इंग्रजी स्पेलिंग्ज आणि उच्चार इतके तर्कशून्य का?

Submitted by स्वीट टॉकर on 3 February, 2015 - 02:56

माझं शिक्षण मराठी माध्यमातून मजेत चाललं होतं. पण मुंबईला स्थलांतरित झालो, आणि समस्या उभी राहिली. जवळच्या मराठी माध्यमाच्या शाळांमध्ये प्रवेश मिळेना.

किंग जॉर्ज शाळेत त्याच वर्षी इंग्रजी माध्यम सुरू होत होतं. तिथे प्रवेश मिळाला आणि मी रुजू झालो. नशिबानी माझे सगळेच वर्गमित्र मराठी माध्यमातून आले असल्यामुळे आम्ही सगळेच बावचळलेले असायचो. आमचे इंग्रजीचे शिक्षक अतिशय उत्तम शिकवायचे. थोड्याच महिन्यात त्यांनी आम्हाला अज्ञानाच्या चिखलातून काढून गोंधळाच्या चिखलात आणून सोडलं. पण ती चूक आमच्या शिक्षकांची अजिबात नव्हती. इंग्रजी भाषेची होती.

त्यांनी आम्हाला उच्चारांचे नियम शिकवले. A चा उच्चार ऍ किंवा अ, e चा ए, i चा इ, o चा ओ किंवा ऑ, u चा उ किंवा अ, डबल ई चा ई, डबल ओ चा ऊ वगैरे वगैरे. आम्ही ते आज्ञाधारकपणे पाठ केले. वापरायला सुरवात केल्यावर मात्र असं लक्षात आलं की जितके शब्द नियमात बसतात तितकेच नियमबाह्य आहेत. आपण मराठीत अपवाद हा शब्द वापरतो कारण नव्व्याण्णव टक्के नियमात, म्हणून एक टक्का अपवाद. इथे अपवादच अपवाद. मग नियमांना किंमत काय?

आमची स्थिती पुण्यामध्ये वन वे रस्त्यावर योग्य दिशेनी वाहन चालवणारयांसारखी व्हायची. इतकी वाहनं चुकीच्या दिशेनी येतात की आपणच चुकतो आहोत की काय असं वाटायला लागतं. दुहेरी वाहतुकीच्या रस्त्यावर आपण डाव्या अर्ध्यामध्ये चालवतो. पण या वन वे मध्ये उलटे येणार्यांची एक खासियत असते. एकदा दिशेचा नियम मोडलाच आहे म्हटल्यावर यांना डाव्या उजव्याचंही सोयरसुतक राहात नाही. कुठूनही येतात. मात्र हेडलाइट लावून. चोरोंके भी असूल होते हैं.

इंग्रजीचे शब्दही असेच. ‘डबल ओ’ चा उच्चार ‘ऊ’ होतो हे आम्हाला पाठ. लुक, बुक वगैरे. मग ‘ब्लुड’ का नाही? त्याचा उच्चार ‘ब्लड’ करावा हे कुणी ठरवलं? असं आहे का, की ‘ब्लुड’ अशा उच्चाराचा दुसरा एखादा शब्द आहे आणि त्याचा आणि blood या शब्दाचा गोंधळ होऊ नये म्हणून एक विचारी भाषाशास्त्रज्ञानी हा निर्णय घेतला? अजिबात नाही. म्हणजे हा पूर्णपणे Random Decision आहे.

एक महत्वाची गोष्ट नेहमी आपण शिकतो. ती म्हणजे कुठल्याही बाबतीत Random Decision घ्यायचा नसतो. प्रत्येक निर्णय हा उपलब्ध माहिती (Available Data) आणि तर्क (Logic) यावरच घ्यायचा. मग याच भाषेच्या बाबतीत असं का?

