नोकरदार स्त्रिया: आजार आणि सामना

Submitted by मो on 10 February, 2015 - 09:47

गेल्या ५० वर्षात जगभरातील प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये नोकरदार किंवा व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लग्नापूर्वी शिक्षण पूर्ण करुन स्वावलंबी होण्याकडे अनेक मुलींचा कल दिसून येतो. नोकरी व्यवसायात बस्तान बसेपर्यंत आपत्यप्राप्ती लांबवणे किंवा '१ या २ ऐवजी' १ बस कडे कल झुकणे ह्या गोष्टीही आजकाल काही प्रमाणात पाहण्यात येत आहेत. बर्‍याचजणी मूल झाल्यावरही नोकरी/व्यवसाय करत राहण्याला प्राधान्य देत आहेत. हे चित्र कमी अधिक प्रमाणात जगभरातील आहे. 'घर चालवणे' ह्याबरोबरच बाहेर पडून घराबाहेर काम करणे ही जबाबदारी जरी बर्‍याच स्त्रिया घेत असल्या तरी हे सर्व करताना त्या नोकरी, मुलांचे संगोपन, घरकाम आणि नातेसंबंध/कार्यक्रम आणि ह्या सर्व पातळ्यांवर लढताना दिसून येतात. घर आणि नोकरी/व्यवसाय ही कसरत साधताना अनेक स्त्रियांवर अतिरिक्त ताण येतो. अजूनही भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाक, घरकाम आणि मुलांचे, घरातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन ही जबाबदारी मुख्यत्वे स्त्री पार पाडते. बर्‍याचदा घर आणि नोकरी-व्यवसायातील ताण आणि जबाबदार्‍या ह्याची परिणिती ही ह्या स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आजारपणात होते.

'द हिंदू' ह्या वर्तमानपत्राने मार्च २०१४ मध्ये विविध शहरांमधील १२० निरनिराळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या २८०० स्त्रियांचे सर्वेक्षण केला. त्यात असे पाहण्यात आले की भारतातील ७५% कामकरी स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार आहेत. ह्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करणार्‍या स्त्रियांची मुलाखती घेतल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे बर्‍याच जणी आपल्याला असणार्‍या ह्या आजाराबद्दल अनभिज्ञ किंवा डिनायल मध्ये आढळल्या. डॉक्टरकडे जाणे किंवा ह्यावर काही उपचार घेणे ह्यापेक्षा वेळ मारुन नेणे, अंगावर काढणे किंवा घरगुती उपायांवर अधिक जणी भर देतात हेही आढळले.

नोकरदार स्त्रियांमध्ये मुख्यत्वे खालील आजार आढळले -
१. ताण
२. निरुत्साह (फटीग)
३. डिप्रेशन
४. डोकेदुखी
५. मळमळ, भुकेचा अभाव
६. झोप न येणे
७. हायपर टेन्शन, कोलेस्ट्रेरॉल
८. स्थुलता
९. पाठदुखी
१०. अनियमित मासिक पाळी
११. इन्फर्टीलिटी

** हे आजार नोकरी व्यवसायानिमिताने डबल ड्युटी करणार्‍या स्त्रियांमध्ये जास्त पाहण्यात आले, पण ते इतरही अनेक स्त्रियांमध्ये आढळतात. त्यामुळे जरी हा लेख नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वरील समस्यांना तोंड देणार्‍या स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेत असला तरी खाली चर्चिले गेलेले उपाय हे सर्वच स्त्रियांना उपायकारी ठरतील.

घर, नोकरी ह्याबरोबर येणारे ताणतणाव आणि वरील समस्यांचा सामना करायचा कसा? सर्वप्रथम आपण आजारी आहोत हे मान्य करा आणि दुर्लक्ष करणे/अंगावर काढणे बंद करा. आधी साधी वाटणारी पाठदुखी, फक्त दुर्लक्ष केल्यामुळे क्रॉनिक पाठदुखी होऊन वेळ आणि पैसे दोन्हीचाही अपव्यय करु शकते. सतत ताणाखाली राहणे, झोप व्यवस्थित न मिळणे, व्यायामाचा आभाव ह्याची परिणिती अनियमित पाळी, मधुमेह, हायपर टेन्शन, स्थुलता इत्यादी मध्ये होऊ शकते. एक्ट्रीम केस मध्ये ती प्रजनन संस्थेवरही परिणाम करु शकते.

स्वतःकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करु शकता ती म्हणजे व्यायाम. कोणत्याही प्रकारे दिवसातला अर्धा तास तुम्ही एखादा शारीरिक व्यायामप्रकार (चालणे/पळणे/पोहणे/जिम/योगसनं/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम) केला तर अर्धं युद्ध तिथेच जिंकलात समजा. व्यायामाची गरज आणि फायदे मायबोलीवर बरेचदा सविस्तर चर्चिले गेले आहेत. पण व्यायामाचे अतिशय मुलभूत फायदे सांगायचे म्हटले तर वजन आटोक्यात ठेवणे, इम्युनिटी वाढवणे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा करणे इत्यादी. अगदी सुरुवातीच्या स्टेजेस मधला मधुमेह, हायपर टेन्शन, कोलेस्टेरॉल तुम्ही फक्त व्यायामानेही नियंत्रित ठेवू शकता.

ऑफिसमध्ये कितीही जास्त काम असलं तरी दर तासाला पाय मोकळे करुन येत जा. खुर्ची वर बसल्या बसल्या मानेचे, खांद्याचे व्यायाम करत जा. अधून मधून उठून स्ट्रेचींग करत जा. सतत एकाच ठि़काणी बसून राहिल्याने सर्व स्नायूंवर ताण येतो, तो ताण अगदी एका मिनिटाच्या व्यायामानेही जाऊ शकतो. काँप्युटरवर काम करणार्‍यांची सगळ्यात मोठी तक्रार असते ती पाठदुखी, खांदेदुखी आणि डोळेदुखीची! तासाभराने, किंवा जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा खांदे, मान, कंबर, डोळे गोलाकार फिरवून तो ताण घालवत जा. सर्वांसमोर करायला संकोच वाटत असेल तर तुम्ही बाथरुम मध्ये जाऊन हे उभ्याचे व्यायाम करु शकता. ऑफिसला खिडकी असेल तर नजर जेवढी दूरवर नेता येईल तेवढी दूर नेऊन तिथे टक लावून पाहत राहिल्याने सतत काँप्युटरकडे किंवा नजीकच्या वस्तू बघितल्यामुळे येणारा ताण चटकन कमी होतो. डोळ्यावर थंड पाण्याचा हबके मारा. माऊस आणि किबोर्डच्या सतत मुळे हातावर/बोटांवर येणारा ताण घालवण्याकरता वेळ मिळाला की बोटे झटकणे, मुठीची उघडझाप करणे आणि मनगटे गोलाकार फिरवणे हे व्यायाम करा. ह्या सर्व २-५ मिनिटात करता येण्यासारख्या व्यायामांमुळे ताणल्या गेलेल्या स्नायुंना ताबडतोब आराम वाटतो.

