चेट्टीनाड चिकन बिर्याणी

Submitted by नंदिनी on 8 February, 2015 - 11:06
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१ तास
लागणारे जिन्नस: 

१. अर्धा किलो चिकन- तुकडे करून, स्वच्छ धुवून वगैरे.
२. लिंबाचा रस- चिकनला पुरेल इतका
३. तिखट
४. चेट्टीनाड चिकन मसाला (नसेल तर मालवणी चिकन मसाला तोही नसेल तर गरम मसाला तोही नसेल तर घरात असेल तो मसाला तोही नसेल तर जाऊद्यात)
५. मीठ (चवीनुसार)

वाटणः
आलं: एवलुसं
लसूण: साताठ पाकळ्या
दालचिनी: बोटाएवढी
लवंगा: ६-७
बडीशेपः अर्धा चमचा
हिरव्या मिरच्या: आपल्याला सोसतील त्या तिखटाच्या मानानं. नेहमीच्या तिखट मिरच्या असतील तर ३-४ पुरेत.
पुदिना- कोथिंबीर : बचकभर
काजू (ऐच्छिक) ५ (मी कधी वापरले नाहीत पण इंटरनेटच्या रेसिपींमध्ये लिहिलेलं आहे.)

बिर्याणीसाठी:

तांदूळ शक्यतो जीरगी सांबा नावानं मिळणारे तांदूळ किंवा अंबेमोहर किंवा सोनामसूरी. लॉंग ग्रेन बासमती इन बिग्ग नोनो. २ वाट्या
नारळाचे दूध १ वाटी
सांबार ओनियन म्हणजेच पर्ल ओनियन : १० नसतील तर साधे कांदे उभा चिरून पण फ्लेवरसाठी पर्ल ओनियन बेष्ट.
टोमॅटो : १ मध्यम: चिरलेला. प्युरे वगैरे अजिबात नकोय.
तिखट : उगं रंग येण्यापुरती.
धणापावडर: तीपण रंग येण्यापुरतीच.
हळद: चिकनला लावलेलं आहेच त्यामुळे इथंही रंग येण्यापुरतीच.
मीठ : उगं रंग येण्यापुरती ( हे कॉपीपेस्टचे दुष्परिणाम आहेत) मीठ चवीनुसार घाला.
तेल-तूप: बिर्याणी करत आहोत त्या अंदाजानं. डायेटींग वाल्यांनी वरण भात करून घ्यावा.
स्टार अनिस: चक्रीफूल १
मराथी मोक्कू : याचे मराठी नाव नागकेशर. चेट्टीनाड पदार्थांमधला द मोस्ट आय एम पी साहित्य.
वेलची चार. : हिरवी वेलची. काळी वेलची वापरायची आवश्यकता नाही.
कढीपत्ता: घ्या एक टहाळं. दाक्षिणात्य पदार्थ असल्यानं हे सांगावं लागू नये.

सोबतः
उकडलेली अंडी किंवा अंड्याचं आमलेट किंवा दोन्ही. बिर्याणी जास्त प्रमाणांत करत असल्यास पुरवठ्याच्या दृष्टीनं हे लक्षात ठेवावं.

क्रमवार पाककृती: 

बिर्याणी म्हटलं की सर्वसाधारणपणे हैद्राबारी किंवा लखनवी बिर्याणी डोळ्यांसमोर येते. चेन्नईला रहायला आल्यावर समजलं की दक्षिणेमध्ये बिर्याणीचं किती प्रस्थ आहे. इथे मांसाहारामध्ये जास्त करून चिकन बिर्याणी खाल्ली जाते. चेन्नईचा गल्ल्यांगल्ल्यांमध्ये स्ट्रीट फूड म्हणून बिर्याणी मिळतेच मिळते. थलपकट्टू, अंबर, दिंडीगुल अशा ठिकाणच्या बिर्याणी फार प्रसिद्ध आहे. पण सध्या सर्वात जास्त फेमस आहे ती चेट्टीनाड बिर्याणी.

करायला अतिशय सोपी झटपट आणि चुका होण्याची शक्यता फार कमी असलेली ही रेसिपी आहे.

