'युगमुद्रा' - बाबा आमटे : साधना, वारसा आणि प्रेरणा

Submitted by चिनूक्स on 23 December, 2014 - 14:41

परवा, म्हणजे २६ डिसेंबर रोजी बाबांच्या जन्मशताब्दीवर्षाची सांगता होते आहे. या दिवशी लोकबिरादरी प्रकल्पाच्या नव्या, अत्याधुनिक दवाखान्याचा लोकार्पण सोहळा हेमलकशाला होणार आहे. बाबांच्या जन्मशताब्दीवर्षाच्या निमित्तानं महारोगी सेवा समिती आणि आमटे कुटुंबीय यांच्या सहकार्यानं तयार झालेल्या मेनका प्रकाशनाच्या 'युगमुद्रा' या पुस्तकाचं प्रकाशनही याच कार्यक्रमात होणार आहे.

आनंदवन, सोमनाथ, हेमलकसा या नावांशी करुणा, प्रेम, श्रम, आत्मविश्वास, धाडस यांचा निकटचा संबंध आहे. बाबा-साधनाताई, डॉ. विकास - डॉ. भारती, डॉ. प्रकाश - डॉ. मंदा, डॉ. दिगंत - डॉ. अनघा, कौस्तुभ - पल्लवी, अनिकेत - समीक्षा, शीतल - गौतम, रेणुकाताई - विलास मनोहर या सार्‍यांनी झोकून देऊन तिथे उभं केलेलं काम नेत्रदीपक आहे आणि म्हणूनच बाबांच्या व्यक्तिमत्त्वाचे, त्यांच्या कामाचे विविध पैलू वाचकांपर्यंत पोहोचवणं, हा 'युगमुद्रा'चा हेतू आहे.

'युगमुद्रा - बाबा आमटे : साधना, वारसा आणि प्रेरणा' या पुस्तकाचं एक प्रमुख आकर्षण म्हणजे या पुस्तकाच्या निमित्तानं पहिल्यांदाच संपूर्ण आमटे कुटुंबानं खास या पुस्तकासाठी लेखन केलं आहे. 'वारसा' या विभागात डॉ. विकास आमटे यांची त्यांच्या कामाला केंद्रस्थानी ठेवणारी मुलाखत समाविष्ट केली आहे. याच विभागात डॉ. प्रकाश आमटे यांनी बाबांवर लिहिलेला लेख आहे. डॉ. भारती, डॉ. मंदा यांचेही सुरेख लेख या विभागात आहेत. आमटे कुटुंबातली तिसरी पिढीही या कामात कधीच उतरली आहे. या तिसर्‍या पिढीतल्या दिगंत, कौस्तुभ, अनिकेत आणि शीतल यांच्या लेखांबरोबरच डॉ. अनघा, पल्लवी, समीक्षा आणि गौतम करजगी या आमटे कुटुंबातल्या सुना-जावयाचे लेख हे या विभागातलं प्रमुख आकर्षण. रेणुका मनोहर या बाबांच्या कन्या. त्यांचा व त्यांचे पती श्री. विलास मनोहर यांचा व पहिले आदिवासी डॉक्टर श्री. कन्ना मडावी यांच्या पत्नी समता मडावी यांचा लेखही या विभागात आहे.

बाबांच्या सहवासातून, श्रमसंस्कार शिबिरातून प्रेरणा घेऊन स्वतःचं मोठं काम उभं करणार्‍या काही ज्येष्ठांचे लेख 'प्रेरणा' या विभागात आहेत. 'स्नेहालया'चे डॉ. गिरीश कुलकर्णी, 'श्रद्धा रिहॅबिलिटेशन फाऊंडेशन'चे श्री. भरत वाटवानी, धुळे जिल्ह्यातल्या 'श्रमिक संघटने'चे श्री. कुमार शिराळकर, योजना आयोगाचे माजी सदस्य आणि मध्य प्रदेशातल्या 'समाज प्रगती सहयोग' या संस्थेचे संस्थापक श्री. मिहीर शाह, प्रा. सोमनाथ रोडे, श्री. अतुल शर्मा, श्री. दिलीप हिर्लेकर यांचे अतिशय महत्त्वाचे असे लेख बाबांमधल्या ऊर्जास्रोताचं दर्शन घडवतात.

कोणे एकेकाळी पुरोगामी महाराष्ट्रात साहित्यिक-विचारवंत यांना स्वतःची मतं होती आणि या मतांना जनमानसात महत्त्वही मिळे. पु. ल. देशपांडे, नरहर कुरुंदकर, यदुनाथ थत्ते, एस. एम. जोशी, बा. भ. बोरकर यांनी बाबांच्या कार्याबद्दल अनेकदा लिहिलं. बाबांबद्दल, आनंदवनाबद्दल टीकेचा सूर उमटत असताना कुष्ठरोग-निर्मूलनाच्या कामाबद्दल समाजमनात असलेली घृणा दूर व्हावी, बाबांच्या कामाचं मोल समाजानं जाणावं या हेतूनं हे लेख लिहिले गेले. या लेखांचं संकलन 'उजाळा' या विभागात केलं गेलं आहे. या विभागातला एक अतिशय महत्त्वाचा लेख कुसुमाग्रजांचा आहे. बाबा नाशिकला गेले असताना कुसुमाग्रजांना 'संत' ही कविता स्फुरली. या सुंदर कवितेची जन्मकथा, अर्थातच कवितेसह, या विभागात आहे.

माणसं जोडण्याची कला अवगत असल्यानं बाबांचा पत्रव्यवहार दांडगा होता. बाबांना आणि साधनाताईंना लिहिलेली काही सुरेखं पत्रं या पुस्तकात अंतर्भूत केली आहेत. दादा धर्माधिकारी, विश्राम बेडेकर, गो. नी. दांडेकर, मीना व भास्कर चंदावरकर, मधु दंडवते, राम शेवाळकर यांची ही पत्रं अतिशय हृद्य तर आहेतच, पण बाबांच्या कार्याचं या थोरामोठ्यांनी जाणलेलं महत्त्व आणि त्यामुळे बाबांच्या-साधनाताईंच्या प्रकृतीची सतत केलेली काळजीही हेलावून सोडते.

याच विभागात हेरंब कुलकर्णी आणि सुरेश द्वादशीवार यांचे अतिशय सुरेख असे दोन पूर्वप्रकाशित लेखांना स्थान देण्यात आलं आहे. बाबांचं माणूसपण दाखवणारे विलक्षण वाचनीय असे हे लेख आहेत.

मेनका प्रकाशनातर्फे प्रसिद्ध होणार्‍या 'युगमुद्रा' या बाबा आमटे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेणार्‍या पुस्तकाचं प्रकाशकीय आणि साधनाताई आमटे यांची या पुस्तकात अंतर्भूत केलेली मुलाखत -

yugamudra.jpg


***


***

प्रकाशकीय

बाबा आमटे हे काय रसायन होतं, या प्रश्‍नाची असंख्य उत्तरं येतील. ते ज्याला जसे भावले, तसं त्याचं उत्तर. पण उत्तर बरोबर, तरीही अपुरं, अशी अवस्था. जिंदगी बडी होनी चाहिए, लंबी नहीं, असं 'आनंद' या हिंदी चित्रपटातलं एक गाजलेलं वाक्य आहे. बाबांचं आयुष्य तर मोठंही होतं आणि महानही. चौर्‍याण्णव वर्षांच्या प्रदीर्घ खेळीमध्ये त्यांनी समाजासाठी अफाट, अक्षय ठेवा निर्माण केला. त्यामुळेच त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला अन् जीवनकार्याला कोणतीही विशेषणं लावली, तरी ती अपूर्ण वाटतात. साहित्यिकांना, कलावंतांना बाबांच्या सामाजिक कृतिशीलतेचं अप्रूप होतं, तर सामाजिक कार्यकर्त्यांना बाबांमधला लेखक, कवी, कलाकार लोभसवाणा वाटत होता. राज्यकर्त्यांना ताठ कण्याच्या बाबांच्या याचक नसण्याची, दाता असण्याची अपूर्वाई होती, तर पत्रकारांना कर्मयोगी बाबांच्या मृदू-कठोर व्यक्तिमत्त्वाची नवलाई होती. भूतदयावाद्यांना बाबांची बौद्धिक उंची खुणावत होती, तर बुद्धिवंतांना आणि बुद्धिवाद्यांना बाबांचं करुणाचिंब मन मोहवत होतं. ही स्थिती बाबा निवर्तल्यानंतर, आजही कायम आहे. म्हणूनच बाबांच्या जीवन-कर्तृत्वाचा ठाव घेण्याची समाजाची आस संपलेली नाही.

