अरुणाचल - एक अनुभूती...(दिवस चौथा)

Submitted by मुक्ता०७ on 10 January, 2015 - 23:03

अरुणाचल - एक अनुभूती...
अरुणाचलमध्ये पोचल्यानंतर मी लिहिलेल्या रोजनिशीतील काही पाने

अरुणाचल - एक अनुभूती...(दिवस पहिला) http://www.maayboli.com/node/52091

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस दुसरा) http://www.maayboli.com/node/52129

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस तिसरा) http://www.maayboli.com/node/52157

दिवस चौथा

आज रविवार आहे. त्यामुळे काल रात्रीच दादांनी सांगितले की उद्या निवांत उठले तरी चालेल, आपल्याला पिकनिकला साधारण २०० किमी दूर असलेल्या मियाव या ठिकाणी जायचे आहे. मियावला Namdapha व्याघ्र प्रकल्प बघण्यासारखा आहे. पण आज साप्ताहिक सुट्टी असल्याने तो प्रकल्प बघायला जंगलात जायची परवानगी मिळाली नाही. पण तिथे जाऊन नदीकिनारी भटकण्याचा बेत ठरला.

आज निवांत उठायची इच्छा होती पण सहाला जाग आलीच. दादा बाजाराला निघाले होते. पिकनिकसाठी काही सामान आणायचे होते. आम्हीही सोबत गेलो.

From January 11, 2015

From January 11, 2015

वेगवेगळ्या भाज्या, मसाले, मांस खरेदी केले. तयारी करण्यापासूनच ही पिकनिक गमतीदार असणार असा अंदाज येत होता. स्वयंपाकघरात भल्या मोठया पातेल्यामध्ये पिकनिकला बरोबर न्यायचा भात शिजत होता.

From January 11, 2015

एका बाजूला झाडाची मोठी मोठी पाने ठेवली होती. त्या पानांमध्ये भाताचा गोळा करून लाडूप्रमाणे बांधून घेण्याची पद्धत आहे. आंघोळीचे कपडे, चटया, मुबलक प्रमाणात पिण्याचे पाणी, फळे, स्वयंपाकासाठी लागणारी भांडी, डाव, भाज्या मसाले असे सगळे घेऊन आम्ही बाहेर पडलो. आमच्यासोबत ज्योतिषदादा आणि दादांचे आणखी काही मित्रही येणार आहेत असे कळले.

आमचा प्रवास सुरु झाला. जंगलातला रस्ता होता. खूप दाट जंगल नव्हते. मध्ये वस्त्या लागत होत्या.

From January 11, 2015

साधारण निम्मे अंतर पार करून झाल्यावर मोकळी हवा खाण्यासाठी आम्ही थांबलो. तिथे लोला मिरीचे झाड दिसले. कोवळ्या मिऱ्यांनी लगडलेले झाड होते. दोन मिऱ्या माझ्या हातात देत तिने मला त्या चघळायला सांगितल्या, घशाला आराम मिळेल असे ती म्हणाली. मीही अगदी आज्ञाधारक(!) मुलगी असल्याने ताबडतोब त्या तोंडात टाकल्या आणि मला जो काही ठसका लागला! एवढ्या जहाल तर मिरच्याही नसतात! त्या मिऱ्यांनी अक्षरशः डोळ्यातून पाणी काढले. त्या दोन-तीन मिनिटांत ‘कुठून हे खाल्ले! स्वतःची प्रकृती माहीत असताना पण नसते उद्योग करायला सांगितलय कोणी!’ असे अनेक विचार डोक्यात येऊन गेले. अंजलीला पाणी मागण्यासाठी मी तिला हाक मारली आणि... मीच माझा आवाज नीट ऐकला... आवाज जरा मोकळा वाटत होता आणि घसा दुखणही कमी झालं होतं! काय जालीम उपाय होता! अंजलीच्या मदतीने मी लगेच त्या मिऱ्या गोळा केल्या. आम्ही इकडे मिरे गोळा करत होतो. तर दादा आणि लो तिकडे बांबू कापत होते. बांबू कापून करणार काय असे विचारले तर “इसके तो हम ग्लास बनाएंगे!” असं दादा म्हणाले. म्हणजे इकोफ्रेंडली ग्लास! लो केळीची पानं सोबत घेत होती! आम्हीही तिला मदत केली.

