नायजेरियन विचित्र कथा - ३ - लेगॉसचा विमानतळ

Submitted by दिनेश. on 4 February, 2015 - 04:22

लेगॉसचा विमानतळ... खुप सांगण्यासारख्या कथा आहेत याबद्दल. हा काही साधासुधा विमानतळ नाही. इथे ब्रिटीश एअरवेज, सबीना, एअर फ्रांस, अल इतालिया, लुफ्तांसा, स्विस एअर, एमिरेट्स, कतार एअरवेज, इथिओपियन, केनया एअरवेज... अशी अनेक विमाने रोज उतरतात. ( कधीका़ळी नायजेरियन एअरवेजही होते.. पण त्याची कथा पुढच्या भागात आणि त्याही आधीच्या काळात एअर इंडिया ची मुंबईहून थेट सेवाही होती.. पण त्यात एवढी गडबड झाली, कि पायलट राजीव गांधींना स्वतः जाऊन ते विमान आणावे लागले होते.. )

जून १९९६ ला मी इथे पहिल्यांदा जाणार होतो. त्या काळात नेट वगैरे नव्हते, तरीही इथल्या विमानतळाबद्दल
मला थोडी कल्पना होतीच. आणि तसाही नैरोबीच्या विमानतळाचा अनुभव घेतला होता. ( प्रत्येक देशाची चिरिमिरीची भाषा असते. मुंबईत ज्याला चायपानी म्हणतात, त्यालाच केनयामधे किट्टू किडोगो ( काहितरी थोडेसे ) म्हणतात, अंगोलात गॅसोझा ( लिंबूसोडा ) म्हणतात तर नायजेरियात माय क्रिसमस Happy म्ह्णतात )

लेगॉसला जाण्यापुर्वी लुफ्तांसाने मी फ्रॅंकफुर्ट ला गेलो होतो. लेगॉसमधे विमानतळावरच पैसे द्यावे लागतात याची
कल्पना होती ( आणि हि काही ऐतिहासिक गोष्ट नाही, अलिकडेच वर्षूच्या मिस्टरांनी पण याचा अनुभव घेतला. )
त्यामूळे जवळचे सगळे डॉलर्स मी डॉइश मार्क्स ( त्यावेळी युरोचा जन्म झाला नव्हता ) मधे बदलून घेतले आणि
बरेचसे तिथे उडवलेही. जवळ काही नाणी उरली होती. ती पण जर्मनीची आठवण म्हणून मी ठेवली होती.

तर लुफ्तांसाचे विमान आधी अक्रा ( घानाची राजधानी ) ला उतरले आणि मग लेगॉसला. ते विमान फ्रँकफुर्टला असतानाच गडबड झाली होती. त्यात ३ नायजेरियन आले होते आणि त्यांना जर्मनीमधे प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यांना विमानातून बाहेरही येऊ दिले नव्हते. ते आत असतानाच साफसफाई वगैरे झाली.

लेगॉसला त्या काळातही एअरोब्रिज होते.. पासपोर्ट कंट्रोलला तासभर लाईनमधे उभे रहावे लागले. बॅगेज अजून बेल्टवर यायचे होते ( तास झाला होता तरीही ) ८/१० बॅगा आल्या आणि बेल्ट बंद पडला. विमानात जे नायजेरियन्स होते त्यांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. ( त्यांना घरी आल्यासारखे वाटले. )

शेवटी आणखी तासाभराने बॅगा आल्या. नाजजेरियात फारसे काही मिळत नाही, म्हणून मी भरपूर सामान नेले होते. ( वजनावर बंधने नंतरच्या काळात आली. त्या काळात खास करून आफ्रिकेत जाणार्‍या विमानात मी तरी
भरपूर सामान, कुठलाही जादा आकार न भरता नेले आहे. ) बाहेर जायला निघालो तर एका जाडजूड माणसाने
अडवले. त्याच्या अंगावर कुठलाही युनिफॉर्म नव्हता.

माझ्यासाठी काय आणलंस ? असे विचारू लागला. मी म्हणालो, काही नाही. पुढच्या वेळी आणेन ! असं कसं, काहीतरी असेलंच बघ. मी त्याला खिसा, पाकिट दाखवले. खरेच भारतातले २०० रुपये सोडले, तर माझ्याकडे
काही पैसे नव्हतेच. ( त्यावेळी फक्त २० डॉलर्स प्रवासखर्चासाठी मिळत असत, ते मी जर्मनीत उडवले होते. )
खिश्यात हात घालून मी त्याला २ डॉइश मार्क्स काढून दाखवले होते. त्याने ते देखील मागून घेतले. माझ्या ट्रॉलीला त्याने हाताने धरूनच ठेवले होते, ती दक्षिणा दिल्यावरच त्याने मला सोडले.

