५०० वर्षांपूर्वीचे हरीनारायण मंदिर बेनवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहमदनगर

Submitted by मानुषी on 20 February, 2015 - 21:53

काही कारणाने अहमदनगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या बेनवडी इथे जाणं झालं. आणि वाटलं आपल्या आसपास आपल्या संस्कृतीचे पुरातन अवशेष विखुरलेले आहेत आणि आपण त्याबद्दल अनभिज्ञ आहोत.
अगदी तशीच जाणीव बेनवडीला या पुरातन मंदिराला भेट दिल्यावर झाली.
या परिसरात गेल्याबरोबर मन अगदी कुठे तरीच पुरातन काळात ओढ घेऊ लागलं आणि मनात एक अनामिक हुरहुर ठाण मांडून बसली.
कर्जत तालुक्यात शिरल्यावर मेन रोड सोडून जेव्हा एका छोट्या रस्त्याला लागलो तेव्हा काही मिनिटांनी अचानकच समोर एक कळस दिसायला लागला.

या रस्त्याने थोडं अजून आत गेलं की हा गढीसदृश भाग दिसायला लागतो. आणि आपण या आधुनिक काळातून पुरतेच मागे खेचले जातो.

गढीच्या दरवाज्यातून आत गेल्यावर हे दृश्य दिसतं. या तुळशी वृंदावनाच्या खालच्या कोनाड्यातून थेट पुढे असलेल्या हरीनारायण मंदिरातली हरी नारायण स्वामींच्या मूर्तीचं थेट दर्शन होतं! हे सगळं पाहिलं की ....एक संस्कृती उदयाला येते आणि कालांतराने तिचा हळूहळू र्‍हास होतो आणि मग पुन्हा नवीन संस्कृती(सिव्हिलिझेशन) उदयाला येते.................. हा विचार पटतच जातो.

या तुळशी वृंदावनापलिकडे मंदिर आहे.......त्याचं आतलं प्रवेशद्वार

या आतल्या मूर्ती.............मधली हरीनारायण स्वामींची, डावीकडे देशपांडे कुटुंबियांचे वंशपरंपरागत आलेले देव, आणि उजवीकडे अन्नपूर्णेची मूर्ती.

या मूर्तींच्या वरच्या छताचा काही भाग...

या मंदिरातल्या भिंतींवर आणि छताच्या कॉर्नर्सवर ही असलेली पेन्टिन्ग्ज. ही चित्रकलाही ५०० वर्ष पुरातन आहे.

मंदिराचं मुख्य प्रवेशद्वार

हे मंदिराच्या बाहेरून घेतलेले फोटो

मंदिराच्या चहुबाजूंनी देशपांडे कुटुंबियांचं राहतं घर आणि ही या फोटोत दिसणारी ओवरी आहे.

या ओवरीमधे राधाकृष्णाची आणि एक दोन मूर्ती आहेत.

ज्या गढीसदृश इमारतीत देशपांडे कुटुंबीय रहातात आणि हे मंदिर आहे त्या गढीचे बाहेरून दिसणारे दृश्य

वर दाखवलेल्या दिंडी दरवाज्या समोर ...म्हणजेच मंदिराच्या परिसरातून बाहेर आल्यावर दिसतात ...या हरीनारायण स्वामींच्या शिष्यांच्या समाध्या.

या समाध्यांवर दगडात कोरलेलं काही लिखाण आहे. ते मोडी लिपीत असावं असं श्री. देशपांडे यांचं म्हणणं आहे.
पुरातत्व खात्याचे लोक येऊन हे सगळं पाहून गेले आहेत. हा सगळा परिसर या खात्याने रिस्टोरेशनसाठी निवडला आहे.
हा त्या लिखाणाचा फोटो. नीटसा आलेला नाही.

दिंडी दरवाजा आणि समोर शिष्यांच्या समाध्या.

तिथे आम्हाला ही कुलुप किल्ली पहायला मिळाली. ही हातात घेतल्यावर अपेक्षेपेक्षा खूपच हलकी वाटली. त्याचं कारण दिसताना हे लोखंडी असेलसं वाटतं पण हे ब्रॉन्झ या धातूचं असल्याने लोखंडाच्या मानाने खूपच हलकं होतं. हेही खूपच पुरातन कालातलं.

हे कुलुप बंद झाल्यावर असं दिसतं.

हे देशपांडे कुटुंबीय या मंदिराची देखरेख करतात. हे तीन भाऊ आहेत. पैकी एक भाऊ आणि कुटुंबीय कायम इथेच राहतात. यांना गाव सोडता येत नाही. कारण सकाळ संध्याकाळ देवांची साग्रसंगित पूजाअर्चना यांना करायची असते. यांना जर कुठे जायचं असेल तर त्यांच्या उरलेल्या दोन भावांपैकी(एक पुणे, एक नगर) एखाद्याला इथे येऊन पूजेची जबाबदारी घ्यावी लागते.
आता सध्या तिथे हरिनारायण स्वामी जयंती व पुण्यतिथी उत्सव चालू आहे. दि.१९/२/२०१५ ते २२/२/२०१५ पर्यंत कीर्तन प्रवचन भजन भंडारा असा भरगच्च कार्यक्रम आहे.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान माहिती आणि फोटो.

