स्कॉटलंडचा स्वातंत्र्यलढा आणि आम्ही

Submitted by सुमुक्ता on 14 January, 2015 - 05:45

१७०६ मध्ये स्कॉटलंड आणि इंग्लंड ने Treaty of Union वर शिक्कामोर्तब केले आणि United Kingdom चा जन्म झाला. पण तरीही स्कॉटलंड वर स्कॉटिश लोकांचे राज्य असावे असे अनेक देशप्रेमींना वाटत होते. अखेर १९९८ मध्ये स्कॉटलंडला स्वतंत्र संसद असावी ह्या ठरावास मंजुरी देण्यात आली आणि देशपातळीवरचे काही निर्णय वगळता स्थानिक कायदा बनवायचे स्वातंत्र्य स्कॉटलंडला मिळाले. स्कॉटलंडला UK पासून स्वातंत्र्य मिळावे म्हणून स्कॉटिश नॅशनल पार्टीने सार्वमत घेण्याचे आश्वासन दिले. परिणामत: २००७ आणि २०१११ च्या निवडणूकांमध्ये त्यांना यश मिळून ते सत्तेवर आले. सार्वमत घेण्यास संसदेनेसुद्धा मंजुरी दिली आणि संपूर्ण स्कॉटलंडमध्ये उत्साहाचे वारे वाहू लागले.

आमच्यासारख्या UK चा विसा घेऊन स्कॉटलंडमध्ये राहणाऱ्या लोकांनासुद्धा सार्वमताच्या निकालाची उत्सुकता होती. जर स्कॉटलंड स्वतंत्र झाले तर आमचे इमिग्रेशन स्टेटस काय असेल? आम्हाला आमचा बोऱ्याबिस्तर गुंडाळून इंग्लंडला जावे लागेल का? स्कॉटलंडहून आलेल्या इमिग्रंट्सना इंग्लंड विसा देईल का? असे अनेक प्रश्न आमच्या समोर उभे राहिले. अर्थात मायदेशी परतण्याचा मार्ग होताच. पण तरीही भविष्यावर किंचित अनिश्चितता पसरली. मी आणि माझ्या पतीने विचार केला की आत्ताच निर्णय घेण्यात काही अर्थ नाही. सार्वमताचा निकाल लागला की पुढे काय करायचे ते बघू. कदाचित स्कॉटलंड आम्हाला "जा" म्हणणार नाही किंवा इंग्लंड आमचे स्वागत करेल असेच वाटत होते. त्यामुळे इथेच राहून पुढे काय होते ते बघायचे ठरले.

थोड्याच दिवसामध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरु झाली. प्रगतीसाठी स्वातंत्र्य हवेच असे वाटणारे लोक "Yes Please" आणि एकत्र राहूनच प्रगती साध्य करता येईल असे वाटणारे लोक म्हणजे "No Thanks" किंवा "Better Together". "Yes Please" वाल्यांचे मुख्य मुद्दे होते की स्कॉटलंड जेवढा महसूल गोळा करते त्या प्रमाणात स्कॉटलंडच्या प्रगतीसाठी खूप कमी पैसा वापरला जातो. स्वातंत्र्य मिळाले तर सगळाच्या सगळा महसूल आम्ही आमच्या प्रगतीसाठी वापरू. त्याचप्रमाणे स्कॉटलंडची संस्कृती इंग्लंडच्या संस्कृतीपेक्षा खूपच वेगळी आहे तेव्हा स्वतंत्र स्कॉटलंडमध्ये संस्कृतीचे संवर्धन अधिक चांगले होऊ शकते . "Better Together" वाल्यांचे मुख्य मुद्दे होते की स्कॉटलंड स्वतंत्र झाल्यास आपल्याला चलन म्हणून ब्रिटीश पौंड वापरता येणार नाही (तसे बँक ऑफ इंग्लंडनी स्पष्टच सांगितले होते), स्कॉटलंडची अर्थव्यवस्था ढासळेल आणि युरोपियन युनियनमध्ये प्रवेशाचा मार्ग तितकासा सोपा नाही. त्याचप्रमाणे एकत्र राहून जी प्रगती साधता येईल ती वेगळे राहून साधता येणार नाही.

