इंग्रजी स्पेलिंग्ज आणि उच्चार इतके तर्कशून्य का?

Submitted by स्वीट टॉकर on 3 February, 2015 - 02:56

माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना.

किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या चिखलात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती.

त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले. A चा उच्चार ऍ किंवा अ, e चा ए, i चा इ, o चा ओ किंवा ऑ, u चा उ किंवा अ, डबल ई चा ई, डबल ओ चा ऊ वगैरे वगैरे. आम्ही ते आज्ञाधारकपणे पाठ केले. वापरायला सुरवात केल्यावर मात्र असं लक्षात आलं की जितके शब्द नियमात बसतात तितकेच नियमबाह्य आहेत. आपण मराठीत अपवाद हा शब्द वापरतो कारण नव्व्याण्णव टक्के नियमात, म्हणून एक टक्का अपवाद. इथे अपवादच अपवाद. मग नियमांना किंमत काय?

आमची स्थिती पुण्यामध्ये वन वे रस्त्यावर योग्य दिशेनी वाहन चालवणारयांसारखी व्हायची. इतकी वाहनं चुकीच्या दिशेनी येतात की आपणच चुकतो आहोत की काय असं वाटायला लागतं. दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण डाव्या अर्ध्यामध्ये चालवतो. पण या वन वे मध्ये उलटे येणार्यांची एक खासियत असते. एकदा दिशेचा नियम मोडलाच आहे म्हटल्यावर यांना डाव्या उजव्याचंही सोयरसुतक राहात नाही. कुठूनही येतात. मात्र हेडलाइट लावून. चोरोंके भी असूल होते हैं.

इंग्रजीचे शब्दही असेच. ‘डबल ओ’ चा उच्चार ‘ऊ’ होतो हे आम्हाला पाठ. लुक, बुक वगैरे. मग ‘ब्लुड’ का नाही? त्याचा उच्चार ‘ब्लड’ करावा हे कुणी ठरवलं? असं आहे का, की ‘ब्लुड’ अशा उच्चाराचा दुसरा एखादा शब्द आहे आणि त्याचा आणि blood या शब्दाचा गोंधळ होऊ नये म्हणून एक विचारी भाषाशास्त्रज्ञानी हा निर्णय घेतला? अजिबात नाही. म्हणजे हा पूर्णपणे Random Decision आहे.

एक महत्वाची गोष्ट नेहमी आपण शिकतो. ती म्हणजे कुठल्याही बाबतीत Random Decision घ्यायचा नसतो. प्रत्येक निर्णय हा उपलब्ध माहिती (Available Data) आणि तर्क (Logic) यावरच घ्यायचा. मग याच भाषेच्या बाबतीत असं का?

बरं, आता कुठला शब्द नियमाप्रमाणे उच्चारायचा आणि कुठचा वेडावाकडा हे आम्हाला कसं कळणार? तर ते ‘ऑक्सफोर्ड’ नावाच्या शब्दकोशातून. ‘ऑक्सफोर्ड’ ह्या शब्दाची उत्पत्ती ‘ऑक्स-फोड’ या जोडशब्दात आहे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच.

War ‘वॅर’ नव्हे, वॉर.
Son सॉन नव्हे, सन.
‘ow’ हे n च्या नंतर लागले, उदा. now, की त्याचा उच्चार औ.
तेच ‘ow’ हे n च्या आधी लागले, उदा own, की त्याचा उच्चार ओ.
One म्हणजे ‘वन’. ह्यातला ‘व’ हा उच्चार कुठून आला? देवास ठाऊक !

उदाहरणं द्यावी तितकी थोडी. पण ते जाऊ द्या. कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा?

