अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस पाचवा) समारोप

Submitted by मुक्ता०७ on 16 January, 2015 - 01:23

अरुणाचल - एक अनुभूती...
अरुणाचलमध्ये पोचल्यानंतर मी लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने

अरुणाचल - एक अनुभूती...(दिवस पहिला) http://www.maayboli.com/node/52091

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस दुसरा) http://www.maayboli.com/node/52129

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस तिसरा) http://www.maayboli.com/node/52157

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस चौथा) http://www.maayboli.com/node/52233

दिवस पाचवा

कालची स्थिती बरी अशी आजची स्थिती झाली आहे. अंतःकरण जड झाले आहे. आजचा दिवस मला सावकाश जायला हवा होता पण वेळ खूपच पटपट गेला. कार्यशाळेचे जे सामान वापरले गेले नव्हते, ते आजच्या दोन्ही कार्यशाळांमध्ये वाटून टाकले. आमच्यासोबत जी पुस्तके आणली आहेत, तीसुद्धा संपली. आजच्या कार्यशाळांमधली एक तर आमच्या दादांचीच शाळा होती. आज लोसुद्धा आमच्यासोबत आली होती. आता आम्हाला एकमेकांची वाक्यं पाठ झाली आहेत. आम्हालाच नाही तर दादांनाही आमचे सगळे प्रयोग पाठ झालेत! कार्यशाळा झाल्यावर आम्ही एकमेकांची नक्कल करत होतो. प्रत्येकाची बोलण्याची वेगळीच तऱ्हा, आवाजाचा वेगळा पोत, हातवारे... या सगळ्याची इतकी सवय झाली आहे.

आज आम्ही सहकुटुंब सहपरिवार (कुटुंबच म्हणायला हवं...) देवदर्शनाला जाऊन आलो. कोंगमु-खाम या बौद्ध मंदिराला इथे गोल्डन टेम्पल म्हणतात. निघताना गाडीत दादा आणि लो पुढे, लोच्या मांडीत chang, मागे आम्ही तिघे, माझ्या मांडीत सिंत्रिया... असे बसलो होतो. अर्ध्या तासातच वारा लागून मुलं झोपून गेली. नेहमीप्रमाणेच आमच्या तिघांची बडबड चालूच होती. काल मियावला जो भात खाल्ला तो उद्या सकाळी बाजारातून घेऊयात अशी चर्चा चालली होती. तर लोने सांगितले की तो तांदूळ बाजारात नाहीच मिळत. आमच्या घरचा खास तांदूळ आहे असे तिने सांगितले. मला तांदळाच्या प्रकारांमधले फारसे काही कळत नाही पण त्या भाताला एक निराळाच स्वाद होता. आपण येताना लोच्या बहिणीकडून तो तांदूळ घेऊ असे दादांनी सांगितले.

आजचा रस्ता बऱ्यापैकी शहरातून जाणारा होता. पुण्यात आम्हाला सांगितले होते की अरुणाचलमधील रस्ते खराब असण्याची शक्यता आहे. मला गाडी लागण्याचा त्रास असल्यामुळे मी प्लास्टिकच्या पिशव्या, गोळ्या, औषधं तसंच अश्या वेळेस सगळ्यात गरज असते ती सहनशक्ती व हिंमत अशी जय्यत तयारी करून आले आहे. पण आत्तापर्यंत मला एकदाही त्रास झालेला नाही; कारण सुदैवाने आमचा ग्रुप ज्या भागात आलाय, त्या भागातले रस्ते उत्तम आहेत. कधीकधी कुठलेही आडाखे बांधण्याऐवजी त्या प्रवासाचा आनंद घेणं जास्त महत्त्वाचं ठरतं... तसंच काहीसं आज झालं! निघताना गंमत म्हणून रिनाने आम्हाला लांबलचक गवताच्या पाती दिल्या होत्या. तिने गवताच्या पातीचे फूल करून आकर्षक पद्धतीने केसांत खोवले होते. गाडीत हेअरस्टाईल करणे शक्य नसल्याने त्या गवताच्या पातींच्या अंगठ्या, ब्रेसलेट करणे चालू होते. आम्ही त्या सगळ्या पाती संपेपर्यंत असे काहीतरी उद्योग चालू ठेवले.

तासाभरातच आम्ही कोंगमु खामला पोचलो.