थोड्या वेळाने परत आमचा प्रवास सुरु झाला. आता ऊन वाढायला लागले होते. पण हवा एकदम स्वच्छ, करकरीत आणि अस्पर्श होती! लहान असताना आम्ही ‘freeze’ नावाचा खेळ खेळायचो. ज्याच्यावर राज्य असेल त्याने ‘freeze’ म्हणले की सगळ्यांनी जसे असेल तसे थांबायचे... किंचितही हलायचे नाही... मग राज्य असणारा मुलगा हसवण्याचा प्रयत्न करून सगळ्यांना हलवण्याचा प्रयत्न करायचा... जो हलेल तो आऊट! freeze झालेल्या मुलांना हसण्याची परवानगी नसल्याने मुलं डोळ्यांतून हसायची! त्या जंगलातून जाताना त्या रानातल्या वाटा, सगळी झाडं, आजूबाजूची तुरळक वस्ती सगळंकाही स्तब्ध होऊन जणू काही डोळ्यांतून हसत होतं! त्या स्तब्धतेतही तो परिसर इतका प्रसन्न वाटत होता! पण त्या रानात राज्य नक्की कोणावर असणार? मग लक्षात आलं की मधूनच येणारा, बोचरा तरी आल्हाददायक वाटणारा, आपल्याच नादात आणि लयीत असणारा तो वारा त्या रानवाटांवरून मनमुरादपणे जात सगळ्या परिसराला हसवण्याचा प्रयत्न करत होता!

मुळातच लोकसंख्या कमी असल्याने वस्त्या असल्या तरी वर्दळ अजिबातच नव्हती. केवळ माणसांचं अस्तित्व आहे हे कळण्याइतपत घर-दुकान होती! काही वेळाने झाडी दाट होत गेली. त्या गर्द रानातून जाणारा रस्ता वळणावळणाचा होता. ‘कधी येणार? आपण कधी पोचणार?’ असं लहान मुलासारखं आम्ही दादांना विचारत होतो! शेवटी आमच्या चौथ्या ‘कधी येणार?’ ला आम्ही पोचलो. त्या ठिकाणाची पहिली झलक एका मोठ्या झाडामागून दिसली! निरभ्र, निळेशार आकाश आणि त्या निळ्या रंगाशी तितक्याच तोलामोलाची स्पर्धा करणारी निळीशार नदी!

From January 11, 2015

का कोणास ठाऊक... पण त्या क्षणी मला घरची, घरच्यांची जिवाभावाच्या मित्रांची खूप आठवण आली! आईला लगेच फोन करून तिला मी समोर काय दिसतंय त्याचं वर्णन करून सांगितलं. माझ्या एका जवळच्या मित्राला त्या नदीचा विडीओ रेकॉर्ड करून whatsapp वर पाठवून दिला. मागचे काही दिवस मला आठवण येत होतीच पण ती नदी पाहून मला अगदीच राहवले नाही!