अफाट जिद्द, असामान्य प्रतिभा आणि अपार कष्ट यांच्या जोरावर विजीगिषु बाबांनी महारोगी सेवा समितीच्या छत्राखाली जे उत्तुंग काम उभं केलं, त्यामुळे केवळ तिरस्कृत महारोग्यांना, किंवा वंचित माडिया गोंड जमातीलाच संजीवनी मिळाली असं नाही; मुख्य प्रवाहातल्या समस्त धडधाकट, सुखी समाजालासुद्धा टोचणी लागली, प्रेरणा मिळाली. तपस्विनी साधना आमटे यांच्या आत्मविलोपी साहचर्याचं मोल तेवढंच मोठं. त्या दोघांनी लावलेल्या, रुजवलेल्या रोपट्याचा वृक्षविस्तार एकीकडे डॉ. विकास अन् डॉ. भारती आमटे आणि दुसरीकडे डॉ. प्रकाश अन् डॉ. मंदा आमटे यांनी कसाकसा केला, आणि आता त्यांची पुढची पिढीसुद्धा या कामात कशी विरघळून गेली आहे, हा एव्हाना सगळ्यांच्या कौतुकादराचा विषय बनला आहे.

'मी आणि माझं कुटुंब' या वृत्तीशी बाबांची पूर्ण फारकत होती. मूळ बैठकच होती जात, धर्म, भाषा, प्रदेश यांची कुंपणं तोडणारी. त्यामुळे साहजिकच बाबांचा कृतिप्रवण बौद्धिक, आध्यात्मिक वारसा आमटे कुटुंबीयांपुरता सीमित न राहता सर्वदूर, अगदी परदेशांतसुद्धा गेला. बाबांच्या हयातीत आणि त्यांच्या मृत्यूनंतरही असंख्य थोरामोठ्यांनी त्यांच्या कामाची अत्यंत कृतज्ञतापूर्ण दखल घेतली आणि जनसामान्यांच्या कित्येक पिढ्या आनंदवन, सोमनाथ अन् हेमलकसा यांच्यापुढे नतमस्तक होत राहिल्या. तो संदेश चिरंतन होता, हेच त्याचं कारण.

बाबा आमटेंच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं सिद्ध झालेल्या या पुस्तकात त्या चिरंतनत्वाचं गमक गवसण्याचा प्रयत्न केला आहे. बाबांच्या संबंधात यापूर्वीही खूप जणांनी विपुल लेखन केलेलं आहे आणि ते अनेकांनी वाचलेलंही आहे. तरीही बाबांच्या व्रतस्थ जीवनाबद्दल, त्यांनी मागे ठेवलेल्या वारशाबद्दल, त्यातून उगम पावलेल्या प्रेरणांबद्दल जाणून घेण्याची भूक असणार्‍यांची संख्या कमी नाही. त्याही पलीकडे जाऊन, ज्यांना या भुकेची जाणीवच अद्याप झालेली नाही, त्यांना या पुस्तकामुळे ती व्हावी, ही अपेक्षा आहे.

हे पुस्तक अर्थातच 'समग्र बाबा आमटे' नाही, तरीही बाबांच्या जन्मशताब्दीचं औचित्य साधत ते अनेक अर्थांनी वैशिष्ट्यपूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे.

स्वतः बाबा आणि साधनाताई यांसह आमटे घराण्यातल्या तीनही पिढ्यांच्या लिखाणाचा या पुस्तकात अंतर्भाव आहे. त्या घराण्यात मनोहर आडनावाचं दांपत्यही आलंच! बाबांच्या वारशाचं असं एकत्रित दर्शन पहिल्यांदाच सादर होत असावं. आनंदवन, सोमनाथ प्रकल्प आणि हेमलकशाच्या लोकबिरादरी प्रकल्पानं प्रेरित होऊन शेकडो तरुण-तरुणींनी महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेर समाजसेवेत स्वतःला झोकून दिलं. खुद्द ती कामंसुद्धा आता इतर अनेकांची प्रेरणास्रोत बनली आहेत. त्यांपैकी काही मोजके शिलेदार या पुस्तकात लिहिते झाले आहेत. त्यातल्याच दोघांचं इंग्रजीतलं लेखनही यात समाविष्ट आहे.

समाजाच्या अनास्थेशीच नव्हे, तर रागाशी आणि विरोधाशी सामना करत बाबांनी काम उभं केलं. त्यानंतरही परिस्थितीत फार बदल झालेला नसताना यदुनाथ थत्ते, पु. ल. देशपांडे, कुसुमाग्रज, वि. स. खांडेकर, नरहर कुरुंदकर, एस. एम. जोशी या आणि इतर अनेक साहित्यिकांनी / विचारवंतांनी त्या कामाचं मोल समाजाला समजावलं. त्यातलं काही निवडक लिखाण संपादित स्वरूपात आवर्जून पुन्हा या पुस्तकात समाविष्ट करत आहोत.
बाबा हा एक मोठा लोहचुंबक होता. त्यांच्या संपर्कात आलेल्यांपैकी अनेकांचा त्यांच्याशी नियमित पत्र-संवाद होत असे. त्यातली काही बोलकी पत्रं या पुस्तकात वाचायला मिळतील.

वरोर्‍याचा तो शिल्पकार जेवढा श्रवणीय आणि वाचनीय होता, तेवढंच त्यानं साकारलेलं जिवंत शिल्प प्रेक्षणीय होतं. त्या जिवंत शिल्पाची सचित्र झलक समाविष्ट केल्याखेरीज हे पुस्तक पूर्ण होऊ शकलं नसतं. म्हणूनच अक्षरशः हजारो छायाचित्रांपैकी काही निवडक, प्रातिनिधिक छायाचित्रंच या पुस्तकात समाविष्ट केली आहेत.

मर्यादित पृष्ठसंख्येच्या या शतरंगिणी (कॅलिडोस्कोप)मधून बाबा आमटे नामक युगमुद्रेच्या महत्त्वाच्या पैलूंचं दर्शन व्हावं आणि त्यातून खुद्द बाबांना अभिप्रेत होतं त्याप्रमाणे प्रेरणेचे आणखी अंकुर फुटावेत... या अपेक्षेसह हे पुस्तक वाचकार्पण!

- आनंद आगाशे

***

होते अवघड तरी...

- साधना आमटे

बाबा आमटे आणि साधनाताई यांची संपूर्ण वाटचाल अगदी हातात हात घालून झाली, तरी साधनाताईंचं स्वतःचं व्यक्तिमत्त्व बाबांपेक्षा अगदी निराळं होतं आणि बाबांच्या निकट सान्निध्यात राहूनही त्यांनी ते अखेरपर्यंत जपलं. साधनाताईंची ही मुलाखत त्या उभयतांच्या संघर्षमय, उदात्त जीवनावर प्रकाश टाकते.

बाबांचं नाव मुरलीधर देवीदास आमटे. तर या मुरलीधरानं इंदू घुले नावाच्या स्वरूपसुंदर आणि सुविद्य मुलीला, कसं भुलवलं याबद्दल आम्हाला सांगा.

थोडी पार्श्‍वभूमी सांगते माझ्या स्वभावाची. म्हणजे लग्नाच्या आधीची. जी कधीही मी फारशी कुणाशी अशी बोललेले नाही. माझ्या घरचं वातावरण अत्यंत सनातन. सगळे महामहोपाध्यायी. ती परंपराच असल्यामुळे आचार-विचार वेगळेच होते इतरांपेक्षा. प्रत्येकजण खूप कर्मठ आणि त्यात मी जास्त कर्मठ. अशा घराण्यात माझा जन्म झाला. वडील लवकर गेले. त्यामुळे आपल्या मुली छान राहायला तर पाहिजेत, पण कुठे बहकल्या नाही पाहिजेत, याची काळजी. म्हणून कुठे सिनेमा वगैरे पाहण्याची आम्हाला परवानगी नव्हती. जवळजवळ बंदीच होती बाहेर जाण्याची.
आता खरं सांगायचं म्हणजे, बाबा लग्नच करणार नव्हते.

पण त्याआधी सांगायचा मुद्दा असा, की माझ्यामध्ये सेवावृत्ती आणि करुणा प्रथमपासूनच होती. ती काही मी बाबांपासून शिकलेली नाही. बाबांपासून मी जात-पात, धर्म पाळायचा नाही, हे शिकले. मी बाबांना म्हणते, तुम्ही माझ्यापासून करुणा शिका. ती माझ्यामध्ये तुमच्यापेक्षा जास्त आहे. मी लहान असताना आमच्या घरासमोर म्युनिसिपालटीचा नळ होता. त्या नळावर पाणी भरायला बाहेरच्या बायका यायच्या. स्पृश्य, अस्पृश्य, दोन्ही यायच्या. स्पृश्य एका बाजूला बसायच्या आणि महार-मांगांसारख्या अस्पृश्य एका बाजूला. नळ गेला, की त्या बायका बिचार्‍या तशाच राहायच्या. हिरमुसल्या व्हायच्या. त्या वेळी मी काही फार मोठी नव्हते. असेन नऊ-दहा वर्षांची. मला खूप दया यायची. पण माझ्यावर इतके कर्मठ संस्कार झाले होते, की पाण्याचा नुसता थेंब जरी उडाला, कपड्यांचा स्पर्श जरी झाला, तरी अंघोळ करावी लागायची. आमच्या अंगणात लहान विहीर होती. या हिरमुसलेल्या बायकांना लांब बसवून त्यांची सर्व मडकी मी पूर्ण भरून द्यायचे. असं अनेकदा व्हायचं. गाईला पाणी पाजणं, खाऊ घालणं हेही काम माझ्याकडेच होतं.

