नोकरदार स्त्रिया: आजार आणि सामना

Submitted by मो on 10 February, 2015 - 09:47

गेल्या ५० वर्षात जगभरातील प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये नोकरदार किंवा व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लग्नापूर्वी शिक्षण पूर्ण करुन स्वावलंबी होण्याकडे अनेक मुलींचा कल दिसून येतो. नोकरी व्यवसायात बस्तान बसेपर्यंत आपत्यप्राप्ती लांबवणे किंवा '१ या २ ऐवजी' १ बस कडे कल झुकणे ह्या गोष्टीही आजकाल काही प्रमाणात पाहण्यात येत आहेत. बर्‍याचजणी मूल झाल्यावरही नोकरी/व्यवसाय करत राहण्याला प्राधान्य देत आहेत. हे चित्र कमी अधिक प्रमाणात जगभरातील आहे. 'घर चालवणे' ह्याबरोबरच बाहेर पडून घराबाहेर काम करणे ही जबाबदारी जरी बर्‍याच स्त्रिया घेत असल्या तरी हे सर्व करताना त्या नोकरी, मुलांचे संगोपन, घरकाम आणि नातेसंबंध/कार्यक्रम आणि ह्या सर्व पातळ्यांवर लढताना दिसून येतात. घर आणि नोकरी/व्यवसाय ही कसरत साधताना अनेक स्त्रियांवर अतिरिक्त ताण येतो. अजूनही भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाक, घरकाम आणि मुलांचे, घरातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन ही जबाबदारी मुख्यत्वे स्त्री पार पाडते. बर्‍याचदा घर आणि नोकरी-व्यवसायातील ताण आणि जबाबदार्‍या ह्याची परिणिती ही ह्या स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आजारपणात होते.

'द हिंदू' ह्या वर्तमानपत्राने मार्च २०१४ मध्ये विविध शहरांमधील १२० निरनिराळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या २८०० स्त्रियांचे सर्वेक्षण केला. त्यात असे पाहण्यात आले की भारतातील ७५% कामकरी स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार आहेत. ह्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करणार्‍या स्त्रियांची मुलाखती घेतल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे बर्‍याच जणी आपल्याला असणार्‍या ह्या आजाराबद्दल अनभिज्ञ किंवा डिनायल मध्ये आढळल्या. डॉक्टरकडे जाणे किंवा ह्यावर काही उपचार घेणे ह्यापेक्षा वेळ मारुन नेणे, अंगावर काढणे किंवा घरगुती उपायांवर अधिक जणी भर देतात हेही आढळले.

नोकरदार स्त्रियांमध्ये मुख्यत्वे खालील आजार आढळले -
१. ताण
२. निरुत्साह (फटीग)
३. डिप्रेशन
४. डोकेदुखी
५. मळमळ, भुकेचा अभाव
६. झोप न येणे
७. हायपर टेन्शन, कोलेस्ट्रेरॉल
८. स्थुलता
९. पाठदुखी
१०. अनियमित मासिक पाळी
११. इन्फर्टीलिटी

** हे आजार नोकरी व्यवसायानिमिताने डबल ड्युटी करणार्‍या स्त्रियांमध्ये जास्त पाहण्यात आले, पण ते इतरही अनेक स्त्रियांमध्ये आढळतात. त्यामुळे जरी हा लेख नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वरील समस्यांना तोंड देणार्‍या स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेत असला तरी खाली चर्चिले गेलेले उपाय हे सर्वच स्त्रियांना उपायकारी ठरतील.

घर, नोकरी ह्याबरोबर येणारे ताणतणाव आणि वरील समस्यांचा सामना करायचा कसा? सर्वप्रथम आपण आजारी आहोत हे मान्य करा आणि दुर्लक्ष करणे/अंगावर काढणे बंद करा. आधी साधी वाटणारी पाठदुखी, फक्त दुर्लक्ष केल्यामुळे क्रॉनिक पाठदुखी होऊन वेळ आणि पैसे दोन्हीचाही अपव्यय करु शकते. सतत ताणाखाली राहणे, झोप व्यवस्थित न मिळणे, व्यायामाचा आभाव ह्याची परिणिती अनियमित पाळी, मधुमेह, हायपर टेन्शन, स्थुलता इत्यादी मध्ये होऊ शकते. एक्ट्रीम केस मध्ये ती प्रजनन संस्थेवरही परिणाम करु शकते.

