नोकरदार स्त्रिया: आजार आणि सामना

Submitted by मो on 10 February, 2015 - 09:47

गेल्या ५० वर्षात जगभरातील प्रगत आणि प्रगतीशील देशांमध्ये नोकरदार किंवा व्यवसाय करणार्‍या स्त्रियांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. लग्नापूर्वी शिक्षण पूर्ण करुन स्वावलंबी होण्याकडे अनेक मुलींचा कल दिसून येतो. नोकरी व्यवसायात बस्तान बसेपर्यंत आपत्यप्राप्ती लांबवणे किंवा '१ या २ ऐवजी' १ बस कडे कल झुकणे ह्या गोष्टीही आजकाल काही प्रमाणात पाहण्यात येत आहेत. बर्‍याचजणी मूल झाल्यावरही नोकरी/व्यवसाय करत राहण्याला प्राधान्य देत आहेत. हे चित्र कमी अधिक प्रमाणात जगभरातील आहे. 'घर चालवणे' ह्याबरोबरच बाहेर पडून घराबाहेर काम करणे ही जबाबदारी जरी बर्‍याच स्त्रिया घेत असल्या तरी हे सर्व करताना त्या नोकरी, मुलांचे संगोपन, घरकाम आणि नातेसंबंध/कार्यक्रम आणि ह्या सर्व पातळ्यांवर लढताना दिसून येतात. घर आणि नोकरी/व्यवसाय ही कसरत साधताना अनेक स्त्रियांवर अतिरिक्त ताण येतो. अजूनही भारतातल्या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये अनेक घरांमध्ये स्वयंपाक, घरकाम आणि मुलांचे, घरातील ज्येष्ठ नागरिकांचे संगोपन ही जबाबदारी मुख्यत्वे स्त्री पार पाडते. बर्‍याचदा घर आणि नोकरी-व्यवसायातील ताण आणि जबाबदार्‍या ह्याची परिणिती ही ह्या स्त्रियांच्या मानसिक आणि शारीरिक आजारपणात होते.

'द हिंदू' ह्या वर्तमानपत्राने मार्च २०१४ मध्ये विविध शहरांमधील १२० निरनिराळ्या प्रकारच्या इंडस्ट्रीमध्ये काम करणार्‍या २८०० स्त्रियांचे सर्वेक्षण केला. त्यात असे पाहण्यात आले की भारतातील ७५% कामकरी स्त्रियांना कोणत्या ना कोणत्या प्रकारचे शारीरिक आणि मानसिक आजार आहेत. ह्या सर्वेक्षणात वेगवेगळ्या हुद्द्यांवर काम करणार्‍या स्त्रियांची मुलाखती घेतल्या. महत्वाची गोष्ट म्हणजे बर्‍याच जणी आपल्याला असणार्‍या ह्या आजाराबद्दल अनभिज्ञ किंवा डिनायल मध्ये आढळल्या. डॉक्टरकडे जाणे किंवा ह्यावर काही उपचार घेणे ह्यापेक्षा वेळ मारुन नेणे, अंगावर काढणे किंवा घरगुती उपायांवर अधिक जणी भर देतात हेही आढळले.

नोकरदार स्त्रियांमध्ये मुख्यत्वे खालील आजार आढळले -
१. ताण
२. निरुत्साह (फटीग)
३. डिप्रेशन
४. डोकेदुखी
५. मळमळ, भुकेचा अभाव
६. झोप न येणे
७. हायपर टेन्शन, कोलेस्ट्रेरॉल
८. स्थुलता
९. पाठदुखी
१०. अनियमित मासिक पाळी
११. इन्फर्टीलिटी

** हे आजार नोकरी व्यवसायानिमिताने डबल ड्युटी करणार्‍या स्त्रियांमध्ये जास्त पाहण्यात आले, पण ते इतरही अनेक स्त्रियांमध्ये आढळतात. त्यामुळे जरी हा लेख नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने वरील समस्यांना तोंड देणार्‍या स्त्रियांच्या समस्यांचा आढावा घेत असला तरी खाली चर्चिले गेलेले उपाय हे सर्वच स्त्रियांना उपायकारी ठरतील.

घर, नोकरी ह्याबरोबर येणारे ताणतणाव आणि वरील समस्यांचा सामना करायचा कसा? सर्वप्रथम आपण आजारी आहोत हे मान्य करा आणि दुर्लक्ष करणे/अंगावर काढणे बंद करा. आधी साधी वाटणारी पाठदुखी, फक्त दुर्लक्ष केल्यामुळे क्रॉनिक पाठदुखी होऊन वेळ आणि पैसे दोन्हीचाही अपव्यय करु शकते. सतत ताणाखाली राहणे, झोप व्यवस्थित न मिळणे, व्यायामाचा आभाव ह्याची परिणिती अनियमित पाळी, मधुमेह, हायपर टेन्शन, स्थुलता इत्यादी मध्ये होऊ शकते. एक्ट्रीम केस मध्ये ती प्रजनन संस्थेवरही परिणाम करु शकते.

स्वतःकरता सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्ही करु शकता ती म्हणजे व्यायाम. कोणत्याही प्रकारे दिवसातला अर्धा तास तुम्ही एखादा शारीरिक व्यायामप्रकार (चालणे/पळणे/पोहणे/जिम/योगसनं/किंवा इतर कोणत्याही प्रकारचा व्यायाम) केला तर अर्धं युद्ध तिथेच जिंकलात समजा. व्यायामाची गरज आणि फायदे मायबोलीवर बरेचदा सविस्तर चर्चिले गेले आहेत. पण व्यायामाचे अतिशय मुलभूत फायदे सांगायचे म्हटले तर वजन आटोक्यात ठेवणे, इम्युनिटी वाढवणे, मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्यात सुधारणा करणे इत्यादी. अगदी सुरुवातीच्या स्टेजेस मधला मधुमेह, हायपर टेन्शन, कोलेस्टेरॉल तुम्ही फक्त व्यायामानेही नियंत्रित ठेवू शकता.

