अंदमानी सहल

Submitted by नरेंद्र गोळे on 19 March, 2015 - 08:38

अंदमान द्विपसमूह भारताचे अविभाज्य अंग आहे. ही आपल्याकरता खरेच आनंदाची गोष्ट आहे. हिंदी महासागरास मिळालेले, हिंदी हे नामाभिधानही कदाचित, ह्याच आपल्या अस्तित्वाचे द्योतक असावे. मात्र, महासागरातील त्याच्या स्थानामुळे, अंदमान आणि निकोबार राज्यात, वर्षाचे बहुतांशी दिवस हवामान ढगाळ, वादळी आणि पावसाळी राहते. धूसर राहते. तापमान जरी मुंबईसारखेच असले तरी, हवामानातील महासमुद्री बेभरवसा, तिथे पुरेपूर भरून राहिलेला आहे. वर्षातले काही दिवसच तिथे वातावरण समेवर येते. निरभ्र वातावरण, स्वच्छ सूर्यप्रकाश आणि स्थिरपद, स्वस्थ समुद्र; स्वर्गसदृश हवामान प्रदान करतो. हेच दिवस तिथे पर्यटनास अत्यंत योग्य असतात. अशा दिवसात ज्यांनी तिथे पर्यटन केले, ते त्याची अविस्मरणीय गोडी, विसरूच शकत नाहीत. म्हणूनच अंदमानात पर्यटनास जातांना हवामान पक्षकर असायला हवे ह्यात तिळमात्र संशय नाही. एरव्ही, पर्यटनाचे अनेक दिवस खराब हवामानामुळे गमवावे लागलेले पर्यटक तिथे काही कमी नाहीत! संदर्भः http://www.andaman.climatemps.com/ वरील तक्ता स्वतःहूनच सारी हवामान परिस्थिती स्पष्ट करतो.


ओले दिवस पर्यटनास योग्य समजायचे नसतील, तर फेब्रुवारी अखेर व मार्च महिन्याची सुरूवात हाच मुहूर्त सर्वोत्तम समजायला हवा. ह्याच दिवसात नितळ, ऊबदार, सूर्यप्रकाश आणि कमालीची दृश्यमानताही साथ देत असते. आम्हालाही ह्याच सुवर्णदिवसांत अंदमानात जाण्याची संधी मिळाली हे आमचे सुदैव!

बोरिवलीच्या प्रथमेश टूर्सतर्फेच्या ६ रात्री आणि ७ दिवसांच्या; २५ फेब्रुवारी २०१५ रोजी मुंबईत सुरू होऊन, ३ मार्च २०१५ रोजी मुंबईतच संपणार्‍या सहलीकरता, आम्ही नावे नोंदवली. सकाळी पावणे सहाच्या विमानाने निघून, चेन्नईमार्गे सकाळी साडेदहा वाजता आम्ही पोर्ट ब्लेअरला पोहोचलो. एन.के.इंटरनॅशनल ह्या फिनिक्स धक्क्यानजीकच्या हॉटेलात उतरलो. फिनिक्स धक्क्यावरूनच हॅवलॉक बेटाकरता बोटी सुटतात. नॉर्थ बे आणि रॉस बेटांकरता मात्र अबर्दिन धक्क्यावरून बोटी सुटतात. सुग्रास जेवण झाल्यानंतर दुपारी कॉर्बिन कोव्ह बीचला गेलो. तर संध्याकाळी सेल्युलर जेलमधल्या लाईट अँड साऊंड च्या १८०० च्या शोला. हा शो हिंदीत असतो. ह्यानंतरचा १९३० वाजताचा शो इंग्रजीत असतो. ह्याचे दर माणशी तिकीट ५० रुपये आहे.


कॉर्बिन कोव्ह बीच, बेटाच्या महासागराकडील दिशेला आहे. तिथे आम्ही शहाळ्याचे पाणी प्यायले. शंखशिंपली गोळा केली. फोटो काढले. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माणशी ३०० रुपये दराने चौघे जण स्पीडबोटीतून चक्कर मारून आलो.

कॉर्बिन कोव्ह बीच वरून, खुल्या महासागरातील भूशिरावरच्या बेटाकडे आम्ही स्पीडबोटीने निघालो खरे, मात्र नावाड्याने आमची वेव्ह रायडर नावाची बोट, समुद्री लाटांवर अशी काही चढवली की, आपटाआपटीने आमची हाडे खिळखिळी झाली. कधी टोपी उडून गेली, तर कधी कॅमेरा हातातून निसटला! असे वाटत होते की बोट खालच्या दगडांवर आदळते आहे. फुटते की काय, असेही वाटून गेले. थोडे हळू चालव सांगायला तोल सावरायच्या आत, आम्ही बेटानजीक पोहोचलोही होतो. खुल्या सागरात असल्याने, बेटावर उतरायला मात्र मनाई आहे!


