आयुष्यातील पहिलेवहिले .. - प्रेम, बीअर आणि मंगळ !

Submitted by ऋन्मेऽऽष on 26 January, 2015 - 05:07

..

"आयुष्यातले... पहिलेवहिले !..

हे दोन शब्द ऐकताच किमान अठ्ठ्याण्णव टक्के लोकांना आपले पहिले प्रेमच आठवते!
मग मी तरी त्याला अपवाद कसा ठरू !

पहिले प्रेम!.. जे बरेचदा अजाणत्या वयात होते. काही जण त्या वयाला नादान वय म्हणतात. सहजपणे बहकण्याचे वय म्हणतात. बहुधा म्हणूनच त्या प्रेमाला प्रेम न म्हणता आकर्षणाचे नाव दिले जाते. पण मला नाही तसे वाटत. किंबहुना कित्येकदा तेच खरे प्रेम वाटते, कारण ते कोणत्याही अपेक्षांशिवाय केलेले असते. एकदा का अक्कल आली की मग प्रेमही तोलून मापून केले जाते. पण कोवळ्या वयातल्या पहिल्या प्रेमाचे तसे नसते, ते थेट मनाचे ऐकून केले जाते. बहुधा म्हणूनच ते मनात कायम घर करून राहते. ना ते विसरले जाते, ना त्याची जागा दुसरे कोणी घेऊ शकते. तेच ते पहिले प्रेम, जे माझ्या आयुष्यात यायला सतरावे वर्ष उजाडावे लागले.

ज्युनिअर कॉलेजचे पहिले वर्ष!, काही औरच असते. माझेही तसेच होते. शिस्तीच्या बंधनातून मोकाट सुटलेल्या अपेक्षाही गगनावर होत्या. दहावी आणि बारावी हि दोनच वर्षे आयुष्यातील महत्वाची शैक्षणिक वर्षे हे घरच्यांनी ईयत्ता पाचवीपासून मनावर ठाम बिंबवलेले. मग या दोघांमध्ये अकरावीचे वर्ष खास मौजमजा करण्यासाठीच असते असा माझा समज झाल्यास नवल नसावे. पण हाय रे दैवा!, करीअर करीअर म्हणता म्हणता आपण चुकीच्या जागी आलोय हे आठवड्याभरातच समजून चुकले. आमच्या विज्ञानशाखेला सुंदर मुलींची वानवा आणि याउलट कला शाखेत पेटलेला वणवा. मग ते वर्ष वर्गात कमी आणि कॉलेजच्या कॅम्पसमध्येच ऊंडारण्यात जास्त जायचे होते.

पण दुसर्‍याच आठवड्यात कट्ट्याचा शोध लागला आणि वर्षभरासाठी मेंबरशिप घेऊन टाकली. बाकी दरवर्षी शाळेला सोबती म्हणून येणार्‍या जूनच्या पावसाने इथे अगोदरच हजेरी लावली होती. त्यामुळे भिजलेल्या कट्ट्यावर बसायची काही सोय नव्हती. पण त्याचीही आपलीच एक मजा होती. काचेच्या ओल्याचिंब बाष्प जमलेल्या ग्लासामधली कटींग म्हणजे कुडकुडलेल्या जीवांमध्ये जान टाकणारे अमृतच जणू! उरलीसुरली ऊब आसपास बागडणार्‍या हिरवळीला न्याहाळत डोळे शेकून मिळवायची. पण त्याचवेळी आमच्या चेहर्‍यावरचे भाव मात्र लाकडाच्या ओंडक्यासारखे असायचे.. येस्स!., अक्षर्रशा प्रत्येक फुलाकडे ऑं वासून बघणारे ज्युनिअर कॉलेजचे ठोकळेबाज भुंगे!. नाही म्हणायला प्रत्येकाने आपापल्या नावे एकेक फूल वाटून घेतले होते. याच वाटणीत फूल ना फुलाची पाकळी म्हणत एखादीचे नाव माझ्याशीही जोडले जाईल या अपेक्षेने मी देखील होतो. पण ईथे आपला क्लेम आपणच लावायचा असतो हे मला न उमगल्याने इतरांना चिडवण्यातच धन्यता मानत होतो,. आणि अश्यातच मग एके दिवशी....

ती स्पेशलच होती! लास्ट ईयरची रोज क्वीन. यंदा बी.कॉम. फायनल ईयर, म्हणजे आम्हाला सिनिअर,... नव्हे, तब्बल ५ वर्षे सिनिअर होती. आणि हो, कमालीची सुंदर. त्यामुळे इथे कोणी क्लेम लावायचा प्रश्नच नव्हता. ज्याने धाडस केले असते त्याचे हसे निश्चित होते. तसेच तिच्यात रस घेऊन असलेल्या कोणा सिनिअरने धोपटून काढले असते ते आणखी वेगळेच. पण मग काहीतरी घडले...