स्वतःकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करु शकता ती म्हणजे व्यायाम. कोणत्याही प्रकारे दिवसातला अर्धा तास तुम्ही एखादा शारीरिक व्यायामप्रकार (चालणे/पळणे/पोहणे/जिम/योगसनं/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम) केला तर अर्धं युद्ध तिथेच जिंकलात समजा. व्यायामाची गरज आणि फायदे मायबोलीवर बरेचदा सविस्तर चर्चिले गेले आहेत. पण व्यायामाचे अतिशय मुलभूत फायदे सांगायचे म्हटले तर वजन आटोक्यात ठेवणे, इम्युनिटी वाढवणे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा करणे इत्यादी. अगदी सुरुवातीच्या स्टेजेस मधला मधुमेह, हायपर टेन्शन, कोलेस्टेरॉल तुम्ही फक्त व्यायामानेही नियंत्रित ठेवू शकता.

ऑफिसमध्ये कितीही जास्त काम असलं तरी दर तासाला पाय मोकळे करुन येत जा. खुर्ची वर बसल्या बसल्या मानेचे, खांद्याचे व्यायाम करत जा. अधून मधून उठून स्ट्रेचींग करत जा. सतत एकाच ठि़काणी बसून राहिल्याने सर्व स्नायूंवर ताण येतो, तो ताण अगदी एका मिनिटाच्या व्यायामानेही जाऊ शकतो. काँप्युटरवर काम करणार्‍यांची सगळ्यात मोठी तक्रार असते ती पाठदुखी, खांदेदुखी आणि डोळेदुखीची! तासाभराने, किंवा जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा खांदे, मान, कंबर, डोळे गोलाकार फिरवून तो ताण घालवत जा. सर्वांसमोर करायला संकोच वाटत असेल तर तुम्ही बाथरुम मध्ये जाऊन हे उभ्याचे व्यायाम करु शकता. ऑफिसला खिडकी असेल तर नजर जेवढी दूरवर नेता येईल तेवढी दूर नेऊन तिथे टक लावून पाहत राहिल्याने सतत काँप्युटरकडे किंवा नजीकच्या वस्तू बघितल्यामुळे येणारा ताण चटकन कमी होतो. डोळ्यावर थंड पाण्याचा हबके मारा. माऊस आणि किबोर्डच्या सतत मुळे हातावर/बोटांवर येणारा ताण घालवण्याकरता वेळ मिळाला की बोटे झटकणे, मुठीची उघडझाप करणे आणि मनगटे गोलाकार फिरवणे हे व्यायाम करा. ह्या सर्व २-५ मिनिटात करता येण्यासारख्या व्यायामांमुळे ताणल्या गेलेल्या स्नायुंना ताबडतोब आराम वाटतो.

तुम्ही जर फिरतीचे काम किंवा फिल्डवर्क करत असाल तर उन्हात फिरताना टोपी/स्कार्फ/छत्री, गॉगल, पाण्याची बाटली, जमल्यास सनस्क्रीन हे नेहेमी बरोबर ठेवा. अतीश्रमामुळे, व्यवस्थित हायड्रेटेड न राहिल्यामुळे चक्कर येऊ शकते, अश्या वेळी ही पाण्याची बाटली फार महत्त्वाची! अतीश्रमामुळे झोप न येण्यास त्रास होऊ शकतो. खूप वेळ उभे राहण्याचे काम असेल तर जमत असल्यास थोड्या वेळाने बसत जा. बैठे काम करणार्‍यांप्रमाणेच बाहेर काम करणार्‍यांनाही स्ट्रेचिंगची आवश्यकता असते. त्यामुळे वर सांगितलेले व्यायाम त्यांनाही लागू होतात.

