रश्ना इतकच अवघड. त्यातनंही होतं असं की सरळ वाचणारा माणूसंही पूजेचं साहित्य आणायला बाजार नावाच्या महाआजारात शिरतो,तेंव्हा बरेचदा मूळ गोष्टी धरून (किंवा काही वेळेस सोडूनही) इतर नको तेच साहित्य आपल्यासमोर हजर करतो. त्यात पूजेची आणी गोंधळाची सारखीच दिसणारी यादी एकत्र नेली,किंवा एकत्र करून नेली..तर होणारा गोंधळ विचारायलाच नको! एकदा अश्याच एका ठिकाणी आमचे केळीचे खुंट त्यांच्याकडे आणी त्यांच्या'त वापरायचं उसासारखं गवताचं पाचाड आमच्या कडे असा 'बदल' झालावता. गोंधळी शहाणा म्हणून त्यानी खुंट-लावलेन नाइन! नाहीतर नंतर आंम्हाला पाचाड लागायची वेळ आली असती. त्यातही आपण लिहिलेल्या कुंकूचं-कुकू वाचलं गेलं तर फार अडचण नाही.पण तुळशी च्या जागी कळशी वाचलं गेलं तर काय???

या होणार्‍या सर्व त्रासाला वैतागून मी शेवटी एक दिवस याद्या साध्या नव्हे,तर चांगल्या कॉमप्युटर-टैपिंग करणार्‍या एका टायपिके कडून टाइप करून घेतल्या. मनात बंरंही वाटत होतं(कॉम्प्युटर वर टाइप करत असल्यामुळे!!! ) कारण शेवटी कॉमप्युटर हा आपल्या अग्रपूजेचा मान असलेल्या गंपतीबाप्पासारखाच..किंबहुना गंपतीबाप्पाच! किबोर्डं हे मोदकांच ताट..माऊस नावाचं उंदरासारखं वाहन(ज्याच्याशिवाय तो चालू'च शकत नाही! Wink ),आणी खर्‍या गंपतीबाप्पाच्याही वर कडी करेल अशी बुद्धिमत्ता साठवायची क्षमता!!! अशी त्याच्याविषयी(च) मला सांस्कृतिक ममता वाटत असल्यामुळे मी एका दिवशी आमच्या सदा शिवं पेठेतून,,'' ए...कॉम्प्युटर टायपिंग करणा...र" अश्या हळ्या...सॉरी सॉरी..पाट्या वाचत वाचत मला पटणार्‍या दरात टाइप करून देणार्‍या एका दुकानापाशी जाऊन ठाकलो. सच्चिदानंद टायपिंग इनस्टिट्यूट असं भलं आणि बरचसं मोठ्ठं नाव असलेली पाटी पाहिली.आणी (आमच्याच!) पुणेरी दुकान या लयाला जात असलेल्या संस्कृतितलं दुकान'पण त्या दिवशी सहन केलं.

पारंपारिक पुणेरी दुकानांचं काऊंटर हे साधारण शत्रूवर गोळ्या झाडायला युद्धभूमीवर जसं जमिनीपासून मारणार्‍याचं मुंडकं आणी शत्रूचं संपूर्ण शरीर दिसेल अश्या उंचीचा खंदक करून त्यात उभं रहातात..तसच करतात! मला पलिकडे माणूस आहे हा अंदाज आवाजाच्या आधी आणी तो पुरुष आहे हे आवाज आल्यानंतर कळालं... आधी फक्त डोकंच दिसत होतं हो .. त्यामुळे!

आवाजः- काय हवय???
मी:- टायपिंग करून घ्यायचय!
आवाजः-कधी?
मी:-अत्ता!
आवाजः-कसलं आहे?
मी:-का....य?
आवाजः- ऊंsssss... अहो टैपिंग हो!
मी:- पुजेच्या याद्या आहेत
आवाजः- अस्सं...
मी:-(काहि क्षण वाट पाहून!) इथेच मिळतात ना करून?
(हा प्रश्न अंमळ 'लागल्यामुळे' Biggrin ) आवाजः- नै त काय वैकुंठात? थांबा जरा आमची टैपिस्ट डॉक्टरकडे गेल्ये.येइल एवढ्यात!
मी:- हात अखडले का हो टैपिंग करताना... नाही.. डॉक्टरकडे गेल्यात..म्हणून विचारलं!
आवाजः-हात कशाला अखडतील मरायला.. ह्हूंsss...इथे एव्हढं काम कुठाय हल्ली? अहो,नव विवाहीत आहे!