तुम्ही जर फिरतीचे काम किंवा फिल्डवर्क करत असाल तर उन्हात फिरताना टोपी/स्कार्फ/छत्री, गॉगल, पाण्याची बाटली, जमल्यास सनस्क्रीन हे नेहेमी बरोबर ठेवा. अतीश्रमामुळे, व्यवस्थित हायड्रेटेड न राहिल्यामुळे चक्कर येऊ शकते, अश्या वेळी ही पाण्याची बाटली फार महत्त्वाची! अतीश्रमामुळे झोप न येण्यास त्रास होऊ शकतो. खूप वेळ उभे राहण्याचे काम असेल तर जमत असल्यास थोड्या वेळाने बसत जा. बैठे काम करणार्‍यांप्रमाणेच बाहेर काम करणार्‍यांनाही स्ट्रेचिंगची आवश्यकता असते. त्यामुळे वर सांगितलेले व्यायाम त्यांनाही लागू होतात.

बैठं ऑफिसमधलं काम असो वा फिरतीचं जास्त श्रमाचं काम, दोन्हीही कामांमध्ये स्ट्रेस असू शकतो. अश्यावेळी अधून मधून दीर्घ श्वसन, प्राणायाम हे फार फायद्याचे ठरते. दर अर्ध्या तासाने ५ दीर्घ श्वासोच्छवास करणे ही स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे. अतिशय सोपा आणि अतिशय गुणकारी असा हा स्ट्रेसबस्टर आहे. असं म्हणतात की आपल्या शरीरातील ७०% टॉक्सिन्स हे श्वसनामधून बाहेर पडतात. जर तुम्ही योग्य प्रकारे श्वासोच्छवास करत नसाल तर तुम्ही तुमच्या तुमच्या शरिरातील टॉक्सिन्स योग्यप्रकारे/पूर्णपणे बाहेर काढत नाही आहात. शरीरातील ताण कमी करणे, विचारांना अधिक क्लॅरिटी आणणे, प्रतिकारशक्ती वाढवणे इत्यादी आणि इतर अनेक फायदे दीर्घ श्वसनाने मिळतात. मुख्य म्हणजे रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि कार्बन डायॉक्साईड काढणे हे दीर्घश्वसनाने अधिक चांगल्या प्रकारे साधले जाते. दीर्घ, हळू श्वसन करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी सवय लावा. जेंव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप एकाग्र होऊन किंवा ताणाखाली काम करता तेंव्हा छोटे छोटे श्वास घेतले जातात, अश्यावेळी लक्षात ठेवून दीर्घ श्वसन करायला शिका.

जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि कितीही काम असले तरी वेळेवर जेवण करत जा. जेवल्यावर लगेच बसण्यापेक्षा ५-१० मिनिटाची फेरी मारुन या. तसेच दर तासाला उठून पाय मोकळे करत चला. दुपारचे जेवण जास्त घेण्यापेक्षा, एक छोटे लंच घेऊन थोड्या थोड्या वेळाने छोटे सकस स्नॅक्स्/फळे खात चला.

आजकाल बर्‍याचदा नीट घडी बसेपर्यंत मूल नको असा नवरा बायकोचा एकत्रित निर्णय असतो. नोकरी व्यवसायात ताण तणाव असतात, व्यायाम करायला वेळ नसतो, अश्या वेळेला बर्‍याचदा ह्याचा परिणाम स्त्रीच्या मासिक पाळीवर, प्रजनन संस्थेवर होऊ शकतो. स्ट्रेस, व्यायामाचा आभाव आणि त्याच बरोबर अनियमित जीवनशैली ह्यामुळे PCOS (पॉलीसिस्टीक ओव्हेरिअन सिंड्रोम), हार्मोनल इम्बॅलन्स इत्यादी आजारांचा बर्‍याच जणींना सामना करावा लागतो. त्यामुळे नियमितपणे चेकअप करुन घेणे, कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करुन घेणे हे महत्त्वाचे ठरते. बर्‍याच ऑफिसेसमधून वार्षिक तपासणी होत असते, त्याचाही जरुर लाभ घेत जा.

कुठल्याही नोकरी व्यवसायात कमी अधिक प्रमाणात राजकारण पाहण्यात येते. अनेकदा तुम्ही त्याचा भाग बनू शकता, त्याचा अतीव स्ट्रेस येऊ शकतो, इतका की ह्या राजकारणापायी डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि त्यामुळे नोकरीला तिलांजली दिलेल्या महिला पाहण्यात येतात. ऑफिसातलं राजकारण कसं टाळणं हा ह्या लेखाचा विषय नाही परंतू ते घरी आपल्याबरोबर घेऊन येऊन त्याचा आपल्याला पदोपदी त्रास न होऊ देणं बर्‍याच अंशी आपल्या हातात असू शकतं. असं म्हणतात छंद हा जगातला सर्वात उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. सुटीच्या दिवशी (शक्य असल्यास प्रत्येक दिवशी) स्वत:करता थोडासा का होईना, वेळ काढा. आवडत्या पुस्तकाची ४ पानं वाचा, चांगलं संगीत ऐका, मैत्रिणीशी गप्पा मारा, शॉपिंगला जा. अशी एखादी गोष्ट करा ज्यात तुम्हाला पूर्ण आनंद मिळतो आणि तेवढा वेळ तुम्ही सगळे ताण तणाव विसरुन जाता. तुमच्याकरता फक्त तुम्हीच वेळ काढून शकता हे नेहेमी लक्षात ठेवा. घरातल्या कामांची विभागणी करा. जमेल तिथे घरच्यांबरोबर कामे वाटून घ्या. घरच्या आणि बाहेरच्या जबाबदार्‍या पार पाडताना आपण तब्येतीची हेळसांड करत नाही आहोत ना हे तपासून पाहत चला.