ऑफिसमध्ये कितीही जास्त काम असलं तरी दर तासाला पाय मोकळे करुन येत जा. खुर्ची वर बसल्या बसल्या मानेचे, खांद्याचे व्यायाम करत जा. अधून मधून उठून स्ट्रेचींग करत जा. सतत एकाच ठि़काणी बसून राहिल्याने सर्व स्नायूंवर ताण येतो, तो ताण अगदी एका मिनिटाच्या व्यायामानेही जाऊ शकतो. काँप्युटरवर काम करणार्‍यांची सगळ्यात मोठी तक्रार असते ती पाठदुखी, खांदेदुखी आणि डोळेदुखीची! तासाभराने, किंवा जेंव्हा कधी वेळ मिळेल तेंव्हा खांदे, मान, कंबर, डोळे गोलाकार फिरवून तो ताण घालवत जा. सर्वांसमोर करायला संकोच वाटत असेल तर तुम्ही बाथरुम मध्ये जाऊन हे उभ्याचे व्यायाम करु शकता. ऑफिसला खिडकी असेल तर नजर जेवढी दूरवर नेता येईल तेवढी दूर नेऊन तिथे टक लावून पाहत राहिल्याने सतत काँप्युटरकडे किंवा नजीकच्या वस्तू बघितल्यामुळे येणारा ताण चटकन कमी होतो. डोळ्यावर थंड पाण्याचा हबके मारा. माऊस आणि किबोर्डच्या सतत मुळे हातावर/बोटांवर येणारा ताण घालवण्याकरता वेळ मिळाला की बोटे झटकणे, मुठीची उघडझाप करणे आणि मनगटे गोलाकार फिरवणे हे व्यायाम करा. ह्या सर्व २-५ मिनिटात करता येण्यासारख्या व्यायामांमुळे ताणल्या गेलेल्या स्नायुंना ताबडतोब आराम वाटतो.

तुम्ही जर फिरतीचे काम किंवा फिल्डवर्क करत असाल तर उन्हात फिरताना टोपी/स्कार्फ/छत्री, गॉगल, पाण्याची बाटली, जमल्यास सनस्क्रीन हे नेहेमी बरोबर ठेवा. अतीश्रमामुळे, व्यवस्थित हायड्रेटेड न राहिल्यामुळे चक्कर येऊ शकते, अश्या वेळी ही पाण्याची बाटली फार महत्त्वाची! अतीश्रमामुळे झोप न येण्यास त्रास होऊ शकतो. खूप वेळ उभे राहण्याचे काम असेल तर जमत असल्यास थोड्या वेळाने बसत जा. बैठे काम करणार्‍यांप्रमाणेच बाहेर काम करणार्‍यांनाही स्ट्रेचिंगची आवश्यकता असते. त्यामुळे वर सांगितलेले व्यायाम त्यांनाही लागू होतात.

बैठं ऑफिसमधलं काम असो वा फिरतीचं जास्त श्रमाचं काम, दोन्हीही कामांमध्ये स्ट्रेस असू शकतो. अश्यावेळी अधून मधून दीर्घ श्वसन, प्राणायाम हे फार फायद्याचे ठरते. दर अर्ध्या तासाने ५ दीर्घ श्वासोच्छवास करणे ही स्वतःला सवय लावून घ्यायला पाहिजे. अतिशय सोपा आणि अतिशय गुणकारी असा हा स्ट्रेसबस्टर आहे. असं म्हणतात की आपल्या शरीरातील ७०% टॉक्सिन्स हे श्वसनामधून बाहेर पडतात. जर तुम्ही योग्य प्रकारे श्वासोच्छवास करत नसाल तर तुम्ही तुमच्या तुमच्या शरिरातील टॉक्सिन्स योग्यप्रकारे/पूर्णपणे बाहेर काढत नाही आहात. शरीरातील ताण कमी करणे, विचारांना अधिक क्लॅरिटी आणणे, प्रतिकारशक्ती वाढवणे इत्यादी आणि इतर अनेक फायदे दीर्घ श्वसनाने मिळतात. मुख्य म्हणजे रक्ताला ऑक्सिजनचा पुरवठा करणे आणि कार्बन डायॉक्साईड काढणे हे दीर्घश्वसनाने अधिक चांगल्या प्रकारे साधले जाते. दीर्घ, हळू श्वसन करणे ही आरोग्याच्या दृष्टीने अतिशय उपयोगी सवय लावा. जेंव्हा तुम्ही एखाद्या गोष्टीवर खूप एकाग्र होऊन किंवा ताणाखाली काम करता तेंव्हा छोटे छोटे श्वास घेतले जातात, अश्यावेळी लक्षात ठेवून दीर्घ श्वसन करायला शिका.

जेवणाच्या वेळा ठरवून घ्या आणि कितीही काम असले तरी वेळेवर जेवण करत जा. जेवल्यावर लगेच बसण्यापेक्षा ५-१० मिनिटाची फेरी मारुन या. तसेच दर तासाला उठून पाय मोकळे करत चला. दुपारचे जेवण जास्त घेण्यापेक्षा, एक छोटे लंच घेऊन थोड्या थोड्या वेळाने छोटे सकस स्नॅक्स्/फळे खात चला.

आजकाल बर्‍याचदा नीट घडी बसेपर्यंत मूल नको असा नवरा बायकोचा एकत्रित निर्णय असतो. नोकरी व्यवसायात ताण तणाव असतात, व्यायाम करायला वेळ नसतो, अश्या वेळेला बर्‍याचदा ह्याचा परिणाम स्त्रीच्या मासिक पाळीवर, प्रजनन संस्थेवर होऊ शकतो. स्ट्रेस, व्यायामाचा आभाव आणि त्याच बरोबर अनियमित जीवनशैली ह्यामुळे PCOS (पॉलीसिस्टीक ओव्हेरिअन सिंड्रोम), हार्मोनल इम्बॅलन्स इत्यादी आजारांचा बर्‍याच जणींना सामना करावा लागतो. त्यामुळे नियमितपणे चेकअप करुन घेणे, कुठल्याही आजाराकडे दुर्लक्ष न करता वेळीच उपचार करुन घेणे हे महत्त्वाचे ठरते. बर्‍याच ऑफिसेसमधून वार्षिक तपासणी होत असते, त्याचाही जरुर लाभ घेत जा.

