मेंदुतला माणुस

Submitted by प्रकाश घाटपांडे on 17 March, 2015 - 03:24

हे पुस्तक माणसातल्या मेंदुवरच नाही तर मेंदुतल्या माणसावरच आहे. म्हणजे पुस्तकाच स्वरुप हे रोजच्या व्यवहारातल मेंदुविज्ञान अस आहे. रंजकता व सुलभीकरण हे वैज्ञानिक आशयाला बाधा आणणारे असते असा गैरसमज जो असतो तो या पुस्तकाने नक्की दूर होतो. पुस्तकाची शैली ही वाचकाभिमुख आहे. चांगले नातेसंबंध जपण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी विज्ञान हे एक साधन आहे अशी लेखकद्वयांची धारणा आहे. को॓हम्‍ हा प्रश्न अध्यात्मात जेव्हढा गहन आहे तेवढाच विज्ञानात. माझ्या जगण्याचे प्रयोजन काय? जाणीव म्हणजे काय? आकलन म्हणजे काय? याची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपापल्या परीने वैज्ञानिक व तत्वज्ञ करीत आलेले आहेत. प्रश्नांची समाधानकारक उत्तरे मिळतात की नाही हे माहित नाही पण पुस्तकातून दुसर्याततला माणुस पहाण्याची दृष्टी मात्र वाचकाला मिळते. पुस्तकातील माहिती ही गेल्या चार पाच वर्षातील मान्यताप्राप्त संशोधन पत्रिकेत प्रसिद्ध झालेल्या प्रबंधांवर आधारित आहे. लेखक द्वयातील डॉ. आनंद जोशी हे एम.डी (मेडिसीन) असून गेली ४० वर्षे मुंबईत वैद्यकीय व्यवसाय करतात. तसेच सुबोध जावडेकर हे आय आय टीचे केमिकल इंजिनिअर असून सुप्रसिद्ध विज्ञान कथा लेखक म्हणून सर्वांना परिचित आहेत. पुस्तकाची रचना ही अशी ठेवली आहे की पुस्तक अनुक्रमे न वाचता कोठूनही सुरवात केली तरी आकलनात बाधा येत नाही. आवश्यक तिथे आकृती चित्र पुरेशी घेतली आहेत.
पुस्तकात झोपी गेलेला जाग असतो या प्रकरणात रेम झोप, स्वप्न व स्मृती या बाबत उहापोह केला आहे.बा.भ.बोरकर मेघदुताचा अनुवाद मराठीत करत होते तेव्हा नवव्या श्लोकाचा अनुवाद मनासारखा उतरेना म्हणून दोन दिवस अस्वस्थ झाले होते. तिसर्याी दिवशी एका मोठ्या फळ्यावर त्या श्लोकाचे सुभग भाषांतर सुवाच्च अक्षरात लिहून ठेवलेले त्यांना स्वप्नात दिसले. ते दिसेनासे होईल म्हणुन अंधारातच त्यांनी तो श्लोक कागदावर पटकन उतरुन काढला. प्रसिद्ध गणिती रामानुजन ला अनेक कूट गणितांची उत्तरे स्वप्नातच मिळाली. देवी ती उत्तरे सांगते अशी त्याची श्रद्धा होती. रसायन शास्त्रज्ञ कुकुले ला बेंझीन रिंगची कल्पना स्वप्नातूनच सुचली.
अनेक निर्णय प्रक्रियांमधे भावना व तर्कबुद्धी यांची रस्सीखेच होत असते.आर्थिक व्यवहार विश्वास व फसवणूक या दोन टोकांमधे झोके खात असतो. या भावना मेंदुतील दोन विशिष्ट केंद्रावर अवलंबून असतात. त्याविषयी स्वतंत्र प्रकरणात चर्चा केली आहे.
सिक्स्थ सेन्स हा शब्द अतिंद्रिय ज्ञान अशा अर्थाने आपण वापरतो पण निजदेहभान म्हणजे आपला देह आपल्या मालकीचा आहे या संवेदनेसाठी ही तो इथे वापरतात. आपण सहानुभूती हा शब्द कणव अर्थाने वापरतो पण ती प्रत्यक्षात सह-अनुभुती आहे.मानवी मेंदुला संगणकाची उपमा देतात परंतु मेंदुत साठवलेल्या स्मृती या वास,आवाज,रंगरुप,चव आणि स्पर्श यांचा पंचेद्रियांनी घेतलेला अनुभव असतो.
मेंदुतल्या यंत्रणेबद्दल जी माहिती समोर येते आहे त्या वरुन फ्री विल ही संकल्पना मोडीत जरी निघाली नसली तरी त्याच्या परिघाचा संकोच होतो आहे हे मात्र खरं! त्याचा परिणाम काय होईल हा विचार अस्वस्थ करणारा आहे. भारतीय वंशाचे पण अमेरिका स्थित आघाडीचे मेंदुशास्त्रज्ञ डॉ. विलयनूर रामचंद्रन म्हणतात आपल्या जाणीवेमध्ये मुक्त इच्छा जरी नसली तरी मुक्त अनिच्छा मात्र असते. पुस्तकात असंख्य वैज्ञानिक किस्से मनोरंजक पद्धतीने मांडले आहेत. पुस्तकातील प्रकरणांची नावेच पहा ना! उत्क्रांतीतील गांधीगिरी, स्वर आले स्मृतीतूनी, नवीन आज भावना, मनूची स्मृती, आभासी अंगातून वेदनेकडे, जाणीव नेणीवेचा खेळ, निवेदनाची उर्मी अशी आकर्षक व अर्थपूर्ण घेतली आहेत.
प्रास्ताविक व उपसंहार हा प्रकार पुस्तक वाचण्यापुर्वी व पुस्तक वाचल्यानंतर अशा दोन प्रकरणात घेतल आहे. पुस्तक वाचल्यानंतर तुमच्या मेंदुतील काही पेशींच्या जुळण्या झाल्या तर काही जुळण्या तुटल्या असतील. सूक्षस्तरावर का होईना तुमच्या वर्तनात, विचारात बदल होईल. तो कदाचित तुम्हाला जाणवेल कदाचित नाही.
पुस्तक वाचल्यानंतर पुस्तकाच्या लेखनशैली व अंतरंगा बाबत लेखकद्वयांचे आपापसातील मतभिन्नतेमुळे काही प्रश्न निर्माण झाले तर नसतील ना? हा विचार मनात येवून गेला. पण त्याचे ही उत्तर ६ जून २०१४ च्या दिव्य मराठी तील पुस्तक लेखनातील पार्टनरशिप या सुबोध जावडेकरांच्या लेखात मिळाले. त्या लेखाची लिंक http://divyamarathi.bhaskar.com/article/MAG-subodh-jawdekar-article-abou...

मेंदुतला माणुस
लेखक- डॉ. आनंद जोशी व सुबोध जावडेकर
राजहंस प्रकाशन
पृष्ठे २३३ मूल्य २२५/-

Group content visibility: 
Public - accessible to all site users