पीसीओ!,
बोले तो पब्लिक टेलिफोन..
आमच्या तारा जुळायला यापेक्षा योग्य जागा नसावी.

आमच्या कट्ट्याजवळच्या लाल डब्यावर फोन करायला ती वरचेवर यायची. तेव्हा मोबाईलला नुकतेच मिसरूड फुटले होते. इनकमिंग फ्री झाले असले तरीही आमच्यासारख्या सामान्य घरातील कॉलेजयुवकांना सहज परवडण्यासारखी वस्तू नव्हती. आमच्यासाठी पब्लिक बूथच!, एकेक रुपयांचे कॉईन टाका आणि कॉलटाईम वाढवत न्या.

अशीच ती एके दिवशी पंधरा-वीस मिनिटे बोलल्यानंतर अचानक तिच्या ध्यानात आले की तिच्याजवळची नाणी संपली आहेत, आणि तिला अजून बोलायचे आहे. मदतीसाठी ती इथे तिथे बघू लागताच, तिच्या शेजारच्याच फोनला (उगाचच) चिकटून उभ्या असलेल्या मला ते लगेच ध्यानात आले., कारण माझे अर्धेअधिक लक्ष तिच्यावरच लागले होते. ती कोण्या मित्राशी, बोले तो बॉ’फ्रेंडशी बोलत नसून घरी आईशी बोलतेय याच आनंदात होतो. वेळ न दवडता मी लागलीच हाताला लागेल ते नाणे तिच्या हातात सरकावले. ते देण्याच्या नादात तिच्या हाताचा ओझरता स्पर्शही होऊ नये याची चुटपूट मात्र राहिली. आश्चर्य म्हणजे तिच्या चेहर्‍यावर देखील तसलेच काहीसे भाव मला दिसले.

पण तसे काही नव्हते. तिच्या चेहर्‍यावरील चुटपुटीचा उलगडा मला लवकरच झाला... जेव्हा तिने फोन ठेवला.

"अरे एऽऽ, तू मला एकच्या जागी दोन रुपयांचे नाणे दिलेस".. एवढा वेळ ती आईशी बोलत असताना तिचा आवाज मी ऐकत होतो, पण हा मात्र त्यापेक्षा अगदी वेगळाच आणि नाजूक वाटला. कदाचित समकालीन मुलांशी बोलताना ती खास ठेवणीतील आवाज वापरत असावी.

"चालतंय,. दोनच्या नाण्यानेही लागतो फोन" .. मी माझ्या नेहमीच्या आगाऊ आत्मविश्वासात उलटजवाब दिला.

"अरे पण एक रुपया फुकट जातो ना.."

"ईट्स ओके! तुम्ही मला एकच रुपया परत करा.."
येस्स, ‘तुम्ही’ असेच म्हणालो. पाच वर्षे सिनिअर असलेल्या मुलीला पहिल्याच वार्तालापात अरेतुरे करण्याचा प्रश्नच नव्हता.

"म्हणजे.!, तुला माझ्याकडून पैसे हवेयत परत ...(??)"

मी नुसताच आवंढा गिळला. मला यावर काय बोलायचे हे खरेच सुचले नाही. तेव्हा अडीज रुपयाला कटींग चहा मिळायचा, आणि माझे त्याच्याशिवाय चालायचे नाही. माझा आजचा चहा गेला एवढेच मला समजले. आणि ते मी वेड्यासारखे तिला बोलूनही दाखवले. त्याला ती माझा निरागसपणा समजत हसली, आणि म्हणाली, "तुझा एक चहा माझ्यावर उधार राहिला"

बस्स, असे बोलून निघून गेली.

अर्थात ती मिळायची राहिलीच हे न समजण्याईतका मी दूधखुळा नव्हतो. उद्या तिने मला साधी ओळखही दाखवली नसती. पण माझ्या मित्रांना मात्र त्यात ‘चहा डेट’ची ऑफर दिसली, आणि हे रीतसर माझ्या मनात भरवण्यात आले. गंमत म्हणजे हे सारे कळत असूनही मी स्वखुशीने हरभर्‍याच्या झाडावर चढलो. जरी ती आमच्यापेक्षा ५ वर्षे सिनिअर असली तरी मी तब्येतीने हट्टाकट्टा होतो. कोवळी का असेना मिशी असलेला, दर चार आठवड्यांनी दाढी करणारा आणि एका दमात पन्नास सुर्यनमस्कार मारणारा, असा आमच्या ग्रूपमध्ये मी एकटाच होतो. एखाद्या फुलावर, ते देखील थेट रोज क्वीनवर माझा क्लेम मी हातपाय न झाडताच लागत असेल तर,... तर - ते - चिडवणे - मला हवेच होते. जरी तिचे माझे सूत जुळायची सूतराम शक्यता नसली तरीही या चिडवाचिडवीने माझा भाव नक्कीच वधारणार होता याची कल्पना मला आली होती.