सर्वात आधी चिकन धुवून लिंबाचारस, मीठ आणि मसाला घालून मुरवत ठेवा. मुरवत ठेवण्याचा वेळ कितीही चालेल. अगदीच दहा पंधरा मिनिटं मुरवलं तरी पुरेसं आहे. तांदूळ धुवून भिजत घाला. अर्ध्यातासाने भिजलेले तांदूळ निथळून घ्या.

वाटणासाठी दिलेले जिन्नस अगदी बारीक वाटून घ्या.

आता एका मोठ्या पातेल्यामध्ये किंवा कूकरमध्ये तेल आणि तूप गरम करा. त्यात तामालपत्र, वेलची, स्टार अनिस, मराथी मोक्कू घाला. कढीपत्ता घाला. तेलातुपामधे कंजूसी नकोय. जिरेमोहरी वगैरे घालू नका.

आता त्यात सांबार कांदे घालून परता. कांदे चांगले परतल्यावर वाटण घाला. चांगलं खरपूस परता. आता सर्व कोरडे मसाले घाला.

चिरलेला टोमॅटो घाला. तोही चांगला शिजल्यावर चिकनचे तुकडे घाला. पाचसात मिनिटं चांगलं परता.

३ वाट्यापाणी आणि नारळाचे दूध घाला. चवीनुसार मीठ घाला.

चांगली उकळी आल्यावर तांदूळ वैरा. कूकर वापरत असाल तर एक शिटी घ्या. पातेल्यात करत असाल तर काय करायचे ते मला माहित नाही. सुगरणींकडून सल्ला घ्या.

कूकरचे प्रेशर उतरल्यावर बिर्याणी नीट मिक्स करून घ्या. उकडलेली अंडी सोलून त्यामधेय मिक्स करा.
आमलेट असेल तर बिर्याणीसोबत वाढा. बिर्याणीवर कोथिंबीर, ओलं खोबरं वगैरे घालू नका. ती बिर्याणी आहे, कांदेपोहे नव्हेत.

सोबत दह्याचा रायता, तळलेले आप्प्लम उर्प्फ पापड एवढंच पुरेसं आहे. गोडासाठी फिरनी करा ( Proud )

ही बिर्याणी सौम्य वगैरे चवीची अज्जिबात होता कामा नये. चांगली दणदणीत तिखट मसालेदार बिर्याणी व्हायला हवी, पण इतर बिर्याणींसारखी तूपकट होत नाही.

चिकन ऐवजी बटाटे चालतील. फक्त एक उप्कार करा आणि त्याला "बिर्याणी" म्हणू नका. बटाटे पुलाव वगैरे म्हणा!

एरव्ही दाक्षिणात्य सापडेल त्याच्यात मिरे घालतात, पोंगलमध्ये तर तांदळातांदळाला मिरीचा दाणा वेचावा लागतो, पण या बिर्याणीमध्ये मात्र मिरे घातलेले पाहिले नाहीत.

मटण घालून कसे करायचे ते मला माहित नाही, मी कधी बनवले नाही.

वाढणी/प्रमाण: 
३-४ जणांसाठी पुरेल.
अधिक टिपा: 

मराथीमोक्कूला मराठीत काय म्हणतात असं गूगलला एकदा विचारून बघा Proud चेट्टीनाड मसाल्यांमध्ये हा सर्वात महत्त्वाचा पदार्थ आहे.

माहितीचा स्रोत: 
वनिता- माझी तमिळ शेजारीण ,सेल्व्ही आणि इंटरनेट.
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरे देवा, आय अ‍ॅम इन कन्फ्युजन मोड अगेन.

उद्या माझ्याजवलच्या मराथी मोक्कूचा फोटो टाकते. मग ते नक्की काय असावं त्याचा शोध घेऊया

चेट्टीनाड चे सीमेंट फेमस असल्याचे ऐकले होते आता बिर्याणीही माहीती झाली
<<
नो प्रॉब्लेम.
चवीला साधारणतः तशीच लागते थोडीफार. टेक्स्चरमधे थोडा फरक असतो. अन बिर्याणी सिमेंटपेक्षा जरा गरम टेंपरेचरला खाल्ली जाते Wink

Pages