संध्याकाळ फारच लवकर होते. पाच वाजताच उजेड कमी होऊ लागलेला होता. साडेपाचच्या सुमारास आम्ही सेल्युलर जेलसमोर जाऊन पोहोचलो. काही फोटो काढले आणि लाईट अँड साऊंड शोला जाऊन बसलो. सात पंखी सेल्युलर जेलच्या मध्य मनोर्‍यानजीक असलेल्या वृक्षराजाच्या साक्षीने कथा गुंफली जाते. अवघड ठरणार्‍या राजकीय कैद्यांना विजनवासात ठेवण्यासाठी, अशा प्रकारच्या तुरूंगाची योजना करणार्‍या ब्रिटिशांच्या बुद्धिने मन स्तिमित होते. जगावर हुकूमत गाजवत असतांना देखील लोकशाहीने, कायद्याच्या राज्याने, प्रशासन चालवितो आहोत असे दाखविण्याच्या त्यांच्या अट्टाहासाखेरीज; ह्या सव्यापसव्याचे काय समर्थन असू शकते. एरव्ही जगातील जेत्यांनी जीतांना नाहीसे करणे; ह्या ’बळी तो कानपिळी’ थाटाच्या पाशवी प्रथेपासून, काळ्यापाण्याची शिक्षा तयार करण्याच्या, मानवी क्रूर प्रथेपर्यंत ते येते ना. शो लक्षात राहील असा, किंवा खूप प्रेरणादायी असा वाटला नाही. मात्र, त्या ठिकाणाच्या प्रखर क्रांतिकारकांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या भूमीने, देशाकरता जगण्याची दुर्दम्य जिज्ञासा मनात पुन्हा उजागर केली.

 दुसरा दिवस पोर्ट ब्लेअर शहरदर्शनाचा होता. सकाळच्या सत्रात आम्ही सेल्युलर जेल सविस्तर पाहिला. नंतर चॅथम आरायंत्रही विस्ताराने बघितले. दुपारच्या सत्रात १. पुरातत्त्व संग्रहालय (आंथ्रापॉलॉजिकल म्युझियम), २. मात्स्यिकी संग्रहालय (फिशरीज म्युझियम), ३. नौदलाचे समुद्री संग्रहालय -समुद्रिका- (नेव्हल मरीन म्युझियम), आणि ४. कुटिरोद्योग निर्मित वस्तूंचा विक्रयहाट -सागरिका- (कॉटेज इंडस्ट्रीज एंपोरियम); ह्या चार गोष्टी बघितल्या.


२६-०२-१९६६ रोजी मुंबई येथे वीर सावरकरांना देवाज्ञा झाली. त्यानंतर बरोब्बर ४९ वर्षांनी आम्ही पोर्ट ब्लेअर मधील त्यांच्या कोठडीत पोहोचलो होतो. ज्वलंत राष्ट्राभिमानाखातर काळ्या पाण्याची शिक्षा भोगणार्‍या दिवंगत नेत्यास आम्ही सुमनांजली वाहिली. त्यांच्या "माझे मृत्यूपत्र" ह्या कवितेचे अखेरचे कडवे सामुदायिकरीत्या म्हटले.


की घेतले व्रत न हे अम्हि अंधतेने ।
लब्धप्रकाश इतिहास निसर्गमाने ॥
जे दिव्य दाहक म्हणून असावयाचे ।
बुद्ध्याच वाण धरले करी हे सतीचे ॥ - स्वातंत्र्यवीर सावरकर

शहिदांनी ज्याकरता प्राणार्पण केले, सावरकरांसारख्या राष्ट्रवीरांनी ज्याकरता अपार कष्ट सोसले, त्या राष्ट्राकरता, अर्थपूर्ण जीवन जगण्याचे आमचे दायित्व पुन्हा एकदा उजागर झाले! त्या कर्तव्यास आम्ही सदैव लक्षात ठेवू.