From Day 5

From Day 5

From Day 5

रस्त्यापासून थोड्या उंचीवर ते गौतम बुद्धांचे भव्य मंदिर होते. त्या वास्तूच्या आजूबाजूची जागा टापटीप ठेवलेली होती. एकंदरच ती जागा खूपच देखणी होती. काही वेळ तिथेच शांत बसलो. आत्तापर्यंतचा सगळा प्रवास डोळ्यासमोर येऊन गेला. तिथे आम्हाला ज्यांच्या पूर्वजांनी हे मंदिर बांधले आहे त्या Mrs. Mein भेटल्या. आपण जिथे राहतो तिथे एखादे श्रद्धास्थान असावे या भावनेने त्यांच्या पूर्वजांनी या मंदिराची स्थापना केली. अजूनतरी त्या मंदिराचे कुठल्याही business मध्ये रूपांतरण झालेले नाही, मंदिर हे मंदिरच राहिले आहे. त्यामुळे त्या वास्तूची authenticity टिकून आहे. मंदिराच्या एका बाजूने रस्त्यापर्यंत खाली उतरण्याची सोय होती. एका लांबलचक शिडीवजा जिन्यावरून आम्ही खाली उतरत होतो. त्या जिन्यावर उभे राहिले की एकाच वेळेस मंदिराचा कळस, नजर जाईल तिथपर्यंत दूर जाणारा रस्ता, एक छोटासा पाण्याचा नाला दिसत होता. छान वाटत होतं.

अंधार पडायला सुरुवात झाली होती. थंडीही वाढायला लागली होती. ठरल्याप्रमाणे ‘लो’च्या बहिणीकडे पोचलो. लोची बहीण तिचे नाव अरिस्सा... तिच्या घरी तिचे यजमान, दोन लहान मुले, आई असे सगळे राहतात. इथेही जास्त करून विभक्त कुटुंबपध्दती दिसत्ये. पोचल्यावर छान उबदार चुलीजवळ जाऊन बसलो. दादा, लोचे मेव्हणे त्यांची २ लहान मुले, त्यांची आजी असे सगळे बसले होते. कोरा चहा पिऊन पिऊन आता कंटाळा आला आहे. त्यामुळे नुसतेच गरम पाणी प्यायले. त्या खोलीत काळवीटाचे मस्तक लावले होते. ते शिकार करून आणलेले खरे काळवीट आहे असे ‘लो’च्या मेव्हण्यांनी सांगितले. काळवीटाचे मस्तक भुसा भरून टांगले होते. त्यांनी आम्हाला त्यांच्याकडची बंदूकही दाखवली. खरीखुरी बंदूक मी आयुष्यात पहिल्यांदाच हातात धरली. गोळ्या भरण्यासाठी खिट्टी वगैरेही होती. त्यांच्याकडे गोळ्या मात्र नव्हत्या. कारण आता ते काही स्वतः शिकार करत नाहीत. पण त्यांचे वडील शिकारीला जात असत.
chang, सिंत्रिया आणि त्यांची मुलं मोबाईलवर गेम खेळत होती. अचानक दादांनी त्यांच्या मोठ्या मुलाला (वय साधारण ८ असावे) देवेनला विचारले, “बेटा, तू मेरी बेटीसे शादी करेगा?” आम्ही तिघांनी शॉक बसल्यासारखे दादांकडे पाहिले. देवेन थंडच होता. “नही” शांतपणे त्या मुलाने उत्तर दिले! “क्यू?” दादांनी परत प्रश्न विचारला. त्यावर त्याने जे उत्तर दिलेते इतके धमाल मजेशीर होते! तो म्हणाला, “मुझे तो शरम आती है. शरमाएगे तो शादी कैसे होगी?!” या त्याच्या उत्तरावर घरात एकच हशा पिकला. वास्तविक पाहता सिंत्रिया आणि देवेन हे मावस बहीण-भाऊ आहेत! पण इथल्या समाजात अशी लग्न होतात. इथे मुलीच्या वडिलांना हुंडा देण्याची पद्धत आहे. त्यामुळे नात्यातले लग्न सर्वच दृष्टीने सोयीचे असते. ज्या सहजतेने तो मुलगा दादांना उत्तरं देत होता ते पाहून हे त्यांचे नेहमीचेच संभाषण असावे असे वाटत होते.

