(अंध)श्रद्धेची ऐसी की तैसी

Submitted by स्वीट टॉकर on 19 December, 2014 - 02:47

लहान असताना गणपतीचे दिवस अगदी खास असायचे. (आता देखील असतातच, पण त्या वयातली मजा आगळी.) टीव्ही अजून भारतात आलेला नव्हता. आणि आपलं मूल प्रत्येक activity मध्ये एक नंबरी असलं पाहिजे अशी पालकांची मानसिकता नव्हती. त्यामुळे शाळा सुटली की हुंदडायला पोरं चिकार असायची.

गणपतीच्या आधी टोळक्याटोळक्यानी सर्व मित्र मैत्रिणींच्या घरी जाऊन आरास करायची, गणपती यायया दिवशी घसा फुटेस्तोवर ‘गणपतीबाप्पा मोरया’ चा गजर करायचा आणि रोज संध्याकाळी जास्तीत जास्त घरांमध्ये आरतीला जाऊन प्रसाद चापायचा - हे नॉर्मल. सोसायटीअचं गॅदरिंग असायचं त्यासाठी नाटकं, नाच, नकला वगैरे बसवायचे. सगळ्यांच्या घरी जाम धमाल यायची.

हे ही म्हणणं तितकसं खरं नाही. एक असं घर होतं की तिथे धमाल नव्हती. आपला समाज पुरुषप्रधान आहेच, पण एका मित्राच्या घरी अतीच होतं. त्याचे वडील सोडून इतर कोणच्याही मताला आणि आवडीनिवडींना काहीही किंमत नव्हती. त्यातून ते महा गणेशभक्त होते. गणपतीसाठी काहीही केलं तरी त्यांना ते अपुरच वाटायचं. त्यांच्या दृष्टीनी आरास बरोबर काटकोनात नसायची, नैवेद्याच्या ताटातले पदार्थ पुरेसे चविष्ट नसायचे, घरातल्या स्वच्छतेत काहीतरी कमतरता असायची, मंत्रपुष्पांजलीतले उच्चार स्पष्ट नसायचे. एक ना एक.

आम्ही आरास करायला आणि आरती करायला जायचो खरे, पण आमचं मन त्यात नसायचं. मित्राची, त्याच्या बहिणीची आणि आईची आम्हाला कीव यायची.

त्या दिवसात गणेशमूर्ती दुकानातून घरी आणणं, आणि नंतर विसर्जनासाठी समुद्रावर नेणं पायीच असायचं. एका वर्षी विसर्जनाला जाताना मित्राचे वडील दुर्दैवानी ठेचकाळले, हातातली मूर्ती घसरून जमिनीवर पडली आणि फुटली!

झालं ! आकाश कोसळलं ! भगवंताचा कोप झाला होता ! जाणता अजाणता काहीतरी घोडचूक झाली होती आणि गणेशानी नापसंती दाखवली होती. गेल्या पूर्ण वर्षाच्या सर्व खर्‍या आणि कल्पित चुकांची उजळणी झाली. तज्ञ आणले गेले. विविध शांत आणि पूजा केल्या गेल्या.

त्यांचे नातेवाइक, मित्रमंडळी, त्यांचे फॅमिली डॉक्टर वगैरे सगळ्यांनी आपापल्या परीने बाबांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.

आपण उत्तरपूजा केलेली होती. म्हणजे त्यातलं देवत्व नाहिसं झालेलं होतं. उरली होती फक्त मूर्ती. ती तुटणं म्हणजे काही देवाचा कोप नाही –
किंवा
आपण विसर्जन करतो म्हणजे मूर्ती विरघळवतोच ना? मग त्या आधी जर ती तुटली तर तो काय महाकोप आहे का?
किंवा
खरी श्रद्धा तुझ्या मनात आहेच, मुर्तीपूजा हे त्याचं फक्त प्रतीक असतं - वगैरे.

पण व्यर्थ. पालथ्या घड्यावर पाणी. फॅमिली डॉक्टरांनी आपल्या सायकिऍट्रिस्ट मित्राला बोलवून घेतलं पण पेशंटनी सहकार्य केल्याशिवाय ते तरी काय करणार?