जरी वरील शारीरिक/मानसिक तक्रारी खर्‍या असल्या तरी ह्याची एक दुसरीही बाजू पाहण्यात आली आहे. कधी कधी दिवसातले ७-८ तास घराबाहेर असणं हे काही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकरता लाभदायी ही ठरु शकतं. नुकत्याच NPR वाहिनीने घेतलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की अनेक स्त्रियांनी ऑफिसला जाणं हेच एक स्ट्रेसबस्टर, स्वत:करता असलेला दिवसातला वेळ आहे असं सांगितलं. वर्क-लाईफ बॅलन्स महत्वाचा! तुम्हाला हा बॅलन्स साधता आला तर उत्तमच. नोकरी/व्यवसाय आपल्याकरता, आपण नोकरीकरता नाही हे लक्षात ठेवा. स्वत:ची शारीरिक/मानसिक काळजी घ्या, आणि ही डबलड्युटी यशस्वी रितीने पार पडणार ह्याची खात्री ठेवा.

----

वरील लेख हा नोकरी व्यवसायातील स्त्रियांमध्ये मुख्यत्वाने पाहिले जाणारे आजार आणि त्यांचा सामना ह्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न आहे. परंतु, इथे उल्लेख केलेल्या बर्‍याच गोष्टी फक्त स्त्रियाच नव्हे तर नोकरी-व्यवसाय करणार्‍या पुरुषांनाही लागू होतात. वरील माहितीबरोबर तुमच्या पाहण्यात आलेल्या केसेस, आजार, उपचार, तुम्ही घेत असलेली काळजी इत्यादी गोष्टींवरील चर्चेचे स्वागतच आहे.

रेफरन्सेस:
http://www.cdc.gov/niosh/topics/women/
http://www.thehindu.com/news/national/karnataka/75-pc-of-working-women-h...
http://www.onepowerfulword.com/2010/10/18-benefits-of-deep-breathing-and...
http://www.mayoclinic.org/healthy-living/fitness/in-depth/exercise/art-2...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वजन वाढतंय तर घरातली कामे स्वतः करा हा सल्ला बहुतांश स्त्रियांना दिला जातो.
वरचे अमांचे पोस्ट अश्या सल्ल्यांना पोषक वाटले.

वजन वाढण्याची कारणे नॉन अ‍ॅक्टीव्ह लाइफस्टाइल याचबरोबर जंक फूड, हार्मोन्सचे बदल, ताण, पुरेशी झोप न मिळणे ही पण असू शकतातच.

घरून आणलेला डबा हा सुध्दा एक महत्त्वाचा घटक असतो. मला कौतुकाने सांगावेसे वाटते की माझ्या सर्व पुरूष सहकार्यांचे डबे पोळी भाजी, चटणी/कोशींबीर/लोणचे, कच्च्या भाज्या (काकडी टोमाटो, बीट, गाजर, कोबी) , काहीतरी चमचमीत (शेव फरसाण अळूवडी वगैरे), एखादा गोड पदार्थ, फळे यांनी नियमितपणे सजलेला असतो. त्यांचे डबे हे बायकांसाठी महत्त्वाचे काम असणार ही खात्रीच.मला त्यांचा हेवा वाटून गंमतीत मी म्हणतेदेखील, की मलाही तुमच्यासारखी बायको हवी! Lol नवरा माझा डबा भरून द्यायला घरातच नसणार तेव्हा माझे मलाच हे सर्व करणे जमवायचे आहे कारण ते आरोग्यपूर्ण आहे. पण यामुळे मी थोडेसे काम वाढवत आहे, हा सुपर वुमन सिंड्रोमकडे जाणारा प्रकार तर नव्हे?

त्यांच्या डब्यातले सर्व न्यूट्रियंटस असतील असा सोपा आणि तरीही हेल्दी पर्याय शोधता येऊ शकतो.
डबा निघायच्या आधीच भरला जायला हवा असे नाही. कच्च्या गोष्टी किंवा तत्समचे डबे हे २ तास आधी पण भरले जाऊ शकतात.

हो. आठला निघायचे तर रात्रीच फळं, चिरीमिरी भरून ठेवू शकतो. पण ते एक वाढीव काम आलंच, शिवाय आपण एकटेच चौरस आहार खाणार का? तर लगे हाथ इतरांसाठीही कॉपी पेस्ट करा. मग हे जास्त वेळखाऊ झालं की डेलिगेट करा, मग ओनरशिप द्या.. चिडचिड, ताण. दुष्टचक्र, दुष्टचक्र! त्यापेक्षा नको ते डबे, पोळी भाजी घ्या आणि सुटा. मग रिपोर्टात येणार अमूक व्हिटामिन कमी, तमूक मिनरल कमी.
हे एक उदाहरण किंवा केस स्टडी होईल या विषयावर, चर्चा भरकटवत नाहीये.

आशू, सगळ्यांचेच सॅलड/ फळांचे डबे एकाने भरायचे (चिराचिरीसकट) आणि पोळीभाजीचे डबे एकाने भरायचे असा पर्याय नाही का काढू शकत?
वेळ कमी पडत असेल तर ती मदत बाहेरून घेण्याविषयी गिल्ट ठेवू नये असं मला वाटतं.

मग हे जास्त वेळखाऊ झालं की डेलिगेट करा, मग ओनरशिप द्या.. चिडचिड, ताण. दुष्टचक्र, दुष्टचक्र!>> हा खूपच लोड घेतला जातोय असं मला वाटतं.
पुढची पोस्ट आस्वपूवर लिहिते Wink इथे विषयबदल नको.

जाऊदे आता हे फार पर्सनली स्पेसिफीक होतंय. उदा. सकाळी सातपासून आठ पर्यंत मला मदतीला कोणी नाही असं मानू. फळ्, भाज्या रात्रभर चिरून ठेवू नये हे मला माहीत असल्याने मी तसं करायला तयार नाही. मग माझ्याकडे आधीच असलेल्या आवश्यक कामांतून (उदा. बाळाला जरातरी वेळ देणे) मी या कामासाठी वेळ काढलाच, अगदी लवकर बिवकर उठून तर मी सुपर वुमन बनायला जातेय का? हा प्रश्न आहे. मी या धाग्यावरच्या माझ्या पहिल्या पोस्टीत हेच म्हणू पाहत होते, की ते काहीतरी बेस्टच हवं म्हणून नाही, तर किमान करायला हवं म्हणून केलं तरी दमणूक,.ताण येतोच.