कुठल्याही नोकरी व्यवसायात कमी अधिक प्रमाणात राजकारण पाहण्यात येते. अनेकदा तुम्ही त्याचा भाग बनू शकता, त्याचा अतीव स्ट्रेस येऊ शकतो, इतका की ह्या राजकारणापायी डिप्रेशनमध्ये गेलेल्या आणि त्यामुळे नोकरीला तिलांजली दिलेल्या महिला पाहण्यात येतात. ऑफिसातलं राजकारण कसं टाळणं हा ह्या लेखाचा विषय नाही परंतू ते घरी आपल्याबरोबर घेऊन येऊन त्याचा आपल्याला पदोपदी त्रास न होऊ देणं बर्‍याच अंशी आपल्या हातात असू शकतं. असं म्हणतात छंद हा जगातला सर्वात उत्तम स्ट्रेसबस्टर आहे. सुटीच्या दिवशी (शक्य असल्यास प्रत्येक दिवशी) स्वत:करता थोडासा का होईना, वेळ काढा. आवडत्या पुस्तकाची ४ पानं वाचा, चांगलं संगीत ऐका, मैत्रिणीशी गप्पा मारा, शॉपिंगला जा. अशी एखादी गोष्ट करा ज्यात तुम्हाला पूर्ण आनंद मिळतो आणि तेवढा वेळ तुम्ही सगळे ताण तणाव विसरुन जाता. तुमच्याकरता फक्त तुम्हीच वेळ काढून शकता हे नेहेमी लक्षात ठेवा. घरातल्या कामांची विभागणी करा. जमेल तिथे घरच्यांबरोबर कामे वाटून घ्या. घरच्या आणि बाहेरच्या जबाबदार्‍या पार पाडताना आपण तब्येतीची हेळसांड करत नाही आहोत ना हे तपासून पाहत चला.

जरी वरील शारीरिक/मानसिक तक्रारी खर्‍या असल्या तरी ह्याची एक दुसरीही बाजू पाहण्यात आली आहे. कधी कधी दिवसातले ७-८ तास घराबाहेर असणं हे काही स्त्रियांच्या मानसिक आरोग्याकरता लाभदायी ही ठरु शकतं. नुकत्याच NPR वाहिनीने घेतलेल्या एका सर्वेक्षणात असं दिसून आलं की अनेक स्त्रियांनी ऑफिसला जाणं हेच एक स्ट्रेसबस्टर, स्वत:करता असलेला दिवसातला वेळ आहे असं सांगितलं. वर्क-लाईफ बॅलन्स महत्वाचा! तुम्हाला हा बॅलन्स साधता आला तर उत्तमच. नोकरी/व्यवसाय आपल्याकरता, आपण नोकरीकरता नाही हे लक्षात ठेवा. स्वत:ची शारीरिक/मानसिक काळजी घ्या, आणि ही डबलड्युटी यशस्वी रितीने पार पडणार ह्याची खात्री ठेवा.

----

वरील लेख हा नोकरी व्यवसायातील स्त्रियांमध्ये मुख्यत्वाने पाहिले जाणारे आजार आणि त्यांचा सामना ह्या विषयाला हात घालण्याचा प्रयत्न आहे. परंतु, इथे उल्लेख केलेल्या बर्‍याच गोष्टी फक्त स्त्रियाच नव्हे तर नोकरी-व्यवसाय करणार्‍या पुरुषांनाही लागू होतात. वरील माहितीबरोबर तुमच्या पाहण्यात आलेल्या केसेस, आजार, उपचार, तुम्ही घेत असलेली काळजी इत्यादी गोष्टींवरील चर्चेचे स्वागतच आहे.

रेफरन्सेस:
http://www.cdc.gov/niosh/topics/women/
http://www.thehindu.com/news/national/karnataka/75-pc-of-working-women-h...
http://www.onepowerfulword.com/2010/10/18-benefits-of-deep-breathing-and...
http://www.mayoclinic.org/healthy-living/fitness/in-depth/exercise/art-2...

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>बरेचदा त्या स्त्रीला स्वतःलाच कदाचित कंडीशनिंगमुळे असेल, पण ती स्पेस हक्काने घ्यायला जमत नाही.<<<

अश्या स्त्रियांसाठी तर हा लेख फारच चांगला आहे. Happy

तुमचे हे नवीन मत आवडले स्वाती२

बरेच प्रतिसाद आले की! चांगली चर्चा चालली आहे.

हा लेख लिहिताना माझा काय उद्देश होता ते थोड्या वेळात लिहिते. सध्या नोकरदारीमध्ये व्यस्त ;).

मो, चांगला विषय आहे. लेखात दिलेले उपाय पण चांगले आहेत. छोट्या छोट्या गोष्टी आपण विनासायास अंमलात आणू शकतो.

मुळात नोकरी-घर-मुलं-सण-नातेवाईक ही ओढाताण जास्त करून बायकांची होते कारण घर-मुलं-सण-नातेवाईक ही बाईची पहिली जबाबदारी असताना ती पार न पाडता बाई ऑफिसला जाते आहे हा काही तरी गुन्हा आहे अशी समजूत घरातल्या सदस्यांची तर असू शकतेच पण त्याहून जास्त त्या बाईची असते. उदाहरणच द्यायचं झालं तर इथे प्रतिसादांमध्येच वाचलं की एक चांगली सून-बायको-आई झाल्यावर सुद्धा खूप काही अचिव करण्यासारखे असते. मला आधीच काही अचिव करायचं आहे. जे बायका-पुरुष अचिव करतात ते वाईट नवरे इ. असतात का? असो, तर त्या गिल्ट मधून स्ट्रेसचा जन्म होतो. तब्येत नीट ठेवायची असेल तर हा गिल्ट पहिला काढला पाहिजे. डिनायलमध्ये न जाता हा गिल्ट आपल्याला येतो हे स्वतःशी तरी कबूल केलं पाहिजे. त्याशिवाय तो काढण्याची प्रोसेस सुरू होणार नाही.