बरं, आता कुठला शब्द नियमाप्रमाणे उच्चारायचा आणि कुठचा वेडावाकडा हे आम्हाला कसं कळणार? तर ते ‘ऑक्सफोर्ड’ नावाच्या शब्दकोशातून. ‘ऑक्सफोर्ड’ ह्या शब्दाची उत्पत्ती ‘ऑक्स-फोड’ या जोडशब्दात आहे. त्याबद्दल मी पुढे तुम्हाला सांगेनच.

War ‘वॅर’ नव्हे, वॉर.
Son सॉन नव्हे, सन.
‘ow’ हे n च्या नंतर लागले, उदा. now, की त्याचा उच्चार औ.
तेच ‘ow’ हे n च्या आधी लागले, उदा own, की त्याचा उच्चार ओ.
One म्हणजे ‘वन’. ह्यातला ‘व’ हा उच्चार कुठून आला? देवास ठाऊक !

उदाहरणं द्यावी तितकी थोडी. पण ते जाऊ द्या. कळस म्हणजे निःशब्द (silent) अक्षरं ! ती पाठ करायची, लिहायची देखील. पण उच्चार करायचा नाही ! म्हणजे खिसा खालून न शिवण्यासारखं. दिसतो खिशासारखा, आत हात देखील घालता येतो. पण काही ठेवलं की खालून बाहेर पडतं ! हॅ हॅ हॅ हॅ ! याला भाषा म्हणायची, विनोद म्हणायचा का अक्कलशून्यपणा?

या सगळ्यांचा बाप म्हणजे silent & anti-silent अक्षरं एकत्र ! काही लिहिलेली अक्षरं वाचायची पण त्यांचा उच्चार करायचा नाही. त्याऐवजी एक न लिहिलेलं अक्षर तिथे आहे अशी कल्पना करायची आणि त्याचा उच्चार करायचा ! शब्द आहे ‘कर्नल’. स्पेलिंग आहे colonel. ‘एल्’ चा उच्चार करायचा नाही. त्याच्या नंतरच्या ‘ओ’ चा ही उच्चार करायचा नाही. त्या दोघांऐवजी तिथे ‘आर’ आहे अशी कल्पना करायची, आणि त्याचा उच्चार करायचा. आधीच्या ‘ओ’ चा उच्चार ‘अ’ असा करायचा. सोप्पं आहे की नाही?

थोडक्यात काय, तर नुसता नियम माहीत असून काहीही उपयोग होऊ नये, सगळे शब्द पाठच करायला लागावे अशी व्यवस्था केलेली आहे. शालेय जीवनातलं समांतर उदाहरण द्यायचं म्हटलं तर असं म्हणता येईल. शाळा जर मोठी असेल तर शाळेच्या इमारतीच्या तळमजल्यावर कोठला वर्ग कुठे आहे याचा नकाशा लावलेला असतो. शिवाय साधारणपणे एकाच इयत्तेचे वर्ग एका मजल्यावर असतात. प्रत्येक वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिलेली असते. असं समजा की कुठलाही वर्ग कुठेही भरवला, एकाही वर्गावर इयत्ता आणि तुकडी लिहिली नाही तर काय होईल? मुलं आणि शिक्षकांना ते समजेपर्यंत भटक भटक भटकायला लागेल. पालक तर हरवूनच जातील. वर म्हणायचं, “त्यात काय इतकं? एकदा पाठ झालं की काही प्रॉब्लेम येत नाही!”

असं तर काही शक्य नाही की कित्येक भाषापंडित एकत्र बसले आणि त्यांनी ठरवलं, “आपण एक तर्कशून्य स्पेलिंग आणि उच्चार असलेली भाषा बनवूया.” मग ही भाषा अशी झाली तरी कशी?

मला माहीत आहे याचं कारण. एकदा भाषांतरदेवी माझ्या स्वप्नात आली होती. तिनी मला सांगितलं. मी तुम्हाला सांगतो.

सुरवातीला इंग्रजी भाषेची स्पेलिंग व्यवस्थित होती. रक्त blud होतं, लिहिणं rite होतं, बिबट्या lepard होता, साखर shugar होती.