या सगळ्यांचा बाप म्हणजे silent & anti-silent अक्षरं एकत्र ! काही लिहिलेली अक्षरं वाचायची पण त्यांचा उच्चार करायचा नाही. त्याऐवजी एक न लिहिलेलं अक्षर तिथे आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा उच्चार करायचा ! शब्द आहे ‘कर्नल’. स्पेलिंग आहे colonel. ‘एल्’ चा उच्चार करायचा नाही. त्याच्या नंतरच्या ‘ओ’ चा ही उच्चार करायचा नाही. त्या दोघांऐवजी तिथे ‘आर’ आहे अशी कल्पना करायची, आणि त्याचा उच्चार करायचा. आधीच्या ‘ओ’ चा उच्चार ‘अ’ असा करायचा. सोप्पं आहे की नाही?

थोडक्यात काय, तर नुसता नियम माहीत असून काहीही उपयोग होऊ नये, सगळे शब्द पाठच करायला लागावे अशी व्यवस्था केलेली आहे. शालेय जीवनातलं समांतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल. शाळा जर मोठी असेल तर शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर कोठला वर्ग कुठे आहे याचा नकाशा लावलेला असतो. शिवाय साधारणपणे एकाच इयत्तेचे वर्ग एका मजल्यावर असतात. प्रत्येक वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिलेली असते. असं समजा की कुठलाही वर्ग कुठेही भरवला, एकाही वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिली नाही तर काय होईल? मुलं आणि शिक्षकांना ते समजेपर्यंत भटक भटक भटकायला लागेल. पालक तर हरवूनच जातील. वर म्हणायचं, “त्यात काय इतकं? एकदा पाठ झालं की काही प्रॉब्लेम येत नाही!”

असं तर काही शक्य नाही की कित्येक भाषापंडित एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं, “आपण एक तर्कशून्य स्पेलिंग आणि उच्चार असलेली भाषा बनवूया.” मग ही भाषा अशी झाली तरी कशी?

मला माहीत आहे याचं कारण. एकदा भाषांतरदेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनी मला सांगितलं. मी तुम्हाला सांगतो.

सुरवातीला इंग्रजी भाषेची स्पेलिंग व्यवस्थित होती. रक्त blud होतं, लिहिणं rite होतं, बिबट्या lepard होता, साखर shugar होती.

इंग्लंडमध्ये राजेशाही होती. अर्थातच सामान्य जनतेची मुलं शाळेत जात होती. राजाचा मुलगा शाळेत कशाला जाईल? शिक्षकच राजवाड्यात येऊन त्याला शिकवत. एक दिवस राजकुमाराचं इंग्रजीचं शिक्षण चाललं होतं. शिक्षकांनी त्याला ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग विचारलं. राजकुमारानं बुद्धी राणीकडून घेतलेली होती. त्याला काही केल्या ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग आठवेना. त्यानी अंदाजानी ठोकून द्यायला सुरवात केली, “डब्ल्यू . . . . आर. . . .”.

“नाही. बाळराजे”, शिक्षकांनी हळुवारपणे हस्तक्षेप केला. (अर्थातच हळुवारपणे. राजकुमाराच्या कानाखाली आवाज काढायची कुणाची शामत असते काय?) "तुमचं स्पेलिंग चुकतंय बाळराजे."

आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी नेमकी तेव्हांच राणी शेजारून चालली होती. आपल्या बाळराजाचं स्पेलिंग चुकलं ? हे कसं शक्य आहे ? तिनी स्वतः मुलाला रॉन्गचं स्पेलिंग विचारलं. त्या म्हशाच्या डोक्यात ‘डब्ल्यू’ घट्ट बसलेला होता. त्यानं सांगितलं “डब्ल्यू आर ओ एन जी – रॉन्ग”. राणी काळजीत पडली. उद्या हा गादीवर बसला की त्याचं हसं होईल. काय करावं ?

जर महम्मद डोंगरापर्यंत जाणार नसेल तर डोंगरच महम्मदकडे आणावा. तिनी बाळराजांना सगळ्या शब्दांची स्पेलिंग विचारली. त्यानी मनाला वाटेल ती उत्तरं दिली. सगळी नोकरांकरवी लिहून घेतली गेली.

दुसर्या दिवशी इंग्लंडभर दवंड्या पिटल्या गेल्या. “आत्तापासून ही नवीन स्पेलिंग बरोबर धरली जातील. जुनी विसरून जा.”