मंदिर पुरातन आहे आणि अजुन सुस्थितीत आहे आता पुरातत्व खात्याने जर त्याला नवसंजिवनी दिली तर उत्तमच.

रच्याकने, कुलुप किल्ली खुप आवडली.

मानुषी काळाचं भान हरपवणारे हे स्थळ तुम्ही कॅमेरयात अचूक टिपलंय.अशा प्राचीन वास्तुरचना वेगळीच हुरहूर लावतात .त्या ओवरया ,समाध्या ,लघु चित्रशैलीतला पर्णसंभार सुरेख …सगळ काही गतकाळातील अध्यात्म वैभवाचा बहरता काळ डोळ्यांपुढे आणणार

छान माहिती. कुलुप सहीच आहे.

पण अशा इतक्या पडझड झालेल्या जागेला नीट डागडुजी न झाल्यामुळे ते आणखीनच दीन वाटते.

सुंदर !

सुंदर प्रचि!! आणि खूप छान ओळख करून दिलीस!.......मंदिराचे पाषाण अगदी घडवलेले आहेत. शिवाय सगळ्या बांधकामातच आखीव रेखीवपणा, सुबकपणा भरून राह्यलाय! तू म्हणालीस त्याप्रमाणे ही वास्तू आपल्याला त्या काळात घेऊन जाते...
आणि ती कुलूप-किल्ली भन्नाट हं! तो शिलालेख अजून सुस्थितीत आहे हे विशेष!

गमभन,

हरिनारायण हे नवनारायणांपैकी एक आहेत. हे नवनारायण म्हणजे नऊ नाग होत. हरीनारायणांचा पृथ्वीवरील अवतार म्हणजे गोरक्षनाथ होय. संदर्भ : http://navnathbhaktisar.org/

धन्यवाद.

आ.न.,
-गा.पै.

खूपच सुंदर गं मानुषी.. अचानक असं काही समोर आलं तर भान हरपायला होतं .. खूप छान, सुस्पष्ट आलेत फोटोज,

त्यामुळे आम्ही ही या पुरातन वास्तू चा आनंद घेतला.. केव्हढी प्रचंड जागा आहे, मेंटेन करायला खूप अवघड असेल.. पण तिथे राहणार्‍या कुटुंबाने अगदी कसोशीने जतन केलेलीये , हे तेथील स्वच्छतेमुळे दिसून येत आहे. Happy

माहितीबद्दल धन्यवाद गापै!

माझ्यामते हे हरिनारायण कोणी संत्/सत्पुरुष असावेत. कारण लेखात जयंती व पुण्यतिथीचा उल्लेख केला आहे.

हे स्वामी नाथपंथीय नसून ते नारदाचे अवतार आहेत. असं देशपान्डे कुटुम्बियांनी सांगितलं. सविस्तर माहिती सवडीने.
सर्वांना खूप धन्यवाद!

मानुषी, मस्त फोटो आणि माहिती Happy
पण एकूण स्थापत्यशैली आणि विटांचे आकार बघता हे सर्व शिवकाळानंतरचे आहे असेच वाटते. कदाचित या आधीपासून अस्तित्वात असलेल्या मंदिराचा जीर्णोद्धार/पुनर्बांधणी झाली असेल पण फोटोत दिसत असलेल्या वास्तू फारफारतर अडीचशेतीनशे वर्षं जुन्या आहेत. मंदिरावरचा इस्लामिक स्थापत्यशैलीचा प्रभाव अगदी स्पष्ट आहे.

या काळातले/ मध्ययुगीन (प्राचीन नव्हेत) अवशेष आपल्याकडे महाराष्ट्रात गावोगाव आढळतात म्हणलं तरी फारशी अतिशयोक्ती होणार नाही. त्यामुळेच पुरातत्व खात्याची मंडळी येऊन भेट देऊन गेली आणि परिसर रिस्टोरेशन साठी निवडलेला असला (अगदी प्रामाणिकपणे बोलायचं तर या निर्णयामागे कुणीतरी सरकारदरबारी संबंध असलेल्या प्रतिष्ठित व्यक्तीच्या ओळखीमुळे, इच्छेमुळे तो घेतला गेला असल्याची शक्यता नाकारता येत नाही) तरी इथे फारसे काही होईल असे मला वाटत नाही.

पण तुम्ही जिथे जाल तिथे सजगपणे आसपासच्या जुन्या अवशेषांची निदान चित्रनोंदणी करून त्याची माहिती जाणून घेतली हे पाहून खूप छान वाटले Happy

हो, आणि कुलूपकिल्ली फारच आवडली

जिप्सी दौन्ड्पासूनचं अंतर विचारून सांगते. सर्वांना धन्यवाद,
वरदाचे स्पेशल आभार. एक्स्पर्ट ओपीनियनची वाट बघत होतेच.
वरदा लिपीविषयी काही? खरं तर फोटो अस्पष्ट आहे.

Pages