इंग्लंडमध्ये राजेशाही होती. अर्थातच सामान्य जनतेची मुलं शाळेत जात होती. राजाचा मुलगा शाळेत कशाला जाईल? शिक्षकच राजवाड्यात येऊन त्याला शिकवत. एक दिवस राजकुमाराचं इंग्रजीचं शिक्षण चाललं होतं. शिक्षकांनी त्याला ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग विचारलं. राजकुमारानं बुद्धी राणीकडून घेतलेली होती. त्याला काही केल्या ‘रॉन्ग’ चं स्पेलिंग आठवेना. त्यानी अंदाजानी ठोकून द्यायला सुरवात केली, “डब्ल्यू . . . . आर. . . .”.

“नाही. बाळराजे”, शिक्षकांनी हळुवारपणे हस्तक्षेप केला. (अर्थातच हळुवारपणे. राजकुमाराच्या कानाखाली आवाज काढायची कुणाची शामत असते काय?) "तुमचं स्पेलिंग चुकतंय बाळराजे."

आपल्या सर्वांच्या दुर्दैवानी नेमकी तेव्हांच राणी शेजारून चालली होती. आपल्या बाळराजाचं स्पेलिंग चुकलं ? हे कसं शक्य आहे ? तिनी स्वतः मुलाला रॉन्गचं स्पेलिंग विचारलं. त्या म्हशाच्या डोक्यात ‘डब्ल्यू’ घट्ट बसलेला होता. त्यानं सांगितलं “डब्ल्यू आर ओ एन जी – रॉन्ग”. राणी काळजीत पडली. उद्या हा गादीवर बसला की त्याचं हसं होईल. काय करावं ?

जर महम्मद डोंगरापर्यंत जाणार नसेल तर डोंगरच महम्मदकडे आणावा. तिनी बाळराजांना सगळ्या शब्दांची स्पेलिंग विचारली. त्यानी मनाला वाटेल ती उत्तरं दिली. सगळी नोकरांकरवी लिहून घेतली गेली.

दुसर्या दिवशी इंग्लंडभर दवंड्या पिटल्या गेल्या. “आत्तापासून ही नवीन स्पेलिंग बरोबर धरली जातील. जुनी विसरून जा.”

हे सगळं होत असताना राजा स्वारीला गेलेला होता. परत आल्यावर त्याला ही हकीकत समजली. तो हैराण. हा मूर्खपणा त्याला अजिबात पसंत नव्हता. पण राजा असला तरी तो नवरा होता. राणीच्या हट्टापुढे तोही हतबल.

आपल्या पु.लं. नी देखील एका कथेत लिहिलं आहे – रामरायाला काय म्हाइत नव्ह्तं काय का सोन्याचं हरीन बिरीन काय पन नसतं मनून? पन बायकोच्या हट्टापुडं कोनाचं काय चालनार? शीतामाई म्हनली असती, “खा कंदमुळं अन् कोपर्यात पडा चीप.” तो गेला हरीन आनायला अन् रामायन घडलं.

सांगायचा मुद्दा काय, तर राजाराणीचा जाम वाद झाला पण नेहमीप्रमाणे राणी जिंकलीच. आपला पोरगा शुद्ध बैलोबा आहे हे राजाला माहीत होतं. त्याचं थोबाड फोडायला राजाचे हात शिवशिवत होते पण तो तर राणीसाहेबांचा लाडका. त्यामुळे प्रत्यक्षात नाही तर निदान प्रतीकात्मक तरी फोडायचं राजाने ठरवलं. म्हणून या नवीन स्पेलिंग्जचा जो शब्दकोश बनवला त्याला नाव त्यानी ठेवलं बैलाची धुलाई अर्थात ‘ऑक्स-फोड’. याच शब्दाचा पुढे अपभ्रंश ‘ऑक्सफोर्ड’ असा झाला.

तेव्हांपासून ऑक्सफोर्ड शब्दकोशाला जगन्मान्यता मिळाली आणि त्यातली स्पेलिंग आणि उच्चार आपल्या मानगुटीवर बसले ते आजपर्यंत !