बैठं ऑफिसमधलं काम असो वा फिरतीचं जास्त श्रमाचं काम, दोन्हीही कामांमध्ये स्ट्रेस असू शकतो. अश्यावेळी अधून मधून दीर्घ श्वसन, प्राणायाम हे फार फायद्याचे ठरते. दर अर्ध्या तासाने ५ दीर्घ श्वासोच्छवास करणे ही स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे. अतिशय सोपा आणि अतिशय गुणकारी असा हा स्ट्रेसबस्टर आहे. असं म्हणतात की आपल्या शरीरातील ७०% टॉक्सिन्स हे श्वसनामधून बाहेर पडतात. जर तुम्ही योग्य प्रकारे श्वासोच्छवास करत नसाल तर तुम्ही तुमच्या तुमच्या शरिरातील टॉक्सिन्स योग्यप्रकारे/पूर्णपणे बाहेर काढत नाही आहात. शरीरातील ताण कमी करणे, विचारांना अधिक क्लॅरिटी आणणे, प्रतिकारशक्ती वाढवणे इत्यादी आणि इतर अनेक फायदे दीर्घ श्वसनाने मिळतात. मुख्य म्हणजे रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि कार्बन डायॉक्साईड काढणे हे दीर्घश्वसनाने अधिक चांगल्या प्रकारे साधले जाते. दीर्घ, हळू श्वसन करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी सवय लावा. जेंव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप एकाग्र होऊन किंवा ताणाखाली काम करता तेंव्हा छोटे छोटे श्वास घेतले जातात, अश्यावेळी लक्षात ठेवून दीर्घ श्वसन करायला शिका.

जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि कितीही काम असले तरी वेळेवर जेवण करत जा. जेवल्यावर लगेच बसण्यापेक्षा ५-१० मिनिटाची फेरी मारुन या. तसेच दर तासाला उठून पाय मोकळे करत चला. दुपारचे जेवण जास्त घेण्यापेक्षा, एक छोटे लंच घेऊन थोड्या थोड्या वेळाने छोटे सकस स्नॅक्स्/फळे खात चला.

आजकाल बर्‍याचदा नीट घडी बसेपर्यंत मूल नको असा नवरा बायकोचा एकत्रित निर्णय असतो. नोकरी व्यवसायात ताण तणाव असतात, व्यायाम करायला वेळ नसतो, अश्या वेळेला बर्‍याचदा ह्याचा परिणाम स्त्रीच्या मासिक पाळीवर, प्रजनन संस्थेवर होऊ शकतो. स्ट्रेस, व्यायामाचा आभाव आणि त्याच बरोबर अनियमित जीवनशैली ह्यामुळे PCOS (पॉलीसिस्टीक ओव्हेरिअन सिंड्रोम), हार्मोनल इम्बॅलन्स इत्यादी आजारांचा बर्‍याच जणींना सामना करावा लागतो. त्यामुळे नियमितपणे चेकअप करुन घेणे, कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करुन घेणे हे महत्त्वाचे ठरते. बर्‍याच ऑफिसेसमधून वार्षिक तपासणी होत असते, त्याचाही जरुर लाभ घेत जा.

कुठल्याही नोकरी व्यवसायात कमी अधिक प्रमाणात राजकारण पाहण्यात येते. अनेकदा तुम्ही त्याचा भाग बनू शकता, त्याचा अतीव स्ट्रेस येऊ शकतो, इतका की ह्या राजकारणापायी डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि त्यामुळे नोकरीला तिलांजली दिलेल्या महिला पाहण्यात येतात. ऑफिसातलं राजकारण कसं टाळणं हा ह्या लेखाचा विषय नाही परंतू ते घरी आपल्याबरोबर घेऊन येऊन त्याचा आपल्याला पदोपदी त्रास न होऊ देणं बर्‍याच अंशी आपल्या हातात असू शकतं. असं म्हणतात छंद हा जगातला सर्वात उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. सुटीच्या दिवशी (शक्य असल्यास प्रत्येक दिवशी) स्वत:करता थोडासा का होईना, वेळ काढा. आवडत्या पुस्तकाची ४ पानं वाचा, चांगलं संगीत ऐका, मैत्रिणीशी गप्पा मारा, शॉपिंगला जा. अशी एखादी गोष्ट करा ज्यात तुम्हाला पूर्ण आनंद मिळतो आणि तेवढा वेळ तुम्ही सगळे ताण तणाव विसरुन जाता. तुमच्याकरता फक्त तुम्हीच वेळ काढून शकता हे नेहेमी लक्षात ठेवा. घरातल्या कामांची विभागणी करा. जमेल तिथे घरच्यांबरोबर कामे वाटून घ्या. घरच्या आणि बाहेरच्या जबाबदार्‍या पार पाडताना आपण तब्येतीची हेळसांड करत नाही आहोत ना हे तपासून पाहत चला.