हा गिल्ट निघाला की घरात राहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीनं घरातल्या कामांमधे काँट्रिब्युट (माइंड इट, काँट्रिब्युट) केलं पाहिजे हे त्यांच्या गळी उतरवणं सोपं जाइल. ज्येष्ठ नागरिकांचं मन वळवणं कठीण असेल आणि त्यातून नवे वाद आणि स्ट्रेस उदभवू शकतात. तेव्हा त्यांचा नंबर शेवटी लावा किंवा लावूच नका. पण स्पाउस, मुलं यांना तुम्ही वळण लावूच शकता.

तब्येतीची हेळसांड करू नये, वेळेवर उपचार घ्यावेत हे लेखात दिलं आहे. बरोबर आहे. पण मी झोपून राहिले तर सगळं घर व्यवस्थित काही अडथळे न येता चालू राहिल का? मुलं डबे-बिबे घेउन वेळेत शाळेत पोचतील का? अजून काही फलाणी कामं जी रोज झा-ली-च पाहिजेत ती होतील का? या प्रश्नांची उत्तरं बहुतेक वेळा नकारार्थी येतात कारण बाया सगळी ओढाताण स्वतःच करत बसतात. पोर त्याच्या बापासोबत मजेत राहातय यानं पण यांची उलाघाल होते.

बाकी स्वतःच्या पायावर उभ्या असणार्‍या बाईनं माझा विमा कुणी करावा, डॉक्टर्स व्हिझिटची आठवण द्यावी अशा अपेक्षा कराव्यातच कशाला? या सगळ्या फालतू अपेक्षांमधून अपेक्षाभंग-नैराश्य-स्ट्रेस अशी सायकल सुरू होते.

>>>किंवा लावूच नका.<<<

प्रतिसादातील हे तीन शब्द अतिशय महत्वाचे आहेत.

हे जर एखादे 'वैयक्तीक मत' असेल तर ते वैश्विक मत असू शकत नाही. ज्यांचे मन वळवूच नका असे म्हणण्यात येत आहे त्यांच्या जीवावर स्वतः जन्माला घातलेल्यांना सोडून जाणार्‍या अनेक बायका आज सर्रास आढळत आहेत व त्या बायकांच्या आधीच्या पिढीने असे केलेले नव्हते ह्याचे दाखलेही आहेत.

हा जर एखादा 'सल्ला' असेल तर तो समविचारी स्त्रियांसाठी ठीक आहे.

बेसिकली हा प्रतिसाद मूळ लेखाला लालित्यपूर्ण पद्धतीने भरकटवत आहे. ह्यापुढील चर्चा कशा(कशा)वर होईल हे सांगणे अवघड आहे.

नाही बेफिकीर, माझ्या मते तरी सिंडरेला यांच्या प्रतिसादातील -
"घरात राहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीनं घरातल्या कामांमधे काँट्रिब्युट (माइंड इट, काँट्रिब्युट) केलं पाहिजे."

हे सर्वात महत्त्वाचे वाक्य आहे. अर्थात ह्यात 'बाई नोकरी करत नसली तरी' ही अ‍ॅडीशन मी करीन.

आत्तापर्यंतची चर्चा 'स्ट्रेसबस्टर' ह्या शब्दामुळे ट्रिगर झालेली आहे. ह्याचा अर्थ स्ट्रेस घरात आहे हे कुठेतरी मान्य केले जात आहे आणि ऑफीसला जायला मिळणे हा काही स्त्रियांना त्यावरचा एक उपाय वाटत आहे. >>>
असंच काही नाही. मध्यंतरी काही कारणाने १.५ महिना सुट्टीवर होते. नवरा ऑफिसला गेल्यावर घरात मीच माझी मजेत असायचे. नो वन टु बॉदर. दिवसभर पुस्तकं, इंटरनेट, झोप, एका सर्टिफिकेशनचा अभ्यास वगैरे मजेत सुरु होतं.. घरात कुठलाही स्ट्रेस नव्हता. पण फार लिथार्जिक वाटत होतं. पुन्हा ऑफिस सुरु झाल्यावर अतिशयच तरतरीत वाटू लागलं. वेळेवर तयार होऊन, चांगले कपडे घालून उजेडात बाहेर पडणं, दिवसभर डोकं वापरणं आणि त्यामुळे दिवसाखेर एक "अचिव्हमेंट" वाटणं वगैरे मुळे सगळी मरगळ गेली. इतकी की ज्या जॉबविषयी मी सदैव कुरकुर करायचे तो मला एकदमच आवडायला लागला Lol
निष्कर्षः ऑफिस स्ट्रेसबस्टर वाटते याचा अर्थ घरात स्ट्रेस आहे असा नाही. "चेंज" हा स्ट्रेसबस्टर आहे.

>>>

नाही बेफिकीर, माझ्या मते तरी सिंडरेला यांच्या प्रतिसादातील -
"घरात राहाणार्‍या प्रत्येक व्यक्तीनं घरातल्या कामांमधे काँट्रिब्युट (माइंड इट, काँट्रिब्युट) केलं पाहिजे."

हे सर्वात महत्त्वाचे वाक्य आहे. अर्थात ह्यात 'बाई नोकरी करत नसली तरी' ही अ‍ॅडीशन मी करीन.
<<<

सिंडरेलांच्या ह्या मताशी अगदी सहमत!

वेगळ्या विषयावर प्रतिसाद दिला होता, पण ह्या मताशी अर्थातच सहमत आहे.

>>>निष्कर्षः ऑफिस स्ट्रेसबस्टर वाटते याचा अर्थ घरात स्ट्रेस आहे असा नाही. "चेंज" हा स्ट्रेसबस्टर आहे.<<<

ह्याबाबत मूळ लेखातील काही विधाने उद्धृत करतो.