वाईटातही चांगलं शोधायलाच हवं. जर का तेव्हां राजकुमाराचा गणिताचा किंवा विज्ञानाचा अभ्यास चालला असता तर? सगळे अबाउट टर्न करून परत अश्मयुगात गेलो असतो!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>>> o= इ (women), <<< अरे हा उच्चार विमेन तसच वुमेन असाही केला जातो ना? म्हणजे आम्ही तरी वुमेन असाच शिकलो होतो, मग काही लोक आले अन त्यान्नी विमेन म्हणायला सांगितले.

Lol Lol
शाळेत एकदा 'अवर' शिकतांना लक्ष नसल्याने 'हवर' उच्चार करून मार खाल्ल्याची वेदनादायी आठवण जागी झाली. Sad

आमचा अमेरिकेत शिकलेला देसी बॉस् शेड्युल ला स्केडुल म्हणतो आणि आम्हालाही तीच सवय लावली आहे Sad .
लेकाला फोनिक्स सुरु झालं आहे , सुरवातीला सोप वाटलं आता कळतं सेम रूल प्रत्येक ठिकाणि नाही वापरता येत .
तरी नशिब अजून लेकाच्या लक्शात आल नाही आहे , नाहीतर सरबत्ती सुरु होईल .

स्वीट टॉकर,

आजूनेक नेहमीचा नमुना म्हणजे रीड-रेड-रेड अर्थात read-read-read! एकाच वर्णक्रमाचे दोन वेगळे उच्चार!! झेपत नाय बुवा अगदीच! Happy

फर्मचा वर्णक्रम farm न होता firm होतो. फार्म म्हणजे faarm हवं ना? डच भाषेत aa असा स्वर आहे, तसा इंग्रजीत हवा होता.

firm, shirt, virtual यांतल्या i च्या अ अशा उच्चाराचं स्पष्टीकरण आहे. जुन्या इंग्रजीत तिथे y असून त्याचा स्वर अ होता म्हणे. उदा. : fyrth (फर्थ). त्याचा नव्या इंग्रजीत i झाला. y चा अ (आणि u चा ई) असा उच्चार गॅलिक भाषेची देणगी आहे.

उदा. : cymru हे गॅलिक वेल्श भाषेत कमरी असं उच्चारतात. मला सिमरू वाटलेलं Proud

आ.न.,
-गा.पै.

यावरुन एक विनोद आठवला...
एक विद्द्यार्थी शिक्षकांना विचारतो - सर, नटुरे म्हणजे काय?
सर हैराण होतात पण उद्या सांगतो म्हणुन वेळ मारुन नेतात.
दुसर्या दिवशीही तेच होतं!!
सर इकडुन तिकडुन शोधायचा प्रयत्न करतात पण छे!
आता सर त्याला टाळु लागतात, तो दिसला की रस्ता बदलु लागतात.
पण हा बाबाजी काही त्यांची पाठ सोडत नाही!
एक दिवस हैराण होउन ते त्याला विचारतात - बर सांग बघु तुझ्या त्या नटुरे चं स्पेलींग.
विद्यार्थी - NATURE
आता मात्रं सरांच टाळकं सटकतं!!
इतके दिवस माझं डोकं खाल्लं, शिक्षकांना चुकीचे प्र्श्न विचारुन त्रास देतोसं, चल तुला प्रिन्सिपल कडेच घेउन जातो आता....

विद्यार्थी - सर, सर नका हो असं करु... तुम्ही मला प्रिन्सिपल कडे नेल तर माझं फुटुरे खराब होईल हो!!!

लेख इंटरेस्टींग आहे असामी ..

ह्याचा अर्थ तिथेच म्हंटलंय तसं कोणा फँसी पँट्स ला "आली लहर आणि केला कहर" हेच कारण आहे भरपूर इल्लॉजिकल स्पेलींग्ज् असण्यात ..