बाहेर आलो तर आमच्या कंपनीचा माणूस बाहेर आला होता. विमान उतरल्यापासून बाहेर पडायला मला ३ तासापेक्षा जास्त वेळ लागला होता. तरी तो म्ह्णाला, कि मी लवकरच बाहेर पडलो. मला एका गेस्ट हाऊसमधे
जायचे होते. विमानतळाहून बाहेर पडल्याबरोबर एका पोलिसाने अडवले. ड्रायव्हरने सांगितले कि अजिबात खिडकी, दरवाजा उघडायचा नाही, कि बाहेर पडायचे नाही. मी काय ते बघतो.

त्याने आपली काच खाली करून, पोलिसालाच दरडावून विचारले, " डू यू नो हू आय अ‍ॅम ? " पोलिस जरा वरमून नाही म्ह्णाला. मग ड्रायव्हरनेच विचारले, " डू यू नो, हू इज माय ओगा, इन दा कार ? " ( ओगा म्हणजे साहेब ! )
पोलिस आणखीनच वरमला. मग ड्रायव्हरने आणखी दरडावले, " देन व्हाय आर यू स्टॉपिंग अस ? " असे म्ह्णत त्याने गाडी चालू पण केली आणि निघून गेला..

मला नायजेरियातले पहिले दोन धडे मिळाले, पोलिसांची किम्मत काय असते आणि त्यांच्याशी कसे वागायचे !!!

मी दर सहा महिन्याने भारतात येत असे. त्यामूळे लेगॉसचा विमानतळ माझ्या चांगलाच ओळखीचा होता.
तिथून विमान पकडताना आणखीनच मजा असायची. चेक इन कांऊटरवर प्रचंड गडबड असायची. रांगा वगैरे
काही नसायचेच, रेटारेटी करून काऊंटर गाठावा लागत असे. इमिग्रेशनला पण चिरीमिरी द्यावी लागत असे.
आत जरा कमी गर्दी म्ह्णून आत जावे तर तिथे आणखीन गोंधळ. एसी तर चालू नसायचाच पण कधी कधी लाईटही नसायचे. एकदा तर स्विस एअरने खास पंखे आणून बसवले होते, इतकेच नव्हे तर विमानातली
कोल्ड ड्रींक्स बाहेर आणून प्रवाश्यांना दिली होती. ( असे सहसा करत नाहीत, पण स्विस एअर अशी खास सेवा देण्यासाठीच ख्यातनाम होती )

बोर्डींगला आणखी नाटक. केबिन लगेजची प्रत्येक वस्तू एका टेबलवर काढून ठेवावी लागे. स्विस एअर आणि सिक्यूरिटीचे ३ लोक ती प्रत्येक वस्तू तपासत असत. मग स्विस एअरची माणसे ती बॅग स्वतः भरत असत. तोपर्यंत आपण तिथे उभे रहायचे आणि काही प्रश्न विचारले तर त्त्याची उत्तरे द्यायची. नायजेरियातून आणण्यासारखे काही नसल्याने माझ्या सामानात फारसे काही नसे, पण काही काही नायजेरियन्स बॅग भरून
डॉलर्स नेत असत ( हो अगदी सिनेमात दाखवतात तसे. ) या नाटकात बोर्डींगला सहज २/३ तास जात. एकदा
विमानात बसल्यावर मात्र ऐश असे, स्विस एअर अक्षरशः लाड करत असे. ( पुढे ती विमान कंपनी दिवाळखोरीत गेली. मध्यंतरी क्रॉस एअर नावाने सेवा होती. आता परत स्विस एअर सुरु झाली आहे. )

परत लेगॉसला गेलो, तर बेल्ट वगैरे व्यवस्थित चालू होता. बाहेर कुणी अडवले नाही, अगदी दारात एक बाईने पासपोर्ट बघायला मागितला. तिने न मागताच मी हातात तयार ठेवलेलेच १० डॉलर्स तिला दिले. आय डॅश यू ( त्या काळातली नायजेरियन भाषा, अर्थ मी तूला बक्षीस देतोय. ) असे म्ह्णालो. तिने पण वेलकम टू नायजा ( नायजेरियाचा स्थानिक उच्चार ) असे म्हणत मला निरोप दिला.