जरी वरील शारीरिक/मानसिक तक्रारी खर्‍या असल्या तरी ह्याची एक दुसरीही बाजू पाहण्यात आली आहे. कधी कधी दिवसातले ७-८ तास घराबाहेर असणं हे काही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकरता लाभदायी ही ठरु शकतं. नुकत्याच NPR वाहिनीने घेतलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की अनेक स्त्रियांनी ऑफिसला जाणं हेच एक स्ट्रेसबस्टर, स्वत:करता असलेला दिवसातला वेळ आहे असं सांगितलं. वर्क-लाईफ बॅलन्स महत्वाचा! तुम्हाला हा बॅलन्स साधता आला तर उत्तमच. नोकरी/व्यवसाय आपल्याकरता, आपण नोकरीकरता नाही हे लक्षात ठेवा. स्वत:ची शारीरिक/मानसिक काळजी घ्या, आणि ही डबलड्युटी यशस्वी रितीने पार पडणार ह्याची खात्री ठेवा.

----

वरील लेख हा नोकरी व्यवसायातील स्त्रियांमध्ये मुख्यत्वाने पाहिले जाणारे आजार आणि त्यांचा सामना ह्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न आहे. परंतु, इथे उल्लेख केलेल्या बर्‍याच गोष्टी फक्त स्त्रियाच नव्हे तर नोकरी-व्यवसाय करणार्‍या पुरुषांनाही लागू होतात. वरील माहितीबरोबर तुमच्या पाहण्यात आलेल्या केसेस, आजार, उपचार, तुम्ही घेत असलेली काळजी इत्यादी गोष्टींवरील चर्चेचे स्वागतच आहे.

रेफरन्सेस:
http://www.cdc.gov/niosh/topics/women/
http://www.thehindu.com/news/national/karnataka/75-pc-of-working-women-h...
http://www.onepowerfulword.com/2010/10/18-benefits-of-deep-breathing-and...
http://www.mayoclinic.org/healthy-living/fitness/in-depth/exercise/art-2...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चांगला लेख आहे मो.

परमिशन्स वगैरेची काही भानगड झाली आहे का ?
हा लेख संयुक्तातला आहे हे दिसतं आहे आणि त्या ग्रुप खाली मला 'सामिल व्हा' असा ऑप्शन दिसतो आहे.. हा ग्रुप invitation only आहे ना? तर ते नीट करा किंवा अ‍ॅडमिन, वेमांना सांगा..

सार्वजनिक धाग्याबद्दल धन्यवाद.
एक उपाय सुचवावा वाटतो. तुमच्या स्वभावाला अनुकूल असेल तर ऑफीसमधल्या सहकार्यांबरोबर एक ग्रूप करून , तुम्ही एक लक्ष ठरवू शकता. अनेक ऑफिसात आता वजन कमी करण्याचे आधारगट असतात. काही जणांनी मिळून लंच नंतर चालायला जाणे, पळायला जाणे, योगा करणे असे ग्रूप असतात. "Greatest loser" सारख्या वजन कमी करण्याच्या स्पर्धा असतात. तुम्हाला एकट्याला काही जमणे अवघड असेल तर अशा ग्रूपचा खूप फायदा होतो.

व्यायाम सगळ्यांनाच सुरुवातीला आवडत नाही. यावर पर्याय म्हणजे एखादा खेळाशी निगडित ग्रूप जॉईन करणे. त्याने व्यायाम होतोच पण सोशल ग्रूपमुळे निरुत्साह, डिप्रेशन या गोष्टीही कमी व्हायला मदत होते.

छान लेख!
वर अजयनी म्ह्टले आहे तसे ग्रेटेस्ट लुजर वगैरे स्पर्धांचा खूप फायदा होतो. मुख्य म्हणजे या स्पर्धेनिमित्ताने तयार झालेले सपोर्ट नेटवर्क बहुतेकवेळा नंतरही कायम रहाते.

लेख छान आहे.

>>>जरी वरील शारीरिक/मानसिक तक्रारी खर्‍या असल्या तरी ह्याची एक दुसरीही बाजू पाहण्यात आली आहे. कधी कधी दिवसातले ७-८ तास घराबाहेर असणं हे काही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकरता लाभदायी ही ठरु शकतं<<<

ह्याबाबतः

कायम घरात असणे हे अनेकदा खूप जास्त स्ट्रेसफुल असते असा एक निष्कर्ष निघू शकतो का? आणि ज्या घरात नवरा बायको व एक किंवा दोन मुले इतकेच आहेत अश्याही घरात स्ट्रेसफुल वाटू शकते का? ह्या शंकांचा लेखाशी थेट संबंध नाही, पण कुतुहल!

