गुरुजिंचे भावं विश्व! भाग-६

Submitted by अत्रुप्त आत्मा on 25 January, 2014 - 09:57

मागिल भागः- http://www.maayboli.com/node/47219 ...पुढे चालू

अता यादीच्या मागील सूचना:-सर्व सूचना, हे नियमच असतात. पण नियम हे कधिच पाळण्यासाठी नसतात म्हणून त्यांना सूचना म्हणायच. आणी नियमाच्या त्या यमाला असं नियमीत करायचं! अता ही सूचनांची माहिती नसून प्रत्यक्ष म्हणजे ऑन-फिल्ड त्यांची अंमलबजावणी कशी होते त्याचा हा वृत्तांत....
==============================================

क्रमांक-१) अंघोळ:- धार्मिक कार्यांची सुरवात या घोळापासून होते.म्हणूनच याला अं..घोळ असं म्हटलेलं आहे. ज्या दिवशी पूजा असते,त्या दिवशी तो 'नळ' फारच कमी यजमानांन्ना पावतो. व ज्यांना पावतो,ते अंघोळीच्या घोळात घोळत रहातात,व त्या दिवशी तो नळ आंम्हाला चावतो. (यजमानांमधे याशिवायपण या इहलोकातली एक स्पेशल कॅटॅगरी आहे. ही कॅटॅगरी गुरुजींन्नी पूजेसाठी घरात पाउल ठेवले..कीच मग अंघोळीला जाते! त्या आधी जाणं फाउल समजतात त्यांच्यात..अजूनंही! आलोच गुर्जी दहा मिनिटात! असं म्हणून आपल्या पुढच्या खेळाची वेळ होत आली..की मग साधारण आचमनाला यायची त्यांची 'तयारी' असते. )

क्रमांक-२) कार्यक्रमाची वेळ:- कार्यक्रमाची वेळ पाळून त्याचा आनंद वाढविणे आपल्या हतात आहे,कारण आपली वेळ आमच्या हतात आहे. असं खरं-खरं लिहिलं तर मंडळी रागावतील. म्हणून ही सूचना रद्दबातल समजावी. कारण अंघोळीच्या घोळानी त्या कार्यक्रमाला तडाखा दिला,की आमची गाडी पुढल्या कार्यक्रमांच्या श्टेशनांकडे दिवसभर अर्धा किंवा एक तास उशिरा धावते. पण गाडी उशिरा-सोडण्याला "पहिलं घरं" नामक महामंडळ जवाबदार! डायवरचा काय दोष?
तरी..पर्वाचाच एक बोलका प्रसंग सांगतो. यजमान म्हणाले,"गुरूजी तुंम्ही उशिरा आलात,हे आमच्या अगदी पथ्थ्यावर पडलं!" मी लगेच म्हणालो, "तुमचं पथ्थ्य मला माहीत होतं,त्यामुळे..तुमचं पथ्थ्य आमच्या पथ्थ्यावर पडलं!"
कार्याच्या शेवटी गोंधळ-घातला जातो,पण कार्यात किती गोंधळ घातले जातात,याला गणना नाही.

क्रमांक-३) घरातले पाळीव प्राणी :- कार्यक्रमाच्या दिवशी एक वेगळं घर पाहून ठेवावं. व या घरात त्यांना ठेवावं. कारण पोपट मांजर कुत्रा यांपैकी, मांजराचा काहि त्रास नाही. कारण मालक घर सोडून गेला,तरी मांजर घर सोडत नाही.घर त्याचच आहे,याचा त्याला ठाम विश्वास असतो. त्यामुळे नवीन आलेल्या गुरुजी नामक प्रण्याकडे, "हा कोण घुसखोर???" अश्या संशयी नजरेनं ते पहात नाही.उलट धार्मिक कार्यक्रमांच्या दिवशी ते सरळ दुसर्‍या घरात जाऊन मूळ घरातला हक्क अबाधित राखत असतं. शिवाय घराच्या बाबतीत मांजरांची भावना व वर्तवणूकही कॉलेज मधल्या मुलांसारखी असते. त्यामुळे वर्गात न बसता, इतरत्र उंडारण्याची मजा...ते काही सज्जन मुला/मुलींसारखं घेत असतं! (मांजरीत व माझ्यात या वर्गात न-बसण्याच्या गुणासारखं अजुन एक साम्य आहे. आंम्ही उभयता एकमेकाला बरेचदा अडवे गेलेलो आहोत.पण कुणावरही कुणाचाच काहीही परिणाम झालेला नाही! Lol ) त्यामुळे..मांजराचा त्रास नाही.