त्यांनी जेवणखाण जवळजवळ सोडलं, अंथरूण धरलं, कामावर जाणं देखील बंद झालं. आता मात्र सगळ्यांचच धाबं दणाणलं. पण ओढवून घेतलेला आजार. नातेवाईक आणि मित्रमंडळी किती दिवस साथ देणार? कुटुंबाची दयनीय अवस्था. व्हरांड्यात त्याची आई बसायची, डोळ्यातून घळाघळा पाणी. बाजूला मित्र आणि त्याची बहीण, केविलवाण्या चेहर्‍यानी तिच्याकडे पहात असायचे ! ते वय असं असतं की आईवडील सर्वेसर्वा असतात. तेच अगतिक झाल्यावर मुलं सैरभैर झाली.

कठिण समय येता, कोण कामास येतो ?

त्याच्या आईला एक भन्नाट आयडिया सुचली ! जर एखाद्याला झोपेचं औषध दिलं अन् त्याला झोपू दिलं नाही की त्याची भ्रमिष्टासारखी अवस्था होते. खरं आणि स्वप्न ह्याची सरमिसळ व्हायला लागते.

तिचा प्लॅन असा. आमचा एक मित्र गुटगुटीत होता. त्याला गणपतीचा मेकअप करायचा. गजवदनासकट. वर म्हटल्याप्रमाणे बाबांची अवस्था करून गणपतीला त्यांच्या खोलीत पाठवायचं.

खोलीत जाऊन गणपतीनी म्हणायचं, “वत्सा, मी तुझी सत्वपरीक्षा पहात होतो. तुझी भक्ती पाहून मी प्रसन्न झालो आहे. ही वेळ गृह्स्थश्रमाची कर्तव्ये करण्याची आहे. हीच माझी खरी आराधना. जा ! परत पूर्ववत् आपल्या कुटुंबाची काळजी घे. आता डोळे मीट. मी अंतर्धान पावलो की तुला माझी आरती ऐकू येईल. मगच डोळे उघड.” बाबांनी जर डोळे मिटले नाहीत तर गणपतीनेच हाताने ते मिटायचे.

आमच्या जाड्या मित्राची हे नाटक करण्याची कुवत नव्हती आणि इच्छा तर त्याहून नव्हती. पण त्या काळात त्या वयोगटात गुटगुटीत मुलं क्वचितच दिसायची. त्यामुळे choice नव्हता. त्याला बळेबळेच तयार केलं. भरपूर प्रॅक्टीस करून घेतली.

सगळी तयारी झाली. डॉक्टरांनीच झोपेच्या औषधाचा योग्य तो डोस तीर्थाच्या नावाखाली पाजला आणि ते बाबांशी गप्पा मारत राहिले. झोपू दिलं नाही. (आज कोणीही डॉक्टर असा धोका पत्करेल असं काही मला वाटत नाही.) योग्य गुंगी दिसल्यावर बेडरूममधून बाहेर पडले.

गणपतीला तयार ठेवलंच होतं. त्याला बेडरूममध्ये पाठवलं. दिवाणखान्यात आई आणि डॉक्टर. आम्ही मुलं आणि तीनचार काकू दाराबाहेर उभे. आम्हाला आतलं ऐकू येत होतं पण दिसत काही नव्हतं. हळूहळू चालत तो बिछान्याकडे गेला.

गणपतीला बघताक्षणी बाबांनी बिछान्यावरून ताडकन् उठण्याचा प्रयत्न केला पण ते उभं राहाण्याच्या अवस्थेत नव्हते. क्षीण आवाजात “गणराया ऽऽऽ” अशी आरोळी ठोकून ते धाडकन् जमिनीवर कोसळले ! शेजारी ठेवलेला पाण्याचा तांब्या ठण्ठणत खाली पडला अन् घरंगळत गेला. फरशीवर पाणीच पाणी.