ऑफीसला जाणे हे स्ट्रेसबस्टर वाटणे ही मानसिक आरोग्याची / कौटुंबिक आरोग्याची पातळी चिंताजनक आहे असे मला वाटते.

लेख नीट कळला नाही. हा सर्व्हे तौलनिक अभ्यास केला होता का? म्हणजे सहभागी स्त्रियां मधील काम करणार्‍या वि. काम न करणार्‍या. का ही नुसतीच यादी आहे - 'हे आजार आढळले' म्ह्णून.

बेफिकीर
सर्वेक्षण NPR चे आहे म्हणजे अमेरिकेतले आहे. पण मी काही जणांना/जणींना "ऑफीसला जाणे हे स्ट्रेसबस्टर" वाटणे हे समजू शकतो.

बाहेर कडाक्याची थंडी, त्यामुळे कामाशिवाय बाहेर जाणे नाही, सूर्यदर्शन नाही, बाहेर कुंद अंधार, घरात कमी प्रकाश (सर्वसाधारण अमेरिकेन घरात भारतीय कुटुंबांपेक्षा कमी उ़जेड असण्याचा कल असतो) आणि त्यात जर घरात फक्त लहान मुले असतील तर Adult Interaction नाही (किंवा फक्त तुमच्या बरोबर राहणार्‍या व्यक्तीशीच), अगदी लहान मूल असेल तर त्याच्या शी/शू/खाणे/झोप याच्या चक्रात स्वतःच्या झोपेचे खोबरे या सगळ्या चक्रातून जाताना "ऑफीसला जाणे हे स्ट्रेसबस्टर" वाटू शकते. आणि त्यात तुम्ही पूर्वी काम केले असले आणि आता घरात असलात तर हे नक्की जाणवते. H1B/H4 वर असलेल्या स्त्रियांना या सगळ्यातून जावे लागते आणि त्यात परका देश्/परकी संस्कृती/परकी भाषा याचे आणखीनच अवघड वातावरण. त्यांना इच्छा असूनही/अनुभव असूनही काम करता येत नाही, याची आणखी चीडचीड.

>> 'द हिंदू' ह्या वर्तमानपत्राने मार्च २०१४ मध्ये विविध शहरांमधील १२० निरनिराळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या २८०० स्त्रियांचे सर्वेक्षण केला. त्यात असे पाहण्यात आले की भारतातील ७५% कामकरी स्त्रियांना

यावरून सर्वेक्षण भारतातील स्त्रियांचे आहे असा समज झाला माझा.

अर्थात कुठलाही असला तरी आपलं स्वत:चं काहीएक स्केड्यूल असणं, आपल्या अ‍ॅप्टिट्यूडनुसार काम करता येणं, एक केअरगिव्हर यापलीकडेही काही अस्तित्व असणं हे निश्चितच स्ट्रेसबस्टर असतंच.

आमच्या इथे एक ओवेरीअ न / सर्वायकल कॅन्सर वर लेक्चर झाले परवा, त्यात त्या डॉक्टरीण बाईंनी फीअर ऑफ लूजिन्ग जॉ ब - नोकरी जाईल कि काय अशी कायम वाटणारी काळजी हे देखील ए क म हत्त्वाचे ताणाचे कारन सांगितले आहे. नोकरदार स्त्री व पुरुष अशी जॉइंट अर्थ व्यवस्था एखाद्या कुटुंबाची असल्यास कदाचित तिच्या पगारातून हप्ते वगिअरे जात असतात व एकद्म नोकरी गेल्यास आर्थिक परिस्थिती धोक्यात येते हे बायकांना फार मोठे टेन्शन असते.