आम्ही दोघं तसे समृद्ध घरातले. बाबा तर खूपच श्रीमंत होते. आमच्याकडे सात महामहोपाध्याय झालेले आहेत. बाळशास्त्री हरदास, डॉ. शिवदास बारलिंगे, केशवराव ताम्हाणे हे सर्व माझ्या आजोबांचे शिष्य होते. त्यामुळे आमच्यावर संस्कार सगळे वेगळे होते.

वास्तविक आमचं आणि बाबांचं नातं होतं. माझ्या आईच्या काकांना बाबांची सख्खी बहीण दिलेली होती. या नात्यामुळे ते आमच्याकडे आले. त्यावेळी माझी मोठी बहीण लग्नाची होती. पण बाबांनी ब्रह्मचारीच राहायचं असा निश्‍चयच केला होता. बाबा आमच्याकडे आले, त्या दिवशी मला पाहायला एक पीएच. डी. झालेले डॉ. देवरस नावाचे गृहस्थ आले होते. त्यांच्याबद्दलची नापसंती बोलायची माझी हिंमत नव्हती. पण मी माझ्या आईला, बहिणीला म्हटलं, की हा तर खूपच ठेंगणा आहे, मला नाही पसंत. माझे आजोबा होते. आईचे वडील. माझ्या आजोबांना सांगितलं आईनं, तर आजोबा भडकले माझ्यावर, 'ह्या पोट्टीला आणखी काय चांगलं मिळणार आहे? घरी चालत आला चांगला, तर नाही म्हणून राहिली म्हणे.' मला खूप दाटलं. त्याच दिवशी बाबा आले तिथे. बाबांना सांगितलं माझ्या आजोबांनी, ही पोट्टी कशी आहे पाहा, तिला घरी चालत एवढं मोठ्ठं स्थळ आलंय, हिला म्हटलं तर नाहीच म्हणते. बाबा निरागसपणे म्हणाले, तुम्ही तिची काळजी करू नका, मी स्थळ पाहून देईन तिला. त्या वेळी बाबांचे सगळे मित्र आय. सी. एस. वगैरे. हायरेंज. त्यांच्या मनात काही पाप नव्हतं (हसून).

पण मग बाबा आल्यावर मी काही त्यांच्या पुढे पुढे करत नव्हते. माझा स्वभावच नव्हता तो. (हसत हसत) नंतर पंधरा-वीस दिवस आमच्याकडे राहिल्यावर त्यांच्यात थोडंसं हृदयपरिवर्तन व्हायला लागलं होतं. काही दिवसांनी आले परत आणि हिंमत करून म्हणाले, की माझ्याइतका लायक कुणी दिसला नाही. मलाच इंदूशी लग्न करायची इच्छा आहे. त्या वेळेला सगळ्यांची रिअ‍ॅक्शन म्हणजे, खूप राग होता. वा रे, संन्याशी म्हणे, चांगला पिघळला. आणि मग मीपण हो म्हणून टाकलं. मलाही थोडं वेगळं जीवन जगायचं होतं. पण खूप विरोधातूनच हे लग्न झालं.

बाबांशी लग्न म्हणजे सतीचं वाण आहे, याची तुम्हाला जाणीव होती तर...

नाही. नव्हती एवढी. सतीचं वाण वगैरे काही माहीत नव्हतं. त्यांच्याकडे घरी चांगला बंगला, गाडी, सगळं काही होतं. पण ते पाहून मी लग्न नाही केलं. मला वेगळं जीवन जगायचं होतं. बाबांनी त्यावेळी नुकतीच वकिली सोडली होती. त्यांचं म्हणणं, लग्न जमलं माझं, आता मला वकिली करायची नाही. सनद फाडून टाकली त्यांनी, तुकडे केले.
मग एकशे पन्नास रुपये महिना वेतनावर कोरगांवकर ट्रस्टसाठी आम्ही काम करू लागलो. या ट्रस्टचे अध्यक्ष शंकरराव देव होते. आचार्य जावडेकर, आचार्य भागवत, आप्पासाहेब पटवर्धन, एस. एम. जोशी, भाऊ धर्माधिकारी, हरीभाऊ मोने असे सदस्य होते. एवढ्याच पैशात संसार करायचा ठरवला. वडिलोपार्जित प्रॉपर्टीही नाही घेतली आम्ही. आनंदवनाला निघायच्या आधीचा, म्हणजे १९४६ ते १९५१ चा हा काळ, अत्यंत कठीण गेला.

मधुचंद्राच्या काळात तुमचं म्हणे हरिजन वस्तीत स्वागत झालं. स्मशानाशेजारच्या बंगल्यात बाबांनी श्रमाश्रम काढला.

थोडक्यात सांगते. बाबांना दलितांबद्दल फार प्रेम. पहिल्यापासून. बाबांना जर महारोगी रस्त्यात दिसला नसता, तर बाबा दलितांचे झाले असते. डॉ. आंबेडकर, महात्मा फुले यांच्या खालोखाल बाबांचा नंबर आला असता. विकासचा जन्म होईपर्यंत आम्ही रोज दलित मोहल्ल्यात जायचो. मी आधी कुणाच्या हातचं पाणीदेखील प्यायले नव्हते. म्हणजे ओबीसी नाही, तेली नाही, माळी नाही, कुणाच्याच हातचं नाही. मी मधुभाई पंडितला नेहमी म्हणते, की तुम्ही मासोळ्या खाणारे सारस्वत. तुमच्या हातचं लग्नाआधी मी पाणी नसते प्यायले. पण लग्न व्हायच्या आधी बाबांनी एक लेक्चर झोडलं होतं आमच्या घरी, की मानव-मानव कसा एक आहे, हे जात-पात धर्म, पंथ याला कसा काही अर्थ नाही वगैरे वगैरे. हे जेव्हा मला पटलं, तेव्हाच मी तयार झाले.

लग्न झाल्यावर आमचं स्वागत हरिजन मोहल्ल्यात झालं. सगळ्या तर्‍हेचे हरिजन लोक होते तिथे. चांभार, तेली, भंगी, महार, भूरड, परधान... त्यांच्यामध्ये आमचं स्वागत झालं. त्यानंतर तिथेच भंग्याच्या घरचं पहिल्यांदा पाणी प्यायले. काचेच्या पेल्यामध्ये. म्हणजे हनुमानझेप मी तिथेच घेतली. त्यानंतर आम्हाला सासर सुटलं, माहेर सुटलं. आमच्याकडे जातपात पाळत नाहीत, म्हणजे हा भ्रष्टाचार झाला, असं म्हणून आमच्याकडे कोणीच येत नव्हतं. विकासच्या जन्मानंतर आम्ही गावातलं घर सोडलं. ज्या ब्राह्मणाच्या घरी राहत होतो, तिथे रोज दलित यायचे. अंगणात आम्ही रात्री झोपायचो, तर घरावर दगड यायचे. घरमालकांनी आम्हाला ताबडतोब घर खाली करायला सांगितलं. पण जाणार कुठे? कुठेही हा प्रश्‍न आलाच असता.

आर. के. पाटील नुकतेच अन्नमंत्री झाले होते त्या वेळेला. मुसलमानांच्या कब्रस्तानाजवळ जुना बंगला त्यांनी विकत घेतला होता. तो म्हणजे घुशी वगैरेंनी पोखरलेला. डागडुजी करून आम्ही तिथे राहायला आलो. मग बाबा मला म्हणाले, की आपण एक प्रयोग करू - साम्य योगाचा. महार, चांभार, अस्पृश्य आणि स्पृश्यसुद्धा - असे जे तयार झाले, त्या वीस-बावीस जणांसकट आम्ही तिथे एकत्र राहायला लागलो. खूप कष्ट काढले जीवनामध्ये आम्ही तेव्हा. शेजारी मुसलमानांचं स्मशान होतं. मुर्दे दिसायचे पलीकडे.

या प्रयोगामागची कल्पना काय होती?

या प्रयोगाची कल्पना म्हणजे- जातपात, धर्म सोडून सगळ्यांनी एका पातळीवर राहायचं. एकच कुटुंब होतं ते. त्याचवेळी विकासचा जन्म होऊन नुकतेच दोन महिने झाले होते. आम्ही एकत्र राहत असल्यानं मला वेगळं असं काहीच खायला मिळत नव्हतं. दूध वगैरे सगळं बंद. एका मांगाला तीन बायका होत्या. त्यांची जी मुलं होती त्यांची वेणीफणी मी करून देत असे. उवा काढून देत असे.