राजीवदादांचे मित्रही आले. त्यांनी सोबत भरपूर संत्री आणली होती. आपल्याकडच्या छोट्या पपईच्या आकाराची ती संत्री होती! तोपर्यंत आमच्याकडे इतके सामान झाले होते. नदीच्या किनाऱ्याला लागूनच अगदी जंगल नसले तरी थोडीफार झाडं होती. तिथपर्यंत सगळे सामान न्यायचे होते. मग लगेचच सामानाची विभागणी झाली. सगळे सामान आणायला दहा मिनिटे देखील लागली नाहीत. ऊन्हामुळे सगळ्यांना तहान लागली होती. आम्ही लगेचच त्या संत्र्यांवर ताव मारला. पहिला ताव ओसरल्यावर दादा आणि त्यांच्या मित्रांनी चूल मांडली. आज लोला स्वयंपाकाला सुट्टी होती! कारण दादा आणि त्यांचे मित्र मिळून स्वयंपाक करणार होते. त्यामुळे आज मी, अंजली, प्रथमेश आणि लो असा आमचा ग्रुप होता. लगेच आंघोळ करून घ्यावी असे तिचे मत होते. दादांनी संथ प्रवाह असणाऱ्या ठिकाणी जायला सांगितले. पण आम्हाला नुसती आंघोळ नव्हती नं करायची... पाण्यात खेळायचं होतं! लोने दादांना रीतसर इमोशनल blackmail करून तिला हव्या त्या ठिकाणी आम्हाला घेऊन गेली. अरुणाचलला आल्यापासून आंघोळीची वानवाच आहे. त्यामुळे इतक्या दिवसांनी आंघोळ आणि तीही इतक्या सुंदर ठिकाणी म्हणजे स्वर्गच! पाण्यात मनसोक्त डुंबत आम्ही खेळत होतो. वरती ऊन असले तरी पाणी शहारा आणत होते. मला सर्दी झाली आहे, घसा दुखतोय पण म्हणून मी नदीवर मजा न करणे हा वेडेपणा ठरला असता! परत कधी मी इथे येणार... माझ्याबरोबर हेच मित्र असणार... राजीवदादा आणि लोसारखी माणसं मला भेटणार... त्यांच्याबरोबर इतकी मज्जा करणार... त्यामुळे हे क्षण शंभर टक्के जगायलाच पाहिजे!

आंघोळ केल्यानंतर नदीवर फेरफटका मारला. वरचे निरभ्र, निळेशार आकाश, ती नदी आजूबाजूला थोडीफार झाडेझुडुपे, मासेमारी करणारी ४-५ माणसे वगळली तर आसमंतात कोणी नव्हते! कथा-कादंबऱ्यामध्ये असते तशी निरव शांतता होती!

From January 11, 2015

एरवी आम्ही तिघे खूप बडबड करतो पण आज शांत होतो. नीट लक्ष देऊन ऐकले तरच नदीचा आवाज येत होता. कधी वाळूतून तर कधी गोट्यामधून चालताना कसरत होत होती. आजूबाजूला बघितलं तर निसर्गातले विविध रंग दिसत होते. निळे आकाश, तरंगणारे पांढरे ढग, निळीशार आरस्पानी नदी, हिरवीगर्द झाडी, ऊन्हात चमकणारी वाळू आम्ही डोळे भरून पाहून घेतले.

From January 11, 2015

कॅमेऱ्यात अनेक क्षण टिपले. पण वातावरणातला तो उबदारपणा, अंगावर शहारा आणणारा वारा, झाडाखालच्या सावलीमुळे आलेला सुकून, मन अनुभवत असलेली तृप्ती, आंघोळ करून आलेला टवटवीतपणा, मित्र सोबत असल्याने झालेला आनंद, राजीवदादा आणि लोची माया फोटोत कशी येणार!

परत येईपर्यंत वेगवेगळ्या पद्धतींनी बनवलेले चिकन आमची वाट बघत होते! पत्र्याच्या डब्यात बनवलेले, बांबूमध्ये शिजवलेले, लाकडावर भाजलेले, भांड्यात बनवलेले... कित्तीतरी प्रकार होते! फक्त मीठ, हळद आणि तिखट वापरलेलं होतं! कमीतकमी मसाले वापरून आणि कमीतकमी प्रक्रिया करून इतके रुचकर पदार्थ बनू शकतात हे पाहून आम्ही चकितच झालो.

From January 11, 2015

पाणी प्यायला सकाळी बनवलेले बांबूचे ग्लास वापरत होतो! त्या ग्लास मधून पाणी पिणं इतकं मजेशीर वाटत होतं! त्यातून पाणी पिण्याची एक कला आहे! ‘एक-एक घोट सावकाश प्यायचा, नाहीतर पाणी सांडते’ असे अनुभवाचे बोल अंजलीने दिले. तिच्या भिजलेल्या कपड्यांवरून तिला मिळालेल्या अनुभवाचा पुरावा देखील दिसला!