लो आणि तिची बहीण ‘अरिस्सा’ आत बसल्या होत्या. अरिस्सा सुद्धा लोसारखीच मनमोकळ्या स्वभावाची आहे. तिच्या लग्नाची गोष्ट ती सांगत होती. इथे लग्न करण्याचे विविध (आणि भलतेच!) रीतीरिवाज आहेत. ती साधारण १६ वर्षाची असताना तिच्या नवऱ्याने तिचे अपहरण केले. तिला तिचे यजमान पसंत पडल्यावर काही दिवसांनी त्यांनी लग्नही केले. हे सर्व ती अगदी लाजून वगैरे सांगत होती. जर मुलीला मुलगा पसंत पडला नाही तर असा प्रश्न मला पडला. पण असे झाले तर मुलीला तिच्या घरी सन्मानाने परत पाठवले जाते. तसे बघितले तर किती सोपे आहे हे आयुष्य! आपण लिव्ह-इन रिलेशनशिप आणि contract-marriage असे मोठेमोठे शब्द वापरतो. इथेही तश्याच गोष्टी चालतात पण समजुतीच्या तत्वावर! मुलामुलीचे कुटुंब आणि मुख्य म्हणजे समाज या गोष्टींचे अवडंबर माजवत नाहीत. सगळ्या गोष्टी अगदी नैसर्गिकरित्या पार पाडल्या जातात.

काही वेळाने निरोप घेऊन आम्ही परतीच्या वाटेला लागलो. दादांनी क्लासिक हिंदी गाणी लावली होती. एरवी गाण्याच्या चालीकडे लक्ष देणारी मी आज शब्दांचा अन्वय समजून घेण्याचा प्रयत्न करत होते. काही गाणी ओळखीची होती, तर काही गाण्यांचे नव्यानेच अर्थ समजत होते. तुफान वारा सुटला होता. गाडीच्या काचेतून चंद्र दिसत होता. वाऱ्यामुळे मधूनच डुलकी लागत होती. आत्तापर्यंतचा प्रवास म्हणजे जणू काही एक स्वप्नंच आहे असे वाटत होते. तो प्रवास कधी संपूच नये असं वाटलं. उद्या सकाळी आठ वाजताची बस आहे. प्रवासात खाऊ म्हणून काय देऊ असे लोने विचारले. हा प्रश्न ऐकून कंठ दाटून आला. गाडीतून उतरल्या उतरल्या अंजली तर रडायलाच लागली. आम्ही तिघेही एकमेकांना मिठी मारून गहिवरलेल्या अवस्थेत बराच वेळ उभे होतो. अरुणाचलमधले हे जादुई दिवस आता संपले!

नि:शब्दपणे आम्ही आपापल्या bags भरून ठेवल्या. नुसते सामान नाही तर इथल्या असंख्य आठवणी सोबत घेऊन जायच्या आहेत. दादा आणि लो समोर आता काही औपचारिकतेची गरज नसली तरी आम्ही एकत्र बसून आम्हाला इथल्या आवडलेल्या गोष्टी सांगितल्या. आमच्या सगळ्यांच्या डोळ्यातले पाणी बघून chang आणि सिंत्रीयाही कावरीबावरी झाली आहेत. आयटा आणि रिनाशीही चार आपुलकीचे शब्द बोललो. आईसुद्धा दादांशी फोनवर बोलली. फोन झाल्यावर दादांनी अश्या गोष्टी सांगितल्या की ज्या ऐकून माझा त्यांच्याविषयीचा आदर आणखीनच वाढला. सेवाभारतीच्या मीटिंग मध्ये जेव्हा आपल्या भागात तीन स्वयंसेवक येणार आहेत हे कळले तेव्हा तिघांचीही वेगवेगळ्या घरांमध्ये सोय करण्यात येणार होती. पण ILP (Inner line permit) वरचे आमचे वय बघून “ये तो बच्चे है” असे दादांच्या लक्षात आले. ही तरुण मुले आधीच एका अनोळखी राज्यात येणार आणि परत त्यांना वेगळे करायचे हे दादांना पटले नाही. त्यामुळे तिन्ही स्वयंसेवकांची जबाबदारी त्यांनी आपल्याकडे घेतली. एका अनोळखी राज्यातून आलेल्या अनोळखी तरुण मुलांची जबाबदारी घेणं काही सोप्पा निर्णय नाही. पण लोने सुद्धा त्यांना साथ दिली. दादांचे आधीचे आयुष्य बरेच हलाखीत गेले. शाळेत असल्यापासूनच उदरनिर्वाहासाठी छोटीमोठी त्यांनी केली. शिक्षणाचा मार्गही त्यांच्यासाठी खडतरच होता. इच्छाशक्ती कितीही प्रबळ असली तरी शिक्षण घेण्यासाठी योग्य मार्गदर्शन लाभणे अत्यावश्यक असते. योग्य गुरु मिळायला त्यांना वेळ लागला; तो मिळाल्यानंतर मात्र त्यांनी मागे वळून पाहिले नाही.