माझ्या लग्नात जे कपडे मला मिळाले होते - म्हणजे माझ्या बहिणींनी, आईनं दिले होते ते - त्याची आम्ही खादीचं व्रत घेतल्यानं काहीच किंमत राहिली नव्हती. मी ते सगळे त्या बायकांना वाटून दिले. फ्रॉक शिवले मुलींना.
स्वयंपाक म्हणजे मी फक्त भाजी वगैरे करायचे. भाकरी वगैरे त्या करायच्या. भाजीसुद्धा रोज कुठे? भाजी फक्त रविवारी. वरण, भाकरी, चटणी - बस् हेच जेवण. फक्त आठवड्यातून एकदा दोन रुपयांची भाजी असे. रविवारी.
त्या वेळी त्या बायकांना खरुज वगैरे होती. त्या वेळचे दलित आणि आताचे दलित यांमध्ये पुष्कळ फरक आहे आता. पण मी मनाची तयारी केली. मी तिथे झाडू तयार करायला शिकले. मांग, बुुरूड असे लोक होते तिथे. बुरूड टोपल्या विणत आणि मांग शिंदीची पानं आणून फडे तयार करीत. फडे तयार करण्यात मी निष्णात झाले. मला त्यांच्यापेक्षाही जास्त चांगलं करता यायला लागलं. ते फडे तयार करून विकायला पाठवायचे. कारण एकशे पन्नास रुपये मिळायचे आम्हाला. त्यात आम्ही आणि बाकी सगळे.

बाबा नागपूरला थर्ड क्लासनं ग्रांट रेल्वेनं जायचे. काचेचे प्याले, एकदाण्या, दगड्या असं सामान टोपल्यांमध्ये विकत आणायचे आणि या लोकांना विकायला द्यायचे. कधी ज्वारी कमी किमतीत घ्यायचे आणि ती त्यांना विकायला द्यायचे. फार कठीण दिवस गेले ते.

तिथे सतत भयंकर साप आणि विंचू. त्यांची गणतीच नसायची. माझ्या आयुष्यात मी आत्तापर्यंत पाचशे-सहाशे विंचू मारले असतील. त्या घरी संध्याकाळी वारं सुटलं की विंचू यायचे. बाबांना तिथेच एकदा साप चावला. त्यावर औषध काय? तर काहीच नाही. माझा विश्‍वास आहे म्हणून असेल, पण तिथे कुणी परमेश्‍वराचा अंश म्हणून अप्पा मांगलेकर नावाचे मालगुजार आमच्याकडे रात्री बारा वाजता आले. बाबांचं विव्हळणं सुरू होतं. बाबांनी कधी मिरची खाल्लीच नव्हती, तरी त्यांनी उतारा म्हणून एवढ्या मोठ्या मिरच्या खायला दिल्या. आणि मग कडुलिंबाचा पाला दिला. म्हणजे साप चावला की नाही हे कन्फर्म करायला. साप दिसला नव्हता ना. मग त्यांनी काहीतरी मुळी सांगितली. त्या मुळीचं औषध बाबांना लावलं आणि त्यांना रात्रभर उभं ठेवलं. आम्ही रात्रभर रघुपती राघव राजाराम... भजन म्हणत होतो. बाबांना असं रात्रभर नाचवत ठेवलं. दिवस उजाडायला लागला, तेव्हा बाबांचं जरा ठीक झालं.

प्रकाशच्या जन्माची कथा अशीच. मला सातवा महिना लागला आणि चाळीस दिवसांचा जोरदार टायफॉईड झाला. रोज एकशे पाच अंश ताप. जवळ कोणीच नाही. विकास आठ-नऊ महिन्यांचा. आमचं धुणं, भांडी, विकासचे शीचे कपडे धुणं, सगळं बाबाच करायचे. खेड्यातून दोन-तीन गाई आणल्या होत्या. त्यांचंही दूध काढायचे. हे करता करता एकशे साठ पौंडांच्या बाबांचं वजन एकशे वीस पौंड झालं होतं. मग विकासला काही दिवस मातृसेवा संघात कोणी सांभाळावं म्हणून पाठवलं. आमच्याकडे महादेव नावाचा एक मुलगा होता. त्यानं सांगितलं, की तिथे विकासला दूध पाजून खोलीत बंद करतात. मी त्याला कसंही करून घरी आणायला लावलं. स्वयंपाक, माझं बेडपॅन वगैरे सगळं बाबा करायचे. करायचं काय?

टायफॉईडवर डॉक्टरांनी क्विनाईनचं इंजेक्शन दिलं. माझा श्‍वास अडला. बाबांना म्हणाले, मी चालले आता. विकासचा सांभाळ तुम्ही करा. मग डोळे मिटले आणि सकाळी डोळे उघडले. (हसत) मनात म्हटलं, आपण जिवंत आहोत तर!

नंतर मला नऊ महिने पूर्ण होत आले. पण सगळ्यांनी सांगितलं, की हा वाचणार नाही. पडूनच जाणार. पण नशीब! तो यायचा होता ना! एवढं काम करायचं होतं ना त्याला. मग नवव्या महिन्यात मी पडले. आणि एवढं लागलं, की वरोर्‍याच्या सिस्टरांनी बाळंतपण करायला नकार दिला. मला नागपूरला घेऊन जायला सांगितलं.
मग आर. के. पाटील सिव्हिल सर्जनला घेऊन आले आणि बाबांना म्हणाले, साधनाताईंना नागपूरला पाठवा. तिथे सगळं नीट होईल. मी म्हणाले, फायदा काय त्याचा? गरीब बायका गेल्या असत्या का सिव्हिल सर्जनकडे आणि मिनिस्टर आले असते का त्यांना न्यायला? आता आपण गरिबीचा वसाच घेतला आहे, तर जे होईल ते होईल. नंतर चार-आठ दिवसांनी मला असं वाटलं, की आपली वेळ आलीये. बाबांनी मला टांग्यातनं दवाखान्यात सोडलं आणि स्वतः गेले म्युनिसिपालटीकडे. मला एका खोलीतल्या कॉटवर टाकलं आणि नर्सेस तिकडे तयारी करायला गेल्या तोवर कॉटवरच प्रकाश जन्मला.

घरी आले अकरा दिवसांनंतर. घर पाहिलं तर सगळं भणभण पडलेलं. प्रकाशला टाकलं कॉटवर. घर स्वच्छ केलं आणि बाबा यायच्या आधी पटकन झोपून गेले. म्हटलं, मोठी बरसात होणार आपल्यावर. घाबरून घाबरूनच केलं सगळं.

कोणाला घाबरून? बाबांना घाबरून?

हो. बाबांना घाबरून. तेव्हा घाबरतच होते. आता नाही घाबरत. (हसत) पुष्कळ वर्षं झाली ना. आता त्यांच्या चुका त्यांच्यासमोरच सांगते. बाबांचं असं आहे, त्यांचा दूरचा चष्मा आहे आणि माझा बायफोकल चष्मा आहे. माझी जवळची व्हिजन आहे, त्यांची दूरची आहे. दोन्हीची गरज असते जीवनामध्ये.

बाबा एक उग्र प्रकृतीचे गृहस्थ आहेत. कसं सांभाळून घेतलंत त्यांना?

असं आहे, त्या वेळी 'स्त्रीमुक्ती' नव्हती. 'स्त्रीमुक्ती' असती तर कदाचित चित्र पालटलं असतं. पातिव्रत्य हा धर्मच होता त्या वेळेला. मला खरंतर लग्नाच्या बाजारात बराच भाव होता. पण मलाच काहीतरी वेगळं हवं होतं. त्यामुळे मीच सगळं सोडून आले होते आणि जे येईल ते अ‍ॅक्सेप्टच करायचं, असा पतिव्रताधर्म होता म्हणून मी केलं.
मनाची तयारी करतो माणूस तेव्हा जमतं सगळं. बाबांच्या सहवासात जिवाला कधी घाबरले नाही मी. या आयुष्यात बाबांचे आजारच इतके झाले, की त्या आजारांचा एक ग्रंथ तयार होईल. अनेक मृत्यूंशी लढाया घेतल्या बाबांनी! अनेकदा! सगळी हॉस्पिटल्स पाहिली.

इंदूताई, खूप तर्‍हेतर्‍हेने पाहुणे तुमच्याकडे आले. तर्‍हेवाईकसुद्धा आले. देशी आले, परदेशी आले. राष्ट्रपती आले, पंतप्रधान आले, तुम्ही कसं काय सगळं सांभाळलंत?

माझ्यात पुष्कळ हिंमत होती. कोणत्याही मजुरी करणार्‍या बाईपेक्षा मी जास्त करून दाखवत असे. आताही करू शकते. चाळीस-पन्नास लोक जरी घरी आले, तरी मी एकटी चुलीवर स्वयंपाक करत असे. बाबा टनानं लाकडं फोडायचे. रोज चूल-पोतेरं करण्याचं काम बाबांनी वर्षभर केलं. बाबांचं नेहमी असं म्हणणं असे, की श्रम है श्रीराम हमारा. त्यामुळे कोणत्याही कामात भेदभाव नाही. त्यांच्यात करुणा खूप भरली आहे. पण शीघ्रकोपी आहेत बाबा. एकदम एक घाव दोन तुकडे. मी ते तुकडे जोडत असते. वेल्डिंगच. (हसत) मी वेल्डर आहे. बाबा शीघ्रकोपी असल्यानं मी त्यांना नेहमी म्हणते, हायली इम्फ्लेमेबल! हँडल विथ केअर! मग बाबा गमतीनं म्हणतात, नॉट टू बी लूज शंटेड. (हशा).