केवळ अंदमानातच आढळून येणारा पडौक वृक्ष, हा ह्या राज्याचा राज्यवृक्ष आहे. तो सुमारे १२० फूट उंच वाढतो. पानगळीचा पर्णसंभार बाळगतो. अशा वृक्षांचे उंचच-उंच जंगल तर नजरेचे पारणेच फेडते. तो अत्यंत भारदस्त दिसतो आणि उत्तम लाकडी वस्तुंकरताचे दर्जेदार लाकूड पुरवतो. पडौक लाकूड हे सागवानी लाकडापेक्षा जास्त सुदृढ असते.
ह्या पडौकवनांतील वृक्षांचा वापर, बांधकामांकरता आणि बैठकीच्या सामानांकरता लागणार्‍या लाकडाच्या गरजा भागवण्याकरता, करता यावा, म्हणून १८८३ मध्ये ब्रिटिश सरकारने इथे एका आरा यंत्राची स्थापना केली होती . दुर्दैवाने दुसर्‍या महायुद्धात थेट ह्या ठिकाणी स्फोटके पडल्यामुळे यंत्राचे अपरिमित नुकसान झाले. मात्र पूर्व पाकिस्तान, लंका आणि बर्मामधून ब्रिटिशांनी इथे पुनरुत्थानाकरता आणलेल्या लोकांच्या लाकडाबाबतच्या अतिरिक्त गरजा भागविण्याकरता ह्या यंत्राची पुनर्स्थापना करण्यात आली.

बिनीच्या अंदमानी पडौक वृक्षाची कटाई केवळ ह्या सरकारी आरा यंत्रावरच केली जाते. हे आरायंत्र चॅथम बेटावर आहे. हे बेट पोर्ट ब्लेअर शहराच्या उत्तरेला आहे. पोर्ट ब्लेअरशी ते केवळ चॅथम पुलानेच जोडलेले आहे. दुपारच्या जेवणापूर्वी आम्ही ह्या आरायंत्राला भेट दिली.


पहिल्या चित्रात प्रवेशद्वार आणि वन-उप-संरक्षकांचे कार्यालय दिसत आहे.

खालच्या ओळीत आरायंत्रावर, तसेच मानवी कौशल्याने साधलेल्या लाकडी वस्तू दिसत आहेत.


पहिल्या चित्रात उभ्या दिसणार्‍या दोन बांबूंपैकी एकाचा काप मधल्या चित्रात दिसत आहे. मग दिसते आहे ती लाकडातून साकारलेली विश्वकर्म्याची मूर्ती.


त्यानंतरच्या चित्रात दिसते आहे आरायंत्राचे प्रारूप.

खालील पहिल्या चित्रात आरा यंत्राकरता, दातेरी आरीचा पट्टा उचलून नेला जात असलेला दिसत आहे. दुसर्‍या चित्रात कापले जाणारे पडौक वृक्षाचे लांबलचक खोड दिसते आहे.


त्या कामगाराच्या डाव्या हाताकडील खोडाच्या टोकास आरीचे पाते खोडात उभे घुसलेले स्पष्ट दिसत आहे. उजव्या बाजूस रुळांवरून सरकत पुढे जाणार्‍या खोडातून कापली गेलेली फळीही, त्या कामगाराच्या उजव्या बाजूस सुटी झालेली दिसते आहे.


तिसर्‍या दिवशी पोर्ट ब्लेअरपासून फिनिक्स धक्क्यावरून, कोस्टल क्रूझ बोटीने हॅवलॉक बेटावर गेलो. देशात सर्वोत्तम म्हणून, पर्यटन खात्याने गौरवलेल्या राधानगरी बीचवर गेलो. पुन्हा समुद्रस्नान केले आणि हॅवलॉक बेटावरच हॉटेल हॉलिडे इन्नमध्ये राहिलो. राधानगरी बीचवर, पैसे देऊन का होईना पण, कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची चांगली सोय आहे. हॅवलॉक बेटावरले आमचे वास्तव्य सगळ्यात आनंददायक होते. हॉटेलच्या परंपरागत कल्पनेलाच छेद देणारी सगळी व्यवस्था होती तिथे. खूप मज्जा आली. सर्व अत्याधुनिक सोयीसवलतींसह सुसज्ज पण झावळ्यांच्या झोपड्या वाटाव्यात अशा खोल्या.


हॉटेल हॉलिडे इन्न, हॅवलॉक

वेताच्या काड्यांना वाकवत वाकवत तयार केलेली मंचके, खुर्च्या, स्तंभ, छत्र्या इत्यादींमुळे जास्तच प्रसन्नतेचे वातावरण निर्माण होत होते. अंदमानातील वृक्षराजींत वेळूची बेटे आणि वेताच्या झुडुपांचा समावेश नक्कीच असणार! जागोजाग फळलेल्या नारळी सर्वदिस नारळांचा वर्षाव करत होत्या. सर्वत्र, इथे तिथे सुके नारळ आणि शहाळी पडलेली दिसत होती.


वेताच्या वस्तूंची रेलचेल

चौथ्या दिवशी सकाळी ८ वाजताच हॉटेल सोडून द्यायचे होते. म्हणून सगळे सामान गोळा करून स्वागतकक्षात रचून ठेवले. नास्ता केला आणि मग आम्ही निघालो एलिफंट बीच बघायला. इथे पहिल्यांदा आमच्यापैकी एका मुलीने (मुलगी कसली, लग्न झाले आहे आता तिचे!) सी-वॉक केले. आणि आम्ही सगळ्यांनी स्नॉर्केलिंगचा भरकस प्रयत्न केला. दोन जणांना स्नॉर्केलिंग करण्यात यश आले. इतरांनी त्याचा आनंद लुटला.