सहसा कुठल्याही देशात विमान पकडताना, चेक इन बॅगेज उघडून दाखवावे लागत नाही. आजकालची एक्स रे मशीन्स ते काम व्यवस्थित करतात. आणि तशीही त्या सामानात काय ठेवायचे यावर फारशी बंधने नाहीत. म्हणजे अगदी स्फोटके नाही ठेवता येत. पण धारदार वस्तू, द्रव पदार्थ वगैरे ठेवायला बंधने नसतात.
पण लेगॉसला तर चेक इनच्या आधी ते सामानही टेबलावर ठेवून उघडून दाखवावे लागत असे. आपल्या सामानाची अशी उचका पाचक कुणी केली तर कुणाला आवडेल ? आणि त्यानंतर ते व्यवस्थित पॅकही आपल्यालाच करावे लागत असे. त्यावर पण उपाय होताच. सामानाच्या सोबतच हातात हजार, पाचशे नायरा ( नायजेरियाची करन्सी ) ठेवायची. तिथला अधिकारी ती नोट पकडायचा आणि बॅग न उघडता जाऊ द्यायचा. हा व्यवहार अगदी उघडपणे होत असे. मी सहज एकदा थांबून बघितले कि नेमके कुठले सामान अडवतात. एका माणसाच्या बॅगेत, ५०० च्या वर सिडीज होत्या. बहुतेक धार्मिक होत्या त्या. त्याचे म्हणणे तो त्या धर्मप्रसारासाठी नेतोय तर अधिकार्‍याचे म्हणणे तो विकायला नेतोय. वेल, माझ्या सामानात असले काही आक्षेपार्ह असायची शक्यता नव्हतीच.

नायजेरियातून मी आणायचो ते त्यांचे याम. हे साधारण सुरणासारखे असतात पण आकाराने दिड दोन फूट लांब व
रुंदीला ६ इंच वगैरे. यांना खाज नसते. चवीला खुप छान असतात. ( आकारावरून कुणाला "कुणी गोविंद घ्या, कुणी गोपाळ घ्या" साठी अगदी योग्य असे वाटेल. ) आणि चौकोनी चवळ्या.. हे खास नायजेरियन धान्य आहे. बहुदा माझे मित्र मला त्यांच्या शेतातल्या आणून देत. या चवळ्या भिजवून हाताने चोळल्या कि त्यांची साले सहज निघत. मग त्या वाटून त्यात कांदा घालून आपल्या खेकडा भजीप्रमाणे त्याची भजी करतात. त्यांना "करकरा" असे म्हणतात. तर यापैकी सुद्धा काही ते अधिकारी मागत असे. पण ते त्यांना देण्यापेक्षा पैसे देणे मला परवडायचे.

माझ्या कंपनीतल्या कामगारांना तिकिट काढून देणे ही माझी जबाबदारी होती. ते काम करणे फोनवरून होत असे. त्यांना ए व्ही एम एल बूक करून देणे, सीट बूक करून देणे अशी कामे पण नेटवरून ( ही अलिकडच्या काळातली गोष्ट आहे. पुर्वी मी स्विस एअरवर एक ठराविक सीट कायमसाठी बूक केली होती. ) होत असत. पण
काही जणांना विमानतळावर पोहोचवावे देखील लागे.
एकदा एका कामगाराला अपघात झाला. पायाला फ्रॅक्चर वगैरे झाले होते. तिथे उपचार मिळणे कठीण होते.
म्हणून तातडीने भारतात पाठवायचे ठरले. कतार एअरवेजचे विमान सकाळचे १० वाजताचे होते आणि ते पकडायला आम्हाला अगबाराहून पहाटे ४ वाजता निघावे लागे. मी त्याच्यासाठी व्हील चेअर वगैरे बूक केली होती.
कुठल्याही विमानतळावर आजकाल असते तशी बंधने तिथेही आहेतच. म्हणजे केवळ प्रवाश्यानाच, तेही तिकिट
आणि पासपोर्ट बघून प्रवेश दिला जातो. मी त्याचा पासपोर्ट आणि तिकिट घेऊन आत गेलो. ( तिथल्या अधिकार्‍याला पासपोर्टवरचा फोटो आणि माझ्याकडे बघायची गरज वाटली नाही. फक्त तिकिटावरचे नाव आणि
पासपोर्टवरचे नाव बघून आत सोडले त्याने. आणि तो तसेच करणार एवढा विश्वास मला होता. )
कतारच्या काऊंटरवर गेलो, तिथल्या बाईने मला बोर्डींग पास वगैरे दिला मग म्हणाली तू पॅसेंजर आहेस का ?
मी म्हणालो, मला व्हील चेअर द्या, मी घेऊन येतो. आणि इथे माझ्या भ्रमाचा भोपळा फुटला. जरी व्हील चेअर
बूक केली असली तरी ती विमानतळाच्या बाहेर नेत नाहीत. विमानकंपनीच्या काऊंटरपर्यंत प्रवाश्यानेच यावे अशी अपेक्षा असते. ( बहुतेक हा नियम जगभर लागू आहे. खात्री नाही. ) तिथून पुढे प्रवाश्याची जबाबदारी विमानकंपनी
घेते. खास करून असा प्रवासी एकटा प्रवास करत असेल तर अशी काळजी घेतात कारण प्रवासा दरम्यान त्याला
जर वॉशरूम मधे जायचे असेल तर आपल्या आपण जावे, अशी अपेक्षा असते.
मग मी त्यांच्याच एका माणसाला गेटपर्यंत यायची विनंति केली. मी बाहेर आलो आणि त्या कामगाराला आत पाठवले.