आणखी एक गंमत सांगते. एकदा विनोबांबद्दल बाबांनी लिहिलं, तुझ्या प्रवचनातून पावनता अनेक लोक पिऊन जातात, पण तुझ्या शिष्यांच्या नशिबी वंचनेचा चोथाच आला आहे. यावरून मी बाबांना म्हटलं, तुझ्या बोलण्यातून प्रेरणा अनेक लोक घेऊन जातात, पण तुझ्या साधनेच्या नशिबी कटकटीचा चोथाच आहे (हसत) कटकट हिअर! कटकट देअर! कटकट कटकट एव्हरी व्हेअर!! (हशा) आता आमची जुगलबंदी खूप चालते.

बाबांसारखा उग्र प्रकृतीचा माणूस कधी हळवा झाला का?

बाबा दुसर्‍यांचं दुःख पाहून हळवे होतात. स्वतःचं नाही. दुसर्‍यांची दुःखं बघवेनात म्हणून तर एकातून एक कामं सुरू झाली. आंधळ्यांचं काम, मूकबधिर वगैरे.

बाबा रेल्वेनं जात होते एकदा दिल्लीला. एक म्हातारा पडला होता असाच. त्याला कुणी पाहत नव्हतं. गणपत नाव होतं त्याचं. गाडी यायला अर्धा तास होता. तेवढ्यात बाबांनी त्याला घरी आणलं. तो घाणीनं भरला होता. गरम पाणी करायला लावलं. स्वतः त्याची घाण धुतली आणि मग पटकन् गाडीत बसले.

माझाही मूर्खपणाच सांगते तुम्हाला. अंधश्रद्धाच म्हणा त्याला. त्या श्रद्धेवर मी आत्तापर्यंत जगली आहे. मी अत्यंत भाविक. बाबांचा देवावर विश्‍वास, पण कर्मकांडावर अजिबात नाही. आमच्याकडे महायुद्धं झाली असतील या उपवासाकरता! उपवास केला, की बाबा भयंकर कासावीस व्हायचे. मी कधी आयुष्यात खोटं बोलले नाही. फक्त उपवासाकरता नाटक करायचे. खोटं बोलायचे. बाबांचे अनेक मृत्यू मी जवळून पाहिले. म्हणून मी अनंत उपवास केले. माझी लहान लहान मुलं. एवढं मोठ्ठं जंगल! कसं करावं?

माझ्या अंधश्रद्धेचा एक किस्सा. मी मनात म्हणे, सावित्री आणू शकते आपल्या नवर्‍याला परत, मग मी का नाही आणू शकणार? मी तर जिवावर उदार आहे. आजारी बाबा, गिंडेंच्या दवाखान्यात दाखल होते. बाबा सीरियस आहेत, असा रात्री गिंडेंचा फोन आला. माझी छोटी बहीण त्या वेळी घरी होती. तिला म्हणाले, आज स्वयंपाक तू कर. विकास-प्रकाशला बघ. मी जाते आज वडाखाली. सावित्रीची पूजा करते. पहाटेच मी अंघोळ करून निघून गेले. तिथे सगळं जंगलच होतं. मोठ्ठं वडाचं झाड होतं तिथे. वाघ, रानडुक्कर, कोल्हा, लांडगा असे प्राणी असायचे. त्या वेळी आमची झोपडीच होती नुसती. म्हणजे ही १९५४-१९५५ सालची गोष्ट असेल पाहा. मला विनोबांची गीताई पुष्कळ वर्षांपासून पाठ आहे. मनात आलं, की गीताईची अठरा आवर्तनं करू. तेव्हा एवढं लक्षात नाही आलं, की एकदा गीताई म्हणायला दीड ते दोन तास लागतात. म्हणजे मला चोवीस तासदेखील पुरणार नव्हते. अठरा आवर्तनं करायला लागले. संध्याकाळ झाली. रात्रीचे दहा वाजले. अकरा वाजले. आमचे सगळे आदिवासी पेशंट्स घाबरले. त्यांना कळलं, की ताई निघून गेल्यात जंगलामध्ये. सकाळपासून पत्ता नाही ताईंचा. त्यांनी मग पलिते पेटवले. भाले घेतले. जंगलात शोधत ताई, ताई करत ते वडाखाली आले. तेव्हा मी प्रदक्षिणाच घालत होते. अकरा आवर्तनं झाली होती. सकाळपासून पाणीसुद्धा न घेता तोपर्यंत होते. असे आयुष्यात पाचशे तरी उपवास मी बिनपाण्याचे केले आहेत. अशावेळीसुद्धा डोक्यावरून पाणी आणायचं, भांडी घासायची, धुणी धुवायची ही कामं केलीत. माझी मुलं लहान तर होतीच. माझी स्वतःची दोन. आणि दत्तक तीन मुली. विहिरीवर जायचे, तेव्हा विहिरीवर कॉट ठेवायचे. धुणी धुवायचे. अशा प्रकारचं जीवन होतं. खरंतर बाबांच्या आजारपणामुळेच मी हैराण होऊन गेले होते. कधी कधी आनंदवनात बाबा इतके सीरियस व्हायचे, की डोळेच फिरवायचे, त्यांची दातखीळ बसायची. नाडी फक्त पन्नास असे त्या वेळी. हातापायाला गोळे यायचे. मला काही सुचायचंच नाही. आसपास जंगलच होतं. तिथे धावतच पेशंट्सकडे जायचे. बाबा सीरियस झाले आहेत, बैलगाडी घेऊन डॉक्टरांकडे जा म्हणून त्यांना सांगायचे. ते येईपर्यंत माझा प्राण व्याकूळ होत असे. तासाभरानं डॉक्टर यायचे. कोरॅमिनचं इंजेक्शन द्यायचे. गावात बातमी पसरायची, बाबा सीरियस आहेत. लोक बघायला यायचे. तोवर बाबा अगदी व्यवस्थित दवाखान्यात काम करत असायचे!

बाबांचे आजार आणि मृत्यूशी लढाया याचा मोठा ग्रंथ होईल. (हसत) त्यांना रक्ताच्या ओकार्‍या व्हायच्या. लोबॅक्टोमी का काय म्हणतात ते. मला नीट माहीत नाही. टी. बी. झाला होता. आम्ही एक दिवस मोजली, तर बाबांची चोवीस ऑपरेशन्स झाली आहेत. पहिल्यांदा एकवीस झाली होती. म्हटलं दुर्वांची जुडी झाली. नंतर पेसमेकर तीन वेळा बसवलं. म्हणून चोवीसपर्यंत आली.

तुम्हाला असं नाही वाटत, की बाबा निर्भय तर आहेतच, पण तुम्ही त्यांच्यापेक्षा जास्त निर्भय आहात?

(हसतच) त्याचं असं आहे, की लेप्रसी सांसर्गिक नाही. पण निर्भयता सांसर्गिक आहे. तो गुण मला लागला.

बाबांनी आपल्या कामामध्ये क्षेत्र बदलताना तुमच्याशी काही विचारविनिमय केला का? तुम्ही काही सुचवलंत का?

नाही नाही. मी काही सुचवलं नाही. बाबांनीच सांगायचं. मी म्हणजे... हिज मोस्ट ओबिडियन्ट सर्व्हंट...

तुम्ही मुकाट्यानं सगळं करत गेलात.

तुम्ही सगळ्या लोकांनी आधीच मला पदव्या देऊन टाकल्या होत्या. काहीजण मला आनंदवनाची गवळण म्हणायचे. सोळा गाई होत्या. रोज त्यांचं बघायला तीस रुपये महिना द्यायची ऐपत नव्हती. मग मीच शिकले. शिकले म्हणजे खूप लाथा खाल्ल्या. हे हात सुजायचे. असं करता करता मी एक्सपर्ट झाले दूध काढण्यात. पहाटे तीन वाजता उठायचे. बाबा दुधाची भांडी घासायचे. जवळजवळ एक वर्ष मी अकरा गाईंचं दूध काढलं. बाबा पाणी गरम करून द्यायचे. मी हात शेकायचे. बाबांचा हात तुटलेला आहे अ‍ॅक्सिडेंटमुळे. त्यामुळे दोन-पाच गाईंच्या धारा काढल्या तरी त्यांचा हात सुजून यायचा.

तुम्हाला कधी भीती वाटली का?