>>>म्हणजे उदाहरणार्थ आठवडाभराची भाजी आणून द्यायची जबाबदारी नवरा घेईल पण ते कधी? तर लिस्ट करून दिल्यावर. कुठल्या दिवशी कुठली भाजी, तीच का? घरातल्या सगळ्यांना आवडत नसेल तर शिस्तीचे धडे की आवड राखणे? आवड राखायची असेल तर काय करायचे वगैरे वगैरे सगळं प्लॅनिंग बाईच्या डोक्यावर.
कामवाली बाई सोडून गेली तर नवीन शोधायचे, नव्या बाईला ट्रेनिंग द्यायचे, नवीन बाईशी बोली ठरवायचे हे सगळे बाईने करायचे. <<<

माझ्या घरात हे सर्व पूर्णपणे मी करतो व डेलिगेट न करावे लागता करतो. ह्याशिवाय बायकोचा डबाही काही वेळा भरून देतो व तो तसाच परीपूर्ण आहाराच्या व्याख्येनुसार! (फळे, सॅलड, पोळी, भाजी व एक बेव्हरेज).

म्हणून असे म्हणत नाही आहे की वरील उतारा मला पटला नाही. सर्वत्र तेच चित्र दिसत असेल जे वर कोट केलेल्या उतार्‍यात लिहिलेले आहे.

सकाळी तिघांसाठी एक काढाही तयार करतो मी! (हे फक्त आरोग्याबाबत खास स्टेप ह्या सदरात मोडणारे एक प्रकरण म्हणून लिहिले)

चर्चा वाचायला फार आवडत आहे. चर्चा भरकटत असल्याचे वेमांनी एका ठिकाणी लिहिलेले दिसले, पण चर्चा विषय निघतील तशी स्मूथली वाहत जात आहे असे वाटत आहे. कदाचित हा धागा एक मोठा उपयुक्त व वाचनीय धागा होईल. (आत्ताही आहेच)

कोणी आजारी असल्यास घरी थांबायच्या जबाबदारीबाबत आशूडींशी सहमत! आजकाल पुरुष सहज घरी थांबताना दिसत आहेत.

एकुणच, अनेक घरांमध्ये (एकदा किंवा एनकदा डेलिगेट केल्यामुळे किंवा स्वेच्छेने किंवा वारंवार करावे लागल्यामुळे संस्करणच तसे झाल्यामुळे) पुरुष आधीच्या पिढीतील पुरुषांपेक्षा बरीच अधिक घरकामे / संसाराशी निगडीत जबाबदार्‍या पेलताना मी तरी पाहत आहे.

कोल्हापूरला (सासुरवाडी) माझा एक मेहुणा असेच घरातील सगळे काही बघतो व एकदाही डेलिगेट करावे लागलेले नाही हे मला माहीत आहे. त्याची सौ. बराच वेळ ऑफीसमध्ये असते व त्याची नोकरी बर्‍यापैकी वेळ घरातून करता येण्यासारखी आहे म्हणून!

परिस्थिती (निदान शहरी मध्यमवर्गीयांमध्ये तरी) बर्‍यापैकी सुधारलेली असावी.

हा प्रतिसाद आत्ता (चर्चेच्या सध्याच्या टप्प्यावर) अचानक भलताच वाटल्यास दिलगीर आहे.

करेक्ट मयेकर. म्हणूनच 'भरा पोळी भाजी आणि सुटा' वर येऊन पोचते गाडी. पण हे बरोबर नाही याची बोच कुरतडत राहतेच. की लगेच लोक तुम्हाला गिल्ट आला, गिल्ट आला, मग कशाला करता नोकर्या!? विचारत सुटणार. Proud

हो तेच पुढे लिहिले आहे मी, की तुम्ही लिहिलेलेच सर्वत्र लागू होत असणार हे नक्की

अर्थात, मला मी जे घरकाम करतो ते आवडतंही, त्यामुळे त्यात मी काही फार करतो असेही वाटत नाही. इथे विषय दिसला म्हणून लिहिले इतकेच.

मी सूपरवूमन आहे का? असेन, तर का आहे?
नसेन, तर का नाही आणि कशी होईन?
- या विचारांमुळेच जास्त ताण येतोय का? Happy

ताणाचे कारण काही का असेना, त्याचा परिणाम शरीरावर होतो. तेव्हा योग्य वेळी योग्य त्या चाचण्या करून घ्या, औषधं घ्या, ताण कमी करायचा प्रयत्न करा आणि एक हेल्दी जीवन जगा. दुसर्‍याबरोबर कधीच तुलना करू नका. कीप इट सिम्पल- हे मला समजलेलं सार.

तर किमान करायला हवं म्हणून केलं तरी दमणूक,.ताण येतोच.>> जर काम ही तुझी कोअर अ‍ॅक्टिव्हिटी आहे तर तुला एक पर्सनल / डोमेस्टिक असिस्टंटची गरज आहे. वन मोअर रिसोर्स इज नीडेड. तर तसा तुला ठेवता येणे घराने मंजूर केले आहे का. असा निर्नय तू घेतलास तर त्याला सपोर्ट आहे का? का धडपडत तूच करावेस तेच तुझे इश्टकर्म -बायकांच्या जन्माला इत्यादि इत्यादि असे सांगितले जात आहे? घरच्या पूल्ड इन आर्थिक रिसोर्सेस मधून तुझ्या साठी एक असिस्टंटला पगार दिला जाउ शकतो हे इतर डोमेस्टिक टीम ला मान्य आहे का?

अतिश्रमाने तू आजारी पडलीस तर घराची/ बाळाची आबाळ होईल तर तुझे आरोग्य जपणे हे सर्वांच्याच हिताचे आहे असा विचार प्रवाह वाहतो आहे का? ह्याचा विचार व्हावा.

मेजॉरिटी बायकांचा/ मेनस्ट्रीम माइंडसेट जो आहे कि आलेल्या परिस्थितीला तोंड देणे. झगडणे, कसेही करून तारू किनार्‍याला लाव्णे इत्यादी तोच तपासून पाहायाची गरज आहे.