हे सगळं होत असताना राजा स्वारीला गेलेला होता. परत आल्यावर त्याला ही हकीकत समजली. तो हैराण. हा मूर्खपणा त्याला अजिबात पसंत नव्हता. पण राजा असला तरी तो नवरा होता. राणीच्या हट्टापुढे तोही हतबल.

आपल्या पु.लं. नी देखील एका कथेत लिहिलं आहे – रामरायाला काय म्हाइत नव्ह्तं काय का सोन्याचं हरीन बिरीन काय पन नसतं मनून? पन बायकोच्या हट्टापुडं कोनाचं काय चालनार? शीतामाई म्हनली असती, “खा कंदमुळं अन् कोपर्यात पडा चीप.” तो गेला हरीन आनायला अन् रामायन घडलं.

सांगायचा मुद्दा काय, तर राजाराणीचा जाम वाद झाला पण नेहमीप्रमाणे राणी जिंकलीच. आपला पोरगा शुद्ध बैलोबा आहे हे राजाला माहीत होतं. त्याचं थोबाड फोडायला राजाचे हात शिवशिवत होते पण तो तर राणीसाहेबांचा लाडका. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तर निदान प्रतीकात्मक तरी फोडायचं राजाने ठरवलं. म्हणून या नवीन स्पेलिंग्जचा जो शब्दकोश बनवला त्याला नाव त्यानी ठेवलं बैलाची धुलाई अर्थात ‘ऑक्स-फोड’. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश ‘ऑक्सफोर्ड’ असा झाला.

तेव्हांपासून ऑक्सफोर्ड शब्दकोशाला जगन्मान्यता मिळाली आणि त्यातली स्पेलिंग आणि उच्चार आपल्या मानगुटीवर बसले ते आजपर्यंत !

वाईटातही चांगलं शोधायलाच हवं. जर का तेव्हां राजकुमाराचा गणिताचा किंवा विज्ञानाचा अभ्यास चालला असता तर? सगळे अबाउट टर्न करून परत अश्मयुगात गेलो असतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Biggrin

इंग्रजी खिचडखाना भाषा असल्याने ती अनेक भाषांचे व्याकरण उधार घेऊन अशी भेळ करते. >> हे मात्र खरं.

2 good Happy

दिनेश दा,
सही फर्माया....जर्मन आहे ह्याला अपवाद....तिथे सगळा what you see is what you get चा मामला.
अगदी Orange चे स्पेलींग इंग्रजी असुन ही उच्चार मात्र ओरांगss असा करतात. स्पॅनीश मधे ही हीच तर्‍हा !!

लोकहो,

हे खास ससेक्सबोलीचे उच्चार बरंका :

----------------------------------------------------------------------
स्थानिक उच्चार - वर्णक्रम (स्पेलिंग) - देवनागरी
----------------------------------------------------------------------
Ahson - Alciston - आह्सन
Arndel - Arundel - आर्नडेल
Chanklebury - Chanctonbury - शांकलबरी
Charnton - Chalvington - शाऽनटन
Chiddester - Chichester - चिडेस्टाऽ
Envul - Henfield - एन्वूल
Furrel - Firle - फाराल
Gorun - Goring - गाओरन
Heffel - Heathfield - हेफेल
Helsum - Hailsham - हेल्सम
Hors-am - Horsham - हॉर्स-अम
Lunnon - London - लुनन
Medhas - Midhurst - मेडास
Merricur - America - 'मरिकऽऽ
Pemsy - Pevensey - पेम्झी
Pettuth - Petworth - पेटअथ
Stammer - Stanmer - स्टॅमर
Tarrun - Tarring - टारन
Simson - Selmeston - सिम्सन
Blashnun - Blatchington - ब्लाशनन
----------------------------------------------------------------------

स्रोत : विकी

हेनफील्ड, हीथफील्ड, अमेरिका यांचे उच्चार लय भारी हैत! Uhoh

आ.न.,
-गा.पै.

माझी पण कधी कधी युरोपियन ग्राहकांची नावे उच्चारताना भंबेरी उडते. तेव्हा त्यांनाच विचारतो की मी तुमचे नाव बरोबर उच्चारले की नाही.