अंदमानी मासा!


अंदमानी समुद्रातून मासा वेचून आणतांना मी.

गळ्यापर्यंतच्या पाण्यात, नाकावर मुखवटा लावून नाकात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. डोळ्यांवर समुद्री गॉगल लावून, डोळ्यात पाणी शिरण्यापासून बचाव करायचा. तोंडात एका नळीचे कवळीच्या आकाराचे एक टोक धरून, दुसरे टोक पाण्याबाहेर तरंगवायचे. ह्या नळीतूनच तोंडाने श्वासोच्छवास करायचा. पाण्याच्या पृष्ठभागावर तरते राहून, आणि पाण्यात डोके खुपसून तळ न्याहाळायचा. अशी ही स्नॉर्केलिंगची संकल्पना असल्याचे मला कळले. मात्र ’मुख से साँस’ घेण्याचे मात्र, मला किंवा इतर बहुसंख्यांकांना जमू शकले नाही. पोहोणे येत असलेल्या एक दोघांनाच काय ते साधले. तळ अगदी स्वच्छपणे दिसू शकत असलेल्या -नितळ- पाण्यात डुंबण्याचे सुख मात्र सगळ्यांनाच खूप साधले. प्रसन्न वाटले. सुनामीमुळे पडलेल्या झाडांचे भग्नावशेष ह्या किनार्‍यावर विखुरलेले आहेत. त्यांच्या सोबतीने अनेकांची प्रकाशचित्र सत्रे झाली. इथे मात्र कपडे बदलण्याची आणि प्रसाधनाची कुठलीच सोय त्या दिवशी उपलब्ध झाली नाही. कारण असे सांगितले गेले की त्या व्यवस्थेची किल्ली जवळ बाळगणारी व्यक्तीच आज कामावर हजर नव्हती. असो.

पाचव्या दिवशी वंडूरमार्गे जॉली बॉय बेटावर जायचे होते. वंडूर बंदरावरच महात्मा गांधी राष्ट्रीय समुद्री उद्यानाचे प्रवेशद्वार आहे. ह्या बेटावर प्लास्टिकमुक्त वातावरण सांभाळले जाते. म्हणून बाटलीबंद पाणी नेण्यासही मनाई आहे. दर दोन माणसांगणिक, २०० रुपये अनामत भरून दोन लिटरची एक ओतीव प्लास्टिकची वॉटर बॅग दिली जाते. आपल्या बाटल्यांतील पाणी त्यांत ओतून घेऊन त्या बॅगाच बेटावर नेऊ दिल्या जातात. बाटलीबंद पाण्याच्या बाटल्या वंडूरलाच सोडून द्याव्या लागतात. इथे होणारी प्लॅस्टिकच्या पिशव्यांकरताची तपासणी एवढी इत्थंभूत असते की, सगळ्यांनाच आपापल्या सामांनांतून असंख्य प्लॅस्टिकच्या पिशव्या आढळून आल्याने टाकून द्याव्या लागल्या. अंदमानात विशेषतः पाण्यात डुंबायचे असल्याने प्रत्येक वस्तू प्लॅस्टिकच्या पिशवीत भरून घेण्याच्या मोहापायी अक्षरशः हैराण व्हावे लागले. प्लॅस्टिकच्या पिशव्या टाकून द्याव्या लागल्या. आतील सामान उघडे पडले. स्त्रियांना तर हा फटका फारच अनावर झाला. अशा रीतीने आमचा प्लॅस्टिकविरहित प्रवास प्रत्येकी आठ-दहा माणसे नेणार्‍या छोट्या होड्यांतून जॉली बॉय बेटाकडे सुरू झाला. बेट सुरेखच होते. दृष्ट लागण्यासारखे. अंदमानात आल्यानंतर इथे आम्ही प्रथमच, काचेच्या तळाच्या नावांतून समुद्रतळ बघितला. त्याकरता प्रत्येकी ३०० रुपये घेऊन, एका बोटीतून आठ आठ जणांना नेऊन, तीन निरनिराळ्या ठिकाणी सागरतळ दाखवण्यात आला. कॅमेर्‍यांत बंदिस्त केला.


अंदमानी सागरतळातील जीवसृष्टी आणि ज्या काचेच्या तळाच्या होडीतून ती दिसली, ती होडी.