अमा, ते सगळे शक्य आहे. मुळात मी कुणाला काही विचारण्याची, परवानगीची गरजच नाही घरात. वर दिलेच की हे एक केस स्टडी म्हणून पाहा. तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरं माझ्या वरच्या पोस्टीत आहेत. उदा. वेळखाऊ वाडले तर डेलिगेट करणे, मग ते कुणालाहीअसू शकते.
मी सुपर वुमन आहे का नाही हा प्रश्न नाहीये, उठसूट 'नोकरदार स्त्रिया सुपरवुमन बनायला जातात' हा जो आरोप केला जातो तो प्रश्न आहे. यातून हेच दिसते ना की वरवर सहज शक्य वाटणार्या गोष्टी किती खोलवर जाऊन परिणाम करतात.

उठसूट 'नोकरदार स्त्रिया सुपरवुमन बनायला जातात' हा जो आरोप केला जातो तो प्रश्न आहे. यातून हेच दिसते ना की वरवर सहज शक्य वाटणार्या गोष्टी किती खोलवर जाऊन परिणाम करतात.>> ते १००% पटलेलेच आहे. प्रश्नच नाही. मी एक केस स्टडी म्हणूनच लिहीले आहे. घर बेअर मिनिमम चालते ठेवणेच किती स्ट्रेस फुल आहे हे घरातील इतरांनी समजून घ्यावे अशीच इच्छा आहे. मी उगीच टाइमपास म्हणूनही लिहीत नाहीये. मी आजारी पडले तर माझे घर बेअर मिनिमम पण चालणे फार अवघड आहे म्हणून मला ह्या बाफवर काय सोलुशने निघत आहेत त्यात फार इंट्रेस्ट आहे. नोकरदार स्त्रिया आजारी पडल्यावर कसे कोप करावे असाही एक बाफ काढायला हवा आहे.

डिस्क्लेमरः सिंपथी टूर नाही.

कामवाल्या बाया (मेड्स्), ऑफिस असिस्टंट म्हणून काम करणाऱ्या स्त्रिया (चपराशी), शारीरिक मेहनतीची व कष्टाची नोकरी करणाऱ्या अनेक स्त्रियांना तब्येतीच्या कोणत्याही तक्रारीसाठी 'सुई टोचून' घ्यायची व पुन्हा कामावर रूजू व्हायचे या चक्रातून जाताना पाहिलं आहे. तब्येतीची तक्रार असली तरी कुपोषण, काबाडकष्ट, उपासतापास संपत नाहीत. उभं राहून करायची ड्यूटी असते, पाय सुजतात, गुडघ्यांवर ताण येतो, स्वच्छतागृहाचा अभाव असेल तर तो ब्रेकही घेता येत नाही. वेळेवर जेवणखाण नसते. खाल्ले तर वडापाव, चहा खारी यांसारखे अन्न. किंवा आदल्या दिवशीचे अन्न डब्यातून आणलेले. असा एक खूप मोठा नोकरदार महिला वर्ग आपल्या आजूबाजूला महानगरांमध्ये वावरत आहे. तो सुशिक्षितही नाही व अशिक्षितही नाही. अर्धशिक्षित म्हणू, हवंतर. पाचवी - सातवी - आठवी पास झाल्यावर पोटासाठी किंवा परिस्थितीमुळे लहान मोठी कामे स्वीकारून उदरनिर्वाह करणारा. या स्त्रियांनाही व्यवसायानुरूप व जीवनशैलीनुरूप तब्येतीच्या तक्रारी उद्भवतातच. सरकारी दवाखान्यात किंवा सवलतीच्या दरात होणारे उपचार तेवढ्यापुरते करून घेताना दिसतात. परंतु स्वत:च्या आरोग्याची काळजी घेणे तसे कमीच दिसते.

छान आणि उपयुक्त चर्चा चालू आहे. आजारांची लिस्ट बरीच मोठी आहे Sad
घरकाम सोडून जरा दुसर्या विषयांवर गाडी वळवते:
बरेचदा भारताबाहेर असल्याने दात दुखी, सांधे दुखी यांवर भारतीय डॉ. चा सल्ला घ्यायची इच्छा असल्याने ताटकळत राहावे लागते... यावर काय उपाय असावा?

मुल आजारी असताना, बहुतेक वेळा नवरा घरी थांबतो, कारण तो वर्क फ्रॉम होम करू शकतो.. पण जेंव्हा मुल आजारी असेल तेंव्हा आपण जर त्याच्या शेजारी झोपलो तर आपल्यालाही जंतू संसर्ग होऊ शकतो, (आणि मग आपलेही ऑफिसचे खाडे सुरू Sad )पण आजारी बाळाला वेगळे पण झोपऊ शकत नाही. अशा वेळेस करावे काय?

नवरा/बायको पैकी कूणी आजारी असल्यास त्याने/तीने वेगळ्या खोलीत झोपावे हे तर अध्याऋत आहेच्..म्हणजे इन्फेक्शन ची भिती इतरांना नाहि.

इथे ही चर्चाही वाचायला आवडेल -
१. सततच्या उभ्या / बैठ्या / खूप प्रवास / धावपळ करायला लागणाऱ्या नोकरी-व्यवसायात स्त्रियांना ठराविक काळानंतर किंवा वयानंतर कोणत्या स्पेसिफिक आरोग्य समस्या सतावू शकतात? नियमित आरोग्य तपासणीमुळे या समस्यांवर उपाय शोधण्यास कोणत्या प्रकारची मदत होते?

२. निवृत्तीनंतरही स्वास्थ्यपूर्ण आयुष्य जगता यावे यासाठी स्त्रिया स्वत:च्या आरोग्याचे नियोजन कशा प्रकारे करू शकतात? कोणत्या टप्प्यांना सर्वाधिक सावधानता बाळगावी?

३. कुटुंबसदस्य घरातील स्त्रियांच्या स्वास्थ्यासाठी कोणते प्रयत्न घेऊ शकतात?

४. एम्प्लॉयर म्हणून हाताखालील स्त्री कर्मचाऱ्यांना किंवा सोबत काम करणाऱ्या स्त्री सहकाऱ्यांना स्वत:च्या आरोग्याबद्दल दक्ष कसे करता येईल?