दुसर्‍या एका प्रसंगी तर आणखीन मजा. एका कामगाराला तर आयत्यावेळी तिकिट काढून पाठवायचे होते.
एमिरेटचे विमान होते पण नेटवरून बुकिंग होण्यासारखे नव्हते. आम्ही विमानतळावर पोहोचलो. विमान कंपनीचे ऑफिस आतमधे. पण तिकिटाशिवाय आत सोडायला दारावरचा माणूस तयार नाही. मग एक कल्पना सुचली. मी खाली अरायव्हल मधे गेलो. कुठलेच विमान लागलेले नसल्याने तिथे शुकशुकाट होता. तिथून आत गेलो आणि तिकिट वगैरे काढले ( ऑफिस वर डिपार्चर एरियात आहे. अरायव्हल मधून वर जायला जिना आहे. )
मग डिपार्चर मधून बाहेर आलो आणि त्या माणसाला पाठवले.

एथिओपियन एअरलाईन्सचा मात्र एकदा खुप चांगला अनुभव आला. आमचे सहकारी श्री मेहता यांना, अचानक
मुलाचे निधन झाल्याने भारतात जायचे होते. विमानाचे ओव्हर बुकिंग झाले होते. वेटींग लिस्ट होती तरी,
एथिओपियन ने केवळ माझ्या विनंतिवरून त्यांना सिट दिली.

तर हे झाले आंतरराष्ट्रीय विमानतळाबद्दल. नायजेरियात लांबचे प्रवास, रस्त्याने करणे धोकादायक आहे ( तरीही मी तो केला पण त्याबद्दल पुढच्या भागात ) त्यामूळे पोर्ट हारकोर्टला तर आम्ही विमानानेच जात असू.
स्वत इंधनामूळे, नायजेरियात विमान प्रवास फार स्वस्त आहे. आणि खुपदा इतर पर्यायही नसतोच.
तर हा जो स्थानिक विमानतळ होता त्यापेक्षा आपला परळचा यस्टी स्टँड परवडला, अशी अवस्था होती. धड इमारत नव्हतीच. फुटकळ विक्रेते थेट विमानच्या शिडीपर्यंत जात असत. ( विमानात जात नसत हे नशीब. ) बरं विमानही अश्या अवस्थेत असायची कि जमिनीवर असताना उडतील याची खात्री नसायची आणि आकाशात असतील तर उतरू शकतील याची !

एकदा माझ्याच विमानात दोन प्रवाश्यांनी उभ्याने प्रवास केला होता. एका प्रवाश्याने बकरी आणली होती तर एकाने केळीचा घड.. नो जोक्स यार ! एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे. ( जगात असे अनेक देश आहेत, जिथे अशी धोकादायक विमाने
चालवली, नव्हे उडवली जातात. अल जाझिराची कोलंबिया मधली एक क्लिप, यू ट्यूबवर उपलब्ध आहे. )

नंतर पुढे, एक पॉलिसी म्हणून आमच्या कंपनीने आम्हाला चार्टर फ्लाईटने पाठवायला सुरवात केली.. पण त्याला
एक वेगळे निमित्त झाले.. त्याचा किस्साही पुढच्या भागात..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे. Rofl

विमानात बकरी आणि उभे प्रवासी नुसता विचार करूनच हसतोय.:D मला मि. नटवरलाल चित्रपटातील शन्नो आठवली.