सुरुवातीला "No Thanks" वाले बरेच शांत होते. त्यांना आत्मविश्वास वाटत होता की स्कॉटलंडचे लोक स्वातंत्र्याच्या विरोधात मतदान करतील. पण जसजसा मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तसतसे "Yes Please" वाल्यांच्या सततच्या प्रचारामुळे लोकांचे मतपरिवर्तन होउ लागले. एक्झिट पोलचे निकाल "Yes Please" कडे झुकू लागले होते. मग मात्र "Better Together" वाल्यांनी मोहीमच हातात घेतली. आता सोशल मीडिया, टीव्ही , रेडिओ, वर्तमानपत्रे दोन्ही बाजूच्या लोकांची मते मांडत होते. टीव्हीवर राजकीय वादविवादाच्या फैरी झडत होत्या. राजकीय वादविवादांमध्ये कधी "Yes Please" तर कधी "Better Together" च्या बाजूने निकाल लागत होता. "Yes Please" वाल्यांचे प्रमाण ४८% वर येउन पोहोचले होते. त्यामुळे निकाल कोणत्याही बाजूने जाऊ शकतो अशी भीती दोन्हीकडच्या लोकांना वाटत होती.

आमच्यासारखे लोक मात्र दोन्ही मते ऐकून घेत आपले स्वतंत्र मत बनवायचा प्रयत्न करत होते. UK मध्ये राहणाऱ्या commonwealth देशाच्या नागरिकांना मतदानाचा अधिकार असतो, ह्या न्यायाने मला सुद्धा मतदानाचा अधिकार होता. त्यामुळेच दोन्ही बाजू व्यवस्थित समजून घेण्याचा मी प्रयत्न करत होते. विविध लोकांशी चर्चा करीत होते. स्थानिक लोकांचे मत विचारत होते. हे सगळे करताना माझ्या लक्षात आले की बहुसंख्य तरुण वर्ग हा स्वातंत्र्य मिळालेच पाहिजे ह्या मताचा होता. खेडोपाडी राहणारा शेतकरी वर्गसुद्धा स्वातंत्र्याच्या बाजूने होता. परंतु पुष्कळशी मध्यमवयीन नोकरदार मंडळी मात्र "Better Together" च्या बाजूनी होती.

हळूहळू मतदानाचा दिवस जवळ येऊ लागले तसे सगळी कडे "Yes Please" नाहीतर "No Thanks" चे झेंडे झळकू लागले. पुष्कळ लोक आपापल्या घरात, बाहेर, गाडीवर अभिमानाने आपल्या मताचे फलक मिरवीत होते. गुप्त मतदानाची संस्कृती असलेल्या माझ्यासारख्या भारतीयांसाठी ही मोठीच मौजेची गोष्ट होती. विविध ठिकाणी दोन्ही बाजूंची माहितीपत्रके वाटली जात होती. सामान्य माणसांचे शंकानिरसन करण्यासाठी रस्त्यांवरून तात्पुरती कार्यालये उभारली होती. मतदानाच्या दोन दिवस आधी शहरातील दोन मुख्य चौकांत "Yes Please" आणि "No Thanks" चे प्रचारक मोठ्या संख्येने आपापले झेंडे फडकावित होते. परंतु हे सगळे होत असताना कुठेही घोषणा, आरडओरड, गदारोळ, वाहतूकीची अडवणूक, दोन पक्षांमध्ये भांडाभांडी, माईकवरून जोरजोरात भाषणे असे काहीही घडत नव्हते. सगळे व्यवहार अतिशय शांतपणे आणि सुरळीत चालू होते. भारतात घडणारा निवडणूक काळातील गोंधळ बघता मला ह्या परिपक्वतेचे फारच कौतुक वाटले. अशी प्रगती भारतात जेव्हा होईल तो दिवस खरा सुदिन!!