१२० इंडस्ट्रींचा विचार करण्यापेक्षा आपण सध्या इथल्या वाचकांची जी कक्षा आहे त्याचा विचार करू ते फायद्याचं ठरेल. >>
ह्याही अनुषंगानं विचार करतानाही खूप सार्‍या इंडस्ट्रीजचा विचर करावा लागेल.
उदा. माझे आई-वडिल शिक्षक होते आणि दिवसातले आठ तास उभे राहून, बोलून आणि त्याही पेक्षा डेंजरस म्हणजे खडूचे पार्टीकल्स ३० वर्ष इनहेल करणे ह्याचा त्रास त्यांना झालेला मी पाहिला आहे. घसा धरण्याचं, सर्दी-खोकल्याचं प्रमाण जास्त असू शकतं अशा केसेस मधे.
बाबांच्या दुसर्‍या प्रोफेशनमधे नाटकाचे दौरे/शूटींग असलेल्या गावी बदलेलं पिण्याचं पाणी, वेळी अवेळी केलेला प्रवास आणि खाणे, आणि जागरण - याचे पोट नाजूक होणे, अ‍ॅसीडीटी असे परिणाम आहेत.
खुद्द माझ्या प्रोफेशनमधे सांगायचं झालं - स्ट्राँग केमिकल्स बरोबर काम करून २००५ -३२००६ पासून हळूहळू माझी 'वास घेण्याची क्षमता' कमी होत होत आता 'गंध' हा सेन्संच माझ्या आयुष्यातून पूर्ण निघून गेलाय. मला कोड आलेली स्कीन (ह्याचा वास तुम्हा नॉर्मल गंध क्षमता असणार्यांना येणार नाही) सोडता कोणतेही सुगंध- दुर्गंध समजत नाहीत.
यातले काही आजार टाळण्यासारखे असले तरी काही नाही टाळता येत.

आणि परत लिहिते, हे आजार बर्‍यच प्रमाणात स्री-पुरुषांना सारखेच आहेत.
फक्त जिथे 'हार्मोन्स वर काम केलं जातं/ किंवा व्हिटॅमिन्स पॅकींग इंडस्ट्री' तिथे स्पेसिफीक जेंडरचे लोक त्या त्या हार्मोन प्रमाणे कामाला घेतात - कारण हार्मोनची डस्ट उडून शरीरातल्या हार्मोन्सचं प्रमाण बदलण्याच्या धोका असतो/ आणि अशा केसेस घडतात.

ज्यांचे टूल मेकींगचे व्यवसाय आहेत, प्रीटींगचे व्ययसाय आहेत, हातमाग फॅक्टरी आहेत त्यांचे देखील त्या त्या व्यवसायाप्रमाणे आयोग्यविषयक धोके आहेत - ज्याला त्या त्या व्यवसायाप्रमाणे उपाय करायला हवेत.

रार, हो, माझ्या आईला प्रोफेसरकीमुळे 'टीचर्स थ्रोट'चा त्रास, तर वडीलांना वर्षानुवर्षे मैलोन् मैल शेतजमीनी, ढेकळे तुडवल्यामुळे व आता निवृत्तीनंतर तेवढे चालणे न उरल्यामुळे उद्भवणारे त्रास आहेत. वस्तुस्थिती ही आहे की आजही घरातल्या पुरूषाचे औषधपाणी, पथ्य, आहार, वेळा, पोषक आहार वगैरे सांभाळायला कोणीतरी असते (सामान्यीकरणाचा धोका पत्करून केलेले विधान). परंतु तेच स्त्रीच्या बाबतीत दिसत नाही, हाच कळीचा व काळजीचा मुद्दा डोके वर काढतो.

अकु, बरोबर आहे तुझं. आणि ह्या मुद्याश्या तळाशी समाजाचं कंडीशनींग आणि त्याच बरोबर स्वतः स्त्रीची मानसिकता आहे.
वर चौफेर आहाराचा मुद्दा आहे - कदाचित ह्या बीबीचा हा मुद्दा नाही म्हणून लिहिलं नव्हतं... पण खरंच रोजचं प्रत्येक जेवण 'चौफेर' असावं का ओव्हरऑल आठवड्यात सर्व प्रकारचं अन्न खाल्लं जावं ह्यावर देखील विचार व्हायला हवा..
हे सगळं आपण शरीराला, आणि जिभेला सवयी लावू त्यावर आहे. रोजच्या प्रत्येक जेवणात २ भाज्या, १ उसळ, कोशींबीर, भात, पोळी, गोड ह्या सगळ्याची गरज खरंच नसते. आणि इथे काम्/ स्ट्रेस कमी करता येऊ शकतो
(अस्थानी असेल तर डीलीट करीन. लिहावं की नाही हा विचार मीच ४ वेळा केलाय :))

'टीचर्स थ्रोट'चा त्रास >> नीति मोहन वगैरे कशा तोंडासमोर माईक लावून शोज मध्ये नाचत अस्तात. अशा प्रकारचे माईक शाळेत त्या मायक्रोफोन कंपन्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबीलीटी म्हणून का नाही देत? कुणीतरी मागायला हवे, म्हणजे मिळेल.

खडूचे फळे सोडून व्हाईट बोर्डही वापरता येतील. त्याच्या पेन्सचा खर्च खडूपेक्षा जास्त आहे पण टीचर आजारी पडली तर होणार्‍या नुकसानापेक्षा तो स्वस्त आहे. मोप फिया घेतात, त्यात अजून एक-दोन हजार घ्या पण टीचर सांभाळा.

अनेकांनी अनेक वेगवेगळ्या मुद्द्याला स्पर्श केलाय त्यामुळे नवीन लिहायला काही नाही. चर्चा आवडली.

वर चर्चा केल्या गेलेल्या एका अशा मुद्द्याला स्पर्श करत आहे जो झाडुन सर्वांच्या आयुष्यात असतोच. 'पोषक आहार'.
रारला, "रोजचं प्रत्येक जेवण 'चौफेर' असावं का ओव्हरऑल आठवड्यात सर्व प्रकारचं अन्न खाल्लं जावं ह्यावर देखील विचार व्हायला हवा.." याकरता अनेकवेळा अनुमोदन. आशुडीने साधारण असेच लिहिले आहे.