>>>वर्क-लाईफ बॅलन्स महत्वाचा! तुम्हाला हा बॅलन्स साधता आला तर उत्तमच. नोकरी/व्यवसाय आपल्याकरता, आपण नोकरीकरता नाही हे लक्षात ठेवा. स्वत:ची शारीरिक/मानसिक काळजी घ्या, आणि ही डबलड्युटी यशस्वी रितीने पार पडणार ह्याची खात्री ठेवा.<<<

ह्याचा अर्थ वर्क इज नॉट लाईफ अ‍ॅन्ड लाईफ इज नॉट वर्क! (हे त्या सर्व्हेतील मत आहे, माझे नव्हे). त्यात अभिप्रेत असलेली डबलड्युटी ही कुटुंब आणि नोकरी अशी आहे. तुम्ही दिलेल्या उदाहरणात घरात राहणे ही तुम्हाला एक 'ड्युटी' वाटत नव्हती / नसावी (असा माझा अंदाज). हे त्या स्त्रियांबाबत असावे ज्यांना घरात राहणे हे कर्तव्य वाटते आणि घराबाहेर पडता येणे हे स्ट्रेसबस्टर! Happy

बरं असं वाचा:
निष्कर्षः ऑफिस स्ट्रेसबस्टर वाटते याचा अर्थ घरात स्ट्रेस आहे"च" असा नाही. "चेंज" हा स्ट्रेसबस्टर आहे.

>>>बरं असं वाचा:
निष्कर्षः ऑफिस स्ट्रेसबस्टर वाटते याचा अर्थ घरात स्ट्रेस आहे"च" असा नाही. "चेंज" हा स्ट्रेसबस्टर आहे.<<<

नाही.

असे वाचा.

घरात स्ट्रेस असलेल्यांना जर ऑफीस स्ट्रेसबस्टर वाटत असेल तर डबलड्युटी सांभाळताना तब्येतीची काळजी घ्या आणि नोकरीला दुय्यम स्थान द्या. (एन आर आर सर्व्हेचे निरिक्षण, माझे नव्हे) Happy

हा लेख कुठल्याही डिटेल्स मध्ये न जाता नोकरी/व्यवसायात असताना होऊ शकणारे शारीरिक आणि मानसिक ताण आणि त्यासाठी करता येणारे उपाय ह्याबद्दल लिहिलेला आहे. उदाहरणांकरता काही सर्वेजची मदत घेतली होती. ह्या व्यतिरिक्त बाकीही सर्वे केले गेले असतील पण ह्या लेखांकरता हिंदूने केलेला सर्वे हा पुरेसा होता. मुख्य मुद्दा हा होऊ शकणार्‍या आजारांचा आणि उपचारांचा आहे. जास्त भर हा चाचण्या, औषधोपचार आणि व्यायाम ह्यावर आहे. ह्यातले बहुतांशी आजार/ताण हे लिंगनिरपेक्ष आहेत, परंतु लेख संयुक्ताकरता लिहिल्यामुळे स्त्रियांवर भर होता.

अजय, ऑफीसमधल्या सहकार्यांबरोबर ग्रूप करुन काही तरी एक लक्ष ठेवणे आणि साध्य करण्याकरता प्रयत्न करणे ही कल्पना छान आहे. स्वाती२ने म्हटल्याप्रमाणे स्पर्धेनिमित्ताने तयार झालेले सपोर्ट नेटवर्क अनेकदा नंतरही कायम रहाते.

सीमंतिनी, लेख जनेरीक आहे, कुठल्याही एका आजाराकरता किंवा उपचाराकरता स्पेसिफिक नाही. तो उद्देश नव्हता. पहिल्या पॅरेग्राफमध्ये उद्देश लिहिला आहे. सर्वे हा फक्त मदतीकरता घेतला आहे. NPR चा सर्वे फक्त दुसरीही एक बाजू असू शकते ह्याकरता घेतला होता.

बेफिकीर, तुम्ही फार खोलात गेलात राव Happy :दिवा:. पण तुमचा मुद्दा काय आहे हे मला कळत आहे. तुम्ही म्हटला की "स्ट्रेसबस्टर ठरण्यासाठी घरात राहिल्यामुळे स्ट्रेस येते हे गृहीतक अधोरेखीत होत आहे." तर मला नाही वाटत NPR चा सर्वे ते अधोरेखित करीत होता. ऑफिसला जाणे हे स्त्रियांकरता आनंददायी असू शकते हा मुख्य मुद्दा होता. त्या स्त्रियांना घरी स्ट्रेस आहे म्हणून त्यांना नोकरी किंवा व्यवसायाला जाणे स्ट्रेसबस्टर वाटते ह्यापेक्षा स्वतःकरता काही तरी करतोय, लोकांमध्ये मिसळतोय, वेगळेपणात आनंद मिळतोय ही भावना त्यामागे होती. मला सशल, स्वाती, मृदुला, सिमंतिनी ह्यांचे याबद्दल लिहिलेले मुद्दे पटले. पण त्याचबरोबर तुमचा मुद्दा चूक नाही. घरी टेन्शन्स असल्यामुळे घराबाहेर पडण्यामागे एक रिलीफ्/मोकळेपणाची भावना असू शकते, आणि त्या ठिकाणी कौटुंबिक स्वास्थ्य हा चिंतेचा विषय असू शकतो, फक्त हा लेखाचा मुद्दा नव्हता.

सिंडरेला, प्रतिसाद आवडला.

दुर्लक्ष करु नका, डिनायलमध्ये जाऊ नका. नियमित आहार, व्यायाम, चाचण्या करत चला हे लेखाचे सार आहे.

अजयनी लिहिल्याप्रमाणे इतरही काही इनिशिएटिव्हज, किंवा तुम्ही करत असलेल्या गोष्टी लिहू शकत असाल, तर जरुर लिहा.