मी शेवटच्या उत्तरातील वाक्याच्या अखेरून अलिकडल्या शब्दातल्या नव आणी विवाहीत या विग्रहा मुळे,बर्‍यापैकी हदरलो... आणी आता ती बया किती वेळात येणार म्हणून विचारात पडलो. तेव्हढ्यात आलीच ती.आणी दुकानात पडिकावस्थेत असलेल्या मला पहात "या...या..या.." करत तिच्या कंमप्युटरच्या समोर घेऊन गेली. आणी शंभर याद्या छापायचं निश्चित करून गेलेल्या मला, तिनी सरतेशेवटी पाचशे याद्या आणी त्यावर शंभर व्हिजिटिंग कार्ड फ्री..अश्या योजनेत-अडकवलं! त्याआधी मला उगीचच पन्नास फाँट आणी व्हिजिटिंग कार्डासाठी सतराशे साठ डिझायनं दाखवून माझा वेळ खाल्लन. आहो... आत्माराम बापट, असं साधं सरळ आणी बरचसं निर्विकार नाव असणारा आमच्यासारखा माणूस त्या याद्या/व्हिजिटिंगकार्ड नसतं सुशोभिकरण करून कश्याला छापुन घेणार आहे? वाचताना,त्या याद्या पुजेच्या? की किराणामालाच्या??? असा संभ्रम वाचणार्‍यास पडू नये. इतकिच आमची अपेक्षा! काय होतं की त्या अतीसुबकीकरणामुळे वाचणारा यादीत हरवतो,किंवा वाचून झाल्यावर याद्या हरवतो. आमच्या दृष्टीनी दोन्हीही घातकच!

शेवटी..एकदाच्या त्या याद्या (आणी कार्ड..फ्री..!!!) छापून झाल्या,आणी दोन दिवसानी हतातही पडल्या. यादी यजमानाकडे म्हणजे हल्लीच्या भाषेत क्लायंटला देणे,यात "यादी रहाते आणी व्हिजिटिंगकार्ड हरवतं" असा एक मराठीभाषेतल्या म्हणि'सारखा उपप्रकार असतो. तो होऊ नये,म्हणून मी आमच्यातल्या..जन्मतःच कर्णाप्रमाणे मार्केटींगची कवच-कुंडलं घेऊन जन्माला आलेल्या एका महागुरु(जिं)ची एक आयड्या वापरली..आणी ती उत्तम आमलातही आली. आमच्या त्या गुर्जींच्या म्हणण्यानुसार (शंभौवाच! Wink )
तो:-अरे काय करायचं म्हायत्ये का?
मी:-काय?
तो:-"काय करायच की यजमान समोर आला रे आला..आणी काम ठरलं रे ठरलं..की यादी दिल्यावर नंतर एकाच्या जागी दोन/दोन व्हिजिटिंग कार्डं ,लहान मुलांच्या हतात जंबो देतात तशी ठिऊन द्यायची? पुढे यजमान गोंधळतो आणी प्रश्नात-पडतो..एकाच्या जागी..दोन/दोन वस्तू सुटल्या,आणी त्याही गुरुजिंकडून!
मी:-म....ग?
तो:-मग काही नै रे... समोरनं चेंडू येइपर्यंत वाट पहायची..आणी तो येतोच..यजमान म्हणतोच.. "अहो,गुरुजि यादी १ आणी व्हिजिटिंग कार्डं २/२ कशाला???"
मी:- म.....ग???
तो:-मग काय ...मग आपण चालू व्हायचं.. "सांगा यजमान..सांगा..दोन/दोन कार्ड कश्शाला?.." मग यजमान पुन्हा विचारतो:-"कशाला?" आपणः-" एक जपून ठेवायला..आणी दुसरं..हरवायला...!!! "
यजमानः-"क्का...य?" आपणः- "आहो...जे जपून ठेवायचं ते हरवतं..आणी हरवेल असं वाटतं ते वर्षानुवर्ष धूळ खात पडतं!!!" ... यजमानः- "हे बाकी खर्र खरं बोल्तात हो गुर्जी!!!..अता कार्ड नै हरवणार कध्धी!"
परिणामी

"यजमान खूsssssष..आणी आपलीही शेंडी ताsssssठ! Light 1
==========================================
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सर्व लेख माला शनिवारी दुसरीकडे वाचून काढली.
मी साने गुरुजींच्या लेखनाचा आढावा वगैरे असेल म्हणून आतापर्यंत वाचलं नव्हतं. Happy
खूप गोष्टी नव्या कळल्या, खूप गोष्टी पटल्या.

ही सर्व लेख माला अतिशयच छान आहे. मी पूर्वीच मिपावर वाचलेली. लेटेस्ट भागाच्या प्रतीक्षेत आहे तिथे. Happy