पुढले काही दिवस चित्रमय होते. तिचे रोज कट्ट्यावर येणे, फोन करणे, मित्रांनी मुद्दाम माझे नाव घेत हाका मारणे, तिचे समजल्यासारखे हसणे... या प्रकारांनी बहरत चाललेल्या नात्यात एके दिवशी तिने मला खरेच चहा पाजला. म्हणजे झाले असे, मी माझ्या चहाचे पैसे चुकवायला जाणार तोच फोन करायला आलेल्या तिनेच पुढे होत पैसे दिले. एक रुपयाचा फोन करायला तिने माझे दोन रुपयाचे नाणे वापरले होते आणि बदल्यात अडीज रुपया परत केला होता. माझा आठाण्याचा फायदा झाला होता आणि तिचे दिड रुपयांचे नुकसान!. बस्स, हाच मुद्दा उचलत मी तिला थेट ‘कॉफी विथ लंच डेट’ बद्दल विचारले. आणि तिनेही समोरून इतक्या पटकन होकार दिला कि क्षणभर माझ्याच मनात पाल चुकचुकली की अरे हिने यासाठीच तर नाही ना अडीज रुपये इन्वेस्ट केले....

वरचा जोक होता हां, त्याक्षणी असले काहीही माझ्या मनात आले नव्हते!.

दुसर्‍याच दिवशी आम्ही जवळच्या सीसीडीमध्ये फेरफटका मारून आलो. कॉफी हि बीअरपेक्षाही महाग असू शकते हा शोध मला लागला. तसेच मुलगी पाच वर्षे सिनिअर असली तरी बिलाची पुर्ण रक्कम मुलालाच द्यावी लागते, भले तो फ्रेशर का असेना, या आधीच माहीत असलेल्या माहितीवरही शिक्कामोर्तब झाले. असो, पण नुसती बिलाची रक्कमच नाही, तर आमचे जे बोलणे झाले त्यातील शब्द न शब्द माझ्या आजही लक्षात आहे. कारण पुढचा आठवडाभर प्रत्येक मित्राला वेगवेगळे गाठून वृत्तांत सांगितल्याने त्याची कित्येक पारायणे झाली होती. ‘साल्या रुनम्याला जॅकपॉट लागला’, हि भावना आणि त्यातील असूयेची छटा मला प्रत्येकवेळी समोरच्याच्या चेहर्‍यावर स्पष्ट दिसत होती. याच उन्मादाने मलाही पागल केले होते. वहीवर, बाकावर, गाड्यांच्या काचेवर,.. संधी मिळेल तिथे "आर-के" अशी आमच्या नावांची आद्याक्षरे कोरणे हा माझा छंदच झाला होता. बस्स हातावर गोंदवायचे तेवढे शिल्लक राहिले होते.

पण हे सारे करताना मी एक गोष्ट विसरलो होतो...

जन्मपत्रिकेनुसार माझ्या नावाचे आद्याक्षर ‘ड’ आले होते. पण त्यावरून चांगले नाव न सुचल्याने ‘ऋन्मेष’ हे पर्यायी नाव ठेवण्यात आले होते. त्यामुळे मी छापलेल्या "आर-के" या स्टॅंपला देवाने तथास्तु म्हटले असते तरी त्या ‘के’ चा ‘आर’ म्हणजे ‘राजकुमार’ कोणी दुसराच असणार होता...

.........
.....

ऋन्मेष:

Group content visibility: 
Public - accessible to all site users

पुढच्या भागात Proud

आणि बीअरबद्दल कुठे कळाले ??
सीसीडी कॉफी आणि बीअरच्या तुलनेत?
नाही नाही, बीअरची मुख्य भुमिका आहे या घटनेत ..

११ वी
१२ वी
१स्ट इयर
२न्ड इयर
३र्ड (फायनल) इयर

अर्थात फायनल इयर - ११ वी = चार वर्षे. म्हणजेच तुमची स्वप्नपरी तुम्हाला फक्त चारच वर्षे सिनीअर असायला हवी न की तुम्ही लिहिल्याप्रमाणे पाच वर्षे. तुम्हाला वजाबाकी येत नाही की ती नापास होऊन दुसर्‍यांदा फायनल इयर करीत होती?

{{{ म्हणजे आम्हाला सिनिअर,... नव्हे, तब्बल ५ वर्षे सिनिअर होती. }}}

पाथफाईंडर, तुम्ही व्यक्त केलेली शक्यतादेखील मोडीत निघते, कारण लेखकाने आम्हाला असा उल्लेख केलाय म्हणजे त्यांच्या वर्गातील सर्वांनाच ती (त्यांच्या मते) ५ वर्षे सिनीअर होती.