अता पोपटः- एकदा काय झालं? एका यजमानांकडे तो पोपट,पिंजर्‍यातनं बाहेर काढल्यावर परत पिंजर्‍यात जातो..म्हणून बाहेर उघड्यावर ठेवलावता. हल्ली फ्लॉवरपॉट मधली फुलं खर्‍यासारखी वाटतात,पण खरी नसतात,त्याच धर्तीवत..हाही शोभेचा असावा,म्हणून मी अंदाजानी त्याच्या जवळ गेलो..तर क्व्यॉ..क्व्यॉ..क्व्यॉ.. करत तो उडाला. मी ही घाबरून तीन-ताड उडालो. म्हंजे पोपटानी माझा पोपट केला.. असो,आपलाही क्याच उडतो कधी..कधी! म्हणून पोपट नको.

कुत्रा:-अता कुत्र्याला मी भितो,की मला तो! हे अजून आंम्हा दोघांन्नाही कळलेलं नाही... बरं का!
मी प्रेमानी हात लावायला गेलो..की भों..भों.. , लांब राहिलो की आपल्या जिव्हाचातुर्याच्या कावायती आमच्या शरीरावर करायला जवळ! नखं सुद्धा आत ओढून घेत नाही. एकुलतं एक धोतर जायचं उगाच! त्यामुळे आमच्या एका यजमानांकडे गेलो,आणी कुत्रं पूजेच्या खोलीत आलं,की मला मनातनं कमांड'मिळते- "सावधान!" माझ्या एरवीच्या वळवळ्या स्वभावाला त्या दिवशी कुठलिही चळवळ चालवू न देता,एकाच जागी कळवळत ठेवण्याचं प्रचंड सामर्थ्य त्या चतु:ष्पादात आहे. त्या यजमानांकडून माझं विसर्जन सुद्धा गणपतिसारखं पाटासहीत उचलून जिना उतरून खाल पर्यंत केलं जातं!

एकदा मात्र भयंकर बोंब झाली होती. एकदा एका खेडेगावी, अश्याच एका गृहमध्ये मो-काट परिभ्रमी श्वानपालक यजमानांकडे २ दिवसाचा मुक्कामी खेळ होता. आणी यजमानांन्नी गेल्या गेल्या त्यांच्या कुत्र्याशीच पहिली ओळख करून दिली होती..
यजमानः- "हे बगा काका.. ह्ये आपलं रानातलं-डॉग.. आलशिशियन हाए!" (म्हणजे कुत्रं-खरच रान'टी होतं!)
मी:- अहो,मग रानातच ठेवायचं दोन दिवस.. घरी कशाला आणलं"
यजमानः-(खौट्पणे हसत..) "हॅ हॅ हॅ.. कुत्र्याचं भ्या वाटायल का काका?"
मी:- "अहो,मला नाही,मी शूर आहे..पण आमच्या बरोबरचे गुरुजी लोक थोडे भित्रे आहेत!" (मी जमेल तितका कुत्रा 'काढायचा' प्रयत्न केला! Wink )
यजमानः- "मग त्येंच्या जवळ न्हाई जानार... त्ये बी शूर हाए..आपल्या बरुबरीच्याच मान्साला खेटाया येतया!..हॅ..हॅ..हॅ!" (या वाक्यानी "मी" भानावर आलो! )
मी:-(मनात रामनाम जपत!) अस्सं होय.. बरं बरं..
यजमानः-(त्याच खौट मुद्रेनी..) असू दे ... असू दे.. सांजच्या टायमाला आलाय..आता जेवा आनी पडा..भायेर आंगनात..गार वार्‍याला..झोप बी झ्याक लागलं आनी सक्काळी कामाला बी फ्रेस? न्हाय का?
मी:- हो..हो..खरय आप्लं! (असं म्हणत, बाकिच्या गुरुजिंना घेऊन भो-जनं व्यवस्थेकडे गेलो..)
जेवणं होऊन निजानीज झाली आणी मला रात्री दिडच्या सुमारास जोराची शू.... लागली. अंगणातच असल्यामुळे मी सहज उठलो आणी वावराकंडं जायचा रस्ता शोधायला इकडं तिकडं बघितलं.. तेव्हढ्यात मला'ही कोणीतरी अंगणाच्या कडेनी अर्धवट उठून माझ्याकडे बघतय..असं वाटलं..कोण असावं म्हणून ब्याट्री मारून बघतो,तर तो कुत्रा!!!!!! अता मात्र मला वावरापर्यंत जावं लागेल,असं सुद्धा वाटे ना! ... जितक्या सेकंदात अंथरुणातनं उठून उभा र्‍हायलोवतो,त्याच्या निम्यावेळेत मी परत अंथ-ऋणात आत अडवा.. नंतर पुढचे दोन तास एक खेळ नियमीत तिथं सुरू होता .. मी अंथरूणातनं तोंड काढलं..आणी कुत्रा आहे की गेला बघू लागलो. की तो नीच-प्राणी लांबनच नजर रोखून माझ्याकडे बघायचा! मी..परत आत.. आलेल्या शू....सह! शू..ला संस्कृतात "लघु-शंका" का म्हणतात? हे मला त्यादिवशी कळलं! जो...राची लागली असता करायला मिळाली नाही,आणी मनात आटत..आटत गेली की ती खरी लघु-शंका! नाही का???
शेवटी त्यांचा गुरं वळणारा माणूस पहाटे ४ला रानात जायला निघाला आणी तो भयंकर प्राणी त्याच्यामागून त्याच्या मूलगृहाकडे जायला वळला..आणी बर्‍याच दूर गेल्याची डोळ्यांना खात्री झाल्यावर मग आमची दीर्घवेळ खरोखर लघु(झालेली)शंका--त्या दिवशी एकदाची सुटली...(वावरात जाऊन हो! )