बायकानी नोकरी करावी कि नाही/ करिअर करावी की नाही या वादाच्या खूप पुढे आपण आले आहोत तेव्हा त्या एक महत्वाचा घटक आहेत हे लक्षात घेउन त्यांच्या आरोग्याची काळजी घरदाराने घेतली पाहिजे. कंपनीत हेल्थ इन्स्युअरन्स आहे का असल्यास काय आहे हे चेक करून ठेवले पाहिजे. महत्वाचे म्हणजे नॉन कॉर्पोरेट जगतात तितकीच किंवा जास्त मेहनत क रणा र्‍या स्त्रिया आहेत. तर त्यांचा आरोग्य विमा व साधा लाइफ इन्शुअरन्स वगिअरे पुरेसा घेतलेला आहेका, प्रिमीअम अपडेट केलेले आहेत का ते ही घरातल्यांनी, अहोंनी चेक केले पाहिजे. आजारी पडल्यावर देखभाल केली गेली पाहिजे.

माझी एक आवडती आयडिया म्हणजे हिज अँड हर हेल्थ चेक. व्हॅलेटाइन डे च्या निमित्ताने जोडीने हे ल्थ चेकप करावा. आई म्हणजे कुटुंबाचा कणा हे लक्षात ठेवून तिची केअर घेतली जावी.

अजय, केवळ अमेरिकेत नाही तर भारतात ही अनेक महिलांना नोकरी/व्यवसाय करणे स्ट्रेसबस्टर ठरू शकते. त्याला अनेक कारणे असू शकतात - जसे आर्थिक भार हलका होवून आता कुटूंबाच्या गरजा भागत आहेत.

चेन्ज् कोणाला नको असतो? ऑफीसला जावंसं वाटणे त्यायोगे प्रोफेशनल आयुष्य जगता येणे, व्यावसायिक अ‍ॅप्रिशिएशन मिळेल (मिळू शकेल) अशा कशातही गुंतवून घेणे हे "मानसिक आरोग्याची / कौटुंबिक आरोग्याची पातळी चिंताजनक" का असू शकेल कोणाहीकरता?

सीमंतिनी, मला नाही वाटत लेख किंवा ते सर्वेक्षण काही निष्कर्ष देतो आहे .. "आजार आढळले" हे निरीक्षण आणि आजार असो वा नसो लेखात उल्लेखलेल्या गोष्टी किंवा इतर ह्या सवयी लावून घेणे इष्ट असा लेखाचा उद्देश आहे असं वाटलं ..

अजय,

ओके. धन्यवाद.

अ‍ॅक्च्युअली भारतात राहणार्‍या स्त्रियांनाही ऑफीसला जाणे ही एक सुटका वाटत असू शकेल असे वाटून मी ते लिहिले.

एन आर आर वाहिनीने प्रामुख्याने मूळ अमेरिकन स्त्रियांबाबत सर्वेक्षण केले असेल ना पण?

महिलांना नोकरी/व्यवसाय करणे स्ट्रेसबस्टर ठरू शकते.>> कारण आपल्या ब्रेन सेल्स वापरल्या जात आहेत हे फीलिन्ग सुखाचे आहे. चांगली पत्नी, आई सून बनू न झाल्यवरही खूप काही अचीव करायला असते. व तुम्ही जितके शोधाल तितके अव्हेन्यूज सापडत जातात. ब्लॉग चा ल व णे, फ्रीलान्स फोटोग्राफी, व इतर अनेक व्यवसाय देखील करणा र्‍या स्त्रिया हे मेंटल चॅलेंजेस आवडीने झेलतात. व थ्राइव्ह करतात.

हिंदूचे सर्वेक्षण वेगळे व एन आर आर चे वेगळे दिलेले आहे.

=====================================

सशल,

समजले नाही.

मी असे म्हणू पाहात आहे की कामाला जाणे ही एक प्रकारची सुटका आहे असे वाटणे ह्याचा अर्थ घरगुती समस्या फार तापदायक असाव्यात. ह्याचा अर्थ कुटुंबाचे एकुण (एक युनिट म्हणून एकमेकांशी असलेल्या संबंधांच्या अनुषंगाने) आरोग्य प्रभावित असावे किंवा कुटुंबातील स्त्रीचे मानसिक आरोग्य अश्या कुटुंबात राहावे लागत असल्यामुळे प्रभावित असावे.

लेखात दोन सर्वेक्षणे आहेत. एक हिंदूने केलेले भारतीय स्त्रियांबद्दल आणि एक एन्पीआरने केलेले अमेरिकन स्त्रियांबद्दल.

हिंदू सर्वेत व्यवसायानिमित्ताने होऊ शकणारे (आणि दुर्लक्षिले जाऊ शकणारे) आजार आहेत.