'भारत जोडो'च्या वेळेस बाबा पंजाबमध्ये गेले होते. त्यावेळी भीती वाटत होती. पण तरी मी 'नाही' नाही म्हणाले बाबांना. बाबा अतिरेक्यांकडे एकटे गेले. त्यावेळी रिबेरो होते. ते त्यांच्या पाया पडले. म्हणाले, तुम्ही अमृतसरला जाऊ नका. तुम्ही काही परत येणार नाही जिवंत. पण बाबा गेले. पाठीमागच्या दारावर टकटक् केलं त्यांनी. अतिरेक्यांनी दार उघडलं. म्हणाला, बाबा आतमध्ये चला. बाबा गेले आतमध्ये. खूप चांगलं बोलले सर्व अतिरेकी. आणि मग मसाल्याचं दूध दिलं बाबांना. बाबा म्हणाले, माझ्या गाडीत इतकेजण आहेत. त्यांनी लगेच सगळ्यांना दूध दिलं. निर्भयता बाबांमध्ये कायम आहे. पण अंधश्रद्धा म्हणा, काहीही म्हणा, मला असं वाटायचं, की काही कमी पडलं तर माझा कंट्रोल आहे.

आणि आता बाबांनी नर्मदेचं काम घेतलं. म्हणाले, मी जीव देईन त्या पाण्यामध्ये. असं ऐकल्यावर मनात असं आलं का, की बाबाला आपण समजावून सांगावं म्हणून?

नाही, नाही, मी स्वतःला कमी समजते. बाबांचं व्यक्तिमत्त्व चतुरस्र आहे. चौफेर बुद्धिमत्ता आहे. त्यांना मागे कशाला खेचायचं? या कामात तर मीसुद्धा तयार होते. नर्मदेमध्ये मी सहा-साडेसहा वर्षं स्नान केलं. अतिशय भाविकतेनं केलं आहे. नर्मदेची पूजा करत असे. उन्हाळ्यात, हिवाळ्यात, धो-धो पावसातसुद्धा. तेव्हा रोज जागा बदलाव्या लागायच्या. दोन वेळा मी नर्मदेमध्ये पूर्ण बुडाले आहे. पण वापस कशी आले, हे मला माहीत नाही. (हसत) मी 'नर्मदा-रिटर्न' आहे असं लोकांना सांगते.

तुमच्यात आणि बाबांमध्ये आणखी कोणत्या विषयांवर मतभेद आहेत?

मतभेद म्हणजे काही गोष्टी आवडत नाहीत बघा. तिथे निषेध दाखवते. बाबांपेक्षा ज्या गोष्टी मला नीट समजतात, त्या मला सांगितल्यावर खूप राग येतो. मी म्हणते, सूर्य असताना तुम्ही मला टॉर्च दाखवता. इथून चल, तिथून चल, अशी वाट दाखवायची गरज आहे का? कोणी आलं-गेलं की त्यांच्याबरोबरचे ड्रायव्हर, मदतनीस यांना जेवण दिलं की नाही, असं विचारता. मी म्हणते आता, हा माझा अपमान आहे. तुम्ही जर मला हे असं विचारलंत, तर मला आवडणार नाही. तुमच्यापेक्षा मला जास्त समजतं.

पण मला एक सांगा, की बाबा खरंच रसिक कवी आहेत. तर तुम्ही दोघं कधी चांदण्यात वगैरे फिरायला गेलात का हो?

चांदण्यात नाही, पण भयंकर वादळात गेलो आहोत. बाबा वादळ आहेत ना! उपमा तुम्ही लोकांनीच दिली आहे.
एक आठवण सांगते. एकदा असं महाभयंकर वादळ झालं. बाबा नागपूरला गेले होते. मी दूध काढत होते गायीचं. दुपारी तीनची वेळ होती. टेंपररी शेड होती अशी. वादळ इतकं झालं, की डबरं पडलं सगळं आणि टिना उडून पडल्या इकडे तिकडे. एक-एक किलोमीटर लांब गेल्या उडत. दूध काढलं होतं ते मातिमय झालं. कसेबसे आम्ही सगळे वाचलो. थोडं वादळ शांत झाल्यावर मी घरात गेले. झोपडीच होती ती. कुडाच्या भिंती होत्या आणि चुना लेपला होता. तर पोरं जिवंत दिसली. विकास, प्रकाश दोघंही कॉटखाली गेली होती आणि कॉटवर चुना आणि भिंत पडली होती! म्हणजे पोरं मरून गेली असती दबून.

अशी वादळं नेहमीच यायची. तेव्हा बाबा म्हणत, हं चल, फिरायला चल. विजांचा गडगडाट. रस्त्यावर कुणी नाही. लोक घराची दारं बंद करून बसायचे. आम्ही विकासला, प्रकाशला घरात कोंडून ठेवायचो आणि फिरायला जायचो त्या वादळात. विजा चमकायच्या. मग काय करायचं? ही सवयच होऊन गेली मला. वादळाबरोबर जगायची. (हसत.)

मला चार पुरस्कार मिळाले. अण्णासाहेब ससे, मामा क्षीरसागर म्हणतात, आनंदवनची गवळण, आनंदवनची अन्नपूर्णा! कारण रात्री-बेरात्री उठवायचे तुमच्यासारखे. (हसत) तिसरी म्हणजे आनंदवनची यशोदा - कारण ह्या पोरांचा सांभाळ केला म्हणून. चौथा पुरस्कार म्हणजे आनंदवनची मोलकरीण, कारण भांडीधुणी करायचे. सासरी गेले की मोलकरीण घरी बसायची. कौतुकानं माझ्या सासरचे म्हणायचे, मोलकरीण आली वरोड्याची आता.
एक प्रसंग सांगण्यासारखा आहे. एकदा रात्री साडेनऊ वाजता आम्ही थकूनभागून अंथरुणावर पडलो. रात्री अण्णासाहेब, राम बेलवडी, इस्रायलचे कौन्सल जनरल, त्यांची बायको आणि इतर सहा-सातजण आले. ओली लाकडं होती. तसाच स्वयंपाक केला. तवा बाजूला ठेवला. दिवे नव्हते. त्यामुळे तव्यावर हात पडला. हात पूर्ण भाजला. खोबर्‍याचं तेल लावलं तर जास्तच दुखायला लागलं. मी अण्णांना म्हटलं, आता सकाळी इतक्या गाईंचं दूध कसं काढू? बरं, गाई अशा असतात, की त्या दुसर्‍याला हात लावू देत नाहीत. सकाळी नेहमीप्रमाणे तीनला उठले. माझ्यामागे अण्णा बसले. गाईला खायला दिलं, पाय बांधले. एका हातानं मी आणि एका हातानं अण्णांनी असं दूध काढलं. गाईला अण्णा दिसले नाहीत, मी दिसत होते. (हसत) असे गमतीचे प्रसंगही खूप आहेत.

आधी आनंदवन, मग सोमनाथ, मग भामरागडच्या जंगलात, मग भारत जोडो आणि आता नर्मदेच्या काठी लढा सुरू या अस्थिरतेबद्दल तुम्हाला काही वाटत नाही?

नाही. मी कधी विचारच केला नाही. आम्ही सगळं डिसओन केलं. बंगला वगैरे ज्याचं त्याला देऊन टाकलं. माझ्या मुलांना आज एक हक्काची झोपडीसुद्धा नाही. खरं सांगायचं म्हणजे, आता काय चिंता करायचीये?

तसं नाही, पण स्वातंत्र्याच्या चळवळीत ज्यांनी भोगलं आहे त्यांना वाटतं, की तुम्ही कुणीही व्हा, पण आमच्यासारखे होऊ नका. त्यांच्यात कडवटपणा आला आहे.

आमच्यामध्ये दया आणि करुणा पूर्वीपासूनच आहे. त्यामुळे फाटक्यातुटक्या कपड्यांतली मुलं पाहिली, की मला गिल्टी वाटतं. आपण गुन्हा करत आहोत. आपण चांगलं खातो वगैरे...

माझ्या मुलांचं बालपण निघून गेलं. म्हणजे असंच गेलं. मुलांना कधी बिस्किटांचा सहा आण्यांचा पुडा नाही घेऊ शकलो. स्वेटर्स नव्हते कधी. माझे ब्लाऊज घालून पोरं निजायची थंडी वाजते म्हणून. म्हणजे इथपर्यंत सोसलं, पण मला कधी वाईटही वाटलं नाही. मुलांशी खेळायला कुणीच नव्हतं. दोघंच. तिसरा एक दत्तक घेतला, तो नारायण. तिघंच खेळायचे. कुणी पाहुणे आले, की मध्येच, बाबा, हे केव्हा जाणार आहेत, असं विचारायचे. (हसत) इतकी लाज वाटायची! जे पाहुणे आवडायचे, त्यांच्या चपला लपवून ठेवायचे. मी नागपूरला गेले होते. तिथे मुलांनी दुकान पाहिलं. ते तुटून पडले. हे उघडा, ते बघा, पेपरमिंटच्या बरण्या उघडून बघा. लाज वाटली मला. हे घेऊन दे, ते घेऊन दे, असा हट्ट करायला लागले. तोपर्यंत दुकानच पाहिलं नव्हतं त्यांनी कधी मोठं.