क्रमांक-४) उपहार:- गुरुजी लोकांचा प्रत्येक दिवस हा उपासाचाच असतो,हे बरोबर आहे.त्यामुळे धार्मिक कार्यक्रमात -मधेच काहितरी खायला देण्यासाठी म्हणून काय द्याल? तर साबुदाण्याची खिचडी (स्वतःवर!) सोडून दुसरे काहिही द्यावे! थोडक्यात उपासाचा उप-वास येणारा कोणताही पदार्थ नको! (तुंम्ही म्हणाल, हे काय हो आत्मूगुर्जी???..पण खरी गंम्मत पुढेच आहे.)

उपासाचा खरा अर्थ,म्हणजे पोटातल्या गिरणी-कामगारांना पूर्ण सुट्टी किंवा अर्ध्या रजेवर ठेवायचं असा आहे.पण गेल्या काही काळात उपवासा'चे..म्हणून जे काही पदार्थ निघालेत,ते निव्वळ चवीत बदल......म्हणून! इतरांन्ना महिन्यातनं एक/दोन वेळा बदल,म्हणून ठीक आहे. पण गुरुजींची जवळ जवळ रोजच यांच्याशी(म्हण्जे पदार्थांशी..यजमानांशी नव्हे!) गाठ पडते.त्यामुळे रोजच्या रोज ओव्हरटाइम फुकट करायला लागल्यानी,गुरुजिंच्या पोटातले गिरणी कामगार दर पंधरा-एक दिवसानी संप पुकारतात.औषधांचं शिष्ट-मंडळ मध्यस्थिला पाठवावं लागतं...तेंव्हा कुठे तीनचार दिवसानी वाटाघाटी फिस्कटत..फिस्कटत.. परिस्थिती पूर्वपदाला येते.

ऐन तारुण्यात अशीच (सर्वार्थानी)-पोटासाठी औषधे खायला लागलेल्या एका गुरुजिंची कथा सत्यनारायणाच्या कथेसारखीच सुरस आहे. ती अता ऐका.. तत्पूर्वी सर्वांन्नी सत्यनारायणाची कथा ऐकताना हतात जसं तुळशीपत्र ठेवतात,तशी ही कथा ऐकताना पाच रुपायाचा कॉइन ठेवा. (कथा ऐकून झाली,की कुठे पाठवायचा? ते सांगिन! Wink ) अता कथा सुरु करण्यापूर्वी आपण विष्णूचं-ध्यान करतो कि नै? तसं आमच्या त्या गुरुजिंचं उपासाचे पदार्थ खाऊन-झालेलं-ध्यान डोळ्यासमोर आणायचय. -मी "शांताकारम.." सारखा श्लोक म्हणणार आहे.. तो न हसता ऐकायचाय.. चला तय्यार??????

पोटाकारम् खिचडी खाऊनम् , होतसे फूट-बॉलम्।
तो...साबुदाणं रबर-सदृशं,श्वेतवर्णम् च्यूईंगम॥
भगर-खान्तम प्वॉट आन्तम् , आवाज ये तडम-तम।
वन्दे पदार्थम् फारच भयंकरम् , यजमानस्य-नाथम् ॥

ध्यानाच्या श्लोकातच कथेचं 'सार' आहे.

त्या गुरुजिंनी उपासाच्या पदार्थांची त्यांना (चांगलाच) परि चय झाल्यानंतर दिलेली माहिती..