सध्या नोकरी करत नाही पण विचार केला तेव्हा लक्षात आले की नोकरी करत असते तरी व सध्यादेखील सर्वात जास्त 'सर्व कुटुंबाला किमान ८५% टक्केवेळा चौफेर पोषक आहार कसा देता येईल" या विचारातच जास्त वेळ जातोय मेला.
याची २ कारणे,
१. आजार नैसर्गिक पद्धतीने दुर ठेवायचे प्रयत्न.
२.आमची वाढणारी वये, त्यामुळे वयानुसार येणार्‍या आजारांनी इतक्यातच हॅलो म्हणु नये म्हणुन पत्करलेला सर्वात सोपा मार्ग म्हणजे 'पोषक आहार'. तसेच कन्या वाढत्या वयात म्हणजे तिलाही पोषकच खाणे हवे. व व्यायाम अर्थातच.

दरवेळी अगदी पोळी,भाजी, आमटी,कोशिंबीर जेवणात असतेच असे नाही पण वन्डीश मील मधे सर्व घटक यावेत असा प्रयत्न केला जातोच. त्यात आम्ही उत्तम जेवण बनवणारे नाही वा भरपुर पदार्थ बनवायला येणार्‍यातले नाही. मग अजुन ताण.

बाकी इतर गोष्टीत जास्त ताण न घेता रहाटगाड्गं चालु आहे.

कृपया खरच कोणीतरी पोषक आहार कसा विभागावा याबद्दल लेख लिहा. जवळजवळ सर्वांनाच उपयोग होईल.

व्यवसायाप्रमाणे आजार, कष्टकरी बायांचे आजार हे गंभीर मुद्दे आहेत.

आमच्या इथे मॅन्युफॅक्चरींग इंडस्ट्री. साहाजिकच फ्लोअरवर काम आणि तेही शिफ्टमधे. या शिफ्ट रोटेटिंग नसतात मात्र ग्रेवयार्ड शिफ्ट असेल तर एकंदरीतच शरीराच्या नैसर्गिक तालाशी प्रतिकूल असे सगळे होते. याचा तब्येतीवर परीणाम होतो. बरेचदा चाईल्ड केअरचा खर्च वाचवण्यासाठी पार्टनर्स वेगवेगळ्या शिफ्ट्समधे काम करतात. त्यातून बरेचदा नात्यात तणाव आणि त्याचा तब्येतीवर परीणाम होतो.

चर्चा जरी विषयापासून थोडी बाजूला गेली असली तरी छान सुरु आहे. बरेच उपयुक्त मुद्दे आले आहेत. Happy

रार, 'द हिंदू' चा सर्वे सर्वव्यवसाय्/नोकरीसमानेशक नव्हता. ह्या सर्वेमध्ये ११ सेक्टर्स मधल्या १२० कंपन्यांमधल्या २८०० स्त्रियांचा समावेश होता. ११ सेक्टर्स म्हटलं तर तसं बर्‍यापैकी लिमिटेड होतं, कारण हे झालं फक्त नोकरदार स्त्रियांचं. व्यवसाय विविध असू शकतात आणि त्याचा ह्यात समावेश नाही आहे. पण मूळ मुद्दा हा काम करणार्‍या स्त्रियांना येणार्‍या शारीरिक आणि मानासिक ताणाचा होता, आणि हे एक तेंव्हा मिळालेलं सँपलींग होतं. ह्यातला अनेक प्रकारच्या ताणातून (किंवा वेगळा) होममेकर स्त्रियांनाही जावे लागते हे आलेच.

अकुने जे ४ मुद्द्यांवर चर्चा ऐकायला आवडेल हे लिहिले आहे ते ही फार महत्वाचे आहेत. व्यवसायानुरुप होणारे आजार वेगवेगळे आहेत. जसं वर शिक्षकी पेशाबद्दल लिहिलंय तसंच सतत बैठं काम करायला लागणारे प्रोफेशन, कॉल सेंटर सारखे रात्रभर काम करायला लागणारे प्रोफेशन, फिरतीचे व्यवसाय, शिफ्ट्समध्ये काम, केमिकल फॅक्टरीत काम इत्यादी सर्वांच्या तक्रारी वेगवेगळ्या असणार. त्याबद्दल मलाही वाचायला आवडेल. वर लेखात आलेले मुद्दे हे साधारणतः बैठे, काँप्युटर समोर बसून काम करणार्‍या स्त्रियांना जास्त लागू होतात.

संपदाच्या बाफवर चाचण्यांबद्दल जास्त डिटेलमध्ये आहेच पण वयानुसार साधारणतः तिशी नंतर पॅपस्मिअर, चाळीशीनंतर मॅमोग्राम, वार्षिक चाचण्या (हिमोग्लोबिन, आयर्न, व्हिटॅमिन बी/डी) हे सर्वच स्त्रियांनी केले पाहिजे. आहार, व्यायाम, पुरेशी झोप आणि नियमित चाचण्या हे अगदी आयडीयल चित्र झालं पण बिझी, डिमांडींग आयुष्यातून ह्या गोष्टी कशा साध्या करता येतील ही चर्चा आवडेल. माझ्या ऑफिसमध्ये 'हेल्थ इनिशिएटिव्ह' अंतर्गत एक लेक्चर झालं होतं (ते झाल्यावरच मी हा लेख जुन्या संयुक्तामध्ये टाकला होता). डेस्कवर बसल्या बसल्या करता येण्यासारखे व्यायाम, श्वसनाचे प्रकार, जेवणखाण, स्नॅक्स ह्यांच्या सवयी, बाकी अ‍ॅक्टिव्हिटी, एक्सरसाईज ह्याबद्दल बर्‍याच टिप्स दिल्या होत्या. त्यामुळे लेखात मुख्यत्वे ते आले आहे. परंतु ह्या विषयाशी रिलेटेड सर्व प्रकारच्या चर्चेचे स्वागतच आहे!

चौरस, पोषक आहार, सगळी जीवनसत्त्वे मिळणे हे रोज न बघता दर आठवड्याला वगैरे बघा असे पुष्कळदा वाचलेले आहे. विशेषतः लहान मुलांसाठी. दिवसाला भाज्या, फळे इत्यादीचे ५ पोर्शन (फाइव अ डे) मिळतील इतकेच सध्या बघते. एक / दोन फळे, दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातली भाजी आणि सॅलड एव्हढ्यात ते सहज जमते. + दाणे (नट्स), सुकामेवा वगैरे.

दुसरे महत्त्वाचे म्हणजे पुरेशी झोप.

रारच्या पोस्ट्स आवडल्या, पटताहेत. सग्ळ्यांचेच इनपुट्स चांगले आहेत. अजय यांनी प्रामाणिक अनुभव मांडल्याबद्दल कौतुक.