बाकी जर्मन, फ्रेंच ग्राहकांशी बोलताना त्यांचीं इंग्रजीविषयीची नापसंती बर्‍याच वेळेला दिसते.

मस्त! Lol

मस्तच घेतलंय हां इंग्रजीला. Happy

सुदैवानं आम्हाला शाळेत असतानाच स्पेलिंगं लक्षात ठेवायची ट्रिक सापडली होती आणि अजूनही तीच उपयोगी पडते या अडग्या भाषेशी लढताना... सगळे शब्द आम्ही उच्चाराप्रमाणंच लक्षात ठेवायचो. उदाहरणार्थ, थिएटर हा शब्द थेअत्रे असाच लक्षात ठेवायचा. सायकॉलॉजीसाठी पसायचोलोग्य. आणि ते नटुरे-फुटुरे सुद्धा. मग काय बिशाद आहे कधी स्पेलिंग चुकायची? सुरुवातीला विचित्र वाटायचं पण आता सवय झाल्यावर काही वाटत नाही.

तुम्ही छान लिहिलंय... आणि ती पुण्यातल्या वन-वेची फोडणी पण मस्त... Lol

बाकी जर्मन, फ्रेंच ग्राहकांशी बोलताना त्यांचीं इंग्रजीविषयीची नापसंती बर्‍याच वेळेला दिसते. >>> मी तर असाही अनुभव घेतलाय की समोरच्या माणसाला अगदी व्यवस्थित इंग्रजी बोलता येतं पण तो बोलत नाही. फ्रेंच माणूस बोलायला अवेलेबल झाल्यावर मात्र छान फ्रेंच अन इंग्रजीही बोलतात. Happy

देवा हे तर काहिच नाही....फ्रेंच स्पेलिंग्स आणि उच्चार पहा एक्दा.....कहर

माझ्या भाचीची चौथी इंग्रजीची पुस्तके आणली आहेत. त्यातील इंग्लिश बालभारतीतील एक कविता...

"Why English is so Hard..."

We'll begin with a box and the plural is boxes
But the plural of ox should be oxen, not oxes
You may find a lone mouse or a whole lot of mice,
But the plural of house is houses, not hice
If the plural of man is always called men,
Why shouldn't the plural of pan be called pen?
And I speak of a foot and you show me your feet
But I give you a boot; would a pair be called beet?
That one may be that, and three may be those,
Yet the plural of hat would never be hose
The masculine pronouns are he, his and him,
But imagine the feminine she, shis and shim!
So our English I think you will all agree,
Is the trickiest language you ever did see.

vt220>>> Happy

vt220>>> Happy Happy

VT220, छान आहे कविता... अचूक उदाहरणे आहेत. आश्चर्य म्हणजे ही पाठ्यपुस्तकात आहे.
इथे दिल्याबद्दल धन्यवाद.

vt220 धन्यवाद.

बालभारतीत ही घेतली आहे ही कौतुकाची गोष्ट आहे.

असल्या भाषेचं लोढणं गळ्यात घेऊन ह्या लोकांनी जगावर राज्य केलं ही वस्तुस्थिती देखील आश्चर्यजनकच आहे.

स्वीट टॉकर,

यांनी जगावर राज्य केलं ते इंग्रजीच्या जोरावर नाही. यांचं जगावर राज्य होतं म्हणून इंग्रजी जगभर पसरली आहे. Happy

आ.न.,
-गा.पै.

इंग्रजानी राज्य केलं ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर म्हणजेच आधुनिक शस्त्रात्रांच्या बळावर आणि त्यांच्या दर्यावर्दी साहसशीलतेवर. जेव्हा इतर देश समुद्रलंघन म्हनजे पाप हो पाप असे पसरवण्यात मग्न होते. शिवाय माझे नाक कापले तरी चालेल पण दुस र्‍यास अपशकून झाला पाहिजे या वृत्तीची , तसेच एक तुकडा फेकला की इमान विकण्याच्ती वृत्ती अचूक हेरण्याची दूर्दृष्टीच्या बळावर...