नोकरी व्यवसाय सुरू करणे, विशेषतः मधे खंड पडल्यानंतर, हे खूप आनंदाचे ठरते सहसा. (परिस्थितीवर अवलंबून आहे तरी, सहसा.) उदा, माझी एक मैत्रिण तिच्या जुळ्यांच्या जन्मानंतर पहिल्यांदा ऑफिसला जाऊ लागली तेव्हा इतकी आनंदी आणि हसरी झाली की फरक लक्षात आला, सगळ्यांच्याच.

नाही बेफिकीर .. अगदी आनंदी, समाधानी कौटुंबिक आयुष्य असलेल्यांनांही २४ तास तिओच तो आनंद, समाधान हवाच असेल असं नाही .. काहितरी वेगळं करणं, वेगळ्या वातावरणात जाता येणं हे हेल्दी असेल कोणाही करता ..

सशल, पण मग हे सगळ फार जेनेरिक झालं. स्त्री- पुरूष नोकरी असेल नसेल तरी व्यायाम करा हेच सांगणार ना?

सर्व्हे किंवा शास्त्रीय अभ्यासाचा उद्देश स्पेसीफिक गाईडलाईन/इंडीकेटर्स देणे उदा: ८ तास बैठा व्यवसाय असेल तर त्या महिलांमध्ये ब्लडप्रेशरचे आजार आढळले तर ८ तास उभा व्यवसाय असेल (नर्स टीचर इ ) तर व्हेरिकोज व्हेन्स आढळल्या. हे लेखातील सर्व्हे फार जेनेरिक वाटत आहे.

>> एक हिंदूने केलेले भारतीय स्त्रियांबद्दल आणि एक एन्पीआरने केलेले अमेरिकन स्त्रियांबद्दल
ओह ओके. धन्यवाद.

तपशिलातला माझा झालेला घोळ बाजूला ठेवला तरीही माझा मुद्दा तोच आहे/असेल.

>>>काहितरी वेगळं करणं, वेगळ्या वातावरणात जाता येणं हे हेल्दी असेल कोणाही करता ..<<<

पण आत्तापर्यंतची चर्चा 'स्ट्रेसबस्टर' ह्या शब्दामुळे ट्रिगर झालेली आहे. ह्याचा अर्थ स्ट्रेस घरात आहे हे कुठेतरी मान्य केले जात आहे आणि ऑफीसला जायला मिळणे हा काही स्त्रियांना त्यावरचा एक उपाय वाटत आहे.

तेव्हा, काहीतरी वेगळं करता येणं हे मानसिक समाधानासाठी, पूर्णतेच्या जाणिवेसाठी आवश्यक असेलही, पण स्ट्रेसबस्टर ठरण्यासाठी घरात राहिल्यामुळे स्ट्रेस येते हे गृहीतक अधोरेखीत होत आहे.

लेखातील सर्व्हे फार जेनेरिक वाटत आहे.<<<

सर्व्हे जेनेरिक नसून लेखातील संदेश सर्वसामान्यपणे कोणालाही लागू होईल असा आहे, पण तो उपयुक्त आहे असे नोंदवावेसे वाटते.

सर्व्हे जेनेरिक नसून लेखातील संदेश सर्वसामान्यपणे कोणालाही लागू होईल असा आहे, >>> Happy असून हवं. जेनेरिक म्हणजेच स्पेसिफिक नाही म्हणजेच सर्वांना लागू होईल असा.

>>काहीतरी वेगळं करता येणं हे मानसिक समाधानासाठी, पूर्णतेच्या जाणिवेसाठी आवश्यक असेलही, पण स्ट्रेसबस्टर ठरण्यासाठी घरात राहिल्यामुळे स्ट्रेस येते हे गृहीतक अधोरेखीत होत आहे.>.
घरात राहिल्यामुळे स्ट्रेस असे नाही तर स्वतःसाठी स्पेस उपलब्ध न झाल्यामुळे स्ट्रेस येणे. बर्‍याचशा स्त्रीयांना २४ तास घरी असल्यास ही हक्काची स्पेस घरात मिळतेच असे नाही.