छान लेख आहे. इथे घराबाहेर पडणे हे कसे स्ट्रेसबस्टर असते ह्यावर चर्चा झाली आहे त्या अनुषंगाने मी नुकताच वाचलेला एक लेख आठवला. त्यात असेच काहीसे म्हटलं होतं. अर्थात लेख फक्त स्त्रियांविषयी नव्हता. Monday blues (सोमवारी कामावर जायचे ह्या विचाराने येणारी खिन्नता) कमी होत चालले आहेत असं निरीक्षण त्या लेखात मांडलं होतं. आणि त्याचं मुख्य कारण weekend हा weekday पेक्षा अधिक stressful होतो असं होतं. लेख अमेरिकेत झालेल्या सर्वेक्षणावर बेतला होता. weekend stressful असण्याची जी कारणे दिली होती ती फार मजेशीर होती! म्हणजे तर्काने एकदम योग्य पण तरीही आपल्या भारतीय डोक्यात पटकन न शिरणारी. मला आठवत आहेत तेवढी देते (नंतर सापडला तर तो लेख पण देते).
१. कामावर असताना काही नियम तुमच्या बाजूने असतात. तुम्ही कोणाकडे तरी अन्यायाविरुद्ध तक्रार करू शकता. घरी असताना असे नसते. खेळ तुमचा, आणि खेळाडू देखिल तुम्हीच पण नियम मात्र समाजाने आखून दिलेले! त्यामुळे तक्रार कोणाकडे करणार!

२. You get paid (a useful form of appreciation) for work done as an employee whereas as lot of household jobs are thankless chores! And yet number of such things need to be done out of obligation.

3. Your job is ultimately you choice. Most of the times you at least have a chance to hand in a notice, get out of the place if you don't like the work and/or people. But things on the home front are kind of permanent! Under normal circumstances, you are stuck with the same people all your life with no escape! This feeling of "no choice" can be very frustrating!

४. विकेंडला वेळ आहे म्हणून अधिक दमवणाऱ्या गोष्टी अंगावर येऊन पडतात त्यापेक्षा रोजची ८-५ नोकरी परवडली असे वाटू शकते!

आता स्त्रियांसाठी विशेषतः भारतीय स्त्रियांसाठी ही असली कारणे identify होणं हेच फार अवघड आहे. खुद्द मला वाचताना काहीही लॉजिक लावलंय असं वाटतं होतं! पण नंतर विचार केल्यावर वाटलं, हो कदाचित हा जो सारा (सर्व प्रकारचा) अकारण/अनावश्यक ताण भारतीय स्त्रियांवर पडताना दिसतो आहे त्याच्या मागे ही अशी आपल्या मानसिकतेत नसलेली आणि त्यामुळे पटकन शब्दांत मांडता न येणारी कारणं असू शकतील. आणि अशावेळी फक्त घराबाहेर पडणे (नोकरीसाठी/छंदासाठी) हे स्ट्रेसबस्टर असू शकते (असतेच!).

लेख व प्रतिसाद वाचनीय आहेत. माझ्या पिढीतल्या अनेक मुली, स्त्रिया स्वत:च्या स्वास्थ्याबद्दल गेल्या तीन - चार वर्षांत चांगल्याच सतर्क होताना पाहात आहे, परंतु त्याच बरोबर स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष करून आपली नोकरी / घर, संसार, मुले, ज्येना यांची कसरत करणाऱ्या, स्वत:च्या आरोग्याबद्दल चालढकल करणाऱ्या मुलीही सातत्याने दिसत असतात. कदाचित ही एक फेज असू शकते. काही काळाने याच मुली आपल्या आरोग्याची काळजी घेताना दिसतील. परंतु स्वत:च्या तब्येतीकडे दुर्लक्ष हे भविष्यात तापदायक व महागात पाडणारे असू शकते. त्यात नोकरदार, व्यावसायिक किंवा होममेकर अशा सर्वच स्त्रिया आल्या. महत्त्वाचे आहे ते आपल्या तब्येतीविषयी सतर्क राहाणे, हेळसांड न करणे, कोणती लक्षणे दिसल्यावर त्यांकडे दुर्लक्ष न करणे. हे शक्य झाले तरी लेखाचे प्रयोजन साध्य झाले असे म्हणता येईल. Happy

लोकसत्ता मध्ये चतुरंग भागात माझा त्याग आणि समाधान असे एक सदर आहे त्यातील नोकरदार महिलांची धावपळ व त्यांनी केलेल्या तडजोडी वाचल्या की थक्क व्हायला होते. पुणे मुंबई रोज अपडाउन करून संसार करणे मुले वाढवणे ह्यात स्वतःच्या गरजा बाजूला राह्णे, त्रास होणे हे बायका सर्वस्वी अ‍ॅक्सेप्ट करूनही संसार करतातच. हीच परिस्थिती जर नवृयावर असती ( फॉर कंपॅरिझन सेक ) तर
तो मुंबईत घर घेउन आरामात राहिला असता. डबा लावला असता व बायको मुली पुण्याला ठेवल्या असत्या मुलींचे शिक्षण पुण्यात नीट झालेच असते. व हे साहेब वीकांताला घरी आले असते. असा पॅटर्न मी प्रत्यक्ष पाहिला आहे. पण नवरा मुले पुण्यात व बायको मुंबईत आरामात जॉब करते आहे, वीकांताला घरी जाते आहे. ही कल्पना करून बघा. किती लोकांच्या पचनी पडेल. खुद्द ती स्त्रीच असे करणार नाही. हे कसेही करून निभवायचे ही मानसिकताच चुकीची आहे. पहिले स्वतःचे स्वास्थ्य, मानसिक आरोग्य नीट ठेवायचे, पैसे कमवायचे, मग आगे कुछ भी असा विचार केला पाहिजे.

विषय छान आहे. लेख अजून सर्वसमावेशक हवा.
कामाच्या अनुषंगाने निर्माण होणारी मणक्याची दुखणी, कॉम्प्युटरच्या वापरामुळे होऊ शकणारे मनगटाचे, हाताच्या/ बोटाच्या स्नायूंचे आजार, सकस आणि समतोल आहार इत्यादी विषयांबद्दलही चर्चा व्हायला हवी. नोकरीसाठी करावा लागणारा प्रवास, त्यामुळे होणारी दगदग/ धावपळ, वेळापत्रक पाळण्यासाठीचा अट्टहास हे आरोग्यावर गंभीर परीणाम करू शकतात.
नोकरदार स्त्रियांनी 'आपल्याला काय हवे? आपण नोकरी कश्यासाठी करतो? नोकरी करून आपल्याला जे हवंय ते साध्य होतं आहे का?' अश्या प्रश्नांची उत्तरं आपली आपण शोधत राहण्याचा प्रयत्न करायला हवा.

