कॉर्न चाट

Submitted by मंजूडी on 26 February, 2015 - 04:15
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
२० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

स्वीट कॉर्नचे दाणे - २ वाट्या
बेबी कॉर्नचे १ से.मी. आकाराचे क्यूब्स - १ वाटी
पनीरचे १ से.मी. आकाराचे क्यूब्स - अर्धी वाटी
काजू - अर्धी वाटी
धने - १ चमचा
जिरे - २ चमचे
बडिशेप - २ चमचे
४-५ लवंगा
इंचभर दालचिनीचा तुकडा
२ लिंबं
मीठ
अमूल बटर - तीन चार चमचे
लाल तिखट - ऐच्छिक
आवडीप्रमाणे चीज

क्रमवार पाककृती: 

१. जमलं तर, वेळ मिळाला तर काजू अर्धे अर्धे करून दोन तास पाण्यात भिजवून घ्या. ह्याची चव छान वेगळी लागते.
२. स्वीट कॉर्नचे दाणे आणि बेबी कॉर्नचे क्यूब उकडून घ्या.
३. पनीरचे तुकडे पाण्यात घालून ठेवा.
४. धने, जिरं, बडीशेप, लवंगा, दालचिनी न जळू देता खमंग भाजून घ्या. जरा कोमट झाल्यावर मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घ्या.
५. एका कढईत अमूल बटर वितळवून त्यात उकडलेले स्वीट कॉर्नचे दाणे, बेबी कॉर्न घाला. काजू पाण्यातून निथळून काढून त्यात घाला. चवीप्रमाणे मीठ आणि तयार केलेली ताजी मसाला पावडर घाला. तिखटपणासाठी हवं असेल तर लाल तिखट घालून व्यवस्थित ढवळा. पनीरचे तुकडे घालून नाजूकपणे पनीर मोडू न देता ढवळा. वरून लिंबाचा रस पिळून नीट एकत्र करून गरमागरम खायला घ्या.

corn chat.jpg
वाढणी/प्रमाण: 
दोघांसाठी; पण एकच माणूस संपवतो.
अधिक टिपा: 

१. हे चाट नुसतंही खाता येतं, मी घरी केलं होतं तेव्हा कॅनॅपीजमध्ये भरून वरून थोड्डंसं चीज किसून घालून खायला दिलं होतं.
२. लिंबांची काटकसर करू नका. चाटची चव लिंबूरसामुळे खुलून येते.
३. मी ज्या लग्नात हे सर्वप्रथम खाल्लं होत तो आचारी MDH ची धनिया पावडर, जीरा पावडर आणि डेगी मिर्च पावडर घालत होता. लवंग, दालचिनी, बडीशेपेची कल्पना माझी आणि मला ती चव आवडली.

माहितीचा स्रोत: 
एका लग्नातला इंदोरी चाटवाला
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आशू, या पदार्थाचं नाव 'शाही कॉर्न चाट' असायला हवं यात कौतुक काय ते मला कळलं नाही. पदार्थाचं कौतुक असेल तर त्याचं क्रेडीट मी कशाला घेऊ? ही पाककृती मी शोधून निर्माण केलेली नाही. तुम्हाला वाटतं शाही कॉर्न चाट म्हणावंसं तर म्हणा की...

पूनम, कॉर्न फॅन क्लब सुरू कर.

रेसिपी एकदम मस्त आहे.

पण हे कॅनॅपिज काय प्रकरण आहे? गुगल केलं तर मंजुडी या जन्मात खाऊ शकणार नाही असे पदार्थ समोर आले... (आणि मला भुक लागली Happy )

मंजूडी, ते चित्रातील मला आत्याने पाठवलेले पण मला नाही आवडलेले. पापु, शे.पु. च्या पुर्‍यांची चवच मस्त.

त्या बॉक्सवर २-३ मिनिट बेक करा अस दिल आहे. तसच करून मी वापरल.
तळून चांगली टेस्ट येते का?? अजून शिल्लक आहेत. तळण्याचा प्रयोग करेन.

मन्जूडी हा प्रकार काजू व पनीर मुळे शाही झालाय. एक सुचवावे वाटले म्हणून लिहीतेय. मैदा सरसरीत भिजवुन, त्यात ओवा+मीरे पुड्+मीठ घालुन त्यात आईस्क्रीमचा अल्युमिनीअमचा कोन किन्वा एक स्टील वाटी बुडवुन ते डायरेक्ट तेलात तळुन मग कोन वा वाटी वेगळी काढुन ती गार करावी. त्यात तुम्ही केलेला हा चाट घालुन सर्व्ह करता येईल अशी माझी कल्पना. नो जबरदस्ती, उगाच आठवले म्हणून लिहीले. माझ्या मावस साबानी हे केले होते. मात्र साधी भेळ होती.

अगं मी सर्च केले तेव्हा सगळे परदेशी प्रकार आलेत.

काल छेडा स्टोर्स नामक एका भपकेबाज दुकानात गेले होते. तिथे तुझेवाले कॅनपीज दिसले. पाणीपुरीच्या पुरीप्रमाणे तळुन पॅक करुन ठेवले होते. आता तुझी पाकृ करुन पाहतेच.

Pages