गणपती बिचारा इतका गांगरला, सगळं पाठांतर विसरला ! आता मात्र त्याचा धीर सुटला. तो आल्या पावली उलटा वळला आणि धावतंच दारातून बाहेर पडला! इतक्या मेहनतीनं रचलेलं नाटक या घाबरट पोरामुळे जर का पडलं तर आपल्या उर्वरित आयुष्याचं कसं खरोखर नाटक होईल हे आईनी क्षणार्धात ओळखलं असणार. तिनी पळणार्‍या गणपतीला घट्ट पकडलं. डॉक्टरही मदतीला आले. गणपती जेरबंद झाला.

त्याची रडक्या सुरात भुणभुण सुरू झाली. डॉक्टर आपल्या मृदु पद्धतीत त्याला समजावायला, धीर द्यायला लागले. पण गणपतीचा रडका सूर काही बदलेना. नाजुक तंत्रानी हा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून आईनी त्याला खसकन् ओढलं आणि एक धपाटा त्याच्या पाठीत घातला !

“अगं लले, काय करतियेस तू हे?” मित्राच्या बाबांचा आर्त स्वर ! सगळे जागच्या जागी थिजले !

हॉलमधल्या कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं की बाबा रांगत रांगत गणपतीच्या मागोमाग बेडरूमच्या दारापर्यंत आले होते आणि धपाटा पाहिला होता! This was a complete disaster!

प्रसंगावधान, प्रसंगावधान म्हणतात ते काय असतं त्याचं अफलातून प्रात्यक्षिक पुढच्या क्षणी डॉक्टरांनी दाखवलं.
त्यांनी जमिनीवर लोळण घेतली अन् आईचे पाय धरले. “पार्वतीमाते, तुझ्या आणि गजाननाच्या दर्शनानी मी धन्य झालो !”

बस्स. पार्वतीला एक हिंट पुरेशी होती ! तिनी पटकन् गणपतीला आपल्या पाठीशी घातलं, बाबांसमोर उभी राहिली अन् करड्या आवाजात म्हणाली, “मी स्वतः या घरात राहाते आहे. असं असताना गणपतीनी तुझी परीक्षा घेणं अयोग्य होतं. वत्सा, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झाले आहे. जा. तुझ्या गृहस्थश्रमाच्या जबाबदार्‍या व्यवस्थित उचल. त्यात हयगय करू नकोस. आज तू जे पाहिलं आहेस त्याची वाच्यता कुठेही करायची नाही.”

अंतर्धान पावणं शक्य नसल्यामुळे तिनी त्यांना तशाच परिस्थितीत बाबांना परत बेडरूममध्ये ढकललं आणि दार लावून घेतलं !

प्रसंग तिथेच संपला. काकूंनी आम्हा सगळ्यांना तिथून पिटाळून लावलं. ज्या जाड्या मित्राची आम्ही चेष्टा करायचो तो आता आमचा हीरो झाला कारण त्या एकट्यानीच सगळं पाहिलं होतं आणि आंखो देखा हाल चं रसभरित वर्णन आम्हाला पुनःपुन्हा ऐकवलं.

या प्रसंगानंतर एक विचित्र परिणाम झाला जो आमच्या बालमनाला पूर्णपणे अगम्य होता. आमचा मित्र आणि त्याची बहीण घरातून बाहेर येण्याचे अजिबात बंद झाले. दुसर्‍याच दिवशी त्याचे मामा मामी त्यांच्याकडे रहायला आले. आमच्या बिल्डिंगमधले सीनियर लोक त्यांच्याकडे जायचे, खलबतं चालायची पण त्याची अजिबात कुठेही चर्चा होऊ द्यायचे नाहीत. इतका मजेदार किस्सा पण सगळे सुतकात असल्यासारखे !

आमच्या घरातलं वातावरण अगदी मोकळं असायचं. सर्व विषयांवर आईवडिलांबरोबर मोकळेपणानी चर्चा चालायची. मात्र या प्रसंगाबाबत ते ही बोलेनात. आठवड्याभरानी मित्राची संपूर्ण फॅमिली अचानक घर सोडून गेली ! का, कुठे, कधी येणार वगैरे कितीही खोदून विचारलं तरी आमच्या आईवडिलांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन आमची बोळवण केली.