माझे दोन पैसे..जे कदाचित माझ्या बाबतीत लागु असेल. कामाचं स्वरूप, तुमच्या इतर कौटुंबिक जबाबदार्^या याप्रमाणे सरसकट लागु होणार नाही पण मी माझ्याबाबतीत मुख्य मुलं झाल्यानंतर रामरगाडा वाढला म्हणून आधी बर्^याच व्यापातून गेले आणि मग अनुभवातून हे स्वत:ला सांगितलं की सगळीकडे सारखं सारखं स्वतःला सिद्ध केलं पाहिजे किंवा स्पष्टीकरणं देत राहिलं पाहिजे हे सगळ्यात पहिले बंद करायला हवं. थोडक्यात परफॉर्मन्स अप्रेजलमध्ये कसे १५-२० मुद्दे असतात सगळीकडेच आपल्याला मीट किंवा एक्सिड एक्सपेक्टेशन मध्ये असायलाच हवं का? त्यासाठी जीवाचं रान, तब्य्तेतीची नासाडी होणार असेल तर थोडं मागे राहिलं तर काही हरकत नाही. इथे लक्षात घ्या मागे ची प्रत्येकाची व्याख्या वेगळी. माझ्यासाठी मी माझी नोकरी सुरुवातीला सोडून मग घरून काम (पगारात कट घेऊन) मग नोकरी जायचं कायमचा ताण (जो अजूनही असतोच. आय टी काही पर्याय नाही देत कधीकधी) या सगळ्या बदलातून जाताना प्रत्येक वेळच्या अनुभवातून शिकत गेले. अजुनही शिकतेच आहे. एकंदरित गुणाकारात आपली प्रगती होतेय ना? भले त्याची पेस आता थोडी कमी असेल?त्याचा आनंद घ्यायला शिकतेय. माझ्याबरोबर ज्यांनी जॉब्ज सुरू केले ते कुठेत मी कुठे वगैरे तुलना कधीतरी मनात केली असेल पण आता त्याकडे लक्षही दिलं जात नाही.

आपण आपल्या प्राप्त परिस्थितीत आणि असलेल्या पर्यायात आपल्याला झेपणार्ञा गोष्टी कराव्यात हे अंगात मुरतंय आणि मुरेल त्यामुळे ताण कमी होतोय. मग जमतील ते छोटे छोटे स्ट्रेसबस्टर्स अ‍ॅड केले अगदी एखादा जुना छंद पुन्हा थोड्या प्रमाणावर सुरू करणे, मुलांचा स्क्रिन टाइम कमी करताना स्वतःचा गमावला होता तो जमेल तेव्हा वाढवणे, शोधून गाणी ऐकणे वगैरे वगैरे.
दुसरं म्हणजे ज्या व्यक्तींबरोबर काही प्रश्नांची चर्चा करून मार्ग शोधता येईल तिथे ओपन कम्युनिकेशन. यात नवरा आणि बॉस दोघं आले. मग माझा व्यायाम ही माझ्यासाठीची महत्वाची गोष्ट आहे म्हणून तिथे काटछाट नको हेही केलं. सुदैवाने गेले काही वर्षे हापिसात जिमवाल्या नोकर्ञा असल्याने ते करता येतं. मुलांसाठी अर्धा तासाच ब्रेक कमी केला तरी उरलेला अर्धा ब्रेक जिममध्ये आणि लंच डेस्कला करते. मग विकेंडला लवकर उठून व्यायाम, योग जमेल तसं करतेय. विकेंडला मुलांच्या एका अ‍ॅक्टिविटीमध्ये नवर्^याचा व्यायाम पण होतो. मी स्पोर्ट्समध्ये नाहीये त्यामुळे मला व्यायामासाठीचा व्यायाम करावा लागतो

आहार संध्याकाळी चौरस असावा याचा प्रयत्न असतो. सकाळी बाहेरचे हेल्दी ऑपश्न्स किंवा विकेंडला थोडी तयारी करून खाता येतील असे पर्याय ठेवतो. मला वाटतं पुर्वी जेव्हा मला जास्त प्रकृतीच्या तक्रारी नव्हत्या तेव्हा हेल्दी ऑपश्न्स याकडे इतकं लक्ष नसायचं. पण एकदा स्वतःच कुठल्या अनुभवातून गेलं की आपले आपण शिकतो असं म्हणतात तस आमचं दोघांचही झालं. त्यातून खरं तर चांगलं खायचे चांगले पर्याय आहेत हे लक्षात आलं. आजकाल जमेल तितके ऑरगॅनिक ऑपश्न्स वाढवतोय. प्रत्य्के विकेंडला सगळंच नाही करत बसत. कामाची विभागणी आहे आणि माझ्या सुदैवाने आमचं सध्यातरी त्यात बरंच बरं सुरू असतं. तो सिद्ध करायचा अट्टाहास सोडल्यामुळे काही नसलं तर नाही बाबा जमलं आजे हे सोडा. दुसरा पर्याय शोधा याने बरं पडतं.
आहाराविषयी वेगळाच धागा असायल हरकत नाही.

सिद्ध करायचा अट्टाहास सोडल्यामुळे काही नसलं तर नाही बाबा जमलं आजे हे सोडा. दुसरा पर्याय शोधा याने बरं पडतं.>> पर्फेक्ट! मस्त लिहिलं आहेस वेका.

अनेक नोकरदार स्त्रियांना (भारतातील) नोकरीच्या ठिकाणी व परिसरात स्वच्छतागृहासारख्या मूलभूत व स्वच्छ सुविधा नसल्यामुळेही तब्येतीच्या तक्रारी उद्भवतात. माझ्या माहितीतल्या काही नोकरदार बायका हापिसच्या 'रेस्ट रूम' स्वच्छ नसल्यामुळे बाथरूम ब्रेक घेणे टाळतात, पर्यायाने दिवसभरात खूपच कमी पाणी पितात. किडनी स्टोनचा त्रास व तब्येतीच्या इतर तक्रारी सोबत येतातच. यावर सुचणारा उपाय म्हणजे व्यवस्थापनावर दबाव आणून स्वच्छ रेस्ट रूमची मागणी लावून धरणे. गरोदर स्त्रिया, मेनापॉज वयातील स्त्रियांना हा त्रास तर जास्तच जाणवतो.

Pages