पण आता मुलांनासुद्धा पैशांचा लोभ नाही. दोघंही डॉक्टर आहेत. लक्ष्मी त्यांच्या पायाशी खेळली असती. पण ऐन तारुण्यात पंचविसाव्या वर्षी त्यांनी इतका त्याग केला आहे, की त्यांची सर मलासुद्धा येणार नाही.

नर्मदा आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का?

माझा ना? मनातून नाहीये. मी तिथे डिटॅच्ड आहे. म्हणजे बाबांबरोबर राहायचं म्हणून आहे मी तिथे. नुकताच सेंधव्याला मोठा सत्याग्रह झाला होता. आदिवासी मुक्ती संघटनेचा. त्यावेळी बाबांबरोबर मीही गेले आंदोलनात. म्हटलं, मलाही पकडा. माझा तात्त्विक विरोध नाही. अनेक लोकांचा प्रश्‍न असतो आणि कुठे काही दिसलं, की बाबा धावत जातात. झोकून देतात. जिवाची पर्वा करत नाहीत. मीपण करत नाही.

एकदा तर वाघ आला होता आनंदवनात. वाघानं पलंगाखालून आमचा कुत्रा लांबवला. उन्हाळ्याचे दिवस होते. विकास, प्रकाश आम्ही सगळे अंगणात झोपलो होतो. बाबा अंधारातच वाघाच्या पाठीमागे धावले. मीपण धावले. बाबांनी हाट् हाट् करून त्याला घाबरवलं. वाघानं कुत्रा टाकून दिला. तो रक्तबंबाळ झालेला कुत्रा बाबांनी खांद्यावरून आणला.

दोन ध्रुवांवर दोघे आपण असं अजूनही वाटतं का तुम्हाला?

म्हणजे कोणत्या अर्थानं?

म्हणजे स्वभाव वगैरे.

हो. तसं आहे. इलेक्ट्रिसिटी निर्माण होताना जसं पॉझिटिव्ह-निगेटिव्ह असतं ना? मला माहीत नाही. सायन्स विसरले आता मी. पण दोघं सारखे असतील तर रिपल्शन होतं. नाही का?

तसा आपला उघडा संसार आहे. आणि लोक तर सतत तुमच्याभोवती गराडा घालून असतात. या सगळ्या गर्दीतून तुम्हाला कधी मुलं, सुना, नातवंडं असं कौटुंबिक वातावरण असावं असं वाटलं का?

नाही. मला कधीच वाटलं नाही. मी कधीही झुरले नाही. आपली कर्तव्यच करत गेले. ही जी लहान मुलं असतात आमच्या इथे 'गोकुळ'ची वगैरे, त्यांच्याबद्दल मला जास्त प्रेम आहे. तसं मला दहाव्या वर्षापासूनच मातृत्व बहाल झालंय. वडील लवकर गेल्यानं एक महिन्याच्या छोट्या बहिणीचं मीच केलं. नंतर मला अनेक बोलावणी यायची. कोणा मुलाची आई मरून गेली, तर अंघोळ घालून दे वगैरे.

आता ताजी गोष्ट सांगते. 'गोकुळ'मध्ये आमच्याच पेशंट्सची मुलं असतात. महारोग झाला म्हणजे त्यांच्या अतिशय हालअपेष्टा होतात. त्यांना कोण विचारतंय? कुठेही ठेवून देतात त्यांना. अशी पुष्कळ मुलं आमच्याकडे आहेत. मागच्या वर्षी एक मुलगा बी. कॉम.ला होता. तो एकाएकी गेला. त्याचे आईवडील त्याच्याजवळ होते. मरताना त्यानं काय म्हणावं? ताईआजी जिथे असतील तिथे मला घेऊन चला. मला हे जेव्हा कळलं, तेव्हा रडू आवरेना. आईवडील जवळ असताना कसं हे असं असावं?

बाबांच्या कामामुळे कृष्णाबाई निमकरांनी म्हटल्याप्रमाणे किंवा कमलाताई होस्पेटांनी म्हटल्याप्रमाणे बाबा अनेकांचे जावई झाले. अनेकांचा मुलगा झाले. म्हणजे तुम्हाला अनेक सासवा झाल्या.

मला सासवाच जास्त आहेत! (हसत) मी जिथे गेले तिथे सुनेचीच भूमिका केली. मी सासूची भूमिका बजावूच शकत नाही. प्रकाशचं लग्न जमलं, तेव्हा मला एक पत्र आलं, की साधनाताई, तुम्ही आता सासूची भूमिका शिकली पाहिजे. (हसतच)

आणि मला वाटतं, की सगळ्या सासवांमध्ये बाबा ही सर्वांत खाष्ट सासू तुम्हाला मिळाली आहे ना?

हो! (अगदी मनापासून हसत) पण काय आहे, त्यांच्या तोंडावर ज्वाला आहे, पण पोटात प्रीती आहे. मला काही झालं तर बाबा इतके अस्वस्थ होतात, की त्यांचा सगळा मूड जातो. व्याकूळ होतात माझ्याकरता.

बाबांनी कधी पत्रं लिहिली का हो तुम्हाला?

लग्नाच्या आधी लिहिली. हो! बाबांनी मला मागणी घातली याचा अभिमान आहे मला. मी काही गेले नव्हते त्यांना विचारायला.

तुमच्याऐवजी दुसरी स्त्री बाबांची पत्नी असती, तर त्यांनी इतकं काम केलं असतं, असं तुम्हाला वाटतं का?

हा प्रश्‍न बरोबर नाहीए. (हसत) 'स्त्रीमुक्ती'वाली असती, तर दोन दिवसांतच घटस्फोट झाला असता! (हसतच)

म्हणजे तुम्ही मेड फॉर इच अदर आहात तर! तुम्ही सगळं लिहीत का नाही?

हो अगदी खरं, त्यामुळे हे कार्य होऊ शकलं. एक सांगते, ओम शांतिः शांतिःसुद्धा मला शांतपणे म्हणता येत नाही. धावपळच सगळी. आता तर पाठीत खूप दुखतं. नाहीतर मी सगळं लिहू शकते. जी पुस्तकं बाबांवर लिहिली आहेत, ती सगळी सुपरफिशल आहेत. बाबांच्या बाबतीत सात आंधळे आणि हत्ती असं आहे. ज्याला जो भाग दिसला, तो त्यानं लिहिला. बरा-वाईट. कोणी शिखरावर चढवलं, कोणी खाली उतरवलं. पूर्ण बाबा मलाच माहीत आहेत. पण लिहायला वेळ काढू कसा? लिहायला शांतपणा पाहिजे. बाबांच्या पायाला गर्दी आहेच. जिथे जाऊ तिथे गर्दी. मग सांगा पाहू कसं लिहू? सुनीताबाई देशपांडेंनी लिहिलंय ते 'आहे मनोहर तरी', तसं माझं 'होते अवघड तरी' असं म्हणावं लागेल.

तुमची मुलं या कार्यात स्वेच्छेनं आली का?

अगदी स्वेच्छेनं आली. त्यांना कोणत्याही प्रकारची बळजबरी नव्हती. त्यांनी आपणहून निर्णय घेतले आहेत. आता प्रकाशची मुलं आणखी पुढे जंगलात जाऊन काम करायला तयार आहेत. आता हे कसं झालं? तर आमचे संस्कार त्यांच्यावर झाले. हमालांची, मजुरांची मुलं असलेल्या शाळेतूनच त्यांचं शिक्षण झालं. आमची मुलंसुद्धा अशीच शिकली. अठरा घंटे आमचं फिजिकल कामच सुरू होतं.

आज कुणी संस्थेतल्या बायका कामावरून बोलल्या की मी भडकते. कारण आजही मी स्वतः तेवढंच काम करू शकते. आधी कधी कामाची सवय नव्हती, तरी नंतर शेकडो बादल्या पाणी विहिरीवरून भरलं होतं. हात रक्ताळून जायचे अगदी. बाबा चूल सारवायचे. श्रमाची प्रतिष्ठा बाबांना पहिल्यापासून खूप आहे.

आता नर्मदा आंदोलनाच्या वेळी एक फरक झाला आहे बाबांमध्ये. नर्मदेवर मी रोज मंदिरातली पूजा करायची. मी नसताना बाबा आपोआप पूजा करायला लागले. म्हटलं हा चमत्कार! एकदा मी गमतीत म्हणाले होते, की ज्या दिवशी बाबा पूजा करतील त्या दिवशी त्यांना पालखीत टाकावं लागेल. बाबा पूजेच्या कट्टर विरोधी होते. म्हटलं, हे परिमार्जन असलं पाहिजे. आता पूजा करता करता ते गणपतीच्या प्रेमातच पडले आहेत.

मला वाटतं, ताई तुम्ही त्यांचं हृदयपरिवर्तन केलंत.

हो मग! आहेच. सत्याचासुद्धा इनक्युबेशन पीरिअड असतो.