अखेर मतदानाचा दिवस उजाडला. मला आणि माझ्या पतीस घरी रीतसर पत्र आले. पत्रात मतदानाचा दिवस, वेळ आणि स्थान लिहिलेले होते. मतदानास जाताना आम्ही आमच्याबरोबर ओळखपत्र म्हणून वाहन चालवायचा परवाना आणि घरी आलेले पत्र घेऊन गेलो. मतदानाच्या जागी कोठेही पोलिस बंदोबस्त नव्हता, हे सुद्धा मला फारच आश्चर्यजनक वाटले. एका छोट्या चर्चची एक खोली ह्या कामास दिलेली होती. मतदानास आलेले लोक व्यवस्थित रांगेत उभे होते. आतील कार्यकर्ते एकेकजणाला आत बोलावत होते. माझी वेळ आली तेव्हा मी आत गेले मतदानासाठी आलेले पत्र तिथे दाखविले. तेथील कर्मचाऱ्याने ते पत्र स्वत:च्या ताब्यात घेतले आणि कोणतेही ओळखपत्र न मागता मतदानासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या. इतके उत्कृष्ठ आयोजन आणि तितक्याच उत्तमपणे जनतेनी दिलेली साथ असे दृश्य मी मतदान करताना प्रथमच पहिले.

मतदान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी निकाल लागणार होता. सगळ्या देशाचे डोळे ह्या निकालाकडे लागलेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळीच मतदानाचा निकाल वर्तमानपत्रात वाचला. स्कॉटलंडवासियांनी स्वातंत्र्याच्या विरोधात कौल दिला होता. तरीही जवळजवळ ४५% टक्के लोकांनी स्वातंत्र्याच्या बाजूने मत दिले होते. खरेतर "Better Together" वाल्यांचा निसटता विजय झाला होता. "Yes Please" वाले लोक संख्येने खूप होते त्यामुळे ह्या निकालाचे पडसाद काय उमटतात ह्याचीच भीती होती. परंतु ग्लासगो मधील किरकोळ निदर्शने वगळता कोठेही निदर्शने झाली नाहीत, जाळपोळ/मारामारी/ सोशल मीडियावर शिवीगाळ असे काहीच नाही. कोठेही जीवित अथवा वित्तहानी झाली नाही. जनतेने दिलेला कौल मान्य करून सगळे पुन्हा एकदा आपआपल्या कामाला लागले. विरोधात लागलेला निकाल पचवायची ही परिपक्वता निश्चितच अतिशय कौतुकास्पद आहे. ही परिपक्वता अंगी बाणवायला प्रथम सुसंकृत असावे लागते आणि स्कॉटलंड हा सुसंस्कृत लोकांचा देश आहे हे मला प्रकर्षाने जाणविले. स्कॉटलंडच्या प्रेमात तर मी येथे आल्याआल्याच पडले होते. परंतु हा अनुभव घेतल्यानंतर येथील संस्कृतीचा, येथील लोकांचा आणि त्यांच्या परिपक्वतेचा आदर वाटू लागला आहे.

=====
लोकसत्ता रविवार पुरवणीमध्ये पूर्वप्रकाशित (लोकरंग ११ जानेवारी २०१५).
http://www.loksatta.com/lokrang-news/scotland-freedom-movement-and-we-10...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुक्ता, फार छान वर्णन केले आहे.
पण निकाल पाहून जरासे वाईट वाटले, स्वातंत्र्याच्या विरोधात जायला नको होता असे वाटले.

<< स्वातंत्र्याच्या विरोधात जायला नको होता असे वाटले. >>

म्हणजे हे पारतंत्र्य थोडेच आहे? विभाजनाच्या विरोधात आहे इतकेच. आता आपल्या इकडे काही जण स्वतंत्र विदर्भ मागताहेत, म्हणजे याचा अर्थ असा नव्हे की आता विदर्भ पारतंत्र्यात आहे किंवा जे एकसंध महाराष्ट्रवादी आहेत ते विदर्भाच्या स्वातंत्र्याच्या विरोधात आहेत. ते फक्त विदर्भाला वेगळे करायच्या विरोधात आहेत.

याउलट १९६१ साली गोवा पोर्तुगीजांपासून स्वतंत्र झाला असे म्हणता येईल. जे त्याच्या विरोधात होते ते गोव्याच्या स्वातंत्र्याच्या विरोधात होते कारण तेथे पोर्तुगीजांच्या राजवटीत गोवेकरांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली होत होती. इथे स्कॉटलंडच्या नागरिकांच्या मुलभूत हक्कांची पायमल्ली होत होती असे लेखिकेच्या वर्णनातून जाणवत नाही.

धन्यवाद पराग, अमितव, मृणाल आणि महेश.

महेश कदचित एकत्र राहून जेवढी प्रगती साधता येइल तेवढी वेगळे होउन साधता येणार नाही असे येथील लोकांस वाटले असेल.