हो लीम्बुतींबू पाठ्यपुस्तकात ते सुद्धा SSC इंग्रजी माध्यमाच्या! म्हणूनच शेअर करावी वाटली. कवीचे नाव नाही दिले आहे. Happy

>>>>यांनी जगावर राज्य केलं ते इंग्रजीच्या जोरावर नाही. यांचं जगावर राज्य होतं म्हणून इंग्रजी जगभर पसरली आहे. स्मित>>> +१

>>>> इंग्रजानी राज्य केलं ते आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोरावर म्हणजेच आधुनिक शस्त्रात्रांच्या बळावर आणि त्यांच्या दर्यावर्दी साहसशीलतेवर. >>> +१
माझ्या भावाच्या मते आपण अजून सुधारलो नाहीत. अजून स्वत:ची technology शोधण्याऐवजी परदेशी तंत्रज्ञान आयात करतो आहोत. आपल्याकडे थोरियम आहे तरी परदेशातून महागडे युरेनियम आयात करीत आहोत. असो ह्या धाग्यासाठी हे अवांतर होईल आणि मला तेवढ्या मुद्देसूद मांडताही येणार नाही! Happy

आपल्या मराठीमध्ये 'प्रत्यय' ही संकल्पना असल्याने वाक्यातील शब्दांची जागा बदलली तरी विशेष फरक पडत नाही, मात्र इंग्रजीमध्ये शब्दाला 'प्रत्यय' नसल्याने शब्दांची जागा बदलली तर एकतर वाक्य अर्थहीन तरी होते, किंवा वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो तरी. कसे ते पहा:
'रामाने रावणाला मारले' या मराठी वाक्यातील शब्दांच्या जागा बदलून पाहू.
१. रावणाला रामाने मारले.
२. मारले रामाने रावणाला.
३. मारले रावणाला रामाने

आता हेच 'Ram killed Ravan' या वाक्यातील शब्दांच्या जागा बदलून पाहू.
1. Ravan killed ram (!)
2. Killed Ram Ravan (?)
3. Killed Ravan Ram (?)

मराठीमध्ये शब्दांच्या जागा बदलल्या असता तयार झालेली अन्य ३ वाक्ये आपल्या मूळ अर्थाला धरून आहेत, मात्र इंग्रजीमध्ये शब्दांच्या जागा बदलण्याचा प्रयोग केला असता २ वाक्ये अर्थहीन तर १ वाक्य पूर्णपणे विरोधी अर्थाचे होते!

आपल्या मराठीमध्ये 'प्रत्यय' ही संकल्पना असल्याने वाक्यातील शब्दांची जागा बदलली तरी विशेष फरक पडत नाही, मात्र इंग्रजीमध्ये शब्दाला 'प्रत्यय' नसल्याने शब्दांची जागा बदलली तर एकतर वाक्य अर्थहीन तरी होते, किंवा वाक्याचा अर्थ पूर्णपणे बदलतो तरी. कसे ते पहा:
<<
ह्याची दुसरी बाजू म्हणजे डझनावारी प्रत्यय असणारी भाषा शिकणे अवघड असते. नुसते राम आणि रावण शिकून पुरत नाही तर ला, स, ते, चा, ची, चे, साठी, पासून असे अनेक प्रत्यय शिकावे लागतात. कधी कधी असे प्रत्यय लागले की नामही थोडे बदलते. रावणला नाही तर रावणाला. सीताला नाही तर सीतेला. हे शिकणे ही नव्या विद्यार्थ्याला एक डोकेदुखी ठरू शकते.

हे शिकणे ही नव्या विद्यार्थ्याला एक डोकेदुखी ठरू शकते. >>>>> आपण '' विद्यार्थी '' असू तर एखादी गोष्ट योग्य तर्‍हेने, बिनचूक, सखोल शिकणे ही डोकेदुखी की विद्यार्जन?
अवांतराबद्दल क्षमस्व, स्वीट टॉकर.