मग दुसरी शक्यता आहे की स्वप्नपरी नर्सरी मधे गेली असेल आणि ऋ+मित्रांनी नर्सरी मधे न जाता डायरेक्ट छोट्या बालवाडीत प्रवेश घेतला असेल हाकानाका

प्रेम झाले आता बिअर आणि मंगळाचे काय?की 'तुम्ही दोघेच मंगळावर जाऊन बिअर पिताय'असे स्वप्न वगैरे पडले असे काहि आहे रे?

च्रप्स अहो असे काही नाहीये.. तो फक्त टायपो होता.. टायपिंग एरर.. लोकांनी त्यावरूनही वादळ उठवले ..

यावरून एक भूतकाळातील गंमत आठवली. मी कॉलेजला असताना असताना फॅशन आणि स्टाईल बाबत ट्रेंडसेटर होतो. मी आधी एखादी मार्केट मध्ये नवी आलेली स्टाईल फॉलो करावी, वा स्वताच एखादी नवी स्टाईल शोधावी आणि मग ती कॉलेजच्या ईतर पोरांनी करावी असे नेहमीच व्हायचे.. एकदा काय झाले, मी चुकून पँटची चैन द झिप लावायचे विसरलो आणि तसाच कॉलेजला गेलो. दिवसभर बागडल्यानंतर जेव्हा संध्याकाळी शेजारच्या कॉलेजमधील माझ्या तेव्हाच्या गर्लफ्रेंडला भेटायला गेलो तेव्हा तिच्या मैत्रीणी हसायला लागल्या आणि मला हे समजले.. बरं ते झाले ते झाले. मी ओशाळलो आणि घरी जाई जाई पर्यंत हा किस्सा विसरूनही गेलो..
पण दुसर्‍या दिवशी कॉलेजमध्ये येऊन पाहतो तर काय !!!!!
जवळपास अर्धा वर्ग चैन द झिप न लावता आलेला Happy

आदो, मंगळावर जाऊन बीअर प्यायला स्वप्न बघायची गरज काय.. कॉलेजला असताना शुक्रतारा आणि गुरुकृपा मध्ये आमच्या बरेच ओल्या पार्ट्या व्ह्यायच्या ..
बाय द वे त्याचा पुढचा भाग लिहिता आला नाही, कारण ही घटना सत्य आहे. पत्रिकेतल्या मंगळामुळे अजून त्या मुलीचे लग्न न जमल्याने पुढचे लिहायचे टाळले आहे. कोणाच्या ट्रॅजेडीला कथा बनवत लिहिणे नंतर मला चुकीचे वाटले.

मंगळावर जाऊन बीअर प्यायला स्वप्न बघायची गरज काय..>>>>तुझ्याबाबत कोणतीही गोष्ट अशक्य नाही
तूच एखाद वेळी मंळावर जाऊन बीअर प्यायची कशी गरज आहे हे पण पटवून देवु शकतोस रे बाबा (ह.घे)

मंगळावर जाऊन बीअर प्यायला स्वप्न बघायची गरज काय..>>>>तुझ्याबाबत कोणतीही गोष्ट अशक्य नाही
तूच एखाद वेळी मंळावर जाऊन बीअर प्यायची कशी गरज आहे हे पण पटवून देवु शकतोस रे बाबा (ह.घे)
नवीन Submitted by आदू on 8 February, 2018 - 13:34
>>>>>
त्यापुढे जाऊन मंगळच कसा याच्या कडे येऊन बिअर प्याला हे लिहायलाही कमी करणार नाही.

Rofl
___/\___
तुम्ही सगळे धन्य आहात !

ऋन्मेश, तुम्हाला म्हणे दारूचा भलता राग-बिग येतो. मग हे बियर वेग्रे कसे चालते? ' बियर दारू की छोटी बहन होती है' लक्षात ठेवा.

मी नाही पित दारू, बीअर वगैरे. कोणाला प्रोत्साहनही देत नाही. पण जे मित्र पितात त्यांना दारूडे आहेत म्हणून सोडू तर शकत नाही ना. तर त्यांच्यासोबत पार्टीला बारमध्ये बसतो.
आणि हो, एकदा बीअर व्हिस्की यांची चव चाखून झाली आहे.

मी नाही पित दारू, बीअर वगैरे. कोणाला प्रोत्साहनही देत नाही. पण जे मित्र पितात त्यांना दारूडे आहेत म्हणून सोडू तर शकत नाही ना. तर त्यांच्यासोबत पार्टीला बारमध्ये बसतो.
>>>>
अन चखणा संपवतो. Rofl

Pages