From January 11, 2015

जेवणानंतर थोडी विश्रांती घेतली. दादा आणि त्यांचे मित्रही आंघोळ करून आले. त्यांच्या मित्रांनी आमचा निरोप घेतला. आम्हीही आवराआवर केली. सर्व सामान गाडीत ठेवले. परतीचा प्रवास सुरु केला. माझं मन गाडीत बसल्यावर विलक्षण उदास झालं. दादांनी बिहू नाचाची गाणी लावली होती. उडत्या ठेक्याची आणि प्रसन्न गाणी होती. परत येतानाचा वेळ मनाला आलेल्या अस्वथतेमुळे मला खूप जास्त वाटला. पण एकदाचे आम्ही घरी आलो. मनाची अस्वस्थता घालवण्यासाठी आल्याआल्या गार पाण्याने तोंड धुतले कपडे बदलले आणि आता बाहेरच्या पायरीवर येऊन बसले आहे. ही माझी आवडती जागा आहे. पहिल्या दिवशी याच पायरीवर उभे राहून मी चंद्र आणि चांदण्यांनी भरलेले आकाश पहिले, रोज बाहेर जाताना मी इथेच बसून शूज घालते, आयटाला(आजीला) आम्ही इथेच नमस्कार करतो, रात्री झोपण्याआधी आम्ही इथेच बसून गप्पा मारतो! आत्ताशी ७.३० वाजलेत. अजून आमची जेवणं व्हायची आहेत. झोपायला चिक्कार वेळ आहे... आजच्या झोपेबाबत मी जरा साशंकच आहे!

मगाशीच अंजलीने आजचे फोटो दाखवून मला खुलवायचा प्रयत्न केला... फोटो छानच होते... मला नक्की काय होतंय? उद्या शेवटचा दिवस, शेवटची कार्यशाळा... उद्या ही सगळी मजा संपणार! प्रत्येकजण आपापल्या उद्योगाला लागणार... अश्या असंख्य विचारांनी माझ्या डोक्यात आणि मनात कोलाहल माजवलाय! डोळे भरून आलेत...काही क्षणांपुर्वीच प्रथमेश माझ्याशेजारी येऊन बसला. माझी अस्वस्थता त्यालाही जाणवली असावी कदाचित! त्याने मला विचारले की काय झालंय... पण मी काहीच बोलू शकले नाही. कारण त्या प्रश्नाचे उत्तर माझे मलाच माहीत नाही!

पूर्वायुष्यातील अनुभव आणि भविष्यातील तजवीज यातच इतके अडकल्यामुळे वर्तमानातील अनेक सुंदर क्षण, आपण हातातील निसटत्या वाळूसारखे निसटू देतो याची जाणीव मला होत्ये! कदाचित त्यामुळेच मला खूप वाईट वाटतंय! परवा मी घरी परतणार आणि भूत-भविष्याच्या त्या दुष्टचक्रात अडकणार! इथे आल्यावर मी वर्तमानात जगायला शिकल्ये! शहरातल्या मानाने इथे मी शांत आहे हे खरे! पण त्या शांततेत ही अस्वस्थता का यावी? आत्मकेंद्रित आयुष्य जगूनही स्वतःशी संवाद साधण्याची सवयच गेली आहे की काय? का निसर्गाच्या जवळ आल्याने सगळ्या भावना टोकाला जातायत? स्वप्नवत आयुष्य जगायला मिळतंय म्हणून मी भारावून जात नाहीये ना... का आनंदही मला सहन होत नाहीये?