सगळ्यांच्या पालकांनी “या बाबतीत एकही अवाक्षर बाहेर बोलायचं नाही” अशी तंबी दिली असल्यामुळे अर्थातच आम्हाला तेच बोलण्यात प्रचंड रस होता. मात्र त्या वयात प्रत्येक दिवस एक नवनवीन adventure घेऊन येत असतो. हळुहळू आम्ही हा प्रसंग विसरलो.

या गोष्टीला पंचेचाळीस वर्षं झाली. गेल्या वर्षी मी दुबईला एका सेमिनारला गेलो होतो तेव्हां नाव परिचित वाटल्यामुळे अधिक चौकशी केली. तर तोच मित्र होता ! खूप गप्पा झाल्या. त्याच्याकडून पुढची हकीकत समजली.
त्याचे बाबा हयात नाहीत. आता ही हकीकत सांगायला हरकत नाही.

त्या दिवशीच्या नाटकानंतर बाबांची तब्येत सटासट सुधारायला लागली हे सांगायलाच नको. पण आसपासच्या सर्व लोकांना आणि मुख्यत्वेकरून मुलांना प्रत्यक्षात काय झालं ते माहीत असल्यामुळे सत्य कुठल्याही क्षणी आणि कोठल्याही कारणाने बाहेत पडण्याची शक्यता डॅमोक्लिसच्या तलवारीप्रमाणे त्यांच्या डोक्यावर लटकत राहिली असती. सत्य जर का बाबांना कळलं असतं तर त्याच्या परिणामांची कल्पना देखील करणं अवघड आहे. त्यामुळे आईनी तडकाफडकी घर बदलण्याचा निर्णय घेतला आणि अंमलातही आणला. मुलांच्या शाळा देखील बदलल्या. मित्र आणि त्याची बहीण हैराण झाले. काहीही पूर्वसूचना नसताना सगळे मित्र तोडून टाकणं हे बालमनाला शक्य होईल काय?

पण फारच थोडेच दिवसात नवीन ठिकाणी रुळले याचं मुख्य कारण म्हणजे त्यांच्या घरातल्या वातावरणात झालेला प्रचंड बदल !

आता बाबा हे आईचे भक्त झाल्यामुळे सगळंच सुरळित आणि सोपं झालं. योग्य निर्णय आई बेधडकपणे घेऊ शकत होती. मुळातच आई हुषार आणि well organised होती. बाबांच्या अवास्तव अपेक्षांचं लोढणं दूर झाल्याबरोबर सार्‍या कुटुंबाची सर्व बाबतीत प्रगती सुरू झाली आणि वातावरणही wonderful !

त.टी.
ही हकीकत जरी unique असली तरी समाजातली एक वस्तुस्थिती बोचणारी आहे. ती अशी की आज खूपच अशी कुटुंबं दिसतात की ज्यात खरं तर स्त्री जास्त हुषार आणि practical असते. मात्र पुरुषी अहंकारामुळे बहुतेक निर्णय नवरे एकांगी घेतात. कुवत आणि अहंकार यांचं प्रमाण नेहमीच व्यस्त असतं. त्यामुळे अशा लोकांची कुवत मर्यादितच असते. त्यांच्या हे लक्षात येत नाही (किंवा येत असेल तर मान्य करण्याचं धारिष्ट नसतं) की जर निर्णयप्रक्रियेत घरच्या सगळ्यांचा वाटा असला तर निर्णय अचूक तर होतोच, शिवाय घर आनंदी राहातं आणि प्रगतीही सहजगत्या होते.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माफ करा, पण ही शुद्ध लोणकढी थाप वाटते आहे. विशेषतः मित्राची घर सोडून जाण्याची हकीकत तर कथेत सुद्धा कुणी विश्वास ठेवणार नाही इतकी अतार्किक आहे. आजकाल ज्या भंगार मालिका येतात टीव्हीवर त्यांना ही कथा पाठवलीत तर कदाचित चार-पाच भाग होतील त्यांचे याच्यात - पाणी घातल्यास महिना सहज निघेल.