जॉली बॉय बेटावर आम्ही पॅक लंच नेलेले होते. किनार्‍यावरील तिवरांच्या जंगलात, तिवरांच्या झाडांच्या जमिनीनसमांतर फांद्यांवर, तर कुठे विशेष तयार केलेल्या बाकड्यांवर आणि कुटिरांत आम्ही स्वेच्छा-सहभोजनाचा लाभ घेतला.
सहाव्या दिवशी नॉर्थ बे बेटावर समुद्रसंचार (सी-वॉक), मग ब्रिटिश प्रशासनाचे अंदमानातील मुख्यालय राहिलेल्या रॉस बेटावर विहारफेरी आणि पोर्ट ब्लेअरला परत, असे नियोजन होते. हा सगळा प्रवास आम्ही अबर्दीन धक्यावरून एम.व्ही.जया नावाच्या पन्नास आसनी बोटीतून केला.
नॉर्थ बे आयलँडच्या किनार्‍याजवळच सी-लिंक कंपनीचे सी-वॉकर हे जहाज उभे आहे. पोर्ट ब्लेअर वरून समुद्र-संचार करू इच्छिणार्‍या पर्यटकांना ह्या जहाजावर आणतात. ह्याकरता समुद्र संचाराकरताचे रु.३,२००/- चे तिकीट वेगळ्याने घ्यावे लागते. स्कूबा डायव्हिंगकरता रु.३,५००/- चे तिकीट पडते. मात्र, ह्यात प्रत्येक स्कूबा डायव्हरसोबत एक स्वतंत्र पाणबुडा सोबत दिला जात असतो. स्कूबा डायव्हिंगकरता पोहोणे यावे लागते. पोर्ट ब्लेअर वरून येतांना, एका छोट्या स्वयंचलित होडीतून, जहाजालगत उभ्या असलेल्या दुसर्‍या होडीत आणि तिथून ह्या जहाजात आपण प्रवेश करतो.


इथेच कपडे बदलवण्याकरता चेंजिंग रूम, आपले व्यक्तिगत सामान ठेवण्याकरता लॉकर इत्यादी पुरवले जाईल असेही तिकीट देतांना सांगितले जाते. प्रत्यक्षात मात्र इथे चेंजिंग रूमच्या नावाखाली एक झापड असलेला आडोसा, आणि लॉकरच्या नावाखाली झाकणे असलेले अपुरे कप्पे एका रॅकमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्याला कडीकुलूप करावे अशी कोणतीही सोय नाही. समुद्र संचाराच्या कल्पनेने भारावलेले पर्यटक ह्याच तुटपुंज्या सेवांचा आनंद सुखाने घेत असतात. प्रशासकीय अधिकारी सुखासिन ठेवले जात असणार, त्यामुळे त्यांचीही फारशी अडचण होत नाही. तरीही, समुद्र-संचार कंपनीचे सर्व कर्मचारी आणि त्यांचा प्रत्यक्ष व्यवहार प्रामाणिक, सचोटीचा आणि विश्वास निर्माण करणारा आहे, ह्यात मुळीच संशय नाही.

जहाजाच्या मागच्या बाजूला, साधारण जहाजाच्याच आकाराच्या गोलाकार समुद्राला, तरत्या गोलकांच्या आधारे, तळापर्यंत लोंबणारे जाळे लावून बंदिस्त केलेले आहे. जहाजावरून एक लोखंडी शिडी तळापर्यंत उतरवलेली आहे. तिच्यावरून समुद्राकडे पाठ करून, नेसत्या कपड्यांनिशी आपण दोन चार पायर्‍या उतरून तळाकडे निघालो, म्हणजे गळ्यापर्यंत पाण्यात शिरल्यावर, ३२ किलो वजनाचे हवेशीर, म्हणजे पाठीमागच्या बाजूने दाबित हवेची नळी जोडलेली असते असे, शिरस्त्राण आपल्या डोक्यावर चढवले जाते. जहाजावर एक मोठ्ठा हवादाबक (काँप्रेसर) असून त्यातून दाबित हवा आणणार्‍या सुमारे एक सेंटिमीटर व्यासाच्या लांबलचक (पन्नास, शंभर मीटर लांबीच्या असाव्यात) नळ्या शिरस्त्राणास जोडलेल्या असतात. अगदी चष्मा घालूनही हे शिरस्त्राण चढवले जाते. कारण शिरस्त्राणाच्या आतील भाग कोरडाच राहत असतो, शिवाय चष्मा घातल्याने आपण नेहमीसारखेच स्वच्छ पाहूही शकत असतो. शिरस्त्राणाचे आकारमान असे असते की, त्याचे पाण्यातील वजन केवळ ७ किलोच भरते. मात्र, ह्या ७ किलोच्या अतिरिक्त वजनामुळेही आपण सागरतळाकडे लोटले जाऊ लागतो. अशावेळी, सोबत करत असलेला पाणबुडा आपल्याला शिडी सोडायची खूण करतो आणि ती सोडताच आपण त्याचा हात धरून झपाट्याने सागरतळाशी पोहोचतो. इथे सागरतळ साधारणपणे ५ मीटर म्हणजे सुमारे १५ फूट खोल असतो. अर्थात हवेची नळी कायमच हवादाबकाला जोडलेली राहून आपल्याला दाबित हवेचा पुरवठा करत राहते. शिरस्त्राणाच्या आतील हवेच्या दाबाने बाहेरचे पाणी शिरस्त्राणामध्ये शिरू शकत नाही. आपण बाहेरच्यासारखाच सुखाने श्वासोच्छवास करत राहतो.