अरुणाचल - एक अनुभूती... (दिवस पाचवा) समारोप http://www.maayboli.com/node/52333

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त...
त्या जंगलातून जाताना त्या रानातल्या वाटा, सगळी झाडं, आजूबाजूची तुरळक वस्ती सगळंकाही स्तब्ध होऊन जणू काही डोळ्यांतून हसत होतं!>>> फार आवडलं हे Happy

आम्ही इकडे मिरे गोळा करत होतो. तर दादा आणि लो तिकडे बांबू कापत होते. बांबू कापून करणार काय असे विचारले तर “इसके तो हम ग्लास बनाएंगे!” असं दादा म्हणाले. म्हणजे इकोफ्रेंडली ग्लास! लो केळीची पानं सोबत घेत होती! आम्हीही तिला मदत केली. >>>> असे चित्र आयुष्यभर "फ्रिझ" करून ठेवावे वाटणारच!

अफलातून साहस सहलीची सुरस कहाणी आवडली. काश.... आम्हीही हे सगळे अनुभवू शकलो असतो...
वाचतो आहोत हे काय कमी आहे?

@ नरेंद्र गोळे खरंय तिथला क्षण अन क्षण फ्रीझ करून ठेवला पाहिजे!
ज्या सरधोपट पद्धतींनी पिकनिक करायचा आपण विचार करतो... त्या पद्धतींना इतका सुंदर तडा गेला आणि एक आगळावेगळी सहल अनुभवायला मिळाली!

त्या जंगलातून जाताना त्या रानातल्या वाटा, सगळी झाडं, आजूबाजूची तुरळक वस्ती सगळंकाही स्तब्ध होऊन जणू काही डोळ्यांतून हसत होतं! त्या स्तब्धतेतही तो परिसर इतका प्रसन्न वाटत होता! पण त्या रानात राज्य नक्की कोणावर असणार? मग लक्षात आलं की मधूनच येणारा, बोचरा तरी आल्हाददायक वाटणारा, आपल्याच नादात आणि लयीत असणारा तो वारा त्या रानवाटांवरून मनमुरादपणे जात सगळ्या परिसराला हसवण्याचा प्रयत्न करत होता! >>>>> हे वाचतानाही इतके मस्त वाटत होतं ना - तू प्रत्यक्ष अनुभवताना तर काय झालं असेल ना ...

अशीच संवेदनशील रहा आणि असेच सुर्रेख आणि भावपूर्ण शब्दांकन करत जा ....

ग्रेट - ही अनुभूति वाचताना सहजच त्या "वातावरणात" न्यायची तुझ्या शब्दांची किमया पुन्हा पुन्हा अनुभवण्यासारखी .... जियो ... Happy

फार सुंदर फोटो! आणि इतका सुंदर दौरा संपत आल्याची जाणीव झाल्यावर डोळे भरून येणं साहजिक आहे.

@शशांक पुरंदरे हा अनुभव इतका समृद्ध करणारा होता की कितीही वर्णन केले तरी ते मला अपुरेच वाटत आहे! प्रोत्साहनपर शब्दांबद्दल खूप खूप धन्यवाद! Happy

छान Happy

मुक्ता, सगळी मालिका अतिशय सुंदर झाली आहे. तुझ्या पुढच्या आयुष्यातही असेच सम्रुद्ध करणारे अनुभव मिळोत, ही सदिच्छा.

छानच. हूरहूर वाटते वाचताना.
तुझी संध्याकाळची अस्वस्थता लिखाणातून स्पष्ट पोचतेय.

सुंदर. पिकनिकच्या ठिकाणी पोचेपर्यंत आलेलं वर्णन फार आवडलं. तुला आलेले अनुभव तरलपणे मांडताही येत आहेत. फोटोंमधील निळाई मन लुब्ध करणारी आहे. असेच अनेक समृध्द अनुभव तुला लाभोत ही सदिच्छा!

उद्याचा दिवस नकोच उजाडायला. फोटो भारी का रानातले फ्रिजचे वर्णन भारी ?वाऱ्यानेच हसवले आणि मेगापिक्सेलात माया कशी मावणार? नवीन पिढीत चांगले लेखक आहेत का? हा प्रश्न सुटला.