पण बाकी बहुतेक लिहीलेले प्रकार म्हणजे प्रवाशांच्या सुरक्षेची अक्षम्य हेळसांड आहेत. बहुतेक हे प्रकार खुप वर्षापुर्वीचे असतील आता मात्र असे प्रकार घडत नसावेत हीच अपेक्षा.

नरेश, नायजेरियात बंदल होताहेत, तरी फार काही बदलेल असे वाटत नाही. यातले काही किस्से तर ४/५ वर्षांपुर्वीचेच आहेत.
तसे हे देशांतर्गत विमानप्रवास छोटे म्हणजे अर्ध्या पाऊण तासाचेच असत. त्या ठिकाणी रस्त्याने जाणे प्रचंड वेळखाऊ, असुरक्षित आहे. वर मी उल्लेख केलेली अल जाझिराची क्लीप, अवश्य पहा.

एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे >>>>>>>> Rofl

एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे >>>> हात्त दाखवा विमान थांबवा!!!

एकदा माझ्याच विमानात दोन प्रवाश्यांनी उभ्याने प्रवास केला होता>>>>>> तुम च्या लेखावरुन याला खूप वर्षे झाली असावी असे वाट्ते. पण Indian Airlines च्या एका कोणत्या तरी विमानात प्रवासी जास्त झाल्याने दोन Air hostess ने उभं राहुन प्रवास केल्याची बातमी तीन की चार वर्षापुर्वी टाईम्स मधे पहिल्या पानावर होती.

ते उभ्या प्रवाशांचे, बकरीचे किस्से १९९६-९७ चे आहेत. नंतरचे काही २००८-९ चे. इंडियन एअरलाइन्सची एकेकाळची शान आता अजिबात राहिलेली नाही. मुंबई विमानतळावर फारशी विमानेही दिसत नाहीत आता त्यांची.

दिनेशदादा, खुप छान लिहीता तुम्ही.
आपले आणखी अनुभव वाचायला मजा येईल.
माझ्या एका मित्राच्या अपहरणाचा प्रयत्न झाला होता काँगोमधे. ड्रायवर आणि गार्डच्या प्रसंगावधानामुळे वाचला होता.

मजा आली वाचुन.माझ्या घानातल्या वास्तव्याची आठवण झाली. आक्रा एयरपोर्टवर पोहचायचे तर ४ तास आधी निघावे लागे. प्रवाश्याची वाट पाहत विमान थांबल्याची २-३ उदाहरणे तिथे ऐकली होती. आक्रा- कुमासी (अंतर २५० किमी) साठी आम्ही पण फ्लाईटचा पर्याय स्वीकारायचो. घाना तरी बर्यापिकी सेफ कंट्री आहे. त्यांची देशांतर्गत विमान सेवा पण अशीच मजेदार आहे. २५-३० प्रवासी संख्या असलेला विमानातून पण प्रवास केलाय. विमान आधी उडेल कि भीती नंतर खाली उतरेल की नाही याची पण भीती!

एकदा माझ्याच विमानात दोन प्रवाश्यांनी उभ्याने प्रवास केला होता. एका प्रवाश्याने बकरी आणली होती तर एकाने केळीचा घड.. नो जोक्स यार ! एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे. Rofl

I think one can get Wife also on Airport in Nigeria. You only once written about this if I remember correctly.

तुमचे लेख वाचून उगाच कुतुहल वाटले की, कुठल्या फिल्ड मध्ये आहात म्हणून हे असले देश फिरायला मिळते?

मजा आहे.... लुटारु देश आहेत एकदम. Wink

शेवटचे अनुभव खरेच... Lol
मला जॉनी लिव्हरच्या स्टँडअप कॉमेडी मधील एक आयटम आठवला.. भारतातल्या प्रत्येक राज्याच्या लो बजेट विमानसेवा सुरू झाल्या तर... सिंधी गुजराती मराठी पंजाबी वगैरे..