समुद्रसंचार करणार्‍या आठदहा संचारकर्त्यांमागे तीन पाणबुडे सोबत असतात. आमचा गट आठ जणांचा होता. आमच्याच सोबत पर्यटन करणारे पाच जण आणि नवरा, बायको व त्यांचा सुमारे दहा वर्षांचा एक मुलगा असे इतर तिघे बंगाली भाषक, ह्यांचा हा गट होता. तळाशी पोहोचल्यावर संचार कर्त्यांची हातात हात देऊन एक माळ तयार केली जाते. त्या माळेच्या एका टोकास एक, तर दुसर्‍या टोकास दुसरा पाणबुडा हाती धरून मार्गदर्शन करत असतो. काय करायचे आहे ते खुणेनी समजावून सांगण्याचे त्यांचे कसब मला फारच अपूर्व भासले. आवडले. तिसरा पाणबुडा जलगच्च प्रकाशचित्रकाने (वॉटरटाईट कॅमेर्यापने) संचारकर्त्यांचे फोटो काढत असतो. आपण बाहेर येऊन कपडे बदलेपर्यंत, अशा प्रत्येकी १२ फोटोंची एक सी.डी.ही तयार करून आपल्या हाती देत असतात.

आत शिरण्यापूर्वी आम्हाला आठ जणांना एकत्र करून जहाजावरील एका ज्येष्ठ खलाशाने एक पाच मिनिटांचे व्याख्यान दिले. पाण्यात न विरघळणार्‍या शाईचा वापर करून, आठही जणांच्या उजव्या हाताच्या तळव्यामागे ए-८ असे इंग्रजीत लिहूनही ठेवण्यात आले. पाणबुड्यांना आमची ओळख पटावी म्हणून. आपण सुंदर आहे असे दाखविण्यासाठी करतो ती हस्तमुद्रा; ’मला जमते आहे. मी स्वस्थ आहे. आता समुद्रसंचार करू या’ असे सोबतच्या पाणबुड्यांना सांगण्याकरता वापरावी असे सांगण्यात आले. तसेच उजव्या हाताचा अंगठा वरच्या दिशेने दाखवल्यास; ’मला ताबडतोब बाहेर काढा. अस्वस्थ वाटते आहे.’ असा अर्थ सोबतच्या पाणबुड्यांना कळेल आणि ते तुम्हाला बाहेर तत्काळ काढतील. असेही सांगण्यात आले. मात्र ह्याव्यतिरिक्त इतर कुठल्याही हावभावांना आणि खुणांना समुद्रसंचारासंदर्भात काहीही अर्थ नाही, असे बजावून सांगण्यात आले.


खरे तर मी तासाभरापासून नंबर लागण्याची वाट पाहत होतो. लघवीची भावनाही होत होती. मात्र जहाजावर स्वच्छतागृहच नसल्याने, तशी सोय नव्हती. समुद्रात उतरल्यावर सहज विसर्जनाचा विचारही उद्भवला होताच. मात्र प्रत्यक्षात पाण्यात, समुद्रतळाशी पोहोचल्यावर आजूबाजूच्या वाढत्या दाबाच्या प्रभावाने ती भावनाही क्षीण होऊन, नामशेष झाली.