इंदूताई आणि साधनाताई अशी तुमची दोन नावं आहेत. इंदूताई हे माहेरचं नाव, मग साधनाताई नाव कुणी ठेवलं?

बाबांनी! साधना नाव ठेवून एक्सप्लॉइट करायचं होतं मला. माझी साधना! वेदना ही साधना आहे, असं म्हणतात बाबा. मला दोन्ही नावं आवडतात.

सभेच्या सुरुवातीला बाबा आधी 'साधना आमटे' असं नाव घेतात. अगदी राष्ट्रपती भवनातसुद्धा. तुमच्यानंतर मग इतर नावं घेतात.

हो! अगदी राष्ट्रपतींच्या हस्ते बक्षीस घेतानासुद्धा माझं नाव आधी घेतलं. आता मी त्याच्यावर मल्लीनाथी करते, की कोणतीही पूजा करताना गणपतीची पूजा आधी करतात, विघ्न येऊ नये म्हणून, तसं तुम्ही माझं नाव आधी घेत असाल! (हसत) विघ्न नाही आणायचं कधी म्हणून!

(ही मुलाखत शरश्चंद्र गोखले आणि सविता भावे यांनी घेतली होती. मुलाखतीच्या आशयामध्ये बदल न करता ती संपादित स्वरूपात पुनर्प्रकाशित करीत आहोत.)

('अंतर्नाद', सप्टेंबर १९९८)


***


***

युगमुद्रा
बाबा आमटे : साधना, वारसा आणि प्रेरणा
(१९१४ - २००८)

मेनका प्रकाशन
किंमत - रुपये २५०
पृष्ठसंख्या - १९७


***


पुस्तकातील मजकूर प्रकाशनापूर्वी 'मायबोली'वर प्रसिद्ध करण्यास परवानगी दिल्याबद्दल श्री. आनंद आगाशे, श्रीमती सुजाता देशमुख व मेनका प्रकाशन यांचे मनःपूर्वक आभार.

या लेखातील मजकुराच्या कुठल्याही स्वरूपातील पुनर्मुद्रणास परवानगी नाही.***
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एका चांगल्या संग्रहाची (अँथॉलॉजी) ओळख करून दिल्याबद्दल आभार.

अक्षरवार्ताच्या निमित्ताने उत्तमोत्तम पुस्तकांचा परिचय तुमच्यामुळे होतो.

शब्द नाहीत! काय अफाट आयुष्य! आपली सगळी रडगाणी अर्थशून्य वाटायला लागतात!
साधना ताईंची ही मुलाखत फक्त लिखित स्वरुपातच आहे का?

कस्ली आभाळाएवढी व्यक्तिमत्वं आहेत ही .... फारच सुर्रेख मुलाखत ...

धन्यवाद चिनूक्स, या संग्रहाची ओळख करून दिल्याबद्दल व ही माहिती येथे आणल्याबद्दल. >>> +१००

कशी परिपूर्ण स्त्री होती ही.. नतमस्तक..
खुपच सुंदर मुलाखत आणि उत्कृष्ट पुस्तक परिचय. थँक्स चिनूक्स.

आज समोरची स्क्रीन धूसर होण्याची दिवसातली दुसरी वेळ आहे. सकाळी वॉट्सपवर अमेय पंडीतने आयुष्यातल्या सकाळींचा फार सुंदर धावता आढावा घेतला तो वाचून आणि आता साधनाताईंची मुलाखत वाचून. समिधा वाचताना आपण आपले रहात नाही. आता युगमुद्रा वाचतानाही तसाच अनुभव असेल.

देवाच्याही अगोदर ज्या नावासमोर नतमस्तक व्हावे अशी व्यक्ती आणि त्यांचा परिवार. साधनाताईं...एक स्त्री अशी की २४ तासही कामासाठी अपुरे पडावेत. आदर्श असेच सारे काही.

कोल्हापूरातील एका सभेत श्री.बाबा आमटे यानी भाषणाला सुरुवात करताना (पाठीच्या त्रासाने त्यानी कॉटवर पडूनच भाषण केले होते. त्याना उभे राहाता येत नसले तरी अशा लोकसंग्रह कार्यक्रमांना ते आवर्जून उपस्थित राहत असत. मात्र स्टेजवर कॉटच्या सोईबद्दल संयोजकांना तशी आगावू कल्पना दिली जात असे....) ते म्हणाले, "साधना आमटे आणि स्टेजवरील उपस्थित सज्जन....". त्या क्षणीच ताईंच्या महतेची कल्पना आम्हा उपस्थितांना आली होती. अत्यंत योग्य असाच तो मान देत असत बाबा साधनाताईंना.

केवढे उत्तुन्ग व्यक्तिमत्व आणी केवढी सहजता आहे बोलण्यात! साधनाताई.न्चा सेन्स ऑफ ह्युमर ,हजरजबाबीपणा दिसुन येतोय मुलाखतित!

आभाळाएवढी व्यक्तिमत्वं आहेत ही...खरच .साधना आमटे यांची मुलाखत खुप छान आहे .
या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद

आभाळाएवढी व्यक्तिमत्वं आहेत ही...खरच .साधना आमटे यांची मुलाखत खुप छान आहे .
या पुस्तकाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद +१

धन्यवाद चिनूक्स! एव्हढी सर्वांगसुंदर मुलाखत कित्येक वर्षांत वाचली नव्हती. तुमच्यामुळे ओळख झाली. पण तरीही एक सुन्नता दाटून राहिलीये. विजेचा लोळ कडाडून गेल्यावर उरतो तसा सुन्नपणा.
आ.न.,
-गा.पै.

देवदूत! दोघांचीही कमाल आहे. संपत्ती, ऐश्वर्य, सुख सगळं सोडून हा मार्ग अवलंबणे, आणि इतका त्रास, कष्ट , आजारपण काढूनही, त्याच मार्गावरून चालत रहाणं केवळ अशक्य! पण त्यांनी हे केलं आणि त्यांच्या पुढच्या पिढ्याही हेच करतायत. _____________/\_______________.

" दिव्यत्वाची जेथ प्रचिती, तेथे कर माझे जुळती. "

चिनूक्स,

धन्यवाद. ती सारी फॅमिलीच superhuman आहे !

काही महिन्यांपूर्वी आम्ही आनंदवन, सोमनाथ आणि हेमलकसाला राहून आलो. दुर्दैवाने आता बाबा आणि साधनाताई नाहीत. पण त्यांचं कार्य आणि आत्ता डॉ. विकास, भारतीताई, डॉ. प्रकाश, डॉ. मंदाताई आणि त्यांची मुलं ज्याप्रकारे ते कार्य पुढे नेत आहेत ते बघून मला खात्रीच पटते की देवत्व देवत्व म्हणतात ते इथे आहे. मंदिरात नाही.

सुशिक्षित माणसानी शिरडी अन् तिरुपतीला जायचं तर जरूर जावं पण त्याबरोबरच (किंबहुना त्याआधीच) ह्या तीन ठिकाणी जाणं जरूर आहे.

धन्यवाद चिन्मय. तू पुस्तकात बघून बघून मुलाखत टाईप केलीस.. पुस्तक परिचय करुन दिलास त्याबद्दल धन्यवाद.

फड्यांबद्दल वाचून छान वाटले. शिंदीचे झाड कधी पाहिले नाही.

साधनाताईंची विनोदबुद्धी कारुण्य दोन्ही गुण भावलेत.

पुस्तक नक्की घेणार आहे.

सुशिक्षित माणसानी शिरडी अन् तिरुपतीला जायचं तर जरूर जावं पण त्याबरोबरच (किंबहुना त्याआधीच) ह्या तीन ठिकाणी जाणं जरूर आहे.>> खरच आपण सगळे जिथे देव नाही तिथे जातो .. खरा देव तर हे दोघे आहेत.

२६ जुल्ऐ रवीवारी डॉ. प्रकाश आमटे यांच्यावरचा सिनेमा झि वर आहे.
नाना पाटेकरांचा अभिनय व आमटे कुटुंबिय याचे कार्य सर्वच अफाट् आहे... ___/\___

हेमलकसा

रंजले गांजले आदिवासी
जमात त्यांची माडीया
लुटुनी त्यांचे अनुदान
अधिकाऱ्यांनी बांधल्या माड्या

नक्षलवादाचा घेऊन संशय
मांडला त्यांचा छळ
जन्मताच ज्यांची
ठेचली गेली नाळ

जगण्यासाठी करती
कसबसे मेळ
वर्दीतील जनावरे
करिती शरीराशी खेळ

निबिड अरण्यात शिरला
प्रकाशाचा एक कवडसा
घेऊन मानवतेचा वसा
गाव वसवले हेमलकसा

अनाथ प्राण्यांसाठी
काढले त्यांनी निवास
बनले प्राणिमित्र
गौरविले त्यांस भारतरत्न

सहकारी भेटले सारे
होते ध्येयाने भारलेली
सहचरी पण अद्वितीय
भुवरी देवमाणसे पेरलेली

राजेंद्र देवी

Pages