पण नवरा मुले पुण्यात व बायको मुंबईत आरामात जॉब करते आहे, वीकांताला घरी जाते आहे. ही कल्पना करून बघा. किती लोकांच्या पचनी पडेल. खुद्द ती स्त्रीच असे करणार नाही.>>> हे सरसकटीकरण आहे. माझ्या पाहण्यात अशी कुटुंब आहेत जिथे नवरा नोकरी मुलांची, संसाराची काळजी घेतोय आणि बायको परगावी नोकरी करतेय आणि सप्ताहांताला घरी येते आहे.

मंजूडी, उत्तम मुद्दे. या अनुषंगाने झालेली चर्चाही वाचायला आवडेल. वेळापत्रक पाळायचा अट्टाहास जरी व्यक्तिसापेक्ष असला तरी घरातल्या जबाबदाऱ्या निभावून नोकरी व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांमध्ये तो जास्त प्रमाणात पाहिला आहे व त्यामुळे येणारे तणाव व अस्वास्थ्यही पाहिले आहे. गृहव्यवस्थापन हे सर्व कुटुंबियांचा समावेश व समयोचित सहभाग असेल तर कमी त्रासाचे होते हेही पाहिले आहे. भिन्न स्वभाव व सवयींच्या चार व्यक्ती एका छताखाली राहात असतील तर त्यातून येणारे ताणतणावही अनुभवले आहेत. तसेच प्रवासामुळे होणारी दगदग, पाठीची दुखणी वगैरे टाळता येणे - त्यासाठी स्वत:च्या तब्येतीला प्राधान्य देणे यासाठी काही उपयुक्त टिप्स असतील तर त्याही वाचायला आवडतील.

विषय चांगला आहे आणि विचार करायला लावणारा आहे.
पण मुळातच मला घर, संसार, मुलं, सोशल सर्कल, शिक्षण, जॉब, माझे छंद सगळंच सांभाळायचं आहे, आणि एकाच वेळेस आदर्श गृहीणी, आदर्श माता, आदर्श सून , आयडीयल संसार, आयडीयल जॉब, व्हरसटाईल परसनॅलिटी या सगळ्यांच फ्रंटवर अव्वल असण्याची स्वतःकडूनच असलेली अपेक्षा कुठेतरी या स्ट्रेसला, या मानसिक-शारिरीक आजारपणांना कारणीभूत आहेत असं नाही का वाटतं?
मला या मोजक्या आयुष्यात सगळं मिळणार नाहीये, त्यातल्या कोणत्या गोष्टी मी स्वीकारायच्या आणि कोणत्या सोडायच्या हा चॉईस बायकांना असेल (आणि पुरुषांना देखील) आणि ह्या चॉईसचा जेव्हा वापर केला जाईल, तेव्हा बरीचशी मानसिक आणि शारीरीक ओढाताण आपोआपच कमी होईल असं वाटतं.

अमा, तो लेख वाचुन मलाही असंच वाटलं. नवर्‍याने परस्पर पुण्याला सेटल व्हायचा निर्णय घेतला, असं लिहिलय तिथे. ग्रूहित धरण्याची परिसीमा झाली.

अमा, तो लेख वाचुन मलाही असंच वाटलं. नवर्‍याने परस्पर पुण्याला सेटल व्हायचा निर्णय घेतला, असं लिहिलय तिथे. ग्रूहित धरण्याची परिसीमा झाली.

मला या मोजक्या आयुष्यात सगळं मिळणार नाहीये, त्यातल्या कोणत्या गोष्टी मी स्वीकारायच्या आणि कोणत्या सोडायच्या हा चॉईस बायकांना असेल (आणि पुरुषांना देखील) आणि ह्या चॉईसचा जेव्हा वापर केला जाईल, तेव्हा बरीचशी मानसिक आणि शारीरीक ओढाताण आपोआपच कमी होईल असं वाटतं.

>>>> एकदम पतेकी बात, रार.

लेख छान आहे. मंजूडीनं उल्लेखलेले मुद्देही योग्य.

अमाने उल्लेखलेला हा तो लेख - http://www.loksatta.com/chaturang-news/life-for-sacrifice-1069194/

पण मला त्या लेखातली सकारात्मकताच भावली ती ही की त्या बाईंनी प्रवासातील वेळेचा सदुपयोग करत एम.ए. पूर्ण केले आणि आपल्या मुलींसमोर जिद्द, महत्त्वाकांक्षा, चिकाटीचा आदर्श ठेवला.

मुळातच मला घर, संसार, मुलं, सोशल सर्कल, शिक्षण, जॉब, माझे छंद सगळंच सांभाळायचं आहे
, आणि एकाच वेळेस आदर्श गृहीणी, आदर्श माता, आदर्श सून , आयडीयल संसार, आयडीयल जॉब, व्हरसटाईल परसनॅलिटी या सगळ्यांच फ्रंटवर अव्वल असण्याची स्वतःकडूनच असलेली अपेक्षा कुठेतरी या स्ट्रेसला, या मानसिक-शारिरीक आजारपणांना कारणीभूत आहेत असं नाही का वाटतं? >>>>

सुपर वुमन बनण्याचा प्रयत्न, ह्या गडबडीत प्रकॄतीची हेड्सांळ होते हे खर.

चेंज इन वर्क --- खुप मदत करते, प्रवासात वाचन / गाणी एकणे , मैत्रीणी जोडणे आणि गप्पा मारणे Happy

प्रत्येक प्रोफेशनच्या स्वरूपाप्रमाणे (त्यामुळे) उद्भवणाऱ्या तब्येतीच्या तक्रारी या बऱ्याचशा लिंगनिरपेक्ष असल्या पाहिजेत खरंतर. पण स्त्रियांमध्ये (खास करून भारतातील... अन्य देशांमधील माहिती नाही) आढळणारी हिमोग्लोबिन, कॅल्शियम, ड जीवनसत्त्व, प्रतिकारशक्तीची कमतरता यांसारख्या गोष्टी आरोग्याच्या तक्रारींसाठी पूरक ठरत असाव्यात. त्याच जोडीला वाढलेले वजन, पोषक आहाराकडे व आरोग्यदायी जीवनशैलीकडे दुर्लक्ष, तणाव घ्यायची प्रवृत्ती आणि वयानुरूप शरीराची होणारी झीज या गोष्टीही तब्येत कमकुवत करण्यासाठी कारणीभूत ठरत असणार!