घरापासून ३५०० कि.मी लांब असताना राजीवदादा आणि लो हेच आमचे पालक झाले आहेत. आम्ही फक्त त्यांना आई-बाबा म्हणत नाही इतकंच! इतकी निर्मळ, उदार, निस्वार्थीपणे प्रेम करणारी माणसं मिळणे आणि त्यांच्याशी इतके सुंदर बंध जुळून येणे ही गोष्ट तशी दुर्मिळच! ५-६ दिवसांच्या त्यांच्या सहवासात मला इतके काही शिकायला मिळाले. कुठल्याही गोष्टीचा, व्यक्तीचा अथवा जागेचा सर्वांगाने विचार न करता आपण आपल्या सोयीने आणि फक्त आपल्या सोयीसाठी पूर्वानुमान आणि पूर्वग्रह तयार करतो. एखाद्या व्यक्तीला भेटल्यावर वेश, भाषा, जात-पात, रंगरूप यापलीकडे जाऊन एक माणूस म्हणून तिच्याकडे बघितले पाहिजे हे लक्षात येतंय. निसर्गाच्या जवळ असल्याने इथल्या लोकांचे प्रेम आणि राग दोन्ही तितकेच खरे! आणि आपण मात्र मुखवटे घालून स्वतःचेच आयुष्य अजूनच अवघड करतो. स्वतःकडे अलिप्तपणे पाहणे स्वतःच्याच भल्यासाठी किती आवश्यक असते याची प्रचिती हळूहळू येत आहे.

इकडे आम्ही विज्ञानाचे प्रयोग शिकवायला आलो होतो खरे पण प्रत्यक्षात मात्र इथल्या लोकांनीच आम्हाला जगण्याचे धडे दिलेत. आपला जसा दिवस वर्तमानपत्राने सुरु होतो तसा इथला नाही होत. रोज उठून खून आणि मारामारीच्या बातम्या का वाचायच्या असे इथल्या लोकांचे म्हणणे आहे. ‘भारतातल्या कुठल्याही भागात गेलं तरी भारतीय म्हणून आमच्याकडे कोणी बघतच नाही, प्रत्येक वेळेस आमच्या भारतीय नागरिकत्वाबद्दल आक्षेप घेतला जातो. भारतीय असल्याचा आम्हालाही तुमच्या इतकाच अभिमान आहे; पण आम्हाला कोणी समजूनच घेत नाही’ असे इकडे लोकांचे मत आहे. इथेही लोकांकडे टीव्ही, कम्प्युटर, स्मार्टफोन्स, फ्रीज, इंडक्शन कुकर, इन्व्हर्टर आपण बोलू त्या सगळ्या गोष्टी आहेत, पण हे सगळं वापरण्यासाठी वीज मात्र चोरावीच लागते.

‘प्रगतीची तुमची संकल्पना काय? तुम्हाला कोणत्या सोयी हव्या आहेत? कोणते बदल हवे आहेत?’ असे प्रश्न इथे मांडण्याची जास्त गरज आहे. सगळ्या गोष्टींची किंमत पैशात नाही करू शकत हे सत्य आणखीनच अंगावर यायला लागले आहे. शहरात सगळ्या सुखसोयी असतानाही अपूर्ण, रिक्त का वाटते हे निसर्गाच्या जवळ आल्यावरच समजतंय. निसर्ग कधीच कोणताच भेदभाव करत नाही. निसर्गाच्या जवळ राहणारी माणसंही तितकीच गोड असतात! त्यांचे हात आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेतच! गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची, प्रेमाचा सेतू बांधण्याची!

समाप्त.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय सुंदर! समाप्त वाचून अरेरे झालं. खूपच लवकर संपली ग ... सगळे खूप छान झाले. ही एक तुझी अंतर्यात्रा होती... खूप कौतुक अन अभिनंदन!

गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची, प्रेमाचा सेतू बांधण्याची! >>>>>
कवी नामानिराळा म्हणतातः

काय नुसते वाचता प्रतिसाद द्या
हातची राखून द्या पण दाद द्या
आंधळ्यांची दिव्यदृष्टी व्हा तुम्ही
अन् मुक्यांना नेमके संवाद द्या

जीव कासावीस झाला आमुचा
मूळचे नाही तरी अनुवाद द्या
कालची आश्वासने गेली कुठे?
ते पुन्हा येतील त्यांना याद द्या

वेगळे काही कशाला ऐकवा?
त्याच त्या कविताच सालाबाद द्या
एवढा बहिरेपणा नाही बरा,
हाक कोणीही दिली तर साद द्या

गोरगरिबांना कशाला भाकरी?
गोरगरिबांना अता उन्माद द्या
व्हायचे सैतान हे डोके रिते,
त्यास काही छंद लावा नाद द्या

- नामानिराळा, मनोगत डॉट कॉम २००५०६१४

पण ईशान्येतल्या भारतीयांच्या सादाला प्रतिसाद देणे एवढे सोपे नाही.
तुम्ही लोकांनी दिलेला प्रतिसाद समर्पक आहे! असाच प्रतिसाद सारेच देतील तो सुदिन.

इकडे आम्ही विज्ञानाचे प्रयोग शिकवायला आलो होतो खरे पण प्रत्यक्षात मात्र इथल्या लोकांनीच आम्हाला जगण्याचे धडे दिलेत. >>>>> खूप भावले ....

‘भारतातल्या कुठल्याही भागात गेलं तरी भारतीय म्हणून आमच्याकडे कोणी बघतच नाही, प्रत्येक वेळेस आमच्या भारतीय नागरिकत्वाबद्दल आक्षेप घेतला जातो. भारतीय असल्याचा आम्हालाही तुमच्या इतकाच अभिमान आहे; पण आम्हाला कोणी समजूनच घेत नाही’ असे इकडे लोकांचे मत आहे. >>>> च्च .... किती विचित्र वाटत असेल या मंडळींना ....

पण हे सगळं वापरण्यासाठी वीज मात्र चोरावीच लागते. >>>> हे का बरं ? - हे काही उमगले नाही ...

निसर्गाच्या जवळ राहणारी माणसंही तितकीच गोड असतात! त्यांचे हात आपल्या स्वागतासाठी सज्ज आहेतच! गरज आहे ती आपल्या प्रतिसादाची, प्रेमाचा सेतू बांधण्याची! >>>> क्या बात है .... जियो Happy

फारच सुंदर लेखमाला झाली ही - 'तुझी' अनुभूति असल्याने सगळ्यात जास्त भावली ....
खूप खूप शुभेच्छा तुला आणि तुझ्या सगळ्या टीमलाही ...
तुझे कौतुक करायला शब्द अपुरे पडताहेत खरं तर ....

किती गुंतून ठेवलं होतंस तू या मालिकेत. शेवटचा भाग अगदी मनाला स्पर्शून गेला.
तुम्ही तिघांनीही सगळी सहलच किती संवेदनशीलतेने, उघड्या डोळ्यांनी शिकत, शिकवत, आनंद घेत-देत केलीत.
राजीव आणि लोच्या कुटुंबालाही लळा लावून आलात.

तुमच्या यापुढच्या सगळ्या वाटचालीला मनःपुर्वक शुभेच्छा.

मुक्ता, सगळी मालिका अगदी मनाला भिडणारी होती. शेवटचा भाग म्हणजे सुंदर प्रवासाचा हुरहुर लावणारा शेवट झाला आहे. अशीच लिहीत राहा.
अॅडमीन, ह्याची लेखमालिका करता येईल का?

ही लेखमाला संपलीही! तुझे अनुभवकथन खूप प्रामाणिक व सच्चे वाटले. लिहीत राहा. पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा!!

ही लेखमाला संपलीही! तुझे अनुभवकथन खूप प्रामाणिक व सच्चे वाटले. >> ++

मस्त लेखमालिका Happy
मनःपूर्वक शुभेच्छा.

सुंदर झाल्येय ही लेखमाला! माझी अरुणाचलला जाण्याची इच्छा अजून strong झाली आहे!
मुक्ता, ह्या उपक्रमाचे प्रमुख पोंक्षे सर होते का? तुमच्या प्रशिक्षण शिबिराविषयी देखील एक लेख लिही!