त्या प्रसंगात सगळ्यांनी केले ते अगदी योग्यच होते. सर्वांचे सहकार्य मिळाले ते उत्तम.
बाकी केवळ मूर्तीतच देवत्व पहायची अंधश्रद्धा मलाही पटत नाही.

सुंदर, एका किर्तनात मिरजेच्या डॉक्टरांनी केलेले मानसोपचार ऐकले होते त्याची प्रचिती आली.

एका पेशंटला आपण आपण चुकुन पाल खाल्याचा भ्रम झाला होता. पेशंटचा अन्न पाणी गोड लागेना म्हणुन मिरजेला नेला. तिथल्या डॉक्टरांनी वांतीच औषध देऊन वांती झाल्यावर त्यात एक मेलेली पाल हळुच टाकुन प्रथम पेशंटची भ्रांती मिटवली. ह्या नाटकाने पेशंटची खात्री पटली की आतड्याला चिकटुन बसलेली पाल वांती सोबत बाहेर आली. पुढे त्या पेशंटची तब्येत सुधारली.

सुंदर, एका किर्तनात मिरजेच्या डॉक्टरांनी केलेले मानसोपचार ऐकले होते त्याची प्रचिती आली.

एका पेशंटला आपण आपण चुकुन पाल खाल्याचा भ्रम झाला होता. पेशंटचा अन्न पाणी गोड लागेना म्हणुन मिरजेला नेला. तिथल्या डॉक्टरांनी वांतीच औषध देऊन वांती झाल्यावर त्यात एक मेलेली पाल हळुच टाकुन प्रथम पेशंटची भ्रांती मिटवली. ह्या नाटकाने पेशंटची खात्री पटली की आतड्याला चिकटुन बसलेली पाल वांती सोबत बाहेर आली. पुढे त्या पेशंटची तब्येत सुधारली.

घरातील निर्णय सर्वांनी मिळून घ्यावे हे नेहमीच श्रेयस्कर आहे. ज्याला जास्त माहिती आहे त्याचे मत प्रमाण मानणे हे सुध्दा बहुतेक कुंटुंबात रूढ आहे. वरील घटनेत पुरूषी अहंकाराचा नसुन त्यांच्या देवभोळेपणाचा जास्त अंतर्भाव आहे असे मला तरी वाटते.

बादवे, ही घटना खरी आहे का कलिप्त ते सांगाल का?

त्याची रडक्या सुरात भुणभुण सुरू झाली. डॉक्टर आपल्या मृदु पद्धतीत त्याला समजावायला, धीर द्यायला लागले. पण गणपतीचा रडका सूर काही बदलेना. नाजुक तंत्रानी हा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून आईनी त्याला खसकन् ओढलं आणि एक धपाटा त्याच्या पाठीत घातला !
“अगं लले, काय करतियेस तू हे?” मित्राच्या बाबांचा आर्त स्वर ! सगळे जागच्या जागी थिजले !
हॉलमधल्या कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं की बाबा रांगत रांगत गणपतीच्या मागोमाग बेडरूमच्या दारापर्यंत आले होते आणि धपाटा पाहिला होता! This was a complete disaster!

बापरे, हा प्रसंग इमॅजिन करून अशक्य हसलो....:हहगलो: Rofl

हा हा किस्सा खरा असेल तर कमाल आहे, कल्पित असेल तरीही धमाल आहे.. नाटकाचा अंक बनेल मस्त .. लहान मुलांनाही दाखवण्यासारखे नाटक बनेल..

तरीही मला वाटते किस्सा खराच असावा, असे प्रकार पाहिलेत..
लोक कावळ्यामध्ये पूर्वज येतात वा स्वामीबाबांच्या रुपाने देव अवतार घेतात यावर शुद्धीत विश्वास ठेवतात तर मग गणपतीबाप्पा त्याच्या गेटअपमध्ये दर्शन देतो यावर गुंगीत विश्वास ठेवायला हरकत नाही..

हा किस्सा खरा आहे Uhoh वाटत नाही.

अंधश्रद्धा, स्त्री जास्त हुषार आणि practical, पुरुषी अहंकार बर्याच गोष्टींची सरमिसळ वाटते.