>> Don't they look classier that way?

ह्याच्या आधी त्यांनीं ते शब्द ग्रीक मधून आले आहेत असं लिहीलंय ते लिहीलं नसतं तर फक्त त्या शब्दांवर कदचित पॉज् केलं गेलं असतं स्पेलींग असं का ह्याकरता .. पण ते "क्लासीयर" आहेत असं वाटलं असतं का आपल्याला? Happy

अंतू.... Lol
असामी... इतका मोठा लेख नै रे वाचता येत आताशा.. थोडा सारांश तुच दे ना इथे !
गामा.. अगदी अगदी. - अजुन उदाहरणे येऊ देत. (माझा इंग्रजीचा अभ्यास इयत्ता पाचवी इतकाच आहे, म्हणून तुम्हा लोकांना विनंती करतोय)

अगदी खुशखुशीत लेख!
खरे म्हटले तर या सर्व युरोपीय भाषांची जननी लॅटिन मध्ये कधी असे प्रश्न निर्माण होत नाहीत. इंग्रजीत होतात याचे कारण स्पेलिंगज syllable बेस्ड नसतात. म्हणजे आपण कसे ऊ साठी एकच अक्षर वापरतो आणि ते अनेक वापरतात तसे. लॅटिन याची वेगळ्याप्रकारे सोय लावते. आपल्याला लहानपणी पडलेले सगळे प्रश्न लॅटिन मध्ये सुटतात to टू आणि go गू क्यों नहीं होता टाइप्स. इंग्रजी खिचडखाना भाषा असल्याने ती अनेक भाषांचे व्याकरण उधार घेऊन अशी भेळ करते.
विषयांतर झाले असल्यास क्षमस्व Happy

मस्त !

असामी,

मस्त लेख आहे. धन्यवाद!:-)

लेखातील दुसरा मुद्दा रोचक आहे. थोडी भर घालतो.

१. १४ व्या शतकाच्या अखेरीपर्यंत इंग्लंडच्या राजघराण्याची अधिकृत भाषा फ्रेंच होती.

२. जर्मन भाषिक पहिला जॉर्ज जेव्हा इंग्लंडचा राजा झाला (इ.स. १७०० च्या आसपास) तेव्हा तो इंग्रजीत ठार निरक्षर होता. त्याने इंग्रजी शिकायला नकारही दिला होता.

आ.न.,
-गा.पै.

सर्वजण,

धन्यवाद.

स्पेलिंग्जची जखम कायमच ठसठसंत राहाणार. ती बरी करता येत नाही त्यामुळे त्यावर विनोदाची फुंकर घालण्याचा प्रयत्न.

पाचवी, सहावीमध्ये नुकतेच वोवेल्सच्या मदतीने उच्चार करायला शिकल्यावर मी "हिरे" कुटुंबाच्या मालमत्तेने खूप प्रभावित झालेले. रस्त्यावरचे सगळेच टेम्पो, ट्रक त्यांच्या मालकीचे असायचे! (For "Hire") Proud

>>> खुद्द G B Shaw यांनी या भाषेची टर उडवली आहे ती अशी :
'ghoti' चा उच्चार काय ?
उत्तर आहे 'फिश'
कसे? तर पहा : gh = फ (e.g. enough), o= इ (women), ti = श (nation) !!!

फार छान

एका आय.टी.आय. प्रशिक्षीत उमेदवाराचे अ‍ॅप्लिकेशन येऊन पडले होते. ते अ‍ॅप्लिकेशन माझा अमराठी सहकारी वाचत होता. मधेच मला विचारले "यार गिरी, ये 'डाईव्ह' गाव कहांपे आता है? पहली बार ये नाम सुन रहा हुं?"
मी क्षणभर Uhoh मग त्याला म्हणालो की जरा दाखव त्याचा बायोडेटा.
मग मात्र, त्याला म्हणालो की अरे वो डाईव्ह नही, दिवे है. अपना दिवेघाट वाला दिवे गाव.

Lol

Pages