गुरुजी ऊवाचः---

बटाट्याची भाजी चिवडा किंवा किस:-ह्या त्रिकुटा पासून सावध रहावे. चवीला चांगले,पण पोटात गेले की चांग-भले! पोटाचा किती कीस पाडतील याची गॅरेंटी नाही. पोटाला पोटा-लावतात. आणी खर्‍या अर्थानी गॅसवर ठेवतात. घरी गेल्यावर संध्याकाळ पासून बायका-मुलांचे काही आवाजी फटाक्यांनी चांगलेच मनोरंजन आणी बर्‍याचश्या बीनआवाजी फटाक्यांमुळे आपणास वाक्-ताडन होते. एकंदरीत शेजार्‍यांचे कचकून मनोरंजन होते.

शेंगदाण्याचे लाडू,उसळ,किंवा आमटी:- वरच्याच त्रिकुटामधून माजावर आलेले हे पदार्थ,सकाळी आपली डाळ पात्तळ करतात. हे तीन पित्तकारक दहशतवादी पोटात बॉम्ब फोडण्यात अत्यंत पटाइत आहेत. न कळत बॉम्ब ठेवणं.. हे दहशतवाद्यांचं वैशिष्ठ्य ते अचूक पाळतात. तेंव्हा सावधान हो सावधान!

काकडीची कोशिंबीर,साबुदाण्याची खिचडी,खोबर्‍याची चटणी:- ह्या वस्तू एकेकट्या किंवा एकत्र पोटं सेवेला आल्या,तरी क्रांतिकारकां इतक्या डेंजर! काकडीची कोशिंबीर खाताना चविष्ट,पण पोटात गेल्यावर भलतीच खाष्टं! खोबर्‍याची चटणी खाऊन अ‍ॅसिडिटी होण्यापेक्षा तीला खो दिलेला बरा..! आणी साबुदाण्याची खिचडी आ..हा..हा..हा.. काय वर्णावं तीचं वर्णन? साक्षात अ वर्णनीय! बर्‍याचश्या सुंदर मुली,ह्या पाहायला छान..पण वागवायला भलत्याच जड!---- असं "त्या क्षेत्रातले" अनुभवी जाणकार... सांगतात!!! तश्शीच ही बया! हिच्यावर तर मी चवीकरता फिदा झालो,अगदी ताकानी प्रेमपत्रं सुद्धा लिहिली. पण एक दिवस ह्या सगळ्या त्रासांचं मूळ बनून ती माझ्या मुळावर आली.म्हणून तीला हा प्रेमपूर्वक निरोप मी एका कवितेतूनच दिला... (खरं म्हणजे ही खिचडीच्या-ग्राउंडवर झालेली यजमान-गुरुजीं मधली लॉन-टेनिस मॅच आहे. Lol )
कवितेचं नाव

खिचडी करीता वाहातो..ही शब्दांची खिचडी!!!

यजमानांनी विचारलं-"उपास...?
जरा खिचडी देऊ का?"
"चपला घालतच म्हणालो
त्या पेक्षा मी येऊ का?"

"का हो?तुंम्ही गुरुजी..
आणी खिचडीला भिता?"
"अहो,वाचायला फार सोपी
ही पचायला अवघड गीता."

"अहो,मस्त दही टाका
मजबुत दाबून हाणा.."
"म्हणजे नंतर सहा तास
पोटात गोळे आणा!?"

"जुने गुरुजी मजबुत खायचे...
एक/दोन प्लेट?...विसरा!"
"पूर्वीच्यांना उद्योग ठेवलावतात का?
खाण्यापलीकडे...दुसरा?"

"पूर्वीचे गुरुजी कामं करुन
पराती करायचे..फस्त!"
"अहो,जुना स्कुटरचा काळ तो
एव्हरेज पेक्षा इंधन जास्त!"

"जाउ दे गुरुजी आता..
राग विसरा..हट्ट सोडा"
"कालची खिचडी पचायला
आधी आणा १ सोडा"

खिचडी प्रेमाचा उपास आंम्ही
या कवितेतून सोडला
आणी यजमान/गुरुजी नववादाचा
अजुन एक नारळ फोडला.....!
==========================================
क्रमशः

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<गुरुजींन्नी पूजेसाठी घरात पाउल ठेवले..कीच मग अंघोळीला जाते! त्या आधी जाणं फाउल समजतात त्यांच्यात..अजूनंही! आलोच गुर्जी दहा मिनिटात! असं म्हणून आपल्या पुढच्या खेळाची वेळ होत आली..की मग साधारण आचमनाला यायची त्यांची 'तयारी' असते. )>> Lol
खुसखुशीत