बाकी झंपी यांना पडलेला प्रश्न मलाही बरेचदा पडतो Happy

मस्तच लिहिलेय Happy

<<इमिग्रेशनला पण चिरीमिरी द्यावी लागत असे.>>
<<एकदा माझ्याच विमानात दोन प्रवाश्यांनी उभ्याने प्रवास केला होता. एका प्रवाश्याने बकरी आणली होती तर एकाने केळीचा घड.. नो जोक्स यार ! एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे>> Lol

नायजेरियात दोन प्रकारच्या व्यक्तींचा दबदबा असतो. एक असतो चीफ. त्याचा वेश म्ह्णजे एकाच कापडाचा ढगळ लेंगा आणि सदरा. डोक्यावर हॅट, त्यात पिस आणि हातात काठी. ही चीफटॅन शिप असली तर समाजात दरारा असतो. हि चीफटॅनशिप पैसे देऊन, गावजेवण वगैरे घालून मिळवतात. ( चार्लीज एंजल्स भाग २ मधे, ओपनींग सीनमधेच ड्र्यू बॅरिमोर ज्या रुपात दिसते तो ड्रेस ) अशी व्यक्ती विमान वगैरे थांबवू शकते.

आणि दुसरे असतात त्यांना म्हणायचे अलहाजी. त्यांनी खरेच हाजयात्रा केली असते का माहित नाही, पण एकदा अलहाजी बिरुद लागले, कि समाजात मान मिळतोच. पण ते मवाळ असतात. चीफची गुर्मी नसते त्यांच्यात.

तिसराही प्रकार असतो, ते म्हणजे चर्चचे पास्टर.. पण ते समाजात क्वचितच वावरतात. काही पास्टर्स ची स्वतःची विमानेही आहेत.

झंपी, मी शिक्षणाने सी.ए. आहे.

गामा, रिस्किंग इट ऑल, अशी अल जाझिरा ची सिरीज आहे यू ट्यूबवर.. अवश्य बघा. त्यात कोलंबिया बरोबरच, डि आर सी ( काँगो ) पण आहे. बाकिचेही देश आहेत. हे चित्रीकरण खरेच फार धोका पत्करून केलेले आहे.

दिनेश, धन्यवाद. पण मी पेशाने काय विचारलेले. Happy

( ज्यामुळे असे आफ्रीकी वगैरे देशात फिरता येते?( हि उगाच उत्सुकता. कारण आफ्रीकी देशच ज्यास्त दिअले तुमच्या बर्‍याच लिखाणात, नंतर मिडलईस्ट्र्न देश वाचण्यात आले म्हणून म्हटले कोणती कंपनी?)

टेरिबल.. बकरी, केळी, बायको, हात दाखवून विमान थांबवणे... अंगूठी पहननेसे जो माँगोगे वही मिलेगा टाईप्स Lol

खरोखरंच अतिशय डेंजरस देश आहे हा.. दिनेश, आफ्रिकेत इतकी वर्षं (आनंदाने Happy )तगून राहणारा तूच पाहण्यात आहे.. तुझं अनुभव भांडार संपन्न आहे अगदी!!

ते एअरपोर्ट वर चायपानी प्रकरण इंडोनेशिया( ओन्ली जकार्ता) सोडून कोणत्याही इतर साऊथ ईस्ट देशांमधे आढळलं नाही.. तिथे एअरपोर्ट चे कर्मचारी ,' ओले ओले" ( गिफ्ट) म्हणत कुजबुजत..

बाकी आम्हाला आडिस अबाबा ला टूरिस्ट म्हणून जाण्यात काही प्रॉब्लेम वाटत नाही.. क्वाईट सेफ!!!

<<एकदा माझ्याच विमानात दोन प्रवाश्यांनी उभ्याने प्रवास केला होता. एका प्रवाश्याने बकरी आणली होती तर एकाने केळीचा घड.. नो जोक्स यार ! एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे.>>>>

हायला हे भारी आहे. दिनेशदा, तुमच्याकडे अक्षरशः खजिना सापडतो अशा अनुभवांचा Happy

एकदा माझ्याच विमानात दोन प्रवाश्यांनी उभ्याने प्रवास केला होता. एका प्रवाश्याने बकरी आणली होती तर एकाने केळीचा घड.. नो जोक्स यार ! एकदा तर शिडी काढून, दरवाजा बंद झालेल्या विमानाला एका प्रवाश्याने हात केल्यावर ते थांबवल्याचे मी बघितले आहे.>> Rofl

Pages