<<<<माझ्या भावाच्या मते आपण अजून सुधारलो नाहीत. अजून स्वत:ची technology शोधण्याऐवजी परदेशी तंत्रज्ञान आयात करतो >>>>
सध्याच्या परिस्थितीत त्याला इलाज नाही. परदेशी तंत्रज्ञान घेतले नाही तर काय आपण नवीन तंत्रज्ञान शोधेस्तवर वाट बघायची?

हे परदेशी तंत्रज्ञान अव्याहतपणे गेली पाचशे वर्षे तरी हळू हळू विकसित होत गेले आहे. आपण काय केले गेली पाचशे वर्षे?
१७१७ ते १८१७ महाराष्ट्रात अत्यंत बलशाली अश्या पेशव्यांचे राज्य होते. श्रीमंत होते म्हणे ते. काय सुधारणा, नवीन शोध लावले ज्याचा आज फायदा होणार आहे? याच काळात यूरोप मधे काय प्रगति झाली तंत्रज्ञानात?

झाले गेले जाउ द्या.
आ़ज जी परिस्थिती आहे त्याला सामोरे जा. आपण संशोधन करू तेंव्हा करू - तोपर्यंत इंग्रजी शिकणे भाग आहे - ऑस्ट्रेलियात जायचे तर तिथले इंग्रजी, अमेरिकेत यायचे तर इथले इंग्रजी नि इथली स्पेलिंग्स शिकायला पाहिजेत. इंग्लंडमधे सुद्धा निरनिराळ्या ठिकाणी निरनिराळे इंग्रजी बोलतात म्हणे.

>>
हे शिकणे ही नव्या विद्यार्थ्याला एक डोकेदुखी ठरू शकते. >>>>> आपण '' विद्यार्थी '' असू तर एखादी गोष्ट योग्य तर्‍हेने, बिनचूक, सखोल शिकणे ही डोकेदुखी की विद्यार्जन?
अवांतराबद्दल क्षमस्व, स्वीट टॉकर.
<<
मग हाच विचार इंग्रजीतल्या स्पेलिंगकरता का लागू करू नये? इंग्रजी स्पेलिंगला तर्कशून्य म्हटलेले चालत असेल तर क्लिष्ट विभक्ती प्रत्यय आणि त्याचे नियम ह्यांना किचकट म्हटलेले का बरे खुपावे?
हे अवांतर नाही. क्षमस्व स्वीट टॉकर आणि अन्य!

प्रत्येक भाषेत असे सूक्ष्म भेदाभेद असणे शक्य असते.ज्यांची मातृभाषा मराठीच आहे, ते " मी पुण्यात राहतो " व मी पुण्याचे ( उच्चार पुण्ण्याचे ) काम केले ." अशी वाक्ये बरोबर वाचतात अथवा उच्चारतात , पण ज्याची मातृभाषा मराठी नाही, त्याचा मात्र गोंधळच होणार. अहिराणी भाषेशी ज्यांचा परिचय आहे त्यांना सुद्धा हे समजेल की , " मी हाही काम करं " व " तू हाही काम कर " ही दोन्ही वाक्ये दिसायला सारखी दिसत असली तरी शेवटच्या र वर अनुस्वार दिल्याने ,पहिल्या वाक्यातील ' करं ' चा अर्थ ( काम ) केले , म्हणजे भूतकाळ दर्शवितो, तर दुसऱ्या वाक्यातील ' कर ' शब्दाने वाक्य आज्ञावाचक झाले आहे.येथे लिखाणाबरोबर उच्चाराचाही संबंध येतो. मागे लोकप्रभा मध्ये याबाबतीत एक छान लेख मालिका आली होती, ज्यामध्ये मराठी कुटुंबात मद्रासी पाहुणी राहावयास व मराठी शिकण्यासाठी येते आणि ह्याच लेखनाचा धागा पकडून लेख सुंदर लिहिण्यात आले होते.
तेंव्हा भाषा कोणतीही असली तरी शिकावयाची म्हटली तर ती ,तिच्या गुण-दोषा सहीतच आत्मसात करावी लागेल

Pages