आता आमच्यासोबतच्या एका महिलेस, “फ्लोट होत आहेत” ह्या कारणास्तव बाहेर काढण्यात आले. त्यांचे म्हणणे असे होते की, ’मला चांगले जमते आहे’ ह्या अर्थाने त्यांनी उजव्या हाताचा अंगठा वर करून दाखवला. मात्र आधीच सांगितल्याप्रमाणे ही खूण चुकीची ठरल्याने त्यांना बाहेर काढले गेले. तरीही त्यांचे पूर्ण पैसे, सी-लिंकने संध्याकाळपर्यंत परत केलेले होते. इथे हे नमूद करावे लागेल की, सागरतळाशी अशा शिरस्त्राणासह वावरत असतांना, आपले पाण्यातले वजन कमी भरत असल्याने, चालण्याकरता हलकेच पाऊल उचलले तरी, उडी मारल्यासारखे शरीर वर उसळत असते. अशा परिस्थितीत जमिनीवर पावले रोवून ठेवणे, आणि ताठ, सरळ उभे राहणे अत्यंत जरूर ठरते. कारण ह्या उसळीचा आपल्याला अंदाज यायला जरासा वेळच लागतो. शिवाय आपण खाली वाकलो तर शिरस्त्राणात पाणी शिरून आपल्याला बुडण्याचा धोका संभवतो. एका पाणबुड्यास तीन-चार संचारकर्त्यांवर लक्ष ठेवायचे असल्याने आणि त्याचेवर त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी असल्याने, अशा प्रकारे अस्थिर होणार्‍या व्यक्तीस बाहेर काढणे त्यांना क्रमप्राप्तच ठरत असणार.

पहिल्या संचारकर्त्यास हाताने धरून तळाशी गेलेला पाणबुडा खालीच थांबला. दुसर्‍या पाणबुड्याने मग एक एक करून इतर संचारकर्त्यांना खाली आणले. त्यांच्या हातात आधीच खाली उतरलेल्या संचारकर्त्याचा हात सुपूर्त करून तो इतरांना आणायला वर जात असे. तोपर्यंत तळाशी आलेले संचारकर्ते परस्परांचे हात हातात घेऊन समोरच्या दिशेने वाट चालण्याकरता सज्ज होऊन राहत. त्यांच्या माळेच्या एका टोकास पहिल्या पाणबुड्याने घट्ट धरून ठेवलेले होतेच. आता, डोक्यावर शिरस्त्राण, त्यास पाठीमागे जोडलेली हवेची नळी अशा एक एक करून आठही संचारकर्त्यांना दोन पाणबुड्यांच्या संचाने तळापर्यंत आणून सोडले होते. सगळ्यांची तोंडे समोरच्या बाजूला आणि पाठी जहाजाकडे होत्या. त्याच दिशेने सगळ्यांच्या हवेच्या नळ्याही जहाजावरील हवादाबकापर्यंत गेलेल्या होत्या. माळेच्या दोन्हीही टोकांना पाणबुडे होते. अशी मालिका मग एका विहीरसदृश खळग्याच्या कडेवरील पांढर्‍याशुभ्र बारीक वाळूच्या पाऊलवाटेवरून मार्ग चालू लागली.


खळग्यात एके ठिकाणी एक मोठासा खडक उभा होता. त्यावर गुलाबी रंगांची सजीव पोवळी लगडलेली होती. झुडूपांप्रमाणे डोलत होती. मग एका पाणबुड्याने आम्हा एकेकाला सुटे करून आमचा हात त्या पोवळ्यास लावून दिला. सगळ्यात अखेरच्या चित्रात तळाशी मध्यभागी असलेले तपकिरी पोवळे, आम्ही हात लावताच गर्द निळे, जांभळे दिसू लागले. लाजाळूसारखे मिटलेही. हाच प्रयोग मग आम्ही सुट्यासुट्याने आणि एकत्रितपणेही केला. दरम्यान तिसरा पाणबुडा खडकाच्या दुसर्‍या बाजूस जाऊन, जलगच्च प्रकाशचित्रकाने आमचे फोटो काढत होता. आजूबाजूला रंगीबेरंगी मासे स्वैर संचार करत होते. त्यांना हात लाऊन पाहण्याचे आमचे प्रयत्न मात्र असफल होत असत. एक म्हणजे ते अत्यंत चपळ असत. दुसरे म्हणजे पाण्यात खोल असल्याने आमच्या हालचाली अतिशय मंद होत. आणि तिसरे म्हणजे शिरस्त्राणाच्या काचेतून खोलीचा अदमास योग्यप्रकारे येतच नव्हता.

आता आम्हाला हा समुद्र संचार आवडू लागला होता. पण हे सगळे होतपर्यंत आम्हाला वेळेचे भानच राहिलेले नव्हते. सुमारे अर्धा तास तरी गेला असावा. मग जसे खाली आणले होते, तसेच एकेकाला वर नेण्याची प्रक्रिया सुरू झाली. एक पाणबुडा मालिकेचे एक टोक धरून तळाशी थांबला. दुसरा एकेकास शिडीपर्यंत नेऊन, शिडीवरून वरपर्यंत नेई. शिरस्त्राण पृष्ठभागाशी पोहोचताच जहाजावरील कर्मचारी ते काढून बाजूला करी, त्याची नळी काढून टाकी आणि ते बाजूला ठेवून देई. अवजड सामान गाडीत चढवून घ्यावे तसे ते दृश्य दिसे.
बाहेर येणारा विजयी वीराच्या आविर्भावात असे. अद्भूत दर्शनाचा आनंद त्याच्या चेहर्‍यावर ओसंडून वाहत असे. तर आत उतरण्यास तयार असलेले लोक, आपल्या असंख्य प्रश्नांची उत्तरे त्यांना विचारत असतांना दिसत असत. अशा प्रकारे आमचा हा अद्भुतातला प्रवास सुखरूप पार पडला!