स्त्रियांची हवेतला ऑक्सिजन ओढून घ्यायची क्षमताही शरीरातील श्वासनलिकेचा आकार व हिमोग्लोबिनचे प्रमाण यांमुळे पुरूषांच्या तुलनेत कमी असते असे कुठेतरी वाचले होते. सत्यासत्यता माहीत नाही. परंतु तसे असेल तर एखादे शारीरिक श्रमाचे काम करताना स्त्रिया पुरूषांच्या तुलनेत अधिक दमतात यामागची कारणमीमांसा पटते.

या पार्श्वभूमीवर शारीरिक, बौध्दिक व मानसिक श्रमांचे काम करणाऱ्या सर्वच स्त्रियांनी आपल्या तब्येतीविषयी किती दक्ष राहिले पाहिजे व जीवनशैलीत आवश्यक बदल करून आरोग्यदायी जीवनशैली अंगीकारली पाहिजे हे प्रकर्षाने जाणवते.

चांगल चर्चा चालू आहे.
पण मला वाटतं, सुपरवुमन बनण्याचा अट्टाहास कुणाचाच नसतो. सर्व सुरळीत चालावं ही माफक अपेक्षाच दमवून टाकते. कशी ते पाहा -
१. आदर्श गृहीणी - घरातली किराणा, भाजी व अनेक गोष्टींची इन्व्हेंटरी ठेवणे. या वस्तू नवरा नियमित आणत असेल तरी रिअॉर्डर लेव्हल तपासणे, फॉलोअप ठेवणे हे नाही केले तर काय होईल? अचानक Gas संपला, तेल संपले अशा गंमती होतील. वारंवार होत राहिले तर ताण, चिडचिड वाढेल.
२. आदर्श माता- मुलाच्या प्रगतीचा, अभ्यासाचा वेळोवेली रिकॉल ठेवला नाही तर अचानक सरप्राईज मार्कलिस्ट दिसेल. हे काम नवराही करू शकतो पण आईचाही सहभाग असावा की. जगभराचे प्रॉब्लेम सोडवून मुलांकडे लक्ष दिले नाही तर काय उपयोग?
३. इतर आदर्श आपण आरोग्याबाबत गृहीत धरू' - सर्वांच्या तब्येती ठणठणीत असतील तर सतत दवाखान्याच्या वार्या, आर्थिक चणचण, अॉफिसला शाळेला दांड्या वगैरे नकोशा गोष्टी टाळता येतील.
थोडक्यात, Stich in time saves nine हे सूत्र प्रत्येकीच्या डोक्यात फिट्ट झालेले आहे. हे पुरूषांच्या बाबतीतही आहे पण घराच्या आरोग्याच्या किल्ल्या स्वयंपाकघरात असल्याने अर्थातच बाईवर जरा अधिक जबाबदारी येते. हा सुपर वुमन सिंड्रोम नाही तर हे भविष्यातल्या समस्यांना दूर ठेवण्याचे व्यवस्थापन आहे. आता जी बाई एवढी सतर्क, सजग असेल तिने स्वत:कडेही जातीने लक्ष पुरवावे हे आवर्जून सांगावे लागेल असे नाही.
तरीही, एक रिमाईंडर म्हणून या लेखाचा उपयोग सर्वांना व्हावा.

रारची पोस्ट वाचून मला जाणवलं की सगळं सुरळीत असावं ही अपेक्षाच मुळात माफक नाही. ती खूप मोठी अपेक्षा आहे आणि कदाचित ४०-५०% महिलांना कर्तबगारी आणि नशीब यांच्या जोरावर असे 'सुरळीत' आयुष्य भोगता येत असेल. बाकी उरलेल्या आपल्या परीने आयुष्याचा उपभोग घेत असतात. एम्ब्रेसिंग इंपर्फेक्शन्स!

त्यामुळे स्ट्रेसच्या कारणांचा विचार करताना वन अप्रोच फिट्स ऑल असे मॉडेल सापडणे कठीण आहे.

सीमंतीनी खरंय ते. एक घर असणं, नोकरी असेल तर ती घरापासून जवळच असणं (त्याच शहरात असणं), स्वतःचा थोडासा का होईना वेळ मिळणं, घरी कोणी आजारी नसणं ह्या अनेकांसाठी 'टेकन फॉर ग्रअ‍ॅटेड' गोष्टी असल्या तर बहुतेकांकरता नसतात.
अश्या वेळी 'मला निवडायचा चॉइस /संधी ' असती तर असं अनेकांना वाटतं, अनेकांना संधी मिळूनही चॉईस करण्याची हिम्मत होत नाही.
हे नोकरी करणार्‍या स्त्रीयांबद्दल चाललं आहे म्हणून लिहिते, पण किती शिकलेल्या स्त्रीया खरंच करियरमधल्या 'संधी' कोणतंही गिल्ट न ठेवता स्वीकारू शकतात? ( कारण अनेकदा अश्या संधी दुसर्‍या शहरात, किंवा नोकरीसाठी अधिक वेळ देण्याची डीमांड करणार्‍या असतात ). कारण मुळातच स्त्रीने नोकरी करणं हे 'अ‍ॅडिशनल' अ‍ॅक्टीव्हीटी म्हणूनच बघितलं जातं. पुरुषांची जशी ती 'कोअर अ‍ॅक्टीव्हीटी ' आहे, तशी अजून स्त्रीयांसाठी ती नाहीये . आणि इथेच खूप सगळ्या स्ट्रेसचं मूळ आहे.

हा धागा फक्त ऑक्युपेशनल हजार्डस (कामाच्या पद्धतीमुळे होणारे आजार) यावर असेल तर मात्र स्त्री-पुरुष कोणासाठीही ते सारखेच आहेत ...

Pages