सीमंतिनी, मला वाटले की त्या हिंदूच्या सर्वेचा उद्देश व्यायाम करा हे सांगणे असा नसून, आरोग्यचाचण्या करून घ्या; केवळ कामकरी असल्याने आजाराची शक्यता जास्त असू शकते, असे सांगणे हा असावा. सर्वे कोणी स्पॉन्सर केला होता हे शोधल्यास नक्की उद्देश सापडू शकेल. Happy

सीमंतिनी, '

सर्वे स्पेसिफिकच आहे. लेख जेनेरिक आहे असे माझे म्हणणे आहे. सर्व्हेमध्ये काही आकडेवारी दिलेली दिसत आहे. (हिंदूच्या सर्व्हेमध्ये) एन आर आर च्या सर्व्हेबाबत मी अजय ह्यांना एक शंका विचारली आहे की तो सर्व्हे प्रामुख्याने मूळ अमेरिकन स्त्रियांबाबतचा असेल ना असे! एन आर आर च्या सर्व्हेबाबत मो ह्यांनी जेनेरिक लिहिले असावे असे वाटत आहे. तसेच अजय ह्यांनी एन आर आर च्या सर्व्हेची फाईंडिंग्ज अमेरिकेतील भारतीय वंशाच्या स्त्रियांच्या कौटुंबिक अवस्थेशी निगडीत करून प्रतिसाद दिला आहे असे वाटत आहे.

>>>घरात राहिल्यामुळे स्ट्रेस असे नाही तर स्वतःसाठी स्पेस उपलब्ध न झाल्यामुळे स्ट्रेस येणे. बर्‍याचशा स्त्रीयांना २४ तास घरी असल्यास ही हक्काची स्पेस घरात मिळतेच असे नाही.<<<

घरात २४ तास असल्यास हक्काची स्पेस मिळत नाही ही एक स्ट्रेसच नाही का? आणि ती घरातच निर्माण झालेली नाही का? तसेच, ती निर्माण होण्यामागे काही प्रमाणात (जर हे भारतीय वंशाच्या स्त्रियांबाबत म्हणणे असेल तर) कौटुंबिक अपेक्षांमुळेच झालेले नसेल का? Happy

घरात राहिल्यामुळे स्ट्रेस नाही, घरात २४ तास राहिल्यामुळे हक्काची स्पेस नसण्याची भावना निर्माण होणे हे एक गोष्ट दोन भिन्न पद्धतींनी सांगण्यासारखे वाटत आहे.

म्रुदूला (सॉरी, नीट टाईप होत नाहीये.) - एक्झॅटली माय फियर.
भारतासारख्या देशात जिथे आजही महिलांना नोकरी करण्यासाठी 'परवानगी' लागते (क्विन बघा!) तिथे असले अर्धे सर्व्हे करू नयेत. अगदी स्पष्ट गाईडलाईन द्यावी की ८ तास बैठा व्यवसाय असेल तर ह्या ह्या तपासण्या करा. असली अर्धवट माहिती दिल्याने 'आजारपण येतात कशाला हव्या नोकर्‍या' असले वाद करणारे लोक कमी नाहीत.

mRudulaa = मृदुला

सीमंतिनी, "परवानगी" लागत असलेल्या स्त्रीयांचं प्रमाण नोकरी ही गरज असलेल्या स्त्रीयांच्या प्रमाणापेक्षा खुपच कमी असेल भारतात .. माझ्याकडे नंबर्स नाहीत पण माझा अंदाज बरोबर आहे अशी दाट शंका मात्र आहे ..

>> असली अर्धवट माहिती दिल्याने
एकदम सीमंतिनी.

दुसरे म्हणजे नोकरी न केल्याने आजारपणे येत नाहीत असे आहे का? नोकरी व्यवसाय न करणार्‍या स्त्रियांमध्ये या आजारांचे प्रमाण किती आहे. (७६% असले तर? :-)) हे बघितल्याखेरीज वादाच्या मुद्द्यातही काही अर्थ नाही.

कमावायला लागण्याच्या गरजेबाबत सशलच्या मुद्द्याशी सहमत. हिंदू ने नक्की कोणत्या प्रकारच्या कार्यक्षेत्रातल्या स्त्रियांचे सर्वेक्षण केले हेही पहायला हवे.

बेफी,
बरोबर आहे तुमचे पण नेहमीच कुटुंबाच्या अपेक्षा असतात असेही नाही. बरेचदा त्या स्त्रीला स्वतःलाच कदाचित कंडीशनिंगमुळे असेल, पण ती स्पेस हक्काने घ्यायला जमत नाही.

Pages