नॉर्थ बे बेटावरून पोर्ट ब्लेअरला परततांना रॉस बेटावर जेवण करायचे होते. जया बोटीतून आम्ही मार्ग आक्रमू लागलो. रॉस बेट, पोर्ट ब्लेअर शहरातून सारखेच दिसत राहते. सुरेख दिसते.


तिथे पोहोचल्यावर वरील पाटी वाचून मात्र धसकाच बसतो. अर्थात तिथे आलेल्या पर्यटकांच्या संख्येच्या तुलनेत, हे दंड वसूल करण्याकरता नेमलेले लोक, दहा टाक्केही नसल्याने किंवा पर्यटकांना उगाच त्रस्त करायचे नाही ह्या धोरणामुळे असेल, पण वरीलप्रमाणे दंडवसूली अजिबातच होत नसावी असे दिसले. बेट मात्र स्वच्छ सांभाळलेले दिसून येते. महासागरी नैसर्गिक सौंदर्याचे कोंदण तर त्याला लाभलेलेच आहे. त्यामुळे ते आवडतेही.


बेटावर अरुंधती राव नावाची एक खासगी मार्गदर्शक आहे. ती माफक दरात, शुल्क घेऊन, पर्यटकांचे प्रबोधन करत असते. मात्र तिची खासियत ही आहे की ती, खार, हरणे, ससे, मोर इत्यादिकांना त्यांच्या नावाने हाका मारते. ते लोक येतात. ती मग सोबत आणलेले ब्रेड त्यांना खायला देते. हे हरीण बदमाश आहे. लहान मुलांना मारेल. सांभाळा. ते हरीण आंधळे आहे. काही करणार नाही. अशा माहित्याही देत असते. प्रवासी तिच्या व्याख्यानांवर खूश असतात. त्या प्राण्यांसोबत आपापली प्रकाशचित्रे काढून घेत असतात. तेही सुखाने प्रकाशचित्रे काढू देत असतात. अरुंधती रावने ओढणीत बांधून घेतलेला जखमी ससा आणि तिने बोलावल्यावर धाऊन आलेली हरणे.


अशा रीतीने रॉस बेटाची संस्मरणीय सफर, तासाभरात सुखाने संपन्न होते.

एम.व्ही.जया ह्या बोटीतून मग आमचा अंदमानातील अखेरचा समुद्रप्रवास, पोर्ट ब्लेअरच्या दिशेने सुरू झाला.

परतीचा प्रवास दुसरे दिवशी विमानाने चेन्नईकडे उड्डाण भरून सुरू झाला. प्रवासाला निघाल्यावर विमानातून भारतभूमीची प्रकाशचित्रे काढावी अशी इच्छा झाली खरी. पण कॅमेरा बंदिस्त करून चेक-इन लगेजमध्ये ठेवलेला होता आणि मोबाईल बंद केलेला होता. परतीच्या प्रवासात मात्र आठवणीने मोबाईल फ्लाईट मोडवर टाकून, विमानातून असंख्य प्रकाशचित्रे काढली. खाली दिसणार्‍या दृशांचा, ज्ञात भौगोलिक ठिकाणांशी संबंध जोडायचे प्रयत्न मात्र यशस्वी झाले नव्हते. घरी आल्यावर जेव्हा असे प्रयत्न वेगळ्याने केले तेव्हा, कृष्णानदीवरले येरलवाडी आणि शिरसवाडी धरण मात्र विमानातून काढलेल्या फोटोत, त्यांच्या आकारांवरून आणि परस्पर तुलनेतील त्यांच्या स्थानांवरून स्पष्ट ओळखू येत आहे.


Yeralwadi Dam on Krishna River on Google Map. And WP_20150303_138.jpg, 03 March 2015, 14:41:02, From GoAir’s G8-304 Chennai-Mumbai Flight-30F.

त्यानंतर संपूच नये असा वाटणारा अंदमानाचा प्रवास लवकरच पूर्णत्वास आला. मुंबई विमानतळावर त्याची सांगता झाली.
.

http://nvgole.blogspot.in/ ह्या माझ्या अनुदिनीवरही आपले स्वागतच आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद दिनेशदा!

तुमचे ऐकले खरे, पण
"वृथा वृष्टि समुद्रेशु वृथा तृप्तस्य भोजनम"
असाच अनुभव येतांना दिसत आहे.