त्याची रडक्या सुरात भुणभुण सुरू झाली. डॉक्टर आपल्या मृदु पद्धतीत त्याला समजावायला, धीर द्यायला लागले. पण गणपतीचा रडका सूर काही बदलेना. नाजुक तंत्रानी हा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून आईनी त्याला खसकन् ओढलं आणि एक धपाटा त्याच्या पाठीत घातला !
“अगं लले, काय करतियेस तू हे?” मित्राच्या बाबांचा आर्त स्वर ! सगळे जागच्या जागी थिजले !
हॉलमधल्या कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं की बाबा रांगत रांगत गणपतीच्या मागोमाग बेडरूमच्या दारापर्यंत आले होते आणि धपाटा पाहिला होता! This was a complete disaster!

बापरे, हा प्रसंग इमॅजिन करून अशक्य हसलो.... Rofl मी पण Rofl

त्याची रडक्या सुरात भुणभुण सुरू झाली. डॉक्टर आपल्या मृदु पद्धतीत त्याला समजावायला, धीर द्यायला लागले. पण गणपतीचा रडका सूर काही बदलेना. नाजुक तंत्रानी हा प्रश्न सुटणार नाही हे ओळखून आईनी त्याला खसकन् ओढलं आणि एक धपाटा त्याच्या पाठीत घातला !
“अगं लले, काय करतियेस तू हे?” मित्राच्या बाबांचा आर्त स्वर ! सगळे जागच्या जागी थिजले !
हॉलमधल्या कुणाच्याच लक्षात आलं नव्हतं की बाबा रांगत रांगत गणपतीच्या मागोमाग बेडरूमच्या दारापर्यंत आले होते आणि धपाटा पाहिला होता! This was a complete disaster!

बापरे, हा प्रसंग इमॅजिन करून अशक्य हसलो.... हसून हसून गडबडा लोळण मी पण हसून हसून गडबडा लोळण >>> मी पण Happy

कथेवर विश्वास ठेवणे अवघड वाटते आहे. तरी गणपतीला धपाटा घालणे आणि त्या गृहस्थांनी रांगत दारापर्यंत पोचण्याचे वर्णन वाचून जाम हसायला आले.

तांब्यापडला, पाणीच पाणी, गणपतीला धपाटा, रांगणारे काका, पार्वतीचे धरलेले पाय.... अशक्य जमलंय वर्णन. मजा आली.

किस्सा भारी आहे. खरा, खोटा कसाही असो, मजा आली वाचायला इमॅजिन करून.<< +१
मला ते गावी रामलिला करतात (मुव्हीत बघितलेले) तसा प्रकर डोळ्यासमोर आला. Lol

हा ग्रुप कथेचा असल्यामुळे मायबोलीकरांना इथे कल्पित कथा वाचायची सवय झाली आहे. मी लिहिलेली एकही गोष्ट काल्पनिक नाही. fiction मला वाचायलाही आवडत नाही त्यामुळे लिहिण्याचा प्रश्नच नाही.

संसार पाठीवर घेऊन आयुष्यभर जग भटकल्यामुळे खूप वेगवेगळे अनुभव गाठीशी आहेत. आजची reaction बघून असं वाटत आहे की फक्त असेच अनुभव इथे टाकावेत ज्यांची सत्यता तुम्हाला internet व्रर पडताळून पाहाता येईल.

प्रसादराव किस्सा अफलातून आहे. Happy

इथे हवे ते लिखाण तुम्ही करु शकता पण प्रतिक्रिया तुम्हाला अनूरूपच येतील हा आग्रह ठेवू नका. Happy आणि हो कोणामूळेही / कुठल्याही प्रकारच्या प्रतीक्रियांमूळे जे लिहायचे ठरवले आहे ते लिहायचे थांबू नका. Happy

पूलेशू.

"आणि हो कोणामूळेही / कुठल्याही प्रकारच्या प्रतीक्रियांमूळे जे लिहायचे ठरवले आहे ते लिहायचे थांबू नका..."

+ ११११११११११

सहमत.......

Pages